Apr 1, 2022

॥ श्री आनंदनाथ महाराजकृत श्रीगुरुस्तव ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः


ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल समर्था । तव पदी ठेवोनि माथा । स्तवितों ताता तुजलागीं ॥१॥ मूळ स्वरुप तूंचि निराकारू । अवघा जाण तुझाचि आकारू । सच्चित् आनंद आधारू । ॐकारा थारू तूंचि खरा ॥२॥ सर्वा पाहातां सर्व आपण । सर्वामाजी सर्व गुण ।  तत्वांचे केलें बंधन । चालविता खुण तूंची खरा ॥३॥ तूंचि माया अतित । तूंचि माया रहित । तूंचि मायासहित । परब्रह्म व हीत तूंचि खरा ॥४॥ योग याग आकारु । योग ब्रह्म निराकारु । तेथे केलें चराचरु । इच्छामात्रे जाण पां ॥५॥ मूळ आकार गुरु । तया माजील रुकारु । तेथें सत्य स्वरूपीं  निर्धारु । चित् कारणी पैं झालें ॥६॥ सत्चित्ताचा आल्हादु । सहज झाला आनंदु । तेथे ॐकारासि बोधु । तीन गुणा निर्मिले ॥७॥ अर्ध मातृका सबळ । सत्य स्वरूपीं केवळ । माया बळें अवघा खेळ । लीलामात्रें चालविला ॥८॥ पंच तत्वांचा भास । तेथेंचि झाला आभास । मानिती अभ्यास । शुन्यवत् जाणुनी ॥९॥ जें जें आहे तेंचि नाहीं । नाहीं तेंचि पाही । तेथेंची मुरोनी राहीं । आत्मस्वरुपा ओळखुनियां ॥१०॥ होते तें आकाराशी आलें । होणार तें स्तब्ध राहिलें । दोहोंचे ऐक्यत्व भंगलें । द्वैत शमलें त्या ठाया ॥११॥ जें पहावें तें असे । तेथोनि तेंही नसे । परी शोधितां वसे । शोधा निज गुज ॥१२॥ जें आकारा आलें । तेंचि साक्षात्कारी बोलिलें। शून्याच्या ठावा नाहीं गिळिलें । आत्म कळलें कवण्यापरी ॥१३॥ मायिक माया मोह । मायेचा बुडाला समूह । मग श्रांतीचा भाव । कवण्या परी ॥१४॥ चहुं देहीं चार झाले । चहूं माजीं चार गुंतले । ते उलटतां माघारें पावले । पांचवीं मिळाले निजरूपा ॥१५॥ आधींच अवघा भासु । याचा न करणें अभ्यासु ।  मानणे तितका नासु । भ्रांति भावें होतसे ॥१६॥ होतें तें नाही जाहले । नव्हतें तें  कोठूनि आलें । कैसे भ्रांतीत हे भुलले । मायामोहें करुनियां ॥१७॥ आधिच देह आकारु । पंचतवांचा भारु । तीन गुणे बांधिला सारु । केला वेव्हारु मायेचा ॥१८॥ तेथे उमजलिया खूण । मग होईल ओळखण । आत्मयाचे ज्ञान । समरुपीं  जाणावया ॥१९॥ भ्रांतीचा सरलिया भास । मग तो सहजचि प्रकाश । जेथें कल्पनेचा नाश । होय दास काळ पायीं ॥२०॥ तीन्हीं काळांचे बंधन । सहज मोक्ष लाधे साधन । मुक्तिचे धन । म्हणती आत्मज्ञानघन तया ॥२१॥ आत्मा आत्मींचा वेव्हार । सूक्ष्मी शोधावा बाजार । आत्मशुद्धि निरंतर । ज्ञानमार्गे होय पाहा ॥२२॥ आपला आपण जहालिया वरी । मग सहजचि निवाला अंतरी । विश्वांबरी चराचरी । होय निर्धारीं निजरूपा ॥२३॥ तेथे नाही मी-तूं पण । सहज गळाले द्वैतबंधन । मुमुक्ष मोक्षाचे बंधन । तोडिले साधन सिद्धाचें ॥२४॥ नको वेद आकारु निराकारु । स्वयं जाणे ब्रह्म चराचरु । तेथेच स्थिरावे अंतरु । येर भारु वायां पै ॥२५॥ आपण होतां सर्वां ठाई । मग वासना गळाली पाहीं । जेथे भेद नाहीं संदेही । वृत्ती वाहीं कवण्यापरी ॥२६॥ आपला आपण भरून गेला । आपणामाजीं आपण जिराला । आप-तूं-पणातें विराला । मग उरला काय सांग ॥२७॥ जेव्हां आपण तैसें व्हावें । तेव्हां त्या रुपांत मिळावे । मग ब्रह्म पाहावे । निज देहीं ॥२८॥ जरी चराचरी भरला आकारु । तरी तनुमाजी तोचि आधारु । मी-तूं-पण वेव्हारु । माया अहंकारू वागविता ॥२९॥ भी बुडलिया कारण । माया विराली सहजचि जाण । तूंपणाची तेथें खुण । नाहींच भिन्न देखिलें ॥३०॥ अवघा ऐक्यामाजी ऐक्य जाहला । तोचि चारामाजी विराला । पूर्णानंदी भरूनि राहिला । नामें गुंतला निजरूपा ॥३१॥ तरी अद्वैत ब्रह्मीची खूण । न कळे जिरलिया वांचून । जेव्हा जाईल वितळून । तेव्हां मिळणे समरूपी ॥३२॥ जरी हा राहे देहीं । तरी सहज पडे संदेहीं। माया भ्रांति तेथे पाही । भ्रम भलीं घालितसे ॥३३॥ देह तत्वीं गोविला । व्यवहार गुणीं वाहिला । आपण स्वयेंचि राहिला । निजानंद भोगावया ॥३४॥ आप नाहीं आपण । तेथें नेणेचि जाणीवपण । उणीवपणाची खूण । गळोनि केली सर्वथा ॥३५॥ स्वयंजोतीचा प्रकाश । तेजोमय भासवी भास । जंववरि नसे तेथें वास । तंववरी अभ्यासें कवण लाभे ॥३६॥ सर्वां ठाई सर्व भरला । सम विषम स्वयेंचि झाला । निजरूपारूपीं मिळाला । तोचि उरला निज ठाया ॥३७॥ शोधिता न कळे कदां । जो अबोध झाला वेदां । तो स्थिरचरीं वागे सदां । ज्ञानें खूण जाणती ॥३८॥ स्वयं स्वरूपी रंगावे । ब्रह्मांड स्वरूपीं ऐक्य व्हावें । विश्वामाजी भरून जावें । मग पहावे आत्मसुख ॥३९॥ ऐसी विघडलिया सोय । नरदेही जाहला हो अपाय । वृथा शिणविली माय । करील हाय बापुडा ॥४०॥ आणावे तें काय । तेथे वसे काय । कवण त्याची बापमाय । सांग पाय सुदरोनियां ॥४१॥ जरी ब्रह्मी ब्रह्मांड बोलिला । तरी ब्रह्म कैसा कळला । कळतां मग वळला । बोलावया कवण्यापरी ॥४२॥ नेणे आणणे जया नसे । जें स्वयं सर्वी वसे । तें बोलवे भासे । कवण्यापरी ॥४३॥ तया देशील काय । घेणार घेईल कैसे पाय । वृथा भ्रांतिचा ऊपाय । भरली माय अर्भकाची ॥४४॥ जरी नाहीं समाधान । तरी कैचें ब्रह्मज्ञान । ब्रह्मब्रह्मीची ती खूण | आत्म आत्मीं काय निवडीली ॥४५॥ नाहीं तुझें तुज कळले । मग नेणार काय नेईल वहिलें । देणार देतो काय लिहिलें । अक्षर बोधीं बोध नव्हे ॥४६॥ जरी जाणसी आनंदाचा छंदु । तरीच जोडेल ब्रह्मानंदु । फुका न करी वादु । चावटा परी ॥४७॥ 

॥ राजाधिराज योगीराज श्रीगुरुस्वामी समर्थ महाराज की जय ॥


No comments:

Post a Comment