॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवताभ्यो नमः ॥ श्री इष्टदेवताभ्यो नमः ॥ श्री ग्रामदेवताभ्यो नमः ॥ श्री स्थानदेवताभ्यो नमः ॥ श्री सर्वदेवदेवताभ्यो नमः ॥ श्री नवग्रहदेवताभ्यो नमः ॥ श्री मातापितृभ्यां नमः ॥ ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्री अक्कलकोट स्वामी राजाय नमः ॥ सर्व गुणांचा नायक । बुद्धीज्ञानाचा दायक । अखिल विघ्नांचा हारक । गजानना मी नमितसे ॥१॥ नमन माझें मयुरेश्वरी । विद्यादेवी वागेश्वरी । ग्रंथ लिहावया मजवरी । कृपा करी जगदंबे ॥२॥ श्री गुरुदत्ता वंदीतसे । त्रिगुणाचा अवतार असे । कलियुगी जो नांदतसे । प्रगटरूप होऊनी ॥३॥ स्वामी दत्ताचा अवतार । सर्व भाविका आधार । करितो वंदन साभार । कृपा प्रसाद मिळावया ॥४॥ भिन्न विषयांचे भिन्न गुरू । त्यांच्या ठिकाणी धरुनी आदरू । वंदुनी तया मागतो वरू । कार्यसिद्धी व्हावया ॥५॥ मी तो आहे मतिहीन । परि इच्छा गावया तव गुण । तुझ्या नांवें स्तोत्र करून । सेवा करावी आपुली ॥६॥ नाहीं वाचन नाहीं लिखाण । नाहीं ज्ञान नाहीं घ्यान । कोणतें करू आकर्षण । तव प्रीति मिळावया ॥७॥ कामादि षड्रिपू छळिती । मायेनें गात्रें गळती । मनींचे मांडे मनीं राहती । निराशा ती चहूंकडे ॥८॥ मन चंचल वाऱ्यापरी । स्थिर होत नाहीं ध्यानावरी । तव कृपा नच हो जरी । व्यर्थ आयुष्य जाईल हें ॥९॥ संसारि सुख व्हावे म्हणुनी । अहोरात्र कष्टा करूनी । दुःख होतें शतगुणी । धन दौलत येतां परी ॥१०॥ नकळत आयुष्य चाललें । इंद्रियावरी ताबा न चले । किती एक निश्चयो ढळले । काय करावे न कळे ॥११॥ संसार यातना कठीण । कनक कांता मोह दारुण । किती पापें घडती हातून । स्मरतां भिती वाटतसे ॥१२॥ माझें माझें करितों निशिदिनी । परी विचारित नाहीं कोणी । सुखाचे असती सर्वधनी । व्यवहार हा जगींचा ॥१३॥ ज्ञानाच्या गोष्टी सांगती । आचारीं ज्या कधी न येती । मृगजळापरी सर्व भासती । तृप्ती कधी न होतसे ॥१४॥ स्वानुभवावाचून बोलती । उपदेशामृता पाजिती । परी भाव तो नाहीं चित्तीं । बोल तें फोल होतसे ॥१५॥ गर्वोक्तीने बोलतसे । सर्वांना तुच्छ मानीतसे । शहाणा काय तो मीच असे । मनीं ऐसे समजतो ॥१६॥ पुस्तकी ज्ञान वाचिलें । ज्ञानवंती सांगितलें । परी हृदयीं ठसावलें । काय करू महाराजा ॥१७॥ नियम केले बहुतापरी । न होतां यथासांग जरी । फलश्रुति नच ये करी । व्यर्थ कष्ट होत असे ॥१८॥ किती काळ नेत्रा मिटतो । तव मूर्ती ध्यानीं आणितो । परी न खोले अंतःचक्षू तो । उपाय कोणता करू मी ॥१९॥ नामस्मरण करितां जरी । कार्य होते भराभरी । ऐशी भाषा ऐकतो परी । अनुभव कां तो येईना ॥२०॥ वाचतो ऐकतो बहू ते । परी ध्यानीं मुळी न राहते । पाठ्य ते विसरुनी जाते । काय करावे समजेना ॥२१॥ पूर्वार्जित असती भोगाभोग । ते भोगण्यासि हा जन्मयोग । तरावयाचा कधीं ये सुयोग । कोणी कांहीं सांगेना ॥२२॥ पापपुण्याचा हिशोब न कळे । भ्रांत होते मन त्यामुळे । कार्याकार्यी नित्य गोंधळे । प्राणिमात्र या जगीं ॥२३॥ आयुष्य आले संपावया । हा जन्म जाईल की वाया । याची चिंता नित्य हृदया । स्वामी माते वाटतसे ॥२४॥ आतां करितो एक विनंती । गुणावगुणा नाणी चित्तीं । सदय हृदय धरुनी हातीं । हेतु सफल करावा ॥२५॥ अनन्यभावें शरण तुजशी । जागृती स्वप्नीं त्या वाचविशी । त्यांची चिंता नित्य वहासी । हे तो सर्वां ठाऊक ॥२६॥ तूं ही माता तूं ही पिता । पाळिता सर्वां सांभाळितां । सर्व संकटी रक्षणकर्ता । स्वामी अमुचा आहेस तूं ॥२७॥ केलें तें विसरूनि जाई । क्षमा करी मज लवलाही । शरण आलो तुज पाही । भेट द्यावी स्वामी मला ॥२८॥ तुझ्या नांवाची केली नौका । मध्ये बसुनी मारितो हाका । डळमळे तारू वाटे धोका । घे मज स्वामी परतीरा ॥२९॥ मी तो आहे पूर्ण अज्ञानी । परी शरण तुज लागोनी । पाही मज कृपा दृष्टीनी । धन्य होईल स्वामिया ॥३०॥ स्वामी केव्हां कोठे उद्भवले । हे तो कोणा नाही कळले । दत्तावतार मानियले । सर्व थोर विभुतींनी ॥ ३१ ॥ प्रथम दत्त श्रीपाद दुसरे । नृसिंह सरस्वती हे तिसरे । चवथे स्वामी साजरे । चार अवतार पुरुष हे ॥ ३२ ॥ तेजःपुंज कांति दिव्य । गौरवर्ण शरीर भव्य । आजानबाहू महाभाग्य । देहसौष्ठव न वर्णवे ॥३३॥ नासिका सरल कर्ण विशाल । छाती भरघोस गती चपल । कौपीन कधीं नग्न नवल । सर्व भाविका वाटतसे ॥३४॥ शिरोत्तम सुंदर भिवया । नेत्रकमल भरले कृपया । स्फटिक माला शोभे हृदया । कमरशोभा मेखला करी ॥३५॥ कमलैव चरण भासती । कांती पाहनि नेत्र दीपती । वदन शोभा चंद्रापरि ती । रेखीव सर्व स्वरूप तें ॥३६॥ स्वामीच्या त्या लीला बहुत । वर्णितो तेथें किंचित । तेणे वाढे भक्ति मनांत । हेतु साध्य व्हावया ॥३७॥ स्वामीने दृष्टी फिरविता । वांछित आपुले ये हाता । स्वामीतें शरण जाता । दुरित जाती पळोनी ॥३८॥ राव रंका मानी समान । वागवी सर्वां प्रेमें करून । करी भक्त शंका निरसन । न बोलतां क्रिया करोनी ॥३९॥ चोळाप्पा भक्ति शिरोमणी । आणिला स्वामी चिंतामणी । अर्पिता सर्वस्व तच्चरणी । स्वामी प्रकटरूप जाहले ॥४०॥ रहिले स्वामी चोळाप्पा घरीं । लीला केल्या बहतांपरी । घेऊनि परीक्षा परोपरी । सत्पात्र केले तयाते ॥४१॥ मोडी फोडी फेकुन देई । कृष्णवत केली नवलाई । चोळप्पा पत्नी होऊन आई । सांभाळिले ब्रह्मरूप ते ॥४२॥ चोळाप्पाची एकनिष्ठ भक्ति । दिल्या पादुका दिव्य शक्ति । झाली त्यांची सर्वत्र कीर्ति । दर्शनी मुक्तजन झालें ॥४३॥ बाळाप्पा स्वामीभक्त श्रेष्ठ । मानिली स्वामीसेवा इष्ट । सांगतो त्यांची अल्पशी गोष्ट । स्वामी लीला वर्णावया ॥४४॥ संसार सोडिला बाळाप्पाने । स्वानंद मिळाया स्वामी कृपेनें । केली पदयात्रा त्याने । अक्कलकोटी पातला ॥४५॥ अनन्य भावे सेवा केली । तहान भूक हरपली । सर्वस्व देतां विरक्त झाली । बाळाप्पाची वृत्ति पहा ॥४६॥ मारुनी चापटी पाठीवर । केले बाळाप्पा मन स्थिर । करावया भक्ति दृढतर । हंसध्वज चरित्र दाविले ॥४७॥ निर्लज्ज होऊनी सेवा करावी । हिशेब ठेवोनी जपमाळ घ्यावी । गुरु येता जवळी शंका नसावी । स्वामी बोलले बाळाप्पा ॥४८॥ बाळाप्पाची पाहुनी भक्ति । कृतकृत्य केले त्यास जगतीं । वाढली बाळाप्पाची कीर्ति । अक्कलकोटी मठ स्थापितां ॥४९॥ स्वामी सूत मुंबापुरीचे । महान भक्त श्री स्वामींचे । अलौकिक प्रेम हो त्यांचे । वर्णन कसे करूं मी ॥५०॥ हरीभाऊ त्यांचे मूळ नांव । जिल्हा रत्नागिरी इलिया गांव । गांवचे खोत दृढ स्वभाव । लहानपणा पासोनी ॥५१॥ नोकरीवरी संकट आले । स्वामी कृपें दूर झालें । तत्काळ अक्कलकोटी गेले । श्री स्वामीते भेटावया ॥५२॥ हात ठेवितां मस्तकावर । षड्रिपू ते गेले दूर । वैराग्य आले अनिवार । स्वामी कृपाप्रसादें ॥५३॥ दिल्या पादुका स्वामीसुतास । स्थापावया मुंबापुरीस । सोडोनि आपुल्या नोकरीस । लोककल्याणार्थ झटावे ॥५४॥ लुटवली घरदार संपत्ती । बोलावुनी ब्राह्मणाप्रती । धन्य धन्य ती तारका सती । शुभ्र वस्त्र तें नेसली ॥५५॥ घेतली हातात तुंबरी । घेवोनि स्वामी अंतरी । भजन करी निरंतरी । स्वामी अगाध लिलांचे ॥५६॥ दादा बुवा मोर पाखरूं । मस्तकी ठेवोनिया करू । विरक्त केलें देवोनि वरू । अघटित घटना करवली ॥५७॥ आनंदनाथ वालावलचे । मस्तकीं तुकडे डहाळीचे । पडता दर्शन स्वामींचे । अक्कलकोटी जाहले ॥५८॥ दिगंबर होवुनी राहिले । सहा वर्षे तप केले । अनुज्ञा होता निघाले । स्वामी मठ स्थापावया ॥५९॥ झाले स्वामी तया प्रसन्न । आत्मपादुका स्वयंपूर्ण । काढोनि दिल्या मुखांतून । आनंदनाथ धन्य झाला ॥६०॥ तात महाराज तीन वर्षाचें । झाले भक्त बाबुलनाथाचे । तीनवेळा दृष्टांत स्वामीचे । होतां गेले अक्कलकोटीं ॥६१॥ वडाखाली जातां पाहिले । श्रीशंकराने स्वामीस वंदिलें । तत्काळ स्वामीचरणां नमिलें । स्वामी सेवक जाहले ॥६२॥ बाळकृष्ण दादर मठाचे । पूर्ण नास्तीक मूळचे । उपदेश ऐकुनि ताताचे । स्वामींचे भक्त जाहले ॥६३॥ नित्यानंद भजनांत । वैराग्यें झाले सिद्धभक्त । स्वामी चरणीं अनुरक्त । नित्य राहिले बाळकृष्ण ॥६४॥ विष्णुबुवांचा गर्व हरला । स्वप्नीं विंचवाचा मारा केला । शरण येतां मुक्त झाला । खरा मार्ग दाखविला ॥६५॥ ठाकुरदास मुंबईचे । देऊनी भस्म लाकडाचे । कुष्ट गेलें तत्क्षणी त्यांचे । स्वामीभक्त तो जाहला ॥६६॥ दादासाहेब चिंचोरकर । कुष्ठ झालें मांडीवर । बघतां घाबरले फार । गेले शरण स्वामियां ॥६७॥ आंगठी पांढऱ्या खड्याची । घडवलेली सोन्याची । जरी होती बहु मोलाची । फेकून देण्या सांगितलें ॥६८॥ कुष्ट ते गेलें तात्कालिक । पाहूनि स्वामींचे कौतुक । जडली भक्ति अत्यंतिक । संसारी सुखी जाहले ॥६९॥ दामले वकील भक्तश्रेष्ठ । मुळव्याध झाली अनिष्ट । गोमुत्राने केली नष्ट । अक्कलकोटकी स्वामीनें ॥७०॥ अनुज्ञा मागे बंडास । शरण जाऊनी स्वामींस । नकार दिला जाणूनी दुःखास । वासुदेव बळवंताते ॥७१॥ चिंतोपंत आप्पाटोळ । स्वामीतें भजती सर्वकाळ । पूजार्थ देती स्वामी दयाळ । पाटावरी पादुका उमटवूनी ॥७२॥ राधानांवें कसबीण । रूपवती कलावंतीण ।। स्वामी दर्शना लागोन । आली भाग्य तें उदेलें ॥७३ ॥ स्वामीची कांती देखतां । पडे मोह तिच्या चित्ता । मिळावा नर भोक्ता । मनीं इच्छा जाहली ॥७४॥ जों जों स्वामींकडे पाही । कामातूर राधा होई । कटाक्षे इच्छा प्रगटवी । स्वामी कौतुक पाहती ॥७५॥ तिचा तो काम जावयाते । देई स्तना ब्राह्मणाते । बोलले स्वामी तियेतें । राधा आश्चर्य जाहली ॥७६॥ स्तन जातां विरक्त झाली । अनन्यभावें शरण गेली । काशीतें जाऊनी राहिली । स्वामींची सेवा करीत ॥७७॥ श्रीरामानंद बिडकर । हनुमानाचा भक्त थोर ।। विरक्त व्हावया लौकर । श्री स्वामीतें शरण गेले ॥७८॥ स्वामींचा लागतां छंद । बिडकरा जाहला आनंद । केलें भजन होऊनी धुंद । संवत्सर एक तयाने ॥७९॥ करण्या पाद संवाहनाते । बिडकर बैसले रात्रीतें । जानुमध्ये द्वय नागाते । फणा काढतां देखिलें ॥८०॥ निर्भयपणे सेवा केली । स्वामी उठले निद्रा झाली । क्रोधानें थप्पड दिली । जिंदा राक्षस बोलले ॥८१॥ बिडकर बेशुद्ध पडले । शुद्धीवर येतां ज्ञान झाले । प्रखर वैराग्य प्राप्त झाले । तेव्हापासूनि बिडकरा ॥८२॥ बोटे स्वामी चवदा वर्षांचे । प्रीतीपात्र चिदंबराचें । दर्शन घेण्या श्रीस्वामींचें । पायी चालत निघाले ॥८३॥ स्वामींसाठी पेढा घेतला । परी दर्शनी तल्लीन झाला । पेढा विसरातां घेतला । स्वामीने त्याच्या पासोनी ॥८४॥ नृसिंह सरस्वती आळंदीचे । प्रयोग करिती हटयोगाचे । मार्ग न मिळता समाधीचें । गेलें शरण स्वामींया ॥८५॥ लोक अज्ञा चक्र भेदाचा । सांगता योग शास्त्राचा । साधला योग समाधीचा । नृसिंह सरस्वतीतें ॥८६॥ समाधीने सिद्धी मिळाली । शिष्य परंपरा वाढली । कीर्ती सर्वत्र पसरली । साधु साधु म्हणोनी ॥८७॥ रावजी पाटील विठाबाई । स्वामी प्रसन्न पूर्व पुण्याई । अजब केली कारवाई । रामपूर ग्रामांमध्ये ॥८८॥ चाळीस माणसांचा नवस । फेडावया धरूनी उद्देश । स्वामी यावे जेवावयास । हात जोडोनी विनविले ॥८९॥ घातले मंगल स्नानांते । मनोभावे पूजिता श्रीतें । बोलले स्वामी दाम्पत्याते । भोजन सर्वां घालावे ॥९०॥ दाम्पत्य साशंकमनीं झालें । स्वामीनें तत्क्षणी जाणले । सर्वान्न आणाया सुचविलें । रावजी विठाबाईस ॥९१॥ देवी खंडोबादि टाक आणिले । अन्नामाजी ते ठेविले । अन्नपूर्णा पूजन करविले । पंक्ती बसविल्या जेवावया ॥९२॥ चार हजार वृंद जेविला । स्वामींचा जयजयकार झाला । अद्भुत चमत्कार पाहिला । आबाल वृद्ध जनांनी ॥९३॥ पाण्याच्या गुळण्या टाकिल्या । अग्निज्वाळा प्रदीप्त झाल्या । जैशा कां घृत आहुती दिल्या । होम कुंडा माझारी ॥९४॥ आला न्यावया काळपुरुष । बाबा जाधव भक्तास । धरी घट्ट स्वामी चरणास । सेवा पुरी करावया ॥९५॥ यमातें परत पाठविले । वृषभातें नेण्या सांगितले । जाधवातें वाचविले । वृषभ केला मुक्त तो ॥९६॥ इटगीचा रावण्णा वाणी । सर्प दंशे पडला धरणीं । मारिल्या हाका त्रिवार कर्णीं । उठला स्वामी प्रतापे ॥९७॥ श्री गुरुकाका महाराजांनें । नोकरी सोडली स्वामी आज्ञेनें । मठ स्थापिला प्रेमाने । गोवित्री गांवीं जाऊन ॥९८॥ गोवित्री गायत्रीचे स्थान । करावया अनुष्ठान । गायत्री मंत्राचे ज्ञान । लाधलें स्वामी कृपेनें ॥९९॥ लीला तो अगणित असती । परी किंचित दाविल्या स्तोत्रीं । त्या योगें ठसावें चित्तीं । स्वामी तो पूर्णावतार ॥१००॥ अनंत कोटी ब्रह्मांड नायक । न वर्णावे वर्णितां लौकीक । शरण आलो मारितो हाक । मार्ग तो मज दाखवी ॥१०१॥ ध्यानांत आणोनी स्वामीतें । पूजन करा एकाग्र चित्तें । लावोनी धूपदीप नैवेद्याते । आदरें स्वामींस अर्पावे ॥१०२॥ सुप्रभातीं शयन काळीं । स्तोत्र म्हणावे एकांत स्थळीं । येईल प्रेमाची उकळी । आनंदभाव दाटतील ॥१०३॥ भावे वंदुनी प्रार्थना करा । जयजय समर्था स्वामी वरा । कैवारी दीनांचा आसरा । स्वामी राया तूं असे ॥१०४॥ कर्तुमकर्तुं तुझी शक्ति । दुर्गुणाचीही सद्गुण मूर्ति । घडविशी तूं सहजगती । हें तो मी जाणतसे ॥१०५॥ कोणा कैसे उद्धरावे । ही तो रीति तुज ठावें । मज विषयी मी काय सांगावें । जाणतोसी तूं सर्व ॥१०६॥ या जगीचें महागूढत्व । उकलूनी दावी मज तत्त्व । किती तळमळती तव । भक्त, कृपा करी महाराजा ॥१०७॥ तूं अससी अक्कलकोटकीं । अज्ञानाच्या सारूनि पुटी । भवसागर परतटाकी । नेण्या समर्थ तूं एक ॥१०८॥ तूंचि मालक तूंचि चालक । भक्तांचा संकट निवारक । दुर्जनांचा संहारक । शरण आलो मी तुला ॥१०९॥ स्वामी समर्था तूंचि एक । दृढावला हाचि विवेक । तूंचि होई मार्गदर्शक । परमार्थ साधावयासी ॥११०॥ प्रतिदिनीं पाठ म्हणावया । स्फूर्ति दिली स्तोत्र करावया । समर्पण हे तव पाया । गोड करूनी ते घ्यावें ॥१११॥ जे जे म्हणतील या स्तोत्रातें । प्रेमें पाळुनी स्वयंमाते । त्यांची इच्छा पुरविण्यातें । स्वामी समर्थ आहेत ॥११२॥ संसारियासी सुख व्हावया । सर्व चिंता नष्ट व्हाया । आरोग्य संतती मिळावया । स्तोत्राधार तो होवो ॥११३॥ विद्यार्थियाला विद्या मिळावी । धनार्थीकडे संपत्ति यावी । मन:कामना पूर्ण व्हावी । स्तोत्र म्हणतां स्वामीराया ॥११४॥ नियमाने जे पाठ करिती । त्यांची चिंता स्वामी वहाती । दृढभाव असावा चित्तीं । मनीं संशय नसावा ॥११५॥ स्तोत्र म्हणतां एकाग्र मनीं । व्हावे नम्र स्वामी चरणीं । मूर्ति दिसेल नयनीं । जागृती स्वप्नीं प्रत्यक्ष ॥११६॥ स्तोत्रे व्हावें सर्वाचे कल्याण । न पडावी कशाची वाण । स्वार्थ परार्थ मिळवून । स्वामी समर्थ देतील ॥११७॥ स्वामींनी स्फूर्ति दिधली । भास्करें कृतिही केली । स्वामी चरणीं ठेविली । अगाध शक्ति स्वामींची ॥११८॥ ॥ इति श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्रं संपूर्ण ॥ ॥ शुभं भवतु ॥ सौजन्य - https://sanskritdocuments.org/
No comments:
Post a Comment