Apr 6, 2022

सार्थ श्रीरामरक्षास्तोत्र


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

भारतभू दैवी समृद्धिनें समृद्ध आहेच. ही दैवी संपत्ती ज्या अनेक साधनातून मिळविता येते, त्यांत स्तोत्र हे एक महान साधन आहे. या स्तोत्राच्या परिपाठाने सर्वसत्ताधीश बनता येते असा विख्यात अनुभव पूर्वसूरींनी नमूद केला आहे.
या स्तोत्रांचे खरे सामर्थ्य त्यांच्या विनियोगांत आहे. " देवता प्रीत्यर्थे जपे विनियोगः ।" असा जो संकल्प आहे यांतच या स्तोत्राचे सर्व रहस्य आहे. या स्तोत्राच्या जपाने आपली आकर्षण शक्ती वाढत जाते. आपल्या उपास्य देवतेचे तेज आपण या शरीराने ग्रहण करतो. शरीर आणि त्या बरोबर आपले मन तेजोमय बनते. त्या तेजांत पूर्वी प्रत्ययाला न आलेल्या अनेक गोष्टी आपल्या प्रत्ययाला येतात. त्यांच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. यालाच आपण आपली देवता आपणास प्रसन्न झाली असे म्हणतो. आपल्या या शरीरांत ते देवताचें तेज ग्रहण करण्याची शक्ती आहे, हे सांगूनही सामान्य माणसाला पटणार नाही. परंतु अनुभवाची कास धरली तर त्याची सत्यता प्रत्ययाला तेव्हांच येते. त्याचे प्रत्यंतर सर्वांना सुलभपणे घेता यावे हा एकमेव उद्देश आहे. 
- श्री. स. कृ. देवधर


श्रीगणेशाय नमः ॥

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य । बुधकौशिकऋषिः । श्रीसीतारामचन्द्रो देवता । अनुष्टुप् छन्दः । सीता शक्तिः । श्रीमद्हनुमान कीलकम् । श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे रामरक्षास्तोत्रजपे विनियोगः ॥ ह्या रामरक्षा स्तोत्राचा बुधकौशिक ऋषी हा कर्ता आहे. श्री सीतारामचंद्र ही स्तव्य देवता आहे, स्तोत्रातील (बहुतेक) श्लोक अनुष्टुप् छंदात आहेत, श्रीमान् हनुमान ही या स्तोत्रांत प्रवेश करण्याची किल्ली आहे आणि श्रीरामचंद्राची प्रीती लाभावी म्हणून या स्तोत्राचा सारखा पाठ करणे हा या स्तोत्राचा उपयोग आहे.

श्रीरामांची ध्यानमूर्ती अशी आहे. । अथ ध्यानम् ।  ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्धपद्मासनस्थं । पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् । वामाङ्कारूढसीतामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं । नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥ ॥ इति ध्यानम् ॥ गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या आणि ज्याने धनुष्य व बाणही हाती घेतली आहेत, जो मांडी घालून बसला असून ज्याने पीतांबर नेसलेला आहे, नवीनच उमललेल्या कमळाच्या पाकळीशी स्पर्धा करणारे असे सुंदर आणि आनंद ओसंडणारे ज्याचे डोळे आहेत, डाव्या मांडीवर बसलेल्या जानकीच्या मुखाकडे जो पाहात आहे, जलपूर्ण मेघाप्रमाणे ज्याची श्यामवर्ण कांती आहे, अनेक प्रकारच्या अलंकारांनी जो सुशोभित झाला आहे आणि ज्याने भव्य जटामंडळ मस्तकावर धारण केले आहे, अशा रामाच्या मूर्तीचे ध्यान करावे. (अंतश्चधूंनी पाहावे.) चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् । एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥ ज्याचे एक एक अक्षर मानवाच्या महाभयंकर पापकर्माचा नाश करते, अशा रघुकुल श्रेष्ठाच्या (रामाचे) चरित्राचा विस्तार शंभर कोटी श्लोकांचा आहे. ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् । जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥ निळ्या कमळाप्रमाणे ज्याचा श्यामल वर्ण आहे, कमळाप्रमाणे ज्याचे डोळे आहेत, ज्याच्या समवेत लक्ष्मण आणि सीता आहेत, आणि जटांच्या मुकुटामुळे जो शोभून दिसतो, सासितूणधनुर्बाणपाणिं नक्तंचरान्तकम् । स्वलीलया जगत्त्रातुं आविर्भूतं अजं विभुम् ॥३॥ ज्याच्या हाती तलवार आणि धनुष्य असून पाठीला बाणभाता बांधलेला आहे, राक्षसांचा संहारक, आणि जगाच्या रक्षणासाठी जन्मरहित सर्वव्यापी असतांनासुद्धा सहज लीलेने अवतीर्ण झालेल्या रामाचे ध्यान करून,

रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् । शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः ॥४॥
सर्व इच्छा पुऱ्या करणाऱ्या, पापाचा नाश करणाऱ्या या रामरक्षा स्तोत्राचे शहाण्या माणसाने पठण करावे. रघुवंशाचे भूषण असलेल्या रामाने, माझ्या मस्तकाचे रक्षण करावे. दशरथाच्या पुत्राने माझ्या कपाळाचे रक्षण करावे.
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रिय: श्रुती । घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ॥५॥
कौसल्येच्या रामाने माझ्या डोळ्याचे, विश्वामित्राला आवडणाऱ्या रामाने माझ्या कानांचे, यज्ञरक्षण करणाऱ्या रामाने माझ्या नाकाचे आणि सुमित्रानंदन लक्ष्मणावर प्रेम करणाऱ्या रामाने माझ्या मुखाचे रक्षण करावे.
जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः । स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः ॥६॥
सर्व विद्यांचा ठेवा अशा रामाने माझ्या जिभेचे, भरताने ज्याला वन्दन केले आहे अशा रामाने माझ्या कंठाचे, दिव्य आयुध धारण करणाऱ्या रामाने माझ्या खांद्यांचे आणि शिवधनुष्य मोडणाऱ्या रामाने माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करावे.
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् । मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ॥७॥
सीतानाथ राम माझ्या दोन्ही हातांचे, जमदग्नीपुत्र परशुरामाला जिंकणारा राम माझ्या हृदयाचे, खर राक्षसाचे हनन करणारा राम माझ्या शरीरमध्याचे, जाम्बवन्ताला आपलासा केलेला राम माझ्या नाभिकमलाचे-बेंबीचे रक्षण करो.
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः । ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥
सुग्रीवाचा स्वामी माझ्या कंबरेचे, मारुतीचा प्रभू राम माझ्या मांड्यांच्या मागच्या भागाचे, रघुकुलांत श्रेष्ठ असणारा आणि राक्षसकुलाचा संहारक राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो.
जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः । पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः ॥९॥
सेतू तयार करणाऱ्या रामाने माझ्या गुडघ्यांचे, रावणाला ठार मारणाऱ्या रामाने माझ्या पोटऱ्यांचे, बिभीषणाला सर्व वैभव देणाऱ्या रामाने माझ्या पायांचे, इतकेच काय श्रीरामाने माझ्या सर्व देहाचे संरक्षण करावे.
एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत् । स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत् ॥१०॥
रामसामर्थ्याने युक्त अशा या रक्षास्तोत्राचे जो पठण करील, तो दीर्घायुषी, सुखी, संततिवान्, विजयी आणि विनयसंपन्न होईल.
पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः । न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः ॥११॥
रामनामाने ज्याचे रक्षण केले जाते, त्याला पाताळ, भूतल आणि आकाश यांत हिंडणारे कपटी लोक पाहू शकणार नाहीत.
रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन् । नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति ॥ १२॥
राम, रामभद्र, किंवा रामचन्द्र असे म्हणून जो मनुष्य रामाचे स्मरण करतो, त्याला पापे चिकटत नाहीत आणि शिवाय तो ऐहिक व पारमार्थिक वैभव मिळवितो.
जगज्जैत्रैकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम् । यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिद्धयः ॥१३॥
जगाला जिंकणारा मंत्र जो रामनाम त्याने संरक्षित (असा एखादा पदार्थ) कंठात धारण केला असता त्याला सर्व सिद्धि प्राप्त होतात.
वज्रपञ्जरनामेदं यो रामकवचं स्मरेत् । अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम् ॥१४॥
वज्राप्रमाणे अभेद्य असे हे रामरक्षा स्तोत्र जो म्हणतो, त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते आणि त्याला जय व कल्याण प्राप्त होते.
आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षांमिमां हरः । तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः ॥१५॥
ही रामरक्षा भगवान् शिवांनी ज्याप्रमाणे बुध-कौशिक ऋषींना स्वप्नात सांगितली, त्याप्रमाणे त्यांनी जागे होतांच लिहून काढली.
आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम् । अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः ॥१६॥ कल्पवृक्षांचा विसावा, सर्व संकटे दूर करणारा, आणि तीनही लोकांना आनंद देणारा राम आमचा स्वामी आहे. तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ । पुण्डरीकविशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ ॥१७॥
तरुण, स्वरूपसंपन्न, सुकुमार, महा-सामर्थ्यवान, कमलपाकळीप्रमाणे विशाल नेत्र असलेले, आणि मृगाजिन वस्त्राप्रमाणे नेसलेले,
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ । पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥१८॥
कन्दमुळे खाणारे, ज्यांनी आपली इंद्रिये जिंकली आहेत, तपोवान ब्रह्मचारी असे हे दशरथाचे पुत्र, एकमेकांचे बंधु राम आणि लक्ष्मण,
शरण्यौ सर्वसत्त्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम् । रक्षःकुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ ॥१९॥
सर्व प्राण्यांना अभय देणारे, सर्व धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ आणि राक्षसांचा नाश करणारे रघुकुलोत्तम राम-लक्ष्मण आमचे रक्षण करोत.
आत्तसज्यधनुषाविषुस्पृशावक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ । रक्षणाय मम रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम् ॥२०॥
सिद्ध धनु आणि बाण, व भाते धारण करणारे असे दोघे राम आणि लक्ष्मण माझ्या रक्षणासाठी माझ्या समोर चालोत.
सन्नद्धः कवची खड्गी चापबाणधरो युवा । गच्छन् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः ॥२१॥
कवच घालून खड्ग आणि धनुष्य-बाण घेवून सदैव सिद्ध असलेला आमचे मानसच जणु काही असा लक्ष्मणासह जाणारा राम आमचे संरक्षण करो.
रामो दाशरथिः शूरो लक्ष्मणानुचरो बली । काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघुत्तमः ॥२२॥
दशरथाचा शूर पुत्र, लक्ष्मण ज्याचा दास आहे, बलवान् ककुस्थ वंशात जन्मलेला, पूर्णब्रह्म कौसल्येचा पुत्र, रघुकुल श्रेष्ठ असा राम-
वेदान्तवेद्यो यज्ञेशः पुराणपुरुषोत्तमः । जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः ॥२३॥
वेदांकडून ज्ञात होण्यास योग्य, यज्ञपुरुष, अनादि पुरुषोत्तम जानकीनाथ, वैभववान् आणि अतुल पराक्रमी-
इत्येतानि जपन् नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः । अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः ॥२४॥
अशा (नांवांनी) नित्य जप करणाऱ्या, श्रद्धावान अशा माझ्या भक्ताला अश्वमेध यशाच्या पुण्यापेक्षा अधिक फल प्राप्त होते यांत शंका नाही.
रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम् । स्तुवन्ति नामभिर्दिव्यैः न ते संसारिणो नरः ॥२५॥
दूर्वादलाप्रमाणे श्यामलवर्ण, कमलाप्रमाणे ज्यांचे डोळे आहेत, पीतांबर ज्याने नेसलेला आहे अशा रामप्रभूची जे लोक (त्याच्या वर सांगितलेल्या) दिव्य नांवांनी स्तुती करतात, ते जन जन्ममरणाच्या प्रवासांतून सुटतात.
रामं लक्ष्मणपूर्वजं रघुवरं सीतापतिं सुन्दरम् । काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम् । राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम् । वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिम् ॥२६॥
लक्ष्मणाचा मोठा भाऊ, रघुकुलांत श्रेष्ठ, सीतेचा नाथ, रूपसंपन्न, ककुस्थ कुलांत जन्मलेला, करुणानिधी, सर्व गुणांचा ठेवा, विद्वान ज्याला आवडतात, धर्माप्रमाणे आचरण असलेला, राजश्रेष्ठ सत्यवत दशरथात्मज, श्यामवर्ण, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणारा, रघुकुळाला तिलकाप्रमाणे शोभा देणारा आणि रावणाचा शत्रू अशा रामाला मी वंदन करतो.
रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे । रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः ॥२७॥
श्रीराम, रामभद्र, रामचन्द्र, वेधस्, रघुनाथ, नाथ, आणि सीतापतीला मी नमस्कार करतो.
श्रीराम राम रघुनन्दन राम राम । श्रीराम राम भरताग्रज राम राम । श्रीराम राम रणकर्कश राम राम । श्रीराम राम शरणं भव राम राम ॥२८॥
रघुकुलांत श्रेष्ठ असलेल्या रामा, भरताच्या जेष्ठ बंधो रामा, युद्धात कठोर होणाऱ्या रामा आमचा रक्षिता होवो.
श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि । श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि । श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि । श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये ॥२९॥
श्रीरामाचे चरण मनाने मी स्मरतो, वाणीने त्याची कीर्ती गातो, मस्तकाने नमस्कार करतो, आणि त्यांच्या चरणी मी शरण येतो.
माता रामो मत्पिता रामचन्द्रः । स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः । सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर् ।  नान्यं जाने नैव जाने न जाने ॥३०॥
राम माझी आई, राम माझा पिता, रामचंद्र माझा धनी, राम माझा स्नेही, माझे सर्वस्व तो दयाघन रामचंद्र आहे. त्याशिवाय मी अन्याला जाणत नाही. त्रिवार जाणत नाही.
दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा । पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम् ॥३१॥
ज्याच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, डाव्या बाजूला जानकी आहे आणि समोर मारूती आहे त्या रघुनंदनाला मी वंदन करतो.
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् । कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रम् शरणं प्रपद्ये ॥३२॥
लोकांना आनंद देणारा, युद्धांत धीरवान असणारा, कमलनेत्र, रघुवंशाचा स्वामी, दया हे ज्याचे रूप, दया हाच ज्याचा आकार आहे, त्या रामचंद्राला मी शरण आहे.
मनोजवं मारुततुल्यवेगं । जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम् । वातात्मजं वानरयूथमुख्यं । श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ॥३३॥
मनाप्रमाणे ज्याचा वेग आहे, वाऱ्याप्रमाणे वेगवान, इंद्रिये जिंकलेला, बुद्धिमानांमध्ये श्रेष्ठ, वायुपुत्र, वानराधिपती, आणि श्री रामचंद्राचा दूत अशा मारुतीला मी शरण आहे.
कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् । आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम् ॥३४॥
कवितारूपी खांदीवर बसून राम राम अशा गोड अक्षरांचे कूजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वन्दन करतो.
आपदां अपहर्तारं दातारं सर्वसंपदाम् । लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् ॥३५॥
संकटांना दूर करणारा, सर्व वैभव देणारा, लोकांचा आनंद अशा रामचंद्राला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो.
भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदाम् । तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् ॥३६॥
जन्म-मरणाचे मूळ जाळून टाकणारा, सर्व वैभव देणारा, यमदूतांना भीती वाटणारा, असा राम राम हा घोष आहे.
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे । रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः । रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहं । रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर ॥३७॥
राम राजश्रेष्ठ असून तो सदा विजयी होतो. रमापती रामचंद्राला मी भजतो, ज्या रामाने राक्षस-सेना मारिली, त्या रामाला मी नमस्कार करतो. रामाहून मला कोणी श्रेष्ठ नाही, मी रामाचा दास आहे, रामांत माझे मन मिळून जावो. हे रामा, माझा उद्धार कर.
राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे । सहस्रनाम तत्तुल्यं, रामनाम वरानने ॥३८॥
हे सुमुखी पार्वती, ‘ राम, राम, राम ’ असे म्हणून मी रामांत रमतो. कारण श्रीरामाचे नांव विष्णुसहस्रनामाशी तुलना करणारे आहे, असे भगवान शिव पार्वतीला सांगतात.
॥ इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम् ॥ ॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥ याप्रमाणे
श्रीबुधकौशिकांनी लिहिलेले रामरक्षास्तोत्र संपूर्ण झाले.
ते श्रीसीतारामाच्या चरणी अर्पण असो.


लेखन - श्री. स. कृ. देवधर




No comments:

Post a Comment