Apr 28, 2022

श्री स्वामी समर्थ मंत्रराज आणि प्रार्थना


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

मंत्रराज
प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतीचे । जे रुप श्रीपाद श्रीवल्लभाचे । अवधूत मूर्ती अवतार झाला । नमो सद्‌गुरु दत्त स्वामीपदांला ॥१॥  महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती । जिथे सर्व सिद्धी, पदी लोळताती । असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ । परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त ॥२॥  प्रत्यक्ष घ्या रे गड्या अनुभवास । विश्वास तेथेची स्वामी निवास “स्वामी समर्थ” अशी मंत्र शक्ती । श्वासातही वास देई प्रचीती ॥३।। साक्षात् परब्रह्म परमात्मतेज । अवतार नामातला मंत्रराज । या कल्पवृक्षाचि सोडोनि छाया । नको भटकु रे साधका अन्य ठाया ॥४॥ पवित्र प्रेमाचे पारिजात फूल । एकदा फुलेल हे अन्तरात । देवपूजेसाठी तयाला ठेवावे । कधीही न हुंगावे वासनेने ॥५॥  सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा । उपेक्षू नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेचि आता ॥६॥ प्रार्थना 
दीनदयाळा श्रीगुरुराया अर्जी ही ऐका । जोडूनि कर हे विनवितसें तुज न मागे पैका ॥धृ.॥ आत्मस्वरूपी ध्यान निरंतर हें द्यावें मजला । प्रेमानंदे करून खरा हा देह अर्पिला तुजला ॥१॥  विश्वारंगी रंग खरा हा एकचि मजला भासो । सदया सदय हृदय निरंतर तुजला बा असो ॥२॥ देहा-देहीं देह विराला मग जीवा पार पाहे । आत्मस्वरूपीं रूप निरंतर रंगुनियां राहे ॥३॥ अनंतभुवनीं भरा भरली अवधी तव सत्ता । नाम वाणिनें घेतां जगिं हे हरली भवव्यथा ॥४॥ आनंदानें अर्जी केली घ्या पायापाशीं । नाम तुझें बा खरें बळें हें तारी जगतासी ॥५॥ 

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


No comments:

Post a Comment