Mar 31, 2022

श्री आनंदनाथ महाराजकृत श्री स्वामी समर्थ ध्यान


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः


ध्यान हे तुझें देखतां बरें । रूप तें कसें जाण साजिरें । पूर्ण ब्रह्म तूं विश्वकारणा । सगुण रूप हें जग तारणा ॥१॥ काय गूण ते कवण हे लिला । दिव्य मंचकी स्वामी शोभला । केशर उटी भाळिं चर्चिली । मध्य कस्तुरी रेखिली भली ॥२॥ धनुष्य आकृती भोंवया तरी । मध्य भृकुटी शोभे साजिरी । पद्मनेत्र हो देखतां भले । रूप तें कसें मुख शोभले ॥३॥ कठी ती बरी शोभे साजिरी । रूद्राक्ष तरी मध्य निरंतरी । माळ हे बरी दिसे साजिरी । मूर्ती ही तुझी कैसी गोजिरी ॥४॥ कौपिन कळा कटीसि मेखळा । रंग ना निळा शुभ्र सांवळा । काय रंग तो कोण वर्णिल । वेद वर्णिता मौन्य पावेल ॥५॥ दिनवत्सला स्वामी राजसा । कां न पावसी आजि हो कसा । कोठें गुंतला कवण त्या परी । कवण भक्त हो धरी पदरी ॥६॥ म्हणुनिया तुला वेळ लागला । धांव पाव तूं आजि गा भला । गजेंद्रस्तवनें तूचि धावसी । भक्त-संकटी बापा रक्षिसी ॥७॥ तुजविणें आम्हा कोण हो तरी । आजि धांव गा जाण लौकरी । सर्व सुख तें देखतां तुला । बापा सांभाळी आजि या मुला ॥८॥ मायबाप तूं जाण सोयरा । आमुचा तरी आसरा खरा । भेट देऊनी तोषवी मना । हातिं धरिलें जाण चरणा ॥९॥ स्तोत्र वाचिता दुःख ते सरे । प्रेम धरील्या भव हा तरे । सत्यसंकटी स्वामी सांभाळी । स्तोत्र वाचितां पुरवि आळी ॥१०॥ आनंदनाथ तो बोलला तरी । स्वामी बोलवी जाण वैखरी । म्हणुनि सांगतो तुमच्या हिता । स्तोत्र वाचिता जाईल व्यथा ॥११॥


॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


No comments:

Post a Comment