Mar 23, 2022

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय १२


कलियुगाचा कालखंड, जीवमात्रांचे आयुर्मान, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत पारायण फलप्राप्ती, अन्नदानाचे महत्त्व, कुलशेखराचे गर्वहरण, आणि भीमास कृपाप्रसाद 

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

श्री सुब्बया श्रेष्ठी मोठे विद्वतप्रचुर आणि व्यासंगी होते. आपल्या ओघवत्या वाणींत ते कितीतरी नवनवीन विषयांची सुलभतेनें ओळख करून देत असत. तें इह-पर कल्याणदायक असे ज्ञानामृत श्रवण केल्यामुळें श्रोत्यांची, साधकांची आत्मोद्धाराच्या प्रगतीपथावर सहजच वाटचाल होत असे. त्यांनी कथन केलेल्या श्रीपाद प्रभूंच्या सर्वच बाललीला ऐकून शंकरभट्ट विस्मित तर होत असतच, मात्र श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या अवतार लीलांचे वर्णन करण्याचा आपण केलेला जो संकल्प आहे, त्यास त्या परब्रह्माचा कृपाशीर्वाद आहे, अशीच त्यांची दिवसोंदिवस दृढ श्रद्धा बळावत होती. श्रीपाद अवताराची महती सांगताना श्री सुब्बया श्रेष्ठी म्हणाले. - श्रीपाद श्रीवल्लभ हेच श्री वेंकटेश्वर आहेत. कलियुगांत श्रीपाद प्रभूच कल्की होऊन अवतरित होणार आहेत. सांध्र-सिंधु वेदांतानुसार या कलियुगाची पाच हजार वर्षे सरल्यावर सामान्य प्रलय होईल आणि त्यानंतर सत्ययुगाचा आरंभ होईल. मात्र, वेदश्रुतींच्या कालगणनेनुसार या कलियुगाचा कालखंड चार लाख बत्तीस हजार वर्षे आहे. यांत अंतर्दशा, सूक्ष्मदशा, विदशा यांचा अंतर्भाव होतो. अर्थातच वेदांत जाणणाऱ्याला हे सर्व ज्ञात असते.  या कलियुगांत ब्रह्मदेवाने प्रत्येक जीवमात्रांस एकशेवीस वर्षांचे आयुष्यमान दिले आहे. मात्र, याचा अर्थ प्रत्येक प्राणिमात्र आपापले भौतिक शरीर एकशेवीस धारण करू शकतील असा नव्हे, तर याचा गूढार्थ असा की, सामान्य स्थितींत एकशेवीस वर्षांत घेता येतील इतके श्वास आणि प्रश्वास प्रत्येकांस दिले आहेत. क्रोधिष्ठ, वेगवान जीवन जगू पाहणारे, चिंताग्रस्त अथवा दुष्प्रवृत्तीचे लोक आपले श्वास वेगाने घेऊन कमी  वेळात  संपवून  टाकतात. उदाहरण म्हणून बघायचे झाल्यास, हळूहळू श्वास-प्रश्वास घेणारे महाकाय कासव ३०० वर्षे जगते. तर, चंचल असे मर्कट तेच श्वास-प्रश्वास लवकर घेऊन अल्पकाळच  जिवंत  राहते. तसेच, योगी-मुनीजन अनेक योगासने, वायुंचे  कुंभक आदि क्रियांनी श्वास शरीराच्या अंतर्भागात फिरवत राहतात. परिणामी, त्यांचे अनेक श्वास वाचतात आणि ते दीर्घायुषी होतात. यांविषयी योगशास्त्राचे सखोल ज्ञान असलेले विस्तृतपणें समजावून सांगू शकतील.   मानवी शरीरावर जिवाणूंचादेखील परिणाम होत असतो. त्यामुळे सर्व शरीर, त्यातील अवयव, प्राणशक्ति आणि मनःशक्ती यांत बदल होत राहतात. मनःशक्तीचे अतुलनीय सामर्थ्य दैवीशक्ति, दैवीकृपा यांची अनुभूती देऊ शकते आणि त्याद्वारे साधकाचे मन, प्राण आणि शरीर शुद्ध होऊ लागते. श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत हे साक्षात त्या परब्रह्माचेच स्वरूप आहे. या दिव्य ग्रंथातील प्रत्येक अक्षरात सिद्धशक्ती आणि योगशक्ती समाविष्ट आहेत. असे प्रासादिक ग्रंथ सश्रद्धेने वाचल्यास प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंच्या कृपेची अनुभूती येते. या ग्रंथाचे पारायण करणाऱ्या भक्तांच्या ऐहिक मनोकामना तर सत्वर पूर्ण होतातच, तसेच परमार्थिक, परलौकिक कल्याणदेखील होते. या परमसिद्ध ग्रंथाचे शास्त्रोक्त पद्धतीने पारायण करावे आणि तदनंतर कमीत कमी अकरा सत्पुरुषांना भोजन द्यावे अथवा कुठल्याही दत्तक्षेत्रीं जाऊन भोजनखर्चाएवढी रक्कम दान करावी. सत्पुरुषांना अन्नदान केल्याने आयुष्यवृद्धी होते. तसेच, सत्पुरुषांच्या आशीर्वादाने शांती, पुष्टी, तुष्टी, समाधान, ऐश्वर्य, भाग्य आदिरूपांत कैकपटीने फळदेखील मिळते. पांडव वनवासात असतांना द्रौपदीने श्रद्धेने अर्पण केलेल्या अन्नाच्या केवळ एका कणाने भगवान श्रीकृष्ण प्रसन्न झाले आणि त्या भक्ताभिमानी परमात्म्यानें दुर्वास महर्षी आणि त्यांच्या दहा हजार शिष्यांना उत्तम, सुग्रास भोजन दिले. तसेच, साधकांनी श्रीकृष्ण आणि सुदामा यांचीही कथा सदैव स्मरणांत ठेवावी. सुदामाच्या पत्नीने भक्तिभावाने दिलेले पोहे श्रीकृष्णांनी स्वीकारले आणि त्याबदल्यात अपार ऐश्वर्य, राजवैभवाचे वरदान दिले. कर्मसूत्राची तीव्रता कशी असते आणि त्या परब्रह्माची कृपा झाल्यास त्याचे काय फल प्राप्त होते, हेच या कथेतून विशद होते. श्रीपाद प्रभू आता चार वर्षांचे झाले होते. पीठीकापुरवासी त्यांच्या नित्य नूतन लीला अनुभवीत असत. एके दिवशी, मल्याळ देशातील कुलशेखर नामक एक मल्ल पीठीकापुरांत आला. तो वर्मकलेत निष्णात होता. ही एक प्रकारची मर्मकला होय. आपल्या शरीराच्या अनेक भागांवर नियंत्रण करू शकणारी अशी काही महत्वाची ऊर्जाकेंद्रे असतात, त्यांना मर्मबिंदू असे म्हणतात. या विशिष्ट मर्मबिंदूंवर योग्य पद्धतीने दाब अथवा जोर देऊन शरीराचा कोणताही एखादा अवयव दुर्बल करता येतो किंवा त्यांत वैकल्यही निर्माण करता येते. ही वर्मकला युद्धांत बलशाली शत्रूला नामोहरम करण्यासाठीही वापरत असत. मात्र काही विशेष मर्मस्थाने ज्यांचा रोगचिकित्सा पद्धतीत लोकांच्या वेदना दूर करण्यासाठी किंवा रोगपरिहारार्थ उपयोग करण्यात येतो. शरीरावरील या १२ विशिष्ट मर्मस्थानी प्रचंड प्राणशक्ती अथवा चैतन्य असते, त्यांना ' अडंगल ' असे संबोधतात. वैद्यशास्त्रांत यांचा शोध प्रथमतः प्राचीन, विख्यात वैद्य सुश्रुत यांनी लावला. वैद्यशास्त्राचा सखोल अभ्यास केलेले निपुण वैद्य या वर्मकलेचा उपयोग लोककल्याणासाठी करतात.  हा कुलशेखर मल्ल सप्तगिरी बालाजीचा म्हणजेच वेंकटेश्वराचा भक्त होता. अनेक राज्यांतील प्रबळ मल्लयोद्ध्यांना पराजित करून त्याने विजयपताका प्राप्त केल्या होत्या. आता पीठीकापुरातील मल्लयोद्ध्यांना जिंकण्याचा त्याचा मानस होता. पीठीकापुरातील मल्लदेखिल कुलशेखराचे मल्लकौशल्य जाणून होते. त्या सर्व मल्लांनी एकत्र येऊन असा विचार केला की - या मल्लयुद्धांत कुलशेखरच्या हातून आपला पराभव अथवा मृत्यू निश्चित आहे. त्यांमुळे आपल्या या नगरीची प्रतिष्ठा नक्कीच धुळीस मिळेल. यांवर आता प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचे अवतार असलेल्या श्रीपादांना शरण जाणे हा एकमेव उपाय दिसत आहे. त्या मल्लांची श्रीपाद प्रभूंवर दृढ श्रद्धा होती. त्या सर्वांनी श्रीपाद प्रभूंकडे जाण्याचे ठरविले. त्यावेळी श्रीपाद स्वामी वर्मांच्या घरी होते. श्रीयुत वर्मा यांनी बाळ श्रीपादांसाठी खास एक सुंदर चांदीचे जरीकाम केलेली पगडी बनविली होती. ती पगडी मोठ्या कौतुकानें श्रीपादांना घालून ते नेहेमीच आपल्या शेतजमिनी दाखविण्यासाठी त्यांना नेत असत. प्रभूंचा चरणस्पर्श आपल्या भूखंडांना व्हावा, असा त्यांचा श्रद्धाभाव होता. त्या दिवशी मात्र, " आजोबा, आज आपण थोड्या वेळाने आपल्या शेतांत जाऊ या. " असे बाळ श्रीपाद त्यांना म्हणाले.  थोड्याच वेळांत तिथे पीठीकापुरातील सर्व मल्ल आले आणि त्यांनी श्रीपादांकडे कृपायाचना केली. शरणागतवत्सल प्रभूंनी त्यांना अभय दिले. तदनंतर, स्वामींनी भीम नावांच्या एका युवकांस बोलावले. या भीमाचे शरीर आठ ठिकाणी वाकले होते. तो अतिशय अशक्त असून काही काम करू शकत नसे. तरीही त्या कुबड्या युवकास वर्मांनी आश्रय दिला होता. तें त्यास त्याच्या शक्तीनुसार थोडेफार काम करायला सांगत असत आणि त्याच्या उदरनिर्वाहापुरते वेतन देत असत. भीमाची श्रीपादचरणीं दृढ भक्ती होती व आपले व्यंग दूर व्हावें अशी तो प्रभूंना नेहेमी प्रार्थना करीत असे. अंतर्ज्ञानी श्रीपाद स्वामीही त्याच्याकडे कृपादृष्टीने पाहत असत. " माझ्या भक्ता, थोडा धीर धर. तुझी प्रार्थना सत्वरच फळांस येणार आहे. " असेच जणू काही ते आपल्या दयार्द्र आणि करुणामय नजरेने भीमास सूचित करत असत. पुढें, बाळ श्रीपाद त्या सर्व मल्लांना म्हणाले, " तुम्ही सर्वजण निश्चिन्त राहा. हा आपला भीम कुलशेखरबरोबर द्वंद्वयुद्ध करेल." श्री दत्तप्रभूंच्या लीला अनाकलनीय आणि अगम्य असतात हेच खरें ! भीमाची श्रीपाद स्वामींवर अढळ श्रद्धा होती. त्यानें क्षणाचाही विलंब न करता प्रभूंचे आज्ञापालन करण्यास होकार दिला. कुक्कुटेश्वर मंदीराच्या जवळच हे मल्लयुद्ध आयोजित करण्यात आले. ही अपूर्व घटना पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी जमली. ठरल्याप्रमाणें भीम आणि कुलशेखर यांच्यातील मल्लयुद्धास प्रारंभ झाला. कुलशेखर मोठ्या त्वेषानें भीमास मारू लागला. पण काय आश्चर्य ! कुलशेखर ज्या ठिकाणी भीमावर प्रहार करत होता, त्याच ठिकाणी त्याला स्वतःला मार लागून वेदना होत असत.  याऊलट, कुलशेखर करत असलेल्या प्रत्येक वाराबरोबर भीमाचे कुबड नष्ट होऊन त्याचे शरीर अधिकाधिक बलवान होत होते. अखेर, कुलशेखर संपूर्णतः निर्बळ झाला आणि तो श्रीपाद प्रभूंना शरण आला. श्रीपाद स्वामींना अनन्यभावाने त्याने वंदन केले. तेव्हा, श्रीपाद धीर-गंभीर स्वरांत म्हणाले, " कुलशेखरा, मनुष्य शरीरावर असलेल्या १०८ मर्मस्थानांचे तुला सर्वथैव ज्ञान आहे. तर या भीमाची माझ्यावर नितांत श्रद्धा आहे अन मी त्याचे सदैव रक्षण करेन, हा दृढ विश्वास आहे. तू विद्यापारंगत असला तरीही जयपत्रे घेऊन गर्विष्ठ झाला आहेस. यासाठी दंड म्हणून आजपासून या भीमाची संपूर्ण दुर्बलता मी तुला देत आहे. तुला अन्न-वस्त्र आदिंची कमतरता जाणवणार नाही, मात्र यापुढें तू सामर्थ्यहीन होशील. तुझी प्राणशक्ती घेऊन हा भीम अत्यंत बलशाली होईल. अरे, तिरुपतीस्थित वेंकटेश्वर मीच आहे. माझा भक्त असूनही तू या वर्मकलेचा दुरूपयोग केलास. परिणामी, तुझी ही विद्या आजपासून निष्फळ होईल. मात्र, तुझ्या उपासनेचे फलित मी तुला देत आहे." इतके बोलून श्रीपाद प्रभूंनी कुलशेखरला त्याची आराध्यदेवता अर्थात पद्मावतीसह व्यंकटेश्वराच्या रूपात क्षणिक दर्शन दिले.  ही अद्भुत लीला कथन करून श्री सुब्बया श्रेष्ठी शंकरभट्टांस म्हणाले, " वत्सा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरित्रकथा कल्पनातीत आहेत. त्या भक्तवत्सल दत्तप्रभूंचा कृपाशीर्वाद प्राप्त करणे, हेच आपल्या जीवनाचे ध्येय असले पाहिजे. श्रीपाद स्वामी करुणासागर आहेत, ते निश्चितच आपलें इह-पर कल्याण करतील."

अध्याय फलश्रुती - शरीरारोग्य प्राप्ती

द्वितीय दिवस विश्राम


No comments:

Post a Comment