॥ श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
॥ ध्यानम् ॥
अजानुबाहु विशाल नेत्रम् । अनंत ब्रह्माण्डकार स्वरुपम् ॥
भक्त कामकल्पद्रुम कामधेनुम् । स्वामी समर्थ शिरस: नमामि ॥
अनंतकोटी ब्रह्माण्डनायक योगीराज श्री स्वामी समर्थ यांच्या चरित्र-बखर या दिव्य ग्रंथात ग्रंथकार श्री गोपाळबुवा केळकर लिहितात - आज पावेतों असंख्य भक्तजन श्री स्वामी महाराजांचे दर्शनास येऊन पुनीत होऊन गेले आहेत. महाराजांचा प्रत्येक शब्द आणि त्यांची प्रत्येक कृती चमत्काराची असे. क्षणोक्षणीं श्री स्वामींच्या लीलेंत चमत्कार दृष्टीस पडे. मात्र, त्यांची साग्र लीला कोणालाही लिहिता आली नाही.
दत्तभक्तहो, अनेक वाचकांनी श्री स्वामी चरित्र, त्यांच्या लीला याविषयीं लिहिण्याबद्दल सूचना/अभिप्राय पाठवले. तसे पाहतां, या अक्कलकोटनिवासी अवतारी पुरुषाच्या चरित्रावर आधारित श्रीगुरुलीलामृत, श्री स्वामी समर्थ सारामृत, श्री स्वामी समर्थ बखर, श्री स्वामी समर्थ गुरुकथामृत, श्री स्वामी समर्थ सप्तशती असे अनेक सिद्ध ग्रंथ रचले आहेत. तरीही, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अफाट चरित्र सागरांतून अनेक अमौलिक रत्ने, त्यांच्या काही लीला, स्वामीभक्तांना आलेल्या अनुभूती भक्तजनांपुढे मांडण्यासाठी एक उपक्रम घेऊन येत आहोत.
स्वामीभक्तहो, आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता. करायचे एव्हढेच आहे की आपण आपली आवडती श्री स्वामी चरित्र कथा, लीला, बोधकथा आम्हांस ' संपर्क ' वापरून अथवा Email Us इथे कळवावी. आम्ही तुमचा नामनिर्देश करून त्या प्रकाशित करू. जेणे करून सर्व श्री स्वामी भक्तांना त्याचा लाभ होईल.
महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.
जास्तीत जास्त भाविकांना हे श्री स्वामी चरित्र वाचता यावे, श्री स्वामी/दत्तभक्तीचा प्रसार व्हावा आणि स्वामींच्या लीलांचे मनन करीत आपण सर्वजण स्वामीकृपेत रंगून जावे, केवळ हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
चला तर मग स्वामीभक्तहो, शुभस्य शीघ्रम् म्हणत सुरुवात करू या.
श्री स्वामी समर्थ कृपेनें व्याधिमुक्तता
कर्नाटकामध्यें श्रीधर नावाचा एक दत्तभक्त ब्राह्मण राहत असे. तो पोटशुळानें व्याधिग्रस्त होता. अनेक औषधोपचार, नवस सायास करूनदेखील त्याचा रोगपरिहार झाला नाही. अखेरीस, ह्या असाध्य रोगशमनार्थ त्याने श्री दत्तमहाराजांना शरण जाण्याचे ठरविले. त्यानुसार तो गाणगापूर ह्या दत्तक्षेत्रीं आला. तिथे त्याने प्रति दिनीं संगम स्नान, श्री दत्तमहाराजांचे पूजन -अभिषेक, तसेच श्रीगुरुचरित्र पारायण आदि प्रकारें उपासना सुरु केली. त्याच्या भक्तिभावानें प्रसन्न होऊन श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी त्यास स्वप्नदृष्टांत दिला आणि आज्ञा केली, " श्रीधरा, तू श्रीपुरीच्या पानांच्या रसांत सुंठ आणि सैंधव घालून भक्षण कर, त्या योगें तुझी उदरव्यथा नष्ट होईल." या शुभसूचक स्वप्नाने श्रीधरास अत्यंत आनंद झाला. भगवान श्री दत्तात्रेयांना तो वंदन करू लागताच त्याला जागृती आली. परंतु श्रीपुरी म्हणजे कुठला वृक्ष हे काही त्याला माहित नव्हते.
दुसऱ्या दिवशीं, गाणगापुरांतील वैद्य, पुजारी मंडळी, आणि इतर भाविक जन यांच्याकडे श्रीधराने श्रीपुरीच्या झाडाबद्दल विचारले. मात्र, कोणाकडूनही यासंबंधी त्याला खात्रीशीर उत्तर सापडले नाही. अत्यंत खिन्न आणि सचिंत होऊन श्रीधर ब्राह्मण श्री दत्तमंदिरात परतला. त्याने पुन्हा एकदा श्री दत्तप्रभूंची कळवळून प्रार्थना केली. त्या रात्रीं श्रींनी पुन्हा एकदा त्याला स्वप्नांत दर्शन दिले आणि सांगितले, " मी सध्या श्री अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ रूपांत अवतरलो आहे, तू तिथे आता त्वरित गमन कर. माझे दर्शन होताच तुझी मनोकामना अवश्य पूर्ण होईल."
दुसऱ्या दिवशीं प्रातःकाळीच प्रभू दत्तात्रेयांचे पूजन करून, श्रीधर अक्कलकोटला जाण्यास निघाला. पोटशूळाने ग्रस्त तो ब्राह्मण कसाबसा अक्कलकोटास पोहोचला. त्यावेळीं, श्री समर्थांची स्वारी नव्या विहिरीजवळ असलेल्या मारुतीरायाच्या मंदिरात होती. हे समजताच श्रीधर त्या स्थानीं धावला आणि ' माथा ठेवूनि चरणीं । न्यासितां झाला पुनःपुन्हा ' अर्थात ओट्यावर बसलेल्या श्री स्वामींच्या चरणांवर अत्यंत भक्तिभावानें त्याने आपलें मस्तक ठेवले. समर्थांच्या दिव्य दर्शनानें अष्टभाव जागृत झालेला तो दत्तभक्त हात जोडून तिथेच उभा राहिला. तेव्हा त्याच्याकडे पाहत श्री स्वामीराय वदले, " अरे श्रीधरा, श्रीपुरीचे झाड म्हणजे निंबवृक्ष ! तू त्या पानांचा रस काढून त्यांत सुंठ व सैंधव घाल आणि तें तीन दिवस घे. म्हणजे तू व्याधीमुक्त होशील."
श्री समर्थांचे हे वचन ऐकून श्रीधरास हे प्रत्यक्ष श्री दत्तावतार आहेत, याची खात्री पटली. त्याने श्री स्वामींना पुन्हा एकदा नमस्कार केला आणि त्यांच्या आज्ञेनुसार श्रीपुरीचा रस प्राशन केला. त्यायोगें, त्या ब्राह्मणाची उदरव्यथा पूर्णपणे बरी झाली आणि स्वामींचा आशीर्वाद प्राप्त होऊन तो आपल्या गांवी परतला.
|| श्री स्वामी समर्थ ||
|| श्री गुरुदेव दत्त ||
संदर्भ : श्री स्वामी समर्थ बखर
No comments:
Post a Comment