May 14, 2021

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक १०१ ते ११० )


 || श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||

अपक्वं छेदयित्वापि क्षेत्रे शतगुणं ततः । धान्यं शूद्राय योऽदात्स श्रीदत्तः शरणं मम ॥१०१॥ भावार्थ : ज्या गुरुनाथांनी आपल्या शूद्र भक्ताने ( केवळ गुरुवचनांवर दृढ श्रद्धा ठेवून ) पूर्णपणे तयार न झालेले पीक अयोग्य वेळीं कापले असता, त्याच्या भक्तिभावानें प्रसन्न होऊन शतपटीनें अधिक धान्य त्याला दिले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत. 

गाणगापुरके क्षेत्रे योऽष्टतीर्थान्यदर्शयत् । भक्तेभ्यो भीमरथ्यां स श्रीदत्तः शरणं मम ॥१०२॥
भावार्थ : ज्या गुरुवर्यांनी गाणगापूर क्षेत्री भीमा-अमरजा नदींच्या संगमस्थानीं ( तीरांवर ) असलेल्या आठ तीर्थांचे आपल्या भक्तांना सविस्तर दर्शन करविले आणि त्यांचे माहात्म्यही वर्णन केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

पूर्वदत्तवरायादाद्राज्यं स्फोटकरुग्घरः । म्लेच्छाय दृष्टिं चेष्टं स श्रीदत्तः शरणं मम ॥१०३॥
भावार्थ : श्रीपादराजांनी आपल्या रजक भक्ताला पूर्वजन्मीं दिलेल्या वरदानामुळे पुढच्या जन्मीं त्या रजकास राज्यप्राप्ती झाली आणि तो म्लेच्छ राजा झाला. ज्या श्रीगुरुंनी केवळ आपल्या कृपाकटाक्षाने त्याच्या मांडीवरच्या फोडाचे निवारण केले तसेच त्याचे इह-पर कल्याणही केले,असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.

श्रीशैलयात्रामिषेण वरदः पुष्पपीठगः । कलौ तिरोऽभवद्यः स श्रीदत्तः शरणं मम ॥१०४॥
भावार्थ : जे दत्तप्रभू कलियुगाचा प्रभाव वाढल्याने श्रीशैल पर्वत यात्रेच्या निमित्ताने लौकिकार्थाने पुष्पांच्या सुखासनावर बसून पाताळगंगेच्या तीरावरून अदृश्य झाले. तथापि आम्ही निर्गुण, गुप्तरूपानें मठातच वास्तव्य करू आणि भक्तांच्या मनोकामना त्वरित पूर्ण करू, त्यांचा योगक्षेम चालवू असे वरदान देणारे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.

निद्रामातृपुरेऽस्य सह्यशिखरे पीठं मिमंक्षापुरे काश्याख्ये करहाटकेऽर्घ्यमवरे भिक्षास्य कोलापुरे । पाञ्चाले भुजिरस्य विठ्ठलपुरे पत्रं विचित्रं पुरे गांधर्वे युजिराचमः कुरुपुरे दूरे स्मृतो नान्तरे ॥१०५॥
भावार्थ : ज्या दत्तात्रेयांचे निद्रास्थान माहूर आहे, त्यांचे मुख्य आसन सह्याद्रीच्या शिखरावर आहे, काशी नगरींत जे नित्य स्नान करतात, अर्घ्यादि प्रात:संध्या जे कऱ्हाड येथे करतात, तर दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कोल्हापुरांत जे भिक्षा मागतात, पांचाळेश्वरी जे भोजन करतात, ज्यांचे गंधलेपन पंढरपूर क्षेत्री असते, ते ध्यान गाणगापुरीं तर आचमनादि सायंसंध्या कुरवपुरांत करतात. मात्र त्यांच्या भक्ताने कितीही दुरून त्यांचे स्मरण केले असता, तो स्मर्तृगामी त्याच्या अंत:करणात त्वरित प्रकटतो.

अमलकमलवक्त्रः पद्मपत्राभनेत्रः परविरतिकलत्रः सर्वथा यः स्वतन्त्रः । स च परमपवित्रः सत्कमण्डल्वमत्रः परमरुचिरगात्रो योऽनसूयात्रिपुत्रः ॥१०६॥
भावार्थ : ज्याचे मुख कमळपुष्पाप्रमाणे निर्मळ आहे, ज्याचे नेत्र कमलपत्रासारखे रेखीव आणि तेजस्वी आहेत. वैराग्य,परम विरक्ती हीच ज्याची पत्नी आहे, जो सर्वथा स्वतंत्र आहे आणि अतिशय पवित्र, मंगलकारक आहे, सुरेख कमंडलु हेच पात्र ज्याने धारण केलेले आहे आणि ज्याचे सर्वच अवयव अतिशय मनमोहक आहेत, तो अनसूया आणि अत्रि ऋषींचा पुत्र श्री दत्तात्रेय माझ्या हृदयांत सदैव वास करो.

नमस्ते समस्तेष्टदात्रे विधात्रे नमस्ते समस्तेडिताघौघहर्त्रे । नमस्ते समस्तेङ्गितज्ञाय भर्त्रे नमस्ते समस्तेष्टकर्त्रेऽकहर्त्रे ॥१०७॥
भावार्थ : सकल वांच्छित मनोकामना पूर्ण करणाऱ्या आणि ह्या सृष्टीचा निर्माणकर्ता ( ब्रह्मदेवस्वरूप ) असलेल्या हे जगन्नियंत्या, तुला माझा नमस्कार ! सर्वांना पूजनीय, वंदनीय असलेल्या आणि सर्व प्रकारच्या पापांचा नाश करणाऱ्या तुला माझा नमस्कार असो ! सकल जनांच्या अंत:करणांत वास करणाऱ्या आणि सर्वज्ञ अशा परमेश्वरा, तुला माझा नमस्कार असो ! सर्वांचे सर्वदा शुभ, कल्याण करणाऱ्या आणि सकल दुरित हरण करणाऱ्या हे गुरुवर्या, तुला माझा नमस्कार असो !

नमो नमस्तेऽस्तु पुरान्तकाय नमो नमस्तेऽस्त्वसुरान्तकाय । नमो नमस्तेऽस्तु खलान्तकाय दत्ताय भक्तार्तिविनाशकाय ॥१०८॥
भावार्थ : पुरांतकांला म्हणजे त्रिपुरांतकांला ( अर्थांत श्रीशिवशंकर स्वरुप ) श्रीदत्तात्रेया तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. असुरांचे निर्दालन करणाऱ्या ( श्रीहरिविष्णुस्वरूप ) जगदीशा, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. दुष्टांचा ( दुष्ट प्रवृत्तींचाही ) विनाश करणाऱ्या प्रभो, तुला पुन्हा पुन्हा नमस्कार असो. भक्तांच्या कष्टांचे निवारण करणाऱ्या दत्तात्रेयांना माझा पुन्हा पुन्हा नमस्कार असो.

श्रीदत्तदेवेश्वर मे प्रसीद श्रीदत्तसर्वेश्वर मे प्रसीद । प्रसीद योगेश्वर देहि योगं त्वदीयभक्तेः कुरु मा वियोगम् ॥१०९॥
भावार्थ : हे देवांच्याही ईश्वरा श्रीदत्ता, माझ्यावर प्रसन्न हो. ह्या सर्व विश्वाच्या ईश्वर असणाऱ्या श्रीदत्ता, माझ्यावर प्रसन्न हो. हे योगेश्वरा, माझ्यावर प्रसन्न हो आणि मला योगज्ञान दे. तुझी भक्ती करण्यापासून, तुझ्यापासून मला दूर लोटू नकोस.

श्रीदत्तो जयतीह दत्तमनिशं ध्यायामि दत्तेन मे हृच्छुद्धिर्विहिता ततोऽस्तु सततं दत्ताय तुभ्यं नमः । दत्तान्नास्ति परायणं श्रुतिमतं दत्तस्य दासोऽस्म्यहम् । श्रीदत्ते परभक्तिरस्तु मम भो दत्त प्रसीदेश्वर ॥११०॥
भावार्थ : श्रीदत्तच या विश्वांत विजयी होतात. सर्व देवांचेही देव असणारे अर्थात ज्यांना कोणीही ईश नाही अशा श्रीदत्ताचेच मी सदोदित ध्यान करतो. श्रीदत्तानेच माझ्या मलिन अंतःकरणाला शुद्ध केले आहे. त्यामुळें हे दत्तात्रेया, तुला सर्वदा वंदन असो. वेदश्रुतिदेखील श्रीदत्ताहून काहीच श्रेष्ठ नाही, हे गर्जून सांगत असतात. मी श्रीदत्तांचाच दास आहे. श्रीदत्तांच्याच ठायीं माझी दृढ भक्ती असो, हे दत्तात्रेया ईश्वरा माझ्यावर कृपा कर.

॥ इति श्री परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचितं श्री दत्तभावसुधारसस्तोत्रं सम्पूर्णम् ॥ || श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||


No comments:

Post a Comment