॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
धन्य धन्य नृसिंहगुरुमुनि । अक्कलकोटीं स्वेच्छे वसूनि । प्राणिमात्रांसि संतोषवूनि । कृतकार्य केलें सहज कीं ॥
अनंत अमृतरूप श्रीगुरूलीला । दावूनि निरुपाधिक वेगळा । धन्य भाग्य धीपुरींचा सोहोळा । वर्णिला न जाय सुखाब्धि ॥ - त्या अनंतकोटी ब्रह्मांडनायकाची अशीच एक लीला !
एक भाविक गोसावी अनेक तीर्थयात्रा करीत श्रीसेतुबंधरामेश्वर इथे आला. त्या पावन क्षेत्रीं द्वारका पश्चिमधाम यात्रेचा शुभसंकल्प सोडून तो पुढील प्रवासास निघाला. चतुर्भुज श्रीकृष्णमूर्तीच्या दर्शनाचा त्याला ध्यास लागला होता. मात्र दुर्दैवाने त्या प्रवासातच त्याला जलोदराची व्याधी जडली. दिवसोंदिवस ती व्याधी बळावतच गेली, त्या तपस्व्याला द्वारकायात्रा पूर्ण करणे आता अशक्य वाटू लागले. अतीव कष्टाने त्याने गाणगापुर गाठले आणि श्रीदत्तात्रेय-श्रीपाद-श्रीनृसिंह महाराजांच्या पावन पादुकांचे दर्शन घेतले. भाग्यवशात अक्कलकोट श्रीस्वामी समर्थांची महती त्याला तिथे समजली. या परमहंस अवतारीक महापुरुषांचेही दर्शन घ्यावे, असे त्याने ठरविले आणि दहा दिवसांच्या अतिशय कष्टप्रद, व्याधीने वेदनादायी अशा प्रवासानंतर तो अक्कलकोटास पोहोचला. अंतर्यामी श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्या भक्ताची भगवान श्रीकृष्ण दर्शनाची ओढ जाणली. भक्तवत्सल योगीश्वरांच्या कृपाप्रसादाने त्या गोसाव्याची जलोदर व्याधी निवारण होऊन त्याला निरामय आरोग्यता तर लाभलीच, अन त्या ब्रह्मांडनायकाने त्याला साक्षात चतुर्भुज श्रीकृष्णस्वरूपांत दिव्य दर्शनही दिले. त्या सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वांतर्यामी नियंत्याची ही अद्भूत लीला पाहून तो भाविक तपस्वी कृतकृत्य झाला आणि त्याने श्रीस्वामी समर्थांची अतिशय सुंदर, आर्त प्रार्थना केली.
म्हणे अहो गुरु विश्वंभरा । महाविष्णु महेश्वरा । दत्तात्रेय स्वामी दयासागरा । अज्ञानअविद्यातीत मज केलें ॥
अनेकप्रकारचे ब्रह्मांडांत । आपणच एक चिद्रूप आहां व्याप्त । निःसंशय ब्रह्मांडनायक अनंत । व्याप्त व्यापक वर्जित आहां ॥
काय व्हावें आपले उतराई । द्यावा ऐसा पदार्थचि नाहीं । लक्ष्मी लोळे सर्वदा निजपायीं । कोणतें धन द्यावया योग्य ॥
कमलपद्म प्रभुचरणीं विराजे । तेथें कोणतें पुष्प उरलें अर्पाया शिळें ताजें । त्वच्चरणांपासूनि निघाली जे । जगत्पावनी भागीरथी ॥
म्हणूनि कोणत्या उदकें स्नाना । घालावें आपणां जनार्दना । कोणत्या प्रयत्न रिझवावें जगत्पावना । सकलसिद्धिदायका ॥
नखांची शोभा दीप्ति अनेक । कोटिसूर्यचंद्रांहून अधिक । तेथें कोणते धूप दीप दाखवावे अमोलिक । स्वयंप्रकाशी निरांजना ॥
अखंड वाजे अनुहत ध्वनि । तेथें कोणतीं वाद्ये वाजवूनि । संतोषवावें देव चक्रपाणि । हें नकळे मजलागीं ॥
जेथूनि निघाले चार वेद । त्यासि स्तोत्रादिक पठणें तुष्टिप्रद । एक स्वतःसिद्ध प्रभु स्वसंवेद । परिच्छेदरहितासि कैसें व्हावें ॥
आनंदस्वरूप अद्वितीय निर्विकल्पासि । कोणत्या प्रकारें करावें पूजनासि । आवाहन कोठें परिपूर्णासि । सर्वाधारासि कैचें आसन ॥
अति स्वच्छासि अर्घ्य पाद्य जाण । शुद्ध परम्यात्म्यासि कैंचें आचमन । निर्मलासि कोठें स्नान । विश्वोदरासि वस्त्र कैचें ॥
निरालंबासि यज्ञोपवीत अर्पण । नित्योपरमासि आभरण । निर्लेपासि सुगंध चंदन । कैसें पुष्प अर्पावें निर्वासनासि ॥
निर्गंध आत्म्यासि सुगंध धूप । स्वयंप्रकाशमानासि निरांजन दीप । नित्यतृप्तासि नैवेद्य पदार्थ अमुप । निष्कामासि फल काय अर्पावें ॥
त्रयोदशगुणी तांबूल विभु-परमात्म्यासि । दक्षिणा द्यावी कोठें नित्यानंदासि । स्वप्रकाशक एक आत्म्यासि । आर्तिक्यनिरांजन कैसें ओवाळावें ॥
अनंतासि पुष्पांजलि कैशी प्रदक्षिणा । अद्वितीयासि कैशी करावी प्रार्थना । अंतर्बाह्यवर्ती परिपूर्णा । उद्वासन कोठें करावें ॥
हीच पूजा अमित तेजस । करिती श्रेष्ठ ब्रह्मानुभवी विद्वांस । भोगिती जीवन्मुक्ति-ब्रह्मसुखास । वेदांतीं आचार्यै कथिली असे ॥
केवळ स्मरण करताच धावत येणारे, अल्प सेवेनेही संतुष्ट होणारे, आणि करुणेचा सागर असणारे भगवान दत्तात्रेय मानवदेहाने या पृथ्वीतलावर अवतरले ! प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थांना अशक्य ते काय असणार ? त्यांच्या लीला खरोखर अनंत, अनाकलनीय आणि अगाध आहेत. राव, रंक, सज्जन, दुर्जन, सामान्य जन इतकेच नव्हे तर पशु-पक्षी-वृक्ष यांनादेखील श्री स्वामी समर्थांच्या कृपेचा लाभ झाला. त्या योगीश्वरानें आपल्या सर्वच भक्तांचे ऐहिक कल्याण तर केलेच, तसेच अनेक अधिकारी भक्तांना आत्मसाक्षात्कार घडवून मुक्तीही दिली.
पूर्णावतारी परमहंस । परमात्मा स्वामी परमपुरुष । तच्चरणांचे जन्मोजन्मीं दास । व्हावें हीच आस असे ॥ - हीच प्रार्थना श्रीस्वामी समर्था !!
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्री गुरुदेव दत्त ॥
संदर्भ : ब्रह्मनिष्ठ वामन रावजी वैद्य रचित श्रीगुरुलीलामृत
No comments:
Post a Comment