Feb 26, 2019

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 


दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा l

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll 

भवतापाच्या डोही बुडतां नाम दत्त हे स्मरले

गुरू करुणेच्या भाव बळावर जीवन अवघें तरले

नाम दत्त हृदयासी असता भवमुक्ती ही येई घरा

परमानंद आनंदकंद योगीराज तो स्मरां स्मरां

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll १ ll

दर गुरुवारी या गाभारी दत्त आरती गाऊ

त्रिशूल डमरू करी कमंडलू दत्तराज तो पाहू

कामधेनू जगताची माता वात्सल्याचा मूर्त झरा

औदुंबर तरु कल्पतरू हो दत्तमूर्ती ही नयनीं धरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll २ ll

नेत्र शोधिती वणवण ज्याला तृषा युगांची बोले

गुरुपदकमली गाणगापुरी जीवन आमुचें आलें

गुरुरूपातून पावन गंगा जन्मच भिजले गुरुवरा

समाधीतही जगती आम्हीं श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll ३ ll

जगताचा गुरु तारक पालक आम्ही लेकरें त्याची

विश्व पोळता सहा रिपूंचा मिळे सावली त्याची

गुरुलीलामृत वर्णू कसे मी नि:शब्दाची कास धरा

गातां गातां महती गुरूंची जन्म जगत दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll ४ ll

मन चातक हा शोधीत फिरतो गुरु चांदणे भवती

सहा रिपूंचे सुटता जाळें येई अलगद हाती

तीच ओढ अन तीच साधना क्षणाक्षणाला स्मरां स्मरां

मेघ कृपेच्या दत्तरूपातील आतुर झाली हृदयधरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll ५ ll

कृष्णाकाठी प्रगटे माया धाम नरसोबावाडी

नृसिंहसरस्वती अवतारांतून दत्तभेटींची गोडी

सत्य शिवाच्या सुंदर स्वरूपी नतमस्तक ही वसुंधरा

या हृदयाची करुनी ओंजळ गुरुकृपेचा मधुर धरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll ६ ll

मनमंदीरी या दीप उजळलें गुरु सहवासी रमतां

ब्रह्मा विष्णू महेश्वरांच्या पदकमलांशी नमिता

रवि शशींचे तेज मुखावर चमत्कार हा पहा जरा

प्रदक्षिणा करतांना म्हणू या श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll ७ ll

तिमिर जीवाचा विलया गेला दिशा उजळल्या दाही

ज्ञान जाहले एकच हृदयीं गुरुविण कोणी नाही

त्या ध्यासाने त्या नामाने अर्थपूर्ण हा जन्म करा

नित्य असावे स्थान जीवन हीच प्रार्थना मुनीवरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll ८ ll

दत्त निवारा दत्तच तारा दत्तच भरला गगनीं

दत्त श्वास अन दत्त प्राण हा दत्तच वातावरणी

ध्यान लागलें दाही दिशांना दत्त सूर हा मनी धरा

आनंदाने नाचत डोलत म्हणा भक्त हो दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll ९ ll

किती पातकें घडली हातून मजला घ्यावें पोटी

दत्त माय अन दत्त पिता हो भक्त लेकरासाठी

भेटायाला माय आपुली गुरुनामास्तव त्वरा करा

शरण मनाने लीन तनाने भजू या दत्ता दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll १० ll

साद घालता आर्त मनाने सद्गुरू धावत येई

संकट येता पथावरी हो गुरूच उचलून घेई

सत्त्वपरिक्षा घेई सद्गुरू क्षणाक्षणाला ध्यास धरा

एकच चिंतन सदैव अनुदिन दत्तगुरुंचा घोष करा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll ११ ll

दत्तगुरुरूपांत गुंफिले सकल जगाचे सार

ब्रह्मा विष्णू महेश हेचि आम्हां मुक्तीद्वार

संचित अवघें आले फुलूनी बोध मानसी जाण जरा

काम धाम हें करतांनाही नाम दत्त हे नित्य स्मरां

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll १२ ll

करू आरती पंचप्राणें ओवाळू सप्रेम

गुरुपारायण करण्याचा नित्य धरू या नेम

मन:शांतीचे फलित मिळाया दत्तगुरूंचे स्मरण करा

अमृत घन हा पाहा बरसला जन्मच अवघा चिंब करा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll १३ ll

उद्धारायां भक्तजनांना गुरुविण नाही कोणी

तेजच किरणें ज्ञानरवीची आली गुरुरूपानी

जे नश्वर तें आम्हां लाभलें मंत्र गुरूंचा अधरी धरा

नाही पुन्हा रे वळणे मागें वाट मुक्तीची चला धरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll १४ ll

दिव्य सतारी आम्हां लाभली गाणगापुरी आज

दत्त नाम हे एकच आतां या जन्माचे काज

दत्तगुरूंच्या आशीर्वादे पावन अवघी वसुंधरा

अणू-रेणूंतून नाम प्रगटले श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll १५ ll

सद्गुरुंच्या करुणेने आतां कृतार्थ जीवन आमुचे

मंत्रामधुनी दत्तगुरूंच्या सारथ युगायुगांचे

सदगुरु उत्सव मठांत करू या नाम जाऊ द्या दिगंतरा

प्रसन्न व्हावे भक्तांवरती हीच प्रार्थना दिगंबरा 

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ll १६ ll

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा


गीत : प्रवीण दवणे 

गायक : पं. अजित कडकडे 




No comments:

Post a Comment