विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णू-व्योमकेशी । धरिला वेष तू मानुषी । भक्तजन तारावयां ।। (श्री गुरुचरित्र अध्याय १४ - ओवी १० )
श्री गुरुदेव दत्तांचा श्रीपाद श्रीवल्लभ हा प्रथम अवतार पीठापूर नामक नगरांत झाला. 'कलौ श्रीपाद श्रीवल्लभ:' अशी ख्याती असलेल्या ह्या अवतारासंबंधित कथा श्री गुरुचरित्रांत अध्याय ५ ते अध्याय १० यामध्ये वर्णिल्या आहेत. साक्षात श्री दत्तात्रेयांच्या आशीर्वादाने आपळराज आणि सुमती या सद्गुणी दाम्पत्यांच्या पोटी श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी भक्तांनुग्रहाकारणें तें गृहत्याग करून तीर्थयात्रेस निघाले. श्रीपाद श्रीवल्लभांचे रूप अतिशय दिव्य होते. पुढें कुरवपुरात त्यांचे जेव्हा वास्तव्य होते, तेव्हा प्राणत्याग करण्यास निघालेल्या एका विप्र स्त्रीस आशीर्वाद देऊन तिचा मूढ पुत्र ज्ञानी केला आणि त्या ब्राह्मण स्त्रीच्या प्रार्थनेनुसार 'श्रीपादांसारखा पूज्य आणि वंदनीय पुत्र व्हावा' यासाठी तिला शनिप्रदोषाचें व्रत करावयास सांगितले.
श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील नृसिंहसरस्वती अवताराची ही पूर्वपीठिका गुरुचरित्रकारांनी सुरेख शब्दांत वर्णिली आहे : "आणिक कार्य कारणासी । अवतार घेऊ परियेसी । वेष धरू संन्यासी । नाम नरसिंहसरस्वती ।।"
कुरवपुरातील अजून एका भक्तालाही म्हणजेच रजकाला नृसिंहसरस्वती अवतारांत पुन्हा एकदा त्यांच्या श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत दर्शनाचा लाभ प्राप्त झाला.
"श्री गुरु म्हणती तयासी ।वैदुरानगरीं जन्म होसी ।भेटी देऊं अंतकाळासी । कारण असे आम्हां येणे ॥" असे श्रीपाद श्रीवल्लभांनी त्या भक्तास वचन नवव्या अध्यायांत दिले होतें.
काही दिवस कुरवपुरात वास्तव्य करून श्री गुरु अश्विन शुद्ध द्वादशीस गंगेत अदृश्य झालें. परंतु त्यानंतरदेखील आपण भक्तांच्या सतत पाठीशी आहे, ह्या त्यांच्या वचनाची प्रचिती वल्लभेश ब्राह्मणास आली. तो कथाभाग गुरुचरित्रात दहाव्या अध्यायांत वर्णिला आहे. या अध्यायाचा अजून एक विशेष म्हणजे ज्या चोराने वल्लभेश ब्राह्मणाच्या हत्येत भाग घेतला नाही, त्याने भक्तवत्सल श्रीपादांची क्षमा मागितली असता त्याला जीवदान मिळाले. इतकेच नव्हें तर त्या चोरास श्रीपाद श्रीवल्लभांचे प्रत्यक्ष दर्शन, त्यांच्याशी संभाषण तसेच श्री गुरूंची वल्लभेश ब्राह्मणास पुनर्जिवित करण्याची लीला प्रत्यक्ष घडतांना पाहण्याचा लाभ झाला. हा गुरुकृपेचा चमत्कारदेखील त्यानेच त्या ब्राह्मणास सांगितला. श्रीपादांच्या प्रत्यक्ष दर्शनाचे भाग्य भक्त वल्लभेशासही लाभले नाही. हा विलक्षण प्रभाव श्री गुरूंच्या कृपेचा, भक्तवत्सलतेचा आणि शरणागतांस कायम अभय देण्याचा आहें, ह्यांत शंकाच नाही.
' श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ' असा दृढ भाव असेल तर श्री गुरु कसा अनुभव देतात आणि आजही सूक्ष्म रूपात तें कुरवपूर क्षेत्री नित्य वास करत आहेत, हें ह्या कथांवरून सहज लक्षात येते.
श्री शंकर भट यांनी लिहिलेलें आणि श्री हरिभाऊ जोशी निटूरकर यांनी मराठी अनुवाद केलेले श्रीपाद श्रीवल्लभांचे विस्तृत चरित्र इथे उपलब्ध आहे.
इतर साहित्य : श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत सार
श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत
श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत - MP3
No comments:
Post a Comment