॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीसद्गुरुवे नमः ॥
रजक झाला यवन राजा । भावें करी श्रीगुरुपूजा । राजधर्मानें पाळी प्रजा । चित्त गुरुपदी बैसलें ॥ श्रीगुरु निघाले तेथून । गोदा तीर्थीं केलें गमन । गोदेंत भागिरथीस्नान । सिंहेस गुरु असतांना ॥ कन्या राशीस बृहस्पति । कृष्णा होतसे भागीरथी । कृष्णातीरीं शैल्य पर्वती । जाणार म्हणती श्रीगुरु ॥ गाणगापुरीं गुरु आले । सांगती स्थान प्रसिद्ध झालें । यवनही येती सगळे । होईल विप्रां अडचण ॥ म्हणून तेथें गुप्त व्हावें । यात्रामिषें निघून जावें । परी भक्तांनी प्रत्यय घ्यावे । येथेंच पूर्वीसमान ॥ श्रीगुरुकरणी अगाध । त्यांचें चरित्र बहुविध । यवन राजाही प्रसिद्ध । शिष्य झाला श्रीगुरूचा ॥ श्रीगुरु विचार करिती । धर्म दाविला जनांप्रती । यवनांच्याही राजाप्रती । भक्ति उपजली उत्तम ॥ वेदधर्मा अनुसरणें । सर्वभूत हित चिंतणें । आपलाही पंथ पाळणें । विधायक वृत्ति ठेवून ॥ श्रीगुरु यतिआचरण । सदा त्याचें हवें स्मरण । चिंतून श्रीगुरुचरण । सुख मिळतें इहपर ॥ तत्त्व लोकांला समजलें । येथलें कार्य पुरें झाले । शैल्य पर्वती गमन केलें । श्रीगुरु करणी लक्षावी ॥ लोकांस मिळे आश्वासन । अनुभव येती प्रतिदिन । निर्गुण पादुका मम स्थान । वास्तव्य त्यांत निरंतर ॥ येथें राहूं गुप्तपणानें । भाव ठेवा आतां प्रमाणें । भक्तांस सदा सांभाळणें । ब्रीद आमुचें सदैव ॥ जाहली होती धर्मग्लानी । लोक झाले शंकित मनीं । म्हणून आलों अवतरूनी । वैदिक धर्म रक्षिण्या ॥ जशी परिस्थिती होतेसे । त्यापरी येणें घडतसे । भावा ठेवावा भरंवसे । चिंता नको मुळींच ॥ ऐकतां गुरूंचे वत्सल बोल । लोकां वाटली हळहळ । म्हणती गुरो तुम्ही जल । आम्ही मत्स्य सुखी होतों ॥ लोक दुःखी झाले अपार । शब्दें वर्णन न होणार । श्रीगुरू नसती निष्ठुर । प्रेमें लोकां शांतविती ॥ श्रीगुरु भक्तांस सांगती । आम्ही राहातों गुप्तरीतीं । ज्यांना असेल भावभक्ती । त्यांना दृश्य स्वभावें होऊं ॥ निर्गुण पादुका मठांत । चिंतामणीही येथें असत । शुद्धभावें भजा सतत । सुख होईल तुम्हांला ॥ मला आवडतें गायन । गायनीं करावें स्मरण । चित्तवृत्ति चरणीं लीन । कृपा होईल निश्चित ॥ मी भावाचा सदा भुकेला । भेटेन ज्यासी भाव त्याला । आरती करा तिन्ही वेळां । पूजन विधी प्रमाणें ॥ आम्ही येथून नाहीं जात । परंतु राहणार गुप्त । येतील येथें नाना भक्त । त्यांच्या इच्छा पुरतील ॥ गाणगापूर दिव्य स्थान । सर्वांना करील पावन । येथें नसावा अभिमान । उत्तम क्षेत्र हें असे ॥ चरित्र वाचावें ऐकावें । घरींही सर्वदा पूजावें । श्रद्धेनें निर्भय असावें । रक्षण निश्चयें होईल ॥ जे जन करिती माझी भक्ती । त्यांची काळजी मजप्रती । त्यांच्या घरी मी श्रीपतीं । अखंड वसतों प्रीतीनें ॥ त्यांना चारही पुरुषार्थ । साधतील हा निश्चितार्थ । सकळ सिद्धि वसतो तेथ । संशय मनीं नसावा ॥ दुष्ट बाधेचें निरसन । होऊन सुखसमाधान । लाभेल रहावें सावधान । दुष्ट बुद्धि धरूं नये ॥ त्यांना नाहीं यमाचें भय । लाभ ही लाभे हा निश्चय । पुत्रपौत्रादि अष्टैश्वर्य । अंतीं निर्भय मिळे मुक्ति ॥ यापरी श्रीगुरु सांगती । त्यांना असो भावें प्रणती । छप्पन्नावा अध्याय येती । श्रीदत्तगुरु भक्तहिता ॥ सायंदेव, नंदी, नरहरी, । सिद्ध हे गुरु शिष्य चारी । त्यांच्यासह श्रीगुरुस्वारी । निघे श्रीशैल्य यात्रेसी ॥ आश्वासून गाणगापुरी । निघातां यात्रा जमे अपारी । लोकांचे नेत्रीं दिसे वारी । वर्णन येथें न करवे ॥ कंठ दाटून येतसे । नेत्रीं उदक गळतसे । भक्तिपाश गहन असे । विचारें न जमे वागणें ॥ श्रीगुरुदत्त कृपामूर्ती । पुन्हां पुन्हां लोक नमिती । शिष्यांसह श्रीगुरु जाती । लोक माघारे परतले ॥ मठांत दिसे श्रीगुरु यती । लोक झाले निर्भय चित्तीं । लगेच गुरु गुप्त होती । धन्य त्रैमूर्ति अवतार ॥ प्रातःस्नान कृष्णा-तीरीं । दुपारीं भिक्षा गाणगापुरीं । अशी असे गुरु-वैखरी । भक्त मनीं सदोदित ॥ पहाटेपासून नित्यापरी । क्रम चालविती पूजारी । सेवा करिती सेवेकरी । श्रीगुरु रात्रीं झोंपती ॥ कृपाळु श्रीगुरुदत्त-मूर्ती । नाना स्थानें प्रकट करिती । भक्त-कामना पुरविती । साक्षात्कार भक्तमना ॥ बहुधान्य वर्ष माघ मास । सायन कुंभ संक्रांतीस । कृष्ण प्रतिपदा शुक्र दिवस । कन्या राशींत देव-गुरु ॥ शक तेराशें ऐंशीत । श्रीगुरु यात्रेस निघत । भक्तमनें उचंबळत । मठीं पाहून भक्त सुखी ॥ श्रीमल्लिकार्जुन पर्वतीं । कृष्णेचें पात्र खोल अती । पाताळगंगा तिला म्हणती । श्रीगुरु तेथें पातले ॥ शिष्य वंदिती चरणांसी । श्रीगुरु आज्ञापिती त्यांसी । जाणें असे पैलतीरासी । पुष्पासन त्वरित करा ॥ शिष्य आणिती नाना फुलें । पुष्पासन लगेच केलें । नदी-प्रवाहांत ठेविलें । त्यावर श्रीगुरु बैसले ॥ आतां होणार ताटातूट । सगुण रूपें नाहीं भेट । काय होईल आमुची वाट । हीच शंका दाट मनीं ॥ धन्य धन्य श्रीगुरुनाथ । दतात्रेय स्वामी समर्थ । त्यांच्या भक्तीनें जन्म कृतार्थ । नमन प्रेमं गुरुचरणीं ॥ गुरु सांगती प्रिय शिष्यांसी । चिंता करूं नका मानसीं । सदा पावाल प्रत्ययासी । तुमच्याकडे मी असें ॥ तुम्हां नाहीं कसलें भय । रहावें सर्वदा निर्भय । मम भक्तां सदा अभय । त्यांची प्रीती अपार मला ॥ प्रेमं शिष्यां कुरवाऴिती । प्रसाद फुलें धाडूं म्हणती । शेवंती पुष्पे चार येती । घ्यावी काढून चौघांनी ॥ करा त्यांचें नित्य पूजन । पावाल क्षेम समाधान । अंतीं सद्गती सुख भोगून । आतां निश्चिंत असावें ॥ इतके सांगून श्रीगुरु । जाते जाहले पैलपारु । नावाड्यांकडे सांगती गुरु । निरोप शिष्यां प्रेमाचा ॥ शिष्य बनले चिंताक्रांत । नावाडी येती इतक्यात । सांगती शिष्यां टाका खंत । आम्ही श्रीगुरु देखिले ॥ नाम नृसिंह सरस्वती । त्यांचा वेष संन्यासी यती । सुवर्ण पादुका पदांप्रती । चालत जाती पलीकडे ॥ त्यांनी सांगितले तुम्हांस । गाणगापुरीं गुप्त वास । आतां जातों कर्दळी वनास । प्रसाद पुष्पें येतील ॥ तेचं पुष्पें प्रवाहांतून । आलीं घेतलीं उचलून । गुरु-रूप मानून वंदन । भक्तिभावें शिष्य करिती ॥ सिद्ध नामधारका सांगती । गुरु-चरित्र प्रेमें अती । प्रसाद पुष्पही दाविती । नामधारक समाधिस्थ ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
संदर्भ आणि मूळ स्रोत : http://dattacharitrasar.com/
No comments:
Post a Comment