हे परममंगला श्रीहरी, तुझी कृपा झाल्यावर अवघेंच अशुभ दूर जातें असाच संतांचा अनुभव आहे.॥१॥त्या संतवचनांवर सर्वथा विश्वास ठेवून हे श्रीनिवासा, मी मांगल्याची आशा मनीं धरून तुझ्या दारीं पातलों आहें.॥२॥ मला आतां विन्मुख पाठविल्यास त्याचा तुला दोष लागेल आणि संतांच्या वचनांसदेखील बट्टा लागेल.॥३॥ आणि म्हणूनच हे माधवा !,माझा तुम्ही अभिमान धरावा.या अजाण लेंकरावर कधीही तुम्ही रागावू नका.॥४॥ बालकांचा कमीपणा/ दोष हा मातेला दुषणच असतो. हे कृपया लक्षांत घेऊन जे आपणांस योग्य वाटेल तेच करा.॥५॥ असो. समर्थांची स्वारी बंकटलालाच्या घरी असतांना एक अपूर्व घटना घडली. श्रोते हो, ती गोष्ट तुम्ही आतां ऐका.॥६॥ शेगांवच्या दक्षिणेस बंकटलालाचे शेत होतें.एक दिवस महाराज त्या मळ्यांत मक्याचीं कणसें खाण्यास गेले.॥७॥ त्यांच्यासोबत खूप सारी मंडळी कणसें खाण्यास आली. मळ्यांतील विहिरीजवळ कणसें भाजण्याची तयारी केली होती.॥८॥ ती विहीर विशाल असून तिला भरपूर पाणीही होते. चिंचेचे गर्द छाया असलेले मोठे वृक्ष त्या विहिरीजवळ होतें.॥९॥ (कणसें भाजण्यासाठी) अंदाजे दहा-बारा आगीच्या शेगड्या पेटवल्या गेल्या. त्यांमुळे धुराचा डोंब अगदी आकाशापर्यंत पोहोचला.॥१०॥ त्याच्यामुळे झाले असे की एका चिंचेच्या झाडावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यातील मधमाश्या उठल्या. ॥११॥ ज्या क्षणींत्या माशा उठल्या, तत्क्षणीच सर्व मंडळी घाबरून पळून गेली. आणि मक्याचीं कणसें तिथल्याच तिथें राहिली.॥१२॥ त्या पोळ्यातील मधमाश्या बघतां बघतां सर्व मळ्यांत पसरल्या. काहीजण घोंगडयाचा बुरखा घेऊन पळून गेले.॥१३॥ खरोखर ह्या जगांत प्राणापेक्षा अधिक आवडती वस्तू कोणतीही नाही.अशा वेळीं मात्र समर्थमूर्ती आपल्यां आसनीं निर्धास्त होती.॥१४॥ तें मुळी पळून न जातां आपल्या आसनी स्वस्थ बसलें होते. आपल्या चित्ती मधमाश्यांचा विचार करूं लागले.॥१५॥ मीच माशीरूप आहें, पोळे हेही मीच आहें.ही कणसें खावयास मीच इथे आलों आणि कणसेंही माझीच तर रूपें आहेत.॥१६॥ असा विचार करीत महाराज आनंदात बसलें होते. त्यांच्या अंगावर असंख्य माश्या येऊन बसल्या होत्या.॥१७॥ श्री समर्थ जणू काही मधमाश्यांची घोंगडी घेऊन बसले आहेंत असेच वाटत होते. ब्रह्मनिष्ठ स्वामींची योग्यता कशी बरी वर्णावी ? ॥१८॥ त्यामधमाश्यांनी त्यांस अनेकदा दंश केला.त्या माश्यांचे असंख्य काटे महाराजांच्या शरीरात पसरलें होते.॥१९॥ एक पूर्ण प्रहरभर, महाराजांच्या सर्व शरीरावर मधमाश्यां होत्या, अवघें भक्त चिंतातुर झालें. बंकटलालाचें मन तर दु:खाने व्याकुळ झालें.॥२०॥ मला कोठून बुद्धी झाली अन मी श्री समर्थांस इथे इतर मंडळींसमवेत मक्याची कणसें खाण्यास आणले.॥२१॥ अश्या रितीने समर्थांस दु:ख देण्यास मीच कारणीभूत झालो.हाय रे दुर्दैवा ! हेच का माझें शिष्यपण ? असा तो मनांत विचार करू लागला.॥२२॥ अखेर बंकटलालानें पुढें येण्याची खरोखर तयारी केली आहे हे समर्थांनी मनांत जाणले अन एक चमत्कार केला.॥२३॥ हे मधमाश्यांनो, तुम्ही इथून निघून आपल्या पोळ्यांत परत जा ! माझा प्रिय भक्त बंकट इथे येतो आहे, त्यांस तुम्हीं कुणीही चावू नका.॥२४॥ इथे जमलेल्या सर्व मंडळींत बंकट हाच माझा निःसीम भक्त आहें, जो माझ्यासाठी धावून येत आहें.॥२५॥ असे महाराजांनी म्हणताच सर्व मधमाश्या पुन्हां पोळ्यांत जाऊन बसल्या. बंकटलालानें स्वतः आपल्या डोळ्यांनी त्या परत आपल्या स्थानीं गेलेल्या पाहिल्या.॥२६॥ महाराज त्यास पाहून हसून बोलले,अरे वा ! आमच्यासाठी छान मधमाश्यांची मेजवानी केलीस.॥२७॥ अरे, ते विषारी जीव जेव्हा माझ्या सर्वांगावर बसले होतें,तेव्हा हे सारे लड्डूभक्त माझ्यापासून लांब पळून गेलें.॥२८॥ बघ तू नीट विचार कर,कुणावरही संकट आल्यांस एका ईश्वरावांचून कोणीही साहाय्य करत नाहीं.॥२९॥ केवळ जिलेबी, पेढे, बर्फी खाण्यासाठी जमतात अन मधमाश्या आल्यावर पळून जातात,असें ज्यांचे वर्तन असतें. ते निःसंशय स्वार्थी भक्त होत.॥३०॥ त्यावर बंकटलाल विनम्रतेने विचारू लागला,महाराज मी मधमाश्यांचे काटे काढण्यासाठी सोनारांस बोलावू का ? ॥३१॥ हे गुरुराया,मी महापापीच ज्याने तुम्हांस ह्या ठिकाणीं आणले,अन तुम्हांस असंख्य मधमाश्या डसल्यामुळे झालेल्या ह्या त्रासांस कारणीभूत झालो.॥३२॥ तुमच्या सर्वांगावर (मधमाश्यांच्या दंशामुळे)अगणित गांध्या उठल्या आहेंत, यातूंन बरें होण्यासाठी आता कोणता उपाय करावा ? हे कृपा करून सांगा.॥३३॥ बंकटलालाचें तें बोलणे ऐकून महाराज उत्तरलें, अरे, इथे काहीच वेगळे घडले नाही. डसणे हा तर माश्यांचा स्वभावच असतो.॥३४॥ पण मला कधीही त्या मधमाश्यांची बाधा होणार नाहीं कारण त्या माशीरुप सच्चिदानंदाला मी पूर्णतः जाणले आहें.॥३५॥ मधमाशीही तोच झाला, माझे रूपदेखील तोच आहें. पाण्यानेंच पाण्याला कधी दुखवितां येतें का ?॥३६॥ हें ब्रह्मज्ञान ऐकून बंकटलाल काहीच बोलला नाहीं. त्यानें कांटे काढण्यासाठी सोनारांस बोलाविलें. ॥३७॥ सोनार चिमटे घेऊन आले आणि मधमाश्यांचे काटे महाराजांच्या शरीरांत कोठें रुतले आहेत तें शोधू लागलें. ॥३८॥ महाराज त्यांस बोललें,उगाच कशाला तुम्ही वेळ दवडतां ? तुमच्या ह्या डोळ्यांना काही ते कांटे दिसणार नाहींत.॥३९॥ तें मधमाश्यांचे काटे काढण्यासाठी ह्या चिमटयांचा काहीच उपयोग नाहीं. ह्या गोष्टीचा पुरावा मीच तुम्हांस दाखवतो. ॥४०॥ असें म्हणून महाराजांनी योगाने वायूस रोखलें. तों शरीरातील अवघेंच रूतलेलें कांटे वर आलें. (असा समर्थांनी चमत्कार केला.)॥४१॥ तो प्रकार पाहून सारे लोक फार आनंदले.श्रीगजाननस्वामींचा अधिकार सर्वांस कळून आला.॥४२॥ त्यानंतर तिथे कणसें भाजलीं व सर्वांनी तीं ग्रहण केलीं.सायंकाळी सर्व मंडळी आपापल्या घरीं निघून गेली.॥४३॥ असो. पुढें एकदा महाराज आपला बंधू श्रीनरसिंगजी महाराज यांना भेटण्यासाठी अकोटाला गेले.॥४४॥ हें श्रीनरसिंगजी कोतश्या अल्ली यांचे शिष्य असून मराठा जातीचे होते.आपल्या भक्तीसामर्थ्यामुळे ते विठ्ठलाचे प्रिय भक्त, जणू कंठमणीच झाले होते.॥४५॥ मीं भक्तलीलामृतांत श्रीनरसिंगजी महाराजांचे चरित्र इत्यंभूत वर्णिलें आहे. आतां इथे तें (विस्तारभयास्तव )सांगत नाहीं.॥४६॥ शेगांवपासून ईशान्य दिशेला साधारण अठरा कोसांवर हें अकोट नावाचे नगर आहे.॥४७॥ शरण आलेल्या भक्तांचे कल्पतरूच असलेले श्रीगजानन महाराज मनोवेगाच्या वारूवरून (अकोटास )जाण्यास निघालें.॥४८॥ अकोटाच्या जवळ असलेल्या एका घनदाट अरण्यांत श्रीनरसिंगजी महाराज एकान्तवासात दिवसरात्र रहात असतं.॥४९॥ ते महा भयकंर असें अरण्य निर्जन असून निंब, पिंपळ, रातांजन असें अनेक विशाल वृक्ष तिथे होते.॥५०॥ अनेक प्रकारच्या लता-वेली त्या महाकाय वृक्षांस वेढलेल्या होत्या. भूमीवरती प्रचंड गवत वाढले होतें. तिथे वारुळांमध्ये असंख्य सर्प होतें.॥५१॥ अश्या त्या अरण्यांत नरसिंगजी वास्तव्य करून होतें. म्हणूनच श्री समर्थ त्यांस अवचित भेटण्यासाठी आलें.॥५२॥ खरोखर समान तत्त्व असलेलेच,सामान विचारधारेचेच एकेमेकांस भेटतात.पाणीच पाण्यांत एकरूप होतें.विजातीय द्रव्य कधीच समरस होऊ शकत नाही.॥५३॥ श्री गजाननांस पाहून नरसिंगजी स्वामींस अत्यानंद झाला.त्यांच्या एकमेकांवरील लोभाचे मी वर्णन करू शकत नाही.॥५४॥ एक हरी तर एक हर जणू काही दोघेही चालते बोलते परमेश्वरच होते.एक राम तर एक वसुदेव-देवकीचा कुमार कृष्णच होते.॥५५॥ एक मुनी वसिष्ठ तर एक श्रेष्ठ असे पाराशर ऋषि होतें.एक जान्हवीचा कांठ तर एक गोदावरीचा तट होते.॥५६॥ एक कोहिनूर हिरा,तर खरोखर एक कौस्तुभमणीच होते. एक वैनतेय म्हणजे गरुड तर एक सती वानरी अंजनीचा पुत्र हनुमंतच होते.॥५७॥ दोघांसही एकमेकांस भेटून अतिशय आनंद झाला. एका आसनांवर बसून दोघेही एकमेकांशी हितगुज करू लागलें.॥५८॥ एकमेकांस आपापले अनुभव कथन करू लागले.नरसिंगा,तूं प्रपंचांत राहिलास हे उत्तम केलेंस.॥५९॥ मी प्रपंचाचा त्याग करून योगमार्ग स्वीकारला.या सच्चिदानंद तत्त्वाचा विचार करू लागलो.॥६०॥ या योगक्रियेत अत्यंत अघटीत अशा गोष्टी घडतात, त्या सर्वच आकलन होणें हे ह्या सामान्य जनांस अशक्य असतें.॥६१॥ त्याच गोष्टी लपवण्यासाठी या जगाच्या दृष्टीने मी हा असा पिसा झालो.नको ती उपाधी टाळण्यासाठी मी बळेंच वेडेपणाचे सोंग घेतलें.॥६२॥ शास्त्रकारांनीं शास्त्रांमध्ये हे तत्त्व जाणण्यासाठी कर्म, भक्ति, आणि योग असे तीन मार्ग सांगितले आहेंत.॥६३॥ या तीन ही मार्गांचें जरी फळ अखेर एकच असले तरीही प्रत्येक मार्गांचें बाह्य स्वरुप मात्र अतिशय भिन्न आहें.॥६४॥ जर एखाद्या योगी साधकाने योगक्रियेचा अभिमान धरला तर त्याला कधीही ह्या तत्त्वाचा खरा बोध होतं नाहीं.॥६५॥ योगक्रिया करूनदेखील कमळाच्या पानांप्रमाणे त्यांपासून अलिप्त राहिले तरंच ते तत्त्व कळून येतें.॥६६॥ नरसिंगा, अगदी त्याचप्रमाणे प्रपंचाची स्थिती आहे.तिथे कन्यापुत्रांची आसक्ती मुळींच राहतां कामा नये.॥६७॥ गार ज्याप्रमाणे पाण्यांत असून देखील पाणी आंत शिरू देत नाही,त्याचंप्रमाणे ह्या प्रपंचात वर्तन असू द्यावें.॥६८॥ तूही तसाच रहा. सदा अपेक्षारहित असावें आणि त्या सच्चिदानंद परमेश्वराला कधीही अंत:करणातून ढळूं देऊ नये(त्याचा विसर पडू नये).॥६९॥ म्हणजे कांहींच अशक्य रहात नाहीं. तूं, मी आणि शेषशायी श्रीविष्णू एकरुपच आहोंत. जन आणि जनार्दन काही वेगळे नसतात.॥७०॥ त्यांवर नरसिंग बोलले,हें बंधुराया,मला तू भेटण्यास आला, ही तुझी किती कृपा व दया आहे, खरोखर त्यांस उपमा नाहीं.॥७१॥ हा प्रपंच मुळीं अशाश्वत आहें, त्याची किंमत तरी काय ? दुपारच्या सावलीला कधी कोण खरे समजतो का ?॥७२॥ तू जो उपदेश केला आहेस तसाच मी ह्या जगतीं नक्की वागेन. मला तू असाच वरचेवर भेटावयास येत जा.॥७३॥ ज्याचें जसे देह-प्रारब्ध असेल त्याचप्रमाणे सामान्य लोकांच्या बाबत निःसंशय घडून येतें.॥७४॥ मात्र तुम्हां-आम्हांला जे करण्यासाठी ह्या भूमीवर ईश्वरानें पाठविलें आहे तेच आपण निरालसपणें करावयाचें आहें.॥७५॥ आतां इतकीच विनंती आहे की वरचेवर अशी व्यावहारिक भेट मला देत जावी, कारण मी तुझा धाकटा बंधु आहे.॥७६॥ भरत ज्याप्रमाणें श्री रघुपतीची वाट पहात नंदीग्रामीं राहिला, मीही तसाच या आकोटांत वास करीत तुझी वाट पहात राहीन.॥७७॥ तुला इथे येण्यांस निश्चितच काही अशक्य नाहीं ! तुला पहिल्यापासूनच अवघ्या योगक्रिया अवगत आहेत.॥७८॥ पाण्यांस पायदेखील न लावतां योगीपुरुष त्यावरून भरधांव पळतात.एका क्षणांतच अवघ्या त्रिभुवनांत शोध घेत फिरूनही येतात.॥७९॥ त्यां उभयतांचें असें हितगुज रात्रभर झालें. एकमेकांस भेटून दोघांनाही अतिशय आनंदाचे, प्रेमाचे भरतें आलें होतें.॥८०॥ श्रोतेहो, जे का खरें संत असतात,तिथेच असे घडतें. दांभिकांचीं मात्र एकमेकांना पाहून भांडणें होतात.॥८१॥ दांभिकांस कधीही आपला गुरु म्हणूं नये,ते केवळ पोट भरण्यासाठी संत झालेले असतात. फुटकें जहाज कधीही पुरातून आपण्यास वाचवण्यास समर्थ नसते.॥८२॥ जरी जगांत खरोखर दांभिकांचाच बोलबाला होतो, तरीही श्रोते हो !त्यांस ओळखून आपण त्याचा त्याग करावा हेच बरें.॥८३॥ संतत्व एखाद्या मठांत नसते, तसेच फक्त विद्वत्तेंत वा कवित्वांतदेखील संतत्व नसते. तिथें केवळ स्वानुभव पाहिजे.॥८४॥ दांभिकतेचा मुलामा दिलेलें सोनें कधी कुणाला घेणें आवडेल काय ? घरांत गृहिणी म्हणून कोणी कसबीण ठेवते का ?॥८५॥ ही साक्षात्कारी संतजोडी मुळातच दांभिकतेची वैरी होती. त्यांच्या घरी सदैवच सन्नीति आणि सदाचार नांदत होतें.॥८६॥ नरसिंगजी महाराजांस भेटण्यासाठी गजानन स्वामी अरण्यांत आले आहेंत, हे वर्तमान एका गुराख्याकडून अकोटवासियांना समजले.॥८७॥ तें वर्तमान ऐकून लोकं आनंदले. त्या संत द्वयांस बघण्यासाठी नारळ घेऊन वनाकडे धावतच निघाले.॥८८॥ एकमेकांस म्हणू लागले,सत्वर चला चला रे! अरण्यांत गोदा आणि भागीरथीचा संगम झाला आहें .॥८९॥ त्या भेटीरूप प्रयाग स्थानी आपण स्नानासाठी जाऊ या. सर्वांनीया महोदयपर्वणीचा लाभ करून घेऊ या.॥९०॥ पण तेव्हा काय झालें की गजानन महाराज नरसिंग स्वामींना भेटून आधींच निघून गेले होतें. त्यामळें लोकांस त्यांची भेट घडलीच नाही.॥९१॥ पुढें एकदां गजानन समर्थ भ्रमण करत करत आपल्यां शिष्यांसह दर्यापूरजवळ आलें.॥९२॥ दर्यापुराच्या निकट चंद्रभागेच्या तीरीं शिवरगांव नावाचे एक गांव आहें. तिथे व्रजभूषण रहात असें.॥९३॥ श्रोते हो, ही चंद्रभागा पंढरीची नव्हें बरं का ? ही एक लहानशी गंगा आहें जी पयोष्णी नदीला जाऊन मिळतें.॥९४॥ याच शिवर गांवांत व्रजभूषण नावाचा पंडित होतां. श्रोतेजन हो, त्यांस चार भाषा अवगत होत्या.॥९५॥ साऱ्या वऱ्हाडांत त्याच्या विद्वत्तेची कीर्ति पसरली होतीं. तों सूर्यनारायणांची मनापासून भक्ती करत असे.॥९६॥ तों प्रतिदिवशी चंद्रभागेवर स्नान करीत असें. दिनकर उदयास येतांच त्यांस अर्घ्य देत असे.॥९७॥ अगदी उषःकाली व्रजभूषण उठत असे. प्रातर्विधी आवरून अरुणोदयाच्या वेळीं स्नान करीत असे.॥९८॥ नेहमीच तो थंड पाण्यानें स्नान करी, असा तो अतिशय कर्मठ पण ज्ञानी होता.अनेक विद्वज्जनांत त्याच्या विद्वत्तेची विशेष मानमान्यता होती.॥९९॥ त्या शिवरगांवी योगीराज गजानन फिरत फिरत आलें.त्या व्रजभूषणाच्या तापाचे त्यांना फळं द्यायचे होते असेंच वाटते.॥१००॥ हा ज्ञानजेठी चंद्रभागेच्या वाळवंटांत बसला होतां.समोर नदी तीरावर व्रजभूषण स्नानासाठी आले होतें.॥१०१॥ त्या प्रभातकाळीं दाहीं दिशा प्रकाशमान झाल्या होत्या.वरचेवर कुक्कुटाचा आवाजही ऐकू येत होता.॥१०२॥ पूर्व दिशा लक्षून चातक, भारद्वाज आदी पक्षी अत्यादरांने जणू भास्कराचे स्वागत करीत सामोरी जात होतें.॥१०३॥ सूर्यनारायणांचा उदय होतांच हां हां म्हणतां तम निघाला. जसें की सभेस पंडित येतांच मूर्ख लगेच उठून जातात.॥१०४॥ अशा त्या सुप्रभातीं, गुरुमूर्ति ब्रह्मानंदीं डोलत,निवांत त्या वाळवंटांत बसली होती.॥१०५॥ सभोवताली अनेक शिष्य मंडलाकारात बसले होतें. तें शिष्य नसून गजाननभास्कराचीं तेजस्वी किरणेंच भासत होतें.॥१०६॥ त्यावेळींनित्यनियमानुसार व्रजभूषणाने सूर्यास अर्घ्य दिले. तेव्हा समोर बसलेला हा ज्ञानसविता त्याच्या नजरेस पडला.॥१०७॥ ज्यांची सूर्याप्रमाणें सतेज कांति असून ते निश्चितच अजानुबाहू होते.महाराजांची दृष्टि नासाग्रावर स्थिर झालेली होती.॥१०८॥ असा योगीपुरुष पहाता क्षणीच व्रजभूषणाला मनांत अतिशय आनंद झाला. संध्येचे सर्व साहित्य घेऊन तो त्यांच्याजवळ धावतच आला.॥१०९॥ सत्वर त्याने गजानन महाराजांच्या पायांवर अर्घ्य दिलें.अखेर समर्थांस त्याने प्रदक्षिणाही घातली.॥११०॥ "मित्राय नमः, सूर्याय नमः, भानवे नमः, खगाय नमः... " अशी नांवे घेऊन व्रजभूषणाने द्वादश नमस्कारही घातले.॥१११॥ शेवटीं गजानन महाराजांची त्याने मनोभावे आरती केली. अशा रितीने काहीही न्यून न ठेवतां पूजन केलें.॥११२॥ नंतर त्याने प्रार्थनापूर्वक साष्टांग नमस्कार केला आणि महाराजांचे थोर स्तवन तो मुखानें म्हणू लागला.॥११३॥ आज मला खरोखर माझ्या तपाचरणाचें फळ मिळालें. आपल्या दिव्य चरणांचे दर्शन झाल्याने आज मी धन्य झालों.॥११४॥ आजपर्यंत मी आकाशातील भास्करांस अर्घ्य देत होतों. त्याच ज्ञाननिधि योगेश्वरांचे आज मला प्रत्यक्ष दर्शन झालें.॥११५॥ श्लोक - हे पूर्णब्रह्म, जगचालक, आणि ज्ञानराशी असें प्रत्येक युगांत किती अवतार घेतोस ? हें गजाननगुरु ,तुझें दर्शन झाल्यांस भवरोग, आणि चिंता क्षणांत नाश पावतात. माझ्यावर आतां कृपा कर. ॥१॥ अशी प्रार्थना करून त्यानें स्तवन पूर्ण केलें. योगेश्वरांनी ( प्रसन्न होऊन ) दोन्ही करांनी दृढ धरून व्रजभूषणास आलिंगन दिलें.॥११६॥ माता जशी लेंकराला प्रेमाने पोटाशी धरतें,त्याचप्रमाणें महाराजांनी व्रजभूषणाला पोटाशी धरले.॥११७॥ आणि त्यांनी 'बाळा व्रजभूषणा,सर्वदा तुझा जयजयकार होईल 'असा त्याच्या मस्तकावर हात ठेऊन थोर आशीर्वाद दिला.॥११८॥ तू कधीही कर्ममार्ग सोडूं नकोस. विधींस निरर्थक मानूं नको ! मात्र बाळा, त्यांत केव्हांही गुंतून जाऊ नकोस.॥११९॥ कर्मफलाचे सच्चेपणानें आचरण केल्यांस तो घननीळ नक्की भेटतो. या कर्मामुळे तो ईश्वर कधींही मलिन होत नाहीं.॥१२०॥ तू आतां माझे हे बोल लक्षात ठेव, आपल्या घरांत तू जेव्हा जेंव्हा माझे ध्यान करशील, तेव्हा तेव्हा तुला माझे दर्शन होईल.॥१२१॥ असे म्हणून महाराजांनी त्या व्रजभूषण पंडिताला श्रीफळ प्रसाद म्हणून दिले. त्यानंतर समर्थ शेगांवीं परत आलें.॥१२२॥ श्रोतें हो, पूर्वकालीं ह्या शेगांवाचें नांव शिवगांव असे होतें.त्याचाच अपभ्रंश होऊन सध्या शेगांव हे नांव प्रचलित आहें. वर्हाडांत असलेल्या या गांवात एकूण सतरा पाटील होते.॥१२३-१२४॥ महाराज शेगांवी परत आलें खरे, पण त्यांनी तिथे कधीच स्थिर असा वास केला नाही.तें कायमचं मनाला येईल त्या स्थानीं भटकत राहिले.॥१२५॥ आकोट, अकोलें, मलकापूर आदी त्या स्थानांची नावे तरी किती सांगावी? कोणालाही आकाशांतील चांदण्यांची गणती करतां येत नाही.॥१२६॥ ज्येष्ठ, आषाढ मास सारले, अन पुढें श्रावण महिना आला. मारुतीच्या देवळांत आता उत्सव सुरुं झाला होता.॥१२७॥ त्या शेगांवीं हें भव्य असे मारुतीचें मंदिर होतें. सारी पाटील मंडळी या मारुतीरायाचें भक्त होतें.॥१२८॥ गवताच्या पेंडीला ज्याप्रमाणें आळ्याने बांधतात, तसेच साऱ्या गांवावर पाटील मंडळींचा वचक होतां.जें जें कांहीं पाटलास आवडेल, लोकांसही तेंच आवडत असे.॥१२९॥ हा उत्सव महिनाभर संपन्न होई.अभिषेक, पोथी-वाचन, कीर्तन- गजर असे कार्यक्रम होत.सढळ हस्तें अन्नदानही होत असे, त्यांमुळें अवघे लोक तृप्त होत असतं.॥१३०॥ खंडू पाटील या उत्सवाचा पुढारी होता. शेगांवचा हा मुख्य कारभारी अतिशय उदार मनाचा होता.॥१३१॥ श्रोतें हो,हें पाटीलपण म्हणजे वाघाचें पांघरुण असतें.तें जो घेई, त्यांस अवघे गांवकरी सहजच घाबरून असतं.॥१३२॥ मराठींत एक ' गांव करी तें राव न करी ' अशी सुंदर म्हण आहें. ती अगदी समर्पक आहें.॥१३३॥ श्रावण महिन्याच्या आरंभी त्या मारुतीच्या मंदिरांत पुण्यराशी गजानन महाराज श्रींचा उत्सव पाहण्यासाठी म्हणून आलें.॥१३४॥ त्यांनी बंकटलालास त्यावेळीं समजावले, मी आतां इथून पुढें मंदिरातच वास्तव्य करेन. तू याबद्दल अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस.॥१३५॥ गोसावी, संन्यासी, वा फकीर यांना कायमचें राहण्यांस प्रापंचिकाचें घर काही योग्य नव्हे.॥१३६॥ मी परमहंस, संन्यासी आहें, मी आतां यापुढें मंदिरातच राहीन. तू ज्या दिवशीं मला तुझ्या गृहीं बोलावशील, मी तेवढयापुरता तिथे येईन.॥१३७॥ बंकटलाला, हें अंतरींचें गुह्य मी तुला सांगितले आहें. स्वामी शंकराचार्यानी देखील भ्रमणच केलें.॥१३८॥ मच्छिंद्र, जालंदर आदी गोसावीसुद्धा निरंतर अरण्यांत वृक्षातळीं राहिले. त्यांनीही प्रापंचिकाचें घर वगळलें.॥१३९॥ छत्रपती राजा शिवाजी जो वीर-रणबहादूर होतां. ज्यानें दुष्ट यवनांचा पराभव करून, हिंदूच्या परंपरेचे, राज्याचें रक्षण केलें.॥१४०॥ त्या राजा शिवछत्रपतीचे समर्थ रामदासांवर फार प्रेम होतें. तरीही, स्वामींचे सज्जनगडावरच वास्तव्य होतें.॥१४१॥ बंकटलाला ,तूसुद्धा याचा विचार करून मुळींच हट्ट करू नकोस आणि माझ्या या म्हणण्यास मान द्यावा. यांतच तुझे कल्याण आहें.॥१४२॥ अखेर निरुपाय होऊन त्या बंकटलाल सावकाराने गजाननस्वामींच्या म्हणण्याला रुकार दिला.॥१४३॥ स्वामी समर्थ मंदिरात राहायला आल्यांवर, सर्व भक्तजनांस अतिशय हर्ष झाला. त्यावेळीं भास्कर पाटील महाराजांजवळ सेवा-शुश्रूषेकरतां सतत जवळ असें.॥१४४॥ हा दासगणूविरचित श्रीगजाननविजय नावाचा ग्रंथ सर्व मुमुक्षांस संतचरणसेवेचा मार्ग दाखवो, हीच प्रार्थना.॥१४५॥
॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥
श्री गजानन विजय कथामृत अध्याय १ ते ५ इथे वाचता येतील.
No comments:
Post a Comment