॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्रीदत्त संप्रदायांतील सर्वच अधिकारी विभूतींनी श्री सरस्वती गंगाधर विरचित श्रीगुरुचरित्र ग्रंथाचे माहात्म्य पुन्हा पुन्हा अधोरेखित केले आहे. तर असंख्य दत्तभक्तांनीदेखील या वेदतुल्य ग्रंथाचे नित्यपाठ वाचन, पारायण करून श्रीदत्तमहाराजांच्या कृपेची प्रचिती अनुभवली आहे. ज्या दत्तभक्तांना काही कारणास्तव समग्र गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य होत नाही, त्यांनी निदान काही विशिष्ट अध्यायांची यथाशक्ती, भक्तिपूर्वक पारायणे करावीत, असे अनेक अधिकारी संतमहात्म्यांनी सांगितले आहे. त्यांतीलच एक अध्याय म्हणजे चौदावा अध्याय - आकस्मिक अरिष्ट निवारणार्थ हा अध्याय अवश्य वाचावा. गुरुकृपा किती प्रभावी असते हे सांगणारा हा अध्याय या श्रीगुरुचरित्र अध्यायमालिकेचा मेरुमणि आहे. मेरुमणि म्हणजेच एखाद्या माळेंतील मोठा, मध्यवर्तिमणि किंवा मुख्य आधारस्तंभ ! क्रुरयवनशासनं-सायंदेववरप्रदानं नामक या अध्यायचेही असेच महत्व आहे. ' न मे भक्त: प्रणश्यति ' अर्थात माझा भक्त कधीही नाश पावत नाही, असे भगवंतांचे वचन आहे. याच वचनांची, श्रीगुरूंच्या भक्तवात्सल्यतेची पूर्णतः अनुभूती देणाऱ्या या अध्यायाच्या चिंतनाचा हा अल्प प्रयास ! ही यथामति केलेली वाङ्मयसेवा कृपामूर्ती श्रीदत्तमहाराजांनी त्यांच्या दिव्य चरणीं रुजू करून घ्यावीं, हीच अंतःकरणपूर्वक प्रार्थना !!
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ नामधारक शिष्य देखा । विनवी सिद्धासी कवतुका । प्रश्न करी अतिविशेखा । एकचित्ते परियेसा ॥१॥ जय जयाजी योगीश्वरा । सिद्धमूर्ति ज्ञानसागरा । पुढील चरित्र विस्तारा । ज्ञान होय आम्हांसी ॥२॥ उदरव्यथेच्या ब्राह्मणासी । प्रसन्न जाहले कृपेसी । पुढे कथा वर्तली कैसी । विस्तारावे आम्हांप्रति ॥३॥ श्री सिद्धांनी सांगितलेल्या श्रीगुरूंच्या लीला ऐकून नामधारक भक्तिरसांत रंगून गेला. त्याने मोठ्या उत्सुकतेने सिद्धांना प्रश्न केला, " हे योगीश्वरा, मला श्रीगुरुंचे पुढील चरित्र विस्तारपूर्वक सांगा. पोटशूळ असलेल्या त्या ब्राह्मणांवर श्रीगुरुंनी कृपा केली आणि त्याला व्याधिमुक्त केले. त्यानंतर काय घडले ? " ऐकोनि शिष्याचे वचन । संतोष करी सिद्ध आपण । श्रीगुरुचरित्र कामधेनु जाण । सांगता जाहला विस्तारे ॥४॥ ऐक शिष्या शिखामणि । भिक्षा केली ज्याचे भुवनी । तयावरी संतोषोनि । प्रसन्न जाहले परियेसा ॥५॥ गुरुभक्तीचा प्रकारु । पूर्ण जाणे तो द्विजवरू । पूजा केली विचित्रु । म्हणोनि आनंद परियेसा ॥६॥ तया सायंदेव द्विजासी । श्रीगुरू बोलती संतोषी । भक्त होय रे वंशोवंशी । माझी प्रीति तुजवरी ॥७॥ शिष्याचा हा भाव पाहून सिद्धांना संतोष झाला आणि त्यांनी कामधेनूस्वरूप श्रीगुरुचरित्र सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, " हे शिष्योत्तमा, त्या दिवशी ज्याच्या घरी भिक्षा घेतली होती, त्या सायंदेव नामक ब्राह्मणावर श्रीगुरु प्रसन्न झाले. त्याची श्रीगुरुचरणीं अनन्य भक्ति दृढ झाली होती, गुरुभक्ती कशी करावी हे तो जाणत होता.
' न करा चिंता असाल सुखे । सकळ अरिष्टे गेली दुःखे ।... ' अशी भाक प्रत्यक्ष त्या परब्रह्माकडून सायंदेवाला मिळाली, त्याच्या भाग्याचे काय अन किती वर्णन करावे बरें ? वरद-कृपाघन श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी कडगंची इथे त्याच्या घरी भिक्षा घेतलीच, अन तद्-नंतर गाणगापुर येथे श्रीगुरु असतांनादेखील पुनःश्च स्वगृहीं यथासांग श्रीगुरुपूजन आणि मोठी समाराधना करण्याचे महद्भाग्य या सद्भक्तास अन त्याच्या संपूर्ण परिवारास लाभले. भक्तकामकल्पद्रुम दत्तमहाराज किमान दोनदा तरी या शिष्योत्तमाच्या घरीं गेले होते, असा श्रीगुरुचरित्रांत स्पष्ट उल्लेख आहे. तसेच, पुढें पंधरा वर्षांनी नित्य श्रीगुरुदर्शन, सेवा, सान्निध्य, काशीयात्रापुण्यफळ आणि प्रत्यक्ष श्रीगुरुदेवांच्या उपस्थितीत अनंतव्रत पूजन असे अनेक परमलाभ सायंदेवास प्राप्त झाले. अर्थात त्याचा जो अनन्यभाव श्रीगुरुचरणीं स्थिर झाला होता, त्याचेच हे वरदानस्वरूप फळ होते.
' कांहीं मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें ।... ' या उक्तीची प्रचिती असंख्य दत्तभक्तांनी आजपर्यंत नित्य अनुभवली आहे. तेव्हा आपणही - " श्रीगुरुकृपेची त्वरित प्रचिती देणाऱ्या या मेरुमणि अध्यायाचे नित्य स्मरण-पठण घडावें आणि गुरुमहाराजांच्या ठायीं सायंदेवाचा जो उत्कट भक्तिभाव होता, त्याच्या किमान एक कोट्यांश भक्तिभाव तरी दत्तमहाराजांची ही अत्यल्प सेवा करतांना आपल्या मनांत दृढ व्हावा !", हीच त्या भक्तवत्सल, शरणागत-तारक आणि भवभय-वारण अशा श्रीदत्तप्रभूंच्या चरणीं प्रार्थना करू या !
No comments:
Post a Comment