॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥ ॐ श्री साईनाथाय नमः ॥
अभंग
मनोहर ध्यान किती हें साईचें । पाठीशीं चांदीचें सिंहासन ॥ सिंहासन गादी उशांचे सहित । सछत्र शोभत प्रभावळी ॥ प्रभावळीमाजी कुंजवनशोभा । शोभेचा हा गाभा मुरलीधर ॥ मुरली धरिली सुंदर हो हातीं । वाजवूनियां ती धेनू पाळी ॥ पाळीव पक्ष्याचे समान मयूर । करिती विहार वनामध्यें ॥ वनामध्यें हरी नित्य हा क्रीडत । रवि स्थिरावत आनंदानें ॥ आनंदाने दोघे गरुड हनुमंत । जोडोनियां हात उभे सेवे ॥ सेवेकरी मोदें मोर्चेल चवरी । धरिती स्वामीवरी प्रेमभावें ॥ भावें धावूनियां येती भक्तजन । करिती पूजन एकनिष्ठें ॥ एकनिष्ठ मेघा करितां आरती । स्वामी खुणवीती आत्मबोध ॥ बोध करूनियां भक्तावरी दृष्टी । करिताती वृष्टी सुप्रेमाची ॥ सुप्रेमाची मना आवडी लागली । म्हणूनी गुंफली भावें माला ॥ माला ही गुरूची गुरूला वाहिली । पावन ती झाली गुरूचे पायीं ॥ पायीक या माना कृष्णा साईनाथा । जडो पद माथा मनोहर ॥१॥ मानसपूजा श्रीमत्साई परेश मूर्ति हृदयीं आणोनियां पाहिली । तों ती सुंदर वस्त्रवेष्टित शिरीं भासावया लागली ॥ पाहें जों निरखोनि अंगि कफनी सिंहासनाचे पुढें । बैसे आसन घालुनि सकलही ने जो लया सांकडें ॥१॥ आपाद मस्तक निहाळुनियां गुरूला । भावें पदीं नमुनि मस्तक ठेवियेला ॥ ठेवियला वरदहस्त शिरीं गुरूनें । केलें पुढें स्वमनिं पूजन तत्कृपेनें ॥२॥ प्रथम गुरुपदांघ्री अर्पिलें प्रेमवारी । त्रिभुवनपथगामी पाप ज्याचेनि वारी ॥ ग्रहण करुनियां तत्प्रेमतीर्थोदकातें । पुनित करूनि देहा पूजिलें सद्गुरुतें ॥३॥ भावें केशरयुक्त चंदन मनें पादांगुलीं लाविलें । पुष्पें सुंदर अक्षता तुलसिही वाहोनियां अर्चिलें ॥ केलें वंदन पादमार्जन शिरीं पुष्पें सुगंधीजलें । भालीं लावुनि गंध पुष्प तुलसी बिल्वाक्षतें पूजिलें ॥४॥ कर्णासि कंठासि उर:स्थळाला । लावूनियां चंदन दो करांला ॥ पुष्पाक्षता वाहुनि पुष्पमाला । गुंफोनियां अर्पिलि सद्गुरुला ॥५॥ देवाचिया हस्तिं सुगंधिपुष्प । अर्पियले नंतर धूप दीप ॥ काल्पी करीं देउनियां गुरूला । दक्षिणा विडा नंतर अर्पियेला ॥६॥ करोनियां ऐसें यजन मग मीं दीप धरुनी । तुला ओंवाळुनि मुखकमल तें नेत्र भरुनीं ॥ पहातां तूं केली मजवरि कृपावृष्टि नयनीं । अहाहा त्या सौख्या किति वदुं गुरू अल्पवदनीं ॥७॥ गादी पाट उशा समस्त उचला साई असें सांगुनि । काढिती खिचडी शिरा सकळ जें भक्तें दिलें आणुनि ॥ वांटोनि सगळें यथोचित पुढें देती प्रसादीं उदी । ती मीं घेउनि हस्तिं भाल नमुनि ठेवियला तत्पदीं ॥ ८ ॥ घेवोनि उदी दूर राहुनि उभा जैं सद्गुरु पाहिला । तेव्हां जोडुनि श्रीहरी समपदें वाटे उभा राहिला ॥ होवोनि अति सुप्रसन्न नयनीं सुप्रेमवृष्टि करी । दे जी सद्गुरु साइनाथ उदि ती आशीच भक्तावरी ॥९॥ प्रभो साईनाथा ग्रथित कवनीं मानसपुजा । करूनि केला हा गरिब अपुला दास समजा ॥ सदा गाऊनी ही करिति गुरुची मानसपुजा । तया कृष्णस्वामी वरदत्रिदिवेशस्तरुजवा ॥१०॥
॥ श्री साईसमर्थ ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment