॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
समस्त दत्तभक्तांना श्री दत्तात्रेय जयंतीच्या भक्तिमय शुभेच्छा !
पैठणचे संत एकनाथ महाराज हे थोर दत्तकृपांकित जनार्दन स्वामींचे शिष्य ! ते दौलताबाद येथे त्यांच्याकडे मंत्रादि वेदाध्ययन शिकण्यासाठी राहत होते. आपल्या सद्गुरुचरणीं एकनाथ महाराजांची दृढ निष्ठा होती. एकदा जनार्दनपंतांनी त्यांना जवळ बोलावले आणि म्हणाले, " एका, उद्यापासून त्या समोरच्या टेकडीवरील झाडाखाली बसून अध्ययन करीत जा." श्रीगुरूंच्या आज्ञेनुसार एकनाथ महाराज दुसऱ्या दिवशी सकाळीच त्या झाडाखाली जाऊन बसले. तिथे छान एकांत होता, त्यांना ती जागा फार आवडली. तिथे बसून ते अध्ययन करू लागले. पण काही वेळांतच तिथे प्रखर ऊन तापू लागले. एकनाथ महाराजांच्या घशास कोरड पडली. पण तिथे ओढा, तळं असे पाण्याचे कुठलेच साधन नव्हते ना तिथे जवळपास कुणाचे घर होते. एकनाथ महाराज तहानेने फारच व्याकुळ झाले, त्यांना काय करावे हे समजेना.
इतक्यात तिथे एक गवळी आला, आणि मोठ्या ममत्वानें त्यांना म्हणाला, " बाळा, तुला फार तहान लागलेली दिसतेय! हे दूध पी. हे अगदी उत्तम नि ताजं आहे. तुला बरें वाटेल आणि मग तू एकाग्रतेने अध्ययन करू शकशील."
त्यावर एकनाथ महाराज विनंती करीत म्हणाले," महोदय, पण माझ्याजवळ पैसे नाहीत! तुम्हांला उद्या पैसे दिले तर चालेल का ?"
" अरे, पैशाची काळजी करू नकोस. उद्या दिलेस तरी हरकत नाही. " तो गवळी उत्तरला.
संध्याकाळी एकनाथ महाराज जनार्दनस्वामींकडे परतले. स्वामींनी विचारले," कसे झाले आजचे अध्ययन ?"
" फारच उत्तम ! मी उद्याही तिथेच जाईन ! " एकनाथ महाराज म्हणाले.
दुसन्या दिवशीही पुन्हा तोच प्रकार घडला. तोच गवळी पुन्हा आला नि दूध देऊन गेला. तेव्हा मात्र एकनाथ महाराज संकोचून म्हणाले, " महोदय, मी काल स्वामींजवळ पैसे मागायला विसरलो. उद्या मात्र मी तुम्हांस नक्की पैसे देईन!"
मग त्यादिवशी संध्याकाळी स्वामींपाशी येऊन एकनाथ महाराज म्हणाले, " आजही माझे छान ध्यान लागले. पण काल मी तुम्हांला एक गोष्ट सांगायचीच विसरलो."
" कुठली गोष्ट ? " जनार्दन स्वामींनी विचारले.
" गेले दोन दिवस एक गवळी मला अगदी ताजं ताजं दूध आणून देत आहे. त्याला देण्यासाठी मला पैसे हवे आहेत!" नाथ म्हणाले.
" काही नकोत पैसे द्यायला... तो आपलाच आहे रोजचा !", जनार्दनपंत मंद स्मित करत म्हणाले.
" आपल्याकडे दूध घालणारा हाच का गवळी ? त्याला एकदम महिन्याचे पैसे द्यायचे का ?" एकनाथ महाराजांनी पुन्हा प्रश्न केला.
" अरे एका, कधी-मधी माझ्या शेजारी येऊन बसतात ते...." जनार्दन स्वामी हसत म्हणाले.
" म्हणजे? श्रीदत्त गुरु?", एकनाथ महाराजांनी सदगदित होऊन विचारले.
" हो, तीच भक्तवत्सल गुरुमाऊली !" जनार्दन स्वामी उत्तरले.
एकनाथ महाराजांनी जनार्दनपंतांना आपणांसही श्रीदत्तात्रेय दर्शन व्हावे, अशी प्रार्थना केली. त्यावर जनार्दन स्वामी आश्वासक स्वरांत म्हणाले," एका, तुझी उपासना पूर्ण झाली आणि योग्य वेळ आली की दत्त महाराज तुला आपणहून दर्शन देतील."
आणि लवकरच जनार्दनपंतांनी एकनाथ महाराजांना दत्तदर्शनाचा लाभ घडविला. फकीर वेशांतील श्रीदत्तगुरूंची ओळख जनार्दन स्वामींनी नाथांना करून दिली. इतुकेच नव्हें तर त्रिगुणात्मक स्वरूपातीलही दत्तप्रभूंचे दर्शन एकनाथ महाराजांना झाले. पुढे, दत्तप्रभूंच्या आदेशानुसार त्यांनी आपल्या आवडत्या शिष्याला अर्थात एकनाथ महाराजांना सर्व गुह्यज्ञान देऊन अद्वयत्वाची, अभेदतत्त्वाची जाणीव करून दिली.
धन्य ती गुरु-शिष्याची जोडी, ज्यांच्यावर श्रीदत्तात्रेय प्रभूंनी कृपानुग्रह केला.
श्रीदत्तजन्माचे संत एकनाथ महाराजांनी रचलेले हे काही सुरेख अभंग :
धरी अवतार विश्व तारावया । अत्रीची अनूसुया गरोदर ॥१॥
ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी । शुक्लपक्ष दिनीं पूर्णतिथी ॥२॥
तिथि पूर्णिमा मास मार्गशीर्ष । गुरु तो वासर उत्सवकाळ ॥३॥
एका जनार्दनीं पूर्ण अवतार । निर्गुण निराकार आकारलें ॥४॥
अव्यक्त परब्रह्मा न्हाणी पायांवरी । अभेद नरनारी मिळोनियां ॥१॥
पीतांबर पदरें पुशिला घननीळा । निजविला निर्मळ पालखांत ॥२॥
निंब कातबोळ त्रिगुण त्रिखुंडी । प्रेमाचे आवडी सेवी माय ॥३॥
एका जनार्दनीं दत्त पाळण्यांत घातिला । हालविती त्याला अनुसुया ॥४॥
जो जो जो जो रे निज आया । हालविती अनुसुया ॥धृ.॥
पालख पुरुषार्थ चौकोनी । भक्तिनाडी गुंफोनी । दोरी प्रेमाची लाउनी । शांती गाती गाणीं ॥१॥
करितां उत्पत्ति शिणलासी । विश्रांति आलासी । निज रे ब्रह्माया तपलासी । कमळोद्भव जालासी ॥२॥
लक्ष्मीपति निज हो घनःश्यामा । सांडोनि वैकुंठधामा । प्रतिपाळ करी हो जीव नामा । दर्शन दिलें आम्हां ॥३॥
पार्वतीरमण शिवा निज आतां । संहारक जीवजंता । निजरुप निगमा हो आदिनाथा । एका जनार्दनीं दाता ॥४॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
No comments:
Post a Comment