Sep 2, 2025

स्वामी माधवानंदविरचित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्रीगजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता भाविकांना श्रीगजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतुकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजाननभक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

याच दिव्य पोथीचे विवरण करणारा स्वामी माधवानंदलिखित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा ग्रंथ श्रीगजानन महाराजांच्या अनेक लीलांचे, सद्‌गुरु श्रीगजाननांच्या उपदेशपर शिकवणीचे आणि समर्थांच्या भक्तांच्या भावपूर्ण अंतःकरणाचे अनेक विलोभनीय पैलू उलगडून दाखवतो. गजाननभक्तांनी हा ग्रंथ आवर्जून वाचावा, त्यातील सूक्ष्म अर्थांचे नित्य मनन-चिंतन करावे जेणेकरून श्रीगजानन विजय पोथीवाचन केवळ वाचनमात्र न राहता, भाविकांना आंतरिक समाधान तर निश्चित लाभेलच, तसेच महाराज सदैव आपल्यासोबतच आहेत अशी दृढ धारणादेखील होईल.

स्वामी माधवानंद म्हणजेच पूर्वाश्रमीचे डॉ. माधव बाळकृष्ण नगरकर. हे आदिनाथ, श्रीदत्तात्रेय, श्रीमच्छिंद्रनाथ, श्रीगोरक्षनाथ, श्रीजालंदरनाथ यांच्यापासून सुरु झालेल्या आणि पुढे श्रीज्ञानेश्वर महाराज तसेच स्वामी स्वरूपानंद (पावस), स्वामी माधवनाथ (पुणे) यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाच्या परंपरेतील ध्यानयोगप्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी होते. अनेक संत-महात्मे यांचे वाङ्मय तसेच विविध पौराणिक कथा व स्तोत्र यांवर त्यांनी निरूपणपर लेखन केले आहे. त्यांतून व्यक्त होणारा बोध, भावार्थ आणि वाचकांना मनन करण्यास प्रेरित करणारे सोदाहरण विश्लेषण हे स्वामी माधवानंदलिखित साहित्याचे खास वैशिष्ट्य म्हणता येईल.

श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा ग्रंथदेखील याला अपवाद नाही. या ग्रंथाविषयी स्वामी माधवानंद लिहितात - गजानन महाराजांच्या भक्तांच्या अंतःकरणाची विलोभनीयता आणि महाराजांना द्यायची असलेली शिकवण यांवर विशेष प्रकाशझोत टाकून, चमत्कारांनी दिपलेल्या डोळ्यांना हे सर्व दिसेल, माणूस त्यांतून स्वतःसाठी योगज्ञानाच्या प्रेरणा आणि 'श्रीगजानन विजय' ग्रंथातील भक्तिरसाचा आस्वाद घेऊ शकेल यासाठी श्रीगजानन महाराजांनी हा ग्रंथ त्याच्या नावाच्या स्फुरणासह प्रकट केला अशी माझी प्रामाणिक धारणा आहे.

  स्वामी माधवानंदलिखित श्रीगजानन-विजय भक्तिरसास्वाद हा विवरण ग्रंथ इथे ऑडिओ स्वरूपात उपलब्ध आहे. सर्व गजाननभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा.

  " देवा, उपासना तुझी आहे. तुझ्या इच्छेने, तुझ्या प्रेरणेने आणि तुझ्या शक्तीनेच ही चालली आहे. कर्ता आणि करविता तूच आहेस. या उपासनेतून हे देवा, तू मला तुझ्या दर्शनासाठी योग्य करून घ्यावेस. याशिवाय दुसरी कोणतीही इच्छा नाही. ऐहिक गोष्टींच्या बाबतीत जी तुझी इच्छा तीच माझी इच्छा !", याच ग्रंथातील ही अनन्यशरणागत भावयुक्त प्रार्थना करून ही लेखनसेवा श्रीगजानन महाराजांच्या दिव्य चरणीं रुजू व्हावी, हेच मागणे गुरुवरा !

श्रीगजानन महाराजार्पणमस्तु   

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

No comments:

Post a Comment