॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
करुणात्रिपदी पहिले पद :
शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आतां ।। ध्रु. ।।
तूं केवळ माता जनिता । सर्वथा तूं हितकर्ता ।।
तूं आप्त स्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ।।
(चाल) भयकर्ता तूं भयहर्ता । दंडधर्ता तूं परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तूं आर्ता आश्रय दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।१।।
अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।।
तरि आम्ही गाऊनि गाथा । तव चरणीं नमवूं माथा ।।
(चाल) तूं तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ?
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ? शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।२।।
तूं नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ।।
(चाल) गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच हो कोपी ।
निजकृपालेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।३।।
तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा त्राता ।
(चाल) निजबिरुदा आणुनि चित्ता । तूं पतीतपावन दत्ता।
वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तूं गुरुनाथा ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।४।।
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार ।
तव पदी अर्पुं असार । संसाराहित हा भार ।
(चाल) परिहरिसी करुणासिंधो । तूं दीनानाथ सुबंधो।
आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव प्रार्थित दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।५।।
मराठी विवरण :- डॉ. वा. व्यं. देशमुख
शांत हो श्रीगुरुदत्ता । मम चित्ता शमवी आतां ।। ध्रु. ।।
' शांत हो श्रीगुरुदत्ता ' या पहिल्या पदात ध्रुपदात आपले मुख्य मागणे मांडले आहे. 'हे दत्त प्रभो ! शांत व्हा आणि माझ्या क्षुब्ध मनाला शांत करा !'. जीवनातील सर्व सुखदुःखांचे स्थान मन आहे. ' चित्ते प्रसन्ने भुवनं प्रसन्न, चित्ते विषण्णे | ' या उक्तीप्रमाणे मनाची प्रसन्नता हीच सुखाची गुरुकिल्ली आहे. मन शांत असेल तरच प्रसन्न असते. तेव्हा माझे मन शांत करा म्हणजेच मला सुखी करा, असा अभिप्राय होतो. मनःशांतीच सर्व सुखांचा आधार आहे. पण इथे आपल्या मनाची शांती मागण्याआधी भक्त , देवा, तुम्ही शांत व्हा !' अशी प्रार्थना करीत आहे. यांत आपल्या चित्ताची शांती, पर्यायाने आपल्या सुखाचा आधार, देवाची शांती आहे, असा कार्यकारणभाव अध्याहृत आहे व देव कसा अशांत वा क्षुब्ध होईल ? निर्विकार, निरपेक्ष आनंदरूप परमेश्वरावर अशांतीचा आरोप कसा होऊ शकतो ? पण भक्तासाठी देव जेव्हा सांगून साकार होतो, तेव्हा देवभक्तांच्या नात्याच्या निर्वाहासाठी त्याला रागद्वेषादी विकार धारण करावे लागतात. त्याशिवाय सगुणात येण्याचे मुख्य प्रयोजन अर्थात दुष्टांना शासन आणि सज्जनांचे रक्षण हे कसे सिद्ध होतील? आपण या पदाच्या पार्श्वभूमीत पाहिले आहे की अर्चकगणाच्या ( दोषामुळे ) देव रागावले आहेत. अर्थात हा कृत्रिमकोप आहे, हे पुढे स्पष्ट होईलच. अशा रीतीने दासाला दत्तप्रभूंचा कोप अनुभवाला येत आहे. तेव्हा हा राग आवरून, त्यापासूनच उद्भवलेला माझ्या मनाचा क्षोभ ही शमवावा, अशी प्रार्थना केली आहे. हेच या पदाचे मुख्य प्रयोजन आहे.
तूं केवळ माता जनिता । सर्वथा तूं हितकर्ता ।।
तूं आप्त स्वजन भ्राता । सर्वथा तूचि त्राता ।।
(चाल) भयकर्ता तूं भयहर्ता । दंडधर्ता तूं परिपाता ।
तुजवाचुनि न दुजी वार्ता । तूं आर्ता आश्रय दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।१।।
पुढे, देवाचा आणि भक्ताचा संबंध स्पष्ट केला आहे. जणू ,' कोणत्या नात्याने वा अधिकाराने तू माझ्याकडे आला आहेस?' असा दत्तप्रभूंचा प्रश्न अपेक्षून त्याचे उत्तर दिले आहे,' हे प्रभो ! आपणच आमचे मायबाप आहात. भगवदगीतेत आपणच सांगितले आहे, "पिताSहमस्य जगतो माताधाता पितामह: I "(९. १७) तेव्हा आईबापच नव्हे, तर सर्वच - बंधू, सखा , हितकर्ता, आप्त, स्वजन अशा सर्वही प्रकारे आपणच आमचे रक्षणकर्ते आहात.' इथे या सर्व प्रापचिक नात्यांचा अप्रत्यक्षतया निरासच केला आहे. सामान्यतः आपल्याला यांचा आधार वाटतो; पण तो लटकाच आहे. खरा आधार भगवंताचाच आहे की ही खूणगाठ मनाशी बांधायची आहे.
आमच्या चित्तवृत्तींचे नियंत्रक श्रीगुरुदत्तच आहेत. तेच भयादि विकारांचा प्रादुर्भाव करतात आणि त्यांचा उपशमही करतात. आमच्या अपराधांच्या शासनासाठी दत्तप्रभूच दंड धारण करतात आणि आम्ही आर्त झालो दुःखाने कळवळलो की तोच दत्त आमचा आश्रय आहे. असे सर्वबाजूंनी आम्ही त्या दत्ताशी संलग्न आहोत. त्याच्यावाचून दुसऱ्या कशाचीही वार्तासुद्धा नाही.
या कडव्याचा मुख्य प्रतिपाद्य विषय अनन्य शरणागती हा आहे. इतर सर्व आश्रयांना निक्षून बाजूला सारले तरच परमेश्वर जवळ करतो. असे म्हणतात की वस्त्रहरणाच्या प्रसंगी द्रौपदीने निरीवर घट्ट धरलेला हातसुद्धा जेव्हा सोडला, तेव्हाच श्रीहरी वस्त्ररूपाने प्रकटले आणि त्यांनी तिच्यालज्जेचे संरक्षण केले. अश्याप्रकारे स्वतःच्या प्रयत्नांसह सर्वही आधार सोडल्यावरच अनन्यता सिद्ध होते. हे भक्तिमार्गातले रहस्य या पहिल्या कडव्याची शिकवण आहे.
अपराधास्तव गुरुनाथा । जरि दंडा धरिसी यथार्था ।।
तरि आम्ही गाऊनि गाथा । तव चरणीं नमवूं माथा ।।
(चाल) तूं तथापि दंडिसी देवा । कोणाचा मग करूं धावा ?
सोडविता दुसरा तेव्हां । कोण दत्ता आम्हां त्राता ? शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।२।।
'हे दत्तप्रभो, आपणच आम्हा सर्व जीवांचे नियामक आहात. जेव्हा आम्ही नियम्य आमच्या विकारांना बळी पडतो आणि आडवाटेला लागतो. तेव्हा आम्हाला अटकाव करण्यासाठी, प्रसंगी शासन करण्यासाठी आपण दंड हाती घेतला आहे. तो योग्यच आहे. त्या दंडाला सामोरे जातानाही आम्ही आपली प्रार्थना करीत आपल्या चरणी विनम्र होऊ. दुसरा कोणता पर्याय आमच्याकडे आहे ? या उप्परही, देवराया, तू आम्हाला ताडन करशील तर आम्ही दुसऱ्या कुणाला बोलावणार? तुझ्याविना आमचा इतर कोणी वाली आहे?' अशा रीतीने या कडव्याची अनन्यताच दृढ केली आहे.
' दत्तभावसुधारसस्तोत्रांत ' हीच अगतिकता मार्मिकतेने व्यक्त केली आहे. लौकिक बालकाला माता आणि पिता असे दोन पालक असतात. एक रागवला तर बालक दुसऱ्याचा आसरा घेते. पण हे दत्तदयाघना, आमच्यासाठी या दोहोंच्या ठायी तूच एक आहेस. तरी तू निर्दय होऊ नकोस !'
प्रत्येक भक्ताच्या जीवनात प्रारब्धानुसार अनुकूल आणि प्रतिकूल प्रसंग येतातच. आपल्याच कर्मांची ती फळे असतात. सुखद घटनांचे अभिमानाने श्रेय स्वतःकडे घेणारा जीव, दुःखसमोर आले की मात्र ' देवाने असे का केले ?' असा त्यालाच जाब विचारायला लागतो. अशा प्रसंगी देव आपल्याला ' कृपाळूपणे ' करण्याचे धैर्य आणि त्यातून योग्य तो धडा शिकण्याचा विवेक, आपण देवाकडे मागावा. हाच उपदेश श्री स्वामीमहाराज करीत आहेत.
तूं नटसा होउनि कोपी । दंडितांहि आम्ही पापी ।
पुनरपिही चुकत तथापि । आम्हांवरि नच संतापी ।।
(चाल) गच्छतः स्खलनं क्वापि । असें मानुनि नच हो कोपी ।
निजकृपालेशा ओपी । आम्हांवरि तूं भगवंता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।३।।
पुजाऱ्यांच्या हातून स्वारी ( उत्सवमूर्ती ) उतरणे आणि श्रीस्वामीमहाराजांच्या मुखातून श्रीदत्तप्रभूंच्या कोपाची अभिव्यक्ती होणे ह्या , अर्जुनाला युद्धाच्या आरंभीच होणाऱ्या मोहवश उपरतीसारख्याच प्रतिकात्मक आहेत. भगवदगीता ही जशी मानवमात्रांना आध्यात्मिक मार्गदर्शन करते, त्याचप्रमाणे ही करुणात्रिपदीही सर्वच दत्तभक्तांना इहपारलौकिक सुखाचे साधन ठरते. पुजाऱ्यांवरचा राग सर्वच संसारिकांना अनुभवाला येणाऱ्या दैवीकोपाचे प्रतिनिधित्व करतो. हा देवाचा राग खरा नसतो, तर कृत्रिम असतो. ते रागाचे नाटक मात्र असते. कारुण्यसिंधू अत्रिनंदन कधीतरी आपल्या भक्तांवर रागावतील काय ? विस्तवाला स्पर्श करू पाहणाऱ्याला बाळाला आई जशी रागावते, प्रसंगी मारतेही, तसाच भगवंत आम्हाला आमच्या अकल्याणापासून परावृत्त करण्यासाठी , आमच्या कल्याणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी कठोर होतो. दुःखाचा अनुभव करवितो त्याच्या पोटी प्रेमच असते. संसारामधील सुखदुःखे आपलीच कर्मे असतात. ज्याअर्थी आपल्या जीवनात आध्यात्मिक , आधिभौतिक वा आधिदैवक दुःख आले आहे, त्याअर्थी ते आपलेच पाप मिळाले आहे. हे पाप प्रथम आपल्या बुद्धीत दुष्प्रवृत्तीच्या रूपाने येते. तीच दुःखाची वाट आहे. मानवमात्रांत पाप आणि पुण्य सारख्याच प्रमाणात असतात असे शास्त्रात सांगितलेच आहे. म्हणून ' आम्ही पापी ' असा शब्दप्रयोग श्रीस्वामीमहाराजांनी केला आहे. वरचेवर दुःखाचे अनुभव येऊनही, जोपर्यंत संचित पाप शिल्लक आहे तोपर्यंत पुन्हा पुन्हा त्याच चुका तो करीत राहतोच. ही मानवाची प्रमादशीलता ध्यानात घेऊन दत्तप्रभूंनी कोप न करता, ' होते एखाद्यावेळी चूक ! ' असा क्षमाशील विचार करून आमच्यावर आपल्या कृपेची स्वल्पांशानेही पखरण करावी. तीच आम्हाला सर्व प्रापंचिक कष्टांतून तारून नेईल, अशी प्रार्थना करायची आहे.
तव पदरीं असता ताता । आडमार्गीं पाऊल पडतां ।
सांभाळुनि मार्गावरता । आणिता न दूजा त्राता ।
(चाल) निजबिरुदा आणुनि चित्ता । तूं पतीतपावन दत्ता।
वळे आतां आम्हांवरता । करुणाघन तूं गुरुनाथा ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।४।।
भक्ती म्हणजे देवाशी जुळणे, देवाशी संलग्न होणे. दास्य , सख्य , राग किंवा द्वेष अशा भावाने देवाशी संबंध जोडणे म्हणजेच भक्ती. असा एकदा संबंध जुळला की भक्त देवाच्या पदरात पडतो. देवाच्या परिवारात मिळतो. अशा रीतीने एकदा देवाच्या पदरी रुजू झाल्यावर त्याचा सर्व भार देवावरच पडतो. जे असे भगवंताला शरण झाले ते कृतार्थ होणारच ( ये त्वां शरण मापन्ना:कृतार्थ अभवन्हि ते II - दत्तभावसुधारस ) सर्व धर्मांचा परित्याग करून तू मलाच शरण ये, मी तुला सर्वपापांपासून मुक्त करीन, असे गीतेचे अभिवचन प्रसिद्ध आहे. जाणता अजाणता असा भक्त जरी वाकड्या वाटेला लागला, तरी त्या भक्ताला काळजीपूर्वक पुनश्च सन्मार्गावर आणणारा दत्तगुरुंवाचून दुसरा कोण आहे? त्या ' पतितपावन ' या बिरुदाचे श्रीदत्तप्रभूंना स्मरण देऊन श्रीस्वामीमहाराजांनी त्यांच्या कृपेची भीक मागण्यास सांगितले आहे. मग तो कारुण्यसिंधू सद्गुरूनाथ निश्चितच आपल्याकडे कृपाकटाक्ष करील.
सहकुटुंब सहपरिवार । दास आम्ही हें घरदार । तव पदी अर्पुं असार । संसाराहित हा भार । (चाल) परिहरिसी करुणासिंधो । तूं दीनानाथ सुबंधो। आम्हां अघलेश न बाधो । वासुदेव प्रार्थित दत्ता ।। शांत हो श्रीगुरुदत्ता... ।।५।। प्रारंभी ज्या कौटुंबिक नात्यांचा निरास केला आहे, त्यांना इथे समारोपात संसारातून लादला गेलेला भार, असे म्हंटले आहे. जन्ममरणरूपी संसाराचे मूळ अज्ञानात आहे. अविद्याजन्य मोहानेच संसाराचा आभास उपजला आहे. मायेच्या आवरणशक्तीने जीव आपले खरे शुद्ध , बुद्ध अविनाशी ,अविकारी , आनंदमय चेतन स्वरूप विसरून जाऊन त्याच मायेच्या विक्षेपशक्तीने भासविलेल्या बुद्धी , मन , इंद्रिये आणि देहादिंनाच आपले स्वरूप मानून आभासात्मक पंचभौतिक जगतात हरवून जातो. देह म्हणजेच मी आणि त्याचे संबंधीच माझे अशा संमोहात तो सापडतो. त्यांचे मिथ्यत्व ओळखून त्यांचा निरास करण्याचा विवेक त्या मोहग्रस्त जीवाकडे नाही. अशा या संसारजनित (संसार + अहित ) आभासिक ओझ्याचा परिहार श्रीदत्तप्रभूच करूं शकतात. या ओझ्याखाली दबलेल्या हीनदीन शरणागताचा तोच खरा बंधू आहे. ' तुका म्हणे घालूं तयावरी भार I वाहूं हा संसार देवापायीं I ' या संतोक्तीशी जुळणारा उपदेश श्रीस्वामीमहाराज करीत आहे. आमच्या संचित , क्रियमाण आणि प्रारब्ध अशा सर्वही कर्मांतून सतत उद्भवणाऱ्या पापांची आम्हा आश्रित भक्तगणांना यत्किंचितही बाधा होऊ नये, यासाठी वासुदेव या मुद्रेने श्रीस्वामीमहाराज दत्तगुरूंची विनवणी करीत आहेत. षडैश्वर्यसंपन्न गुरुराज दत्तात्रेया, आपल्या कोपाचा उपसंहार करा आणि आमच्या चित्ताला आपल्या पदीं परमशांतीचा लाभ करून द्या.'
मूळ स्तोत्र : प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित करुणात्रिपदी संदर्भ - श्री वासुदेव निवास, पुणे क्रमश:
No comments:
Post a Comment