Aug 17, 2020

जरी त्रिकाली म्हणसी ‘ करुणात्रिपदी ’ तरी - पद क्र. ३


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

करुणात्रिपदी तिसरें पद : जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ।।ध्रु.।। निजअपराधें उफराटी दृष्टी । होउनि पोटीं भय धरूं पावन ।।१।। तूं करुणाकर कधीं आम्हांवर । रुसशी न किंकर-वरदकृपाघन। ।२।। वारी अपराध तूं मायबाप । तव मनीं कोपलेश न वामन ।।३।। बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।। प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव । पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन ।।५।।

मराठी विवरण :- डॉ. वा. व्यं. देशमुख

जय करुणाघन निजजनजीवन । अनसूयानंदन पाहि जनार्दन ।।ध्रु.।। तिसऱ्या पदात श्री दत्तप्रभूंच्या कोपाच्या स्वरूपाचे विवेचन आहे. सहेतुक विशेषणांनी संबोधून श्रीदत्तप्रभूंच्या कोपाच्या स्वरूपाचे प्रार्थनेला आरंभ केला आहे. ' हे अनसूयानंदना ' या हाकेने दत्तप्रभूंना त्यांच्या मातेचा आठव करून देऊन, जणू त्यांच्या मातृहृदयालाच जागवले आहे. आपण वर्षाव करणारे मेघच आहात. दयेने नुसते ओतप्रोत भरलेलेच आहात असे नाही, तर त्या दयेची, भक्तांवर सहज, अयाचित पखरण करणे हा आपला स्वभावच आहे. असे सूचित केले आहे. कारण आपल्या आश्रित जनांचे आपण जीवनच आहात. आपला विजय असो! आपण सर्व जनांचे अर्दन, शासन करणारे असला तरी आमचे रक्षण करा.


निजअपराधें उफराटी दृष्टी । होउनि पोटीं भय धरूं पावन ।।१।। ह्या चरणात स्वामीमहाराजांनी एक महत्वाचा सिद्धांत मांडला आहे. भगवंताचा कोप आणि त्यामुळे आम्हाला वाटणारे भय, हा आमच्याच मनाचा खेळ आहे. आमच्याच अपराधांमुळे दूषित झालेल्या आमच्या मनात देवाची भयावह प्रतिमा उमटली आहे. आरशाच्या वक्रतेने जसे प्रतिबिंब विकृत होते, त्याचप्रमाणे आपल्याच चित्ताच्या विकारांनी आम्हाला कृपाळू भगवंत क्रुद्ध भासतो आणि त्याचे भय वाटू लागते. हे चित्तातील प्रतिकूल संस्कार आमच्याच दुष्कर्मांपासून उद्भवतात. वस्तुतः परमेश्वर निराकार, निःसंग , आनंदपूर्ण , शुद्ध चैतन्यघनच आहे. डोळ्यांना कावीळ झाल्यावर जगच पिवळे दिसते किंवा सापाने विष भिनल्यावर कडुलिंब गोडच लागतो, त्याचप्रमाणे आमच्याच पापांनी आमची जाणीव विकृत होते. हेच आमच्या भीतीचे खरे कारण इथे प्रतिपादले आहे.

तूं करुणाकर कधीं आम्हांवर । रुसशी न किंकर-वरदकृपाघन। ।२।। पहिल्या पदातच सांगितल्याप्रमाणे या अखिलविश्वाचा आणि त्यातील सकल जिवांचा मायबाप परमेश्वरच आहे. तो स्वभावतःच वात्सल्य सिंधू आहे. तो आमच्यावर का आणि कसा रुष्ट होईल? आम्हा दासांचा तोच करुणासागर वरदाता आहे.

वारी अपराध तूं मायबाप । तव मनीं कोपलेश न वामन ।।३।। ' त्वमेव माता च त्वमेव पिता... ' ही प्रार्थना दृढ करून श्रीमहाराज आमच्या अपराधांचा परिहार करण्याचे मागणे मागत आहेत. हे त्रिविक्रम वामना, तुमच्या मनात कोपाचा लवलेश असूच शकत नाही.' वामन ' ह्या संबोधनाची योजना मार्मिक आहे. इंद्राला स्वर्गाचे राज्य परत मिळवून देण्यासाठी वामनावतार झाला. त्यानुसार बलीराजाच्या औदार्याचाच आधार घेऊन त्याला पाताळात घातले. सकृतदर्शनी हा बलीराजावर क्रोध वाटतो, पण त्याला पाताळाचे राज्य तर दिलेच, शिवाय भगवंत स्वतःच त्याचे द्वारपाल होऊन रक्षण करत आहेत आणि भविष्यात त्याला इंद्रपदही देणार आहेत. अशा रीतीने क्वचित देवाचा कोप झाल्यासारखा वाटलं तरी अंतिम तो कल्याणकारीच ठरतो, अशी गर्भीत सूचना यातून दिली आहे.

बालकापराधा गणे जरी माता । तरी कोण त्राता देईल जीवन ।।४।। आईच्या प्रेमाबद्दल समर्पक दृष्टांत भगवंताच्या कृपेसाठी दुसरा नाही. आईचे मन आपल्या बाळाच्या प्रेमानेच सदैव तुडुंबलेले असते. त्याच्याविषयी इतर कोणत्याही भावाला तिथे वावच नसतो. तिच्या सर्व कृतींचा उगम बाळाचे रक्षण आणि पोषण यासाठीच असतो. ती बाळावर रागावेल, ओरडेल , अगदी त्याला मारीलही; पण त्यात बाळाची सुरक्षा आणि संवर्धन हाच उद्देश असतो. ह्या तिच्या आंतरिक प्रेमात बाळाकडून कसली अपेक्षा तर नसतेच: पण त्याच्या अपराधांचा त्या प्रेमावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. त्या बाळाला त्याच्या अपराधाच्या शासनाचा किंवा कोणत्याही प्रकारे त्याला दुखवण्याचा विचारही तिच्या मनात येऊ शकत नाही. बाळ आईच्या मांडीवर, रडत, भेकत , लाथाही मारीत असते, पण ती मात्र त्याला शांत करून आपले स्तन त्याच्या मुखात घालण्याचाच प्रयत्न करीत असते. परमेश्वराचेही आम्हा बाळगोपाळांवर असेच निर्हेतुक प्रेम असते. 'दत्तमाऊलीने जर आमच्या अपराधांचा खेद मानला, तर आम्हाला दयास्तन्याने बुझविणारा दुसरा कोण आहे?' एकीकडे ह्या सत्याकडे देवाचे लक्ष वेधत असताना दुसरीकडे श्रीस्वामीमहाराज आम्हाला देवाच्या कारुण्याला कसे आवाहन करावे याची शिकवण देत आहेत.

प्रार्थी वासुदेव पदिं ठेवी भाव । पदीं देवो ठाव देव अत्रिनंदन ।।५।। आतापर्यंत या तीन पदांतून श्रीस्वामीमहाराजांनी भक्तिमार्गाचे उध्वोधन केले आहे. पहिल्या पदात अनन्य होऊन श्रीदत्तप्रभूंची भक्ती करावी, सर्व प्रापंचिक भार त्यांच्यावर घालावा, म्हणजे ते सर्वोतोपरी सांभाळ करून आपल्याला मोक्षमार्गावर प्रगत करतात, असा उपदेश केला. दुसऱ्या पदात त्यांच्या लीलांचे स्मरण, कीर्तन, श्रवण यांच्या द्वारा चित्तशुद्धी करून आपली श्रद्धा दृढतर करायला सांगितली. तिसऱ्या पदात श्रीदत्तप्रभूंच्या सच्चिदानंदस्वरूपातील परमप्रेमस्वरूपाचे प्रतिपादन केले आहे. आता या समारोपाच्या चरणात भक्तिमार्गाची जणू फलश्रुतीच सांगितली आहे. संत ज्ञानेश्वरमहाराजांनी भक्तीचे उद्दिष्ट भगवंताच्या 'अव्यंग धामाची प्राप्ती' असे सांगितले आहे. ('तरि झडझडोनि वहिला निघ I इथे भक्तिचिये वाटे लाग I जिया पावसी अव्यंग I निजधाम माझें II' ९.५१६) नाममुद्रेने अंकित केलेल्या या चरणात श्रीदत्तचरणीं भक्तिभाव व्यक्त केला आहे. आतापर्यंत मांडलेल्या भक्तिमार्गाचा तो निर्देश आहे. तो निर्देश करून आपल्याला दत्तपदी ठाव मागितला आहे. यातील पहिले 'पद' साधनरूप श्रीदत्तचरण आहेत तर दुसरे पद हे भगवद्गीतेत प्रतिपादले अव्यय पद (गच्छन्त्यमूढा: पदअव्ययं तत् II १५.५) आहे. सर्व वेद ज्या पदाचा उद्घोष करतात (सर्वे वेदा यतपदमामनन्ति II कठ उ. १ .२.१५ ) ते सच्चिदानंदपद श्रीस्वामीमहाराजांना इथे अभिप्रेत आहे. त्यांनी आपल्या वेदनिवेदनिस्तोत्रात याचा उहापोह केलेला आहे, तो जिज्ञासूंनी मुळातच पाहावा. अत्रिनंदन परमात्म्याकडे त्याच्या पदाच्या प्राप्तीची याचना केली आहे. यात परमात्मा आणि त्याचे पद या दोन वस्तू नाहीत. याला राहू आणि त्याचे शीर यांचा दृष्टांत दिला आहे. राहुला केवळ शिरच असते. तो जसा त्या शिरापासून अभिन्न असतो तसेच परमात्मा आणि त्याचे पद अभिन्न आहेत. ते पद प्राप्त होणे म्हणजेच आत्मस्वरूपाशी एकत्व पावणे. हेच मागणे मागून श्रीस्वामीमहाराजांनी या 'करुणात्रिपदी' चा उपसंहार केला आहे. यथाशक्ती, यथामती केलेली ही वाक्-सेवा श्रीगुरुचरणी समर्पित असो.

मूळ स्तोत्र : प. प श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित करुणात्रिपदी संदर्भ - श्री वासुदेव निवास, पुणे



No comments:

Post a Comment