Apr 4, 2024

श्री स्वामी समर्थ श्रीकरुणास्तोत्र - प्रथमोऽध्यायः


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥ 

जय जयाजी महाराजा । दीनदयाळा सद्‌गुरुराजा । वेदां अगोचर महिमा तुझा । आनंदकंदा श्रीहरी ॥१॥ जय जयाजी कल्पतरु । विश्वातीता विश्वंभरु । अनाथसखया जगद्‌गुरु । आदिरूपा निर्विकल्पा ॥२॥ जयजयाजी अनाथसखया । कृपें निवारिसी भवभया । मापातीता भक्तसदया । अनाथनाथा दीनबंधो ॥३॥ जय जयाजी दीनोद्धारा । विश्वपती कृपासागरा । अतर्क्य अनंत अवतारा । हेही लीला सहज तुझी ॥४॥ सच्चिदानंदा गुणातीता । लीला लाघवी अनंता । तुझिया चरणीं श्रीस्वामीसमर्था । नमन माझे साष्टांगी ॥५॥ तूंचि सद्‌रूप । तूंचि चिद्‌रूप । तूं आनंदरूप । याही वेगळा तूंचि तूं ॥६॥ निर्विकल्पा निरामया । निष्कलंका निराधारिया । निष्प्रपंचा तुझी माया । ब्रह्मादिका अतर्क्य ॥७॥ निःसंगा निरंतरा । निर्गुणा निराकारा । निर्मोहा निराकारा । निर्व्यंगा निर्धूता तूं ॥८॥ गुणासहिता निर्गुणा । मायातीता निरंजना । मूळपुरुष सनातना । आदि-अंत-रहित तूं ॥९॥ आता करूं स्तवन । तरी स्तवनातीत तूं जाण । अथवा करुं नमन । तेंहि तैसेंचि ॥१०॥ रूप पाहूं तरी तूं अरूप साचार । ऐसा वेद-शास्त्रें करिती निर्धार । असो, काही न करावें, तरी उद्धार । कैसा होय जीवांचा ॥११॥ म्हणून तूंचि सगुण । तूंचि निर्गुण । तूंचि खेळसी त्रिगुण । मायामय सहजचि ॥१२॥ मायेकरितां तुझें ज्ञान । तुजकरितां माया जाण । ऐसें तुमचे परस्पर ऐक्य असणें । म्हणूनि अतर्क्य म्हणतसें ॥१३॥ तथापि आपुल्या कार्याकरितां । तुज स्तवितसें अनंता । कृपाकटाक्षे सांभाळावें आतां । दास म्हणवितों म्हणूनी ॥१४॥ श्रीकेशवा नारायणा । श्रीमाधवा वामना । श्रीअच्युता मधुसूदना । श्रीवासुदेवा गोविंदा ॥१५॥ श्रीगुरु सद्‌गुरु । सच्चिदानंद परात्परु । अनाथसखया कल्पतरु । श्रीसमर्थस्वामी ॥१६॥ मी तो अति हीन-दीन । महापापी चांडाळ पूर्ण । आतां आपुल्या कृपेंकरून । उद्धारावें श्रीअनंता ॥१७॥ मला पापें कवटाळिती । माझ्या आचरणे नरक-भीती । मज दोषिया यम कांपती । दंड कोणता करावा ॥१८॥ म्यां चौर्यकर्म केलें । परस्त्रियांतें भोगिलें । अखाद्यही भक्षिलें । मिती नाही असत्या ॥१९॥ केलें अपेयपान । बहुत निंदिले सज्जन । मी कोण हें नाठवे पूर्ण । झालों केवळ आत्मघातकी ॥२०॥ जैसा सूर्य आणि प्रकाश । तैसा माया आणि परेश । म्हणूनि तुज स्तवितां हृषीकेश । मायेचें स्तवन होतसे ॥२१॥ म्यां सायासें दोष संचिले । जें करूं नये तें केलें । रात्रंदिवस विषय भोगिले । उसंत नाही क्षणमात्र ॥२२॥ म्यां देह पोषिला । इंद्रियांसी लळा दिधला । म्यां सन्मार्ग सोडिला । उन्मत्तपणाचेनि योगें ॥२३॥ कामुक झालों परस्त्रियांचेनि । जी स्त्री दिसे ती हवीच वाटे मनीं । अन्य विषय हे तैसेचि निशिदिनीं । आवडती मायबापा ॥२४॥ सुखाचा नाहीं लेश । दुःख भोगिले असोस । झाला आयुष्याचा नाश । दुर्लभ नरदेह गेला ॥२५॥ वांचूनि काय केलें । बहुत पाप संचिलें । जन्मोजन्मीं पुरे वहिलें । राई पर्वतासारख्या ॥२६॥ नाहीं केलें तीर्थाटन । नाहीं मातृपितृसेवन । नाहीं अतिथिपूजन । घडले नाही दानधर्म ॥२७॥ नाहीं घडलें तुझें अर्चन । नाहीं घडलें कथाश्रवण । नाहीं परोपकारी वेचिलें धन । तुजप्रीत्यर्थ महाराजा ॥२८॥ नाही केली भूतदया । नाहीं झिजविली भजनीं काया । नाहीं घडली सत्क्रिया । अनुभवें खूण कळतसे ॥२९॥ नाहीं केला सद्विचार । नाही पाहिले सारासार । म्हणूनि पुढे काय होणार । पश्चात्ताप होईना ॥३०॥ नाहीं संध्यास्नान । नाहीं वेदपठण । नाही तुझें स्मरण । नाम वाचें येईना ॥३१॥ नाहीं केले कोणा वंदन । नाहीं भगवन्मूर्ति-अर्चन । नाहीं कोणतें व्रत घडले जाण । तुज संतोषाकारणें ॥३२॥ प्रपंची वाटे हव्यास । भागवतधर्मी कंटाळा चित्तास । सत्पुरुषांचे बोध-वित्तास । मन अती संतापें ॥ ३३॥ माझी स्त्री, माझे पुत्र । माझ्या कन्या, माझे मित्र । माझे जामात, माझे वित्त । आणि संसार माझा ॥३४॥ माझा देह, माझें घर । माझे बंधू, माझा परिवार । अती वाढविला जोजार । आपुल्या बंधनाकारणें ॥३५॥ मी शहाणा मी थोर । मी विद्वान मी चतुर । मी संपन्न, मी उदार । ऐसें मनीं वाटतसे ॥३६॥ मी कार्यकर्ता, मी भाग्यवान । मी दीर्घदर्शी पुण्यवान । मी पालनकर्ता गुणवान । आपल्या परिवाराचा ॥३७॥ मी बोलका लोकप्रिय । मी भक्त मी उदय । मी श्रेष्ठ, मश्यक काम । अन्य मजपुढे ॥३८॥ इत्यादि सत्य वाटे हा अविचार । असत्य वाटे तो सद्विचार । प्रस्तुत माझा तो आचार । ऐसाचि आहे गुरुश्रेष्ठा ॥३९॥ काया-वाचा-मन । कांहीं पाहतां न दिसे पुण्य । जळो माझे जन्म घेणें । भूमिभार जाहलों ॥४०॥ सकळ अवगुणांची राशी । जन्मा आलो दोष-संचयांशी । आतां माझी सुटका कैशी । होय ते कळेना ॥४१॥ कोणते जन्मीचें पुण्य पदरीं । म्हणोनि आलो तुझे नामरूप दरबारीं । आतां जैसी युक्ती दिसेल बरी । तैसें करी मायबापा ॥ ४२॥ कलियुगीं अति दुर्धर । तेथ तुझें नाम दरबार थोर । बहुत पावविले परपार । या दरबारीं ऐसें ऐकतों ॥४३॥ तुझ्या प्राप्तीविषयीं करावें साधन । तरी ती नाही आंगवण । ऐसें मला माझे मन । साक्ष देतसे ॥४४॥ तुजप्रीत्यर्थ करावें तीर्थाटन । तरी शरीरीं शक्ती नाही जाण । अथवा करुं पुरश्चरण । तरी मन तेथ न बैसे ॥४५॥ भूतमात्रीं दया करूं । तरी तोही न दिसे विचारू । दोषदृष्टी निरंतरु । म्हणूनि तेंही नावडे ॥४६॥ करावें अध्यात्म-श्रवण । तरी चंचल नावरे मन । करावें वर्णाश्रमधर्म जाण । तरी तेथ श्रद्धा न बैसे ॥४७॥ करावे वेदपठण । किंवा तुझें अर्चन-कीर्तन । तरी शरीरी आले वृद्धपण । तोही उपाय चालेना ॥४८॥ जरी करूं सत्पात्री दान । तरी पदरीं नाहीं ध्यान । भावे सेवावे संतजन । तरी पूज्यबुद्धी असेना ॥४९॥ करू इंद्रियदमन । अथवा योग-साधन । तरी आवरेना चंचल मन । तोही विचार दिसेना ॥५०॥ जरी करावे यज्ञयाग । अथवा सर्वसंगपरित्याग । तरी आवडती विषयभोग । कंटाळा मना न ये कीं ॥५१॥ करावा अरण्यवास । की परोपकारीं वेचावें शरीरास । तरी देहीं ममता वाढली असोस । तूं जाणसी दयाळा ॥५२॥ व्रतांचे करावे सायास । तरी अन्नावांचूनि प्राण कासावीस । जरी घ्यावा संन्यास । तरी चित्तीं वैराग्य नाहीं ॥५३॥ करावें प्रेमें भजन । अंतरी प्रेम नाहीं जाण । करावें ध्याननिष्ठ मन । तरी एकारता नव्हे कीं ॥५४॥ करावे शरणागतीचे उपाय । तरी न होय बुद्धीचा निश्चय । आतां काय करूं उपाय । तुज पावावयाकारणें ॥५५॥ ज्ञानचक्षूंविषयीं आंधळा । वैराग्याविषयीं पांगळा । गुरुसेवेविषयी खुळा । ऐसा अधम जन्मला ॥५६॥ नाही ऐकिली कथा । नाही केली तुझी वार्ता । लेश न दिसे पाहतां । पूर्वसुकृताचा ॥५७॥ तेथ आमचे वैभव तें किती । संसारी होतसे नित्य फजिती । तरी लाज न उपजे चित्तीं । विरक्ती अंतरी होईना ॥५८॥ मीठ मिळे, तरी न मिळे पीठ । पीठ मिळे, तरी न मिळे मीठ । तरी प्रपंची आवडी अवीट । ऐसें जाहलें महाराजा ॥५९॥ पुढे भाग्य येणार । मग भोग मी भोगणार ! ऐशिया संकल्पे बांधिलें घर । इया रीतीं ॥६०॥ अल्पमात्र विषयासाठी । नीच जनाचे लागे पाठी । नाना प्रकारचे संकटीं । घाली आपणांकारणे ॥६१॥ करूं नये ते करी । धरूं नये तें धरी । बोलूं नये तें वैखरी । भलतेंचि बडबडे ॥६२॥ नाठवे मागील केलें । पुढे काय होणार न कळे । ऐसे जाहलो जी आंधळे । केवळ डोळे अमान ॥६३॥ देव कोण, मी कोण । कोण असले तें ज्ञान । याचा विचार न पाहे मन । आणि विषयमृगजळी धावतसे ॥६४॥ ऐसा अवगुणी अन्यायी । किती म्हणुनी सांगू काई । आता आपुलें ब्रीद पाही । आणि सोडवी मजलागीं ॥६५॥ सोडवी म्हणता वाटें लाज । नाही केले सेवेचे काज । परंतु दयाळु महाराज । तारी तारी पतितासी ॥६६॥ नको पाहूं पुण्य । नको पाहूं अवगुण । नको पाहूं गुण । असे की नाही समर्था ॥६७॥ नाही भाव नाही भक्ती । नाही नेम नाहीं विरक्ती । नाहीं निश्चय चित्तीं । तुझे पाय प्राप्तीसी ॥६८॥ नेणें निर्गुण । नेणे सगुण । नेणें मी हा कोण । नेणें तत्त्वचिंतन ॥६९॥ नाहीं शांती नाहीं ज्ञान । नाहीं विचार नाहीं साधन । नाहीं सत्समागमी आवडी पूर्ण । अविवेकी पूर्ण दुरात्मा ॥७०॥ ऐसा पापी मी अघोरी । काय वाणूं एके वैखरी । पाषाण जन्मलों संसारीं । केवळ महामूर्ख ॥७१॥ असो, आता किती सांगू अवगुण । धिक धिक् माझा नरदेह जाण । आतां कांहीं करावें साधन । ऐसा हेत उपजला ॥७२॥ तों आला वृद्धापकाळ । गेलें तारुण्य सकळ । शक्ति नाही अळुमाळ । झालों पांगुळ सर्वोपरी ॥७३॥ अंतरी होतो पश्चात्ताप । जन्मांतरीचे मोठे पाप । तेणें गुणें विक्षेप । वारंवार होती पैं ॥७४॥ कांहीं साधन करावे ऐसा हेत मना । तों मागें ओढिती विषय-वासना । जैसा पायीं दोर लावुनी जाणा । कीटकासी ओढिती ॥७५॥ म्हणोनि झालों कासावीस । तुझ्या कृपेची आस । करतिसें गा हृषीकेश । गुरुराया समर्था ॥७६॥ येथुनी कधी सोडविसी । कधी आपुला दास म्हणविसी । कधी मजवरी दया करिसी । हे न कळे मजलागीं ॥७७॥ कांहीं एक निमित्त करुनी । महापापी सोडविले भयापासुनी । अजामिळादि कुंटिणी । ऐसे पुराणीं ऐकतों ॥७८॥ तोच धरुनी आधार । तुजपाशी रडतो वारंवार । हाका मारितों सत्वर । कृपा करी भलतिया भावें ॥७९॥ उदंड शब्द ज्ञानी बोलती । की आत्मा आपणचि निश्चितीं । साधनाच्या विपत्ती । कां सोसाव्या ॥८०॥ न लगे भजन । न लगे पूजन । न लगे नेम न लगे दान । न लगे कांहीं वैराग्यादि ॥८१॥ न लगे व्रत न लगे तीर्थ । न लगे पाहणे ग्रंथ । न लगे कांहीं खटपटींचा पंथ । साक्षात् आपण ब्रह्मरूप ॥८२॥ परि तें न ये मना । जेविल्याविणें पोट भरेना । पोटावरी पदार्थ नाना । बांधिले तरी व्यर्थचि ॥८३॥ तैसें वैराग्यविण शब्दज्ञान । बोलताती वाउगाचि शीण । दिवसेंदिवस वाढे अभिमान । मी ज्ञानी म्हणोनी ॥८४॥ वृत्तीची चळवळ जाईना । विषयांची लालुची सुटेना । क्षणभर शांती न ये मना । आणि म्हणतो मी ब्राह्मण ॥८५॥ असो त्यांचे ज्ञान त्यांसी । ती स्थिती नको मजसी । झणीं मज त्यांत घालिसी । अनर्थ थोर होईल ॥८६॥ आतां कृपा करी भलतिये परी । मज दीनातें उद्धरीं । आम्हीं अभाविकें भवसमुद्रीं । बुडतसों स्वामिया ॥८७ ॥ मी आपुला निवेदिला भाव । तूंही सर्वसाक्षी जाणसी सर्व । जेणे होय तरणोपाय । त्या त्या मार्गे नेई जे ॥८८॥ प्रपंची ठेवी भलत्या रीतीं । परी तुझी आवड असो द्यावी चित्तीं । संसारी नाना विपत्ती । झाल्या तरी होवोत कां ॥८९॥ परी ज्या आम्हां सोडविती । त्याच होवोत कां विपत्ती । नाहीं तरी खंडेल तव भक्ती । ऐसें नको करूं दयाळा ॥९०॥ कर्मे पाठीं घेतलीं। म्हणोनि शक्ती न चले आपुली । नाना संकटीं घाली । आपुल्या इच्छे विपरीत ॥९१॥ तेथ मुख्य देह अधिष्ठान । तो केला रोगाधीन । बुद्धीही नसे सत्त्वसंपन्न । आतां म्यां काय करावे ? ॥९२॥ जो जो करूं जावा उपाय । तो तो होतसे अपाय । कैसा होय तरणोपाय । तो आम्हां कळेना ॥९३॥ वरी वरी म्हणे शरणागत । अंतरी विषयी आसक्त । दंभें जाहलों महंत । भक्तिरहस्य नेणोनी ॥९४॥ लोकांत मान्यता जाहली जरी । लज्जा वाटे अंतरीं । अभक्तपणे असोनि दूरी । भक्त ऐसें म्हणवितों ॥९५॥ असो, आतां कांहीं । मज ठेवी आपुले पायीं । करोनी माझी सोई । अनुभवारूढ करावा ॥९६ ॥ तूं कृपावंत किती । मातेचें प्रेम तें किती । खूण बाणली प्रचिती । आली अंतरीं ॥९७॥ इष्टमित्र, बंधू, गोत । तूंच सखा भगवंत । अपराध घालोनी पोटांत । आपुला दास म्हणवावें ॥९८॥ माझा उपाय किंचित । स्वसामर्थ्ये न चले जेथ । कांहीं करोनि निमित्त । मज तारावें समर्था ॥९९॥ मी लौकिकीं शरणागत । साधुत्व मिरवितों लोकांत । हेंचि करोनी निमित्त । मज तारावें समर्था ॥१००॥ परिसासी लोह शिवो भलत्या भावें । परी तेणें सुवर्णचि करावें । तैसें मज सांभाळावें । उणे पुरे समर्था ॥१०१॥ मीठ समुद्र मिळणी । तत्काळ होय पाणी । तैसी माझी कर्मकेरसुणी । जाळोनि टाकावी समर्था ॥१०२॥ जैसा गांव ओहोळ । मिळतां तात्काळ गंगाजळ । तैसें माझे कर्मफळ । धुवोनिया टाकावें ॥१०३॥ मी तुझ्या दासाचा दास । बळेचि तुझी धरिली कास । पाहतसें कृपेचि आस । कधीं करशील म्हणोनी ॥१०४॥  मी पातकी ब्रीदाचा । तरी जवळी येण्या अधिकार कैचा । दूर उभा राहोनि वाचा । तुझें नाम जपतसें ॥१०५॥ आतां तो जैसा क्रौंचपक्षी । दुरोनीच पिलियातें रक्षी । तैसा मज संरक्षी । आपुल्या ब्रीदाकारणें ॥१०६॥ कां कासवी आपुलिये । दृष्टीं पिलियांचे पोषण विये । तैसी मजवरी करुणा माये । केलीच करावी ॥१०७॥ कृपा तों केली किंचित । म्हणोनि नाम वाचेसी येत । परी त्या नामाचे सामर्थ्य हृदयांत । न ठसे अद्यापि ॥१०८॥ म्हणोनी जी कृपा केली । तिची सार्थकता नाही झाली । म्हणोनी असोसी राहिली । आणि तळमळ मानसीं ॥१०९॥ असो, आतां विचार । मजकडे केलाचि करावा कृपाकर । आणि हा भव दुर्धर । यांतुनी पार करावें ॥११०॥ नामीं धरावा विश्वास । पायीं राखावें चित्तास । आवरावें चंचळ मनांस । आपुलिया सामर्थ्ये ॥१११॥ विषयांपासून सोडवावें । देहबंधनांतून मुक्त करावें । बोधामृत पाजावें । जेणें हें अज्ञान नासे ॥११२॥ जेणें तुझी सेवा घडे । जेणे हा पूर्वसंस्कार मोडे । अहंकारावरी चिरा पडे । आणि नाशती कामादि ॥११३॥ जेणें उपजे भक्ती । सज्जनसेवेसी प्रीती । दया उपजो भूतमात्रीं । चित्त निर्विकार असावें ॥११४॥ हें घ्यावया नाहीं अधिकार । परि तूं घेववी कृपासागर । याचक मी तुझें दार । धरुनी उभा राहिलों ॥११५॥ तूं दयेचा सागर । तूं ममतेचे आगर । उदारत्वाचा डोंगर । कृपें दीन लक्षावा ॥११६॥ तूं वात्सल्याचें सरोवर । तूं भाग्याचे शिखर । अभागी मी पामर । कृपाकटाक्षे लक्षावा ॥११७॥ तूं विश्वाचा पालक । तूं धर्माचा रक्षक । म्हणूनि मी एक अभागी रंक । शरण आलों जी समर्था ॥११८॥ तूं भक्तांचा सुखकारी । शरणागतांचा साह्यकारी । मी अभाविक दास परी । रक्षण माझें करावें ॥११९॥ तूं देवाचा देव । तूं वैभवाचें वैभव । तूं मायेचा गौरव । तूंचि सत्ता तूंचि लक्षी ॥१२०॥ पोट भरेल ऐशिया आशा । रानपाला खाल्ला जगदीशा । तयात अमरवल्ली मर्त्यपाशा । होती छेदणारी जी ॥१२१॥ तियेचे झाले सेवन । सुटला मृत्युभयापासून । हे सहज न कळतां जाहले जाण । कोणा एकासी ॥१२२॥ तैसा जी मी देवाधिदेवा । लटिकाचि शरण वासुदेवा । तुज आलों परी तुवां । आपुलें ब्रीद साच केलें ॥१२३॥ कांचमणी घेऊन परिस देणें । की पय देऊनी उदक मागणें । हे साजे तुज एकाकरणें । यदर्थी संदेह असेना ॥१२४॥ मुळी मी भक्त तुझा सकाम । परि करी मज निष्काम । आणि शरणागतीचें वर्म । मज अंतरी प्रबोधावें ॥१२५॥ नको पाहूं पुण्य । नको पाहूं अवगुण । नको पाहूं गुण । आहे की नाहीं ॥१२६॥ नको पाहूं ज्ञान । नको पाहूं ध्यान । नको पाहूं मन । वश आहे कीं नाहीं ॥१२७॥ नको पाहूं पाप । नको पाहूं जप । नको पाहूं तप । आहे की नाही ॥१२८॥ नको पाहूं भक्ती । नको पाहूं विरक्ती । नको पाहू शरणागती । आहे की नाहीं ॥१२९॥ नको पाहूं आचार । नको पाहूं निर्धार । नको पाहूं विचार । आहे की नाही ॥१३०॥ नको पाहूं धर्म । नको पाहूं कर्म । नको पाहूं नेम । आहे की नाहीं ॥१३१॥ नको पाहूं भावा । नको पाहूं सेवा । नको पाहूं देवाधिदेवा । संचित माझें ॥१३२॥ माझी स्थिती मीं स्पष्ट वर्णिली । परि सत्ताधीशा, जैसी आपुली । इच्छा असेल तदनुरूप साउली । करी दीनावरी ॥१३३॥ न मागें धन, न मागें विद्या । न मागें मान, न मागें सन्मान । न मागें कल्याण । या प्रपंचाचें ॥१३४॥ न मागें पशु, न मागे पुत्र । न मागें पृथ्वी, न मागे कलत्र । न मागें वस्त्र किंवा पात्र । जी तुझें विस्मरण करणारीं ॥१३५॥ शरीरी बहुत द्यावी शक्ती । आणि तुझी सेवा घडो अहोरात्रीं । यावेगळी नसे प्रीती । अंतरापासुनी महाराजा ॥१३६॥ मोक्षाची इच्छा नाहीं अंतरीं । आणि जन्म येवो भलत्या परी । दोन वर द्यावे श्रीहरी । कृपा करुनी दीनासी ॥१३७॥ पुनःपुन्हा हेंचि मागणें । सत्संगती आणि आपुली सेवा देणें । अन्य काही नसे सांगणे । तुझे पाय शिवतसें ॥१३८॥ जयाचे अंगी बळकट सामर्थ्य । तिहीं बळेंचि संपादिला परमार्थ । मी तो केवळ असमर्थ । हीन दीन अभागी ॥१३९॥ म्हणोनि करितसें विनवणी । सहस्र लोटांगणे चरणीं । घालोनी प्रार्थी दीनवाणी । कृपादृष्टी इच्छितसें ॥१४०॥ जय जयाजी श्रीस्वामी समर्था । मज संपादुनी देई मागिल्या अर्था । मग न मागे काही समर्था । तुझी आण मागतसे ॥१४१॥ लोटांगण साधुसंतासीं । दंडवत महानुभावांसी । नमन तयां भाविकांसी । प्रीतिनंद करीतसे ॥१४२॥ ॥ इति श्रीकरुणास्तोत्रस्य प्रथमोऽध्यायः संपूर्णम् ॥ ॥ श्रीस्वामीसमर्थार्पणमस्तु ॥  

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


No comments:

Post a Comment