Aug 30, 2023

अथ श्रीसाईसच्चरिते श्रीसाईमहिमावर्णनं - सार्थ श्री साई रुद्राध्याय (१)


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

चरित्र नव्हे हा सुखाचा ठेवा। निज परमामृताचा मेवा ।

भाग्ये आगळा तेणेचि सेवावा । भक्ति भावा करोनि ॥ (अ. १४ : १२५) 'श्रीमद्भगवद्गीता' ही जशी भगवान श्रीकृष्णाची आणि 'श्री ज्ञानेश्वरी' ही जशी संत शिरोमणी ज्ञानेश्वरांची वाङ्मय मूर्ती आहे तशीच हेमाडपंतकृत 'श्रीसाईसच्चरित' ही श्रीसाईबाबांची वाङ्मय मूर्ती आहे. अशा या परम मंगल 'श्रीसाईसच्चरित' पोथीचा साईभक्त कै. मु. ब. निंबाळकर यांनी केलेला गद्य-भाष्यानुवाद 'श्रीसाईंचे सत्य चरित्र' या नावाने प्रसिद्ध आहे. श्रीसाईसच्चरित या दिव्य, प्रासादिक ग्रंथातील अकरावा अध्याय अर्थात ‘श्री साई रुद्राध्याय’ - याचे महत्व विशेष आहे. या अध्यायाचे आदरपूर्वक वाचन अथवा नेमाने पारायण केल्यानें श्रीसाईकृपेने संकट निवारण अवश्य होते असा अनेक साईभक्तांचा अनुभव आहे.

अशा या संकटमोचक अध्यायाचे पूरक विवरण करतांना थोर साईभक्त कै. मु. ब. निंबाळकर लिहितात -  हा अकरावा अध्याय फार महत्त्वाचा आहे. हेमाडपंतांनी तर या अध्यायाचे पठण म्हणजे यजुर्वेदातील प्रसिद्ध रुद्राध्यायाचे अकरा वेळा पठणच म्हटले आहे. श्रीधर स्वामीकृत श्रीशिवलीलामृताचाही अकरावा अध्याय श्रेष्ठ मानला आहे. "असो सर्वभावे निश्चित । अखंड पाहावे शिवलीलामृत । हें न घडे जरी त्वरित । हा अध्याय तरी वाचावा ॥७८॥”  तेव्हा हेमाडपंतांनी या अध्यायाच्या पठणाची जी फलश्रुती सांगितली आहे त्याबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही. होऊनि श्रद्धा-भक्तियुक्त । करील जो या अध्यायाचें नित्य । पारायण होऊनि स्वस्थचित्त । आपदानिर्मुक्त होईल ॥१५०॥ फार काय करूं मी कथन । शुद्ध करोनियां अंत:करण । नेमनिष्ठ व्हा साईपरायण। ब्रह्म सनातन पावाल ॥१५१॥ पुरेल अपूर्व इच्छित काम। व्हाल अंतीं पूर्ण निष्काम । पावाल दुर्लभ सायुज्यधाम । अखंड राम लाधाल ॥१५२॥ साईभक्तांसाठी 'श्रीसाईंचे सत्य चरित्र' या ग्रंथातील सार्थ श्री साई रुद्राध्याय इथे क्रमश: प्रकाशित करत आहे. 

   ॥ अथ श्रीसाईसच्चरित अध्याय ११ ॥ श्रीसाईमहिमा वर्णनं

(श्रीसाईबाबांच्या प्रभावाचे वर्णन)

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥ श्रीगणेशाला नमस्कार असो. श्रीसरस्वती देवीला नमस्कार असो. श्रीगुरुमहाराजांना नमस्कार असो. श्रीकुलदेवतेला नमस्कार असो. श्रीसीता व श्रीरामचंद्र यांना नमस्कार असो. श्रीसद्‌गुरु साईनाथांना नमस्कार असो.

गतकथेचें अनुसंधान बाबांचें अरुंद फळीवर शयन । अलक्ष्य आरोहण अवतरण । अकळ विंदान तयांचें ॥१॥ असो हिंदू वा यवन । उभयतांसी समसमान । जाहलें आयुर्दाय-पर्यालोचन । तें हैं देवार्चन शिरडीचें ॥२॥ मागच्या कथांची संगती अशी आहे. बाबांचे अरुंद फळीवर झोपणे, कोणालाही न दिसता चढणे आणि उतरणे असे त्यांचे न कळणारे कौशल्य होते. हिंदू असो किंवा मुसलमान असो, दोघांनाही एकसारखीच वागणूक होती. ज्यांच्या जीवनकाळाचे निरीक्षण झाले ते हे शिरडीच्या लोकांचे पूज्य दैवत होते.

आतां हा अध्याय अकरावा । गोड गुरूकथेचा सुहावा । वाटलें साईचरणीं वहावा । दृढ भावा धरूनी ॥३॥ घडेल येणें सगुणध्यान । हे एकादशरुद्रावर्तन । पंचभूतांवर सत्ता प्रमाण । बाबांचें महिमान कळेल ॥४॥ कैसे इंद्र अग्नि वरुण । बाबांच्या वचनास देती मान । आतां करूं तयाचे दिग्दर्शन । श्रोतां अवधान देईंजे ॥५॥ आता वाटते की, हा गोड कथांनी सजविलेला अकरावा अध्याय दृढ भाव धरून श्रीसाईच्या चरणी वहावा. यामुळे बाबांच्या सगुण रूपाचे ध्यान घडेल, रुद्राचे (यजुर्वेदातील रुद्राध्याय नावाच्या प्रसिद्ध मंत्रगटाचे) अकरा वेळा पारायण घडेल, बाबांच्या पंचमहाभूतांवरील सत्तेचा पुरावा सापडेल आणि त्यांचा महिमा कळेल. इंद्र (पर्जन्याची देवता), अग्नी व वरुण (जलाची देवता) बाबांच्या शब्दांना कसे मान देत असत याची आता थोडक्यात माहिती करून घेऊ या. श्रोत्यांनी लक्ष द्यावे.

पूर्ण विरक्तीची विरक्ति । ऐसी साईंची सगुण मूर्ति । अनन्यभक्तां निजविश्रांति । आठवू चित्तीं सप्रेम ॥६॥ गुरूवाक्यैक-विश्वासन । हेंचि बसाया देऊं आसन । सर्वसंकल्पसंन्यासन । करूं पूजन या संकल्पें ॥७॥ प्रतिमा स्थंडिल अग्नि तेज । सूर्यमंडळ उदक द्विज । या सातांहीवरी गुरूराज अनन्य पूजन करूं कीं ॥८॥ चरण धरितां अनन्यभावें । गुरूचि काय परब्रह्म हेलावे । ऐसे गुरूपूजेचे नवलावे । अनुभवावे गुरूभक्तें ॥९॥ साईबाबांचे सगुण रूप म्हणजे मूर्तिमंत पूर्ण वैराग्य व अनन्यपणे भक्ती करणाऱ्यांचे विश्रांतीचे स्थान होय. ते आपण मनात प्रेमपूर्वक आठवू या. गुरुचे वाक्य हेच फक्त खरे मानणे याचे त्यांना बसायला आसन देऊ या आणि सर्व कामनांचा त्याग करणे या संकल्पाने त्यांचे पूजन करू या. प्रतिमा, स्थंडिल (यज्ञ, होम इत्यादींकरिता केलेला साधारण एक हात चौरस व चार अंगुळे उंचीचा मातीचा ओटा), अग्नी, तेज, सूर्यमंडळ, उदक (पाणी) व द्विज (ब्राह्मण) या सातही पूजास्थानांपेक्षा गुरुराज हे श्रेष्ठ आहेत. त्यांचे अनन्यपणे पूजन करू या. अनन्य भावाने चरण धरले असता गुरुच काय, परब्रह्मसुद्धा हलेल, इतके गुरुपूजेचे आश्चर्य आहे. गुरुभक्तांनी त्याचा अनुभव घ्यावा.

पूजक जेथवर साकारू । देहधारीच आवश्यक गुरू । निराकारास निराकारू । हा निर्धारू शास्त्राचा ॥१०॥ न करितां सगुणाचे ध्याना । भक्तिभाव कदा प्रकटेना । आणि सप्रेम जंव भक्ति घडेना । कळी उघडेना मनाची ॥११॥ तें उमलल्यावीण कांहीं केवळ कर्णिकेस गंध नाहीं । ना मकरंद ना भ्रमर पाहीं । तेथ राहील क्षणभरी ॥१२॥ सगुण तेंचि साकार । निर्गुण तें निराकार । भिन्न नाहीं परस्पर । साकार निराकार एकचि ॥१३॥ थिजले तरी तें घृतचि संचलें । विघुरलें तेंही घृतचि म्हणितलें । सगुण निर्गुण एकचि भरलें । समरसले विश्वरूपें ॥१४॥ डोळे भरूनि जे पाहूं येई । पदी ज्याच्या ये ठेवितां डोई । जेथ ज्ञानाची लागे सोई । आवडी होई ते ठायीं ॥१५॥ जयाचियें संगती । प्रेमवार्ता करूं येती । जयासी पूजूं ये गंधाक्षतीं । म्हणूनि आकृति पाहिजे ॥१६॥ निर्गुणाहूनि सगुणाचें । आकलन बहु सुकर साचें । दृढावल्या प्रेम सगुणाचें । निर्गुणाचे बोधन तें ॥१७॥ भक्तां निर्गुण ठायीं पडावें । बाबांनी अनंत उपाय योजावे । अधिकारानुरूप दूर बसवावें । दर्शन वर्जावें बहुकाळ ॥१८॥ एकास देशांतरा पाठवावें । एकास शिरडींत एकांती कोंडावें । एकास वाड्यांत अडकवावें । नेम द्यावे पोथीचे ॥१९॥ वर्षानुवर्ष हा अभ्यास । होतां वाढेल निर्गुणध्यास आसनीं शयनीं भोजनीं मनास । जडेल सहवास बाबांचा ॥२०॥ पूजा करणारा जोवर साकारू (देहाचे भान असलेला) असतो तोवर त्याला गुरुही देहधारीच लागतो.निराकारास (देहाचे भान विसरलेल्या पूजकाला) निराकारू (देहधारी नसलेला, सूक्ष्मरूप असलेला) गुरु लागतो, असा शास्त्राचा निर्णय आहे. सगुणाचे ध्यान केल्याशिवाय भक्तिभाव कधीच प्रगट होत नाही आणि जोवर सप्रेम भक्ती घडत नाही तोवर मनाची कळी उघडत नाही. उमलल्याशिवाय केवळ कळीला वास नसतो, फुलातील मधही नसतो आणि मग भुंगादेखील तेथे क्षणभरसुद्धा थांबत नाही बघा. रूप - गुणसंपन्न म्हणजेच साकार व रूप-गुणाशिवाय म्हणजेच निराकार, दोन्ही एकमेकांपासून भिन्न नाहीत. साकार व निराकार एकच. गोठले, तरी ते तूपच. घट्ट झाले आणि वितळले, तरी त्याला तूपच म्हटले जाते. ब्रह्मदेवाने सगुण व निर्गुण दोन्ही एकत्र करून मिसळून टाकले आहेत. डोळे भरून ज्याला पाहता येते, ज्याच्या पायी डोके ठेवता येते. जेथे ज्ञान प्रत्यक्ष भेटून मिळण्याची सोय असते त्या ठिकाणी आवड उत्पन्न होते. ज्याच्याबरोबर प्रेमाच्या गोष्टी करता येतात. ज्याची गंध व अक्षता लावून पूजा करता येते म्हणून सगुण साकार व्यक्ती पाहिजे. निर्गुणापेक्षा सगुणाचे आकलन होणे खरोखर फार सोपे असते. सगुणाचे प्रेम दृढ झाले की, निर्गुण आपोआप समजले जाते. भक्तांना निर्गुण समजावे म्हणून बाबा अनेक उपाय योजत असत. ज्याच्या - त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला दूर बसवीत आणि बऱ्याच काळपर्यंत आपले दर्शन घेऊ देत नसत. एकाला शिरडीच्या बाहेर दूर पाठवीत, एकाला शिरडीत एकांतात कोंडून ठेवीत, तर एकाला वाड्यात अडकवून ठेवून पोथी वाचण्याचा नेम सांगत असत. बाळाराम मानकरांना मच्छिंदर गडावर पाठवले. तसेच कुणाला शिर्डीत एकांतात ठेवले होते. उपासनी महाराजांना खंडोबाच्या मंदिरात एकटे ठेवले होते. तसेच ते मशिदीच्या अंगणात कोणाला तरी थांबवून नियमितपणे पोथी वाचायला सांगत. काकासाहेब दीक्षित यांनी रात्री भावार्थ रामायण आणि दिवसा एकनाथी भागवत वाचण्याचा नियम केला. हेतू हा की, वर्षानुवर्षे असा अभ्यास झाला म्हणजे, निर्गुण रूपाचे आतुरतेने सतत चिंतन वाढेल आणि बसले असताना, झोपले असताना आणि जेवण करीत असताना त्यांच्या मनाला बाबांचा सहवास जडेल.

  देह तरी हा नाशिवंत । कधी तरी होणार अंत । म्हणूनि भक्ती न करावी खंत अनाद्यनंत लक्षावें ॥२१॥ हा बहुविध दृश्य पसारा । सकल अव्यक्ताचा सारा । अव्यक्तांतूनि आला आकारा जाणार माघारा अव्यक्तीं ॥२२॥ ही 'आंब्रह्मस्तंब ' सृष्टी । व्यष्टी जैसी तैसी समष्टीं । उपजली ज्या अव्यक्तापोटीं । तेथेंच शेवटी समरसे ॥२३॥ म्हणवूनि कोणासही ना मरण । मग तें बाबांस तरी कोठून । नित्य शुद्धबुद्धनिरंजन निर्मरण श्रीसाई ॥२४॥ कोणी म्हणोत भगवद्भक्त । कोणी म्हणोत महाभागवत । परी आम्हांसी ते साक्षात भगवंत । मूर्तिमंत वाटले ॥२५॥ गंगा समुद्रा भेटू जाते । वाटेनें तापार्ता शीतल करिते । तीरींचे तरूंसी जीवन देते । तृषा हरिते सकळांची ॥२६॥ तैसीच संतांची अवतारस्थिति । प्रकट होती आणि जाती । परी तयांची आचरिती रीती। पावन करिती जगातें ॥२७॥ कमालीची क्षमाशीलता । नैसर्गिक विलक्षण अक्षोभ्यता । ऋजुता मृदुता सोशिकता । तैसीच संतुष्टता निरुपम ॥२८॥ दिसाया जरी देहधारी । तरी तो निर्गुण निर्विकारी । निःसंग निर्मुक्त निज अंतरीं । प्रपंची जरी विचरला ॥२९॥ कृष्ण स्वयें जो परमात्मा । तोही म्हणे संत मदात्मा । संत माझी सजीव प्रतिमा । संतसप्रेमा तो मीच ॥३०॥ प्रतिमारूपही संतां न साजे संत निश्चळ स्वरूप माझें । म्हणवूनि मद्भक्तांचे ओझें । तयांचें लाजें मी वाहें ॥३१॥ संतांसी जो अनन्यशरण । मीही वंदी तयाचे चरण । ऐसें वदला उद्धवा आपण संतमहिमान श्रीकृष्ण ॥३२॥ सगुणांतला जो सगुण । निर्गुणांतला जो निर्गुण । गुणवंतांतील जो अनुत्तम गुण । गुणियांचा गुणिया गुणिराजा ॥३३॥ पर्याप्तकाम जो कृतकृत्य । सदा यदृच्छालाभतृप्त । जो अनवरत आत्मनिरत । सुखदुःखातीत जो ॥३४॥ आत्मानंदाचें जो वैभव । कोणा वर्णवेल तें गौरव । अनिर्वाच्य सर्वथैव । ब्रह्म दैवत मूर्त जो ॥३५॥ की ही अनिर्वचनीय शक्ति । दृश्यरूपें अवतरली क्षितीं । सच्चित्सुखानंदाची मूर्ति । ज्ञानसंवित्ती तीच ती ॥३६॥ ब्रह्माकारांतःकरणमूर्ति । झाली जयाची प्रपंची निवृत्ति । नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्म्यैक्यस्थिती आनंदमूर्ती केवळ ती ॥३७॥ “आनंदो ब्रह्मेति" श्रुति । श्रोते नित्य श्रवण करिती । पुस्तकज्ञानी पोथींत वाचिती । भाविकां प्रतीती शिरडींत ॥३८॥ धर्माधर्मादि ज्याचें लक्षण तो हा संसार अति विलक्षण अनात्मज्ञांसी क्षणोक्षण । करणे रक्षण प्राप्त कीं ॥ ३९ ॥ परी हा न आत्मज्ञांचा विषय । तयांसी आत्मस्वरूपींच आश्रय । ते नित्यमुक्त आनंदमय । सदा चिन्मयरूप जे ॥४०॥ आपले हे शरीर नाश पावणारे आहे. कधीतरी त्याचा शेवट होणारच आहे. म्हणून भक्तांनी दुःख न करता जन्मरहित व मृत्युरहित परमेश्वराकडे लक्ष द्यावे. हा सृष्टीचा नाना प्रकारचा दिसणारा पसारा म्हणजे मायेचा प्रभाव आहे. हा अव्यक्तातून आकाराला आला आणि अव्यक्तातच माघारा जाईल. ही ब्रह्मापासून लहान झुडुपापर्यंतची सृष्टी, ज्यात एकेकटा जीव व अनेकांचा समूह असलेले ब्रह्मांड समाविष्ट आहे ती अव्यक्तातून आकारा आली आणि त्यातच शेवटी समरस होईल. अशा प्रकारे मरण कोणासच नसते; मग ते साईबाबांना तरी कोठून येईल! श्रीसाई शुद्ध, बुद्ध (ज्ञानी), निरंजन (दोषरहित) व निर्मरण (मरण नसलेले) आहेत. त्यांना कोणी भगवंताचे भक्त म्हणोत की महान वैष्णव म्हणोत. परंतु आम्हाला ते साक्षात मूर्तिमंत भगवंत वाटले. गंगा नदी समुद्राला भेटण्यास जाताना वाटेत उन्हाने तापलेल्यांना थंड करते, काठांवरच्या वृक्षांना पाणी देते आणि सगळ्यांची तहान भागविते.तशीच संतांची अवतारस्थिती असते. ते प्रगट होतात आणि निघून जातात. परंतु त्यांची वागण्याची पद्धत जगाला पापमुक्त करते. बाबांचा क्षमा करण्याचा स्वभाव कमालीचा होता, शांती नैसर्गिक व विलक्षण होती आणि निष्कपटता, कोमलता, सहनशीलता, तशीच सदा समाधानी वृत्ती अजोड होती. दिसायला जरी ते देहधारी होते तरी ते रूपगुणांशिवायचे व काम, क्रोध इत्यादी क्षुब्ध विकारांशिवायचे होते. ते या संसारी जगात फिरत असले, तरी अंत:करणात कोणाचीही संगत नसलेले व सर्व मोहांच्या बंधनांपासून मुक्त होते. कृष्ण स्वतः जो साक्षात् परमेश्वर तोही म्हणतो की, भक्तिपूर्ण संत हे माझेच जीव की प्राण आहेत. ते माझ्या जिवंत मूर्ती आहेत. संत म्हणजे मी स्वत:च आहे. परंतु संतांना प्रतिमांची उपमासुद्धा बरोबर नव्हे. "संत माझेच न ढळणारे रूप आहे; म्हणून त्या माझ्या भक्तांची प्रतिष्ठा राखण्यासाठी त्यांचे ओझे मी वाहतो. संतांना जो शरण जातो त्याचे मी चरण वंदितो". असे संतांचे माहात्म्य स्वतः श्रीकृष्णाने उद्धवाला सांगितले. सर्व सगुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ सगुण वस्तू आहे आणि सर्व निर्गुण वस्तूंमध्ये जो श्रेष्ठ निर्गुण वस्तू आहे, चांगले गुण असलेल्या व्यक्तीमधील जो सर्वांत श्रेष्ठ गुण आहे आणि सर्व गुणीजनांतला जो अत्यंत श्रेष्ठ गुण असलेला असा गुणीजनांचा राजा आहे, जो कृतकृत्य (आपल्या श्रमांचे फळ मिळून समाधान पावलेला), अवाप्तकाम (सर्व इच्छा पूर्ण झालेला) व यदृच्छालाभतृप्त (दैवाने जे लाभेल त्याने संतुष्ट) आहे, जो सतत आपल्या स्वरूपात अत्यंत तल्लीन असून सुख-दुःखांच्या पलीकडे आहे, जो आत्मानंदाचे ऐश्वर्य आहे त्याचा बडेजाव कोणाला वर्णन करता येईल ! जो साक्षात् पूजनीय परमात्मा आहे तो सर्व प्रकारे वर्णन करण्याला अशक्यच असतो. ही वर्णन न करता येणारी शक्ती पृथ्वीवर दिसण्याजोग्या रूपाने अवतरली आहे. सत्य, ज्ञान व आनंदाच्या सुखाची मूर्ती आणि ज्ञानाची पूर्ण ओळख ती हीच; जिचे अंत:करण ब्रह्माशी एकरूप झालेले आहे ती मूर्तीदेखील हीच ! ज्याची प्रपंचापासून निवृत्ती झालेली आहे, ज्याची संसारासंबंधीच्या व्यवहारापासून मुक्त अशी ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याच्या अनुभवाची स्थिती आहे अशी जी शुद्ध आनंदमूर्ती ती हीच ! "आनंदो ब्रह्मेति" (आनंद म्हणजेच ब्रह्म किंवा परमात्मा) ही श्रुती (तैत्तिरी उपनिषद, वल्ली ३, अनुवाक ६) श्रोते नित्य ऐकतात. पुस्तके वाचणारे पोथीत वाचतात. परंतु भाविक शिर्डीत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतात, धर्म व अधर्म वगैरे ज्याचे लक्षण आहे असा हा संसार फार विलक्षण आहे. ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले नाही त्यांना क्षणोक्षणी हा संसार सांभाळावा लागतो; परंतु ज्यांना स्वस्वरूपाचे खरे ज्ञान झालेले आहे त्यांचा संसार हा विषय नव्हे. ते सदा आत्मस्वरूपातच स्थित असतात. ते नित्य मुक्त व आनंदस्वरूप असतात आणि सदा शुद्ध ज्ञानस्वरूप म्हणजे परमात्मरूप असतात.

क्रमश:

॥ श्रीसद्‌गुरुसाईनाथाय नमः ॥

॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 


स्रोत : हेमाडपंतकृत श्रीसाईसच्चरित आणि कै. मु. ब. निंबाळकर अनुवादित श्रीसाईंचे सत्य चरित्र


No comments:

Post a Comment