॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥
गुलाब पुष्पासम गौर कांती । आजानुबाहु अशी दिव्य मुर्ति ॥
कृपापूर्ण ती नेत्रदीप्ती सतेज । नसे मानवी देह हा स्वामीराज ॥१॥
प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतींचे । जे रूप श्रीपाद श्री वल्लभाचे ॥
अवधूत मूर्ती अवतार झाला । नमो सदगुरू दत्त स्वामी पदाला ॥२॥
जयाच्या पुढें काळ ही नम्र आहे । अशा स्वामीच्या मी पदी बाळ आहे ॥
समर्था तुझें पोर ना दीन व्हावे । चरणी तुझ्या ते सदा लीन व्हावे ॥३॥
अनन्य भावे घडे स्वामी भक्ती । करिती तयां संतही साह्य प्रीती ॥
ग्रहांची नसे त्या प्रतिकुल भीती । कुलदेवता ही अनुकुल होती ॥४॥
पदी भक्त आले कृपा पात्र झाले । बहु सिद्ध केले किती उद्धरीले ॥
असामान्य तुमची असें किर्तीगाथा । म्हणोनीच हा ठेविला पायी माथा ॥५॥
नसे पात्र स्वामी मी तुमच्या कृपेसी । नको सोडू माते तरी या मुलासी ॥
मला संपदाही तुझे पाय दोन्ही । तुझ्याविण माझे जगी नाही कोणी ॥६॥
फळाली कृपा संत देवादिकांची । मिळाली मला जोड स्वामी पदांची ॥
हृदयी ठेव जीवा धरी घट्ट पाय । तया सारखी न करी कोणी माया ॥७॥
मातेची माया पित्याचीच छाया । दया मूर्तिच्या या नको सोडू पाया ॥
मना भार ठेवी अरे याच ठाया । मिळेना कुठे ही अशी स्वामी माया ॥८॥
सदा स्वामी सन्नीध ऐसे करावे । तुम्ही साह्यकारी मनीं हे ठसावे ॥
जाज्वल्य तुमचा अभिमान राहो । भयाचा मला लेश ना स्पर्श होवो ॥९॥
समर्थ जाणोनी आलो मी पाया । तुम्हीच माझे सर्वस्व व्हाया ॥
कृपेचे जरी अल्प देशी निधान । जीवा सारीखे मी तयासी जपेन ॥१०॥
पदी हट्ट ऐसा धरीला असें मी ॥ ध्यानी दिसावे मला याच जन्मी ॥
मी स्वामीचा,स्वामी सर्वस्व माझे । असें प्रेम वाढो गुरूमाय तुझे ॥११॥
मला स्वामीराया तुमचीच छाया । तुम्हाविण देवा करी कोण माया ॥
स्वामी समर्थ गर्जूनी गावे । या जीवनाचा महायज्ञ होवो ॥१२॥
आधार नाही तुम्हांविण कोणी । नसे आश्रयदाता तुम्हाविण कोणी ॥
माता पिता सदगुरू एक स्वामी । जवळी मला घ्या करी प्रार्थना मी ॥१३॥
स्वामी करावे इतुके करावे । हाती धरावे मला ना त्यजावे ॥
होईन मीं पात्र तुमच्या कृपेने । अशा तळमळीवीण मी कांहीं नेणे ॥१४॥
प्रभो मी न माझा तुमचाची होवो । त्वदिच्छेप्रमाणे ही वृत्ती राहो ॥
असे हो कृपाळा तुम्हां वाहिलो मी । चरणारविंदार्पणमस्तु स्वामी ॥१५॥
॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥
No comments:
Post a Comment