Aug 18, 2022

श्रीहरिविजय - बलराम-श्रीकृष्ण जन्म कथा


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥


जय जय अनंतब्रह्मांडनायका । चतुराननाचिया निजजनका । चोघांसीही नव्हे आवांका । तुझें स्वरूप वर्णावया ॥
हे अनंतकोटी ब्रह्मांडनायका, ब्रह्मदेवाच्या जनका तुझ्या स्वरूपाचे वर्णन करतांना चारही वेद थकले. हे प्रभो, एक वेळ या पृथ्वीचे वजन, समुद्रातील जल, भूमीवरील तृणांकुर, आकाशाची भव्यता इत्यादिकांची गणती करता येईल, परंतु तुझे माहात्म्य कथन करणे कदापि शक्य नाही.
क्रूर कंसाने देवकीचे सहा गर्भ मारले, गाई-ब्राह्मणांस अपार कष्ट दिले, तेव्हां क्षीरसागरवासी भगवान श्रीविष्णू शेषास म्हणाले," आता आपण अवतार घेऊन दुष्टांचा निःपात करूं चला." अनंताचे ते वचन ऐकून शेष म्हणाला, " मी पूर्वावतारात सौमित्र होऊन फार कष्ट भोगिले, आता मी अवतार घेणार नाही. हे श्रीहरि, तुम्हीच अवतार घेऊन गाई ब्राह्मण, साधुजन यांचा प्रतिपाळ करावा." त्यावर रमाधव कौतुकाने त्याला म्हणाले, " तूं माझा प्राणसखा । समरभूमीचा पाठिराखा ॥ - मग मी तुझ्याशिवाय अवतार कसा घेऊ ? तरी तूं जाऊन माझा वडील बंधु, बळिभद्र होऊन देवकीच्या गर्भी जाऊन राहा, मी तुझी आज्ञा पाळीन. मी योगमायेसी लवलाहीं । पाठवितो तुजमागें ॥ कंसाने यापूर्वीच्या सर्व गर्भांना मारले असले तरी, तुला माझी योगमाया गोकुळांत नेऊन रोहिणीच्या गर्भात ठेवील. माया स्वतः यशोदेच्या पोटीं जाईल. मग मी मथुरापुरास देवकी-वसुदेव पुत्र म्हणून अवतार घेईन व उपजतांच गोकुळांत येईन. तिथे आपण दोघेजण, गोरक्षमिषें संपूर्ण । दैत्य तेथील संहारूं ॥. नारायणाचे हे बोलणे ऐकून संकर्षणाने त्यांना साष्टांग नमन केले आणि त्यांच्या आज्ञेनुसार देवकीच्या पोटी सातव्या गर्भात जाऊन राहिला. पुढे एके दिवशी वसुदेवास देवकी म्हणाली, " नाथ, मी यापूर्वी सहावेळा गर्भिणी झाले. परंतु या गर्भावस्थेतील माझे डोहाळे काही वेगळेच, नवलाईचे आहेत." वाटे पृथ्वी उचलीन । कीं आकाशा धीर देईन । सप्त समुद्र सांठवीन । नखाग्रीं मज वाटतसे ॥ हातीं घेऊन नांगर-मुसळ । मीच मर्दीन कंसदळ । दैत्य मारावे समूळ । मनामाजी वाटतसे ॥ पत्नीचे हे बोल ऐकून वसुदेव म्हणाला, " ईश्वराची करणी कोणास कळली आहे ? हे बालक तरी वांचून विजयी होवो, एव्हढीच माझी प्रार्थना आहे." लवकरच, देवकीस सातवा महिना लागला. एके रात्री ती निद्रिस्त असतांना, त्या श्रीहरिच्या मायाराणीनें एक अगम्य लीला केली. तंव ती हरीची योगमाया । तिची ब्रह्मांदिकां न कळे चर्या । तिनें देवकीचा गर्भ काढूनी । गोकुळासी पैं नेला ॥ गोकुळांत वसुदेवाची पत्नी रोहिणी कंसाच्या धाकानें नंदगृहांत लपून राहिली होती, ती निद्रिस्त असतां त्या योगमायेने देवकीचा गर्भ काढून तिच्या पोटांत नेऊन घातला. निजले ठायीं गर्भ । पोटांत घातला स्वयंभ । परम तेजस्वी सुप्रभ । सूर्य जैसा तेजस्वी ॥ रोहिणी जागी होताच ती सात महिन्यांची गर्भिणी आहे, याची तिला जाणीव झाली आणि ती चिंताग्रस्त झाली. ही वार्ता नंद-यशोदेस कळताच, तेही अचंबित झाले. इतक्यांत आकाशवाणी झाली की, “ रोहिणी, तू वृथा चिंता करूं नको, हा वसुदेवाचा गर्भ असून, पृथ्वीचा भार उतरण्याकरितां शेषाने अवतार घेतला आहे." ती देववाणी ऐकून सर्वच आनंदित झाले. अशा रीतीने, लोकापवाद सर्व हरला । चिंतेचा डाग धुतला । तों बळिराम जन्मला । नवमास भरतांचि ॥ नंदाने त्या बालकाचे जातक वर्तवून बळिभद्र असे नाव ठेविलें. तों यशोदा जाहली गरोदर । हरिमायेनें अवतार । तेथें घेतला तेधवां ॥ इकडे देवकी जागी झाली. आपल्या पोटांत गर्भ नाही, हे लक्षांत येताच ती अतिशय घाबरली आणि दुःखी स्वरांत वसुदेवास म्हणाली, " नाथा, गर्भ धरणीवर न पडतां पोटांत जिरून गेला." तिचे सांत्वन करीत वसुदेव तिला म्हणाला, " ईश्वराची करणी अगाध आहे. कंसाच्या धाकानें गर्भ कदाचित जिराला असेल !" ही बातमी कंसास कळतांच, त्याने सेवकांस आज्ञा केली, " आतां आठव्याची आठवण विसरू नका." - देवकी होतांचि गर्भिण । जागा नेत्रीं तेल घालून । आठव्याची आठवण । विसरूं नका सर्वथा ॥ देवकीच्या गर्भातील आठव्या बालकाचाच ध्यास कंसाला लागला. त्याला जिकडे तिकडे आठवा दिसू लागला. अर्थात्, आठव्यानें व्यापिलें त्यासी । दिवसनिशीं आठवा ॥ इकडे क्षीरसागरीं श्रीहरीने लक्ष्मीस आज्ञा केली की, तूं वैदर्भ देशांतील भीमक राजाचे पोटी अवतार घे. श्रीविष्णूंचे वचन ऐकून, तात्काळ चालली कमळजा । नमस्कारूनि हरीतें ॥ जगद्वंद्य श्रीविष्णू मथुरापट्टणांत देवकीच्या गर्भी येऊन राहतांच अपूर्व असे तेज तिच्या सभोवती दिसू लागले. पोटा आला विदेही हरी । देवकी नाहीं देहावरी । जनीं वनीं दिगंतरीं । अवघा मुरारी दिसतसे ॥ देवकीस आता सदैव अतीव सुखावस्थेची अनुभूती येऊ लागली. ते पाहून वसुदेव देवकीस म्हणाला, " तुला आपल्या आठव्या बाळाची चिंता वाटत नाही का?" त्यावर, देवकी भुजा पिटोनि बोले वचन । कंसास मारीन आपटोन । मुष्टिकचाणूरांचा प्राण । क्षणमात्रें घेईन मी ॥ हांक फोडोन गर्जे थोर । उतरीन पृथ्वीचा भार । करूनि दैत्यांचा संहार । बंदिशाळा फोडीन मी ॥ आणीं वेगें धनुष्यबाण । युद्ध करीन मी दारुण । जरासंध रथीं बांधोन । सत्रा वेळां आणीन मी ॥ भस्म करीन कालयवन । रचीन द्वारकापट्टण । सकळ नृपां शिक्षा लावून । पट्टराणी आणीन मी ॥ हांक फोडिली क्रोधें थोर । जिवें मारीन भौमासुर । निवटीन कौरवभार । निजभक्तकैवारें ॥ मी भक्तांचा सारथी होईन । दुष्ट सर्व संहारीन । मी ब्रह्मानंद परिपूर्ण । अवतरलों पृथ्वीवर ॥ देवकीचे हे आवेशपूर्ण बोल ऐकून वसुदेवास काळजी वाटू लागली. तिचे हे बोलणे कंसाच्या दूतांनी ऐकले तर अनर्थ होईल, अशी भीती त्याला वाटली. तो देवकीस समजावित म्हणाला, " देवकी ! आतां तू शांत राहा." तत्क्षणीं देवकी गर्जली, मी असें ब्रह्म सनातन । मीच सगुण मीच निर्गुण । देव दैत्य निर्मून ।कर्ता हर्ता मीचि पैं ॥ मी सर्वद्रष्टा अतींद्रिय । मी अज अव्यय निरामय । अजित अपार निष्क्रिय । आनंदमय वर्तें मी ॥ मी प्रळयकाळाचा शास्ता । मी आदिमायेचा नियंता । मी चहूं वाचांपरता । मायानिर्मिता मीच पैं ॥ असें बोलून देवकी स्तब्ध झाली. तोंच देवांनी आकाशात दुंदुभीचा गजर केला; भगवंत आता लवकरच अवतरेल असा विचार करून समस्त सुरवर मथुरेत गुप्तरूपाने आले आणि जय हरे नारायणा गोविंदा । इंदिरावर आनंदकंदा । सर्वेशा मुकुंदा परमानंदा । परमपुरुषा परज्ञा ॥ सर्वतीता सर्वज्ञा । गुणसागरा गुणज्ञा । आम्ही सकळ सुर तवाज्ञा । पाळोनियां राहतों ॥ अशी हस्त जोडून देवकीच्या गर्भाची स्तुति करून अंतर्धान पावले. कंसाला आता सतत आठव्याचाच ध्यास लागला होता. त्याने एका दासीस विचारले, " गर्भास किती महिने झाले ?" त्यावर दासीने नऊ महिन्यांस थोडाच अवधी आहे असे उत्तर दिले. तेव्हा, कंसासुर देवकीपुढे येऊन उभा राहिला, परंतु देवकीस अवघी सृष्टी कृष्णमय दिसत होती. परमानंदात तृप्त असलेल्या त्या देवकीस अणुमात्र चिंता नव्हती. तिला न्याहाळून पाहतांना त्या कंसाला अचानक तिथे तंव तें चतुर्भुज रूपडें । शंख-चक्रयुक्त दिसे ॥ न दिसे स्त्रियेची आकृती । परम देदीप्यमान विष्णुमूर्ती । आरक्तनेत्र सुदर्शन हातीं । ऊर्ध्व करूनि उभी असे ॥ त्याबरोबर कंसाच्या हातांतील शस्त्रे गळाली, अन त्याची बोबडी वळली आणि भयग्रस्त होऊन तो आपली सर्व शस्त्रें आपटू लागला. "आठव्यानें मज व्यापिलें । त्यासी मी गिळीन सगळें ।" असे रागारागांत बोलू लागला. यथावकाश श्रीकृष्णाचा जन्मकाळ जवळ आला असें जाणून आकाशांत देवांच्या विमानांची दाटी झाली. श्रावण वद्य अष्टमीस, बुधवारी रोहिणी नक्षत्र असतांना मध्यरात्री देवकी निद्रिस्त असतांना आठ वर्षांची चतुर्भुज मूर्ती तिच्यापुढे उभी राहिली. तोच देवकीने जागृत होऊन, बालकावरून जिवाचे लिंबलोण केले आणि म्हणाली, आनंद न माये अंबरीं । म्हणे भक्तवत्सला श्रीहरी । तूं माझिया निजोदरीं । पुत्र होवोनि अवतरें ॥ तेव्हा प्रसन्न होऊन श्रीहरी वदला, " मी पुन्हा बालक होतो, परंतु मला गोकुळांत घेऊन जावे. तेथे माझा ज्येष्ठ बंधु बळिभद्र आहे. तो आणि मी लवकरच तुमच्या दर्शनास येऊ." आणि आपल्या योगमायेने देवकीस मोहवून तो सच्चिदानंद घननीळ तिच्यापुढे बालक स्वरूपात प्रकट झाला. त्यावेळी त्या बंदिशाळेत असंभाव्य असे तेज प्रगटले. मग देवकीने वसुदेवास उठवले आणि तों हळूच बोले देवकी बोला । हा अयोनिसंभव पुतळा । यास नेऊन घाला गोकुळा । भय तुम्हांला कदा नाहीं ॥ तेव्हा, वसुदेव तिला म्हणाला," माझ्या पायांत बेड्या आहेत. बाहेर दारांत रक्षक असून सर्वत्र कुलपे लावलेली आहेत. त्यांत पर्जन्यामुळे यमुनेस पूरही आला आहे, यांतून मी बाहेर कसा जाऊं ? असा तो वसुदेव जाहला सद्गद । हृदयीं धरिला ब्रह्मानंद । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥ त्या मनमोहनाचे मुखकमल पाहताच त्याच्या पदीं शृंखला तुटून गेल्या. तो प्रकार पाहून वसुदेवास नवल वाटले. ज्यांचे करितांच स्मरण । भावबंधन निरसे पैं ॥हेच सर्वथा सत्य नव्हे काय ? मग तो वसुदेव, त्या बाळ श्रीकृष्णास घेऊन चालला, तो देवकीच्या नेत्रांतून आंसवांच्या धारा सुरू झाल्या. तेव्हां श्रीकृष्णाने आपल्या मातेकडे पाहून हास्यवदन केले. त्यावेळी श्रीकृष्णाने दरवाज्यांस पायांचा स्पर्श करितांच, सर्व द्वारे आपोआप उघडली. कंसाचे रक्षक निद्राधीन झाले. वसुदेव सत्वर गोकुळाकडे निघाला. वर्षती पर्जन्याच्या धारा । तों फणींद्र धांविन्नला त्वरा । विशाळ फणा ते अवसरा । कृष्णावरी उभारिला ॥ लवकरच तो यमुनातीरी पोहोचला, त्यावेळी यमुनेस महापूर आला होता तरी तो तसाच यमुनेच्या पाण्यात शिरला. जों जों उचली कृष्णातें । तों तों जीवन चढे वरुतें । स्पर्शावया जगज्जीवनातें । यमुनेतें आल्हाद ॥ अखेर वासुदेवाने, " हे कमळाधवा, वैकुंठपति माझे रक्षण करा." अशी प्रार्थना केली. मग कृष्णाने उजव्या पायानें यमुनेस स्पर्श केला; परमसुखें यमुना सवेग । तात्काळ जाहली दोन भाग । मग वसुदेव लवकरच नंदभुवनीं आला. इकडे त्याचवेळी यशोदा प्रसूत होऊन तिला कन्या झाली; ते योगमाया हरीची पूर्ण । तिनें निद्रिस्त केले सकळ जन । यशोदेशी न कळे वर्तमान । कन्यारत्‍न पुढें तें ॥ त्याचवेळी वसुदेव अंतर्गृही प्रवेशला आणि त्याने यशोदेजवळ श्रीकृष्णास ठेवून ती कन्या उचलून घेतली. कृष्णा ठेवूनि लवलाही । कन्या वेगें उचलिली । पुत्र ठेवूनि कन्या नेली । कोणासी न कळे गोकुळीं ॥ आणि मग तो वसुदेव तेच वेळीं । बंदिशाळे पातला ॥ तेव्हां दरवाजे पूर्ववत बंद झाले. सर्व सेवक पुनःश्च जागृत झाले. इकडे बंदिशाळेत ती कन्या रडूं लागली. तिचे रडणे ऐकून सेवकांनी देवकी प्रसूत झाल्याचे वर्तमान कंसास कळविले. त्याबरोबर कंस धावतच बंदिशाळेत आला आणि माझा आठवा अरी म्हणजे शत्रू कोठे आहे ? असे उच्च स्वरांत विचारू लागला. देवकी रडत विनवणी करत म्हणाली, " बंधुराया ! एवढा वध करूं नकोस रे!" पण तिचे बोलणे ऐकून न घेता त्या दुष्टाने तिच्या मांडीवरील बालकास ओढले. ते शिशु बालक, पुत्र किंवा कन्या आहे तेंही न पाहता रागाने त्याने शिळेवर आपटण्यासाठी गरगर फिरविले. तंव ते महाशक्ति झडकरी । गेली अंबरी निसटूनियां । सहस्र कडकडती चपला । तैसा प्रलय तेव्हां वर्तला ॥ हा अवचित प्रकार पाहून, " आपला वैरी हातातून गेला. " असे वाटून कंस भयभीत झाला. तेव्हां ती तेजस्वी शक्ति त्याला आकाशांत दिसली. कंस जंव वरतें पाहे । तंव ते महाशक्ति तळपत आहे । तेज अंबरीं न समाये । बोले काय कंसासी ॥ अरे मूढा दुराचारा । महामलिना खळा निष्ठुरा । तुझा वैरी पामरा । पृथ्वीवरी वाढतसे ॥ आणि ती अदृश्य झाली. त्या महाशक्तीची वाणी ऐकून कंसाचे मन भयभीत झाले. तो तावातावाने राजगृहात निघून गेला. वसुदेव-देवकी तटस्थ झाली. श्रीहरिचा आठवा अवतार भूतलावर अवतरला होता, श्रीकृष्णाचा जन्म झाला होता.

श्रीकृष्णार्पणमस्तु
॥ श्री गुरुदेव दत्त

No comments:

Post a Comment