Aug 24, 2022

श्रीगुरुचरितम् भक्तिरसामृत - १


श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥


ज्ञान, ऐश्वर्य, बल, तेज, वीर्य आणि वैराग्य आदि वैभवाने युक्त अशा विष्णु, शिव, गणेश, सूर्य, देवी (शक्ति) तसेच इंद्र, अग्नि (आदि) मूर्ति जे आपल्या मायेच्या सामर्थ्याने धारण करतात, पण तत्त्वतः जे अनादि आणि अनंत असतात ते सद्‌गुरु दत्तभगवान् नित्य माझ्या हृदयमंदिरी स्थित असो. मी श्री दत्तप्रभूंना भक्तिपूर्वक नमन करतो. 
दत्तात्रेय जन्मरहित, अनंत, निर्गुण, निरिच्छ, एकमेवाद्वितीय, अक्रिय परब्रह्म आहेत. त्यांनी आपल्या योगमायेने विराट पुरुषरूप धारण करून विश्व निर्माण केले. अनंत पाय आणि अनंत शिरे असलेले भगवंताचे ते दिव्य स्वरूप केवळ सिद्धपुरुष आपल्या ज्ञानचक्षूंनी पाहू शकतात. त्यांच्यापासूनच पातालादि लोकांचा विस्तार झाला आहे. हा मायाध्यक्ष ह्या अखिल चराचर सृष्टीचे सृजन करतो. संत आणि धर्म यांच्या रक्षणासाठी मनुष्यरूपाने अवतरलेल्या त्या भगवंताला सामान्य जन मात्र ओळखू शकत नाहीत.
स्वतःचेच दान करून आपले दत्त हे नाम सार्थक केलेला अनसूया आणि अत्रीचा हा पुत्र दत्तात्रेय साक्षात ईश्वरस्वरूप आहे. केवळ स्मरणमात्रेच संतुष्ट होणाऱ्या या परमानंदस्वरूप दत्तप्रभूंचे श्रद्धेने नित्य पूजन करावे. मानसपूजा ही सर्वथैव श्रेष्ठ मानली आहे. तेव्हा या अचिंत्य, अव्यक्त आणि लीलाविग्रही अशा या परमात्म्याने आपल्या भक्तांसाठी नरदेह धारण केला आहे, अशी कल्पना करावी. परमेश्वर हा शुद्ध भक्तीचा भुकेला आहे, त्यामुळे अनन्यभावानें - मनांत कुठलाही किंतु न आणता त्याचे पूजन करावे. 
श्री दत्तात्रेयांची मानसपूजा विविध उपचारांनी करता येते. इथे श्री टेम्ब्ये महाराजांनी षोडशोपचार पूजाविधी वर्णन केला आहे. 
प्रथमतः प्रार्थना करावी - हे भक्तवत्सला ही मानसपूजा आपण स्वीकारावी. श्री दत्तात्रेया आपण माझ्या चित्तात वास करावा.  
ध्यान - सिद्धासनस्थित खेचरी मुद्रेतील श्री दत्तप्रभूंची द्विभुज मूर्ती डोळ्यांसमोर आणावी. आपल्या भक्तांना, शरणागतांना अभय आणि शुभाशिष देण्यासाठी त्यांनी आपला एक हात वर केलेला आहे.  अशा त्या सद्‌गुरु श्रीदत्तांचे मी ध्यान करतो. 
आवाहन - श्रीदत्तात्रेयांना त्याच्या परिवारासह मी श्रद्धेने आणि भक्तीने आवाहन करतो. हे सर्वव्यापी दिगंबरा, आपण शीघ्र या ध्यानमूर्तीत यावे आणि माझी मानसपूजा स्वीकारावी अशी मी आपणांस प्रार्थना करीत आहे. 
आसन - हे दत्तप्रभू, मी आपल्यासाठी हे रत्नजडित असे सुवर्ण सिंहासन कल्पिलेले आहे. त्यावर विराजमान व्हावे. 
पाद्य - चंदन, कापूर आणि केशर यांनी युक्त अशा या सुवासिक, मधुर जलाने मी आपले हे दिव्य चरण धूत आहे. 
अर्घ्य - हे प्रभो, गंध, अक्षता, आणि बेल-तुलसी-शमी आदि विविध पर्ण व कमळ यांनी सुवासित असे हे सुवर्णपात्रांतील जल आपण ग्रहण करा. 
आचमन - हे श्रीपादा, आपल्या आचमनासाठी या सुवर्ण कलशातील हे मधुर जल मी आणले आहे. तुम्ही आचमन करून हा मधुपर्क घ्यावा, अशी मी प्रार्थना करीत आहे. .
स्नान - हे दत्तात्रेया, अनेक प्रकारच्या सुगंधित फुलांचे अर्कमिश्रित असे हे तेल आपल्या अंगाला लावून मी  पंचामृताने आणि अत्यंत पवित्र गंगोदकाने आपल्याला स्नान घालत आहे.
वस्त्र - हे दिगंबरा, स्नानोत्तर हे भगवे वस्त्र आणि मृगचर्म आपण धारण करावे. 
यज्ञोपवीत - हे जगदीशा, मी कल्पनेने केलेले हे नऊ तंतूंचे दिव्य यज्ञोपवीत धारण करावे.
गंधाक्षता - हे नरहरि, भस्म-मृत्तिका-कस्तूरी आणि केशरयुक्त चंदनाचे लेपन मी आपल्या सर्वांगास करत आहे. तदनंतर ह्या रत्नमय अक्षतांनी आपण अलंकृत व्हावे.
पुष्प - हे स्वामी दत्तराज, शमी, बिल्व आणि तुलसी यांच्या पानांनी आणि नानाविध सुगंधित पुष्पांनी मी मनोमन आपले पूजन करीत आहे.
धूप - लाख, अभ्रक, श्रीवास (वृकधूप), चंदन, अगरु आणि गुग्गुळ यांच्यापासून बनवलेला सुगंधी धूप मी जाळीत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा.
दीप - हे स्वयंप्रकाश प्रभो, गोघृतात भिजवलेल्या वातींनी प्रज्ज्वलित दीप आणि कापूर यांनी मी आपली आरती करत आहे.
नैवेद्य - हे अनसूयानंदना, या सुवर्णाच्या ताटांत मी आपणास ( मधुर, खारट, तिखट, कडू, आंबट आणि तुरट या ) षड्रसयुक्त पक्वान्ने वाढली आहेत. या भोजनाचा आपण स्वीकार करावा, अशी मी अभ्यर्थना करीत आहे. 
फल-तांबूल-दक्षिणा - हे अत्रितनया, भोजनोत्तर हात प्रक्षालन करून हे पुन्हा आचमन घ्यावे आणि ही मधुर फळे, विडा, आणि सुवर्ण दक्षिणा स्वीकारावी. 
आरती-प्रदक्षिणा - हे दत्ता, रत्नजडित नीरांजनाने मी आपली आरती करून नमन करतो आणि तुझ्या लीलांचे स्मरण करीत तुझ्याभोवती प्रदक्षिणाही करतो.
मंत्रपुष्प-राजोपचार - हे दयाळा, मंगल वाद्ये-वेदमंत्रघोषासहित ही पुष्पांजली आपल्या चरणीं अर्पण करतो. 
समर्पण - माझ्या आराध्य देवा, तू सर्वांतर्यामि आहेस. तुझ्याच कृपाप्रसादाने केलेल्या या मानसपूजेचा आपण स्वीकार करावा. तुझा वरदहस्त सतत माझ्या मस्तकी असावा.
विसर्जन - हे दत्तसखया, माझ्या हृदयमंदिरी आपण सदैव स्थित असावे. माझी भक्ती दिवसोंदिवस वृद्धिंगत व्हावी. तुझ्या कृपेला मी नेहेमीच पात्र ठरावे. हे देवाधिदेवा, तू मला हे वरदान दे.

श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु
॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त


No comments:

Post a Comment