॥ ॐ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
श्रीगजानना गौरीनंदना ज्ञानभास्करा नमोस्तुते । द्या स्फूर्ती दत्त-सुयश गाया कल्याणप्रद मजला ते ॥ मतिप्रदे शारदे मला दे नवप्रतिभेची चार फुले। श्रवता जे सत्काव्य सुमंगल जीवमात्र नादात डुले ॥ श्रीवामनगुरु झरू देत शिरावर मधुधारा तव करूणेच्या । तेणे माझ्या काव्यी फुलतील नवबागा कैवल्याच्या ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
विश्ववंद्य अवधूत निरंजन, श्रीदत्तात्रेय तुम्हीच ना । अनन्यभावे शरणागत मी, भवभयवारण तुम्हीच ना ॥१॥ युगायुगी निजभक्त रक्षणा, अवतरता प्रभु तुम्हीच ना । बालोन्मत्त पिशाच्चवृत्ती, धारण करता तुम्हीच ना ॥२॥ महासतीचे सत्व पाहण्या, भूवरी आला तुम्हीच ना । अत्रि-अनसूयाश्रमी प्रकटला, दत्त म्हणुनी तुम्हीच ना ॥३॥ नवनारायण सनाथ करूनी, गिरी उभविला तुम्हीच ना । मच्छिंद्रादि प्रवृत्त करूनी, मार्ग दाविला तुम्हीच ना ॥४॥ स्नान काशीपुरी, चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना । करूनी भिक्षा करवीरी, भोजन पांचाळेश्वरी तुम्हीच ना ॥५॥ कुरवपुरी आचमन, सुनिद्रा माहुरनगरी तुम्हीच ना । शांत समाधीमग्न निरंतर, गिरनारी प्रभू तुम्हीच ना ॥६॥ प्रथम दर्शनी विचित्र रूपे, भय दाखविले तुम्हीच ना । श्रद्धा पाहुनी दर्शन दिधले, कार्तवीर्या तुम्हीच ना ॥७॥ राज्य देऊनी सिद्धी दिधल्या, सहस्त्रार्जुना तुम्हीच ना । मस्ती त्याची शमल्यावरती, मुक्ति दिधली तुम्हीच ना ॥८॥ मदालसासुत अलर्क याच्या, भ्रमा निरसिले तुम्हीच ना । अंती त्यासी ज्ञान देऊनी, कृपे तारिले तुम्हीच ना ॥९॥ अवधूत बनुनी गुरू मानिले, चोवीस दत्ता तुम्हीच ना । एक एक गुण त्यांचा घेऊन, भक्त रक्षिले तुम्हीच ना ॥१०॥ आयुनृपाची सेवा बघुनी, प्रसन्न झाला तुम्हीच ना । नहुषासम सत्पुत्र देऊनी, तृप्त केले तुम्हीच ना ॥११॥ विष्णुदत्त कर्मठ मीमांसक, पंक्ति घेतला तुम्हीच ना । सकलशास्त्रगत मर्म कथुनी, पूर्ण केले तुम्हीच ना ॥१२॥ परशुराम माता सहगमनी विधी कथियला तुम्हीच ना । जमदग्नी-रेणुका गौरवून, देवत्व दिधले तुम्हीच ना ॥१३॥ सोमकीर्ति राजास कथियली, आन्हिककर्मे तुम्हीच ना । नित्यकर्म-सद्धर्म शिकवुनी, मार्गी लाविले तुम्हीच ना ॥१४॥ नामधारका दर्शनध्यासे, तळमळवियला तुम्हीच ना । आर्त प्रार्थना ऐकून त्याची, दर्शन दिधले तुम्हीच ना ॥१५॥ कली-ब्रह्मा संवाद कथियला सिद्धमुखातुनी तुम्हीच ना । कृत-त्रेता-द्वापार कलीते, साग्र वर्णिले तुम्हीच ना ॥१६॥ अंबरिषाकारणे प्रभुवरा जन्म घेतले तुम्हीच ना । कृपा कार्य हे महान करिता, भक्त तारिले तुम्हीच ना ॥१७॥ ज्ञान लोपले असे पाहुनी, तळमळला मनी तुम्हीच ना । गिरनाराहुनी थेट निघाला, जनउद्धारा तुम्हीच ना ॥१८॥ श्राद्धाचे दिनी भिक्षा केली, पीठापुरी तुम्हीच ना । अपळराज-सुमतीच्या पोटी, जन्म घेतला तुम्हीच ना ॥१९॥ अंध-पंगु बंधु उद्धरिले, मातेसाठी तुम्हीच ना । गोकर्ण क्षेत्री वास केला, श्रीपादवल्लभ तुम्हीच ना ॥२०॥ दशाननाची पाहुनी भक्ति, लिंगही दिधले तुम्हीच ना । गणेश हस्ते लिंग स्थापिले, गोकर्णासी तुम्हीच ना ॥२१॥ चांडाळणीच्या करे बिल्वदल, फेकियले प्रभु तुम्हीच ना । पतिता असुनी पवित्र केले, शिवरात्रीदिनी तुम्हीच ना ॥२२॥ मंदमती त्या शास्त्रीकुमारा, ज्ञानी केले तुम्हीच ना । त्याच्या आईस शनिप्रदोष हे, सुव्रत कथिले तुम्हीच ना ॥२३॥ रजकाच्या सेवेस तुष्टुनी, दिले राज्यपद तुम्हीच ना । कुरवपुरी राहुनी गुप्तरूप, भक्त रक्षिता तुम्हीच ना ॥२४॥ चोरा वधुनी भक्त रक्षिला, वल्लभेश द्विज तुम्हीच ना । त्याचे हातुनी समाराधना, करूनी घेतली तुम्हीच ना ॥२५॥ विप्रस्त्रियेच्या वचनी गुंतला, पीठापुरी तुम्हीच ना । अंबा-माधवपोटी जन्मला, करंजनगरी तुम्हीच ना ॥२६॥ जन्मताच ओंकार गर्जुनी, मौन पाळिले तुम्हीच ना । मौजिबंधनी वेदोच्चारणी, चकीत केले तुम्हीच ना ॥२७॥ कृष्णसरस्वती सद्गुरु करूनी, काशीस वसला तुम्हीच ना । रक्षण करण्या वैदिक धर्मा, दीक्षा दिधल्या तुम्हीच ना ॥२८॥ संचारूनी सर्वत्र पुनरपि, मातेस भेटला तुम्हीच ना । पोटशुळाची व्यथा हरविली, ब्रह्मेश्वरस्थळी तुम्हीच ना ॥२९॥ वासरक्षेत्री सायंदेवा, अनुग्रह दिधला तुम्हीच ना । यवनापासुनी रक्षण करूनी, अभयही दिधले तुम्हीच ना ॥३०॥ बालसरस्वती कृतार्थ केला, आश्रम देऊनी तुम्हीच ना । उपदेशुनी सद्धर्मरक्षणा, प्रवृत्त केले तुम्हीच ना ॥३१॥ गुरु माहात्म्यविन्मुख विप्राते, बोध पाजिला तुम्हीच ना । शिष्यासह केलात वास, वैजनाथ क्षेत्री तुम्हीच ना ॥३२॥ भिल्लवडीसी जिव्हा छेदण्या, भाग पाडिले तुम्हीच ना । औदुंबरी ज्ञानवंत केले, विप्रसुतासी तुम्हीच ना ॥३३॥ अमरापुरासी भिक्षा केली, सद्विजसदनी तुम्हीच ना । वेल उपटुनी हेमकुंभही, दिला स्वभक्ता तुम्हीच ना ॥३४॥ गंगानुज कृषिवल भक्ताची, त्रिस्थळी केली तुम्हीच ना । जनउद्धारा दीक्षा दिधली, नृसिंहक्षेत्री तुम्हीच ना ॥३५॥ पिशाच्चपीडा सहज दवडिली, शिरोळग्रामी तुम्हीच ना । विप्रस्त्रियेच्या भक्तिसाठी, सुपुत्र दिधले तुम्हीच ना ॥३६॥ शिरोळग्रामी मृतपुत्रासी जीवन दिधले तुम्हीच ना । मातेकडुनी औदुंबराची, सेवा घेतली तुम्हीच ना ॥३७॥ वांझ महिषिसी दुग्ध निर्मुनी, भिक्षा केली तुम्हीच ना । दैन्य नाशुनी श्रीमंत केले, त्या विप्रासी तुम्हीच ना ॥३८॥ राजानिर्मित मठी राहिला, गाणगापुरी तुम्हीच ना । अश्वत्थाच्या ब्रह्मराक्षसा, उद्धरिले गुरु तुम्हीच ना ॥३९॥ कुमसी ग्रामी शिबिकेमधुनी, मिरवित गेला तुम्हीच ना । संशयरूपी त्रिविक्रमासी, कृतार्थ केले तुम्हीच ना ॥४०॥ म्लेंच्छाईत उन्मत्त ब्राह्मणा, धडा शिकविला तुम्हीच ना । वादविवादी जिंकुनी त्यासी, राक्षस केले तुम्हीच ना ॥४१॥ चार वेद उपशाखासहिते कथन केले तुम्हीच ना । शूद्राकरवी वादामध्ये लज्जित केले तुम्हीच ना ॥४२॥ सात रेखा उलंघून त्यासी, ब्राह्मण केला तुम्हीच ना । भस्म लाविता स्मरणहि दिधले, गतजन्माचे, तुम्हीच ना ॥४३॥ त्रिविक्रमा कर्मविपाक सकल सांगितला प्रभु तुम्हीच ना । शूद्राकडुनी वाद जिंकुनी, गर्व जिरविला तुम्हीच ना ॥४४॥ त्रिविक्रम भारतीसी कथिला विभूतीमहिमा तुम्हीच ना । उद्धरिले वामदेवहस्ते, ब्रह्मराक्षसा तुम्हीच ना ॥४५॥ गोपीनाथसुत दत्तमृतासी, कृपे उठविले तुम्हीच ना । त्याच्या पत्नीस ज्ञान बोधुनी, उद्धरिले गुरु तुम्हीच ना ॥४६॥ अगस्तीबृहस्पती संवादाचे, मर्म कथियले तुम्हीच ना । स्त्रीधर्माची महती कथिली, पतिव्रतेसी तुम्हीच ना ॥४७॥ सहगमनविधी, विधवा धर्मही, वर्णन केला तुम्हीच ना । भस्म आणि रुद्राक्ष श्रेष्ठपण, कथिले दत्ता तुम्हीच ना ॥४८॥ वैश्यरूप घेऊनिया गेला, नंदीग्रामी तुम्हीच ना । महानंदेच्या भक्तिसाठी, गाव तारिले तुम्हीच ना ॥४९॥ रूद्राभिषेक, रूद्राध्याय-माहात्म्य कथिले तुम्हीच ना । राजकुमारा सजीव करूनी, धर्म पढविला तुम्हीच ना ॥५०॥ कच देवयानी आख्यानाचे, मर्म दाविले तुम्हीच ना । मंत्रशास्त्रा स्त्री अनाधिकारी, दाखविले गुरु तुम्हीच ना ॥५१॥ परान्नलोभी विप्र स्त्रीला, अद्दल घडविली तुम्हीच ना । श्वानशूकरासहित भोजन तिसी करविले तुम्हीच ना ॥५२॥ परान्न म्हणजे अशुद्ध याचे, मर्म पटविले तुम्हीच ना । गार्हस्थ्यधर्म कथुनी ब्राह्मणा, उद्धरिले प्रभु तुम्हीच ना ॥५३॥ अल्पशिधा घेऊनी आणिला, भास्कर ब्राह्मण तुम्हीच ना । तेव्हढ्यातहि चार सहस्रा, भोजन दिधले तुम्हीच ना ॥५४॥ वांझ स्त्रियेसी कुमार, कन्या दिधली, दत्ता तुम्हीच ना । अश्वत्थाची सेवा घडविली तिचे हातूनी, तुम्हीच ना ॥५५॥ नंदी नामक कुष्ठी ब्राह्मण, निर्मळ केला तुम्हीच ना । शुष्ककाष्ठ पल्लवित करूनी, नवल घडविले तुम्हीच ना ॥५६॥ सायंदेवाकडुनी घेतली अवघड सेवा तुम्हीच ना । गुरुसेवेचे निधान देऊनी कृतार्थ केला तुम्हीच ना ॥५७॥ काशीयात्रा विधान कथिले त्वष्ट्यालागी तुम्हीच ना । तीच कथा संपूर्ण कथियली सायंदेवा तुम्हीच ना ॥५८॥ कौंडिण्याचे हस्ते केले अनंत सुव्रत तुम्हीच ना । त्याही व्रताचे माहात्म्य कथिले सायंदेवा तुम्हीच ना ॥५९॥ गाणगापुराहून क्षणार्धे तंतुक नेला तुम्हीच ना । श्रीशैल्याची यात्रा करूनी, परत आणिला तुम्हीच ना ॥६०॥ कल्लेश्वर-मी एकच आहे, असे दाविले तुम्हीच ना । नरकेसरीसी ज्ञान देऊनी, उद्धरिले प्रभु तुम्हीच ना ॥६१॥ सात रूपे घेऊन गेला, सप्तग्रामी तुम्हीच ना । रूप आठवे घेऊन होता गाणगापुरी तुम्हीच ना ॥६२॥ भक्तिसाठी शेत कापिले, शूद्राकरवी तुम्हीच ना । प्रसन्न होऊनी त्यासी दिधले, धान्य अपरिमित तुम्हीच ना ॥६३॥ दाखविली प्रभु भीमेमधली, आठही तीर्थे तुम्हीच ना । त्या तीर्थांचा महिमा कथिला, श्रीगुरुदत्ता तुम्हीच ना ॥६४॥ बेदरनगरी राज्य दिधले, रजकसुभक्ता तुम्हीच ना । स्फोटकविकार निमित्त्य करूनी, दर्शन दिधले तुम्हीच ना ॥६५॥ कली मातला असे जाणुनी, गुप्त जाहला तुम्हीच ना । पुष्प आसनी बसुनी गेला, श्रीशैल्यासी तुम्हीच ना ॥६६॥ कर्दळीवनीचा करूनी बहाणा, गाणगापुरी तुम्हीच ना । निर्गुणचरणे दृश्य ठेऊनी, गुप्तमठी प्रभु तुम्हीच ना ॥६७॥ नृसिंहवाडी औदुंबरीहि वास्तव्य असे गुरु तुझेच ना । भीमा अमरजा संगमी रमला गाणगापुरी तुम्हीच ना ॥६८॥ स्वामी जनार्दन, एकनाथ, तरी कृतार्थ केले तुम्हीच ना । नाथसदनीचे चोपदार हो, श्रीगुरुदत्ता तुम्हीच ना ॥६९॥ दासोपंतागृही रंगला, परमानंदी तुम्हीच ना । माणिकप्रभु, श्रीसमर्थ स्वामी, टेंब्येस्वामी तुम्हीच ना ॥७०॥ मम गुरु वामन बनुनी जगती, अवतरला प्रभु तुम्हीच ना । कृतार्थ केले जीवन माझे चिन्मय दाते तुम्हीच ना ॥७१॥ तुम्हीच सद्गुरु, वामनमूर्ती सद्गुणकीर्ति तुम्हीच ना । दत्तसुता प्रवृत्त करूनी, सेवा घडविता तुम्हीच ना ॥७२॥ अनंतकोटी ब्रह्मांडनायका, दासा रक्षिता तुम्हीच ना । अनंत अपराध पोटी घालुनी, भक्त उद्धरिता तुम्हीच ना ॥७३॥ तुम्हीच ब्रह्मा, तुम्हीच विष्णु, श्रीशिवशंकर तुम्हीच ना । माझे तर सर्वस्वच तुम्ही, सुखप्रदाते तुम्हीच ना ॥७४॥ तुम्हीच माता पिताही तुम्ही, माझे सारे तुम्हीच ना । तुम्हावाचुनी शरण कुणाला जावे सांगा तुम्हीच ना ॥७५॥ कुरवपुरी मज चरण दाविले, कृष्णेमाजी तुम्हीच ना । दिले चरण मज, सर्वस्व दिले, माझे झाला तुम्हीच ना ॥७६॥ सर्व हरविले आणि बसविले, साम्राज्यपदी तुम्हीच ना । तुम्हीच ना - तुम्हीच ना - तुम्हीच ना - तुम्हीच ना ॥७७॥
॥ इति श्रीदत्तभावांजलीस्तोत्रम् समाप्तम् ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ॥
No comments:
Post a Comment