Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १४


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय एक खेर्डेगांवचा । रहिवासी मेहकर तालुक्याचा । बंडूतात्या नांवाचा । ब्राह्मण होता विबुध हो ॥१॥ हा बंडूतात्या ब्राह्मण । सदाचारसंपन्न । उदार होतें ज्याचें मन । गृहस्थाश्रम चालवी ॥२॥ या बंडूतात्या घरीं । पाहुणे येती वरच्यावरी । तो अवघ्यांची साच करी । सरबराई निजांगें ॥३॥ ऐसा क्रम चालला । संचय अवघा संपला । आली पाळी बिचार्‍याला । कर्ज काढणें साहूचें ॥४॥ घरदार पडलें गहाण । अगणित झालें तया ऋण । लोकांप्रती दावण्या वदन । लाज वाटूं लागली ॥५॥ तगादे करिती सावकार । शिपाई धाडून वरच्यावर । भागवण्यासी दोन प्रहर । अडचण पडूं लागली ॥६॥ कांता बोले टाकून । मुलें करिती अपमान । पत गेली उडून । उसने न कोणी देती हो ॥७॥ ऐशा तापें तापला । जीव द्याया तयार झाला । पैसा संपतां प्रपंचाला । कांहीं नसे किंमत ॥८॥ बंडूतात्या विचार करी । जीव कोठें देऊं तरी । अफू खाऊन मरूं जरी । तरी ती घ्याया पैसा नसे ॥९॥ यापेक्षां हिमालया । जावे वाटे जीव द्याया । आत्महत्येचा ते ठायां । दोषही ना लागेल ॥१०॥ ऐसा करूनि विचार । पडला घराच्या बाहेर । अखेरचा तो नमस्कार । केला त्यानें प्रपंचाला ॥११॥ बंडूतात्या म्हणे मनीं । हे दीनदयाळा चक्रपाणी । अवकृपा मजलागोनी । कां रे ऐसी केलीस ? ॥१२॥ तुझ्यावरी विश्वास माझा । पूर्ण होता अधोक्षजा । तूं रंकाचा करिसी राजा । ऐसें ऐकिलें पुराणीं ॥१३॥ ऐसें मनीं बोलला । तिकिट घ्याया लागला । तों एक भेटला । विप्र त्यासी स्टेशनांत ॥१४॥ आपल्या वर्‍हाड प्रातांत । श्रीगजानन महासंत । आहेत अवतरले सांप्रत । त्यांच्या दर्शना जाय तूं ॥१५॥ संतदर्शन आजवरी । वायां न गेलें भूमीवरी । उगीच त्रासून अंतरीं । भलतें कांहीं करूं नको ॥१६॥ ऐसें बोलतां ब्राह्मण । तात्या गेला गोंधळून । म्हणे हा मनुष्य कोण ? । अवचित मसी भेटला ॥१७॥ कांहीं असो शेगांवासी । जाऊन वंदूं समर्थांसी । ऐसें बोलून मानसीं । शेगांवासी पातला ॥१८॥ दर्शना गेला ब्राह्मण । तो महाराज वदले हांसून । कां रे देशी जाऊन प्राण । हिमालयासी बंडूतात्या ॥१९॥ अरे आत्महत्या करूं नये । हताश कदापि होऊं नये । प्रयत्न करण्या चुकूं नये । साध्य वस्तु साधण्यास ॥२०॥ जा आतां घरीं परत । राहूं नको लवही येथ । बापा तुझ्या मळ्यांत । आहे एक म्हसोबा ॥२१॥ त्या म्हसोबाच्या पूर्वेसी । बाभुळीच्या झाडापासी । खोदून पहा मेदिनीसी । दोन प्रहर रात्रीला ॥२२॥ काम जमीन खोदण्याचें । तूंच एकटा करी साचें । खालीं तीन फुटांचें । द्रव्य तुजला सांपडेल ॥२३॥ त्यांतून थोडें कर्जदारां । देऊनी ऋणमुक्त होई खरा । नको सोडूंस बायकापोरां । उसनें वैराग्य वाहूं नको ॥२४॥ ऐसे बोलतां गजानन । आनंदला तो ब्राह्मण । आला खेर्ड्यास परतून । राख पुसून अंगाची ॥२५॥ रात्रीचिया वेळेला । मळ्यांत म्हसोबापासी आला । बाभुळीखालीं लागला । जमीन खोदाया कारण ॥२६॥ तों तीन फुटांवर । लागली श्रोते घागर । एक तांब्याची साचार । वेळणी होती जिच्या मुखा ॥२७॥ त्या तांब्याच्या घागरींत । मोहरा सोन्याच्या चार शत । पडल्या त्याच्या दृष्टीप्रत । मग काय विचारितां ? ॥२८॥ त्याच द्रव्येंकरून । फेडिलें त्यानें अवघें ऋण । मळा होता पडला गहाण । तोही आणिला सोडवोनी ॥२९॥ घडी बसली प्रपंचाची । ही गजाननकृपेनें साची । वृत्ति बंडूतात्याची । गेली अती आनंदून ॥३०॥ बंडूतात्यास तैसें झालें । दुःखाचे ते दिवस सरलें । मग त्यानें पुढें केलें । येणे पाहा शेगांवा ॥३१॥ दानधर्म तेथे केला । मोठ्या प्रमाणामाजीं भला । गजाननाच्या पदीं झाला । लीन अनन्यभावानें ॥३२॥ तई महाराज वदले त्यासी । आम्हांस कां रे वंदिसी ? । ज्यानें दिला आहे तुसी । द्रव्यघट तो वंदी तया ॥३३॥ जन सुखाचे सोबती । निर्वाणीचा श्रीपती । त्याची सदैव करी भक्ती । तो न उपेक्षी कदा तुला ॥३४॥ ऐसा उपदेश ऐकिला । समर्थांसी वंदून भला । बंडूतात्या गांवास गेला । आपुल्या अती आनंदें ॥३५॥ एकेकाली सोमवती । पर्व आले निश्चिती । जी कां अमावस्या येती । सोमवारीं ती सोमवती हो ॥३६॥ या सोमवतीचें महिमान । पुराणांत केलें कथन । या दिवशीं नर्मदास्नान । अवश्य म्हणती करावे ॥३७॥ म्हणून शेगांवची मंडळी । नर्मदेस जाया तयार झाली । तयारी त्यांनी अवघी केली । पडशा वगैरे भरून ॥३८॥ मार्तंड पाटील, बंकटलाल । मारुती चंद्रभान, बजरंगलाल । यांनीं केला एक मेळ । ओंकारेश्वरी जाण्याचा ॥३९॥ बंकटलाल म्हणे अवघ्यांसी । आपण जातों नर्मदेसी । घेऊ सांगाते महाराजांसी । स्नान कराया नर्मदेचें ॥४०॥ चौघे मठामाजीं आलें । समर्थां विनवूं लागलें । ओंकारेश्वरी गुरुमाऊले । चला आमुच्या समवेत ॥४१॥ महाराज म्हणाले तयासी । आहे नर्मदा माझ्यापाशीं । उगीच त्रास द्यायासी । जाऊं कशाला तिला मग ? ॥४२॥ आतां पर्वाचें प्रयोजन । नाहीं राहिलें मजलागून । ऐसें ऐकतां चौघे जण । घट्ट धरिती पायांला ॥४३॥ कांही असो तेथवरी । चला आमुच्या बरोबरी । लगेच येऊं माघारी । स्नान करूनी नर्मदेचें ॥४४॥ समर्थ म्हणाले मी तेथ । आल्या होईल विपरीत । मग तुम्ही दोष मात्र । देऊं नये आम्हांला ॥४५॥ ऐसें मठांत बोलणें झालें । अवघें ओंकारेश्वरा आलें । पर्वासाठीं मिळाले । लोक तेथें अपार ॥४६॥ नर्मदेचे अवघे घाट । स्त्रीपुरुषांनीं भरलें दाट । मुंगीलाही नसे वाट । जाया हराच्या मंदिरीं ॥४७॥ पर्व संपेपर्यंत । अभिषेकाची मंदिरांत । गर्दी झाली अत्यंत । शब्द कोणाचा कोणा न कळे ॥४८॥ रम्यशा त्या ओंकारीं । समर्थांची बैसली स्वारी । पद्मासन घालूनी कांठावरी । त्या महानदी नर्मदेच्या ॥४९॥ चौघे दर्शन घेऊन आले । समर्था विनवूं लागले । आतां पाहिजे सोडिले । जाणें सडकेनें आपणा ॥५०॥ कां कीं भीड झाली फार । गाड्या मोडती वरचेवर । बैल गाडीचे बुजार । आहेत आपुल्या त्यांतूनी ॥५१॥ परत बसून गाडींत । जाणें न निर्भय वाटत । म्हणून या नावेंत । बसून जाऊं स्टेशनाला ॥५२॥ तुम्हांस वाटेल, तेच करा । आम्हां न कांहीं विचारा । मी वचनांत गुंतलो खरा । तुम्ही बसाल तेथें येऊं ॥५३॥ ऐसें समर्थ बोलले । त्यांच्यासवें नावेंत बैसलें । गर्दीतून जाऊं लागले । खेडीघाट स्टेशनाला ॥५४॥ तों नदींत मध्यंतरीं । नाव आदळली खडकावरी । फळी फुटून गेली सारी । तिच्या बुडाची एक हो ॥५५॥ छिद्र पडलें आरपार । येऊं लागलें आंत नीर । नावाड्यानें सत्वर । नदींत उड्या टाकिल्या ॥५६॥ परी महाराज निर्धास्त होते । ' गिनगिन गणांत बोते ' । ऐसें भजन मुखातें । चाललें होतें अखंड ॥५७॥ मार्तंड बजरंग मारुती । घाबरून गेले अती । उडूं लागली धडधडा छाती । बंकटलालाची विबुध हो ॥५८॥ चवघे समर्थां बोलले । आम्ही अपराधी आहों भले । आम्ही न तुमचे ऐकिले । शेगांवांत दयाळा ॥५९॥ ऐसें जो ते बोलतात । तों निम्म्यावरी पाण्यांत । नाव बुडाली लोटत लोटत । एक फर्लांग गेली हो ॥६०॥ कांठी लोक बोलती ऐसें । मेली हीं पांच माणसें । आतां यांचा भरवंसा नसे । अथांग पाणी नर्मदेला ॥६१॥ तई म्हणाले गजानन । नका होऊं हैराण । तुमच्या जीवालागून । धक्का न लावी नर्मदा ॥६२॥ ऐसें म्हणून स्तवन केलें । नर्मदेचें त्यांनी भले । हे चवघे बैसले । हात जोडून नावेंत ॥६३॥ श्लोक ( अनुष्टुप छंद ) नर्मदे मंगले देवी । रेवे अशुभनाशिनी । मंतु क्षमा करी यांचा । दयाळू होऊनी मनीं ॥ ऐसें स्तवन चाललें । तों आतील पाणी निघून गेलें । नर्मदेनें लाविलें । आपुल्या करांस त्या छिद्रा ॥६४॥ नाव श्रोते पहिल्यापरी । आली जलाचिया वरी । त्या नावेच्या बरोबरी । होती प्रत्यक्ष नर्मदा ॥६५॥ कोळीणीचा धरला वेष । मस्तकावरी कुरळ केश । भिजविले जियेच्या वस्त्रास । कंबरेपर्यंत जलानें ॥६६॥ नौका कांठास लागली । अवघ्यांनी ती पाहिली । आश्चर्यचकित मुद्रा केली । पाहून तळीच्या छिद्राला ॥६७॥ ही बाई होती म्हणून । आमुचे हे वांचले प्राण । बाई आपण कोठील कोण ? । हे कांहीं सांगा हो ॥६८॥ सोडा वस्त्र भिजलेलें । आम्ही नवें देतों भलें । तईं नर्मदेनें पहा केलें । ऐशा रीतीनें भाषण ॥६९॥ मी ओंकार कोळ्याची कन्यका । माझें नांव नर्मदा ऐका । आम्हां परिपाठ आहे देखा । ओलें वस्त्र नेसण्याचा ॥७०॥ मी ओलीच राहतें निरंतर । माझें रूप आहे नीर । ऐसें बोलून नमस्कार । करून गेली गजानना ॥७१॥ क्षणामाजी नाहीशी । झाली ती नर्मदेसी । वीज चमकून आकाशी । घनीं जैसी लीन होते ॥७२॥ तो पहातां प्रकार । चवघे आनंदले फार । कळला स्वामींचा अधिकार । नर्मदा आली दर्शना ॥७३॥ बंकट विचारी खोदून । समर्था ही स्त्री कोण ? । ते सांगावें फोडून । गुप्त कांहीं ठेवूं नका ॥७४॥ तईं महाराज वदले तत्त्वतां । तुम्ही जे कां विचारितां । तो कथिला आहे गाथा । नर्मदेनें तुम्हांस ॥७५॥ अरे ती प्रत्यक्ष नर्मदा । संशय तेथें न घ्यावा कदा । संकटामाजी देते सदा । हात ती आपुल्या भक्तातें ॥७६॥ म्हणून तिचा जयजयकार । करा मोठ्यानें एक वार । जय जय नर्मदे निरंतर । ऐसेंच रक्षण अंबे करी ॥७७॥ ऐसें ऐकतां वचन । बंकटलालादि चवघे जण । समर्थांचे दिव्य चरण । वंदूं लागलें क्षणक्षणां ॥७८॥ सदाशिव रंगनाथ वानवळे । एक्या गृहस्थासमवेत भलें । शेगांवांत येते झाले । महाराजांच्या दर्शना ॥७९॥ या सदाशिवाकारण । टोपण नांव तात्या जाण । हे माधवनाथाचे छात्रगण । चित्रकूटच्या होते हो ॥८०॥ सदाशिव आले शेगांवाला । जेव्हां श्रींच्या दर्शनाला । तेव्हां महाराज भोजनाला । बसले होते मठांत ॥८१॥ वानवळे येतांक्षणीं । महाराज बोलले मोठ्यांनीं । अरे नाथाच्या शिष्यालागुनी । बसवा आणून माझ्यापुढें ॥८२॥ त्यांचे गुरु माधवनाथ । गेले जेवून इतक्यांत । मठीं माझ्या समवेत । तों हे दोघे पातले ॥८३॥ आतां हे मागून आले । गुरु त्यांचे निघून गेले । विडा न घेतां भले । त्याची करू पूर्तता ॥८४॥ रीतिप्रमाणें सत्कार केला । वानवळ्याचा शेगांवाला । जातांना त्या निरोप दिला । समर्थांनीं येणे रीतिं ॥८५॥ तुम्ही माधवनाथाला । असेच जा भेटण्याला । त्यांचा येथें राहिला । विडा तो त्या द्यायास ॥८६॥ म्हणा " साथें भोजन हुआ । बिडा तुम्हारा याही रहा । तो आम्ही आणिला पाहा । नाथां तुम्हां द्यावयास " ॥८७॥ हें सारें बोलणें । ऐकलें त्या वानवळ्यानें । घेऊन विड्याची दोन पानें । गमन करिता जाहला ॥८८॥ माधवनाथा हकीकत । त्यानें कथिली इत्थंभूत । महाराज आपण शेगांवांत । आला होता कां ते दिनीं ? ॥८९॥ गजानन जे बोलले । तैसेंच आहे जाहलें । भोजनसमयीं त्यांनीं केलें । स्मरण माझें तीच भेट ॥९०॥ त्यांचा माझा एक प्राण । शरीरें ही मात्र भिन्न भिन्न । हें आहे खोल ज्ञान । तें न इतुक्यात कळें तुम्हां ॥९१॥ बरें झालें आणिला । आमुचा विडा तुम्हीं भला । जो होता राहिला । शेगांवी शिष्य हो ॥९२॥ पानें देता वानवळ्यांनीं । ती भक्षिली नाथांनी । खलबत्त्यांत कुटूनी । थोडा प्रसाद दिला त्याला ॥९३॥ संतभेटी होती कैसी । हें चांगदेवपासष्टीसी । सांगते झाले ज्ञानराशी । श्रीज्ञानेश्वर महाराज ॥९४॥ शेख महंमद श्रीगोंद्यांत । तुकाराम होतें देहूंत । आग लागतां मंडपाप्रत । देहूमाजीं कीर्तनाच्या ॥९५॥ ती शेख महंमदांनी । विझविली श्रीगोंद्यांत बैसूनी । हें महिपतींनीं लिहूनी । ठेविले भक्तिविजयांत ॥९६॥ जाऊन हळी खेड्यांत । विहिरींत बुडतां पाटीलसुत । वांचविलें देऊन हात । महाराज माणिकप्रभूंनीं ॥९७॥ योगी वाटेल तेथोनी । भेटे एकमेकां लागुनी । भेट ठायींच बैसोनी । होते त्याचें कौतुक हें ॥९८॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति चतुर्दशोध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १३


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय आतां श्रोते सावधान । बंकट, हरी, लक्ष्मण । विठू जगदेवादि मिळून । गेले वर्गणी जमवावया ॥१॥ भाविकांनीं वर्गणी दिली । कुत्सितांनीं कुटाळी केली । वर्गणीची कां हो पडली । जरुर तुमच्या साधूस्तव ॥२॥ ऐसें ऐकतां भाषण । जगदेव बोलला हांसोन । या भिक्षेचें कारण । आहे तुमच्या बर्‍यासाठीं ॥३॥ श्रीगजाननासाठीं । नको बांधणें मठमठीं । ह्या अवघ्या आटाआटी । तुमचें कल्याण व्हावयास ॥४॥ इच्छा ऐहिक वैभवाची । असते मानवांप्रति साची । ती आहे व्हावयाची । पूर्ण या पुण्यकृत्यानें ॥५॥ संतकार्यास कांहीं देतां । अगणित होतें सर्वथा । एक दाणा टाकितां । मेदिनीमाजीं कणीस होतें ॥६॥ त्या कणसास दाणे येती । एकाचेच बहुत होती । तीच पुण्याची आहे स्थिति । हें बुध हो विसरुं नका ॥७॥ ऐसें बोलतां साचार । कुटाळ झालो निरुत्तर । खरें तत्त्व असल्यावर । कुंठित गती तर्काची ॥८॥ असो मिळाल्या जागेवरी । कोट बांधिला सत्वरीं । झटूं लागले गांवकरी । मग वाण कशाची ? ॥९॥ बांधकाम कोटाचें । चालतां शेगांवीं साचें । दगड चुना रेतीचें । सामान गाड्या वाहती ॥१०॥ रेतीच्या गाडीवर स्वार झाले । समर्थ मध्यभागीं येऊन बसले । तेथेंच हल्लीं काम झालें । त्यांच्या भव्य समाधीचें ॥११॥ महाराज बसले ज्या ठिकाणीं । तीच यावी मेदिनी । मध्यभागा म्हणूनी । हें करणें भाग पडलें ॥१२॥ त्यासाठी म्हणून । अकरा गुंठे जास्त जाण । जमीन ती घेऊन । बांधकाम चालविलें ॥१३॥ पुढार्‍यांच्या होतें मनीं । वचन दिलें अधिकार्‍यांनीं । आणिक एक एकर तुम्हांलागुनी । काम पाहून जागा देऊं ॥१४॥ यास्तव केलें धाडस । अकरा गुंठे घेण्यास । परी तें गेलें विकोपास । एका दुष्टाच्या बातमीमुळें ॥१५॥ तेंव्हा हांसत हांसत पाटलाला । समर्थानें शब्द दिला । जागेबद्दल जो कां झाला । दंड, तुम्हा तो माफ होईल ॥१६॥ त्या तपास अधिकारी जोशाप्रती । समर्थानें दिली स्फूर्ती । चाललेल्या प्रकरणावरती । शेरा त्यांनीं मारिला ॥१७॥ कीं हा दंड झालेला । विनाकारण आहे भला । दंड ! गजानन संस्थेला । परत द्यावा म्हणून ॥१८॥ म्हणून दंड माफ केला । ऐसा हुकूम जेव्हां आला । तैं हरी पाटलाला । आनंद झाला विशेष ॥१९॥ समर्थवाक्य खोटें झालें । ऐसें कोणी न कधीं ऐकिलें । असो शेगांवाचे लागले । लोक भजनी स्वामींच्या ॥२०॥ आतां नव्या जागेंत आल्यावर । जे कांहीं घडलें प्रकार । म्हणजे समर्थांचे चमत्कार । ते आतां वर्णितों ॥२१॥ मेहेकरच्या सान्निध्याला । सवडद नामें ग्राम भला । त्या गांवींचा एक आला । गंगाभारती गोसावी ॥२२॥ यास होता महारोग । कुजून गेलें अवघें अंग । उरली न पडल्यावांचून भेग । जागा दोन्ही पायांला ॥२३॥ म्हणून गंगाभारती । त्या महारोगा त्रासला अती । समर्थांची ऐकोन कीर्ति । शेगांवासी पातला ॥२४॥ श्रोते, त्या गोसाव्याप्रत । लोक आडवूं लागले बहुत । तुला रक्तपिती आहे सत्य । तूं न जावें दर्शना ॥२५॥ महाराज दिसतील ऐशा ठायीं । उभा राहून दर्शन घेई । कधींही ना जवळ जाई । त्यांचे चरण धरावया ॥२६॥ परी एके दिनीं गंगाभारती । चुकवून अवघ्या लोकांप्रती । येता झाला सत्वर गती । प्रत्यक्ष दर्शन घ्यावया ॥२७॥ डोई ठेवितां पायावर । समर्थांनीं चापट थोर । मारिली त्याच्या डोक्यावर । अति जोरानें विबुध हो ॥२८॥ फडाफड मारिल्या मुखांत । आणिक वरती एक लाथ । खाकरोनी बेडक्याप्रत । थुंकले त्याच्या तनूवरी ॥२९॥ तो त्याने घेऊन करी । चोळून अवघ्या शरीरी । लाविता झाला मलमापरी । आपुल्या सर्व अंगास ॥३०॥ तो प्रकार पाहतां । एक कुटाळ तेथे होता । तो गोसाव्यासी बोलतां । झाला पाहा येणें रीति ॥३१॥ आधींच शरीर नासलें । तुझें आहे बापा भलें । त्यावरी यांनीं टाकिले । या अमंगळ बेडक्यातें ॥३२॥ तो तूं प्रसाद मानिला । अवघ्या अंगातें चोळिला । जा लावून साबणाला । धुवून टाकी सत्वर ॥३३॥ गोसावी तें ऐकतां । हसूं लागला सर्वथा । म्हणे तुम्ही येथेंच चुकतां । याचा करा विचार ॥३४॥ तुम्हां दिसला बेडका । तो हा प्रत्यक्ष मलम देखा । कस्तुरीच्या सारखा । सुवास येतो यालागीं ॥३५॥ तुम्हां संशय असल्यास । पहा माझ्या अंगास । हात लावूनिया खास । म्हणजे कळून येईल कीं ॥३६॥ तुझा त्यासी संबंध नव्हता । म्हणून बेडका दिसला तत्त्वतां । समर्थांची योग्यता । त्वां न मुळीं जाणिली ॥३७॥ त्याचें पहाण्या प्रत्यंतर । चाल जाऊं एकवार । स्नान केलेल्या जागेवर । वेळ आतां करुं नको ॥३८॥ समर्थ स्नान प्रतिदिवशीं । करतील ज्या जागेसी । तेथल्या ओल्या मातीसी । मी लावितों निजांगा ॥३९॥ ऐसा संवाद तेथें झाला । दोघे गेले स्नानस्थला । तो कुटाळासी आला । अनुभव गोसाव्यापरीच ॥४०॥ मृत्तिका स्नानस्थलाची । दोघांनींही घेतली साची । तों गोसाव्याच्या हातीं । बसली औषधी होऊन  ॥४१॥ कुटाळाच्या हातांत । ओलीच माती आली खचित्‌ । दुर्गंधीही किंचित्‌ । येत होती तियेला ॥४२॥ तो प्रकार पाहतांक्षणीं । कुटाळ घोटाळला मनीं । कुत्सित कल्पना सोडूनी । शरण गेला समर्था ॥४३॥ असो कोणी गोसाव्यातें । जवळ बसू देत नव्हते । हा दूर बसून भजनातें । करी स्वामीपुढें नित्य ॥४४॥ आवाज गंगाभारतीचा । पहाडी गोड मधुर साचा । अभ्यास होता गायनाचा । त्या गंगाभारतीला ॥४५॥ ऐसे पंधरा दिवस गेले । रोगाचें स्वरुप पालटलें । लालीनें तें सोडिलें । तयाचिया अंगाला ॥४६॥ चाफे झाले पूर्ववत्‌ । भेगा पदींच्या निमाल्या समस्त । दुर्गंधीचा मोडला त्वरित । ठाव त्याचा श्रोते हो ॥४७॥ गोसाव्याचें ऐकून भजन । होई संतुष्ट समर्थमन । प्रत्येक जिवाकारण । गायन हें आवडतें ॥४८॥ बायको गंगाभारतीची । अनसूया नांवाची । ती शेगांवीं आली साची । न्याया निज पतीला ॥४९॥ संतोषभारती कुमार । होता तिच्या बरोबर । येऊन पतीस जोडिले कर । चला आतां गांवातें ॥५०॥ तुमची व्याधी बरी झाली । ती मीं दृष्टीं पाहिली । समर्थ साक्षात्‌ चंद्रमौळी । आहेत हेंच खरें असे ॥५१॥ गंगाभारती म्हणे त्यावर । मला नका जोडू कर । आजपासून साचार । मी तुमचा खचित नाहीं ॥५२॥ ही अनाथांची माऊली । स्वामी गजानन येथें बसली । त्यांनी माझी उतरविली । धुंदी चापट मारुन ॥५३॥ राख लाविली अंगाप्रत । आणि चित्त तुझें संसारांत । केलीस विटंबना बहुत । या भगव्या वस्त्राची ॥५४॥ ऐसें संकेतें बोलले । थापटया मारुन जागें केलें । आतां डोळे उघडिले । संसाराचा संबंध नको ॥५५॥ मातोश्रीची करितां सेवा । तो प्रिय होतो वासुदेवा । म्हणोनि तुझ्या आईची करी सेवा हे संतोषभारती कुमारा ॥५६॥ मी येतां सवडदांत । पुन्हां रोग होईल पूर्ववत्‌ । म्हणून त्या आग्रहांत । तुम्हीं न पडावें दोघांनीं ॥५७॥ समर्थकृपेनें निश्चिती । झाली मला ही उपरती । या परमार्थखिरींत माती । टाकूं नका रे मोहाची ॥५८॥ ऐसें सांगून कुटुंबाला । मुलासह सवडदाला । दिले धाडून राहिला । आपण तसाच शेगांवी ॥५९॥ प्रत्यहीं तो अस्तमाना । एकतारा घेऊन जाणा । समर्थांच्या सन्निधाना । बैसून भजन करीतसे ॥६०॥ हा गंगाभारती बरा झाला । रोगाचा पत्ता मोडला । मलकापुरास पुढें गेला । गजाननाच्या आज्ञेनें ॥६१॥ असो एकदां पौषमासीं । झ्यामसिंग आला शेगांवासी । बोलतां झाला समर्थांसी । माझ्या गांवास चला हो ॥६२॥ झ्यामसिंगाबरोबर । मुंडगांवी आले साधुवर । दर्शना लोटले नारीनर । तो न आनंद वर्णवे ॥६३॥ झ्यामसिंगानें भंडारा । घातिला असे थोर खरा । मुंडगांव झाले गोदातीरा । दुसरें कीं हो पैठण ॥६४॥ आचारी लागले स्वैपांका । अर्धा स्वैंपाक झाला निका । तैं महाराज बोलले देखा । ऐसें झ्यामसिंगासी ॥६५॥ झ्यामसिंगा, आज चतुर्दशी । मुळींच आहे रिक्त तिथी । भोजनाच्या पंक्ती । पौर्णिमेला होऊं दे ॥६६॥ झ्यामसिंग बोलला यावर । स्वयंपाक झाला तयार । लोक जमले आहेत फार । आपला प्रसाद घ्यावया ॥६७॥ स्वामींनीं केलें बोलणें । तुझें व्यवहारदृष्टीनें । योग्य परी हें न माने । त्या जगदीश्वराला ॥६८॥ पंक्ती बसल्या भोजना । तों एकाएकी आकाश जाणा । भरुन आलें गर्जना । होऊं लागली मेघांची ॥६९॥ घटकेंत पाणी पाणी झालें । अन्न अवघें वाया गेलें । मग झ्यामसिंगानें विनविलें । महाराजास येणें रीतीं ॥७०॥ आतां महाराज उद्यां तरी । मुळीं न व्हावें आजच्या परी । हिरमुष्टी होऊन बसली खरी । अवघी मंडळी गुरुराया ॥७१॥ निवारा या पर्जन्याला । हा नव्हे पावसाळा । अगांतुक बेटा आला । आमचा नाश करावया ॥७२॥ तैं महाराज म्हणाले झ्यामसिंगा ! । ऐसा सचिंत होसी कां गा । तुला न उद्यां देईल दगा । हा पर्जन्य कधींही ॥७३॥ आतांच मी वारितों त्यासी । ऐसें बोलोन आकाशासी । पाहूं लागलें पुण्यराशी । तों आभाळ फांकलें ॥७४॥ मेघ क्षणांत निघून गेले । सर्व ठायीं ऊन पडलें । हें एका क्षणांत झालें । अगाध सत्ता संताची ॥७५॥ दुसरें दिवशीं पौर्णिमेला । थोर भंडारा पुन्हां झाला । तो नियम चालला । अजून त्या मुंडगांवी ॥७६॥ झ्यामसिंगानें आपुली । इस्टेट सर्व अर्पण केली । महाराजांचे चरणीं भली । त्या मुंडगांव ग्रामांत ॥७७॥ लोक त्या मुंडगांवांत । समर्थांचे झाले भक्त । पुंडलीक भोकरे म्हणूनी त्यांत । एक जवान पोर्‍या असे ॥७८॥ हा उकिरड्या नामक कुणब्याचा । पुत्र एकुलता एक साचा । भक्त झाला महाराजांचा । ऐन तारुण्यामाझारी ॥७९॥ हा पुंडलीक वद्य पक्षासी । करावया वारीसी । येत नियमें शेगांवासी । घ्याया दर्शन समर्थांचें ॥८०॥ असो एकदां वर्‍हाडांत । रोग ग्रंथिक सन्निपात । बळावला अत्यंत । गांव बाहेर पडले कीं ॥८१॥ त्या दुर्धर सांथीची स्वारी । आली पाहा मुंडगांवावरी । तों पुंडलीकाची आली वारी । शेगांवास निघाला ॥८२॥ कसकस त्याला घरीच आली । परी ती त्याने चोरिली । शेगांवाची वाट धरली । आपुल्या पित्यासमवेत ॥८३॥ येतां पांच कोसांवर । शरीरासी भरला ज्वर । एक पाऊल भूमीवर । तयाच्यानें टाकवेना ॥८४॥ गांठ उठली बगलेंत । हैराण झाला रस्त्यांत । ऐसें पाहून पुसें तात । कां रे पुंडलीका ऐसें करिशी ? ॥८५॥ पुंडलीक म्हणे बापाला । बाबा मशीं ताप आला । गोळा एक कांखेला । उठला आहे येधवा ॥८६॥ हे स्वामी दयाघना ! । वारीस खंड पाडी ना । दाव तुझ्या दिव्य चरणा । भक्तवत्सला कृपानिधी ॥८७॥ वारी सांग झाल्यावर । मग येऊं दे खुशाल ज्वर । जरी सांडले शरीर । तरी न त्याची पर्वा मला ॥८८॥ शरीरसामर्थ्य जोंवर । परमार्थ घडे तोंवर । बापही झाला चिंतातुर । ती मुलाची पाहून स्थिती ॥८९॥ उकिर्डा म्हणे पुत्रास । गाडीघोडे बसावयास । आणूं कां या समयास । तुला बाळा बसावया ॥९०॥ पुंडलीक वदे तयावरी । झाली पाहिजे पायींच वारी । उठत बसत कसें तरी । जाऊं चला शेगांवा ॥९१॥ मध्येंच मृत्यु आल्यास । शव तरी ने शेगांवास । नको करुं शोकास । हेंच आतां सांगणें ॥९२॥ बसत उठत पुंडलीक आला । अति कष्टें शेगांवाला । पाहून स्वामी समर्थाला । घातलें त्यानें दंडवत ॥९३॥ तों समर्थांनीं माव केली । एका हातानें दाबिली । कांख त्यांनींच आपुली । अति जोर करोनिया ॥९४॥ आणि केलें मधुरोत्तर । पुंडलिका !  तुझें गंडांतर टळलें आतां तिळभर । चिंता त्याची करुं नको ॥९५॥ तैसें महाराज वदतां क्षणीं । पुंडलीकाची गांठ जाणी । गेली जागच्या जागी जिरोनी । ताप तोही उतरला ॥९६॥ कंप अशक्‍ततेनें । राहिला देहाकारणें । करीं पुंडलीकाच्या मातेनें । आणिला नैवेद्य वाढून ॥९७॥ घांस त्या नैवेद्याचे । समर्थे घेतां दोन साचें । कांपरें तें पुंडलीकाचें । गेलें बंद होवोनिया ॥९८॥ पुंडलीक झाला पूर्ववत् । अशक्‍तता राहिली किंचित् । हें गुरुभक्‍तीचें फळ सत्य । उघडा डोळे अंधांनो ! ॥९९॥ गुरु योग्य असल्यावरी । वायां न जाई सेवा खरी । कामधेनु असल्या घरीं । कां न इच्छा पुरतील ? ॥१००॥ सांग करुन वारीला । पुंडलीक गेला मुंडगांवाला । हें जो चरित्र वाची भला । त्याचें टळेल गंडांतर ॥१०१॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति त्रयोदशोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १२


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो बच्चुलाल अग्रवाला । होता एक आकोल्याला । धन-कनक-संपन्न भला । मनाचाही उदार जो ॥१॥ त्यानें हकिकत कारंज्याची । म्हणजे लक्ष्मणपंत घुड्याची । कर्णोपकर्णी ऐकिली साची । तेणें साशंक जहाला ॥२॥ तें खरें खोटें पहाण्यास । विचार करी चित्तास । तों एके समयास । महाराज आले अकोल्याला ॥३॥ येऊन बच्चुलाला घरीं । बैसते झाले ओट्यावरी । कीं गजानन साक्षात्कारी । भक्त आपुला जाणून ॥४॥ बच्चुलाला आनंद झाला । तो समर्थांसी ऐसें वदला । आज गुरुराया वाटतें मला । आपली पूजा करावी ॥५॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थे तुकविलीं मान । जें साक्षात् असें चिन्ह । श्रोते संमती दिल्याचें ॥६॥ बच्चुलालानें तयारी । तात्काळ केली ओट्यावरी । षोडशोपचारे अत्यादरीं । पूजन त्यानें आरंभिलें ॥७॥ प्रथमतः घातलें मंगलस्नान । नानाविध उटणीं लावून । मग करविलें परिधान । वस्त्र पीतांबर जरीचा ॥८॥ शालजोडी अंगावरीं । बहुमोल घातली काश्मिरी । एक जरीचा रुमाल शिरीं । अभ्रेस्मी आणून बांधिला ॥९॥ गोफ घातिला गळ्यांत । सलकडीं तीं हातांत । कराच्या दाही बोटांत । मुद्रिका घातल्या नानापरी ॥१०॥ बहुमोल हिर्‍याची । वामकरी घातिली पौची । रत्नजडित कंठ्याची । कंठीं शोभा विशेष ॥११॥ जिलबी राघवदास पेढे । नैवेद्यास ठेविलें पुढें । त्रयोदश गुणी ठेविलें विडे । एक्या लहान तबकांत ॥१२॥ अष्टगंध अर्गजा अत्तर । सुवासिक लाविलें फार । त्यानें अवघ्या अंगभर । गुलाबपाणी शिंपडीलें ॥१३॥ एका सुवर्णाच्या ताटीं । दक्षिणा ठेविली शेवटीं । ती होती फार मोठी । रुपये होन मोहोरांची ॥१४॥ बेरीज करता दहा हजार । येईल ती साचार । ऐशी दक्षिणा होती थोर । किती वर्णन करूं तिचें ॥१५॥ श्रीफळ पुढें ठेवून । विनये केलें भाषण । महाराज माझें इच्छी मन । राममंदिर बांधावया ॥१६॥ या माझ्या ओट्यावरी । अडचण होतसे भारी । मंडप तो घातला जरी । उत्सवासी गुरुराया ॥१७॥ त्या माझ्या मनोरथा । पूर्ण करी ज्ञानवंता । ऐसे म्हणून ठेविला माथा । अनन्यभावें पायांवरी ॥१८॥ त्यावरी साधु गजानन । देते झाले आशीर्वचन । श्रीजानकीजीवन । तुझा करील पूर्ण हेतू ॥१९॥ असो, आज तूं हें काय केलें ? । मला पोळ्याचा बैल बनविलें । हे अलंकार घालून भलें । त्याचें काय कारण ? ॥२०॥ ऐसें म्हणून काढिले । दागिने अंगावरचे भले । चहूं बाजूंस फेकियले । वस्त्रांचीही तीच गती ॥२१॥ दोन पेढे खाऊन । निघून गेले गजानन । हा प्रकार अवलोकून । केला शोक अकोल्यांत बहुतांनीं ॥२२॥ त्यांत कांहीं कारंज्याचे । लोक हजर होते साचें । ते म्हणती आपुल्या वाचें । अभागी आमुचा लक्ष्मण ॥२३॥ त्यानें बच्चुलालापरी । पूजन केलें आपुल्या घरीं । परी कचरला अंतरीं । मोह धनाचा धरून ॥२४॥ हा बच्चुलाल धन्य धन्य । जैसें केलें भाषण । तैसेंच ठेविलें वर्तन । जवाहून न आगळें ॥२५॥ आतां याच्या वैभवाला । ओहोट हा ना शब्द उरला । संतकृपा झाली ज्याला । तो सुखीच राहातसे ॥२६॥ असो एक पितांबर नांवाचा । शिष्य शिंपी जातीचा । होता गजानन महाराजांचा । शेगांवीं मठामध्यें ॥२७॥ त्यानें सेवा बहुत केली । तपश्चर्या फळा आली । एके दिनीं ऐसी झालीं । गोष्ट ऐका मठांत ॥२८॥ फाटकें तुटकें धोतर । नेसला होता पितांबर । तें पाहून गुरूवर । ऐशा रीतीं बोलले ॥२९॥ अरे तुझें नांव पितांबर । नेसण्या न धडकें धोतर । ढुंगणास पाहाती नारीनर । तें तरी झांक वेड्या ! ॥३०॥ तेंच नेसून बैससी । ढुंगण जगाला दाविसी । हा घे दुपेटा देतो तुसी । नेसावयाकारणें ॥३१॥ पितांबरा दुपेटा नेसला । हें असह्य झालें इतरांना । भाऊच घातकी भावाला । होतो स्वार्थ दृष्टीनीं ॥३२॥ त्यापरीच होते येथें । त्यांच्या शिष्यमंडळींते । काहीं शिष्य पितांबरातें । टोचूं लागले निरर्थक ॥३३॥ हेंच कां तुझें शिष्यपण । वस्त्र करिसी परिधान । जें कां समर्थांकारण । ल्यावयाच्या उपयोगी ॥३४॥ तैं पितांबर म्हणाला । मी न गुरूचा अपमान केला । उलट मान ठेविला । आज्ञा ऐकून तयांची ॥३५॥ वस्त्र हें मज त्यांनीं दिलें । नेसावया सांगितलें । तेंच मी हो परिधान केलें । ही कां झाली अवज्ञा ? ॥३६॥ ऐसी भवति न भवति झाली । शिष्यांत तेढ माजली । ती मिटवावया माव केली । ऐशा रीतीं गजाननें ॥३७॥ पितांबरास म्हणती गुरुवर । तूं येथून जावें दूर । जाणतें मूल झाल्यावर । आई त्याला दूर ठेवी ॥३८॥ माझी कृपा आहे खरी । हे पितांबरा तुजवरी । जा हिंडून भूमीवरी । पदनतासी तारावें ॥३९॥ डोळ्यांत आसवें आणून । करूनिया साष्टांग नमन । मागे पाहें फिरफिरून । सोडून जातां मठासी ॥४०॥ पितांबर आला कोंडोलीसी । बसला वनांत आंब्यापासी । चिंतन चालले मानसी । निजगुरुचें सर्वदा ॥४१॥ तेथें होता रात्रभर । उदया येतां दिनकर । जाऊन बसला झाडावर । मुंगळ्यांचिया त्रासानें ॥४२॥ अवघ्या आम्रवृक्षावरी । मुंग्या मुंगळे होते भारी । लहान थोर फांद्यांवरी । आला पितांबर जाऊन ॥४३॥ परी निर्भय ऐसे सांपडेना । स्थान तयासी बसण्या जाणा । हेंच कृत्य गुराख्यांना । कौतुकास्पद वाटलें ॥४४॥ लहान सान फांदीला । निर्भयपणें फिरून आला । परी नाहीं खाली पडला । हेंच आहे आश्चर्य ! ॥४५॥ दुसरा म्हणाला यांत कांहीं । आश्चर्य वाटण्याजोगें नाहीं । श्रीगजाननाच्या शिष्यांठायीं । ऐसे सामर्थ्य असते रे ॥४६॥ यावरून हा त्यांचा । शिष्य असावा खचित साचा । चला हा येथ आल्याचा । वृत्तांत सांगू गांवात ॥४७॥ गोपमुखें वृत्त कळलें । कोंडोलीचे लोक आले । आम्रवृक्षापासीं भले । कोण आलें तें पहावया ॥४८॥ एक मनुष्य पुढे झाला । पितांबरासी पुसूं लागला । तूं कोण कोठील कशास आला ? । गुरू तुझा कोण असे ? ॥४९॥ पिंतांबर बोले त्यावर । मी शेगांवचा राहणार । मी शिंपी पितांबर । शिष्य गजानन स्वामींचा ॥५०॥ त्यांची आज्ञा मजलागून । करण्या झाली पर्यटन । म्हणून येथें येऊन । वृक्षापाशी बैसलो ॥५१॥ ऐसें ऐकतां तद्भाषण । लोक कोपले दारूण । अरे मोठ्याचें नांव सांगून । चेष्टा ऐशा करूं नको ॥५२॥ देशमुख त्या गांवींचा । शामराव नामें साचा । तो बोलला ऐसी वाचा । अरे सोंगाड्या ऐक हें ॥५३॥ स्वामी समर्थ गजानन । प्रत्यक्ष आहे भगवान । त्यांचें नांव सांगून । बट्टा त्यांना लावूं नको ॥५४॥ अरे वेड्या एक्या काळीं । त्यांनीं ऐसी कृति केली । ऋतु नसतां आणवलीं । फळें आम्रवृक्षाला ॥५५॥ त्यांनीं फळें आणवली । तूं नुसतीं पानें आण भलीं । नाहीं तरी या स्थलीं । तुझी न धडगत लागेल ! ॥५६॥ हा बळीराम पाटलाचा । वृक्ष वठलेला आंब्याचा । तो पर्णयुक्त करी साचा । आमच्या देखत ये काळीं ॥५७॥ नको करूं उशीर । हा आंबा करी हिरवागार । तें ऐकतां पितांबर । गेला असे घाबरून ॥५८॥ बोलला ऐसें नाडूं नका । माझी सारी कथा ऐका । एका खाणींत निघती देखा । हिरे आणि गारा हो ॥५९॥ गारेवरून खाणीस । नाही येत जगीं दोष । मी निज गुरूच्या नांवास । चोरून कैसें ठेवावें ? ॥६०॥ शामराव म्हणे त्यावर । नको करूं चरचर । संकट शिष्यांस पडता थोर । ते धांवा करिती सद्‌गुरुंचा ॥६१॥ मग तो शिष्य त्यांचा जरी । नसला कृतीनें अधिकारी । तरी सद्‌गुरुंचा प्रभाव करी । साह्य त्या आपुल्या शिष्यास ॥६२॥ निरुपाय होऊनी अखेर । पितांबरानें जोडिले कर । स्तवन मांडिलें अपार । आपुल्या सद्‌गुरुरायांचें ॥६३॥ हे स्वामी समर्थ गजानना ! । ज्ञानांबरीच्या नारायणा । पदनताच्या रक्षणा । धांव आतां ये काळीं ॥६४॥ माझ्यामुळें दोष तुला । येऊं पहातो भक्तपाला । आपुल्या ब्रीदासाठी पाला । आणीव आम्रवृक्षासी ॥६५॥ आतां न माझा अंत पाही । गुरुराया ! धांव घेई । या वठलेल्या वृक्षाठायीं । आणी पर्णे कोमल ॥६६॥ लोकांस म्हणे पीतांबर । करा सद्‌गुरुंचा नामगजर । जय जय गजानन साधुवर । शेगांवच्या अवलिया ॥६७॥ लोक अवघे गजर करिती । तों पालवी फुटली वृक्षाप्रती । जन नयनी पाहती । त्या अगाध कौतुकाला ॥६८॥ काही चिमटे घेऊन पाहाती । तों निमाली स्वप्नभ्रांति । यावरी कोणी ऐसे म्हणती । ही नजरबंदी असेल ! ॥६९॥ तोही भ्रम निमाला । तोडून पहातां पर्णाला । फांदीवाटें तात्काळ आला । चीक शुभ्रसा बाहेर ॥७०॥ मग मात्र खात्री झाली । वाळल्या वृक्षा पालवी फुटली । श्रीगजानन माऊली । खरीच आहे महासंत ॥७१॥ आतां पितांबराविशीं । शंका न धरणें मानसीं । चला घेऊन गांवासी । हा त्यांचा शिष्य असे ॥७२॥ याच्यायोगें करून । कधीं तरी गजानन । येतील कोंडोलीकारण । वांसरासाठीं गाय जैसी ॥७३॥ तें अवघ्यांसी मानवलें । पितांबरासी मिरवीत नेलें । ऐसें जेव्हां दिव्य झालें । तेंव्हा भाव उदेला ॥७४॥ श्रोते अजूनपर्यंत । तो आंबा आहे कोंडोलीत । इतरांपेक्षां असंख्यांत । फळे येती तयाला ॥७५॥ मठ पितांबराचा । कोंडोलींत झाला साचा । आणि अंतही तयाचा । ते ठायीं झाला हो ॥७६॥ आतां इकडे शेगांवांत । महाराज आपुल्या मठांत । एके दिनीं उद्विग्न चित्त । होऊनिया बैसले ॥७७॥ शिष्य त्यांचें कारण । पुसूं लागलें कर जोडून । महाराज आपुलें मन । कां हो अस्थिर जाहलें ? ॥७८तैं महाराज वाणी निघाली । तुमच्या गांवांत आहे दुफळी । मला कोणाची जागा मुळीं । नको येथें रहावया ॥७९॥ जी कोणाची नसेल । ऐसी जागा जरी द्याल । तरीच राहणें होईल । माझें या शेगांवीं ॥८०॥ ऐसी गोष्ट ऐकिली । तेव्हां मंडळीं चिंतावली । समर्थांनीं आज्ञा केली । मोठ्या पेंचाची आपणां ॥८१॥ कोणाच्या जागेंत । राहाण्या तयार नाहींत । सरकार यांच्या प्रीत्यर्थ । जागा ती देईल कशी ? ॥८२॥ समर्थें केलें भाषण । काय हें तुमचें अज्ञान । जमिनीची मालकी पूर्ण । आहे सच्चिदानंदाची ॥८३॥ जागा मिळेल प्रयत्न करितां । पुढें नका बोलूं आतां । हरी पाटलाच्या हातां । यश येईल निःसंशय ॥८४॥ हरी पाटलाकडे आली । मंडळी ती अवघी भली । त्याच्या सल्ल्यानें मागितली । जागा अर्ज करून ॥८५॥ बुलढाण्याचा सर्वाधिकारी । साहेब होता नामें ' करी ' । त्यानें एक एकर जागा खरी । अर्जावरून दिली असे ॥८६॥ आणि ऐसें म्हणाला । तुम्ही दोन एकरास्तव अर्ज केला । परी मी तूर्त तुम्हांला । एक एकर देतसे ॥८७॥ तुम्ही एक वर्षात । जागा केल्या व्यवस्थित । तुमचा मी पुरवीन हेत । जागा आणिक देऊनिया ॥८८॥ मग हरी पाटील, बंकटलाला । निघते झाले वर्गणीला । द्रव्यनिधी क्षणांत जमला । आणि काम झाले सुरूं ॥८९॥ विठू पाटील डोंगरगांवचा । लक्ष्मण पाटील वाडेगांवचा । जगु आबा शेगांवचा । हे पुढारी वर्गणीचे ॥९० हा गजाननविजय नामें ग्रंथ । ऐका श्रोते सावचित्त । सत्पुरुषाचा पुरविण्यात हेत । देव राहे तत्पर सदा ॥९१शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ११


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय बाळकृष्णाच्या सदनासी । समर्थ आले दुसरे वर्षी । त्या बाळापुरासी । दासनवमीकारणें ॥१॥ या वेळीं बरोबर । होते पाटील भास्कर । बाळाभाऊ, पितांबर । गणू, जगदेव, दिंडोकार ॥२॥ उत्सव दासनवमीचा । सांग झाला तेथ साचा । दैवयोग भास्कराचा । तेथेंच आला ओढवून ॥३॥ एक कुत्रें पिसाळलेलें । भास्करा येऊन चावलें । तेणें लोक इतर भ्याले । म्हणती आतां हा पिसाळेल ॥४॥ भास्कर म्हणे ते अवसरीं । वैद्याची ना जरुर खरी । माझा डॉक्टर आसनावरी । बैसला आहे गजानन ॥५॥ त्याचकडे मजला न्यावें । वृत्त अवघें कळवावें । ते सांगतील तें ऐकावें । आपला हेका करुं नका ॥६॥ गजाननाचे समोर । आणिला पाटील भास्कर । बाळाभाऊनें समाचार । अवघा समर्थांस श्रुत केला ॥७॥ तो अवघा ऐकून । महाराज वदले हासून । हत्या, वैर आणि ऋण । हें कोणासी चुकेना ॥८॥ हें कुत्रें निमित्त झालें । तुझें आयुष्य मुळींच सरलें । आतां पाहिजे प्रयाण केलें । तूं या सोडून मृत्यूलोकां ॥९॥ पूर्वजन्मीचें उर्वरित । भास्कराचें न उरलें सत्य । तो अवघ्यापून झाला मुक्त । मोक्षास जायाकारणें ॥१०॥ आतां मी इतकेंच करितों । दोन महिने वांचवितों । याला न पिसाळूं देतों । श्वानविषापासून ॥११॥ तें न मीं केलें जरी । हा जन्मास येईल पुन्हां परी । दोन महिने भूमिवरी । उरलें आयुष्य भोगावया ॥१२॥ भास्कर बोले त्यावरी । मी अजाण सर्वतोपरी । जें असेल अंतरीं । आपुल्या तेंच करावें ॥१३॥ ऐसें ऐकतां भाषण । संतोषले गजानन । खर्‍याप्रती समाधान । खरें बोलतां होतसे ॥१४॥ ऐसें ज्ञान ऐकिलें । तें कित्येकांस नाहीं पटलें । मात्र बाळाभाऊ आनंदले । त्या बोधातें ऐकुनी ॥१५॥ भास्करा, तूं धन्य धन्य । संतसेवा केलीस पूर्ण । चुकलें तुझें जन्ममरण । काय योग्यता वानूं तुझी ? ॥१६॥ ऐसा प्रकार झाल्यावरी । मंडळी आली शेगांवनगरीं । भास्कर बोले मधुरोत्तरीं । महाराजांच्या भक्तगणां ॥१७॥ बाळापूरची हकीकत । सांगे प्रत्येका इत्थंभूत । माझी विनंती जोडून हात । हीच तुम्हां भास्कर म्हणे ॥१८॥ महाराज लाधलें शेगांवा । याचा विचार करावा । या कीर्तीचा अमोल ठेवा । सांभाळा स्मारक करुन ॥१९॥ त्यांना स्मारकाची जरुर नाहीं । ते पुढीलांसाठीं पाही । तें स्मारक साक्षी देई । त्यांच्या अमोल साधुत्वाची ॥२०॥ संतसेवा कधींही । अनाठायीं जाणार नाहीं । इच्छा जयाची ज्या ज्या होई । ती ती संत पुरविती ॥२१॥ ऐसेंच स्मारक करण्याची । शपथ वाहा समर्थांची । ही विनंती अखेरची । माझी ती मान्य करा ॥२२॥ तें अवघ्यांनीं कबूल केलें । भास्कराचें स्थिरावलें । यायोगें तें चित्त भलें । रुखरुख मनाची संपली ॥२३॥ उत्तरोत्तर आनंदवृत्ती । भास्कराची वाढत होती । जैसीं लेंकुरें आनंदती । पुढील सणाच्या आशेनें ॥२४॥ माघ वद्य त्रयोदशीस । महाराज वदले भास्करास । चाल त्र्यंबकेश्वरास । जाऊं आपण शिवरात्रीला ॥२५॥ तो त्र्यंबकराजा कर्पूरगौर । भवभवांतक भवानीवर । जो आहे झाला स्थिर । गोदावरीच्या तटातें ॥२६॥ त्या ब्रह्मगिरीवर स्थित । आहेत पहा गहिनीनाथ । ज्यांना आहेत अवगत । गुणधर्म औषधींचे ॥२७॥ भास्कर म्हणे गुरुनाथा । आतां औषधी कशाकरतां ? । तुमची आहे अगाध सत्ता । औषधीहून आगळी ॥२८॥ आपुल्या कृपेनें भलें । विष बाळापुरींच निमालें । आयुष्याचे आहेत उरले । दोन महिनेच आतां कीं ॥२९॥ गोदावरी तुमचे चरण । तेथेंच मी करी स्नान । अन्य तीर्थांचें प्रयोजन । मला न आतां राहिलें ॥३०॥ ऐसी ऐकतां त्याची वाणी । समर्थ वदले हांसोनी । हें जरी खरें जाणी । तरी तीर्थमहिमा मानावा ॥३१॥ चाल नको करुं उशीर । पाहूं तो त्र्यंबकेश्वर । बाळाभाऊ, पितांबर । यांसही घे बरोबरी ॥३२॥ मग ती मंडळी निघाली । शेगांवाहून भलीं । शिवरात्रीस येती झाली । त्र्यंबकेश्वराकारणें ॥३३॥ कुशावर्ती केलें स्नान । घेतलें हराचें दर्शन । गंगाद्वारां जाऊन । पूजन केलें गौतमीचें ॥३४॥ वंदिली माय निलांबिका । तेवीं गहिनीनाथ देखा । तेथून आले नाशिका । गोपाळदासास भेटावया ॥३५॥ गोपाळदासास आनंद झाला । बोलले जवळच्या मंडळीला । आज माझा बंधु आला । वर्‍हाडांतून गजानन ॥३६॥ नारळ आणि खडीसाखर । ठेविली स्वामींसमोर । ती पाहून गुरुवर । ऐसें बोलले भास्कराला ॥३७॥ माझें येथील काम झालें । आतां नाशकाचें राहिलें । म्हणून पाहिजे तेथें गेले । धुमाळ वकीलाच्या घरा ॥३८॥ तेथें राहून कांहीं दिवस । महाराज आले शेगांवास । तो अडगांवीं नेण्यास । झ्यामसिंग पातला ॥३९॥ त्यानें आग्रह केला फार । समर्थें दिलें उत्तर । रामनवमी झाल्यावर । येऊं आम्ही अडगांवा ॥४०॥ तो आला तैसा परत गेला । आपुल्या त्या अडगांवाला । पुन्हां श्रोते येतां झाला । रामनवमीस शेगांवीं ॥४१॥ उत्सव करुन शेगांवांत । समर्थांना शिष्यांसहित । आला घेऊन अडगांवांत । हनुमानजयंतीकारणें ॥४२॥ अडगांवीं असतां समर्थस्वारी । चमत्कार झाले नानापरी । एके दिवशीं दोन प्रहरीं । भास्कर लोळविला फुपाट्यांत ॥४३॥ छातीवरी बैसून । भास्करा केलें ताडन । लोक पहाती दुरुन । परी जवळी कोणी जाईना ॥४४॥ बाळाभाऊ जवळ होता । तो म्हणाला सद्‌गुरुनाथा । भास्करासी सोडा आतां । बेजार झाला उन्हानें ॥४५॥ तैं म्हणाला भास्कर । बाळाभाऊ न जोडा कर । माझा हा साक्षात् ईश्वर । काय करील तें करुं दे ॥४६॥ लोकांसी वाटती चापटया दिल्या । मला होतात गुदगुल्या । अनुभवाच्या गोष्टी भल्या । अनुभवीच जाणती ॥४७॥ पुढें घेऊन भास्करासी । महाराज आले बिर्‍हाडासी । त्या अडगांव ग्रामासी । उतरलेल्या ठिकाणास ॥४८॥ बाळाभाऊस बोलले । अवघे आतां दोन उरले । भास्कराचे दिवस भले । पंचमीला जाईल तो ॥४९॥ तुजला या भास्करानीं । मारविलें होतें छत्रीनीं । शेगांवीं माझ्या करांनीं । तें आहे कां ध्यानांत ? ॥५०॥ तें क्रियमाण नासावया । त्यास मारिलें ये ठायां । ह्या एकाच गोष्टीवांचूनिया । अन्य नव्हता हेत कांहीं ॥५१॥ उत्सवाचा काला झाला । वद्य पंचमी दिवस आला । एक प्रहर दिवसाला । समर्थ म्हणती भास्करासी ॥५२॥ भास्करा तुझें प्रयाण । आज दिवशीं आहे जाण । पद्मासन घालून । पूर्वाभिमुख बैसावें ॥५३॥ चित्त अवघें स्थिर करी । चित्तीं सांठवावा हरी । वेळ आली जवळ खरी । आतां सावध असावें ॥५४॥ इतर जनांकारण । म्हणूं लागले करा भजन । "विठ्ठल विठ्ठल नारायण" । ऐसें उच्च स्वरानें ॥५५॥ हा तुमचा बंधु भला । जातो आज वैकुंठाला । त्याच्या करा पूजनाला । माळबुक्का वाहून ॥५६॥ भास्करें घातलें पद्मासन । नासाग्रीं दृष्टि ठेवून । वृत्ति अवघ्या केल्या लीन । अंतर्मुख होऊनियां ॥५७॥ भजन झालें एक प्रहर । माध्यान्हीस आला दिनकर । महाराजांनीं ’ हरहर ’ । शब्द केला मोठयानें ॥५८॥ त्यासरसा प्राण गेला । भास्कराचा वैकुंठाला । संतांनीं हातीं धरिलें ज्याला । तो पाहुणा हरीचा ॥५९॥ लोक पुसती महाराजांस । कोठें करणें समाधीस । या भास्कराच्या शरीरास । कोठें न्यावें ठेवावया ? ॥६०॥ समर्थ अवघ्यांस सांगती । द्वारकेश्वर जो पशुपती । ज्याच्या सन्निध आहे सती । तेथे ठेवा भास्कराला ॥६१॥ सांगविधि समाधीचा । ते ठायीं झाला साचा । लोक म्हणती महाराजांचा । परमभक्त गेला हो ॥६२॥ दुसरे दिवसापासून । समाधीच्या सन्निध जाण । होऊं लागलें अन्नदान । गोरगरीबांकारणें ॥६३॥ दहा दिवस अन्नदान । झालें याचें वर्णन । तुम्ही नुकतेंच केलें श्रवण । संतभंडारा नांव ज्याचें ॥६४॥ चिंचवृक्षांच्या सावलींत । जेवाया बसे पंगत । तयीं कावळे अतोनात । त्रास देऊं लागले ॥६५॥ काव काव ऐसें करिती । द्रोण पात्रींचे उचलून नेती । मलोत्सर्ग तोही करिती । जेवणारांच्या अंगावर ॥६६॥ त्या योगें लोक त्रासले । कावळ्यांस हाकूं लागले । भिल्लांनीं ते तयार केले । तीरकमटे त्या मारावया ॥६७॥ तईं बोलले गजानन । अवघ्या लोकांलागून । नका मारुं त्याकारण । अपराध त्यांचा कांहीं नसे ॥६८॥ या भंडार्‍यांत येण्याचा । हेतु इतकाच आहे त्यांचा । प्रसाद आपणा भास्कराचा । इतरांपरीच मिळावा ॥६९॥ आत्मा या भास्कराचा । मुळींच मुक्त झाला साचा । तो पाहुणा वैकुंठीचा । झाला आहे येधवां ॥७०॥ जयाला न ऐसी गती । त्याच्यासाठीं पिंड देती । कावळ्यांची वाट पाहाती । पिंड ठेवून कलशावर ॥७१॥ म्हणून कावळे रागावले । त्यांनीं हें जाणीतलें । भास्करानें गमन केलें । एकदम वैकुंठ लोकाला ॥७२॥ म्हणून आम्हां प्रसाद त्यांचा । मिळूं द्या या भंडार्‍याचा । ऐसा विचार कावळ्यांचा । दिसतो या कृतीनें ॥७३॥ तुम्ही त्यांस मारुं नका । मीच तया सांगतों देखा । अहो जिवांनो माझें ऐका । गोष्ट आतां सांगतों जी ॥७४॥ तुम्ही उद्यांपासोन । वर्ज्य करा हें ठिकाण । ना तरी भास्करालागून । येईल माझ्या कमीपणा ॥७५॥ आज प्रसाद घेऊन । तुम्ही तृप्त व्हा अवघे जण । मात्र उद्यांपासोन । या स्थळासी येऊं नका ॥७६॥ काही कुत्सित एकमेकांलागुनी । म्हणते झाले हांसोनी । ही गजाननानें केली वाणी । अस्थानीं कीं निरर्थक ॥७७॥ दुसरे दिवशीं ते कुत्सित । मुद्दाम पाहाया आले तेथ । तों एकही ना दृष्टीप्रत । पडला त्यांच्या कावळा ॥७८॥ मग मात्र चकित झाले । समर्थांसी शरण आले । बारा वर्षें तेथ भले । कावळे न आले श्रोते हो ॥७९॥ चौदा दिवस झाल्यावरी । गजानन फिरले माघारीं । येते झाले शेगांव नगरीं । आपल्या उर्वरित शिष्यांसह ॥८०॥ श्रोते त्या शेगांवांत । एक गोष्ट घडली अघटित । ती ऐका सावचित्त । सांगतों मी येधवां ॥८१॥ होतें साल दुष्काळाचें । म्हणून एका विहिरीचें । काम चाललें खोदण्याचें । सुरुंगातें लावून ॥८२॥ विहीर दोन पुरुषांवर । गेली खोल साचार । खडक काळा लागला थोर । गती खुंटली पहारीची ॥८३॥ म्हणून भोकें करुन । आंत दारु ठांसून । सुरुंगाच्या साह्ये करुन । काम फोडण्याचें सुरुं झालें ॥८४॥ चारी बाजूंस भोकें चार । केलीं पहारीनें तयार । दारु ठासिली अखेर । आंत दोर्‍या घालुनी ॥८५॥ एरंड पुंगळ्या पेटवून । सोडल्या चारी दोर्‍यांतून । तो मध्येंच बैसल्या अडकून । दोऱ्यांचीया गांठीवरी ॥८६॥ तैं कामावरचा मिस्तरी । विचार करी अंतरीं । सुरुंगास लागल्या वारी । सुरुंग वायां जाईल कीं ॥८७॥ म्हणून गणू जवर्‍याला । मिस्तरी तो बोलला । तूं उतरुन विहिरीला । पुंगळ्या थोड्या सरकीव ॥८८॥ त्या पुंगळ्या सरकावण्यासी । कोणी न धजे जावयासी । म्हणून या गणू जवर्‍यासी । मिस्तरीनें दटाविलें ॥८९॥ या गणू जवर्‍याची । निष्ठा समर्थांवरी साची । आज्ञा होतां मिस्तरीची । गणू आंत उतरला ॥९०॥ एक पुंगळी सरकविली । ती तात्काळ तळा गेली । दारुप्रती जाऊन भिडली । गणू आंत सांपडला ॥९१॥ दुसरीस जों घाली हात । पुंगळी सरकवण्याप्रत । तों पहिला सुरंग उडाला सत्य । मग काय विचारतां ? ॥९२॥ गणू म्हणे विहिरींतून । समर्था ये धांवून । माझें आतां रक्षण । तुझ्यावीण कोण करी ? ॥९३॥ तों गणू जवर्‍या भली । कपार हाती लागली । त्या कपारींत बैसली । स्वारी गणू जवर्‍याची ॥९४॥ एकामागून एकांनीं । पेट घेतला सुरुंगांनीं । उडाले सुरुंग ऐसे तिन्ही । दगड अपार निघाले ॥९५॥ लोक जे कां होते वरती । ते बोलले ऐशा रिती । बहुधा मिळाली असेल मुक्ती । विहिरीमाजी गणूला ॥९६॥ असा जो शब्द ऐकिला । आंतून गणू बोलला । अहो मिस्त्री नाहीं मेला । गणू आहे विहिरींत ॥९७॥ गजाननाच्या कृपेनीं । मी वांचलों या ठिकाणीं । बसलों आहे दडोनी । या पहा कपारींत ॥९८॥ परी कपारीच्या तोंडाला । धोंडा एक मोठा पडला । त्यामुळें बाहेर मला । येतां येत नाहीं कीं ॥९९॥ गणूचे शब्द ऐकिले । लोक अवघे आनंदले । लोक खालीं उतरले । तो धोंडा काढावया ॥१००॥ दहापांच जणांनीं । धोंडा सरकविला पहारींनीं । गणूस बाहेर काढूनी । घेऊन आले वरते त्या ॥१०१॥ वरतीं येतांच गांवांत । गणू गेला पळत पळत । समर्थांच्या मठांत । दर्शन त्यांचें घ्यावया ॥१०२॥ गणू दर्शना येतांक्षणीं । बोलले त्या कैवल्यदानी । गण्या कपारींत बैसोनी । किती धोंडे उडविलेस ? ॥१०३॥ जा तुझें गंडांतर । आज निमालें साचार । गणूप्रती पाहाया इतर । लोक आले गांवींचे ॥१०४॥ गणू म्हणे सद्‌गुरुनाथा । सुरुंग चारी पेटतां । तूंच मला देऊन हातां । कपारींत बैसविलें ॥१०५॥ म्हणून मी वांचलों । तुझे पाय पाहाया आलों । ना तरी असतों मेलों । विहिरीमाजीं गुरुराया ! ॥१०६॥ ऐसें गजाननकृपेचें । महिमान आहे थोर साचें । तें साकल्य वर्णण्याचें । मसीं नाहीं सामर्थ्य ॥१०७॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति एकादशोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १०


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो एकदां पुण्यराशी । गेले उमरावतीसी । जाऊन उतरले सदनासी । आत्माराम भिकाजीच्या ॥१॥ हा आत्माराम भिकाजीसुत । उमरावतीचा असे प्रांत । मोठा अधिकार हातांत । होता त्याच्या विबुध हो ॥२॥ त्याच्या घरीं समर्थ गेले । ते त्यानें सांग पूजिलें । मंगलस्नान घातलें । उष्णोदकानें गजानना ॥३॥ उटणीं नाना प्रकारचीं । अंगा लाविलीं साचीं । वृत्ति आनंदली त्याची । संतसहवासें तेधवां ॥४॥ कर्वतीकांठी उमरेडचा । धोतरजोडा नेसविला साचा । भालीं केशरी गंधाचा । भव्य तिलक लाविलासे ॥५॥ कंठामाजीं पुष्पहार । नैवेद्याचे नाना प्रकार । दक्षिणेसी शंभर । रुपये त्यानें ठेविले ॥६॥ धूप, दीप आरती झाली । पुष्पांजली समर्पिली । दर्शनालागी दाटी झाली । उमरावतीच्या लोकांची ॥७॥ प्रत्येका ऐसें वाटावें । समर्थ आपल्या घरीं न्यावें । यथासांग करावें । पूजन त्यांचें येणें रितीं ॥८॥ इच्छा ऐसी बहुतां झाली । परी थोडक्यांची मनीषा पुरली । सदनीं पाऊलें लागण्या भलीं । पुण्य पाहिजे बलवत्तर ॥९॥ गणेश श्रीकृष्ण खापर्डे । उमरावतीचे गृहस्थ भाविक बडे । वकीलींत ज्यांच्यापुढें । ढीग रुपयांचे पडती कीं ॥१०॥ त्यानें विनंति करितां खरी । महाराज गेले त्याच्या घरीं । तेथें ही झाली याचपरी । समर्थांची पूजा हो ! ॥११॥ गणेश आप्पा म्हणूनी । होता लिंगायत वाणी । चंद्राबाई कामिनी । त्याची परम भाविक असे ॥१२॥ ती बोलली पतीला । हा साधु पाहिजे नेला । कसेंही करुन घराला । पाहा विनंती करुन ॥१३॥ परि आप्पा बोलेना । छाती त्याची होईना । बोलवावयासी निजसदना । श्रीगजानन साधुते ॥१४॥ महाराज वदले अखेर । गणेश आप्पाचा धरुन कर । तुझें किती आहे सदन दूर । तेवढें सांग मला ? ॥१५॥  ऐसें महाराज बोलतां । गणेश आप्पाचिया चित्ता । हर्ष झाला तत्त्वतां । तो न शब्दें बोलवें ॥१६॥ समर्थांस नेऊन सदनीं । पूजा केली उभयतांनीं । आपुला संसार त्यांचे चरणीं । अर्पण केला तात्काळ ॥१७॥ असो ऐशा पूजा अमित । झाल्या उमरावतीत । त्या प्रत्येक पूजेप्रत । एक गृहस्थ हजर असे ॥१८॥ तो आत्माराम भिकाजीचा । नात्यानें हा होता भाचा । राहणार मुंबई शहरींचा । तारमास्तर असे कीं ॥१९॥ तो रजा घेऊन भला । उमरावतीस होता आला । भेटण्या आपुल्या मामाला । बाळाभाऊ नाम ज्याचें ॥२०॥ त्या बाळाभाऊकारण । समर्थांचें लागलें ध्यान । म्हणे ऐशा साधूचे चरण । सोडून कुठें जाऊं नये ॥२१॥ असो कांहीं दिवसांनीं । शेगांवीं आले परतोनी । मळ्यासी न जातां जाणी । आले मंदिरीं मोट्याच्या ॥२२॥ त्या मंदिराच्या पूर्वेस । एक जागा होती ओस । गजानन पुण्य पुरुष । येऊन बसला ते ठायां ॥२३॥ बातमी महाराज आल्याची । कृष्णा पाटला कळली साची । त्यांनीं जागा मळ्याची । सोडली हें समजलें ॥२४॥ म्हणून आला धांवत । त्या ओस जागेवरी सत्य । महाराजा करुन दंडवत । अधोवदन बैसला ॥२५॥ पाटील बोले त्यावर । जोडोन आपले दोन्ही कर । महाराज मळ्याचा अव्हेर । कां हो आज केलांत हा ? ॥२६॥ ही देशमुखाच्या बाजूची । जागा आहे बघा साची । एका माळ्याच्या मालकीची । येथें तुम्ही राहूं नका ॥२७॥ मळ्यांत मर्जी नसेल जरी । तरी चला राहात्या घरीं । तें खालीं करितों सत्वरीं । तुम्हांसाठीं दयाळा ॥२८॥ पाटील बंधू धांवून आले । महाराजा विनवूं लागले । निजसदना या या भले । हरी आणि नारायण ॥२९॥ महाराज बोलले तयासी । मी जो या जागेसी । येऊन बसलों आज दिवशीं । तें तुमच्या हितास्तव ॥३०॥ सखाराम देईल जागा । पुढचें करुं आपण बघा । म्हणजे अवघ्यांस यांत भागा । घेतां येईल सहजची ॥३१॥ समेट अवघ्यांचा होऊनी । मठ बांधिला त्या ठिकाणीं । परशराम सावजींनीं । मेहेनत घेतली विशेष ॥३२॥ समर्थांच्या बरोबर । निस्सीम भक्त होते चार । भास्कर, बाळाभाऊ, पितांबर । उमरावतीचा गणेश आप्पा ॥३३॥ रामचंद्र गुरव त्याचपरी । राहात होता बरोबरी । हे पांच पांडव, श्रीहरी । गजानन शोभूं लागले ॥३४॥ वृत्ति बाळाभाऊची । अतिविरक्त झाली साची । पर्वा न त्यानें नौकरीची । केली यत्किंचित्‌ आपुल्या ॥३५॥ एकदां बळेंच घालवून । दिलें बाळाभाऊकारण । परी तो आला परतून । राजीनामा देवानिया ॥३६॥ बाळाभाऊ शेगांवासी । येतां भास्कर बोलला त्यासी । झाली जयाला विरक्ति । त्यानेंच येथें यावें रे ! ॥३७॥ हें अहंकाराचें भाषण । समर्था न खपले जाण । त्यांनीं भास्कराचें अज्ञान । निवटाया कृत्य केलें ऐसें ॥३८॥ एका गृहस्थाच्या हातीं । भली थोरली छत्री होती । ती गजाननें घेऊन हातीं । बाळास झोडूं लागले ॥३९॥ मारतां मारतां मोडली । बुध हो छत्री भली । मग एक मोठी घेतली । भरीव कांठी वेळूची ॥४०॥ तिनें मारणें सुरुं केलें । तें पाहतां लोक भ्याले । कांहीं कांहीं पळून गेले । सोडून त्या मठाला ॥४१॥ परी बाळाभाऊ तसाच पडला । समर्थांच्या पुढें भला । कैक म्हणती असेल मेला । तो या अशा मारानें ॥४२॥ भास्करही झाला चिंतातुर । बाळाभाऊचा पाहून मार । परी समर्थांच्या समोर । बोलण्या छाती होईना ॥४३॥ तीही काठी मोडली खरी । बाळाभाऊच्या पाठीवरी । मग तो कंटाळून अखेरीं । तुडवूं लागले तयाला ॥४४॥ बंकटलाल म्हणे भीत भीत । समर्था हा आपुला भक्त । पुरें झालें याप्रत । आतां ऐसें तुडवणें ॥४५॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थ वदले हांसून । हें असंबद्ध भाषण । कां करितां कळेना ॥४६॥ तो महाराज म्हणाले बाळासी । उठ वत्सा वेगेसी । या आलेल्या मंडळीसी । अंग तुझें दाखिव ॥४७॥ ऐसी आज्ञा होता भला । बाळाभाऊ उठून बसला । लोक त्याच्या अंगाला । पाहूं लागले निरखून ॥४८॥ तों वळाचें नांव नाहीं । कोठेंही न लागलें कांहीं । तो पहिल्यापरीच होता पाहीं । निमग्न आपुल्या आनंदांत ॥४९॥ त्यायोगें भास्कराला । बाळाभाऊचा अधिकार कळला । मग तोही ना पुन्हां बोलला । वेडेवांकडें बाळासी ॥५०॥ सुकलाल नामें आगरवाला । होता बाळापुराला । श्रोते त्याच्या आगराला । गाय एक द्वाड होती ॥५१॥ तिनें गांवांत फिरावें । मुलांमाणसां तुडवावें । सशक्तांसी हुंदाडावें । शिंगानें कीं आपुल्या ॥५२॥ घरीं बांधून ठेवितां । चर्‍हाटें तोडी हां हां म्हणतां । सांखळीसी आणिली लघुता । बांधतां त्या गाईनें ॥५३॥ ती गाय नोव्हे वाघीण । बाळापुराकारण । लोक गेले कंटाळून । त्रास सोसितां तियेचा ॥५४॥ अखेर लोक म्हणती । आतां याला एक युक्ति । गोविंदबुवाचा घोडा म्हणती । समर्थानें गरीब केला ॥५५॥ तूंही या गाईला । घेऊन जा शेगांवाला । अर्पण करी समर्थाला । म्हणजे अवघें संपलें ॥५६॥ तें अवघ्यांस मानवलें । गाय नेण्याचें ठरविलें । तिला धरण्यासाठीं केलें । प्रयत्‍न नानापरीचे ॥५७॥ साखळदंडानें बांधून पुरी । गाय घातली गाडीवरी । आणिली शेगांवाभीतरीं । गजाननासी द्यावया ॥५८॥  समर्थांपुढें येतांक्षणीं । गाय झाली दीनवाणी । तिनें लोचनीं आणून पाणी । पाहिलें त्या पुण्यपुरुषा ॥५९॥ महाराज म्हणाले अवघ्यांना । हा काय तुमचा मूर्खपणा । गाईस ऐशा यातना । देणें कांहीं बरें नव्हे ॥६०॥ तिला आतांच करा मुक्त । ती न हुंदाडी कोणाप्रत । परी लावण्या तिला हात । छाती कोणाची होईना ॥६१॥ जो तो पाहून मागें सरे । तेथ समर्थ आले त्वरें । आपुल्या त्या पुनीत करें । बंधनें तोडिलीं धेनूचीं ॥६२॥ बंधनें अवघीं तुटतां भलीं । गाय गाडीच्या खालीं आली । पुढले पाय टेकिती झाली । समर्थां वंदन करावया ॥६३॥ समर्थ म्हणाले धेनूस । बाई कोणा न द्यावा त्रास । तूं या सोडून मठास । कोठेंही जाऊं नको ॥६४॥ ऐसा घडतां प्रकार । अवघ्यांनीं केला जयजयकार । उच्च स्वरानें त्रिवार । समर्थांच्या नांवाचा ॥६५॥ बाळापूरची मंडळी । बाळापुरा निघून गेली । गाय तेथेंच राहिली । शेगांवासी मठामध्यें ॥६६॥ त्या दिवसापासून । ठावे न तिला चर्‍हाट जाण । सुज्ञ धेनूचे अवघे गुण । तिच्या ठायीं पातले ॥६७॥ अजून त्या शेगांवातें । तिची संतती नांदते । जे कांहीं वदती ब्रह्मवेत्ते । तेंच येतें घडोन ॥६८॥ असो एक कारंज्याचा । लक्ष्मण घुडे नांवाचा । विप्र वाजसनीय शाखेचा । धनकनक संपन्न असे ॥६९॥ त्यासी रोग झाला पोटांत । उपाय केले अत्यंत । परि न आला गुण किंचित । खर्च सारा व्यर्थ गेला ॥७०॥ त्यानें समर्थांची कीर्ति । कर्णोपकर्णी ऐकली होती । म्हणून सहपरिवारें सत्वरगती । आला शेगांवाकारणें ॥७१॥ करण्या नुसता नमस्कार । असमर्थ होतें शरीर । त्याच्या कुटुंबानें पदर । समर्थांपुढें पसरिला ॥७२॥ आणि म्हणाली दयाघना ! । मी आपली धर्मकन्या । माझ्या पतीच्या यातना । हरण कराव्या आपण ॥७३॥ त्या वेळीं समर्थस्वारी । आंबा खात होती खरी । तोच फेकिला अंगावरी । त्या लक्ष्मणकांतेच्या ॥७४॥ जा दे हा पतीस खाया । व्याधि त्याची बरी व्हाया । तूं शोभसी त्यास जाया । पति-भक्ति परायण ॥७५॥ भास्कर म्हणे ’ अहो बाई ' । आतां न बसा ये ठाईं । आपल्या पतीस लवलाही । घेऊन जा कारंज्यातें ॥७६॥ प्रसाद आंब्याचा जो कां तुला । समर्थकरीं प्राप्त झाला । तोच घाली खावयाला । आपुल्या पतीकारणें ॥७७॥ यानें तुझें होईल काम । गुण येईल अत्युत्तम । लक्ष्मणासी आराम । होईल आंबा खातांच ॥७८॥ बाई घेऊन आंब्याला । येती झाली कारंज्याला । प्रसाद खाऊं घातला । आंब्याचा आपल्या पतीस ॥७९॥ हें वैद्यांनीं जईं ऐकिलें । तई त्या वाईट वाटलें या पोटातील रोगाला आंबा हेंच कुपथ्य होय ॥८०॥ तुम्ही तो प्रसाद दिलेला । पाहिजे होता भक्षण केला । पत्‍नीचें पुण्य पतीला । उपयोगीं पडतसे ॥८१॥ ऐसें वैद्य बोलले । आप्त अवघे घाबरले । जे ते टोचूं लागले । लक्ष्मणाच्या पत्‍नीस ॥८२॥ परी झालें अघटित । लक्ष्मणाचें पोट सत्य । रेच होऊन अकस्मात । मऊ होऊन गेले हो ॥८३॥ शौचावाटें व्याधि गेली । हळूंहळूं शक्ति आली । पहिल्या परीच होती झाली । प्रकृति लक्ष्मणाची ॥८४॥ निसर्गाच्या बाहेरी । वैद्यशास्त्र कांहीं न करी । तेथें उपयोगी पडे खरी । कृपा देवसंतांची ॥८५॥ लक्ष्मण बरा झाल्यावर । आला शेगांवीं सत्वर । म्हणे महाराज माझें घर । पाय लावून पवित्र करा ॥८६॥ आग्रह त्याचा विशेष पडला । महाराज गेले कारंज्याला । तेधवां होते संगतीला । शंकर, भाऊ, पितांबर ॥८७॥ घरीं नेऊन पूजा केली । दक्षिणा ती निवेदिलीं । अवघी संपत्ती आपुली । आहे मी कोण देणार ? ॥८८॥ परी एका ताटांत । कांहीं रुपये ठेविले सत्य । महाराज बघून त्याप्रत । ऐशा रिती बोलले ॥८९॥ म्हणशी माझें कांहीं न उरलें । मग हे रुपये कोठून आणिले ? । लक्ष्मणा ऐसें चाळे । दांभिकपणाचे करुं नको ॥९०॥ लक्ष्मण कांहीं न बोलला । मौन धरुन बैसला । परी समर्थें आग्रह धरिला । खजिन्याचें दार उघडी ॥९१॥ भीत भीत मोकळें द्वार । केलें त्यानें अखेर । खजिन्याच्या उमर्‍यावर । स्वतः जाऊन बैसला ॥९२॥ आणि म्हणाला महाराज यावें । वाटेल तें घेऊन जावें । ऐसें बोलला जरी बरवें । परी अन्यभाव अंतरींचा ॥९३॥ हें त्याचें दांभिकपण । समर्था आलें कळोन । बहुरुप्याचें राजेपण । कोठून टिके बाजारीं ? ॥९४॥ सोडून त्याच्या घरासी । उपाशी निघाले पुण्यरासी । दांभिकांच्या सदनासी । संत न होती तृप्त कदा ॥९५॥ जातां जातां बोलले । माझें माझें म्हणसी भलें । भोग आतां त्याचीं फळें । माझा उपाय त्यास नसे ॥९६॥ मी कृपा करावया । आलों होतो या ठाया । याहीपेक्षां दुप्पट द्याया । परी ते न तुझ्या प्रारब्धीं ॥९७॥ तेंच पुढें झालें सत्य । एका सहा महिन्यांत । अवघी लक्ष्मी झाली फस्त । तया भिक्षेची वेळ आली ॥९८॥ म्हणून श्रोते परमार्थांत । खोटेपणा न खपे किंचित् । याचसाठीं हें चरित्र । समर्थें घडवून आणिलें ॥९९॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥

॥ इति दशमोऽध्यायः समाप्तः ॥