Feb 25, 2021

गुरुचरित्रमिदं खलु कामधुक् - १


॥ श्री गणेशाय नम: ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ ॥ श्रीकुलदेवतायै नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ श्रीपादश्रीवल्लभ-श्रीनृसिंहसरस्वती-दत्तात्रेयसद्गुरुभ्यो नमः ॥ अथ ध्यानम् बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङगरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरम् । ब्रह्मज्ञैः सनकादिभिः परिवृतं सिद्धैः समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे ह्रदि मुदा ध्येयं सदा योगिभिः ॥ श्री गुरुचरित्र हे सरस्वती गंगाधर यांनी प्रत्यक्ष श्री गुरूंच्या, श्री दत्तात्रेयांच्या आज्ञेवरून लिहिलेले आहे. ' श्रुतं हरति पापानि ' अर्थात वेद, पुराणें आणि प्रासादिक ग्रंथ श्रवण केल्याने पाप हरते, हे वेदवाक्य आहे. त्यांतील दिव्य अक्षरांतून शुभ स्पंदने निर्माण होत असतात, त्यांमुळे त्यांचे पठणमात्रें फळ मिळतेच. परंतु ही ईश्वर आराधना केवळ श्रवण, वाचन करणे यापुरतीच मर्यादित न ठेवता त्यांचे मनन करावे, त्यातून योग्य तो बोध घ्यावा, यासाठी हा अल्प प्रयास. ॐ नमो जी विघ्नहरा । गजानना गिरिजाकुमरा । जय जय लंबोदरा । एकदंता शूर्पकर्णा ॥ सकळ मंगल कार्यांसी । प्रथम वंदिजे तुम्हांसी । चतुर्दश-विद्यांसी । स्वामी तूंचि लंबोदरा

प्राचीन ग्रंथ परंपरेस अनुसरून श्री गुरुचरित्रकार ग्रंथारंभ मंगलाचरणाने करतात. ग्रंथलेखन निर्विघ्नपणे व्हावे यासाठी अर्थातच विघनहर्त्या गणरायाला, गिरिजेच्या कुमाराला वंदन करून प्रार्थना करतात.

माझे अंतःकरणींचें व्हावें । गुरुचरित्र कथन करावें । पूर्णदृष्टीनें पहावें । ग्रंथसिद्धि पाववीं दातारा ॥

तू तुझ्या कृपादृष्टीनें हा ग्रंथ पूर्णत्वास न्यावा, अशी विनवणी करतात.

पुढें, सरस्वती गंगाधर विद्यादात्री शारदेला नमन करून तिचे स्तवन करतात. सकल विद्या, वेद, शास्त्रें जिच्या वाणीतून उत्पन्न झाली, अशा वागीश्वरीला गुरुचरित्र विस्तार करण्यासाठी चांगली मति द्यावी, असा आशीर्वाद मागतात.

विद्यावेदशास्त्रांसी । अधिकार जाणा शारदेसी । तिये वंदितां विश्वासी । ज्ञान होय अवधारा ॥ऐक माझी विनंति । द्यावी आतां अवलीला मति । विस्तार करावया गुरुचरित्रीं । मतिप्रकाश करीं मज ॥

त्यानंतर आपल्या गुरूंचे नाव नृसिंह-सरस्वती आहे, त्या नामांत तूही स्थित आहेस. तसेच, माझेही नाव सरस्वती गंगाधर आहे, म्हणून तू मजवरही लोभ ठेव, अशी प्रार्थना करीत आपले प्रतिभा चातुर्यही दाखवतात.

गुरुचे नामीं तुझी स्थिति । म्हणती ' नृसिंह-सरस्वती ' । याकारणें मजवरी प्रीति । नाम आपुलें म्हणोनि ॥

तदनंतर अनुक्रमें ब्रह्मा, विष्णू, शिव, समस्त देवी-देवता, सिद्ध माहात्मे, ऋषीमुनी, गंधर्व-यक्ष-किन्नर, पराशर, व्यास आणि वाल्मिकी ऋषी यांना वंदन करून ' भाषा न ये महाराष्ट्र । म्हणोनि विनवीं तुम्हांसी ॥ समस्त तुम्ही कृपा करणें । माझिया वचना साह्य होणे ।' अशी आळवणी करतात. अर्थात, हा देखील सद्गुरुकृपेचा चमत्कार म्हणावयास हवा. श्रीगुरूंचा वरदहस्त मस्तकी असल्यास अशक्यही कसे शक्य होते, हेच यावरून सिद्ध होते.

तसेच, आपल्या पूर्वजांचे स्मरण करून आपस्तंब शाखेच्या कौंडिण्य ऋषींच्या गोत्रातील साखरे कुळाची ओळख करून देतात. सायंदेव - नागनाथ - देवराव - गंगाधर अशी कुलपुरुषांची नांवे सांगत आपल्या चंपा नामक आईच्याही पूर्वजांचे स्मरण करतात.

ग्रंथलेखनाचा हेतू स्पष्ट करीत गुरुचरित्रकार आपल्या वंशावर पूर्वीपासूनच श्री गुरूंची कृपा होती आणि त्यांचे चरित्र लिहिण्याची आज्ञा झाली हे सांगतांना लिहितात -

पूर्वापार आमुचे वंशी । गुरु प्रसन्न अहर्निशी । निरोप देती मातें परियेसीं । ' चरित्र आपुलें विस्तारीं ॥ चरित्र ऐसें श्रीगुरुचें । वर्णावया शक्ति कैंची वाचे । आज्ञा असे श्रीगुरुची । म्हणोनि वाचें बोलतसें ॥

प्रत्यक्ष गुरुआज्ञेवरून लिहिलेले हे श्री गुरुचरित्र कामधेनू असून श्रोत्यांनी ते एकाग्रतेने श्रवण केल्यास त्यांना सहजच महाज्ञान प्राप्त होते. ज्यास पुत्रपौत्रीं चाड । त्यासी हे कथा असे गोड । लक्ष्मी वसे अखंड । तया भुवनीं परियेसा ॥ ऐशी कथा जयांचे घरीं । वाचिती नित्य मनोहरी । श्रियायुक्त निरंतरीं । नांदती कलत्रपुत्रयुक्त ॥ रोगराई तया भुवनीं । नव्हती गुरुकृपेंकरोनि । निःसंदेह सात दिनीं । ऐकतां बंधन तुटे जाणा ॥ अशी या सिद्ध ग्रंथाची महती कथन करून गुरुचरित्रकार आपले गुरु श्री नृसिंह सरस्वती ह्यांची कथा सांगण्यास सुरुवात करतात. ॥ श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥ श्रीगुरुदेवदत्त ॥


No comments:

Post a Comment