Feb 10, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ९


कर्मफल मीमांसा, श्री साईबाबा व गाडगे महाराज अवतार संकेत, श्री सच्चिदानंदावधूतांचा धर्मनिर्णय, आणि पंचमहाभूतांची साक्ष

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटेच तिरुमलदास आणि शंकरभट्ट यांनी स्नानसंध्यादि नित्यान्हिक उरकले. त्यानंतर प्राणायाम करून मन एकाग्र केले. अशा रितीनें, सबाह्य अभ्यंतरीं शुद्ध होऊन ते दोघेही श्रीपाद श्रीवल्लभांचे ध्यान करू लागले. तो गुरुवारचा शुभ दिवस होता. हळू हळू सूर्यनारायणांचे पृथ्वीतलांवर आगमन होऊ लागले. सूर्याच्या त्या प्रथम किरणांत तिरुमलदास आणि शंकरभट्ट या दोघांनाही त्यांच्या आराध्यदेवतेचे दर्शन झाले. अत्यंत तेजस्वी, दिव्य आणि मनोहर अशा षोडशवर्षीय युवकाच्या रूपांत झालेले श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे ते क्षणिक दर्शन त्यांना मंगलप्रद वाटले. मात्र त्यावेळीं एक अकल्पित घटना घडली. श्रीपाद प्रभूंना नैवैद्य म्हणून जे चणे ठेवले होते, त्यावर सूर्यकिरणें पडताच ते चणे लोखंडात रूपांतरित झाले. लोखंडाचे ते चणें पाहून शंकरभट्ट खिन्न झाले. आपल्या हातून काही प्रमाद घडला असावा का अथवा भविष्यकालीन घटनेचे हे सूचक आहे का?, ह्या विचाराने ते कष्टी झाले. या शंका निवारणार्थ आपण तिरुमलदासाशीच बोलावे, असा विचार करून शंकरभट्ट वळले. एव्हढ्यात, तिरुमलदासच बोलू लागले, " शंकरा, आज दुपारीच तू भोजन करून कुरवपुरांस प्रयाण करावेस, असा श्री दत्तप्रभूंचा आदेश झाला आहे. आजचा दिवस अतिशय शुभ आहे. श्री दत्त क्षेत्री दररोज माध्यान्हकाळीं प्रत्यक्ष दत्तमहाराज भिक्षा मागतात, ह्या गोष्टीचे तू नित्य स्मरण ठेव."

त्यावर शंकरभट्ट लीनतेने उत्तरले, " स्वामी, आपल्यासारख्या ज्येष्ठ भक्ताकडून मी दररोज श्री दत्तप्रभूंचे अवतार, त्यांच्या कथा, वेद निरुपणादी श्रवण करीत होतो. आपल्या रसाळ वाणीतून श्रीपाद प्रभूंचे अनुभव, त्यांच्या लीला ऐकतांना अनिर्वचनीय असा आनंद मला मिळत होता. तसेच आपल्या आदरातिथ्याबद्दलही मी आपला ऋणी आहे. आज मात्र माझ्या मनांत एक शंका उद्भवली आहे. प्रातःकाळी अर्चन करतांना श्रीपादस्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण केलेले चणे लोखंडाचे झाले, या घटनेने मी खिन्न झालो आहे. आपण कृपया माझ्या ह्या संशयाचे निरसन करावे अशी मी आपणांस प्रार्थना करतो." तेव्हा, शांत स्वरांत तिरुमलदास म्हणाले, " शंकरभट्टा, हा या कलियुगाचा महिमा आहे. ज्याप्रमाणे खनिजद्रव्यांत चैतन्य निद्रावस्थेत असते, त्याचप्रमाणे सांप्रत कली प्रबळ झाल्यामुळे मनुष्य देहांत आस्तिकता, चैतन्य असेच निद्रावस्थेंत राहील. प्राणशक्तीत असलेले हे चैतन्य वेदोक्त आराधना, योगसाधना, जप-ध्यानादी उपायांनी हळूहळू विकसित होते. मानवी देहाच्या मूलाधारात सुप्तरूपांत असलेले हे चैतन्य जागृत झाल्यास साधकांस निर्विकल्प समाधीचा अनुभव येतो आणि तो त्या परब्रह्माशी एकरूप होतो. या स्थितीत तो कर्मबंधनांतून मुक्त होतो. मानवी मन हे अतिशय चंचल असते, मात्र श्री प्रभूंचे अतिमानस हे कल्पनातीत, अगम्य आणि प्रकाशाच्या वेगापेक्षाही असंख्य पटीने अधिक वेगवान आहे. प्रत्येक क्षणी कोट्यावधी साधकांनी, भक्तांनी, प्राणिमात्रांनी केलेल्या प्रार्थना श्रीपाद प्रभूचरणीं पोहोचतात. ह्या अनंत कोटी ब्रह्माण्डाचे सृजन-पालन आणि संहार करणारे श्री दत्तात्रेयच सगुण साकार मनुष्य देह धारण करून श्रीपाद श्रीवल्लभांच्या रूपांत आपल्या भक्तांस दर्शन देत असतात."

तिरुमलदासाचे हे स्पष्टीकरण ऐकून शंकरभट्टांचे समाधान झाले, पण किंचित चिंताग्रस्त होत ते म्हणाले, " प्रभू श्रीपादांच्या ह्या कथा ऐकतांना मला कितीतरी वेळा त्यांच्या अस्तित्वाची, सान्निध्याची जाणीव झाली. ह्या सृष्टीरचनेतील अनेक रहस्यें, वेदांतील क्लिष्ट तत्त्वें, भगवंताचे स्वरूप अशा अनेक विषयांवर आपण विस्तृत निरूपणही केले. मात्र वेदांनाही ज्यांचे वर्णन करणे शक्य नाही, असे अनंत, दिव्य स्वरूपी परमगुरु यांचे हे अथांग चरित्र मी कसे लिहावे ? हे अद्भुत कार्य माझ्याकडून घडेल का ? याविषयीं माझे मन साशंक आहे." तेव्हा, अत्यंत आश्वासक स्वरांत तिरुमलदास म्हणाले, " वत्सा, श्रींचे हे चरित्र लेखन तुझ्या हातूनच होणार आहे, हे विधिलिखित सत्य आहे. केवळ या शुभ कार्यासाठीच तुला श्रीपादांचे अनेक भक्तश्रेष्ठ त्यांचे अनुभव सांगतील आणि तू ते लेखणीबद्ध करशील. स्वतः श्रीपाद प्रभूच त्यांचे हे दिव्य चरित्र लिहितील, तू केवळ निमित्तमात्र असशील अशी दृढ श्रद्धा ठेव. त्या परब्रह्मास तू अनन्यभावाने शरण जा आणि मग तुला त्यांच्या कृपेची अनुभूती निश्चितच येईल."

महर्षी अत्रि आणि महासती अनसूया यांच्या भक्तीनें प्रसन्न होऊन परमगुरु श्री दत्तात्रेय त्रिगुणात्मक त्रैमूर्तीच्या स्वरूपांत अवतार घेते झाले. पूर्वायुगांतील श्री दत्त हेच श्रीपाद श्रीवल्लभ आहेत का ? अशी शंका तुझ्या मनांत निर्माण झाली. त्या शंकेचे निवारण करण्यासाठीच प्रभूंनी हे नैवेद्याचे चणे लोखंडात रूपांतरित केले. ह्या जन्म-मृत्यूच्या चक्रास कारणीभूत असलेले हे अज्ञान नष्ट करून आपल्या भक्तांस मोक्ष-कैवल्य आदींचा लाभ करून देण्यासाठीच हा अवतार झाला आहे. मनुष्याच्या अध:पतनाचे लक्ष मार्ग असतील तर तो परमकृपाळू परमात्मा दशलक्ष मार्गांनी आपल्यावर अनुग्रह करतो. त्या करुणासागर प्रभूंना अनन्यभक्तीनें शरण गेल्यास मनुष्यास शाश्वत सुख प्राप्त होते. सलग तीन अहोरात्र श्रीपाद प्रभूंचे निरंतर मनःपूर्वक स्मरण अथवा ध्यान केले असता, त्या साधकास श्रीपाद प्रभूंचे साक्षात दर्शन होते. केवळ स्मरणमात्रेच प्रसन्न होणाऱ्या श्री दत्तप्रभूंचा हा आद्य अवतार आहे. त्यांच्यावर अढळ श्रद्धा ठेवून आपण आध्यात्मिक प्रगती साधावी. तिरुमलदासाने श्री गुरूंचा असा महिमा सांगूनदेखील शंकरभट्टांच्या मनांतील संशय पूर्णत: दूर झाला नव्हता. कुशंकाग्रस्त मनानेच ते विचार करू लागले, " श्रीपाद श्रीवल्लभ जर खरोखरच श्री दत्तात्रेयांचे अवतार असतील, तर प्रभू मला भगवान श्रीकृष्णांचे निर्वाण कधी झाले, या कलियुगाचा आरंभ दिन कुठला याविषयीं दृष्टांत देतील." शंकरभट्ट असा विचार करतच होते तेवढ्यात कानठळ्या बसतील असा प्रचंड ध्वनी झाला. अनपेक्षितपणे झालेल्या त्या मोठ्या आवाजाने शंकरभट्टांची श्रवणशक्ती, तर तिरुमलदासाची वाचाशक्तीच नष्ट झाली. खूप प्रयत्न करूनसुद्धा त्यांच्या मुखातून एक शब्दही निघत नव्हता आणि शंकरभट्टांस काहीच ऐकू येत नव्हते. इतक्यात तिथे नैवेद्यासाठी म्हणून ठेवलेले चणे जे लोखंडाचे झाले होते, ते चणे हळूहळू '' श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये '' या दिव्य मंत्राक्षरांत आकारबद्ध झाले. त्या चण्यांवरच एक धवल पत्र प्रगटले आणि त्या तलम पत्रावर अक्षरें उमटू लागली - श्रीकृष्णांचे निर्वाण ख्रिस्त पूर्व ३१०२ साली झाले. त्यानंतर प्रमादी नामक संवत्सरात चैत्र शुद्ध प्रतिपदेला शुक्रवारी, अश्विनी नक्षत्र सुरु झाल्यावर कलियुगाचा प्रारंभ झाला. ते अनाकलनीय दृश्य पाहून शंकरभट्ट अतिशय भयभीत झाले, आपल्या वर्तनाचा त्यांना पश्चात्ताप होऊ लागला. त्यांनी मनोमन श्रीपादप्रभूंची क्षमायाचना केली. अन काय आश्चर्य ! त्याच क्षणी ते सर्व विरून गेले आणि लोखंडाचे चणे पूर्ववत झाले. ते पाहून त्या करुणासागर प्रभूंनी आपल्या अनंत अपराधांबद्दल क्षमा केली, या विचाराने शंकरभट्ट सदगदित झाले आणि ते कृतार्थभावाने तिरुमलदासाकडे पाहू लागले. त्यावेळीं, तिरुमलदासाच्या मुखावर जणू ब्रह्मतेजचं विलसत आहे, असे त्यांना भासले. मंद स्मितहास्य करीत तिरुमलदास बोलू लागले, " शंकरा, श्रीपादप्रभूंचा पुढील अवतार लवकरच महाराष्ट्र देशांत श्री नृसिंह सरस्वती म्हणून होणार आहे. माझी बाळकृष्णांवर श्रद्धा आहे, हे तू जाणतोच. श्रीपादप्रभूंची आपल्या भक्तांवर जन्मोजन्मी कृपादृष्टी असते. माझ्या पुढील जन्मातही समर्थ सद्गुरू रूपांत अवतारित झालेल्या साई बाबा यांच्याकडून मला अनुग्रह प्राप्त होईल. गाडगे महाराज या नावाने मी पुन्हा रजक कुळांत जन्म घेईन. ' गोपाला ! गोपाला ! देवकीनंदन गोपाला !' या नाम मंत्राने मी पुन्हा माझ्या कृष्णभक्तीत रंगून जाईन."

तिरुमलदास पुढे म्हणाले, " प्रत्येक जीवास आपल्या कर्माचे फळ हे भोगावेच लागते. प्रत्यक्ष भगवंताचीदेखील त्यातून सुटका नाही. मात्र मनुष्य पुण्यसंचय, दानधर्म, सत्पुरुषांची सेवा आदी साधनांद्वारे आपल्या पापकर्मांचा क्षय करू शकतो. परमेश्वर, संत-माहात्मे, अवतारी पुरुष, सद्गुरू पुण्यस्वरूप असल्याने त्यांना शरण आलेल्यांची संचित पाप कर्मे ते आपल्या योगसामर्थ्याने दग्ध करू शकतात. त्यांना भक्तिभावाने अर्पण केलेल्या उपचारांनीसुद्धा कर्मांची तीव्रता कमी होऊ शकते, अर्थात जशी श्रद्धा, भक्ती आणि भाव तसेच फळ मिळते. त्यांच्या चरणीं आर्ततेनें केलेली प्रार्थना त्वरित फलित होते. शंकरा, भावेंविण भक्ती नाही आणि भक्तीविण मुक्ती नाही, हेच सत्य आहे. श्रीपाद प्रभू त्यांच्या शरणागतांचे कर्मदोष काही वेळा निर्जीव पाषाण-दगड यांना भोगावयास लावून त्या पातकांचे निवारण करत असत. तुला, मी याविषयीची एका भक्ताची कथा सांगतो."

सुमती महाराणी श्रीपादांना त्यांच्या जन्मापासून पुरेसे स्तनपान करू शकत नसे. श्री आपळराज यांच्या घरी एक गाय होती, मात्र तिचे दूध अगदीच कालाग्निशमन दत्तांच्या नैवैद्यापुरतेच मिळायचे. कधी कधी त्या वंशपरंपरागत दत्तमूर्तीस नैवैद्य दाखवायच्या आधीच श्रीपाद ते दूध देवघरांत जाऊन प्राशन करायचे. त्या दिवशी आपळराज मग देवास गुळाचा नेवैद्य दाखवून उपवास करायचे. पतीस उपवास घडल्यामुळे सुमती महाराणीदेखील उपवास करीत असे. आपल्या या दिव्य शिशुस आपण पुरेसे दूध देऊ शकत नाही, या विचारांनी ते सदाचारी माता-पिता दुःखी होत असत. श्री आपळराज स्वतः वेदशास्त्र पारंगत होते. केवळ पौरोहित्य करून मिळणाऱ्या दक्षिणेवरच ते आपला प्रपंच करीत होते. वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंहराय वर्मा आणि सासरे श्री सत्यऋषिश्वर (श्री बापन्नार्य) यांच्याकडूनदेखील ते कधीही दान घेत नसत. एके दिवशी सुमती महाराणीने आपल्या पतीस, माझ्या दुधाने बाळ श्रीपादांची भूक भागत नाही, यासाठी एक गोदान स्वीकारण्याची विनवणी केली, मात्र आपळराजांनी त्यास नकार दिला.

श्री आपळराज शर्मा यांचे वडील श्रीधररामराज शर्मा वेलनाड्डु येथील ग्रामाधिकारी होते. वेळ प्रसंगी करवसुलीसाठी त्यांना धर्माविरुद्ध जाऊन आचरण करावे लागत असे. याच पिढीजात कर्मदोषांमुळे आपळराज-सुमती महाराणी यांच्या दोन पुत्रांस जन्मतः वैगुण्य आले होते. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंचा अवतार असलेल्या श्रीपादांनादेखील हे प्रारब्ध भोगावे लागले, त्यांमुळेच त्यांना पुरेसे दूध मिळू शकत नव्हते. कर्मचक्राचा हा नियम प्रत्यक्ष भगवंतांलाही लागू होतो, हेच आपल्या भक्तांना दाखविण्यासाठी प्रभूंनी ही लीला केली.

श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठी आणि नरसिंहराय वर्मा हे दोघेही श्रीपादांवर पौत्रवत प्रेम करीत असत. बाळ श्रीपादांच्या या दुग्ध समस्येचे निवारण करण्यासाठी त्यांनी एक उपाय योजना केली. श्री नरसिंह वर्मांची एक शुभ लक्षणयुक्त गाय श्रेष्ठींनी विकत घेतली. गोमाता विक्रय करून आलेले ते सर्व धन श्री वर्मांनी आपळराजांस पौरोहित्यानिमित्त दक्षिणा म्हणून दिले. मात्र वेदशास्त्रनियमांचे कठोर पालन करणाऱ्या आपळराजांनी ते सर्व द्रव्य न घेता केवळ धर्ममान्य असलेलीच दक्षिणा स्वीकारली. तेव्हा, मी क्षत्रिय आहे आणि एकदा दान दिलेले द्रव्य मी परत घेऊ शकत नाही, असे म्हणत वर्मांनी ती उरलेली दक्षिणा स्वीकारण्यास नकार दिला. हा वादविवाद मिटवण्यासाठी अखेर ब्राह्मण परिषद बोलावण्यात आली. शास्त्राज्ञांचा परामर्श घेऊन त्या सभेत श्री बापन्नार्यानी '' आपळराज शर्मानी अस्वीकार केलेले हे धन ज्यांना घ्यावयाचे असेल त्यांनी घ्यावे.'' असा निर्णय दिला. एक शुभलक्षणीं गाय विकत घेण्यास पुरेसे असलेले ते धन आपणांस मिळावे या हेतूने अनेक ब्राह्मणांत चढाओढ सुरु झाली. ग्रामांतील पापय्या शास्त्री नामक एका वेदाध्ययनी ब्राह्मणाने आपण श्रेष्ठ दत्तभक्त आणि धर्मपरायण असून सत्पात्री आहोत, असे मोठ्या चातुर्यतेने सर्वांस समजाविले. ब्रह्मवृंदांनीही ते धन त्या ब्राह्मणास देण्याचा निर्णय दिला.

ते स्वीकारून पापय्या शास्त्री स्वतःवरच खूष होत आपल्या घरी परतला. तेव्हा, तिथे त्याचे मामा भेटण्यासाठी आलेले दिसले. त्यांचे स्वागत करून, ' आपण आता भोजनासाठी इथेच थांबावे.' अशी पापय्याने विनंती केली. त्यावर, ' मी वर्षातून केवळ एकदाच भोजन करतो. मात्र आपण लवकरच भेटू.' असे म्हणून त्याचे मामा त्वरेनें तिथून निघून गेले. ते विचित्र बोलणें ऐकून पापय्या शास्त्री संभ्रमात पडले. त्याचवेळी, त्याची पत्नी आश्चर्यचकित होऊन म्हणाली, " स्वामी, तुमचे एकुलते एक मामा तर गतवर्षीच वारले. मग अगदी त्यांच्यासारखेच दिसणारे हे कोण होते ?" पत्नीचे हे बोलणे ऐकताच पापय्या शास्त्रीच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण मृतात्मा तर पाहिला नाही ना ? या भीतीने त्यांची गाळण उडाली. आपले उपास्य दैवत श्री दत्तात्रेय यांची आपल्यावर अवकृपा झाली का ? आपल्या हातून काही अक्षम्य गुन्हा घडला का ? असा विचार करीत पापय्या श्री स्वयंभू दत्तात्रेय कुक्कुटेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा मार्गांत काही अपशकुनही झाले. त्या दिवशी तो एकाग्रतेने दत्तप्रभूंचे ध्यान, जप वा इतर साधना काहीच करू शकला नाही. विमनस्क अवस्थेतच तो घरी परतला. तेव्हा, त्याला आपली पत्नी सुवासिनी न दिसता गतधवा दिसू लागली. पापय्याचे ते विचित्र वर्तन आणि दिवसभरांत घडलेल्या घटना पाहून त्याची पत्नी चिंताग्रस्त झाली. श्रीपादप्रभू दत्तावतारी आहेत, अशी तिची पहिल्यापासूनच दृढ श्रद्धा होती. त्यांनाच आपण आता शरण जावे असा विचार करून ती श्रीपाद स्वामींकडे आली आणि आपल्या सौभाग्याचे रक्षण करावे, अशी तिने त्यांना आर्त प्रार्थना केली. श्रीपादांनाही तिच्या अढळ निष्ठेला, उत्कट भक्तीला दाद द्यावीच लागली. प्रभूंनी पापय्याच्या पत्नीला नूतन गृह प्रवेश आणि विधीवत वास्तुपूजा करावयास सांगितली.

श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तिने पीठिकापुरांतील काही प्रतिष्ठित आणि सदाचारसंपन्न व्यक्तींना नवीन गृह बांधण्यासाठी मदतीची याचना केली. अशा रितीने, थोडी आपली जमापुंजी खर्चून, गरजेनुसार ऋण काढून आणि काही मदत घेऊन लवकरच पापय्या शास्त्रींचे नवीन गृह निर्माण झाले. अर्थात श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद पाठीशी असल्यावर सर्व कार्ये निर्विघ्नपणें पार पडणारच, यांत काही शंकाच नाही. नूतन प्रवेश केल्यावर पापय्या शास्त्रींचा सर्व त्रास नाहीसा होऊन ते पूर्ववत झाले.

" शंकरा, तुला या कथेतील कर्मफल रहस्य कळले का ? पापय्या शास्त्रींची मृत्यूदशा सुरु होती, त्यांच्या कुंडलीत अपमृत्यूचा योग होता. श्रीपाद प्रभूंनी त्याला मानसिक त्रास, जननिंदा, धनव्यय अशा प्रकारचे कष्ट देऊन त्याच्या कर्मदोषांचे निवारण केले. नूतन गृह बांधतांना जे मोठे पाषाण अथवा पर्वतशिला फोडल्या जात होत्या, त्या क्षणीच श्रीपादांच्या कृपादृष्टीमुळें पापय्याच्या पातकांचीही शकले होत होती. आपण थोर दत्तभक्त आहोत, त्यांमुळे कुक्कुटेश्वर मंदिरातील पाषाणमूर्ती सर्वदा आपले रक्षण करील अशा अहंकारांत पापय्या शास्त्री होता. मात्र पीठिकापुरांत बालकरूपांत असलेल्या आपल्या आराध्य देवतेला तो ओळखू शकला नाही. श्रीपादांना तो श्रद्धापूर्वक शरण आला असता, तर आपल्या योगाग्नीनें प्रभूंनी सहज त्याच्या कर्मदोषांचा क्षय केला असता. ' जेथें सप्रेम नाही भगवंताची भक्ती तेथे कर्मे अवश्य बाधिती ॥' या उक्तीचा त्याला पुरेपूर अनुभव आला. मात्र त्याच्या पत्नीच्या भावभक्तीनुसार त्याला भगवंताचा अनुग्रह प्राप्त झाला. श्रीपादांचा असा कृपानुभव घेतल्यावर मात्र पापय्याने ते दत्तप्रभूंचे अवतार आहेत हे ओळखले आणि त्याची श्रद्धा त्यांच्या चरणीं दृढ झाली.

श्री श्रेष्ठी आणि श्री वर्मा मात्र अजूनही बाळ श्रीपादांच्या दुग्ध समस्येचे निवारण न झाल्याने चिंतीत होते. त्या दोघांनी श्री बापन्नार्यांशी याविषयी चर्चा केली. आपल्या नंदिनीसमान असलेल्या धेनूचे क्षीर श्रीपादांस मिळावे, यासाठी ही गोमाता आम्ही आपल्या गोठ्यांत आणतो, अशी त्यांनी श्री बापन्नार्यांस विनंती केली. मात्र, आपले श्वशुर बापन्नार्य यांच्याकडूनही गोदान घेण्यास श्री आपळराजांनी नकार दिला. त्याच सुमारास हिमालयातील सतोपथ या प्रांतामधील श्री सच्चिदानंदावधूत नामक ज्येष्ठ आणि वयोवृद्ध महायोगींचे पीठिकापुरांत आगमन झाले. ते कैवल्यश्रुंगी येथे असलेल्या श्री विश्वेश्वरप्रभूंचे शिष्य होते. श्री प्रभू दत्तात्रेयांच्या आद्य अवताराचे दर्शन तू घेऊन कृतार्थ व्हावेस, असा त्यांच्या गुरूंचा सच्चिदानंदावधूतांना आदेश झाला होता. श्री बापन्नार्यांनी त्यांचा यथायोग्य आदरसत्कार केला. एके दिवशी, त्या वयोवृद्ध तपस्व्यांना बापन्नार्यांनी आपळराज आपणाकडून गोदान स्वीकारण्यास नकार देत असून आपण काही तरी मार्ग सुचवावा, अशी प्रार्थना केली.

तेव्हा, ब्राह्मण परिषदेत हा प्रश्न मांडला गेला. श्री सच्चिदानंदावधूत यांनी, " श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तात्रेय आहेत. आपण अजाण लोकांनी व्यर्थ नियम बंधनात न पडता प्रभूंना गोरस अर्पण करण्याच्या या सुवर्णसंधीचा लाभ घेतला पाहिजे." असे निक्षून सांगितले. सभेतील काही ब्रह्मवृंदाने यांवर आक्षेप घेत, बाळ श्रीपाद हे दत्तात्रेय असल्याचे त्यांना साधार सिद्ध करण्यास सांगितले. त्यावेळी, त्या श्रेष्ठ योग्याने आपल्या तप:सामर्थ्याने पंचमहाभूतांना साक्ष देण्यास सांगितले. त्यांच्यावर गुरु श्री विश्वेश्वरप्रभूंचा वरदहस्त होताच. भूमाता, वरुण, अग्नि, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी, " श्रीपाद श्री दत्तप्रभूच आहेत. सत्य ऋषीश्वरांनी श्री श्रेष्ठीकडून गोदान घ्यावे आणि श्वशुरांनी जामातास प्रीतिपूर्वक दिलेली भेट हे दान होत नाही, त्यांमुळे आपळराज शर्मा यांनी त्या गोमातेचा स्वीकार करावा." अशी साक्ष दिली. हा धर्मसंमत निर्णय मान्य करून आपळराजांनी श्री बापन्नार्यांनी दिलेली गोमाता भेट म्हणून स्वीकारली. त्या प्रसंगी, नरसिंह वर्मा यांनी त्या धेनुची विक्री करून मिळालेले धन आपले कुलपुरोहित असलेल्या आपळराज शर्मा यांस दक्षिणा म्हणून देण्याचा मानस व्यक्त केला. श्री सच्चिदानंदावधूत यांनीही त्यास अनुकूलता दर्शविली. अशा प्रकारें त्या ज्येष्ठ मुनींच्या योग्य मार्गदर्शनाने श्रेष्ठी आणि वर्मा या दोघांस अपूर्व पुण्यसंचयाचा अलभ्य लाभ झाला.

भविष्यकाळांत, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आशीर्वादाने पीठिकापुर महासंस्थान म्हणून उदयास येईल. श्रीपादांचे चरित्र संस्कृत भाषेत लिहिले जाईल. त्यानंतर '' श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत '' हा ग्रंथ प्रकाशित होईल. भूर्जपत्रात लिहिलेला मूळ ग्रंथ, श्रीपादांच्या जन्मस्थानी जमिनीखाली अदृश्यरूपांत राहील. त्या परम पवित्र स्थानी त्यांच्या पादुकांची स्थापना आणि मंदिर निर्माण होईल. प्रत्यक्ष श्रीपाद प्रभूंना गोदान केलेल्या महापुण्यशाली वेंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या वंशावर लक्ष्मीची कृपा असेल. आपल्या पुण्यसंचयामुळे या जन्मानंतर ते हिरण्यलोकात काही काळ राहतील. श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील श्री नृसिंह अवतारांतदेखील ते ऐश्वर्यसंपन्न वैश्य कुळात जन्म घेतील आणि त्यांना प्रभूंचे सान्निध्य आणि दर्शन यांचा लाभ होईल. " शंकरा, गोदान हे विशेष शुभप्रद आहेच, त्यांतून प्रत्यक्ष भगवंताला केलेल्या त्या दानाचे अपूर्व असे फळ मिळणार यांविषयी तिळमात्र शंकाच नाही. प्रभूंच्या आदेशानुसार, तू आता कुरवपुरास प्रयाण करावेस. श्रीपाद श्रील्लभ सदैव तुझी रक्षा करतील.", असे म्हणून तिरुमलदासाने शंकरभट्टांस निरोप दिला.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - प्रारब्ध, कर्मदोष नाश


No comments:

Post a Comment