Jan 28, 2021

श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र सारामृत - अध्याय ८


श्री दत्तात्रेय स्वरूप वर्णन, आत्मसाक्षात्कार - कर्मचक्र परिणाम, श्रीपादस्वामींचा वर्णाश्रमाविषयी व्यापक दृष्टिकोन आणि माधव सिद्धाची कथा

॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥  श्री  गुरुवे  नम:  ॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥

नित्यनियमांनुसार प्रात:कर्मे आटपून पुन्हा एकदा तिरुमलदास श्रीपादप्रभूंची कथा शंकरभट्टांस ऐकवू लागले. श्रोता एकाग्रचित्ताने आणि श्रद्धापूर्वक ऐकत असल्यास वक्त्याच्याही वाणीस जणू घुमारे फुटतात. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या भक्तीरसांत रंगून गेलेले ते दोन निष्ठावंत भक्त प्रभूंच्या लीलांचे सतत श्रवण, चिंतन आणि मनन करीत होते. या ब्रह्माण्डाची रचना आणि कार्य, वेदांतील अनेक क्लिष्ट तत्त्वें, अगम्य घटना, ईश्वरी संकेत आदि अनेक विषयांवर तिरुमलदास अतिशय सुलभ आणि रसाळ वाणींत प्रबोधन करीत होते. श्रीपादांचे स्मरण करून ते म्हणाले, " शंकरभट्टा, या सृष्टीच्या प्रारंभी पंचमहाभूतें निर्माण झाली. विधात्याने सर्वप्रथम या पंचमहाभूतांपासून हिरण्यगर्भ म्हणजेच प्राणांची निर्मिती केली. या प्राणमय कोशात स्थित असलेल्या जीवधातू शक्तीला शरीर असे म्हणतात. या ईश्वरी तत्त्वांचे आकलन करण्यासाठी ज्ञानेंद्रिये आणि ते जाणून योग्य कर्मे करण्यासाठी कर्मेंद्रिये यांची रचना झाली. शरीरातील प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता असते. त्या त्या देवतेच्या प्रभावानेच ती इंद्रियें कार्यरत असतात. ही ५ ज्ञानेंद्रिये आणि ५ कर्मेंद्रिये यांचे नियंत्रण मन करत असते. साधकाने नेहेमीच सात्विक आहार घेतला पाहिजे. जसा आहार तसेच आपले विचार होतात. मनुष्याच्या कर्माचरणाचे मूळ कारण अहंकार होय. थोडक्यांत मनुष्यांस कर्मानुसारच फलप्राप्ती होत असते. अर्थात मन प्रसन्न आणि संतुलित असल्यास अहंकार शेष राहत नाही. अशा साधकाच्या ध्यानादि उपासना, मंत्र, इतर कर्मे सत्वर फलित होतात आणि तो मुक्तावस्था पावून परब्रह्मात लीन होतो. या शरीरांत प्राण, विश्वास, आकाश, वायु, अग्नी, जल, भूमी, इंद्रिये, मन, अन्न, बल, विचार, मंत्र, कर्म, लोक, लोकांतील विविध नावे अशा सोळा कळा असतात. अहंकार पूर्णपणे नामशेष झाल्यावरच आत्मसाक्षात्कार होतो, त्यावेळी ह्या सोळा कला आपल्या मूलतत्वांत विलीन होतात आणि आत्मज्ञान ब्रह्मस्वरूपात लीन होते. आत्मसाक्षात्कारी योग्यांस जन्मांतरांचे कर्मफळ शेष राहत नाही. हेच थोर सिद्ध योगीमुनी आपल्यासारख्या मुमुक्षांस त्या परमात्म्याच्या दिव्य लीलांचे दर्शन घडवतात. मात्र एखाद्या योग्यास जर आपल्या योगशक्तीचा अहंकार झाला तर तो परमात्मा पुन्हा एकदा तो अहंकार नष्ट करून त्यास आत्मोन्नतीचा योग्य मार्ग दाखवितो. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी या सकल षोडश कलांनी परिपूर्ण असे परब्रह्म आहेत.

पूर्वी, आईनविल्ली येथे संपन्न झालेल्या महायज्ञांत श्रीवरसिद्धी विनायक म्हणजेच महागणपती प्रगट झाले होते. त्यावेळी, त्या परब्रह्माने श्री बापन्नार्यांना एक विशेष कार्य करण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार, श्री बापन्नार्यांच्या अध्वर्यत्वाने श्रीशैल्यास सूर्यमंडळातील तेजाचा शक्तिपात झाला होता. त्या दिवशीच गोकर्ण क्षेत्री, काशीमध्ये, बदरी आणि केदार या क्षेत्रीदेखील एकाच वेळी त्या परमात्म्याच्या विशेष अनुग्रहाने शक्तिपात झाला होता. श्री दत्तप्रभूंनी घेतलेला हा श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार आणि हा शक्तीपात ह्या दोन अत्यंत अनाकलनीय अशा दैवी घटना आहेत.

श्री दत्तात्रेय या विश्वाचे चालक, नियंते असून मोक्षदाते आहेत. त्यांच्यापासून त्रिमूर्ती आणि या त्रिमूर्तींपासून तेहत्तीस कोटी देव-देवता उत्पन्न झाल्या. यास्तव, केवळ श्री दत्तात्रेयांचे नामस्मरण केले असता सर्व देवतांचे पूजन-अर्चन यांचा लाभ होतो. त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या दिव्य पादुकांचे केलेले भावपूर्ण पूजनदेखील अपूर्व फळ देते. स्मरतां क्षणीच प्रसन्न होणाऱ्या या परब्रह्माचे वर्णन करण्यास मानवच काय तर सर्व देवता आणि ऋषीमुनींसुद्धा असमर्थ आहेत. ' मी माझ्या भक्तांचा उद्धार करणारच.' असे ब्रीद असलेल्या श्री दत्तप्रभूंस पुन्हा पुन्हा प्रणाम ! त्रिमूर्ती स्वरूपांतील श्रीदत्तप्रभूंची आराधना करतांना ब्रह्ममुखाचे ऋषीपूजन करावे. श्री विष्णुमुखाचे श्री सत्यनारायण व्रत व विष्णु सहस्त्रनाम आवर्तन करतांना अर्चन करावे. तर रुद्रमुखास, रुद्राभिषेकाने अभिषेक करावा. श्रीदत्तप्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिव्हेवर विद्याधात्री सरस्वती वास करते. श्री विष्णूमुखाच्या वक्ष:स्थळी ऐश्वर्यप्रदायिनी लक्ष्मीचा वास आहे, तर रुद्रमुखाच्या वामभागी आदिशक्ती गौरीचा वास आहे. सृष्टीतील सकल स्त्री देवता शक्ती श्रीपादांच्या वामभागी आणि पुरुष देवता दक्षिण भागी विराजमान आहेत. तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री वेंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूच आहेत. पूर्व युगांत श्री दत्तात्रेयांनी सोळा अवतार घेतले होते. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत : १) योगीराज, २) अत्रिवरद, ३) दिगंबरावधूत, ४) कालाग्निशमन, ५) योगीजन वल्लभ, ६) लीला विश्वंभर, ७) सिद्धराज, ८) ज्ञानसागर, ९) विश्वंभरावधूत, १०) मायामुक्तावधूत, ११) आदिगुरु, १२) संस्कारहीन शिवस्वरूप, १३) देवदेव, १४) दिगंबर, १५) दत्तावधूत, आणि १६) श्यामकमल लोचन.

श्रीहरी विष्णूंनी ज्यावेळी वामनावतार घेतला, साधारण त्याच सुमारास जन्मत: ब्रह्मज्ञानी असलेले महर्षी श्री वामदेव यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्माचे वैशिष्ट्य असे की त्यांनी त्यांच्या मातेच्या गर्भातून दोनदा जन्म घेतला. श्रीपादप्रभूंचा जन्मदेखील असाच झाला होता. प्रथमतः ते केवळ ज्योती स्वरूपांत प्रगट झाले होते. त्यानंतर, देव-देवता, महायोगी, ऋषिगण आणि सिद्धपुरुष यांनी त्यांची प्रार्थना केली असता, मातेच्या गर्भातून ज्योतीरूपाने बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झालेल्या श्रीपादप्रभूंनी भाद्रपद शुक्ल चतुर्थीस ( श्रीगणेश चतुर्थी ) अवतार घेतला. दोनदा जन्म झालेला हा महागणपतीरूपी श्री दत्तात्रेयांचा अवतार सकल षोडश कलांनी परिपूर्ण आणि पूर्ण ब्रह्मज्ञानी होता. श्रीपादप्रभूंचे जन्म नक्षत्र चित्रा आणि या नक्षत्राचा अधिपती अंगारक (मंगळ) आहे. त्यामुळे, चित्रा नक्षत्र असतांना केलेले श्रीपादांचे पूजन अत्यंत शुभदायक फळ देते.

पूर्वी समाजांत चतुर्वर्ण पद्धती अस्तित्वात होती. मात्र श्रीपाद प्रभूंनी ह्या वर्णाश्रमधर्माला व्यावहारिकदृष्ट्या व्यापक स्वरूप आणि नवी दृष्टी दिली. ब्राह्मणांनी वेदवचनांचे पालन करून ब्रह्मज्ञानप्राप्ती हेच आपले जीवनध्येय ठेवावे, तरच तो खरा ब्राह्मण होय. असे धर्मयुक्त आचरण न करता दुराचारी वर्तन करणाऱ्या ब्राह्मणाचे ब्राह्मतेज लय पावते आणि कर्मफलानुसार त्याचा पुढील जन्म चांडाळयोनींत होतो. त्याचप्रमाणे क्षत्रियाने क्षात्रधर्माचे पालन करावे. क्षत्रियाने ब्रह्मज्ञानाच्या आकांक्षेने निरंतर तपाचरण केल्यास त्यास ब्राह्मणत्व प्राप्त होते. ऋषी विश्वामित्र यांनी आपल्या कठोर तपश्चर्येनें ब्राह्मणत्व प्राप्त केले होते आणि जन्माने ब्राह्मण असणाऱ्या भगवान परशुरामांनी क्षात्रधर्म अंगिकारला. याच नियमानुसार, जन्मत: वैश्य अथवा शुद्र हेदेखील विहित कर्मे करून ब्रह्मज्ञानी होऊ शकतात. याचेच एक उदाहरण म्हणून तू माझ्याकडे बघ. मी केवळ एक रजक आहे, तरीही श्रीपाद प्रभूंच्या कृपेनें मलासुद्धा ब्रह्मज्ञान प्राप्त झाले नाही का ? केवळ एका विशिष्ट वर्णात आपला जन्म झाला म्हणजे आपला तोच वर्ण हा नियम नसून आपल्या आपल्या कर्माचरणावर आपला वर्ण ठरतो. इतकेच नव्हें, तर पुढील जन्मसुद्धा शेष कर्मफलानुसारच प्राप्त होतो.

त्यानंतर तिरुमलदासांनी कर्मफल मीमांसा याविषयी सविस्तर वर्णन केले. 'ह्या कर्मचक्रातून प्रत्यक्ष देवदेवताही मुक्त होऊ शकत नाही, आपले संचित कर्म भोगण्यासाठी त्यांना या पृथ्वीतलावर पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो.' हा सिद्धांत शंकरभट्टांना समजावून सांगताना त्यांनी अहिल्या, सीता, द्रौपदी, तारा, मंदोदरी या महापतिव्रता पंचकन्या आणि त्यांच्या पूर्वजन्मांचे रहस्य कथन केले. निरंतर श्रीपादांचे नामस्मरण अथवा ध्यान केले असता तो अवघा परिसर अतिशय शुभ आणि पवित्र स्पंदनाने भरून जातो. साधकांस तेथे अपूर्व अशा मनःशांतीचा अनुभव येतो. पीठिकापुरांतील ग्रामस्थांच्या जन्मांतरीच्या पुण्यकर्माचे फलित म्हणून श्री दत्तात्रेयांनी तेथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वरूपांत अवतार घेतला. मात्र सद्गुणी, सदवर्तनी भाग्यवंतच त्यांचे खरे स्वरूप ओळखू शकले आणि मोक्षप्राप्ती, आत्मोन्नती करण्यास पात्र ठरले. एखादा अभक्त अनन्यभावानें अथवा आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप होऊन श्रीपाद श्रीवल्लभांना शरण आल्यास, त्या करुणासागर प्रभूंनी नेहेमीच त्याचा उद्धार केला, त्यांस अभय दिले.

त्यावेळीं पीठिकापुरांत एका बालोन्मत्त अवधूताचे आगमन झाले. त्या सिद्धपुरुषाच्या मार्गदर्शनाने स्वयंभू श्री दत्ताची मूर्ती एका नदीत सापडली. लवकरच एका शुभ मुहूर्तावर त्या स्वयंभू दत्तात्रेयांची श्री आप्पलराज शर्मा आणि सुमती महाराणी या सद्गुणी दाम्पत्याच्या हस्ते विधीवत पुन:प्रतिष्ठापना झाली. त्याच दिवशी श्री बापन्नार्य यांनी त्या अवधूतांस आपल्या घरी भिक्षेस येण्याची प्रार्थना केली. ते सिद्धपुरुष भिक्षेसाठी त्यांच्या घरी आले असता, त्यांना श्रीपाद स्वामींचे दर्शन झाले. केवळ दोन वर्षाच्या त्या तेजस्वी बालकास पाहिल्यावर त्या अवधूतांच्या मनात पुत्रवात्सल्य उत्पन्न झाले आणि त्यांची समाधी लागली. तेव्हा, " माधवा, मी सोळा वर्षाचा झाल्यावर हरिहर-बुक्कराय हिंदू साम्राज्याची स्थापना करेल. त्याच्या दरबारांत तू विद्यारण्य महर्षि या नावाने प्रख्यात होशील. पुढील शतकांत तू तुझ्या सहोदराच्या वंशात राजर्षी गोविंद दिक्षित म्हणून जन्म घेशील आणि तंजावूर संस्थानाचा विद्वान महामंत्री होशील." असा श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यास कृपादृष्टांत दिला. श्रीपादांचे हे आशीर्वचन ऐकून त्या अवधूताचे अष्टभाव जागृत झाले, त्याने तुष्ट चित्ताने बाळ श्रीपादांना आपल्याजवळ घेतले. इतक्यात, श्रीपादांनी त्या सिद्धास साष्टांग नमन केले. प्रत्यक्ष दत्तप्रभूंनी नमस्कार केल्यामुळे दिग्मूढ झालेल्या त्या अवधूतास पाहून श्रीपाद आपल्या मधुर वाणींत बोलू लागले, " त्या पुढचा तुझा जन्म शृंगेरी पीठाधिपती म्हणून होईल. तुझे नाव विद्यारण्य असेल आणि तू पुन्हा तुझ्याच शिष्यपरंपरेत कृष्ण सरस्वती म्हणून जन्म घेशील. तुझ्या मनांत माझ्याविषयीं पुत्रवात्सल्यभाव निर्माण झाला आहे. या कारणास्तव, तू कृष्णसरस्वती होऊन मला माझ्या पुढील नृसिंहसरस्वती नामक अवतारात काशी क्षेत्रीं संन्यास दीक्षा देशील. त्यावेळीं श्री काशी विश्वेश्वर आणि माता अन्नपूर्णा यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. " श्रीपादांची ही भविष्यवाणी ऐकून त्या सिद्धपुरुषाने त्यांना मनोमन वंदन केले. त्या अवधूताच्या अनंत जन्मांची पुण्याई जणू फळाला आली आणि त्याला प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे दर्शन आणि कृपाशिर्वाद यांचा लाभ झाला.

त्या पीठिकापुरांत श्रीपाद श्रीवल्लभ नामक केवळ दोन वर्षाच्या बालकरूपांत असलेल्या श्री दत्तप्रभूंनी अगणित बाललीला केल्या आणि आपल्या भक्तांना आपण षोडश कलांनी परिपूर्ण असा महा-अवतार असल्याची वारंवार प्रचिती दिली. इथपर्यंतची कथा सांगून तिरुमलदास शंकरभट्टांस म्हणाले, " आज आपण इथेच थांबू. उद्या पुन्हा मी तुला श्रीपाद श्रीवल्लभांच्या आणखी लीला, चरित्र कथा सांगेन. " श्रीपाद श्रीवल्लभांचे हे दिव्य चरित्र त्यांच्याच निस्सीम भक्ताकडून ऐकण्याचा हा अपूर्व योग आपल्यास लाभला, हे आपले सद्भाग्यच आहे, असा विचार शंकरभट्टांच्या मनीं आला. आपल्यावर सतत अशीच स्वामींची कृपादृष्टी रहावी, अशी प्रार्थना करीत ते लवकरच निद्राधीन झाले.

॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥

अध्याय फलश्रुती - संतान प्राप्ती, श्री कृपा, ऐश्वर्य लाभ


No comments:

Post a Comment