श्रीपाद प्रभूंची बहुरूपधारण लीला, श्रीपाद श्रीवल्लभस्वामींचा नरसावधानींस आत्मबोध आणि खगोल वर्णन
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री गुरुवे नम: ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
दुसऱ्या दिवशी प्रातःकाळीच श्री तिरुमलदास आणि शंकरभट्ट यांनी स्नान-संध्या करून श्रीपादप्रभूंचे पूजन केले. थोडा वेळ ध्यानधारणा झाल्यावर शंकरभट्टांनी तिरुमलदासास नरसावधानींची उर्वरित कथा सांगण्याची प्रार्थना केली. तिरुमलदासही प्रसन्न चित्ताने सांगू लागले, " वत्सा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा आहे. केवळ यामुळेच श्रीपाद वल्लभांचे दिव्य चरित्र रचण्याचे महान कार्य तुझ्या हातून होणार आहे. त्यांचे चरित्र, त्यांच्या लीला पूर्णतः समजणे ही सर्वथा अशक्यप्राय गोष्ट आहे. तरीही त्या अथांग चरित्रसागरातून आपण काही अद्भुत रत्नें वेचू या."
श्रीपाद प्रभूंच्या कृपाकवचामुळे नरसावधानींचे मृत्यू गंडांतर टळले खरें, मात्र त्यानंतर त्यांची साधनाशक्ती क्षीण झाली. त्यांना पूर्वीप्रमाणें जप-ध्यानादि करणे जमेनासे झाले. त्यांची आर्थिक स्थितीदेखील खालावली. पीठिकापुरांतील ग्रामस्थ आता त्यांच्याशी आदरपूर्वक वागत नव्हते. त्यांची प्रतिष्ठा हळूहळू लोप पावू लागली. अशा अतिशय कष्टमय परिस्थितीत ते एक दिवस भिक्षेसाठी घराबाहेर पडले. त्यावेळी महाचार्य बापन्नाचार्युलु आपल्या घरी परतत होते. त्यांच्या कडेवर बाल श्रीपाद होते. आजोबांचे घर गावांतच असल्याने लहानपणीं श्रीपाद प्रभू अनेकदा आजोबांच्या घरीच राहात असत. तसेच, श्री नरसिंह वर्मा व श्री वेंकटप्पा श्रेष्ठी या दोन भाग्यवंताच्या घरीही स्वेच्छेने जात असत. आपल्या आजोबांच्या कडेवर असलेल्या त्या गोंडस दिव्य बालकाला आपण जवळ घेऊन त्याचे लाड करावेत, असे नरसावधानींना तीव्रतेनें वाटले. त्या क्षणींच श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहून अतिशय मंद आणि मोहक असे स्मित केले. त्या लोभस शिशुकडे पुन्हा पुन्हा वळून बघतच, नरसावधानी भिक्षेसाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. तो काय आश्चर्य ! त्यांना तिथे बाळ श्रीपाद श्रेष्ठींच्या मांडीवर खेळत असलेले दिसले. पुन्हा एकदा त्या लडिवाळ बालकाकडे नरसावधानी मायेनें पाहू लागले आणि बाळ श्रीपाद आपल्याकडे पाहून मिस्किलपणे हसत आहे, असे त्यांना वाटले. श्रेष्ठींच्या घरातून भिक्षा घेऊन ते नरसिंह वर्माच्या घरी भिक्षा मागण्यास गेले अन तेथील दृश्य पाहून ते दिग्मूढ झाले. नरसिंह वर्मांच्या खांद्यावर श्रीपाद प्रभू आनंदाने खेळत होते. यावेळीही नरसावधानींकडे पाहून श्रीपाद पुन्हा एकदा मिस्किलपणे हसू लागले. एकाच वेळी बाळ श्रीपाद श्रेष्ठींच्या घरी, वर्मांच्या घरी व आजोबा बापन्नाचार्युलु यांच्या कडेवर अशा अनेक ठिकाणी होते. आपणांस हा भास होतो आहे का हे स्वप्न आहे, याचा नरसावधानींना काहीच उलगडा होईना. मात्र श्रीपाद हे दत्तप्रभूच आहेत, अशी त्यांची दृढ भावना झाली.
दिवसोंदिवस वाढत चाललेल्या लोकनिंदेने नरसावधानी आणि त्यांची पत्नी अत्यंत कष्टी होत असत. एके दिवशी, हा सर्व प्रकार असह्य होऊन ते उभयंता देवघरांत प्रार्थना करीत असतांनाच तिथे श्रीपादस्वामी प्रगटले. त्यांना पाहून त्या पती-पत्नीस अतिशय आनंद झाला. प्रभूंना मनःपूर्वक नमन करून त्या पती-पत्नींनी त्यांची करुणा भाकली. त्यावेळीं, देवघरात बसून श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या धर्मपत्नीस हितोपदेश केला.
श्रीपाद श्रीवल्लभ आपल्या दिव्य वाणींत बोलू लागले, " ह्या अखिल ब्रह्माण्डाचा मी उत्पत्तीकर्ता , चालक आहे. या समस्त सृष्टींत विद्यमान असलेली अदृश्य शक्ती मीच आहे. सर्वांच्या हृदयांत स्थिर असलेला सर्वांतर्यामी असा मी ब्रह्म आहे. या पृथ्वीतलावर गुरुस्वरूप अवतारीत होणारा केवळ मीच आहे. मीच निराकार व निर्गुण भगवान दत्तात्रेय असून तुम्हाला माझी ओळख पटण्यासाठी मी हे शरीर धारण केले आहे. महर्षी अत्रि आणि महापतिव्रता अनसूया यांच्या तीव्र तपश्चर्येचे फलित म्हणून त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार झाला. तसेच, त्रिमूर्तिंच्या शक्ती एकत्र येऊन त्यांनी अनघादेवी हे रूप धारण केले. साकार वा निराकार, सगुण अथवा निर्गुण या सर्वांचा आधार मीच आहे. जो पर्यंत तुझ्यात ही 'स्व'ची जाणीव असेल, तो पर्यंत सुख-दु:ख, पाप-पुण्य अशा द्वंद्वातून तुझी सुटका होऊ शकत नाही. ज्यावेळीं तुला माझी जाणीव होईल, तेव्हा या संसारचक्रातून तू मुक्त होशील. ह्या द्वैत-अद्वैताच्या साक्षात्कारानंतरच तुला मोक्ष अथवा ब्रह्मानंदस्थितीचा अनुभव येईल. या दोन्ही स्थितींचे वर्णन करणे ज्ञानेंद्रियांनाही अगम्य आहे. तथापि, कर्मसूत्रांच्या नियमानुसार पाप-पुण्यांस अनुसरून सुख-दु:ख प्राप्त होत असल्या कारणाने या सृष्टीतील सर्व चराचर, प्राणिमात्र संसारचक्रांत पुन्हा पुन्हा गुंतले जातात. अनेक जन्मबंधनांत अडकले जातात. प्रत्येक जीव आपल्या संचित कर्मांनुसार जन्म घेतो. पुण्यसंचय झाल्यास आयुष्य, ऐश्वर्य, कीर्ती, धन, सौंदर्य याची प्राप्ती होते, तर पापक्षालनार्थ दारिद्रय, अल्पायुषी, कुरूप आदी भोगावे लागते. तसेच, सर्व प्रकारच्या संसार बंधनांतून मुक्त झालेले अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंद सुखाचा अनुभव घेतात. माझ्यात लीन झालेले अवधूतसुद्धा माझी आज्ञा झाल्यास पुन्हा जन्म घेतात. ह्या सृष्टीमध्ये केवळ संकल्पमात्रें सृजन करण्याचे सामर्थ्य असलेल्या ईश्वरास आवश्यकतेनुसार सृष्टीक्रमांत बदल घडविणे सहज शक्य आहे, हे तू लक्षांत ठेव.
धर्माचरण अथवा वेदांतील नियमांविषयी जर कधी वाद निर्माण झाला तर वेदशास्त्रांचा संदर्भ घेऊन शंका निवारण करावे. शास्त्रानुसार आचरण करावे अथवा करू नये ह्याविषयी जर समाधानकारक उत्तर मिळत नसेल तर, सदाचारी, थोर सत्पुरुषांचे वचन वेदवाक्यासमान मानावे. माझे आजोबा, माझे माता-पिता, तसेच नरसिंह वर्मां यांच्या पूर्वजन्मांच्या पुण्यकर्मांची फलप्राप्ती म्हणूनच हा माझा अवतार झाला. त्या तीन घराण्याशी माझे ऋणानुबंध पूर्वापार आहेत. माझा वरदहस्त आणि कृपा त्यांच्यावर वंशोवंशी असेल. तुमचे शुभाशुभ कर्म यांस अनुसरूनच मी वर्तन करीत असतो. अनन्य शरणागत झालेल्या माझ्या भक्तांचे मी सदैव रक्षण करतो."
त्यानंतर श्रीपाद प्रभूंनी ब्रह्माण्डाची निर्मिती कशी झाली, या सृष्टीचे कार्य कसे चालते ? याविषयीं विवरण केले. परमात्म्याने आपल्या अनिर्वचनीय अशा शक्तीचा अल्प अंश वापरून ही सृष्टी रचण्यासाठी ब्रह्मदेवाची उत्पत्ती केली. पूर्णतः जलरूप असलेल्या या सृष्टीतील अंधकार आपल्या तेजाने नाहीसा केला. वेदांनी त्या परमात्म्यालाच हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परंज्योती अशा अनेक संज्ञानी संबोधिले आहे. त्या सत्यलोकात निरामय नावाचे एक स्थान आहे. वसु, रुद्रादित्य नावाचे पितृगण या निरामय स्थानाचे संरक्षक आहेत. मूल प्रकृति स्थान असणारे, ब्रह्मलोक चतुर्मुख ब्रह्माचे निवासस्थान आहे. त्यावर प्रख्यात असलेले श्रीनगर आहे. त्याच्यावर महा कैलास, त्यावर वैकुंठ आहे. महर्लोकात सिद्धादि गणांचा वास आहे. पुढें, स्वर्गलोकात अमरावती नगरीमध्ये देवेंद्रादि देवतांचे वास्तव्य आहे. खगोलाशी संबंधित ग्रह-नक्षत्रादि असलेले भुवर्लोकात विश्वकर्मा नामक देव-शिल्पीचा वास करतो. त्यानंतर भूलोक जिथे मानवांचा वास आहे, आणि शेवटी सप्त पाताळ आहेत. थोडक्यात, स्वर्ग, मर्त्य, आणि पाताळ अशी सृष्टीची रचना आहे. पुढें, प्रभूंनी प्रत्येक लोकांत वास करणारे देवदेवता, ऋषी-मुनी, द्वीप, द्वीपाधिपती यांचेही सविस्तर वर्णन केले. बाळ श्रीपादांनी केलेला हा आत्मोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांच्या पत्नीने अत्यंत भक्तिभावाने त्यांना वंदन केले. त्या दिव्य बालकाच्या श्रीचरणांवर नतमस्तक व्हावें म्हणून ते उभयंता पुढे झाले असता श्रीपादांनी त्यांना " पुढच्या जन्मी माझा तुम्हांस अनुग्रह होईल, असा माझा आशीर्वाद आहे. मात्र, माझ्या पादुकांस स्पर्श करण्याचे भाग्य या जन्मीं तुम्हांला नाही." असे सांगितले. श्रीपादांचे तें वचन ऐकताच नरसावधानी व त्यांच्या पत्नीला आपल्या वर्तनाचा पश्चात्ताप झाला. त्यांनी अनन्यभावें श्रीपाद श्रीवल्लभांची क्षमा मागितली. कोटयानुकोटी ब्रह्मांडांचे सृजन, रक्षण व लय करणाऱ्या त्या करुणासागर प्रभूंनी आपला वरदहस्त त्यांच्या मस्तकीं ठेवला आणि ते अदृश्य झाले. पुढे लवकरच, श्रीपाद स्वामींच्या आशीर्वचनांनुसार स्वयंभू दत्ताच्या मूर्तीचा शोध लागला आणि पिठीकापुरांतील मंदिरांत त्या जागृत मूर्तीची शास्त्रोक्त प्रतिष्ठापनाही झाली. श्री नरसावधानींना पुन्हा एकदा गावांत मान-सन्मान मिळू लागला. ते पती-पत्नी श्रीपादांच्या लीलांचे स्मरण करीत श्री दत्तभक्तींतच आपलें उर्वरित आयुष्य व्यतीत करू लागले. पीठिकापुरांत बालरूप धारण केलेल्या त्या जगत्प्रभूच्या बालपणीच्या सर्व लीला अगम्य आणि अनाकलनीय आहेत, हेच खरें !
॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
अध्याय फलश्रुती - अज्ञान निवृत्ती, विवेक प्राप्ती
No comments:
Post a Comment