सुबय्या श्रेष्ठीची कथा, श्री आपळराजांची ऋणमुक्तता, श्रीपादांची वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, व बापनार्युलु यांच्या वंशांवर कृपादृष्टी आणि श्री नरसिंह राजवर्मा यांस स्वप्न-दृष्टांत
॥ श्री गणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री गुरुवे नम: ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
श्रीपादप्रभूंच्या तिरुमलदासास झालेल्या आदेशाचे पालन करीत शंकरभट्टांनी कुरवपुरास प्रयाण केले. तिरुमलदासांनी त्यांचे यथायोग्य आतिथ्य तर केलेच होते, मात्र त्याहूनही अधिक असा श्रीपाद श्रीवल्लभांच्या लीलांचा अनमोल ठेवा शंकरभट्टांस दिला होता. प्रभूंच्या त्या शब्दातीत बाललीलांचे पुन्हा पुन्हा स्मरण करीत शंकरभट्टांचा प्रवास सुरु होता. काही वेळ चालल्यानंतर त्यांना दूरवर एक अश्वत्थ वृक्ष दिसला. एव्हाना माध्याह्न समय झाला होता. दुपारच्या भोजनाचा काही तरी प्रबंध करावयास हवा, असा विचार ते करू लागले. तेव्हढ्यात त्यांना त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत आहे, असे दिसले. त्या व्यक्तीसच जवळपास एखाद्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षा मिळेल का ? हे विचारावे म्हणून ते त्या वृक्षाकडे वळले.
अश्वत्थाजवळ आल्यावर त्यांना एक यज्ञोपवीत धारण केलेला जटाधारी पुरुष दिसला. त्या योगीराजाचे डोळे जणू करुणेने ओतप्रोत भरलेले होते आणि तो अतिशय तन्मयतेने श्रीपाद श्रीवल्लभांचे नामस्मरण करीत होता. एक झोळी आणि त्यात असलेले एक ताम्रपात्र एवढीच काय ती त्याची साधन-सामुग्री दिसत होती. शंकरभट्टांना पाहताच मंद स्मित करीत त्याने त्यांची विचारपूस केली. आपली ओळख सांगून त्या योगीस वंदन करीत शंकरभट्ट म्हणाले, " श्रीमान, आपण श्रीपाद प्रभूंचे कृपांकीत भक्त आहात का ? तुम्हाला त्यांच्या दर्शनाचा लाभ झाला आहे का ?"
त्यावर गंभीर स्वरांत ते मुनी बोलू लागले, " माझे नाव सुबय्या श्रेष्ठी असून माझा जन्म वैश्य कुळांत झाला आहे. पिठीकापुरांतील पिढीजात संपन्न असलेल्या आमच्या घराण्यांत अनेक धार्मिक दिव्य ग्रंथांच्या पारायणाची परंपरा असल्याने आम्हांला ' ग्रंथी ' असेही म्हणतात. माझ्या लहानपणीच माझ्या माता-पित्याचे छत्र हरपले. युवावस्थेत आल्यावर मी देशाटन करीत व्यापार करू लागलो. त्या सुमारास मळयाळ देशातील पालक्काड प्रांतातील बिल्वमंगल नावाच्या ब्राह्मणाशी माझी ओळख झाली. आम्ही दोघे मिळून काही काळ व्यापार करु लागलो. व्यापारांत आम्हांला भरपूर फायदा होत होता. दुर्दैवाने, आम्ही वाईट संगतीस लागलो आणि मद्य, जुगार, वैश्या अशा अनेक व्यसनांत आमचे धन आम्ही उडवू लागलो. पुढे, अरबांशी केलेल्या एका अश्व व्यापारांत आमचे अतोनात नुकसान झाले आणि आम्ही कर्जबाजारी झालो. त्या धक्क्याने माझी धर्मपत्नी मृत्यू पावली. थोड्याच दिवसांत आमच्या मंदबुद्धी पुत्राचाही अकाली मृत्यू झाला. अर्थात हे सर्व माझ्या कुकर्मांचे भोग होते."
" पिठीकापुरांत व्यापार करीत असतांना मी कुठल्याही धर्मनियमांचे पालन करीत नसे. विशेष करून ऋणवसुली करतांना देव-ब्राह्मणांचा विचार न करता अतिशय स्वार्थी आणि निर्दयी असे माझे वर्तन होते. एकदा श्रीपादप्रभूंचे पिता श्री आपळराज यांच्याकडे आईनविल्ली येथून त्यांचे काही नातेवाईक आले. त्यावेळीं, त्या सर्वांची भोजन व्यवस्था करण्यासाठी पुरेसे धन त्यांच्याकडे नव्हते. आपळराज हे श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या घरी पौरोहित्य करत असले तरी, केवळ धर्मनियमांनुसार मिळणारी दक्षिणाच स्वीकारत असत. त्यामुळे, त्यांच्या दुकानांत न जाता ते माझ्या दुकानात आले आणि अगदी नाईलाजाने त्यांनी एक वराह एव्हढ्या किमतीचे जिन्नस उधारीवर देण्याची मला प्रार्थना केली. तसेच, मला धन मिळाल्यावर मी आपले देणें त्वरित फेडेन, अशी ग्वाही दिली. तेव्हा मी आपळराजांना जिन्नस दिले खरे, मात्र काही काळानंतर मी खोटे हिशेब दाखवून चक्रीवाढ व्याज आकारत, ' आपण मला आता १० वराह देणे बाकी आहे. ' असे त्यांना कळविले. वास्तविक पाहता, माझा राजशर्मांच्या राहत्या घरावर डोळा होता. त्यांच्या परिवारास गृहत्याग करणे भाग पडावे, अशी माझी कुटील योजना होती. तदनुसार, मी लवकरच राजशर्मांचे घर विकत घेऊन त्यांना १-२ वराह देऊन हा उधारीचा व्यवहार पूर्ण करणार, असे ग्रामस्थांना सांगत असे. माझे हे दुष्ट कारस्थान श्री वेंकटप्पय्या श्रेष्ठींनी मात्र त्वरित जाणले आणि क्रोधायमान होत मला म्हणाले, " अरे, धनांध होऊन तू आपळराज यांच्यासारख्या पुण्यात्म्यांचा अपमान करीत आहेस. आमच्या कुलपुरोहिताशी दुर्वर्तन केल्याचे फळ तुला लवकरच भोगावे लागेल, ह्याचे स्मरण ठेव. "
तरीही, मी माझा दुराग्रह सोडत नव्हतो. एक दिवस मी श्रेष्ठींच्या घरी आलो असता मला तिथे बाळ श्रीपाद खेळत असलेले दिसले. पुन्हा एकदा आपळराजांचा पाणउतारा करावा या हेतूने मी श्रेष्ठींस उपहासानें म्हणालो, " जर राज शर्मा माझे ऋण फेडू शकत नसतील तर त्यांनी त्यांच्या तीन पुत्रांपैकी एकास माझ्या दुकानात चाकरी करण्यास पाठवावे. अरे पण, त्यांचा एक पुत्र आंधळा, तर दुसरा पांगळा आणि तिसरा हा केवळ तीन वर्षाचा बालक आहे. त्यांमुळे हे तीन पुत्र माझी चाकरी करून पित्याचे ऋण फेडणे सर्वथा अशक्यच दिसते. नाही का ?" माझे हे कठोर बोलणे श्रेष्ठींना असह्य झाले, आणि त्यांच्या डोळ्यांत दुःखाश्रु आले. श्रीपादांनी आपल्या चिमुकल्या हातांनी त्यांचे अश्रू पुसले आणि शांतपणे म्हणाले, " आजोबा, मी असतांना आपण का कष्टी होता ?" आणि माझ्याकडे वळून म्हणाले, " अरे सुबय्या, मी माझ्या पित्याचे हे ऋण फेडीन. मी आत्ताच तुझ्या दुकानात सेवा करून माझ्या पित्यास ऋणमुक्त करेन. मात्र, तुझे देणे देऊन झाल्यावर तुझ्या घरी लक्ष्मी राहणार नाही, हे लक्षांत ठेव." ' विनाशकाले विपरित बुद्धी... ' या वचनाप्रमाणे श्रीपाद स्वामींच्या या बोलण्याकडे मी पूर्णतः दुर्लक्ष तर केलेच, पण " श्रीपादांच्या ऐवजी मी तुमच्या दुकानात काम करतो. " ही श्रेष्ठींची विनंतीही मी धुडकावली. अखेर नाईलाजाने, बाळ श्रीपादांना घेऊन वेंकटपय्या श्रेष्ठी माझ्या दुकानात आले.
इतके बोलून सुबय्या श्रेष्ठी काही क्षण थांबला आणि आपले डोळे मिटून त्याने अतिशय उत्कटतेनें एकदा श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम घेतले. नंतर शंकरभट्टांकडे पाहत त्याने पुढील कथा सांगावयास सुरुवात केली. तो म्हणाला, " त्यावेळी एक जटाधारी संन्यासी दुकानात येऊन तांब्याच्या पात्राची चौकशी करू लागला. तातडीची गरज असल्याने त्या संन्याशाने अधिक किंमत देण्याचीही तयारी दर्शवली. त्याला हवे असलेल्या पात्राचे माझ्या दुकानांत खरे तर बत्तीस नग होते, मात्र मी त्याला " माझ्याकडे हे एकच पात्र शिल्लक आहे आणि त्याची किंमत दहा वराह आहे. " असे सांगितले. तो जटाधारी ती रक्कम देण्यास त्वरित तयार झाला, परंतु त्याने एक अट ठेवली. वेंकटपय्या यांच्या मांडीवर बसलेल्या बाळ श्रीपादांकडे पाहत तो म्हणाला, " केवळ या तेजस्वी बालकाच्या हातांनी ते पात्र मला द्यावे." या व्यवहारातील फायद्यावर डोळा ठेवून अर्थातच मी या गोष्टीला अनुमती दिली आणि त्याच्या मागणीनुसार बाळ श्रीपादांनी ते ताम्रपात्र त्या जटाधारी संन्याशास दिले. ते पात्र त्याच्या हातात देतांना बाळ श्रीपाद खट्याळपणे हसत म्हणाले, " झाले ना तुझ्या मनासारखे ? तुझ्या घरी लक्ष्मी अखंड राहील. तू आता संन्यासी वेष त्यागून गृहस्थाश्रम स्वीकार." त्यावर अत्यंत समाधानाने तो जटाधारी संन्यासी तेथून निघून गेला. मीही हा विशेष धनलाभ झाल्याने अहंकारपूर्ण स्वरांत म्हणालो, " ह्या विक्रीने मला फायदा झाला असल्याने अप्पळराज शर्मांचे दहा वराहाचे ऋण फिटले आणि त्यांच्याबरोबर केलेला हा उधारीचा व्यवहार पूर्ण झाला. या क्षणी श्रीपाद माझ्या ऋणातून मुक्त झाले. " ते ऐकून वेंकटपय्यांनी गायत्रीच्या साक्षीने मला अप्पळराज शर्मा ऋणमुक्त झाल्याचा पुनरुच्चार करावयास सांगितला. त्याप्रमाणे मी पुन्हा एकदा हा व्यवहार पूर्ण झाल्याचे माझे वचन बोलल्यावर बाळ श्रीपादांना घेऊन वेंकटपय्या आपल्या घरी परतले."
" मीही उरलेल्या एकतीस ताम्रपत्रांची नोंद करावी म्हणून दुकानाच्या आतल्या दालनात गेलो, तर काय आश्चर्य तिथे केवळ एकच ताम्रपात्र होते. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसेना, कारण काही वेळापूर्वीच तिथे बत्तीस पात्रें होती. खरोखर श्रीपाद प्रभूंच्या लीला अनाकलनीय आणि अगम्य होत्या. त्यांच्यासमोर बोललेले प्रत्येक वचन सत्य होत असे. प्रत्यक्ष श्री दत्तप्रभूंच्या दिव्य करकमलांनी ते ताम्रपात्र स्वीकारणाऱ्या त्या जटाधारी संन्याशाच्या भाग्याचे काय वर्णन करावे बरें ! त्याची कुठल्या जन्मींची पुण्याई फळास आली अन हा अलभ्य लाभ घडला, हे न कळें ! माझ्या उद्धाराची वेळ आली असतांना माझे दुर्दैव आडवे आले हेच खरे ! अशा रितीने श्रीपादप्रभूंनी अद्भुतरित्या केवळ काही क्षणांतच माझ्या खोट्या हिशोबाने आकारलेल्या ऋणाएव्हढी रक्कम मला मिळवून दिली आणि आपल्या पित्यास ऋणमुक्त केले."
इथपर्यंतची कथा सांगून सुबय्या श्रेष्ठी शंकरभट्टांस म्हणाले, " महाशय, आपण क्षुधेने व्याकुळ झालेले दिसत आहात. ' जर तुमच्या घरी कोणीही कधीही भुकेला-तहानलेला आला तर जात, धर्म, कुलादि यांविषयीं मनांत कसलाही किंतु न बाळगता प्रथम त्या व्यक्तीस आपल्या परिस्थितीनुसार खाऊ-पिऊ घाला.' असे श्रीपाद श्रीवल्लभ नेहेमीच आपल्या भक्तांना सांगत असत. तेव्हा, आपण आता आपल्या भोजनाची व्यवस्था करू. इथे जवळच एक जलाशय आहे, तेथे जाऊन तुम्ही संध्यादि उरकून घ्या. तोपर्यंत मी या वनातून केळीची व पळसाची पाने घेऊन येतो, आज आपण दोडक्याचे वरण आणि भात असे भोजन करू या." हे बोलणे ऐकून शंकरभट्टांस आश्चर्य वाटले. सुब्बय्याजवळ काहीच शिधा सामुग्री अथवा भोजन पात्रे दिसत नव्हती. त्यांमुळे इतक्या थोड्या कालावधीत हा आपल्यासाठी हे विशेष भोजन कसे बरे बनवणार ? असा विचार करीत ते जलाशयाकडे निघाले. तिथे मुखमार्जन करून, हात-पाय धुवून ते परतले, तोपर्यंत सुब्बय्याने दोन केळीची पाने मांडली होती आणि शेजारीच पळस पत्राचे द्रोणही ठेवले होते. त्याच्यासमोर ते झोळीतील ताम्रपात्र होते.
शंकरभट्टांस पाहताच त्याने त्यांना एका पानासमोर बसायची खूण केली. त्यानंतर, शांतपणे आपले डोळे मिटून काही क्षण तो ध्यानस्थ झाला. शंकरभट्ट हे सर्व नवलाईने पाहत होते. तेव्हढ्यात सुब्बय्याने डोळे उघडले. श्रीपाद प्रभूंचे नाम घेत ते ताम्रपात्र उचलले आणि त्या रिकाम्या पात्रातून द्रोणांत पाणी भरले. नंतर, त्याच भांड्यातून दोडक्याचे वरण आणि भातही वाढला. त्या दोघांनी आचमन, चित्राहुती करून भोजन केले. ते अत्यंत रुचकर पदार्थ प्रसाद म्हणून ग्रहण करताना शंकरभट्टांनी अपूर्व अशी तृप्ती अनुभवली. भोजनानंतर त्यांनी ते ताम्रपात्र पाहिले असता, ते पहिल्याप्रमाणेच रिकामे होते. त्यांच्या आश्चर्यास पारावार उरला नाही.
थोडा वेळ विश्रांती घेऊन सुबय्या पुन्हा एकदा श्रीपाद प्रभूंच्या लीला कथन करू लागला. " शंकरा, तुझ्या मनांत या ताम्रपत्राविषयी कुतुहूल आणि असंख्य प्रश्न आहेत ना ? तर आता पुढील वृत्तांत ऐक. बाळ श्रीपादांनी अनाकलनीय अशी लीला करून आपल्या पित्यास ऋणमुक्त केले, ही वार्ता पीठिकापुरांत वाऱ्याप्रमाणे पसरली. अप्पळराज आणि सुमती महाराणी यांच्या नेत्रांतून पुत्र वात्सल्यतेने अश्रुधारा वाहू लागल्या. त्या वेळी त्यांच्या घरी वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, बापनार्य आणि काही प्रतिष्ठित मंडळी जमली होती. मलाही तिथे बोलावले गेले. तिथे जाताच त्या ज्येष्ठ मंडळींसमोर मी श्री राजशर्मांचे उधारी देणे व्याजासहित फिटले, हे सर्वांना सांगितले. तरीही, कुणी एक जटाधारी येऊन दहा वराह देऊन ताम्रपात्र खरेदी करतो, त्यांमुळे आपण ऋणमुक्त झालो ह्याविषयी अप्पळराज शर्मा अजूनही साशंक होते. तेव्हा, बाळ श्रीपाद म्हणाले, " तात, पित्याला ऋणमुक्त करणे हे पुत्राचे कर्तव्यच आहे. मी केवळ तीन वर्षाचा बालक आहे, असे आपणांस वाटते. पंचमहाभूतांनीही ' मी श्री दत्तात्रेय आहे ' अशी साक्ष दिल्यावरदेखील, केवळ अज्ञानामुळे तुम्हांस याचा वारंवार विसर पडतो. ह्या सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय माझ्या संकल्पमात्रे होतो. ह्या सृष्टीचक्रांतील अनेक गूढ रहस्ये यांचे मी साक्षीभूत होऊन अवलोकन करतो. मी सर्वव्यापी, सर्वज्ञ आणि सर्वांतर्यामी असून ह्या दत्ततत्त्वाची सर्वांस कर्मफल आणि भावानुरूप अनुभुती देतो.
हा सुबय्या पूर्वजन्मी एका जंगलप्रदेशातील दत्तमंदिराचा पुजारी होता. अत्यंत दुर्वर्तनी असा हा पुजारी कधीच वेदधर्मानुसार आचरण करीत नसे. एके दिवशी, त्याने ती ताम्र दत्तमूर्ती विकली आणि ग्रामस्थांना मात्र दत्तमूर्ती चोरीला गेली, असे सांगितले. मूर्ती विकून आलेले धन त्याने अर्थातच वाममार्गाने खर्च केले. आज जो जटाधारी संन्याशी ताम्रपत्राच्या शोधात आला होता, तो पूर्वजन्मी सोनार होता. त्यानेच ती ताम्र दत्तमूर्ती त्या पुजाऱ्याकडून विकत घेतली होती. ती दत्तमूर्ती वितळवून बत्तीस ताम्रपात्रे बनवून त्याने धन कमावले होते, त्यामुळे ह्या जन्मी तो दरिद्री म्हणून जन्मला होता. त्या पुजाऱ्याने अनेक वर्षे श्री दत्तात्रेयांचे अर्चन केले होते, ह्याच पुण्यकर्मामुळे ह्या जन्मी श्रीमंत अशा श्रेष्ठी कुळात तो सुबय्या म्हणून जन्मला. पूर्वजन्मी तो सोनार नरसिंहाची आराधना करीत असे. त्या पुण्याईमुळे त्याला पूर्वजन्म स्मृती झाली आणि मला अनन्यभावाने शरण येऊन आपले दारिद्र्य हरण करण्याची आर्त प्रार्थना केली. मीही त्याच्या भक्तिभावाने प्रसन्न होऊन त्यास पीठिकापुर येथे येऊन माझ्या हातून ताम्रपात्र स्वीकार असा दृष्टांत दिला. हा सुबय्या खोटे हिशोब दाखवून दहा वराह इतके कर्ज दाखवणार, हे मला ज्ञात होते. म्हणूनच त्याला त्या संन्याशाकडून दहा वराह मिळतील, असा योग मी जुळवून आणला. माझ्या दृष्टांतानुसार तो आपल्या देणेदारांचा त्रास चुकविण्यासाठी जटाधारी संन्याशाचा वेष धारण करून पीठिकापुरांत आला. पुढील वृत्तांत आपणास ज्ञातच आहे."
त्यानंतर श्रीपाद प्रभू माझ्याकडे पाहत गंभीर स्वरांत बोलू लागले, " सुबय्या, तुझ्या दुकानात आता केवळ एकच ताम्रपात्र उरले आहे ना ? तू त्या जटाधारी संन्याशाकडून दहा वराह घेताच तुझे सर्व पुण्यफळ क्षय पावले. तुझी सर्व व्यसने, चिंतामणी नामक वैश्या, कर्जवसुली करतांनाचे तुझे वर्तन हे सर्व मी जाणतो. आपले कर्मभोग तुला आता भोगणे प्राप्त आहे. यापुढे तू झोळी घेऊन खाण्याचे पदार्थ विकशील. माझ्या पित्याने आतिथ्यासाठी तुझ्याकडून धन उधार घेतले होते आणि अतिथींस दोडक्याचे वरण आणि भात असा भोजन प्रबंध केला होता. काही काळाने तुझी अन्नान दशा होईल, त्यावेळी ह्या उरलेल्या एकाच ताम्रपात्रातून तुला गरजेपुरते पाणी, दोडक्याचे वरण आणि भात मिळेल, असा माझा तुला आशीर्वाद आहे. मी तुझा मृत्युयोगही दूर करत आहे. आज रात्री तुझ्या घराच्या दक्षिण दरवाजाजवळ एक म्हैस येईल. तिला तू स्वहस्तें रांधलेले दोडक्याचे वरण आणि भात खाऊ घाल. जेणें करून तुझे मृत्यू गंडांतर टळेल." त्यावेळी श्रीपाद क्रोधायमान दिसू लागले, तेथील सर्व मंडळींना ते जणू उग्र नृसिंहरूपांत दिसू लागले. सर्वांना भयभीत झालेले पाहून श्रीपाद पुन्हा मूळ स्वरूपांत आले आणि म्हणाले, " आजोबा, मीच नृसिंहमूर्ती आहे. परंतु, आपणास घाबरायचे काहीच कारण नाही. नरसिंह वर्मा - वेंकटप्पय्या श्रेष्ठींच्या आर्य वैश्यांचा, बापनार्य यांच्या लाभाद महर्षी गोत्राचा आणि माझा फार जुना अनुबंध आहे. त्यांच्यावर माझा वरदहस्त नेहेमीच राहील. तुमच्या वंशातील कोणत्याही पुरुषाने श्रीपाद श्रीवल्लभांची नवविधा भक्तींपैकी कुठल्याही मार्गाने आराधना केल्यास, माझी कृपादृष्टी तुमच्यावर राहील. तुमच्या तेहत्तीसाव्या पिढीच्या काळांत माझ्या जन्मस्थळी महासंस्थान निर्माण होईल. तिथेच माझ्या दिव्य पादुकांची स्थापना होईल." श्रीपाद प्रभूंची ही भविष्यवाणी ऐकून आम्ही सर्व जण स्तंभित झालो. हे तर प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयच आहेत, अशी आमची दृढ श्रद्धा झाली. अप्पळराज शर्मा - सुमती महाराणी यांनी पूर्वजन्मी दत्ताराधना केली होती, भगवान दत्तात्रेयांचा त्यांच्यावर वरदहस्त तर होताच, पण त्याचबरोबर वेंकटप्पय्या श्रेष्ठी, नरसिंह वर्मा, आणि बापनार्युलु यांच्याही अनेक जन्मांच्या ईश्वर उपासनेचे आणि पुण्यकर्मांचे फलित म्हणूनच या सत्शील दाम्पत्यापोटी दत्तात्रेयांनी अवतार घेतला. याच कारणास्तव या तिघांकडून धन स्वीकारले तर ते दान होत नाही, उलट ते धन न स्वीकारल्यास महापाप लागू शकते हेच श्रीपाद आपल्या पित्यास समजावू इच्छित होते.
सुब्बय्याने सांगितलेला हा दिव्यानुभव ऐकून शंकरभट्ट दिग्मूढ झाले. पण त्यांच्या मनांत एक शंका उद्भवली. त्यांनी सुब्बय्याला नम्रतापूर्वक विचारले, " स्वामी, श्रीपाद श्रीवल्लभ हे श्री दत्तात्रेयांचे अवतार आहेत, असे म्हणतात. पण मग तेच नरसिंह अवतार, शिवस्वरूप, श्रीकृष्ण आणि श्रीनिवासदेखील तेच आहेत असे म्हणता, ह्याचा कृपया खुलासा करावा." त्यांवर मंद स्मित करीत सुबय्या श्रेष्ठी उत्तरले, " महोदय, ह्या सकळ ब्रह्माण्डाचे नियंता असलेले श्रीपादस्वामी सकल देवता स्वरूप आहेत. तेच ब्रह्मा, श्री विष्णु आणि सदाशिव आहेत, त्यांच्या ठायीं सर्व देवी-देवता, ऋषी-मुनी यांचेही वास्तव्य असते. नवग्रह हे त्यांचेच स्वरूप आहे. शनिदेव कर्मकारक आहेत, मंगळ ग्रहांतील चित्रा नक्षत्रांवर श्रीपादांचा जन्म झाला. त्यामुळे, चित्रा नक्षत्र असता केलेले श्रीपादांचे पूजन अपूर्व असे फळ देते. श्रीपाद श्रीवल्लभ षोडश कलांनी परिपूर्ण आहेत. त्यांच्या प्रत्येक कलेमधून तन-मन-आत्मस्वरूपी (१० x १० x १० = १०००) अशी हजारो स्पंदने प्रवर्तित होतात. त्यांच्या अष्टविधा प्रकृतीच त्यांच्या भार्या आहेत. अशा प्रकारे, श्रीपाद श्रीकृष्णच आहेत, तसेच श्री व्यंकटेश श्रीनिवासदेखील त्यांचेच रूप आहे."
याविषयीची मी तुला श्रीपादांची अजून एक कथा सांगतो. एकदा बाळ श्रीपाद नरसिंह वर्मांना म्हणाले, " आजोबा, उद्या आपण दोघे घोडागाडीतून आपली जमीन पहाण्यास जाऊ या. ती भूमाता माझ्या पद्स्पर्शाची कित्येक दिवसांपासून प्रार्थना करीत आहे." तेव्हा नरसिंह राजशर्मा लीनतेने म्हणाले, " अरे श्रीपादबाळा, माझे एक तुझ्याकडे मागणे आहे. आपली ही पीठिकापूराजवळ जी काही जमीन आहे, तिथेच एक छोटेसे गांव वसवून काही कष्टकरी लोकांना वाट्याने शेती करायला द्यावी, आणि जमिनीचा मालक म्हणून केवळ नाममात्र मोबदला घ्यावा, असा माझा मानस आहे. हा सर्व व्यवहार, हिशोब बघण्यासाठी मी तुझ्या पित्यास म्हणजेच श्री अप्पळराज शर्मा यांस कुलकर्णी पद देऊ इच्छितो. तसेही आईनविल्ली या ग्रामाचे कुलकर्णी पद ते सांभाळीत नाहीच ना ?" त्यांचा तो संकल्प ऐकून श्रीपाद हसत म्हणाले, " आजोबा, तुम्ही केवळ तुमच्या जमिनदारीचा विचार करत हा निर्णय घेत आहात. माझ्या पित्याने आणि तदनंतर मी हे कुलकर्णीपद सांभाळावे, हीच तुमची इच्छा आहे. परंतु, मला या सकळ ब्रह्माण्डाचे काळचक्र, कोट्यावधी प्राणिमात्रांचे कर्मफल हिशोब अविरत सांभाळावे लागतात. मुळात माझ्या ह्या अवताराचे मुख्य प्रयोजन विश्वकुंडलिनी जागृत करणे हेच आहे. ह्या पीठिकापुराची कुंडलिनी मी आपल्या, बापनार्युलु, आणि वेंकटप्पय्या श्रेष्ठी यांच्या तेहत्तीसाव्या पिढीत जागृत करीन, तेव्हा आपण ही चिंता करणे सर्वथा सोडून द्या."
सुबय्या म्हणाले, " शंकरा, श्रीपाद श्रीवल्लभांनी पीठिकापुर सोडून इतरत्र कुठे जाऊ नये, यासाठीच नरसिंह वर्मांचा हा प्रयत्न होता. मात्र प्रभूंचे अवतारकार्य जाणून घेण्यास आपण असमर्थ आहोत, हेच खरें ! त्याच रात्री नरसिंह वर्मांना स्वप्नदृष्टांत झाला, त्यांना श्रीपाद प्रभूंनी श्री नृसिंहांच्या बत्तीस अवतार स्वरूपांत दर्शन दिले. ती रूपे अशी होती. : १) कुंदपाद नरसिंहमूर्ती २) कोप नरसिंहमूर्ती ३) दिव्य नरसिंहमूर्ती ४) ब्रह्मांड नरसिंहमूर्ती ५) समुद्र नरसिंहमूर्ती ६) विश्वरूप नरसिंहमूर्ती ७) वीर नरसिंहमूर्ती ८) क्रूर नरसिंहमूर्ती ९) बिभीत्स नरसिंहमूर्ती १०) रौद्र नरसिंहमूर्ती ११) धूम्र नरसिंहमूर्ती १२) वह्नि नरसिंहमूर्ती १३) व्याघ्र नरसिंहमूर्ती १४) बिडाल नरसिंहमूर्ती १५) भीम नरसिंहमूर्ती १६) पाताळ नरसिंहमूर्ती १७) आकाश नरसिंहमूर्ती १८) वक्र नरसिंहमूर्ती १९) चक्र नरसिंहमूर्ती २०) शंख नरसिंहमूर्ती २१) सत्त्व नरसिंहमूर्ती २२) अद्भूत नरसिंहमूर्ती २३) वेग नरसिंहमूर्ती २४) विदारण नरसिंहमूर्ती २५) योगानंद नरसिंहमूर्ती २६) लक्ष्मी नरसिंहमूर्ती २७) भद्र नरसिंहमूर्ती २८) राज नरसिंहमूर्ती २९) वल्लभ नरसिंहमूर्ती. तिसावे नरसिंहाचे रूप म्हणून श्रीपाद वल्लभ प्रगट झाले. तर एकतिसाव्या अवतार स्वरूपांत श्री नृसिंह सरस्वती महाराज आणि बत्तिसाव्या नरसिंहमूर्ती रूपात प्रज्ञापुराचे (अक्कलकोटचे) श्री स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले."
" शंकरभट्टा, आज आपण इथेच थांबू या. ज्योतिषशास्त्रानुसार उद्याचा दिवस अतिशय शुभ आहे. त्या मंगलयोगावर मी तुला श्रीपादांच्या अनेक आश्चर्यकारक लीला कथन करेन. माझा मित्र बिल्वमंगल आणि वैश्या चिंतामणी हे पीठिकापुरांत कसे आले ? श्रीपाद प्रभूंनी त्यांच्यावर कशी कृपा केली ? नरसिंह वर्मांच्या शेतांतील श्रीपादांचा चमत्कार आणि चित्रवाडा या ग्रामाची कथाही मी तुला सांगेन. श्रीपाद प्रभूंचे भविष्यांतील अवतार आणि त्यांचे काही संकल्प यांविषयीही मी काही विवरण करेन. अत्यंत भक्तिभावाने केलेल्या प्रभूंच्या स्मरणाने, अथवा केवळ त्यांच्या लीला श्रवण केल्या असता पूर्वजन्मांतील अनेक पातकांच्या राशी सहजच भस्म होतात. आजची रात्र आपण श्रीपाद श्रीवल्लभांचे अखंड नामस्मरण करू या." असे म्हणून सुबय्या श्रेष्ठी जवळच असलेल्या त्यांच्या कुटीत शंकरभट्टास घेऊन गेले. त्या कुटीत दोन ताडपत्रीच्या चटया होत्या. तसेच, चार श्वान त्या कुटीचे रक्षण करीत होते. शंकरभट्टही प्रभूंच्या ह्या अद्भुत लीला ऐकण्याचे भाग्य आज आपल्याला लाभले, जणू श्रीपादांचा कृपाप्रसादच आपणास प्राप्त झाला, असा मनोमन विचार करीत नामस्मरणांत रंगून गेले. ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥ अध्याय फलश्रुती - दुर्भाग्य नाश
No comments:
Post a Comment