Feb 12, 2021

कार्तवीर्योsर्जुनो नाम राजा बाहुसहस्त्रवान् - ३


 || श्री गणेशाय नमः || श्री दत्त समर्थ ||

अर्जुनाची ती प्रार्थना ऐकून गर्गमुनींना संतोष वाटला. आपल्या उपदेशाचा उचित परिणाम झाला आहे, याचे त्यांना अतिशय समाधान वाटले. श्री दत्तप्रभूंचे मनःपूर्वक स्मरण करून त्यांनी अर्जुनाच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास आरंभ केला. गर्गमुनी म्हणाले -

पूर्वी जंभासुर नावाचा महापराक्रमी दैत्य होता. त्याने संपूर्ण पृथ्वीचे राज्य जिंकले आणि स्वतःला सम्राट घोषित करून अत्यंत जुलुमी पद्धतीने तो राज्यकारभार करू लागला. त्या अतिमहत्वाकांक्षी दैत्याने नंतर स्वर्गावरही चढाई केली. देवराज इंद्र आणि जंभासुर दैत्य यांच्यात घनघोर युद्ध झाले. त्या संग्रामात देवांनी पराक्रम करून दैत्य सेनेचा संहार केला, मात्र अखेर त्या बलशाली दैत्याने अमरावती जिंकून स्वर्गलोकीचे राज्य आपल्या ताब्यात घेतले. पराभूत झालेल्या देवांनी मेरू पर्वतावरील एका गुहेचा आसरा घेतला. आपले स्वर्गलोकीचे राज्य परत मिळविण्यासाठी इंद्रासहित सर्व देव देवगुरु बृहस्पतीकडे आले आणि आपणांस योग्य मार्गदर्शन करावे, अशी प्रार्थना केली. त्यावेळी, देवगुरु बृहस्पतींनी इंद्रासहित सर्व देवगणांस बोध केला. तसेच, त्यांना सह्याद्री पर्वतावर वास करणाऱ्या श्री दत्तात्रेयांस अनन्यभावें शरण जा, तेच तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील असे सांगितले.

आपल्या गुरूंची आज्ञा घेऊन इंद्रादिक देव सत्वर सह्याद्रीच्या शिखरावरील श्री दत्तप्रभूंच्या आश्रमांत आले. श्री दत्तात्रेयांचे ते ' मन-बुद्धीपर वाचे अगोचरु ' असे रूप पाहून त्या सर्वांचेच देहभान हरपले. त्यावेळीं, श्री दत्तमहाराजांजवळ सौंदर्यवती अनघादेवीही होती. सर्व देवांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला, मात्र दत्तात्रेयांनी इंद्रादिक देवांकडे अजिबात लक्ष दिले नाही. क्षणभर सर्व देव खिन्न झाले, मात्र देवगुरुंच्या उपदेशाचे स्मरण करून ते सर्व अढळ श्रद्धेने दत्तप्रभूंची सेवा करू लागले. असा बराच काळ लोटला, मात्र दत्तप्रभूंनी ना त्यांची दखल घेतली ना विचारपूस केली. तरीही, अपार कष्ट झेलुनही प्रभूंच्या कृपेची याचना करणाऱ्या त्या सर्व देवांचा दृढ निश्चय आणि अनन्यभाव पाहून अखेर दत्तात्रेय इंद्रास म्हणाले, " देवराज, आपण उगाच इतके कष्ट घेत आहात. मी मद्यासक्त, स्त्रीरत भ्रष्ट असून माझ्यापासून आपणांस कदापिही लाभ होणार नाही. तेव्हा, तुम्ही दुसऱ्या एखाद्या योग्य पराक्रमी पुरुषाकडे जावे." श्री दत्तप्रभूंचे हे बोलणे ऐकून त्या सर्व सुरवरांना आपल्या गुरूंचा उपदेश आठवला. हीच आपली कसोटी आहे, हे लक्षांत घेऊन इंद्रादि देव श्री दत्तांची , " तू ईश्वर स्वच्छंद । भेदपरिच्छेद तुज नाहीं । तूं अनघ अससी । अनघा हे असे तसी । तुझा होतां अनुग्रह । कोण करील निग्रह ।" अशी स्तुती करू लागले. त्यांचा तो दृढभाव आणि चित्तशुद्धी झालेली पाहून दत्तप्रभू प्रसन्न झाले. त्यांनी आता जंभासुराचा विनाश अटळ आहे, तसेच स्वर्गलोकीचे राज्य तुम्हांस लवकरच प्राप्त होईल, असा आशीर्वाद दिला. केवळ स्रीमोहच असुरांचा विनाश करू शकेल, हे भगवान दत्तात्रेय जाणून होते. त्यांनी देवांना दैत्यांशी युद्ध करून युक्तीने त्यांना आपल्या आश्रमांत घेऊन यायला सांगितले. दत्तप्रभूंच्या आज्ञेनुसार, देवांनी दैत्यांबरोबर रण पुकारले. काही काळ युद्ध करून पूर्वनियोजित युद्धनीतीचे पालन करीत सुरसेनेने समरभूमीतून पळ काढला. त्यांचा पाठलाग करीत सर्व दैत्यही सह्याद्रीवर दत्तात्रेयांच्या आश्रमांत आले. तिथे अनुपम सौंदर्यवती अशा अनघादेवीला बघून ती दैत्यसेना आपण इथे सुरांशी युद्ध करत आलो आहे, हेच विसरली. त्या आदिमायेविषयीं त्यांच्या मनात अभिलाषा निर्माण झाली. त्यांनी तिला पालखीत बसविले आणि डोक्यावर ती पालखी घेऊन ते निघून गेले. दैत्यांचे हे आसुरी कृत्य बघून श्री दत्तात्रेय म्हणाले, " देवेंद्रा, परस्त्रीस्पर्श हे महापातक आहे. त्या पापाच्या प्रभावाने लवकरच दैत्यांचे सामर्थ्य आणि ऐश्वर्य नष्ट होईल.

श्री: पदगाssलयदात्री सक्थिगतांशुकदात्री । गुह्यगता प्रमदादा क्रोडगतार्भकदा चेत् ॥
चेद्धृदि कामितदात्री कण्ठगता वसुदात्री । चेन्मुखगाsशनवाग्दा मूर्धगता तु शिरोदा ॥
तन्मूर्धगाsधुनेयं श्री: शीर्षाण्युत्कृत्य सत्वरम् । आयास्यत्यत्र नैवात्र शङ्का ह्येते मृतोपमा: ॥

अर्थात, श्री म्हणजे लक्ष्मी जर पायांत असेल तर गृहदात्री असते. श्री जर छातीवर घेतली तर वस्त्रलाभ आणि गुह्येंद्रियांत असेल तर स्त्रीलाभ होतो. श्री बाहूंवर संततीकारक, हृदयांत विराजमान झाली तर इच्छापूर्तीकारक, कंठात धनदायक, आणि वाणींत असेल तर शक्ती आणि यशदायक असते. मात्र लक्ष्मीला मस्तकावर घेतले असता विनाश घडविते. तेव्हा देवांनो, दैत्यांचा पराजय आता अटळ आहे. तुम्ही एक क्षणही न दवडतां निर्भय होऊन दैत्यांवर आक्रमण करा. तुमचा विजय आता निश्चित आहे. " दत्तप्रभूंच्या या वचनांवर विश्वास ठेवून इंद्रादिक देवांनी त्वेषाने पुन्हा एकदा दैत्यांशी युद्ध आरंभिले. दुराचरण आणि महापातक यांनी निस्तेज झालेले ते दैत्य थोड्याच वेळांत पराभूत झाले. श्री दत्तकृपेनें त्या दुष्ट दैत्यांचा संहार करून देवसेना विजयी झाली.

आदिमाया अनघादेवीही श्री दत्तप्रभूंच्या अंकावर पुन्हा विराजमान झाली. सर्व देवगणांसहित इंद्राने सद्गदित होत श्रीदत्तप्रभू आणि अनघा देवीची स्तुती केली. त्या स्तवनाने आणि सेवाभावाने प्रसन्न झालेल्या श्री दत्तात्रेयांनी आशीर्वाद देऊन इंद्रास कर्तव्यदक्षतेने स्वर्गलोकीचे राज्य करावयास सांगितले. तसेच सर्व देवांस हवा तो वर मागून घ्यावा असेही सांगितले. त्यांवर, सर्व देवांनी कृतज्ञतेने ' भक्ती द्यावी निश्चयेंसी । दिवा निशी प्रेमयुक्त ।' असे वरदान मागितले. आजसुद्धा, अतीव श्रद्धेने देवराज इंद्र दररोज योगिराज दत्तप्रभूंच्या दर्शनास येत असतो.

इतका कथाभाग सांगून गर्गमुनी अर्जुनाला म्हणाले, " युवराज, स्वर्गीचे वैभवही आपल्या आराध्य देवतेच्या भक्तीपुढे गौण वाटणे, हेच त्या देवतेच्या पूर्ण कृपेचे द्योतक आहे. हेच भक्तीचे अंतिम फळ आहे. तुझ्या मनांत उद्भवलेली ही दत्तदर्शनाची इच्छा कल्याणकारी आहे. तू आता अनन्यभावानें त्यांना शरण जा, तेच तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण करतील." गर्गमुनींचा हा हितोपदेश ऐकून अर्जुनाचे मन भक्तिभावाने भरून आले. अतीव श्रद्धेने त्याने आपल्या कुलगुरूंना प्रणिपात केला आणि कृतार्थभावाने म्हणाला, " गुरुवर्य, दत्तचरणांची भक्ती आपण माझ्या हृदयांत उपजविली, याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे. माझ्यावर सत्वर दत्तकृपा व्हावी, असा आपण मला आशीर्वाद द्या. दत्तदर्शनासाठी मी अतिशय उत्सुक झालो आहे, आपण आता मला आज्ञा द्यावी." गर्गमुनींनी तथास्तु असे आशीर्वचन देताच अर्जुनाने श्री दत्तप्रभूंच्या सह्याद्रीवरील आश्रमाकडे प्रयाण केले.

क्रमश:


No comments:

Post a Comment