Feb 16, 2021

श्री दत्तभावसुधारस स्तोत्र - ( श्लोक ८१ ते ९० )


 || श्री गणेशाय नमः ||

दत्तभक्तहो, ह्या श्री टेम्ब्ये स्वामीरचित स्तोत्राचा भावार्थ जर आपणांस चुकीचा आहे असे आढळल्यास, तर त्या श्लोकाचा योग्य अर्थ आम्हांस ' संपर्क ' वापरून कळवावा, आम्ही तुमचा नामनिर्देश करून योग्य ते बदल जरूर करू. जेणे करून सर्व दत्तभक्तांना त्याचा लाभ होईल.

महत्वाचे, आपले नांव प्रकाशित करण्यास आपली अनुमती नसेल तर कृपया प्रतिसादांत तसे स्पष्ट लिहावे.

|| श्री गुरुदेव दत्त ||

त्रिविक्रमायाह कर्मगतिं दत्तविदा पुनः ।
वियुक्तं पतितं चक्रे श्रीदत्तः शरणं मम ॥८१॥
भावार्थ : ज्या श्रीगुरूंनी त्रिविक्रमयतींना कर्मविपाक संहितेचे ज्ञान देऊन, त्या पतिताला अल्पावधीसाठी दिलेल्या गतजन्मीच्या स्मृती आणि ज्ञानापासून पुन्हा विलग केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
रक्षसे वामदेवेन भस्ममाहात्म्यमुद्-गतिम् ।
उक्तां त्रिविक्रमायाह श्रीदत्तः शरणं मम ॥८२॥
भावार्थ : ज्या गुरुमहाराजांनी, पूर्वी वामदेव ऋषींनी ब्रह्मराक्षसाला सांगितलेले भस्म माहात्म्य आणि त्याचा केलेला उद्धार याची कथा त्रिविक्रम मुनींना सांगितली, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
गोपीनाथसुतो रुग्णो मृतस्तत्स्त्री शुशोच ताम् ।
बोधयामास यो योगी श्रीदत्तः शरणं मम ॥८३॥
भावार्थ : माहूरच्या गोपीनाथ विप्राचा क्षयग्रस्त पुत्र मृत झाला असता, त्याची पतिव्रता पत्नी शोक करू लागली. त्यावेळीं तिचे सांत्वन करून तिला बोधपर उपदेश करणारे योगीराज म्हणजेच ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
गुर्वगस्त्यर्षिसंवादरूपं स्त्रीधर्ममाह यः ।
रूपान्तरेण स प्राज्ञः श्रीदत्तः शरणं मम ॥८४॥
भावार्थ : ज्या सर्वज्ञ श्री गुरूंनी तपस्व्याचा वेष धारण करून (त्या गोपीनाथसुताच्या पतिव्रतेला) देवांचे गुरु बृहस्पति आणि अगस्ति ऋषींची पत्नी लोपामुद्रा यांच्यातील संवादावर आधारित स्त्रियांचा पतिव्रता आचारधर्म सविस्तर कथन केला, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
विधवाधर्ममादिश्यानुगमं चाक्षभस्मदः ।
अजीवयन्मृतं विप्रं श्रीदत्तः शरणं मम ॥८५॥
भावार्थ : ज्या नृसिंहसरस्वती महाराजांनी त्या साध्वी पातिव्रतेला विधवा स्त्रियांचा आचारधर्म आणि सहगमनाचे नियम आदिंचा उपदेश केला, तसेच तिला भस्म व रुद्राक्ष देऊन तिच्या मृत पतीला पुन्हा जिवंत केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.
वेश्यासत्यै तु रुद्राक्षमाहात्म्ययुतमीट्-कृतम् ।
प्रसादं प्राह यः सत्यै श्रीदत्तः शरणं मम ॥८६॥
भावार्थ : ज्या श्री गुरूंनी रुद्राक्षाचे माहात्म्य आणि सतीधर्माचे निष्ठेने पालन करणारी महानंदा नावाची वैश्या ईश्वराच्या कृपाप्रसादाला कशी पात्र झाली, हे आख्यान त्या गोपीनाथसुताच्या पतिव्रतेला सांगितले, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
शतरुद्रीयमाहात्म्यं मृतराट्-सुतजीवनम् ।
सत्यै शशंस स गुरुः श्रीदत्तः शरणं मम ॥८७॥
भावार्थ : ज्या गुरुमहाराजांनी, त्या साध्वी पतिव्रतेला शतरुद्राचा महिमा आणि त्याच्या अनुष्ठानानें सुधर्म नामक मृत राजपुत्राचे संजीवन हे आख्यान सांगितले, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
कचाख्यानं स्त्रियो मंत्रानर्हतार्थसुभाग्यदम् ।
सोमव्रतं च यः प्राह श्रीदत्तः शरणं मम ॥८८॥
भावार्थ : ज्या नृसिंहसरस्वती गुरूंनी स्त्रिया मंत्रोपदेशासाठी अनाधिकारी का आहेत हे विस्तृतपणें समजविण्यासाठी कच-देवयानीची कथा सांगितली आणि शिवकृपेसाठी सौभाग्यदायक सोमवारव्रतकथाही सांगितली, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
ब्राह्मण्या दुःस्वभावं यो निवार्याह्निकमुत्तमम् ।
शशंस ब्राह्मणायासौ श्रीदत्तः शरणं मम ॥८९॥
भावार्थ : ज्या सर्वज्ञानी गुरूंनी, ब्राह्मण स्त्रीच्या स्वभावदोषाचे निवारण केले आणि आन्हिक कर्मांविषयी जिज्ञासापूर्वक प्रश्न विचारणाऱ्या तिच्या पतीला श्रुति-स्मृति संमत धर्माचरणाचा उपदेश केला, असे ते श्री दत्तात्रेय माझे रक्षणकर्ता आहेत.
गार्हस्थधर्मं विप्राय प्रत्यवायजिहासया ।
क्रममुक्त्यै य ऊचे स श्रीदत्तः शरणं मम ॥९०॥
भावार्थ : ज्या श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला गृहस्थधर्माचे आचरण याविषयीं क्रमवार आणि विस्तृतपणें निरूपण करून त्याच्या सर्व आशंकांचे निवारण केले, असे ते श्री दत्तात्रेय माझे आश्रयदाता आहेत.

|| श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ||

क्रमश:


1 comment:

  1. हा अमूल्य व अविस्मरणीय व कल्याणकारक ठेवा देल्याबद्दल शतशः ऋणी आहे. श्री दत्ता प्रभूंना शत कोटी साष्टांग दंडवत !

    ReplyDelete