Mar 12, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ८३ ते १०७ )


II श्री गणेशाय नमः II

१/८३ शेगावी माघमासी | वद्य सप्तमी ज्या दिवशी |

हा उदय पावला ज्ञानराशी | पदनताते तारावया ||

ते

१/९२ मूर्ती अवघी दिगम्बर | भाव मावळला आपपर |

आवड निवड साचार | राहिली न जवळी जयाच्या ||

शेगांवचे साधे भोळे, प्रामाणिक भक्त महाराजांना शरण गेलेत, पूर्ण विश्वास ठेऊन त्यांच्यावर. ईश्वर जाणण्यासाठी, ईश-तत्व, सत्य-तत्व समजण्यासाठी आत्मभाव जागृत व्हावा लागतो, तो संतसेवेत व सत्संगातून होतो. अन्यथा घडत राहते, केवळ भक्तीचे नाटक. पण शेगावंचे भक्त म्हणतात, गजानना ! आपण कितीही लपविले, झाकून ठेवले तरी आपली कृपाच आमच्यावर आता अनुग्रह करू शकेल. आपण ज्ञानी आहात, आमच्या कळवळयानेच आपण भारतातल्या शेगाव या मध्यवर्ती स्थळी अवतार घेतला. आपल्या मूळ रुपात कुणी ओळखू नये म्हणूनच तर आपण असे रूप धारण केले असावे.

देविदास पातुरकर हा एक मठाधिपती होता. त्याच्या मुलाची ऋतुशांती होती. त्यानिमित्ताने घरात मंडळी भोजन करीत होती. पंक्ती उठत होत्या आणि घरासमोरच त्या विप्राने उष्ट्या पत्रावळी रस्त्यावर टाकल्या होत्या. समर्थ सिद्धयोगी श्री गजानन महाराजांनी जाणीवपूर्वक हेच स्थान बसण्यासाठी निवडले.

निर्गुणातील भगवंत सगुण रूपाने मानवी अवतार तेंव्हा घेतो, जेंव्हा समाज दिशाहीन झाला असेल, त्याला कुणी वाली राहिला नसेल. सज्जनाचे जीवन जगणे कठीण झाले असेल, सर्व बाजूनी ते नाडल्या जात असतील, दुष्ट भावना समाजात बलिष्ठ झाल्या असतील, समाजाला नीती मुल्यांची चाड राहिली नसेल, धर्म पालन व नीती पालन होत नसेल, सद्-भाव लोप पावला असेल, सर्व सामान्य जनता सर्व बाजूने नाडल्या जात असेल तर, सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माचे पालन करण्यासाठी, दुष्टांच्या संहारासाठी, व भक्तांना दर्शन देण्यासाठी भगवंत अवतार घेतो कुठल्याही रूपाने आणि शेगांवला असेच घडले यात शंका नाही. अवलिया रूपाने दलीत, पददलित सदभक्तांचा तारणकर्ता बनून २३ फेब्रुवारी १८७८ रोजी म्हणजेच माघ वद्य सप्तमीला शके अठराशे मध्ये ऐन दुपारच्या समयाला अंगात साधी जुनी पुराणी बंडी परिधान करून कोणतीही उपाधी, नाव न स्वीकारता एका हातात पाणी प्यायला म्हणून भोपळा व दुसऱ्या हातात कच्ची चिलीम घेऊन दिगंबर अवस्थेत रस्त्याच्या कडेला उष्ट्या पत्रावळीच्या ढिगाऱ्याशेजारी निर्विकार अवस्थेत पण शांत मुद्रा व नासाग्र दृष्टी ठेऊन सर्व वस्तू बद्दल समभाव राखून तू-मी भाव सोडून उन्हातान्हाची तमा न बाळगता निवांत बसले होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एकालाही या वेडगळ दिसणाऱ्या, भिकारी वाटणाऱ्या माणसाकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही. साधू संतांच्या वर्तणुकीत जो आशय असेल, तो सामान्यांना कळतोच असे होत नाही. आपल्या मूळ रुपात कुणी ओळखू नये म्हणूनच तर त्यांनी असे रूप धारण केले असावे. सर्वांना सदा आनंदित करण्यासाठी या रूपाने अवतीर्ण झाले होते महाराज. अति बुद्धिवान, ज्ञानी जनांच्या हे लक्षात येणार नाही कारण सहजासहजी ते कुणावर विश्वास ठेवीत नाहीत कारण त्यांचा असा एक अहं असतो ना ! त्यासाठी श्रद्धावान भक्ताची गरज असते.

पण ज्यांचा उद्धार होण्याची वेळ आली की ते अशा अवतारी महामानवाकडे सात्विक भावाने ओढल्या जातात. पण त्यासाठी परमभाग्य गाठीशी घेऊन जन्माला यावे लागते तेंव्हा हे नशिबाने घडते.

खर तर संतचरण सापडणे कठीण, नशिबाने सापडले तर ते समजणे महाकठीण. एकतर संताचे दर्शनच लवकर होत नाही, झाले तर सत्संग-सहवास लाभत नाही, सहवास लाभला तरी आशीर्वाद लाभेलच असे नाही, आणि आशीर्वादही लाभला तरी सद्गुरूची कृपा होईलच असे नाही. केवळ भाग्यवंत पुण्यात्म्यांनाच संतचरण सेवा लाभून ईश्वर दर्शन होत असते. असे सद्भक्त केवळ साधूचे बाह्य शरीर वा कृती बघत नाहीत तर त्यांचा प्रेमळ, सात्विक भाव आणि अंतकरणीचे ईशतत्व त्यांना जाणवते. मग तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, कोठून आला आहे, त्याचे नाव काय आहे या फंदात पडत नाहीत. कारण साधूच्या कृपेने व आशीर्वादाने ते वेगळ्याच भाव विश्वात असतात. त्यांना समोर दिसतो तो महात्मा त्यांना ब्रह्म वाटतो.


१/९३ शीत पडल्या दृष्टीप्रत | ते मिखी उचलुनी घालीत |

हे करण्याचा हाच हेत | “ अन्नपरब्रह्म ” कळवावया ||

ते

१/१०७ हिरे गारा एक्यां ठायी | मिसळल्या असती जगाठायी |

पारखी तो निवडून घेई | गार टाकून हिऱ्याते ||

नीज आनंदात सदैव रममाण असणारे श्री, भुकेल्या वेड्या मनुष्याने वागावे तसे रस्त्यावर पडलेल्या उष्ट्या पात्रावरील एखादे अन्नाचे शीत दिसले की ते त्वरेने मुखात घालत होते. रस्त्यावरून जाणाऱ्या एकालाही या वेडगळ दिसणाऱ्या, भिकारी वाटणाऱ्या माणसाकडे लक्ष द्यावे असे वाटले नाही. साधू संतांच्या वर्तणुकीत जो आशय असेल तो सामान्यांना कळतोच असे होत नाही. “ अन्न हे परब्रह्म ” आहे हे लोकांना कळावे म्हणून प्रवचन करणारे श्री नव्हते त्यांना तर स्व-आचरणातून लोकांना ते समजावे, उमजावे म्हणून श्री शेगांवात येताच पहिली लीला केली असेल तर ती ही आहे. कारण मानवी जीवनात केवळ पोट भरण्यासाठी मानवाला अन्न लागत नाही तर आध्यात्मिक उन्नतीसाठी ते लागते हा संदेश द्यायचा होता. श्रुतींनी मोठ्याने गर्जना करून हे लोकांच्या मनावर बिम्बविण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्याकडे दुर्लक्ष केले. ‘अन्नम् ब्रह्मेति’ ही उक्ती तैत्तिरीयोपनिषदात ३-२-१ मध्ये आलेली आहे. त्यात अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोशाचे सविस्तर वर्णन आले आहे. त्यातूनच हृदयस्थ परमेश्वराला ओळखण्याचे ज्ञान प्राप्त होते. लौकिक आनंदाच्या स्तरावरून उत्तरोत्तर ब्रह्मानंद म्हणजे काय याचा स्वानुभव तर मिळतोच पण अन्नमय कोश माध्यमातून परमात्मा व त्याचे आंनंद स्वरूप स्थितीचे दर्शन होते. त्यासाठी तप सांगितले आहे ते सत्य आचरण, सत्यवाणी, अध्यात्मशास्त्राचे अध्ययन, इंद्रियावर नियंत्रण, मनाचा निग्रह इत्यादी. याची सर्वसामान्यांना जाण राहिली नव्हती, त्याचा विसर पडला होता, अन्न हे केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी नाही, फक्त पोट भरण्यासाठी नाही तर या अध्यात्म तत्वाचा भावार्थ कळवा हा खरा हेतू होता शीत उचलून खाण्याचा. बर फक्त पोटासाठी अन्न म्हटले तरी विदर्भात दोन वेळेचे अन्न न मिळाल्याने उपाशी झोपणारे गरीब जन होते. आजही विश्वात अनेक लोक अन्न न मिळाल्याने उपाशीपोटी झोपतात. त्याचवेळी अनेक लोक अन्नाची नासाडी करतात. हे योग्य नाही, हा सामाजिक दृष्टीकोन महाराजांना या कृतीतून समाजापुढे आणायचा असेल. त्यांचा विचार व्हावा म्हणून अन्न ताटात उष्टे टाकू नका, हाही संदेश आपल्या आचरणातून जनतेला द्यायचा होता. पण हे कळणारे लोक फार कमी. श्रींनी हे आचरणात आणावे ते प्रथम साधूने व साधूचे साधुपण जनतेला कळावे हाही उद्देश होता. पोटभऱ्या साधू नव्हते श्री. पण नशिबाने भक्ताचा उदयकाळ आला की त्याला साधू गवसतात. शेगाव नगरीत एक सद्भक्त असाच असावा. त्याचे नाव होते बंकटलाल व त्याच्या सोबत असलेल्या मित्राचे नाव दामोदर. योगायोगाने त्याचवेळी हे रस्त्याने जाताना त्यांनी हे दृश्य बघून न बघितल्यासारखे केले. परत नजर गेली बंकटलालची साधूवर, जरा सजग होऊन निरखून बघितले तर तो दिगंबर अवस्थेतील तरुण विलक्षण वाटला. विदेही व तेज:पुंज मुर्ती समोर दिसताच त्याचा आत्मभाव जागृत झाला. हा साधा भिक्षेकरी वा भुकेला भिकारी नाही, कारण याची भूक केवळ अन्न असती तर त्याने घरात अन्न मागितले असते. पण हा तर एक एक कण निट वेचून मिटक्या मारत खातो अगदी “ अन्नम् ब्रह्मेति ’’ भावाने. याचे बाह्य वागणे व कृती आणि अंत:र्मनाचा भाव व चेहऱ्यावरील तेज याचा काही मेळ लागत नाही. त्यांची लक्षणे पाहून हा थोर योगीपुरुष असावा असा त्या सद्भक्ताच्या मनाने ठाव घेतला. रत्न पारखायला रत्नपारखीच हवा. श्रुतीमधील तत्त्वज्ञान लोकांना केवळ सांगून कळत नाही. अनेक पंडित,कथा कीर्तनकार आपल्या कथा कीर्तनातून “ अन्न परब्रह्म ’’ यावर भाष्यही करतात. उपनिषद ही केवळ कोरड्या ज्ञानार्जनासाठी नसतात तर माणुसकीचा ओलावा आपल्या वर्तनात यावा याही दृष्टीने या थोर संत व योगी पुरुषाने अशा कृतीचे अवलंबन केले असावे, अशी जाणीव बंकटलाल यांना झाली असावी. बंकटलाल दामोदरपंतांना हळूच म्हणाला, आपण थोडावेळ येथेच थांबून या पुरुषाचे निरीक्षण करू या. पुढील कृतीवरून थोडा अंदाज बांधता येईल. खरे साधू जगात पिशा म्हणजे वेड्यासारखे वागतात, असे भागवतात महर्षीं व्यास पण सांगून गेले आहेत. कृती तर वेड्या माणसाप्रमाणे आहे पण दिसतो तर तेज:पुंज, ज्ञानी. ह्यामागचे इंगित काय आहे हे आपण येथूनच न्याहाळू. रत्न समजावे लागते आणि त्यासाठी गरज असते रत्नपारख्याचीच. त्याचे मोल नाही कळले तर एखादा अज्ञ त्याला काचेचा मणी समजून आपल्या म्हशीच्या गळ्यात बांधायचा. आता पर्यंत अनेक लोक या रस्त्यावरून हे दृश्य पाहून तसेच पुढे निघून गेलेत. पण त्यांच्या जवळ जिज्ञासू दृष्टी नव्हती. कारण अध्यात्म ज्ञान त्यांचे कमी पडले. बंकटलाल कथा ऐकून तयार झाला होता, त्यामुळे इतरांपेक्षा वेगळा विचार तो करू शकला.

II श्री गजानन महाराजार्पणमस्तु II

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment