Mar 14, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी १०८ ते १४६ )


II श्री गणेशाय नमः II

१/१०८ प्रथमता तो पुढे झाला | बंकटलाल आगरवाला |

गजाननासी विचारण्याला | विनयाने येणे रिती ||

ते

१/११८ अवघी पक्वाने एक केली | आवड निवड नाही उरली |

जठराग्नीची तृप्ती केली | दोन प्रहरच्या समयाला ||

बंकटलाल सरळ जवळ जाऊन विचारता झाला की क्षुधा असेल तर अन्नपात्राची तरतूद करावी का? न बोलताच त्या तेज:पुंज व्यक्तीने बोलणाऱ्याच्या मुखाकडे पाहिले मात्र त्या पहिल्याच दृष्टीत बंकटलाल भारीत झाला, त्याची अंतर्दृष्टी व भावना विकसित झाल्या, या प्रेषिताच्या केवळ बघण्याने. श्रीं बंकटलाल व दामोदरपंत यांच्याकडे एक प्रखर नजर टाकताच, त्यांचा आधीचा भाव लोप पावला त्यांना श्रींचे मनोहर रूप दृष्टीस पडले. कांती सतेज दिसली. हाताचे दंड, मान पिळदार, छातीची भव्यता जाणवली. श्रींची दृष्टी भृकुटी ठायी स्थिरावलेली. निजानंदात रममाण झालेल्या श्रींचे हे दर्शन होताच त्यांचा नम्रभाव जागृत झाला व श्रींठायी आदर दुणावला आणि नतमस्तक होऊन मनाने आपोआप नमस्कार घडला महाराजांना. कधी नव्हे एवढी प्रसन्नता त्यांना जाणवली. चित्त संतोष पावले. हा असतो योगी दर्शनाचा लाभ ! तो या दोघांना त्यांच्या भाग्याने झाला आणि येथूनच त्यांचे नशिबही बदलले. श्रींच्या हृद्य स्थानी बघताच त्यांना अंतस्थ आत्मारामाचे दर्शन झाले आणि दृष्टी स्थिरावली ती दोन भृकुटीच्या मध्यस्थानी असलेल्या आज्ञा चक्रावर आणि त्यांना ध्यानावस्था प्राप्त झाली क्षणभर त्या भर रस्त्यात. आणि साक्षात्कार झाला की निर्गुण परब्रह्म परब्रह्म म्हणतात ते हेच.

नेवास्याला ज्ञानदेवांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले होते. दररोज सायंकाळी श्री ज्ञानदेव दिवसभर शेतात शेती काम करून थकून भागून आलेल्या गरीब, आडाणी, कष्टकरी साध्याभोळ्या शेतकरी, मोलमजुरी करून प्रामाणिक जीवन जगणाऱ्या निष्पाप व निरागस लोकांना मंदिरात एकत्र बोलावीत आणि एका खांबाला टेकून आपले थोरले बंधू व सद्‌गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपाशीर्वादाने श्रीमद्‌भागवत गीतेवर निरुपण करीत. साध्या सोप्या मराठी भाषेत सांगत होते विश्वकल्याणकारी ज्ञानेश्वरी तरी कशी हो समजली असेल ज्ञानेश्वरी आणि त्यातील अध्यात्म तत्त्वज्ञान त्या निरक्षर ग्रामस्थांना ?  केवळ भगवंताच्या कृपेने व सगुण रूपातील ज्ञानदेवांच्या आशीर्वादाने ते शांतपणे ऐकत होते अगदी सुखमय आनंदात. प्रसन्न अंत:करणानें माना डोलवत होते. ज्ञानदेवांना सकारात्मक प्रतिसाद देत होते. ज्ञानदेवांच्या हळूवार, मधुर व शांत पण भारदस्त व आश्वस्थ वाणीद्वारे ग्रामस्थांना कृपा आशीर्वाद व ऐकण्याचे सामर्थ्य प्राप्त होत होते. ते मंत्रमुग्ध होऊन कानाने हे ज्ञानामृत पीत होते व आपल्या हृदयात साठवत होते. तसेच येथे शेगावात आज घडत होते.

बंकटलालाने श्रींकडे पाहिले तर ते आता भाताची शिते खात नव्हते तर निजानंदात रमलेले महान योगी वाटले. न कळत त्यांचे मन भावविभोर झाले. चित्त संतोष पावले. ही असते शक्ती खऱ्या संताच्या कृपा आशीर्वादाची !

देविदासबुवाकरवी शांतपणे एक पक्वानांनी भरलेले पात्र मागवून हळूच मोठ्या आदराने श्रीना नमस्कार करून त्यांच्या पुढ्यात नेऊन ठेवले. समर्थ स्वारी भोजनाला बसली मात्र अंत:करणात कुठल्याही पदार्थाच्या चवीबद्दल वा आवडी निवडी बद्दल अणुमात्र भाव नव्हता. सर्व पदार्थांच्याबद्दल समभाव. श्री तर तृप्तच होते कारण अनुपम ब्रह्मरस त्यांनी सेवन केला होता. सर्व पक्वान्ने एकत्र केली, काला केला. असा श्रीकृष्णाचा काला श्रींनी ग्रहणही केला. दुपारची भोजनाची वेळ, तेंव्हा जठराग्नीची तृप्ती करावी, एवढाच अन्न ग्रहणाचा अर्थ हेच महाराजांना सांगायचे असेल.

१/११९ बंकटलाल ते पाहून | पंताशी करी भाषण |

ह्या वेडा म्हणालो आपण | ती नि:संशय झाली चुकी ||

ते

१/१२६ पुसू लागले दामोदर |तुंब्यामध्ये नाही नीर |

मर्जी असल्या हा चाकर | पाणी द्याया तयार असे ||

१/१२७ ऐसे शब्द ऐकिले | समर्थांनी हास्य केले |

उभयतासी पाहून वदले | ते ऐका सांगतो ||

ते

१/१४६ हा श्री गजानन विजय ग्रंथ | आल्हादावो भाविकांप्रत |

हेच विनवी जोडून हात | ईश्वरासी दासगणू 

वेदांमध्ये भारतीय धर्मशास्त्राचे मुलभूत सिद्धांत असल्याने त्यांना भारतीय संस्कृतीचा प्राण असे संबोधिल्या जाते. थोडक्यात ज्ञान आणि विज्ञानाचे भांडार म्हणजे वेद !

बृहद्‌दारण्यक उपनिषदात सांगितल्याप्रमाणे चारही वेद परमेश्वराच्या श्वासापासून निर्माण झाले आहेत. वेदमंत्राचे अर्थ अधिभौतिक, अधिदैविक, आध्यत्मिक स्वरूपात केलेत. सायनाचार्यानंतर तुकोबारायांनी आपल्या अनुभूतिस्वरूप अभंगातून वेदातील महावाक्यांचे सविस्तर विवरण केले आहे. महावाक्य म्हणजे ज्या वाक्यात जीव-शिवाची, जीव-ब्रह्माची, जीव-परमेश्वराची एकता प्रतिपादन कलेली असते. या महावाक्याने “ मी ब्रह्म आहे ” असे साधकास ज्ञान होते. श्रीगुरू उपदेशातुनच हे ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान होते. ऋग्वेदाचे “ प्रज्ञानं ब्रह्म ’’ अर्थात प्रज्ञान हे ब्रह्म आहे हे महावाक्य आहे.

तुकोबाराय आपल्या अभंगात म्हणतात-

मरणा हाती सुटली काया | विचारे या निश्चये ||

नासोनिया गेली खंती | सहजस्थिती भोगाचे ||

न देखेसे झाले श्रम | आले वर्म हाता हे ||

तुका म्हणे कैंची कीव | कोठे जीव निराळा || ||१३६६||

जीवब्रह्मैक्याचा सिद्धांत आपल्या सुबोध आणि अमोघ वाणीद्वारा केवळ तुकोबारायच देऊ शकतात.

ते म्हणतात- मी देहाहुन वेगळा असा सत-चीद्‌-अद्वयस्वरूप आहे. सच्चिदानंदरूप आत्मा ब्रह्मरूप आहे, या निश्चयाने माझे शरीर मरणाचे हातून कायमचे सुटले आहे. मला आता चिंता नाही. ब्रह्मस्थिती अनुभवाला आल्याने मी तिचा उपभोग घेत आहे. आता दु:ख, कष्ट, चिंता नसल्याने श्रमाचा पूर्णपणे परिहार झाला आहे. आणि माझा जीव देवाहून वेगळा, निराळा नसल्याने देवापाशी करुणा, विनवणी करावी तरी कशी? प्रज्ञान ब्रह्म आहे या महावाक्यातील जीवब्रह्मैक्य वर्म या अभंगातून प्रगट झाले आहे.

जे वेदांनी सांगितले, तुकोबारायांनी आपल्या अभंगातून सांगितले ते अध्यात्मज्ञान शेगांवकरांना श्री गजानन महाराजांनी आपल्या साध्या जीवनप्रणालीतून प्रगट होताच काही क्षणांतच दिले. भक्त अवाक झाले आणि श्रींना बघताक्षणीच ते त्यांच्या प्रेमात पडलेत ते कायमचेच कसे ते बघा-

तप्त भूमीवर बसलेल्या श्रींना भक्त म्हणालेत, आम्ही पक्वानाचे पात्र आणि वाळा असलेले थंडगार पाणी आपणासाठी आणावे काय? त्यावर “ तुम्हाला गरज असेल तर आणा “ असे महाराज उत्तरले. पण खरे तर

“ एक ब्रह्म जगदांतरी | ओत प्रोत भरले असे ||

आम्हासी या सृष्टीत कोठेही आणि कशातही भेद दिसत नाही.

अन्न काय, पाणी काय दोहोंतही भगवंतच आहे ना? पण तुम्ही म्हणता तो जगद्व्यवहार झाला, भोजनानंतर पाणी अवश्य प्यावे चला, घेऊन या पाणी ! त्या सद्‌भक्ताचा आनंद गगनात मावेनासा झाला. मनी विचार आले - आपले भाग्य उदयाला आले म्हणूनच म्हणूनच ही सेवा घडतेय. तो थंडगार, निर्मळ, वाळा घालून सुगंधित केलेले जल लगेच घेऊन आला खरा, पण पाहतो तर हा महात्मा हौदातील जनावरांसाठी असलेले गढूळ जल स्वच्छ मनाने दोन्ही हाताच्या ओंजळीने सुखावह पितो आहे. हे बघितले आणि तो जवळ जवळ मोठ्याने ओरडलाच- ते पाणी नका पिऊ ? मी आणले ते गार पाणी प्राशन करा. श्रींनी त्याच्याकडे लक्ष न देता, तृष्णाशांती झाल्यावर त्याला सहज भावाने म्हणालेत - ह्या झाल्या तुमच्या संसारीक लोकांच्या गोष्टी, या बघा माझ्या ओंजळीतले पाणी किती गार आणि स्वच्छ आहे ते ! अरे तुम्हाला संसार तेवढा खरा दिसतो आणि परमार्थ खोटा वाटतो. पण हे संपूर्ण चराचर तर ब्रह्ममय आहे ना ? प्रत्येक वस्तुत असणारे तत्त्व हे ईशतत्त्व होय, भगवंताशिवाय कुठलीही वस्तू असूच शकत नाही. प्रत्येकात हे समान तत्त्व आहे, पण तुम्ही तुमच्या चर्मचक्षूने बघता. जी वस्तूकडे बघण्याची दृष्टी तीच जीवाकडे, मानवी प्राण्यांकडे बघण्याची - पण तोही तर भगवंताचाच अंश आहे. बघा या दृष्टीने मग तुम्हाला तो इतर वेगळ्या जातीपातीचा वाटणार नाही, त्याची भाषा, त्याचा वेश, देश, वेगळा आटणार नाही, हा माझा तो तुझा हा भाव मावळेल, तुम्ही समानदृष्टीने, समत्वभावाने त्याच्याकडे बघाल. मी गरीब, तो श्रीमंत; मी उंच, देखणा,तो बुटका, काळाकुट्ट हा आपपर भाव बदलून जाईल.

हा दगड, हे सोने, ही सुकी रोटी, ती पुरणाची पोळी हे भेद ज्याला आध्यात्मिक ज्ञान नाही त्यांच्यासाठी आहेत. ईशतत्त्व सर्वत्र आहे ते बघायला शिका, हेच ज्ञान. भगवंत सर्वच जलात आहे, सर्व स्थळी आहे, मनी आहे. सुवास, कुवास, सुंदर, कुरूप ही त्याचीच रूपे आहेत.पाणी पिणारा व पाणी हे वेगळे नसून मीच आहे. अगाध ईश्वरी लीला कळण्यासाठी साधना हवी, मगच ते प्रत्येकाला कळेल.

अरे बाबा! या विश्वातील सृष्टीची निर्मिती ज्यामुळे घडली, ते दिव्य सत्य-विज्ञान हेच अध्यात्मतत्त्व. तोच भगवंत ! साधकाने ही समर्थ वाणी ऐकली आणि भारावून जाऊन पुढे यायला लागला, श्री चरणी लोटांगण घ्यायला. हे श्रींनी पहिले अन तो त्यांच्यासमोर यायच्या आत श्री वायुवेगाने तेथून निघून गेले, क्षणार्धात दिसेनासे झाले. साधक त्या दिशेकडे अवाक होऊन पाहतच राहिला, त्याच्या कानावर शब्द आलेत “ गणी गण गणात बोते ”.

या पुढील कथा पाही | निवेदन होईल द्वितीयाध्यायी |

अवधान ध्यावे लवलाही | त्या श्रवण करावया ||१/१४५|| हा श्री गजानन विजय ग्रंथ |

आल्हादावो भाविकांप्रत |हेच विनवी जोडून हात | ईश्वरासी दासगणू || १/१४६ ||

|| श्रीहरिहरार्पणमस्तु || शुभं भवतु ||

***|| इति श्री गजानन विजय ग्रंथस्य प्रथमोध्याय: समाप्त ||*** 

II श्री गजानन महाराजार्पणमस्तु II

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment