Mar 5, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ६३ ते ६८ )


।। श्री गणेशाय नमः ।।


१/६३ गजानन चरित्र मेघ थोर | तुम्ही श्रोते अवघे मोर |


चरित्ररूपी वर्षता नीर | नाचाल वाटे नि:संशय ||

श्रोत्यांना मोर आणि या संत चरित्राला थोर मेघाची उपमा देऊन दासगणू महाराज आपले वाङ्मयीन सामर्थ्यच व्यक्त करतात या ओवीत. आकाशात जसजसे मेघ गोळा व्हायला लागतात आणि पाऊस पडायला सुरवात झाली रे झाली की मेघ बेभान होतो त्याला काय करू आणि काय नको हे काहीही कळत नाही आणि बेधुंद, बेभान होऊन तो नाचून जसा आपला दिव्यानंद व्यक्त करतो स्वत:ला विसरून तसेच काहीसे हे संत चरित्र वाचायला सुरवात केल्यानंतर श्री भक्तांचे होईल असे दासगणू यांचे मन त्यांना सांगत असावे.

आपण मन मोकळ करून, रिते करून एकाग्र चित्ताने प्रभूच नाव घेतो, हृदयात भगवंताला साठवून जेंव्हा नामस्मरण घडत तेंव्हा बाहेरच्या जगाचा आणि आपला संबद्ध तुटतो. अशावेळी आपण आपल्या शरीराचे नसतो, शरीर आणि मन वेग वेगळे होतात आणि मन दूरवर चिंतन करीत भटकत असतं आसमंतात आणि शरीर निश्चेष्ट पडून असत भूतलावर.

असच घडतं अध्यात्मात प्रभूचे चिंतन करताना, प्रभू नामाची ही किमया आहे. माणूस बेभान होतो, बेधुंद होतो, शरीराचेही त्याला भान राहत नाही कारण आता तो मश्गुल झालेला असतो, तल्लीन झालेला असतो आत्मानंदात. असाच अनुभव पंढरीच्या वारीत वारकरी भक्तांना येतो भर रस्तात पांडुरंगाचे नाव घेऊन नाचत असताना आपल्या माऊली बरोबर.

पारायण म्हणजे भगवंत चिंतनात तल्लीन होणे, शरीर भाव विसरणे, तल्लीन होऊन एकचित्त होउन आत्मानंदात रममाण झाले की मीपणाचा भाव जाऊन आत्मभाव आपोआप प्रगट होतो. आत्म्याचा संयोग परमात्म्याशी होऊन “ अहं ब्रह्मास्मि ” भाव जागृत होतो. मोराप्रमाणे तोही आपल्या मनाचा पिसारा उघडतो त्या ब्रह्मभावात. मीच तर तो परमेश्वर आहे या सृष्टीचा निर्माणकर्ता. अशा अवस्थेत संकुचित भाव रहात नाही, तो व्यापक होतो आकाशाएवढा.

या ओवीचे चिंतन करताना प्रकर्षाने हेही जाणवले की दासगणू महाराजांना आपल्या लिखाण सामर्थ्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे, कारण श्री संत चरित्र ते लिहित नसतात तर पांडुरंग त्यांच्या हृदयात बसून त्यांना जशी प्रेरणा देतो तसे ते आपल्या लेखणीने लिहितात. या सुमधुर, साध्या सोप्या भाषेत गेयतापूर्ण असलेले चरित्र वाचता वाचता भक्त स्वत:ला विसरतो आणि केंव्हा गजाननमय होतो हे त्याचे त्यालाही कळत नाही. हे सामर्थ्य श्री कृपेने दासगणूना लाभले यामुळेच त्यांनी पारायणकर्त्याला आश्वस्त करण्याचे धारिष्ट्य केले असावे. दासगणू हे ओळखून होते की एकदा पारायणाला सुरुवात झाली की भक्ताची द्विधा मनस्थिती लोप पावून पुढे तो सर्व विसरून पूर्णत्वाने तन्मय होईल तो फक्त प्रभूचिंतनात.

१/६४ शेगावंचे पौरवासी | परम भाग्याचे निश्चयेसी |

म्हणून लाधले तयासी | गजानन हे संतरत्न ||

१/६५ जेंव्हा करावे लागे पुण्य | तेंव्हाच लाभती संतचरण |

संत श्रेष्ठ देवाहून | येविषयी शंका नसे ||

अनंत जन्माच्या पुण्याईने व प्रारब्धात असेल तर संताची भेट होते, नंतर संतदर्शनाचा लाभ होतो, नशिबात असेल तर संतसहवास घडतो, एखाद्यावर संतांची कृपा होते, आणि संतांच्या परीक्षेत पास झालो आणि संतांची मर्जी असेल तर संतबोध प्राप्त होतो. पण येथे तर शेगावचे सर्वच नागरिक परम भाग्याचे ठरतात. त्यांना तर संतरुपी रत्नच न मागता प्राप्त झाले.

शेगावच्या भक्तांची भक्ती श्रेष्ठतम ठरली, कदाचित त्यांच्या भक्तीत प्रेममय ओलावा असेल, कारण भगवंत स्वत: प्रेमस्वरूप आहेत. त्यामुळे त्यांस प्रेममयी भक्ती फार आवडते. प्रेमाविना केलेल्या भक्तीतून भगवंत भेटण्याची सुतराम शक्यता नाही. तसेच ज्ञानाने, विद्वत्तेने, पांडित्याने भगवंतावर चतुरपणे भाषण करता येईल, पण भगवंताची प्रत्यक्ष सलगी होऊन भगवंत त्यांच्याशी बोलेल असे काही घडत नाही. भगवंताला आपला भक्त सहज ओळखता येतो आणि अशा पक्या भक्ताला जवळ करतो, त्याला जाऊन स्वत: मिळतो.

शेगावचे भक्त पुण्यकर्म करीत असावेत आणि पुण्य केले की भगवंत भेटतो म्हणे. पण संत देवा पेक्षा श्रेष्ठ. तेंव्हा संतचरण शेगावकराना प्राप्त झाले याचा अर्थ ते महा भाग्यवान असावेत त्याशिवाय काय भगवंत अवतार घेईल?

ज्ञानदेवांनी सुद्धा भक्तांचे वर्णन चार प्रकारात केले आहे.-

आर्त भक्त- संकट आले की देव देव करणारा

जिज्ञासू भक्त- मुमुक्षूवादी मनुष्य जिज्ञासू असतो. जिज्ञासा पक्की झालीकी तो मुमुक्षू बनतो. व त्याचा हेतू देव जाणणे असा असतो .

अर्थार्थी भक्त- धनासाठी वा अपेक्षापूर्तीसाठी उपासना करणारा भक्त.

ज्ञानी भक्त - देव जाणून देवाची ज्ञानोत्तर भक्ती करणारा भक्त.

पुस्तकी ज्ञानाचा भक्तिमार्गात फार उपयोग होतोच असे नाही. भक्ती बुद्धीपेक्षा हृदयाचा विषय असावा कारण तो श्रद्धावान बनतो. देवाच्या कृपेने भक्ताच्या हृदयाचा विकास होऊन अशा भक्ताचे अंतरंग लक्षात घेतले की भगवंत कृपेने साक्षात्कार झाल्याची, मोक्षपद प्राप्त झाल्याची अनेक उदाहरणे सापडतात. शेगावी श्रीरूपाने भगवान अवतीर्ण झालेत ही त्यांचेवर झालेली कृपाच आहे, कारण तेथील भक्ताचा भाग्योदय काळ जवळ आला असावा. आईच्या मायेने भक्तांची काळजी वाहायला श्री गजानन महाराज शेगावात प्रकट झाले, ते विदर्भाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी एवढे मात्र खरे. आणि भक्तांचा विश्वास होता “ गजानन ” म्हणायचे आणि निर्धास्त होऊन जीवन जगायचे श्रींच्या आश्रयाने. मग अशा भक्तांचे रक्षण संत करणारच ना. शेगावचे भक्त निर्भय होउन, विश्वासाने जगणारे होते, मग श्रींनाही अशा भक्तांचे रक्षण करणे, संकटापासून दूर ठेवणे, त्यांची मायमाऊली बनून काळजी वाहणे ओघाने आलेच ना. पांडुरंगाचा वारकरी निर्मोही होऊन स्वार्थरहित निर्मल मनाने  “ राम कृष्ण हरी ” म्हणत पायी चालतो, त्याची काळजी कोण वाहतो, तो पांडुरंगच ना ? असा हा भक्त शेकडो मैल प्रवास करून क्षणभर दर्शन घेताना काय मागणे मागतो हो - तो म्हणतो देवा एकच कृपा कर – मी तुझा भक्त आणि तू माझा देव हे नातं बाकी जन्मोजन्मी टिकून ठेव-.

शेगावंचे भक्तही असाच विश्वास ठेवणारे असावेत म्हणून महाराज शेगावात प्रगट झालेत. आज शेगाव श्रीतीर्थक्षेत्र बनले, विश्वात प्रथम क्रमांकाचे. श्री भक्त धन्य झालेत. व्यवहारात मध्यस्थी करणारा लागतो, येथे तर होता निखळ अध्यात्मातील देवभाव. देव आणि भगवंत यांच्यात मध्यस्थ नसतो, असते ती भक्ती, प्रेम, श्रद्धा व विश्वास. इष्ट देवतेवर श्रद्धा भक्ती ठेऊन वागणे हेच भगवंत कवच होय. आणि ते कवच आहे “ गणी गण गणात बोते “. लीला आणि चमत्कारातून विश्वात सर्वत्र भक्तीचा डांगोरा पिटणारे पहिले मराठी संत ठरलेत शेगावचे श्री गजानन महाराज. ते त्रिकालज्ञानी व सर्वज्ञ होते. तुकोबारायांच्या “ वेद शास्त्र नाही पुराण प्रमाण | तयाचे वदन नावलोका ||” या प्रमाणावरून वारकरी संप्रदाय हा वैदिक संप्रदाय आहे, हे स्पष्ट होते. ऐतिहासिक शिलालेख व इतर पुराव्यावरून नामदेवराय व ज्ञानोबारायांच्या अगोदर या संप्रदायाचे अस्तित्व होते हे सिद्ध झाले आहे. ‘ बैसलिये ठायी म्हणता रामराम| काय होय श्रम ऐसे सांगा| ’

जगदुध्दाराची तळमळ हे श्रीमूल्य फारच लक्षणीय आहे. श्री गजानन महाराज शेगावात प्रगट झालेत, जीवनकार्य विदर्भात घडले आणि श्रींनी समाधी घेतली तीही शेगाव येथेच. यावरून या क्षेत्राची महती ध्यानात येते. समाधी नंतरही श्रींचे वास्त्यव्य शेगावातच आहे. समाधी घेताना श्रींनीच भक्तांना तसे आश्वस्त केले –

उदईक अरुणोदय समयासी| जावयाचे आहे निजधामासी|

तिळभरही न करावे दु:खासी| ठायीच आहे समजावे|

...पुनरपि यावे या स्थळासी| इच्छा पूर्ण होतील || म्हणूनच विश्वातून असंख्य भक्त, वर्षातून एकदा का होईना, शेगावी येऊन दर्शन घेऊन कृतकृत्य होतात हे आपण बघत आहोतच. जसे भक्ती केली की मुक्ती निश्चित, तसे ‘म्हणता श्री गजानन| होई इच्छापुर्ती |’ हेही खरे. जय गजानन.

१/६६ रामचंद्र पाटलांनी | केली माझी विनवणी |

पंढरी क्षेत्री येऊनि | कार्तिकीच्या वारीला ||

१/६७ माझ्या मनी हेत होता | गावे गजानन चरित्रा |

परि त्याची तत्वता | सागत नाही लागली ||

१/६८ त्या माझ्या वासनेची | पूर्तता करण्यासाठी |

केली रामचंद्राची | योजना या समर्थे ||

या ओव्यांमधून एक गोष्ट स्पष्ट होते ती ही की दासगणू महाराजांना श्री गजानन चरित्र गायन करण्याची आपल्याला संधी मिळावी, ही मनापासून इच्छा होती हे ते स्वत:च येथे नमूद करतात. पण आज पर्यंत तसा योग आला नाही ह्याची खंतही त्यांच्या मनाला बोचत असावी. याचाच कदाचित परिणाम असेल की या चिंतेतून त्यांना सदैव श्रीगजानन नामस्मरण होत असावे, अंतर्मनात कोठेतरी त्यातून चिंतन घडत असावे, त्यामुळे प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रसंग आला तेंव्हा एका दिवसात एक अध्याय भराभर दासगणू सांगू शकले... उलट तारांबळ उडायची ते लिखाण लिहून घेत त्या लेखकांची.

ज्याची जशी योग्यता व ज्याची जशी इच्छा ती पूर्णत्वाला नेणे, हे तर श्रींचे ब्रीदच होते ना ! श्री गजानन महाराज वरद आहेत. ती दासगणूची इच्छा पूर्णत्वाला जावी म्हणून शेगावच्या पाटील विश्वस्त मंडळीच्या मनात श्रींचे चरित्र कुणातरी श्रेष्ठ संतकवीकडून गायन करून घ्यावे ही लालसा निर्माण झाली. पण त्यांना दासगणू महाराजांचे नावही माहित नव्हते व त्यांची ओळखही कधी झाली नव्हती. श्री गजानन महाराज संस्थानचे तत्कालीन व्यवस्थापक रावसाहेब श्री रामचंद्र कृष्णाजी पाटील व काही मंडळी नाशिकला जाऊन ह.भ.प श्री . लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांना भेटून आपण महाराजांवर ओवीबद्ध ग्रंथ लिहून द्यावा, अशी विनंती करताच त्यांनी ओवीबद्ध लिखाण करण्यास असमर्थता प्रगट केली आणि श्री कृपेने त्यांच्या मुखी नाव आले ते दासगणू महाराजांचे. अशी असते महाराजांची किमया. श्रींची कुणावर कशी, केंव्हा व कोठे कृपा होईल हे सांगता येत नाही. तरी यावरून हे सिद्ध होते की “ श्री गजानन विजय ” ग्रंथ दासगणूंच्या पुण्याईने श्रींना त्यांच्याचकडून लिहून घेण्याची योजना होती. श्रींची दासगणू महाराजांवर कृपा झाली. त्यांचे मनोगत यशस्वीपणे पूर्णत्वाला न्यावे ही तर श्रींची इच्छा, मग तसेच घडणार ना! श्री संतचरण सापडले की आध्यात्मिक प्रगती झपाट्याने व्हायला लागते आणि त्या भक्ताच्या सकारात्मक कार्यातून लोकशिक्षण व सामाजिक जडण घडण व्हायला हातभार लागतो. तसा योग संतकृपेने यावा लागतो. खरेच दासगणूची लिखाण शैली प्रासादिक आहे, सर्वांना समजेल अशी साधी, सोपी, सरळ भाषा आहे.भक्तीरसाने ओतप्रोत भरली असून मधाळ आणि रसाळ आहे. श्री गजानन महाराज तर प्रत्यक्ष परब्रह्म, त्यांचे कार्य तेच करवून घेतात,एखाद्या सद्भक्ताला निमित्तमात्र होण्याची संधी त्याच्या पुण्याईने त्याला श्री प्राप्त करून देतात. म्हणून संतसेवा मिळाली तर त्याचा अभिमान धरू नये. पण त्यासाठी सबुरीने घावे लागते. लगेच होकार देताना ते म्हणालेत ही सेवा तर प्रत्यक्ष परमेश्वराची कृपा आहे. हा योग माझ्या मनासारखा घडून आला. मानधनाचे विचारताच ते म्हणालेत अहो पाटीलसाहेब, हा योग आला हेच माझे मानधन समजा. मी संतुष्ट आहे. दुसरे मी कोण लिहिणारा, प्रेरणा देणारा तर माझा पांडुरंग विटेवर उभा आहे. प्रेरणा पांडुरंग देतो आणि वाणीद्वारे सहज शब्द बाहेर येतात. हे परमात्म्याचे शब्द या देहातील आत्म्याकडून वदले जातात, त्याचे मानधन ते मी काय घेणार. एक गोष्ट करा, मी गरीब रामदासी आहे, माझ्या प्रवास भाड्याची तेवढी व्यवस्था करा. पाटलांनी ती करताच दासगणू शेगावात दाखल झालेत. दासगणू महाराजांनी श्री कृपेने ग्रंथ पूर्ण केला आणि तेथेच श्री चरणी संस्थानला अर्पण केला. भक्तीत ही समर्पणाची भावना फार मोलाची असते. दासगणू नगर तालुक्यातील अकोळनेर येथे १८८७ साली जन्मले आणि श्री गजानन विजय ग्रंथ लेखन पूर्णत्वाला जायला सन १९३९ उजाडावे लागले. हा योग आला १९०७ साली त्यांच्या पूर्व पुण्याईने घडलेल्या प्रत्यक्ष श्री दर्शनाने. दासगणू लहानपणापासून प्रतिभावान कवी होते ईश्वरकृपेने. हा दैवी गुण आहे. पण लहानपणी शिक्षणात रस नव्हता, मित्र गोंधळी आणि तमासगीर. पुढे बडोद्याला अल्प वेतनावर पोलीस खात्यात नोकरीला लागले. पण श्री साईबाबांच्या कृपेने सन्मार्ग सापडला. नोकरी सोडली. पुढे वामनराव इस्लामपुरकर यांचा गुरु मंत्र घेतला आणि पंढरीची वारी करायला लागलेत. गुरु उपदेशानंतर पूर्वाश्रमीचे गणेश दत्तात्रय सहस्त्रबुद्धे आता “ दासगणू ” या नावाने नामरूपाला आले.

संतकवी दासगणू यांनी भक्तीरसामृत, भक्तीलीलामृत आणि संतकथामृत लिहिले. पण श्री गजानन विजय ग्रंथ ज्याच्या प्रत्येक ओवीवर आपण चिंतन करीत आहोत तो अप्रतिम असून या ग्रंथात दासगणूच्या प्रासादीक वाणीचे प्रत्यंतर आल्याशिवाय राहत नाही.

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।।

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment