Mar 5, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ४२ ते ६२ )


।। श्री गणेशाय नमः ।।

१/४२ नारद, ध्रुव, कयाधूकूमर | ------------------------------

ते /५७ --------------------------------------------ह्या चरित्र रचण्याची ||

या ओव्यांमधून दासगणू महाराज या भरत खंडात होऊन गेलेल्या थोर संताची नामावली देऊन त्यांचे मोठे पण सांगुण महिपतीनी यांचे चरित्र गायन केले ते अनुभवण्याचा सल्ला देतात किंबहुना जिज्ञासु भक्तांना संतांची महती व संतमहीमा अभ्यासण्यासाठी भक्तिविजय, भक्तमाला हे ग्रंथ वाचायला सांगतात. महान भक्तराज नारद, धृव, कयाधूकूमर, उद्धव, महाबली अंजनीकुमार, अजातशत्रू धर्मराजा यांच्या सोबतच अनेक पद्नताच्या कल्पतरूंची नावे घेऊन अध्यात्मविद्येचे मेरू जगद्गुरू श्रीशंकराचार्यांच्या नावाचा उल्लेख करायला विसरत नाहीत. मध्व, वल्लभ, रामानुज सारख्या थोरांचे ज्यांनी आपल्या सामर्थ्याच्या बळावर धर्माची लाज राखली त्यांचाही या संत यादीत समावेश करतात. नरसी मेहता, तुलसीदास, कबीर, कमाल, सूरदास तथा गौरंगप्रभूच्या लीलांचे जेवढे वर्णन करावे, तेवढे थोडेच आहे असे म्हणतात. राजकन्या मीराबाईने सर्वस्वाचा त्याग करून अथक श्रीकृष्ण भक्ती केली प्रसंगी लोकप्रवाद सहन केला. योगयोगेश्वर गोरखनाथ, मच्छिंद्र, जालंदरनाथ यांच्या नवनाथ भक्तीलीलांचा आदराने सन्मान करतात. तसेच नामदेव, नरहरी, जनाबाई, कान्होपात्रा, संत सखूबाई अशा संतानी हरिभक्ती करून श्रीपती आपलासा केला. मुकुंदराज तसेच स्वामी जनार्दन ज्यांनी निपट निरंजनाला बोध दिला या सर्व संतांची महती विशद केली. नंतर स्वत: बद्दल ते उल्लेख करताना म्हणतात या नंतर जे संत झालेत, त्या संतांचे गायन मी तीन ग्रंथ लिहून जगासमोर ठेवले ज्याला आजही फार मोठा जनाधार आहे. या संताच्या तोडीस तोड असा एक संत शेगाव नगरी विदर्भात अवतीर्ण झाला, ज्याचा लोकांवर विलक्षण प्रभाव आहे व फार मोठा भक्त समुदाय त्यांचा अनुयायी आहे. आज माझे भाग्य उदयाला आले की अशा थोर साधुचे चरित्र गायनाचा सुदैवाने योग आला.

मागे एकदा शेगाव अकोट हा प्रवास टांग्यातून करताना अचानक त्यांचे लक्ष्य ओढ्याकाठी निजानंदी बसलेल्या विदेही साधू कडे गेले होते, याचे दासगणूंना स्मरण झालें. वेळ असेल साधारण दुपारची बारा साडेबाराची. मुखाने “गणी गण गणात बोते” हे प्रिय भजन चालू होते. आजूबाजूला बराच भक्त जन समुदाय जमला होता. सहज त्यांनी टांग्यांवाल्यास विचारणे केले आणि त्यांना कळले हेच श्री गजानन महाराज. पटकन त्यांनी टांग्यांखाली उडी मारली आणि श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. हेच त्यांना घडलेले श्रींचे प्रथम दर्शन. त्या दर्शनाचा प्रसाद म्हणजे आज प्राप्त झालेली श्री गजानन विजय ग्रंथ लेखनाची सेवा होय. या संतपुरुषाच्या चरित्राचे ग्रंथ लेखन आजपर्यंत माझ्या हातून का घडले नसावे याचे चिंतन करताना त्यांचा भाव झाला “ माळा आधी ओविती | मग मेरुमणी जोडीती | तीच आजी झाली स्थिती | ह्या चरित्र रचण्याची || १/५७ संतामधील मेरुमणी म्हणजे श्री गजानन महाराज वाटले दासगणूंना. ईश्वरी अवतार या साधूच्या रूपाने भक्तांच्या कल्याणासाठी शेगावात प्रकट व्हावा, यामागेही कांही ईश्वरी संकेतच असावा.

१/५८ शेगाव नामे वऱ्हाडात | ग्राम आहे प्रख्यात |

खामगाव नामे तालुक्यात | व्यापार चाले जेथे मोठा ||

१/५९ ग्राम लहान साचार | परि वैभव त्याचे महाथोर |

ज्याचे नाव अजरामर | झाले साधूमुळे जगत्रयी ||

विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात खामगाव तालुक्यातील शेगाव हे ग्रामवजा एक लहानसे गाव होते. पण आजूबाजूला वसलेल्या खेड्यांना बाजारहाटासाठी याच गावाचा आश्रय घ्यावा लागत असे. त्यामुळे बऱ्यापैकी व्यापारी मंडळी येथे व्यवसायाच्या निमित्ताने स्थिरावली होती. शिवाय कापूस पिकविणारा भूप्रदेश म्हणून कापसाची सुद्धा बाजारपेठ होती. अशा पेढीवरच शेतकरी आपला माल विक्रीसाठी टाकत असत. माल विक्री होण्याआधीच काही गरजू शेतकरी तेथूनच हात उसने पैसे घेऊन आपला संसार चालवीत होते.

पण पौराणिक काळाची महती सांगणारे हे शेगाव प्रसिद्ध झाले, ते श्रींच्या प्रगट होण्याने. ज्याचे नाव जगत्रयी अजरामर झाले. साधूमुळे त्या गावाला आध्यात्मिक वैभव प्राप्त झाले. वैदिक काळात येथे गर्ग व शृंगमुनींची तपोभूमी होती. शृंगाच गाव ते शृंगगाव अर्थात शिवगाव पुढे शेगाव. येथील प्राचीन शिव मंदिरांमुळे या गावास शिवगाव किंवा शेगाव म्हटले जाते.

मध्य रेल्वेच्या मुंबई नागपूर मार्गावर शेगाव हे स्टेशन असून २५० पेक्षा अधिक विविध ठिकाणाहून बसने, रेल्वेने हजारो भाविकजन व श्रीभक्त येथे दररोज “श्रींच्या” दर्शनार्थ येत असतात. अशा प्रगटस्थळी श्रीच्या आशीर्वादाने श्री गजानन महाराज अध्यासन केंद्र निर्माण होत आहे, ही तर श्रींची असलेली असीम कृपा आहे. श्रींचे कार्य श्रीच करून घेतात एवढेच खरे. विमान सेवेनेही लवकरच हे क्षेत्र मुंबई, नागपूरशी जोडल्या जाऊन विश्वातील असंख्य भक्तांना श्रीदर्शन सोयीचे होईल असे माझे अंतर्मन मला आज सांगत आहे.

१/६० त्या शेगाव सरोवरी भले | गजानन कमल उदया आले ||

जे सौरभे वेधिते झाले | या अखिल ब्रह्मांडा ||

१/६१ हा शेगाव खाणीचा | हिरा गजानन होय साचा |

प्रभाव त्या अवलीयाचा | अल्पमतीने वानितो मी ||

१/६२ ते आता अवधारा | गजानन चरणी प्रेम धरा |

येणे तुमचा उद्धार खरा | होईल हे विसरू नका ||

मूळ सत्यभाव स्पष्ट होण्यासाठी तुकोबाराय आपल्या जग व्यवहाराच्या सूक्ष्म ज्ञानातून पारमार्थिक सत्याचे आकलन पूर्णत्वाने करतात,जसे-

न लगे चंदना सांगावा परिमळ |

वनस्पती तेल हाकारुनी |

अरण्यातील सर्व झाडांना बोलाऊन “ मी सुगंधी आहे “ हे जसे सांगावे लागत नाही तसे श्री गजानन या शेगावरुपी सरोवरात कमलाच्या रूपाने उदयास आले, तेंव्हा सर्व जन त्या सौरभाकडे आपोआप आकर्षित होणारच ना ! तेंव्हा गजानन चरणीं प्रेम धरा, म्हणजे तुमचा उद्धार होईल हे कुणी सांगण्या आधीच शेगावला भक्तांची रीघ लागली होती श्री दर्शन घेण्यासाठी. म्हणून आपल्याकडे लहानपण घेऊन या हिऱ्याची खरी पारख मला काय होणार असे म्हणून “माझ्या अल्पमतीने संतचरित्र गायचे धाडस करतो” हा भाव दासगणू नम्र भावाने व्यक्त करतात कारण दासगणू महाराजांनी आकोटला जाताना स्वत: हा प्रभाव अनुभवला होता व त्या नंतर त्यांच्या शुभ प्राक्तनाने त्यांचेकडून श्रींनी “ श्री गजानन विजय ” गाऊन घेतले.

श्री गजानन महाराज हे अवतारी होते, याचा अर्थ त्यांना “ ईश्वरी तत्व जर माझ्या या अवतार कार्यातून भक्तांच्या अंगवळणी पडले तर अशा भक्तांचे जगणे ही कृपार्थ ठरते ” हा विश्वास जनसामान्यांत ठाम करावयाचा होता. इ.स. १८७८ ते १९१० हा कालावधी श्रींच्या वास्तव्याने पावन आणि भक्तांना चैतन्यदायी ठरला, हे नाकारून चालणार नाही. त्याचे प्रत्यंतर आज विश्वात अमेरिकेतील जॉर्जिया येथील श्री मंदिरात श्रींच्या प्राण प्रतिष्ठेच्या प्रसंगी श्री गजानन महाराज विश्व भक्तीपिठ कॅनडा येथील काही भक्त व इंग्लंड मधील काही भक्त उपस्थित राहणार आहेत यावरून सिद्ध होते.

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।।

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment