Feb 25, 2020

श्री साई चरित्रामृत - ४


ll श्री गणेशाय नमः ll श्री सद्‌गुरु साईनाथाय नमः ll ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ll


महायोगीश्वर साईनाथ

श्री साईनाथांना सर्व योगक्रिया अवगत होत्या. लोकांची नजर चुकवून ते एकांतस्थळीं जात. स्नानाच्या निमित्ताने अभ्यांतरी करतांना कितीतरी शिरडीवासियांनी त्यांना पाहिलें आहे. त्यांना धोती पोती आदी योगांगांचे पूर्णतः ज्ञान होते. इतकेच नव्हें, तर कधी कधी साई खंडयोग लावून शरीराचे सर्व अवयव विलग करून मशिदीत जागोजाग फेकून देत. त्यांचा तो खंड-विखंड झालेला देह पाहण्यासाठी लोक मशिदीत धावून धावून येत असत, मात्र त्यांना बाबा पूर्ववत अखंड स्वरूपांत दिसत. अशाच एका प्रसंगी, साईंचा खंडयोग पाहून एक गृहस्थ अतिशय घाबरला. " मशिदीत चार कोपऱ्यांत बाबांच्या शरीराचे तुकडें दिसत आहेत. भर मध्यरात्रीची वेळ आहे. कुणीही जवळ नाही. कोणा दुष्टाने बाबांना ठार केले असेल बरें ? कोणी हा अत्याचार केला असेल बरें ? कोणाला सांगायला जावें, तर आपल्यावरच नाहक आळ येईल." असा विचार करीत चिंताग्रस्त होऊन तो गृहस्थ बाहेर जाऊन बसला. बाबांची ही काही योगसाधना असेल, असे त्याच्या स्वप्नींही नव्हते. अखेर, पहाटें तो धीर करून मशिदीत गेला अन काय आश्चर्य ! साईनाथ आपल्या नेहेमीच्या ठिकाणी स्वस्थ बसलें होते. आपण मध्यरात्री जे दृश्य पाहिलें, ते स्वप्न तर नव्हते ना असे वाटून तो आश्चर्यचकित झाला.

साईंच्या योगसामर्थ्याच्या महतीचे वर्णन करतांना अजून एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केलाच पाहिजे.  कैसी साईंची रहाणी । कोठे तें निजत कोण्या ठिकाणी । सादर श्रवणीं श्रोतें व्हा । बाबांची झोपण्याची पद्धत अतार्किक अन अचंबित करणारी होती. मशिदीच्या आढ्याला झोपाळ्यासारखी एक लाकडी फळी टांगलेली होती. ती फळी साधारण चार हात लांब आणि एकच वीत रुंद होती. विशेष म्हणजे या फळीची दोन्ही टोकें केवळ चिंध्यांनी बांधलेली होती. बाबा याच फळीवर झोपत असत. इतकेच नव्हें तर बाबांच्या उशाशी म्हणजेच मस्तकाजवळ आणि पायथ्याशी म्हणजेच अर्थातच पायांजवळ पेटलेल्या पणत्या ठेवलेल्या असत. या फळीवर निद्रिस्त झालेल्या बाबांना अनेकांनी अगणित वेळा पाहिले आहे. मात्र तें फळीवर केव्हा आणि कसे चढत तसेच केव्हा उतरत, हें कोणालाच कळत नसे. ऐसी चिंध्यांनीं बांधिली फळी । वजन बाबांचें कैसें सांभाळी । महासिद्धि असतां जवळी । नांवाला फळी केवळ ती ॥ साध्या चिंध्या एकत्र करून बांधलेली ती चौहाती लाकडी फळी बाबांचे वजन कसे पेलवत असेल ? ही एक अद्भुत लीला होती. अर्थात,अष्टसिद्धींवर विजय मिळवलेल्या साईबाबांसाठी मात्र ही सहजशक्य गोष्ट होती. साईनाथांचे असे अनेक चमत्कार आणि लीला, त्यांच्या दिव्यशक्तीची नोंद घेण्यास भाग पाडतात. अर्थात जे प्रसंग साईचरित्रकारांनी वा इतर साईभक्तांनी शब्दबद्ध केलें आहेत तितकेच आपल्याला ठाऊक आहेत. जें अनुभव, ज्या लीला ग्रंथबद्ध झाल्या नाहीत, त्याबद्दल काय लिहावे ?    

थोडक्यांत,साईंची ही योगस्थिती कोणालाही अगम्य अशीच होती. सहा शास्त्रें आणि षडदर्शनें ज्यांच्यासमोर नतमस्तक होतात, ते साईनाथ !

साईबाबांनी मशिदीत वास्तव्यास प्रारंभ केल्यावर म्हाळसापती आणि तात्या कोते पाटील सतत त्यांच्या सहवासात असायचे. ते दोघेही बाबांसोबतच मशिदीत झोपत असत. पूर्व, पश्चिम आणि उत्तर अशा तीन दिशांना तिघांची डोकी असत आणि परस्परांचे पाय मध्यबिंदूस भिडलेले असत. रात्री उशिरा बराच काळापर्यंत त्यांच्या गप्पागोष्टी चालत असत. कुणा एखाद्यास डुलकी लागली तर इतर दोघे त्यास जागे करीत असत. असे जवळजवळ १४ वर्षें तात्या बाबांसमवेत मशिदीतच असत. पुढें तात्यांचे वडील श्री. गणपतराव कोते पाटील निर्वतले. त्यानंतर तात्यांवर प्रपंचाची जबाबदारी आली, ते घर-संसारात पडले आणि मशिदीतील रात्रीच्या वास्तव्यात खंड पडला. मात्र साई आणि तात्यांचा ऋणानुबंध कायम राहिला. खरोखर म्हाळसापती आणि तात्यांच्या भाग्याचे वर्णन किती करावे बरें !

तसेच राहाता गावांत खुशालचंद नावाचे एक श्रीमंत व गावचे नगरशेट गृहस्थ बाबांचे भक्त होते.प्रसिद्ध पाटील गणपत कोते । जैसे बाबांचे फार आवडते । चुलते खुशालचंदांचे होते । तैसेचि बाबांतें प्रिय बहु ॥ खुशालचंदांचे चुलते चंद्रभान शेट बाबांचे अत्यंत लाडके होते. त्यांचे देहावसान झाल्यावरदेखील बाबांची कृपा खुशालचंद आणि त्यांच्या घराण्यावर कायम राहिली. कधी बैलगाडीत तर कधी टांग्यात आपलें काही भक्त बरोबर घेऊन शिरडीपासून सुमारे दीड मैलांवर असलेल्या राहात्यास बाबा जात असत. त्यावेळीं गांवकरी लोक ताशे वाजंत्रींसह वेशीवर सामोरे येऊन बाबांचे स्वागत करीत असत. मग तेथूनि गांवाआंत । बाबांस समारंभें नेत । अति प्रेमें वाजत गाजत । आनंदभरित मानसें ॥ नंतर खुशालचंद बाबांना आपल्या घरी घेऊन जाऊन पूजाअर्चा आणि उत्तम आदरातिथ्य करीत असत. अशाप्रकारे काही काळ तिथे राहून बाबा आपल्या भक्तगणांसोबत शिरडीस परत येत असत.

एकीकडे हे राहते गाव आणि दुसरीकडे निमगाव होते. शिरडीपासून साधारण एक मैलभर अंतरावर असलेल्या निमगावाच्या परिसरांत साईबाबा दुपारी मनास येईल तसे हिंडत असत.निमगांवचे जहागिरदार  बाबासाहेब डेंगळे यांची साईंवर श्रद्धा होती. साईही निमगांवास गेल्यावर डेंगळ्यांच्या घरी जात असत. निमगांवावरी जातां फेरी । बाबानीं जावें तयांचे घरीं । अति प्रेमें तयांबरोबरी । दिवसभरी बोलावें ।। बाबासाहेबांची डोळ्यांची व्यथा साईंनी दूर केली होती तसेच शिवेच्या नाल्याजवळ दर्शन देऊन श्री शेषशायी श्रीहरी रूपांत दिव्यस्वरूपही प्रगट केले होते. बाबासाहेब डेंगळ्यांचे कनिष्ठ बंधू, नानासाहेब डेंगळे अपत्यप्राप्तीसाठी तळमळत होते. बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार नानासाहेब श्री साईंच्या दर्शनास आले. साईबाबांच्या कृपेनें आणि आशीर्वादाने यथावकाश त्यांना पुत्रप्राप्ती झाली. नंतर हळूहळू साईनानाथांची ख्याती वाढत गेली आणि त्यांच्या दर्शनासाठी जनसमुदाय लोटू लागला. पुढे ही वार्ता अहमदनगरला, जिल्ह्याच्या ठिकाणी पोहोचली. तिथे सरकार दरबारी नानांचे बरेच येणें जाणें होते, वजन होते. तिथे सर्कल इन्स्पेक्टर गोपाळराव गुंड आणि चिदंबर केशव गाडगीळ नावाचे चिटणीस होते. नानासाहेब डेंगळ्यांनी त्यांना पत्र लिहून साईसमर्थांचा महिमा सांगितला व सहकुटुंब, इष्टमित्रांसहित बाबांचे दर्शन घेण्यासही सुचविले.ऐसे एकामागून एका । शिरडीस येऊं लागले अनेक । वाढला जैसा बाबांचा लौकिक । परिवारही देख तैसाचि ॥

बाबा आपल्या शिरडीतील वास्तव्याच्या सुरुवातीच्या काळांत रहाते व नीमगांव या दोन गावांपलीकडे अन्यत्र कधीही गेले नाहीत. तरीही त्यांना सर्व ठिकाणांची माहिती होती, आणि रेलगाडीचे वेळापत्रकही माहीत होते. 


धन्वंतरी साई   

बाबा प्रारंभी गावांत वैद्यकी करत असत. त्यांच्या हाताला बरेच यशही होते. त्यामुळें, सत्पुरुष व फकीर याचबरोबर प्रख्यात 'हकीम' अशीही उपाधी त्यांना सुरुवातीच्या काळांत प्राप्त झाली होती. एकदा एका भक्ताचे डोळें सुजून लाल झालें होते व बुबुळेंही रक्तबंबाळ झाली होती. शिरडीतील वैद्यांचाही उपाय चालेना. अखेर,साईबाबांवर अढळ श्रद्धा असल्यानें सर्व मशिदीत आले. साईंनी कुणा भक्ताकडून बिब्बे ठेचून घेतलें. तें गोळें हा त्रास असलेल्या भक्ताच्या डोळ्यांवर दाबून भरलें आणि त्यांवर एक फडकें गुंडाळले. दुसऱ्या दिवशी, साईंची त्या भक्ताच्या डोळ्यांवरील पट्टी सोडून डोळ्यांवर पाण्याची धार धरली. नंतर, त्या भक्तास डोळें उघडण्यास सांगितले असता डोळ्यांची सूज पूर्णपणें निवळली होती, तसेच बुबुळेंही स्वच्छ, निर्मळ झाली होती. डोळ्यांसारखा नाजूक भाग असूनही बिब्ब्यानें मुळीच आग झाली नव्हती, उलट नेत्ररोग पूर्णतः बरा झाला. असें अनेक अनुभव श्रद्धावंतांस येऊ लागलें होते. साईनाथांच्या केवळ दर्शनानेदेखील कित्येक लोक आरोग्यवान झाले, कित्येक दुष्टांचे सुष्ट- सदाचारी झाले. अनेक लोकांचे कुष्ठही नाहीसे झाले. नेत्रहिनांना दृष्टी, तर पंगू लोकांस चालतां येऊ लागलें. कित्येक लोकांचे कल्याण झालें. त्यांची काया जरी मानवाची असली तरी, करणी मात्र अपूर्व आणि परमेश्वराची होती. साईचरित्रकार सांगतात की असे बाबांचे असंख्य चमत्कार आहेत, तें सर्व वर्णन करणें सर्वथा अशक्य आहे.



पुढें साईबाबांच्या प्रसिद्धीचा ओघ वाढत राहिला, तरी त्यांच्या वर्तनामध्ये मात्र फारसा फरक पडला नाही. दिवसभर भक्तांच्या सान्निध्यात बुडालेले बाबा रात्रीच्या वेळी पडक्या मशिदीचा आसरा घेत असत.  बाबांसोबत चिलीम, टमरेल, सटका मात्र नित्य-निरंतर असे. चिलमीमध्ये भरण्यासाठी कुणा भक्ताने दिलेल्या तंबाखूची पुरचुंडी बाबा जपून ठेवत असत. बाबांच्या अंगात पायघोळ कफनी व डोक्याला पांढरा फडका बांधलेला असे. ते धूतवस्त्र आपल्या डाव्या कानामागे पीळ देऊन एखाद्या जटेप्रमाणे गुंडाळत असत. स्नानाचाही काही नित्य नियम नसे. मनांत आल्यास काहीतरी खावे, तर कधी भटकंती करावी अन्यथा पडक्या मशिदीतील गोणपाटावर बसून राहावे, असा दिनक्रमही प्रत्येक दिवशी वेगळा असायचा. बाबा पायात कधीही वहाण घालत नसत. एक गोणपाट हेच त्यांचे आसन होते. मशिदीमध्ये नाथसंप्रदायाची निशाणी, धुनी सतत पेटलेली असे. त्यात कधी खंड पडला नाही. बाबा अनेकदा एकटे असता दक्षिण दिशेकडे असलेल्या या धुनीकडे एकटक पाहत बसत, अशावेळी त्यांचे कुणाकडेही लक्ष नसे. बाबा स्वतःमध्ये मग्न व विचारात गढलेले असत. बाबांनी स्वहस्तें पेटवलेली ही धुनी आजही शिरडीत अखंड-अव्याहतपणे पेटती ठेवली जात आहे. 

श्री साईबाबांच्या १८५८ सालच्या शिरडीतील पुनरागमनानंतरची साधारणपणें १२ वर्षे त्यांनी विजनवासात काढली. ह्या काळांत प्रामुख्याने फक्त बायजाबाई, श्री.गणपतराव कोते व फार थोड्या गावकऱ्यांनी त्यांचा महिमा जाणला. सन १८७०च्या सुमारास बाबा मशिदीत वास्तव्यास राहू लागलें. पुढें १८७३मध्ये बीडकर महाराज, त्यानंतर गंगागीर व १८८०मध्ये आनंदनाथ महाराजांनी जनमानसांत त्यांची प्रतिमा उजळण्याचे कार्य केलें. त्याच साली, बाबांनी मशिदीत दीपोत्सवाचाही चमत्कार केला. त्याआधी १८७८ साली श्री स्वामी समर्थांनी समाधी घेतली आणि हळूहळू साईनाथ ही सिद्धशक्ती शिरडीत प्रकाशमान झाली. याच काळांतील बाबांच्या प्रमुख भक्तमंडळींत म्हाळसापती, काशीराम,कोते दाम्पत्य,डेंगळे बंधू, माधवराव आदींचा प्रकर्षाने उल्लेख केला पाहिजे. नंतर १८९२ पासून नानासाहेब चांदोरकर, दासगणू शिरडीत बाबांच्या दर्शनास येऊ लागले आणि त्यांनी सर्वथा बाबांची कीर्ती दूरदूरपर्यंत पोहोचवण्यांत अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. १९०५ नंतर श्री साईभक्तीचा महाप्रवाह महाराष्ट्रात आणि भारत देशात वेगानें वाहू लागला. तर आजमितीला शिरडी संस्थान हे पूर्ण विश्वातील असंख्य साईभक्तांचे श्रद्धास्थान झाले आहे. 


क्रमश: 


No comments:

Post a Comment