Feb 24, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ३४ ते ४१ )


।। श्री गणेशाय नमः ।।

१/३४ संत हेच भूमिवर | चालते बोलते परमेश्वर |

वैराग्याचे सागर | दाते मोक्षपदाचे ||

१/३५ संत हेच सन्नीतीची | मूर्ति होय प्रत्यक्ष साची |

संत भव्य कल्याणाची | पेठ आहे वोबुध हो ||

श्री गजानना! भगवंता! या शेगाव - विदर्भ नगरीचे भाग्य उदयाला आले आपल्या अवतार रूपाने. तुझ्या दर्शनाने मन कसे आनंदाने भरून गेलें आहे. तुझी अपार शक्ती जाणण्याच्या पलीकडे आहे. तुझ्याकृपेशिवाय का अंतर्मन हातात लेखणी घेऊन तुझे गुणगान करायला सिद्ध झाली असावी. देवा ! ज्ञानदाता तर तूच आहेस ना ? तुझ्या नामाचा ध्यास आणि तुझा वास चित्तात आहेच पण तो कळावा, जाणावा, समजावा, साधावा व त्याची ओळख पटावी म्हणून हे मागणे बरें ! भक्ती ही ज्ञानाच्या अनुषंगाने केली, तरच तो भगवंत भेटेल आणि या नरदेहाचे सार्थक होईल. पण मी तर अज्ञानी. पण तुझी कृपा अगाध आहे. सद्भाग्याने ती झाली की पांगळा मनुष्य सुद्धा लीलया उंच पहाड उल्लंघून जातो, म्हणून तुझे नामस्मरण वा गुणगान करण्यासाठी केवळ ज्ञानच लागते असे नाही तर शुद्धभाव हवा, प्रेम हवे, भक्ती हवी. तेवढी मनात जागृत कर देवा. तुझी शक्ती एवढी महान आहे की माझे हे मागणे फारच साधे आहे. तुझी कृपा झाली तर मुका सुद्धा अस्खलित भगवंत चिंतन करू शकतो.

देवा आम्हाला तुझे निर्गुण रूप नाही समजणार, म्हणूनच तू सर्वसामान्य मनुष्याच्या सगुण रुपात प्रगटला. संतरूपाने आपण अवतीर्ण झालात. संत हेची देव. तर असे हे चालते बोलते परमेश्वर आणि हा  अनुभव शेगांवकर भक्तांना आला, कारण आपली वैराग्यपूर्ण जीवनलीला फार काही देऊन गेली व आजही देत आहे भक्तांना. तू एका मुठीतून भक्ती दिली तर लगेच दुसऱ्या मुठीतून जीवनमुक्तीचा लाभ घडवून आणला भक्तांच्या जीवनात. अनेक भक्तांना सरळ मोक्षपदी पाठविले. त्यांची या मृत्यू लोकातील येरझार संपविली. धन्य आहे देवा. तुझी धर्मभावना, तुझे साधे सरळ निर्मळ सात्विक जीवनविषयक तत्वज्ञान, समाजसुधारण्याची प्रवृत्ती, सामान्य जनाच्या देवावरील भावना दृढ करण्यासाठीकेलेले अथक प्रयत्न लपून का राहिले?

मायलेकराचे नाते लपून राहात नाही, ते शब्दांत व्यक्तही करावे लागत नाही. या नात्यात प्रेमाचा उमाळा हा सहज व उत्स्फूर्त असतो. विशेष म्हणजे हा प्रेमाचा झरा कधीही,कोठेही, कुठल्याही प्रसंगी आटत नाही. खरा संत समाजाची आई होतो, म्हणून लोक संताना मान देतात, त्यांच्या चरणकमलांचे दर्शन घेतात.

संत हेच या पृथ्वीतलावरील चालते-बोलते परमेश्वर आहेत. संताचे दर्शन बाह्यरूपाने घेऊन फसणारे नागरिक शेगांवचे नव्हते. संतत्व हे प्रवृत्तीत आहे, वागणुकीत आहे, वैराग्यात आहे. महाराजच जाणोत की वैराग्यपूर्ण जीवन जगावे कसे आणि त्याची अनुभूती भक्तांना द्यावी कशी? एक तर शेगावचे लोक भाग्यवान असावेत किंवा प्रथम दर्शनातच महाराजांनी त्यांच्या आध्यात्मिक शक्तीने त्यांचे अंतर्मन जागृत केले असावे. महाराजांनी भक्तांवर निर्हेतुक प्रेम केले, सर्वांशी समत्व भावाने वागले, आपल्या आशीर्वादाने सर्वांची अंत:करणे ईश्वरप्रेमाने भरून टाकलीत. भक्तांच्या कल्याणाचा मार्ग महाराजांनी परोपकारातून उन्नत केला. बत्तीस वर्षं शेगांवात भक्तांचे धारण,पोषण व संवर्धन करणारे प्रती-ईश्वर होते महाराज.

आपल्या निस्सीम भक्ताला मोक्षपद बहाल करून त्याच्या नरदेहाचे सार्थक केले. असे हे शेगावंचे भक्त व त्यांना लाभलेले हे महाराज. उलट आम्ही भक्त, भक्तीचा, ज्ञानाचा केंव्हा अहं येईल हे नाही सांगता येणार. कदाचित देव आम्हाला समजलाच नसेल, त्याचे अस्तित्व जाणवले नसेल, तो कोठे राहतो हे कळले नसेल. आम्ही आम्हालाच धोका देत बसतो. मग कसा भेटेल तो सत्य परमेश्वर आम्हाला? शेगावंचे साधे भोळे, प्रामाणिक भक्त महाराजांना शरण गेलेत, पूर्ण विश्वास ठेऊन त्यांच्यावर. आज शेगाव संतनगरी ही श्रींच्या वास्तव्याने भक्त कल्याणाची प्रसिद्ध पेठ बनली. त्यामुळेच विश्वातील अनंत भक्त आवर्जून या पेठी येऊन भक्तीचा स्वानुभव घेऊन धन्य होतात. आपापल्या देशी सुख समाधानाने निघून जातात, जय गजानन श्री गजानन म्हणत म्हणत. परत श्रीदर्शन वारंवार जीवनात लाभत राहावे, ही शुभ भावना ठेऊन.

१/३६ त्या संतचरित्रास | श्रवण करा सावकाश |

आजवरी ना कवणास | संतानी या दगा दिला ||

आदर्श तत्त्वज्ञान जीवनात उतरविणारी, स्वत: त्याबरहुकुम वागणारी विभूती श्रेष्ठ ठरते, अनुकरणीय असते. संताचे आदर्श जीवन त्यांना जनमानसात, विश्व कल्याणार्थ रुजवायचे असते. त्यासाठी करावा लागतो स्वार्थत्याग व जगावे लागते समर्पित जीवन. त्यासाठी ते लोकांच्या भावविश्वात विरघळून जातात, त्यांच्या पैकी एक होतात, त्यांची भाषा आत्मसात करतात, त्यांना भावेल त्या रुपात, वेशात अवतीर्ण होतात. आणि आपले दिव्य विचार त्यांच्या मनाला भावतील अशा माध्यमातून या भोळ्याभाबड्या लोकांच्या मनात प्रवेश करतात तो कायमचा.

" संतापरते दैवत नाही ज्या चित्ती | तोची एक पूर्ण स्थिती ब्रह्मज्ञानी |

संत तोची देव जयाची वासना | एका जनार्दनी भावना नाही दुजी || "

म्हणून या ओवीत संतकवी दासगणू महाराज लिहितात- वाटते तेवढें समजायला संतचरित्र सोपे नसतें, समजलें तरी अनुकरण करणे कठीण जाते, म्हणून ते मनापासून, शांत मनाने सावकाश हळू हळू वाचा. त्यावर चिंतन करा. दररोज तेच तेच वाचा, जोपर्यंत त्याचा अंगिकार जीवनात होत नाही. म्हणून पारायण असतात बरं ! संतावर, देवावर विश्वास, श्रद्धा असावी लागते, शरणागतीचा भाव ठेऊन जीव त्यांना अर्पण करावा लागतो, मीराबाईसारखे प्रसंगी लोकप्रवाद झेलत झेलत सेवा करावी लागते.मग स्वानुभव प्राप्त होतो

“आजवरी ना कवणास | संतानी या दगा दिला ||”

तुकोबारायांना ही किमया फार अप्रतिम साधली बर ! त्यांनी माध्यम निवडलें ते अभंग गायन–कीर्तनाचे. खऱ्या अर्थाने ज्ञानाचे समाजीकरण जर कोणी केले असेल तर ते देहूच्या तुकोबारायांनी. तसेच कार्य विदर्भात गुरुमाऊली योगी श्री गजानन महाराज यांनी शेगाव येथे अवतीर्ण होऊन आपल्या जीवन चरित्रातून लोकांसमोर ठेवले आणि अठरा पगड जातीला एका भक्तीसूत्रात न कळत केंव्हा बांधले व त्यांना पंढरपुरच्या पांडुरंगाचा मार्ग कसा व केंव्हा प्रशस्त केला हे कळलेही नाही आणि जाणवलेही नाही, मिळाला तो फक्त जीवनानंद. थोडक्यात आमच्या गुरुमाऊलीने संतज्ञानातून अध्यात्मिक तत्वज्ञांनाचे सुलभीकरण करून हे ज्ञान-विज्ञान, भक्ती या नावाने समाजातील सर्व पातळीवर प्रतिष्ठित केलें, आपल्या उघड्या-नागड्या जीवनातून पारदर्शकपणे लोकासमोर ठेवलें असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. भारतातील धर्मपरंपरा ही विवेकनिष्ठ विचारांची व लोककेंद्री ज्ञानसंपादनाची राहिली आहे, हे येथे सांगणे न लगे.

“ संतचरण वंदुनी तत्वता | सायुज्य मुक्ती माथा पाय देऊ |

थोरीव थोरीव संताची थोरीव | आणिक वैभव काही नेणे ||”

धर्मज्ञान हे सुसंस्कारीत जीवन व मुक्तीसाठी आवश्यक समजून संतानी ते आपल्या परीने जनसामान्याच्या दारात नेले व ही संस्कृती विस्तारित करून जनमान्य केली व त्यांच्या गळी सहजतेने उतरविली अवतारी श्री गजानन महाराजांनी. म्हणून आज आम्ही त्यांच्या चरणी नतमस्तक होतो व “अध्यासन केंद्र” संकल्पना स्वीकारतो. मानवी जीवन सार्थकी लावण्याच दैवी कार्य विदर्भात श्रींनी साध्य केले व विश्व जनकल्याण साधले. विश्वात शांती टिकवून सहजीवन व बंधुभाव दृढ केला, हे आज विश्वसंमत विश्वमत आहे.

१/३७ ईश्वरी तत्वाचे वाटाडे | संत हेचि रोकडे |

अमोघ ज्ञानाचे ते गाडे | भरले असती प्रत्यक्ष ||

१/३८ संतचरणी ज्यांचा हेत | त्यांचा ऋणी रुक्मिणीकांत |

आता मलरहित करा चित्त | गजाननचरित्र ऐकावया ||

प्रपंचाचे तत्त्व शिकविणारी एखादी शाळा शोधणारा संसारी मनुष्य तुम्हाला भेटला आहे का? नसेलच भेटला. जन्मत:च त्याला ते ज्ञान देणारी फौज सज्ज असते. पण प्रपंच म्हणजे सर्वस्व नव्हे. मन:शांती साठी त्याची धडपड सुरूच असते. तो मंदिरात गेला, साधना केली, ध्यान केले की जरा बरे वाटते. संसारातील दु:ख, संकट, द्वेष, लोभीपणा सोसता सोसता तो मेटाकुटीला येतो. यावेळी नशिबाने कोणी सज्जन भेटला तर भगवंताच्या कथा ऐकून आधार वाटतो. पण हा आधारकर्ता दिसत नाही, भेटत नाही पण चाहूल तर निर्माण होते मनात काहीतरी घडतंय याची. त्यालाच तो ईश्वर या नावाने ओळखायला लागतो. सद्भाग्याने प्रपंचातून ईश्वराकडे घेऊन जाणारा दुवा लाभला तर संसाररूपी नौका सुखरूप पैलतीरावर वाट पहाणाऱ्या भगवंताला भेटून कृतकृत्य होते. असे जो कुणी हे घडवून आणतो तो कुणीतरी हेच आमचे संत असतात. मलरहित चित्त करा, असे म्हणून ते होणार नाही, तर गजानन चरित्राचे बोल ऐकायला आले की मनाचा भाव आपोआप बदलतो. चित्त निर्मल होत. स्वभाव जाऊन परमात्मभाव उदयाला येतो. नवविधा भक्तीच्या आधारावर व आपल्या भक्तीच्या जोरावर त्यांना परमेश्वर भेटतो. पण तो परमेश्वर इतरांनाही भेटावा, अशी कळकळ ज्यांना असते तो संत. " बुडते जग न देखवे डोळा " अशी त्यांची अवस्था होते. संतांचे कार्य एका दिशेने स्वार्थ रहित निर्मोही मनाने होत असते, त्यांचा भाव असतो संसारातील मनुष्याला परमेश्वर जाणता यावा, सुखाचा प्रपंच करता करता जीवनात ईश्वरभक्तीद्वारे शांतीचा अनुभव घेत घेत, अध्यात्म आणि परमार्थ जाणता यावा म्हणून तो सामाजात राहून डोळसपणे कार्यरत असतो.

“ ईश्वरी तत्वाचे वाटाडे | संत हेचि रोकडे | ” असे म्हणणाऱ्या दासगणू महाराजांना स्पष्ट हेच सुचवायचे आहे की या भूतलावर परमेश्वराने जगाच्या उद्धारासाठी अनेक अवतार घेऊन भक्तांचा उद्धार केला. जसे श्रीराम प्रभू, दयाघन श्रीकृष्ण तसेच सगुण रूप घेऊन विश्वात्मक मानवतेद्वारे शांतीचा आणि ईश्वर प्राप्तीचा आपल्या जीवनचरित्रातून संदेश देणारे शेगांवचे श्री गजानन महाराज होत. त्यामुळे श्रींचे जीवन चरित्र मनाला भिडते, जसे संत तुकोबारायांचे अभंग. ’ तुज आहे तुजपाशी | परि तू जागा चुकलासी || ’

१/४० जंबूद्वीप हे धन्य धन्य | आहे पहिल्यापासोन |

कोणत्या सुखाची ही वाण | येथे न पडली आजवरी ||

१/४१ याचे हेच कारण | या भूमीस संतचरण |

अनादि कालापासोन | लागत आले आहेत की ||

भारतखंडात सुखाची वाण कधीही पडली नाही कारण या भूमीला अनादी कालापासून अनेक संत व संतवाङ्मयांची वाण पडली नाही. संत लाभले की सत्संग घडतो, सत्संगातून आत्मज्ञान होतें, आत्मज्ञानातून तो भगवंत कळतो. या आपल्या आत्म्याद्वारे परमात्म्याशी एकात्मता साधता येते. द्विधा मनस्थिती असली की ईशतत्त्वाचा आधार तुटतो, आणि ईशतत्त्व म्हणजे सत्य व्यवहार ! तो संपला की भगवंत आपल्याला सोडून देतो आपल्या कर्मावर. मग आपल्या हातून घडतो अनाचार आणि त्याचीच आपण पाठराखण करतो स्वार्थापोटी. नीतीहीन समाजात अनागोंदी माजते. पण जेथे संत अस्तित्व आहे, तेथे सदाचार घडतो. समाजाची नितीमत्ता, अध्यात्मिकता, शांती, सलोखा, सद्भाव, सहकार्य, एकसंधपणा, समत्वभाव, बंधुभाव हे संतसहवासात वृद्धिंगत होतात. संतांमुळे लोकजीवन उन्नत होते, सत्वशीलता टिकून राहते. सत्शीलतेने लोक नांदतात. अपकारापेक्षा परोपकाराने जीवन जगणारे अधिक असतात. त्यामळे समाज आत्मसुखाचा अनुभव घेतो आणि धन्य पावतो हे सत्य आहे. भरत खंडात संत अस्तित्व व संतवाणी प्रखर होती, म्हणून असे घडले हे नाकारून चालणार नाही.

या संतामुळेच भारत आध्यात्मिक दृष्ट्या आघाडीवर होता व पुढेही राहील. जोपर्यंत संत महात्म्य आहे तोपर्यंत भारत जगज्जेता व जगाचा स्वामी राहील. म्हणूनच भारताने अनंत काळापासून “ संत तेथे सुख ” हा अनुभव घेतला, हा इतिहास नाकारून चालणार नाही. संत तेथे कल्याण, संत तेथे अध्यात्म, संत तेथे लक्ष्मी, संत तेथे उन्नती, संत तेथे सद्भाव, संत तेथे सौंदर्य, संत तेथे उदारता असा हा संत महिमा आहे ज्याचे तुम्ही मी सक्षम वारस आहोत. ईश्वर आराधनेतून सुनिती व सन्मार्ग सापडतो. म्हणून संत हे आमचे खरे वाटाडे ठरतात. विदर्भातील शेगाव नगरी भगवंताने अवतार घेतला श्रींच्या रूपाने व परिसराचा कायापालट झाला. या अवतारात त्यांनी षडरीपुनी ग्रासलेल्या समाजाला अहंकार, चिंता, मीपणा, प्रपंच, विवंचना यातून मुक्ती दिली.

त्यासाठी गुरुवरील श्रद्धा जपा व चिंतामुक्त होऊन त्याच्या आधारे निर्धास्त जीवन जगा. तो तुमची काळजी वाहतो. स्वामी स्वत: आपला कार्यभार आनंदाने उचलतात कारण तुमचा अढळ विश्वास असतो- ‘ महाराजांच्या मर्जी प्रमाणे जगतोय झाले, तो आहे ना माझी चिंता वहायला, झाले तर मग.’ जय गजानन.

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।। 


सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment