Feb 13, 2020

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय ४


॥ श्रीगणेशाय नमः।।

हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा,नीलकंठा,गंगाधरा,महाकाल त्र्यबंकेश्वरा,श्रीओंकारा तू मला पाव.।।१।।आम्हांसाठी तूं आणि रुक्मिणीश हे एकच तत्त्व आहांत.तोय वा वारी म्हंटले तरी जलांस काही फरक पडतो का ?।।२।।हे जगत्पति, तंतोतंत अशीच तुमची स्थिती आहे.ज्याच्या मनी जसा भाव त्याच रूपात तो तुला पुजितो.।।३।। अनन्यभावें तुझी आराधना केल्यांस तू आपल्या भक्तांस निश्चितच पावतो.माता आपल्या बाळांविषयी कधीच निष्ठुरता धरत नाही.।।४।।मीही तुझें अजाण लेंकरुं आहे,तरी तू तुझी माया कमी करू नकोस.हे हरा,तू तर साक्षात् कल्पतरु आहेस,तेव्हा माझी इच्छा पूर्ण करा.।।५।।श्री स्वामी समर्थ बंकटलालाच्या घरांत असतांना एकदा अघटीत असा प्रकार घडला.।।६।।वैशाख शुद्ध पक्षातील अक्षयतृतीयेच्या दिवशीं पितरांसाठी श्राद्ध करून उदककुंभाचे दान देतात.।।७।।अक्षयतृतीयेचा हा दिवस वर्‍हाडांतील लोकांस विशेष वाटतो.तिथे ह्या सणाचे मोठे महत्त्व आहे.।।८।।तर त्या दिवशीं काय झालें हे तुम्ही श्रोते हो ऐका.महाराज लहान मुलांबरोबर बसले होते.जणु त्यांना कौतुकाने लीलाच दाखवायची होती.।।९।।त्या बालकांस गजानन स्वामी म्हणाले,"मला तुम्ही तंबाखूची चिलीम वरती विस्तव ठेवून भरून द्या. सकाळपासून मी असाच चिलीम मुळीच न पीता बसलेलो आहे,त्यामुळें हैराण झालों आहे तर मुलांनो, आता तुम्ही चिलीम भरा."।।१०-११।।अशी आज्ञा ऐकताच अवघी बालके आनंदली आणि तंबाखू आंत घालून चिलीम भरुं लागलीं.।।१२।।त्यानंतर त्यांनी विस्तवाचा तपास केला,पण घरी तो मिळाला नाही कारण लोकहो, चूल पेटण्यास अजून अवकाश होता.।।१३।।ती बालके आपापसांत विचारविमर्ष करून चिलिमेसाठी विस्तव कसा मिळवावा यांवर उपाय शोधू लागली.।।१४।। मुलें अशी चिंतातुर झालेली पाहून बंकट त्यांना समजावत बोलला,"अरे आपल्या आळींत जानकीराम सोनार आहे ना,त्याच्याकडे तुम्ही जा आणि त्याला थोडा विस्तव मागा. दुकान सुरु करण्याकरिता त्यांस आधी विस्तव पेटवावा लागतो.आधी बागेसरी(सोनाराची शेगडी)पेटते, त्यानंतरच दुकानदारी सुरु होते. अशीच खरी सोनाराची रीत असते हे तुम्हांला माहीत आहेच की."।।१५-१७।।मुलांना ते पटले.ती मुले जानकीरामाकडे गेली अन समर्थांच्या चिलमीसाठी त्याला विस्तव मागूं लागली.।।१८।।त्यावर जानकीराम चिडला,अक्षयतृतियेच्या सणाला मी कुणालाही विस्तव देणार नाही असे त्या बालकांस बोलू लागला.।।१९।।मुलें त्यास हात जोडुन म्हणाली,असा अविचार करू नकोस.विस्तव श्री समर्थांना पाहिजे आहे.।।२०।।श्रीगजानन महाराज प्रत्यक्ष देवाचेही देव आहेत.त्यांच्या चिलमीसाठी हा विस्तव हवा आहे.।।२१।।थोर साधुंसाठी काहीही दिले तरी तिथे अशुभ असे काहीच नसते.या अशा व्यावहारिक कथा उगीचच आम्हांस सांगत बसू नकोस.।।२२।।आम्ही मुले तर लहानच आहोत व तूं तर आमच्यापेक्षा मोठा आहेस,असे असूनही ही गोष्ट तुला कळत कशी नाही?।।२३।।तू जर विस्तव आम्हांस दिलास व त्यांमुळे गजानन महाराज चिलीम पिऊन तृप्त झाले तर तुझ्या घरीं भाग्य निश्चितच येईल.।।२४।।तें बोलणे त्या सोनाराने ऐकले नाहीच,वर तो त्या मुलांसच अद्वातद्वा बोलू लागला.खरोखर ज्याचें मरण जवळ आलेले असते,त्याचे पाय खोलाकडेच जातात.।।२५।।तो सोनार त्या बालकांस बोलू लागला,गजानन कुठला पुण्यराशी आहे ?त्या चिलमीबहाद्दरास साधु म्हणून संबोधू नका.।।२६।।तो गांजा,तंबाखू पीत असतो,साऱ्या गावांत नग्न हिंडतो. एखाद्या वेड्यासारखे चाळे करतो,गटारातीलही पाणी पितो.।।२७।।तो कुठलीही जात,गोत पहात नाही, अशा वेडयापिशाला मी साधु मानण्यास मुळींच तयार नाही.।।२८।। बंकटलाल खरे तर खुळावला आहे व त्याच्या नादी लागला आहे.मी काही त्याच्या चिलमेसाठी विस्तव देणार नाही.।।२९।।तो साक्षात्कारी आहे ना, मग त्यांस कशाला विस्तव पाहिजे आहे?तो आपल्या कर्तृत्वाने विस्तव का निर्माण करीत नाही बरें ?।।३०।।नाथपंथीय साधू जालंदरनाथ हे सुद्धा फार चिलीम पीत होते. परंतु विस्तवासाठीं ते कधी घरोघरी फिरले नाहीत.।।३१।।आता तुम्ही इथे उभे न रहाता निघून जा. तुम्हांस माझ्याकडून विस्तव काही मिळणार नाही.त्या तुमच्या वेड्यापिशाची माझ्या लेखी काहीच किंमत नाही.।।३२।।ती मुलें अशा रितीने विन्मुख परत आलीं व सोनाराच्या दुकानांत घडलेली हकीकत महाराजांस त्यांनी निवेदन केली.।।३३।।ती हकीकत ऐकताच दयाघन गजानन महाराज हसून बोलले,'अरे, आपल्याला त्याच्या विस्तवाची मुळीच आवश्यकता नाही.'।।३४।।असे म्हणुन त्यांनी चिलीम आपल्या हातांत घेतली आणि बंकटलालास फक्त एक काडी त्या चिलीमेवर धरावयास सांगितली.।।३५।।त्यावर बंकट म्हणाला,' महाराज तुम्ही थोडे थांबावे. मी लगेच आपणासाठी काडी घासून विस्तव पेटवून देतो.।।३६।।काडी घासल्याशिवाय काही अग्नी प्रगटणार नाही,म्हणून मी तुम्हांस ही विनंती करतो. हे समर्था,ती तुम्ही मान्य करावी.'।।३७।।त्यावर महाराज त्यास उत्तरले,तू आता उगाच बडबड करू नकोस.तू फक्त एक काडी ह्या चिलीमेवर धर व तिला मुळींच घासूं नकोस.।।३८।। बंकटलालाने तसेच केले व समर्थ-आज्ञा म्हणून नुसत्या एका काडीस चिलीमेवरती धरले.।।३९।।तेव्हा काय चमत्कार झाला, तो तुम्ही चतुर श्रोत्यांनी श्रवण करावा. नुसती एक काडी त्या चिलीमेवर धरल्यावर साक्षात वैश्वानर(अग्नी) तिथे प्रगट झाला.।।४०।।खरे तर त्या काडीत विस्तवाचा अंशही नव्हता.हा खचितच महाराजांच्या लोकोत्तर शक्तीचा प्रभाव होता.।।४१।।काडी तर तशीच न जळता मूळ रूपात होती,चिलीमही पेटली गेली होती,ह्या कशाचीच जरूरी त्या खर्‍या साधूला पडली नाही.।।४२।।श्रोतेहो,ह्याचेच नांव साधुत्व होय.हे काही उगीच थोतांड नव्हतें.आतां सोनाराच्या घरांत काय झालें तें तुम्ही ऐका.।।४३।।या अक्षयतृतियेला चिंचवण्यास विशेष मान असतो. जसे की वर्षप्रतिपदेला निंबाच्या फुलांचें फार महत्त्व असते.।।४४।।असो.तर त्या सोनाराच्या घरी भोजनासाठी पंगत बसली होती व द्रोणांत चिंचवणें वाढलेंले होते.तोच एक अघटीत प्रकार तिथे घडून आला तो तुम्ही ऐका.।।४५।।त्या वाढलेल्या चिंचवण्यामध्ये नाना प्रकारच्या अळ्या त्या पंगतीस बसलेल्यांस दिसून आल्या.भोजनांत असा अळ्यांचा बुजबुजाट झालेला पाहून त्या सर्वांस अतिशय किळस वाटली.।।४६।।सारे लोक अवघ्या अन्नांस टाकून पात्रांवरुन तसेच उठले.सोनार अतिशय दु:ख्खी होऊन अधोवदन बसला.त्याला ह्या सर्व प्रकारचे कारण काही उमजत नव्हते.।।४८।।त्या दुषित चिंचवण्याच्यामुळें अवघेच अन्न वायां गेलें होते.मग त्याला कोडें उमगलें  की हे असे घडण्याला मीच कारण आहे.।।४८।।मी सकाळी साधूंस विस्तव दिला नाही,त्यांच्या साधुत्वाची प्रचीती मला तात्काळ आली.श्री गजाननाची अगाध लीला मी खचितच जाणली नाही.।।४९।।गजानन महाराज हे जान्हवीच्या पवित्र जलाप्रमाणे आहेत,पण मी त्यांना थिल्लर मानले. श्री गजानन राजराजेश्वर असतांना मी त्यांस भिकारी समजलो.।।५०।।गजानन स्वामी खरोखर त्रिकालज्ञ आहेत,परंतु मी त्यांस पूर्णपणे वेडा मानले.साक्षात कल्पतरुंस मी बाभळ समजत होतो.।।५१।।गजानन महाराज प्रत्यक्ष चिंतामणी आहेत, पण मी त्यांस साधी गारच लेखत होतो.श्री गजानन कैवल्यदानी आहेत,पण मी त्यांस ढोंगीच मानत होतो.।।५२।।हाय हाय रे माझ्या दुर्दैवा, तू असा कसा ऐनवेळी दावा साधलास? माझ्या हातून तू काही संतसेवा घडू दिली नाहीस.।।५३।।माझा धिक्कार असो.मनुष्याचा जन्म घेऊनदेखील ह्या भूमीला मी केवळ भारच आहे. जणू काही मी दोन पायांचा पशुच आहे.।।५४।।आज माझ्या भाग्योदयाच्याच वेळी नेमकी माझी मति फिरली.माझ्याच हाताने मी ही सुयोगाची जी वेळ आली होती ती दवडली.।।५५।।असो,जे घडून गेले ते गेले,आता  काहीही झाले तरी मी बंकटाच्या घरी जाऊन समर्थांचे पाय धरतो.त्यांच्या पदी अनन्य होऊन माझ्या चुकीची क्षमा मागतो.।।५६।।असा विचार करून,तो सोनार आपल्या सोबत ती नासलेली चिंचवणी घेऊन बंकटलालाच्या घरी आला व झालेली सर्व हकीकत सांगू लागला.।।५७।।'अहो बंकटलाल शेटजी,आज माझा घात झाला.ह्या चिंचवण्यास पहा,ह्यांत कसे किडे पडले आहेत ते बघा.।।५८।।श्राद्धासाठी आलेली सर्व माणसें तशीच उपोषित उठलीं. त्यांमुळे श्राद्धघात झाला.हे असे घडण्यांस माझा मीच कारणीभूत आहे.।।५९।।आज सकाळी माझ्याकडे लहान मुले समर्थांच्या चिलिमीसाठी विस्तव मागत होती आणि मी त्यांना तो दिला नाही.।।६०।।त्याचेंच हें फळ मला मिळाले.त्यामुळेंच ही सर्व चिंचवणी नासली.' जानकीरामाचे तें सर्व बोलणे ऐकून बंकटलाल उत्तरला,'अहो तुम्हीं चिंचोके नीट पाहिले नसतील,ते कदाचित किडलेलें असतील.म्हणूनच तुमची चिंचवणी नासली असेल,असेच मला वाटते.'।।६१-६२।।त्यावर तो सोनार उत्तरला,'शेटजी,तुम्ही अशी शंका मुळीच घेऊं नका.ती नवीन चिंच होती,मग त्यांत चिंचोके किडके कसे असणार ?।।६३।।मी जी चिंच फोडली, तिचीं टरफलें अजून पडलीं आहेत व चिंचोक्यांचीही रास तिथेच आहे.तुमची इच्छा असल्यास ती तुम्ही बघू शकता.।।६४।।पण माझी तुम्हांस एवढीच विनंती आहे की शेटजी, तुम्ही मला लगेचच समर्थांच्या पायांवर नेऊन घाला.।।६५।।मी अनन्यभावाने माझ्या अपराधाची क्षमा मागेन.मुळातच श्री गजानन साधू,दयेचे परिपूर्ण सागर आहेत.'।।६६।।त्वरित जानकीराम समर्थांपुढें भीत भीतच गेला.त्याने समर्थांना साष्टांग दंडवत घातला.।।६७।। आणि त्यांस दीनपणे म्हणाला,' हे दयाघना, तुला माझी करुणा येऊ दे. मी खूप अपराध केले आहेत, तरी तू मला क्षमा करावेस. तू या शेगांवांत नांदणारा साक्षात उमानाथ आहेस. तुझ्याविषयी माझ्या मनांत भ्रांत होती, तिचे आज तू निवारण केलेस.हे माझे अवघे अपराधरुपीं तृण तू  तुझ्या अग्नीरुपी कृपेने जाळून टाक. समर्था, आजपासून मी तुझी निंदा करणार नाही.जी आज मला शिक्षा केलीस, तेवढीच मला पुरे झाली.तूं अनाथांचा वाली आहेस, तेव्हा आतां माझा आणखी अंत पाहूं नकोस.।।६८-७१।।त्यावर महाराज बोलले,जानकीरामा,तू किंचितही खोटे बोलू नकोस. तू आणलेली ही चिंचवणी मधुरच आहे. त्यामध्यें किडे पडलेले नाहीत.।।७२।।ते ऐकताच सर्वजण ती चिंचवणी पाहू लागले.त्यावेळी जो प्रकार आधी घडला होता,त्याचा कुठेही मागमूस नव्हता.जणु असे काही घडलेच नव्हते.।।७३।।ते सर्वजण आश्चर्यचकित झाले, त्यांना समर्थांचें महत्त्व कळलें.हां हां म्हणतां हें वृत्त त्या गांवामध्यें पसरले.।।७४।।ज्यांच्या त्यांच्या तोंडीं हीच हकीकत होती.खरोखर, कस्तुरी झाकली तरी तिचा सुवास लपवता येत नाही.।।७५।।त्या शेगांवात चंदुमुकीन नांवाचा एक गृहस्थ होता. तो समर्थांचा निःसीम भक्त होता. त्याची ही कथा तुम्ही ऐका.।।७६।।श्रोतेहो,एका ज्येष्ठ मासांत समर्थांच्या सभोवती सर्व भक्त जमले होते. ते अत्यंत आदराने हात जोडुन समर्थांच्या चरणांकडे दृष्टि ठेवून बसले होते.।।७७।।काही जण आंबे कापत होते तर कोणी त्या फोडी समर्थांच्या हातांत देत होते. तर काही भक्त समर्थांस पंख्यानें वारा घालत होते.।।७८।।काही जण खडीसाखर वाटत होते, तर कोणी त्यांच्या गळ्यांत हार घालत होते.इतर भक्त गजानन साधूंच्या अंगांस शीतल चंदन लावत होते.।।७९।।तेव्हा महाराज चंदूला म्हणाले," हे आंबे मला नकोत. तुझ्या घरातील उतरंडीला असलेले दोन कान्होले तू मला आणून दे.।।८०।।त्यावर चंदू कर जोडून उत्तरला," महाराज, आतां माझ्या कानवले घरी कसे असतील ? आपली इच्छा असल्यास, हे गुरुराया, मी ताजे तळून आणतो."।।८१।। तेव्हा महाराज परत बोलले , "ताजे कानवले करायची गरज नाही. मला तर तुझ्या घरातील उतरंडीत असलेलेच कानवले खाण्यास हवे आहेत. जा आता, उगाच उशीर करू नकोस, वा काही सबबी सांगू नकोस.अरे वेड्या,गुरूशी कधीही यत्किंचित् खोटें बोलू नये."।।८२-८३।।हे ऐकून तिथे असलेले भक्तगण त्या मुकिन चंदूस बोलू लागले,"तू आता लवकर घरी जाउन पहा कारण की संतवाणी कधीच खोटी होत नाही."।।८४।।चंदू लगेच घरी गेला व "आपल्या घरातील उतरंडीस दोन कानवले आहेत का ग ?" असे पत्नीस विचारू लागला.।।८५।।त्यांवर त्याची पत्नी म्हणाली,"कानवले केले होते त्यांस आता एक महिना होऊन गेला तर आता आपल्या घरांत कानवले कसे बरे मिळणार?हे पतिराया, अक्षयतृतीयेला मी कानवले केले होते, ते तर त्याच दिवशी संपले.त्यांमुळे आता काहीच शिल्लक नाहीत."।।८६-८७।।"आपली इच्छा असल्यास मी आत्ताच ताजे कानवले श्री समर्थांसाठी करते अन तळून देते. हे पहा नाथा, मी ही कढई लगेचच चुलीवर ठेवते.।।८८।।तुम्ही थोडाच वेळ थांबा. घरांत अवघेच सामान तयार आहे,तेव्हा कानवल्याच्या साहित्यासाठी बाजारांतही जायला नको."।।८९।।त्यावर चंदू वदला,"प्रिये,ताजे कानवले समर्थांस नको आहेत, जे तू उतरंडीत दोन कानवले ठेवले आहेत, तेच तू मला दे. समर्थांनीं मला जसे  सांगितले आहे तेच मी तुला आत्ता निवेदन केले. तेव्हा तू जरा नीट आठवून पहा बरे !" ।।९०-९१।।पतीचे ते बोलणे ऐकून त्याची पत्नी विचारात पडली व मनांत "आपण कानवले कुठे ठेवलेत का ?" हे आठवून ते शोधू लागली.।।९२।कानवले शोधत असतांना तिला अचानक काहीतरी आठवले व "अहो,समर्थ वचन सत्य आहे." असे ती आपल्या पतीस बोलली.।।९३।।दोन कानवले उरले होते खरे, ते मी तेव्हा उतरंडीत ठेवले होते.पण मला इतक्या महिन्यांत त्याची आठवणही झाली नाही.।।९४।।आता तर त्या गोष्टीला महिना होऊन गेला आहे. त्या कानवल्यांस कदाचित बुरशीदेखील आली असेल,ते खाण्यासाठी निश्चितच योग्य नाहीत.।।९५।।असे बोलून ती तात्काळ उठली व स्वयंपाकघरातील उतरंडीत शोधू लागली.तेव्हा कानवले ठेवलेली एक मातीची कळशी तिला सापडली.।।९६।।तिने त्यांत डोकावून पाहिले तर तिच्या दृष्टीस दोन कानवले पडले, जे थोडे सुकून गेले होते.।।९७।।श्रोतेहो, त्या कानवल्यांना बुरशी मुळींच आली नव्हती.खरोखर या जगांत संतवाणीला कधीच बट्टा लागलेला नाही.।।९८।।कानवल्यांस पाहून त्या उभयतांचें मन अतिशय आनंदले.महा समर्थ सिद्धयोगी साधु गजानन खरेच धन्य आहेत.।।९९।।त्यानंतर चंदू तें कानवले घेऊन समर्थांकडे आला व त्याने ते कानवले त्यांस अर्पण केले.ते पाहून सर्व लोक आश्चर्य करू लागले.।।१००।।स्वामी गजानन खचितच त्रिकालज्ञ आहेत व त्यांस अवघेच भूत भविष्य वर्तमान कळते असे तें लोक म्हणू लागले.।।१०१।।चंदूच्या त्या कानवल्यांस पुण्यराशी गजानन सेवन करते झाले, ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी शबरीच्या बोरांस खाल्ले होते.।।१०२।।श्रोतेहो, शेगांवच्या दक्षिणेस एक चिंचोली नावाचे गांव आहे, तिथे एक माधव नावाचा विप्र रहात होता.।।१०३।।त्याचे वय साठापेक्षाही जास्त होते, वृद्धत्वामुळे तो गलितगात्र झाला होता.तरुणपणीं केवळ संसार हेच जणू त्याचे ब्रह्म होते.।।१०४।।ह्या भूमीवर प्रारब्धाच्या पुढे कुणाचे चालले आहे ?ब्रह्मदेवाने जी काही अक्षरें लिहिलीं असतील तीच खरी होतात.।।१०५।।माधवाची बायको अन मुले मृत झाले होते, त्यास जवळचे कोणीही उरले नव्हते.म्हणूनच त्याचे मन संसारातून विरक्त झाले होते.।।१०६।।ज्या काही चीजवस्तू शिल्लक होत्या,त्याही संपून गेल्या.'आता माझे काय दशा होणार?' अशा चिंतेने तो ग्रासला होता.।।१०७।।मी केवळ ज्या संसारात रमलो,तो तर आता अवघाच नष्ट झाला. हे दीनबंधो मी तुझे कधी एक क्षणही स्मरण केले नाही.।।१०८।। आता हे दीनदयाळा एक तुजवांचून कोण बरे माझा वाली असणार? देवा, माझे हे अरण्यरुदन तुझ्याशिवाय कोण ऐकणार?।।१०९।।असा पश्चात्ताप होऊन तो शेवटीं शेगांवीं आला आणि गजाननाच्या दारी तो एकच हट्ट धरून बसला.।।११०।।त्याने अन्न-पाणी त्यागून उपोषण आरंभिलें व अखंड नारायण नाम तो वदनी जपू लागला.।।१११।।असाच एक दिवस गेला,पण तो काही तिथून उठला नाही.तेव्हा महाराज त्यास वदले की हे असे करणे योग्य नव्हे.।।११२।।हेच हरीचें नामस्मरण तू पूर्वी का बरे केले नाहीस ?देहांताच्या समयी आता वैद्य बोलावून काय उपयोग होणार?।।११३।।सारे तारुण्य ब्रह्मचारी म्हणून राहिल्यावर म्हातारपणी पत्नी आणण्याला काहीच अर्थ नाही. अरे, योग्य वेळी साधन वापरले नाही तर त्याचा कधीही उपयोग होत नाही.।।११४।।जे करायचें ते नेहेमीच विचारपूर्वक वेळेवर करावे.एकदा का घर पेटले की मग विहीर खोदण्यास सुरवात करणे निरर्थकच असते.।।११५।।ज्या कन्यापुत्रांसाठीं तूं एवढा झिजलास,ते अवघेच तुला एकटे टाकून निघून गेले.।।११६।।तू शाश्वताला विसरुन केवळ अशाश्वतातच रमला.त्या तुझ्या कर्माचीं फळें तुला भोगणें भाग आहे.।।११७।।तीं कर्म फ़ळें भोगल्याशिवाय तुझी सुटका होणार नाही. तेव्हा तू मनांत सारासार विवेक करून हा हट्टीपणा सोडून दे.।।११८।।परंतु माधवाने ते काही न ऐकता आपला हट्ट सोडला नाही. त्यास भोजन घालण्याचे इतर लोकांचे प्रयत्नही वाया गेले.।।११९।।शेगांवचा कुलकर्णीदेखील त्याला आपल्या घरी येऊन असे अन्नाशिवाय न राहातां भोजन करण्याची विनंती करू लागला.।।१२०।।पण माधवाला तेंही म्हणणें पटलें नाही. तो तसाच समर्थांजवळ हरीचे नाम घेत बसून राहिला.।।१२१।।हळूहळू आकाशांत अंधार दाटु लागला, रात्रीचे दोन प्रहर झाले. रातकिड्यांची किरकिर वरचेवर होऊ लागली.।।१२२।।आसपास कुणीही नाही, हे पाहून स्वामी गजाननांनीं तेव्हा एक कौतुक केले.।।१२३।।महाराजांनी भयंकर रूप धरले जणु काही दुसरा यमाजी भास्करच ते भासत होते. असे तें महाराज माधवावर आ पसरुन त्यास भक्षण्यास धांवून आले.।।१२४।।त्यांमुळे माधव आपला जीव वाचवण्यास पळू लागला.तो खूपच घाबराघुबरा झाला होता,त्याची छाती धडधडत होती.।।१२५।।त्याच्या तोंडाला बुडबुडे (फेस) आले होते, मुखातून एकही शब्द फुटत नव्हता.त्याची अशी स्थिती पाहून समर्थांनी सौम्य रुप धारण केले.।।१२६।।आणि गर्जून बोलू लागले,' माधवा, हेच काय तुझे धीटपण ? तू काळाचें भक्ष्य आहेस, तो काळ तुला असाच खाईल.।।१२७।।तुला मी केवळ चुणूक दाखवून पुढील भविष्य दाखवले. तुला यमलोकांत पळण्यासाठी आता जागा उरली नाही.'।।१२८।।ते ऐकून माधव विनयाने बोलला,आता मला यमलोकाची वार्ताच नको, माझे हे  विधीलिखित (आपल्या कृपाकटाक्षाने) टाळा.।।१२९।।आता हे जगणेही नको, मला आता वैकुंठप्राप्ती व्हावी. महाराज, हीच माझी शेवटची आपणांस विनंती आहे.।।१३०।।यमलोकीं जें दिसणार होतें,तेच तुम्हीं इथे दाखविले. आतां या लेकरास यमलोकीं धाडूं नका.।।१३१।।जरी माझ्या पातकाच्या राशी असंख्य आहेत, तरी त्या सर्व जाळणें तुम्हांस मुळीच अशक्य नाही.।।१३२।।माझ्या गाठीशी काही तरी सुकृत होते, म्हणूनच मला तुमचे दर्शन झाले. संत दर्शन झालेल्यांस कधीही यमलोकाची भीती नसते.।।१३३।।असे त्याचे बोलणे ऐकून समर्थ हसून वदले,महापातक्यालाही पावन/पवित्र केवळ साधूच करू शकतात.।।१३४।।तेव्हा माधवा,'श्रीमन्नारायण नारायण ' असेच तू भजन करीत रहा.तुझें मरण जवळ आले आहे, तू आतां गाफील राहूं नकोस.।।१३५।।किंवा तुला अजून जगण्याची इच्छा आहे का ? ती असल्यास मी तुझी आयुष्यवाढ करतो.।।१३६।।त्यांवर माधव उत्तरला, गुरुराया, मला आतां आयुष्याची वाढ नको.ही प्रपंचमाया खोटी आहे, त्यांत मला तुम्ही आतां अडकवू नका.।।१३७।।महाराज तथास्तु असे वदले व पुढे म्हणाले, तू जे मागितलेस ते मी तुला दिले. आतां या भूमीवर तुला पुन्हा जन्म घ्यावा लागणार नाही.।।१३९।।अशा रितीने त्या दोघांचा गुप्त संवाद झाला.त्याचे वर्णन करण्यास माझी वाणी असमर्थ आहें.।।१३९।।त्यानंतर माधव आपले देहभान, दिनचर्या सारे काही विसरला.तो करत असलेल्या उपवासामुळेच त्याचे मस्तक फिरले, असे कित्येक लोक बोलू लागले.।।१४०।।त्यास वेड लागले आहे अश्या अनेक वदंता त्यावेळी उठल्या. त्या सर्व कुठवर सांगाव्यात ?।।१४१।। असो.माधवाचे   देहावसान समर्थांच्याच जवळ झाले. श्री गजाननाच्या कृपेनें त्याचा जन्म-मृत्यूचा फेरा चुकला.।।१४२।।असो. एकदा श्री समर्थांस एक इच्छा झाली, ती त्यांनी आपल्या शिष्यवर्गाजवळ व्यक्त केली. ।।१४३।।वैदिक ब्राह्मण बोलावून इथे आपण मंत्रजागर करू या. वेद श्रवणाने परमेश्वरांस अतिशय आनंद होतो. ।।१४४।।पन्हें,पेढे,बर्फी आणि खवा (प्रसादासाठी) आणा.भिजल्या डाळीस मीठ लावा.घनपाठी ब्राह्मणांस एकेक रुपया (दक्षिणा म्हणून) द्या.।।१४५।।असे महाराजांचे बोल ऐकून शिष्य त्यांस विनवूं लागले, या आपल्या शेगांवात असे वैदिक ब्राह्मण आतां उरले नाहीत.।।१४६।।आपण सांगाल तो खर्च आम्ही करू खरा, पण ब्राह्मण मिळणे हीच एक मोठी अडचण आहे.यांवर आमच्याकडे काही उपायही नाही.।।१४७।।त्यांवर महाराज म्हणाले,तुम्ही उद्या तयारी करा तर खरी, श्रीहरी तुमच्या वसंतपूजेसाठी ब्राह्मण नक्की पाठवेल.।।१४८।।मग काय विचारता,सर्व भक्तगण अतिशय आनंदित झाले,हां हां म्हणतां शंभर रुपये जमा होऊन (मोठ्या उत्साहात)सर्व तयारी झाली.।।१४९।।सर्व सामान आणले गेले.चंदनाचें उटणें केलें,त्यांत केशर व कापुरही कालवला.।।१५०।।भक्तजनहो,दोन प्रहरी काही ब्राह्मण शेगावी येते झाले, जे पदक्रम जटेला जाणत होते.।।१५१।।त्यांमुळे वसंतपूजा अगदी थाटांत साजरी झाली.ब्राह्मण मंडळीही संतुष्ट होऊन दक्षिणा घेऊन अन्य ग्रामी निघून गेली. ।।१५२।।  खरोखरच जे जे संतांच्या मनांत येते, तें तें यत्किंचितही काही कमी न पडू देता रमानाथ पूर्ण करतो.थोर संतांचा प्रभाव हा असाच असतो.।।१५३।।त्यानंतरही बंकटलाल अतिहर्षाने हे व्रत दरवर्षी करत असे. अजूनही त्याचे वंशज शेगांवी हे व्रत करतात.।।१५४।।हा दासगणूविरचित 'गजाननविजय' नावाचा ग्रंथ निर्मळ अशा हरिभक्तीचा साधकांना पथ दाखवू दे , हीच श्रीचरणी प्रार्थना.।।१५५।।श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ ॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥


No comments:

Post a Comment