Feb 22, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी २२ ते ३३ )



।। श्री गणेशाय नमः ।।


आणि आपण पहात आहोत की श्री दासगणू महाराज अनेक देव देवतांना वंदन करतात, संत चरित्र सुगमपणे गायची पात्रता मागतात.

 १/२२ माझ्या कुळीची कुलदेवता| कोल्हापुरवासिनी जगन्माता |

 तिच्या पदी ठेवितो माथा | मंगल व्हाया कारणे |

१/२३ हे दुर्गे तुळजे भवानी | हे अपर्णे अंबे मृडानी |

ठेवी तुझा वरदपाणी | दासगणूच्या शिरावर |

१/२४ आता वंदन दत्तात्रेया | पाव वेगी मसी सदया |

गजानन चरित्र गाया | प्रसादासह स्फूर्ति दे |

आपल चरित्र गायनाचे कार्य सफल व सुफळ व्हाव यासाठी दासगणु आपल्या कुलदेवतेला , कोल्हापूरच्या लक्ष्मी मातेला जनमंगल व्हावे म्हणून तिच्या पायावर आपले डोके ठेवतात. तुळजापूरच्या भवानी मातेचे, दुर्गामातेचे, अंबादेवीचे स्मरण करतात आणि विनवणी करतात शक्ती मातेला की तुझ्या आशीर्वादाशिवाय हे दिव्य कार्य माझ्या हातून घडणे नाही, म्हणून तुझे कर माझ्या डोक्यावर ठेऊन मला वर दे, आशीर्वाद दे.

दत्तात्रेयाच चिंतन, स्मरण करून त्या शक्तीलाही आवाहन करायला दासगणु विसरत नाहीत. दत्तत्रेया, मला प्रसाद दे अशी विनवणी करतात. त्या आशीर्वादरूपी प्रसादामुळेच मला स्फूर्ती प्राप्त होईल श्री गजानन विजय ग्रंथ लेखन कार्य करण्यासाठी. हा ग्रंथ जनकल्याणार्थ माझ्या हातून पूर्ण होवो जेणेकरून समाजातील सर्व सामान्य जनतेला आपले आध्यात्मिक अस्तित्व गवसेल आणि तो भक्ती मार्गाकडे मनापासून आपसूक खेचल्या जाईल. फार ज्ञानी, विद्वान, वेदपंडीत नसला तरी आपला सर्व सामान्य संसार नेटका करून त्याला या भक्ती मार्गावर पादाक्रांत होता येईल. जन्मत: ऊन्नत व सात्विक बनेल. सहयोग, सुख,समाधान,शांती नांदेल. समाज एकदिलाने समरस होईल व परोपकाराच्या भावनेतून जीवन जगायला शिकतील ते या साधूच्या चरित्र गायनातून, पारायणातून. हे स्वप्न आज पूर्णत्वाला जात असल्याचे दृष्टीगोचर होत आहे. श्री गजानन महाराजांना सुद्धा भारत आध्यात्मिक जगाचा पुन्हा नायक व्हावा व सूत्रे असावीत सर्वसामान्य जनतेच्या हातात, म्हणून हा भाव श्रींनी दासगणू महाराजांच्या मनात निश्चितच संक्रमित केला असावा. त्यामुळेच ते आपल्या कार्यात यशस्वी ठरलेत. दासगणू महाराजांनासुद्धा या जनतेला सत्याच्या वाटेवर खांद्यावर पताका घेऊन रस्त्याने ताठ मानेने व “ राम कृष्ण हरीचा ” जप मोठ्याने न लाजता चालत जाणारे भक्त श्रींना निर्माण करायचे आहेत व ते बळ आज फक्त श्री गजानन महाराजांत आहे हे दिसत असावे. त्यांच्या सामर्थ्याने त्यांचे डोळे दिपून गेले होते. त्यातूनच समत्वाची, एकात्मतेची, एकत्वाची, समन्वयाची परिस्थिती देशात निर्माण करणे शक्य होते हेही त्यांनी श्रींकडे बघून मनोमनी जाणले असावे आणि हे श्रींचे मनोगत व्यक्त करावयाचे होते श्री विजय ग्रंथातून, विजयी भावनेने म्हणून सर्वच देव देवतांना ते आवाहन करीत आहेत. प्रार्थनेतून आशीर्वाद मिळवीत आहेत. हाच भाव व क्रांतिकारी दृष्टी असावी तेंव्हाच्या श्री गजानन महाराज संस्थानच्या शिस्तबद्ध कार्यरत असणाऱ्या चालक वर्गाची. त्यामुळे त्यांचे मोठेपण नजरेआड करून चालणार नाही. त्यांचे ऋण मान्य न करता पुढे सरकणे हा कृतघ्नपणा ठरेल, हा अपराध ठरेल.

१/२५ आता शांडील्यादि ऋषीश्वर | वशिष्ठ गौतम पाराशर |

ज्ञाननभी जो दिनकर | त्या शन्कराचार्या नमन असो ||

देवादिकांच्या आशीर्वादानंतर ऋषी, मुनी, यांच्या चरणी आता दासगणू विनम्र भावाने नमन करतात. ते शांडील्यऋषी, वशिष्ठ, गौतम, पाराशर यांना तर शरण जातातच , पण जो ज्ञाननभातील सूर्य आहे त्या शंकराचार्यांना नमन करायला विसरत नाहीत. या सर्वांना स्मरून त्यांच्या चिंतनातून प्रेरणा घेऊन त्यांच्याच आशीर्वादाने श्रींचे चरित्र मनापासून जनकल्याणार्थ गायचे आहे. त्यासाठी या सर्व ऋषी, मुनी, साधू, संत व त्याचे शिष्य-उपासक याना एकत्र आणून, सर्वांच्या प्रेरणेतून प्राप्त होणारे काव्य प्रगट करायचे आहे. दुसरा भाव हाही असू शकतो, एकमुखाने ह्या चरित्र लेखनाला सहाय्य्य प्राप्त झाले तर एक शक्ती त्यातून निर्माण होईल आणि अध्यात्मात एकसुरीपणा आणता येईल. आज या चरित्राच्या प्रभावामुळे व श्रींवर असलेल्या श्रद्धेपोटी समाज मन एक झाले आहे, समाजात एकात्मभाव,बंधुभाव निर्माण होताना दिसतो आहे. श्री गजानन महाराज गुरु तर त्यांचे सर्व भक्त हे एकमेकाला गुरुबंधू म्हणून संबोधतात. तोच भाव श्री दासगणू महाराजांना साध्य करायचा होता. या संत चरित्रातून आज तो साधला जात आहे. हे पाहून निश्चित वाटते दासगणू केवळ संतकवीच नव्हते तर ते एक द्रष्टे होते.

१/२६ आता अवघ्या संतमहंता | नमन माझे सर्वथा |

दासगणुच्या धरुनी हाता | ग्रंथ करवा लेखन ||

१/२७ गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर | श्रीतुकाराम देहूकर |

हे भवाब्धीचे तारू थोर | त्या रामदासा नमन असो ||

१/२८ हे शिर्डीकर साई समर्था | वामनशास्त्री पुण्यवंता |

दासगणूसी अभय आता | तुमचे असो द्या संत हो ||

आई ज्या मायेने,प्रेमाने,आस्थेने बालवाडीत जाणाऱ्या लहान बाळाचा हात धरून त्याला अक्षरें गिरवायला शिकविते, तसेच मोठ्या लडिवाळपणे दासगणू अवघ्या संतमहंताना नमन करतात. “दासगणुच्या धरुनी हाता | ग्रंथ करवा लेखन ||” मी तर निमित्तमात्र आहे, आपण माझ्याकडून जे लिहून घेणार आहत तेच भावपूर्ण शब्द उमटणार आहेत कागदावर. केवढा हा विश्वास व लीनता.

हे नमन घडत असतांनाच त्यांना स्मरण होते ते गहिनीनाथ, निवृत्तीनाथ, श्रीज्ञानेश्वर महाराज, | श्रीतुकाराम महाराज, समर्थ श्रीरामदास महाराज, शिर्डीचे साईबाबा,वामनशास्त्री या पुण्यवंतांचे. दासगणू म्हणतात, संत हो, मला अभयदान द्या. आता त्याशिवाय माझ्याकडून लिखाण नाही होऊ शकणार. “ तुम्हा अवघ्यांच्या कृपेने | मी हे करीन बोलणे ” दासगणू महाराजांचा बालभाव जागृत होतो आणि ते शरणागत होऊन म्हणतात- मला तुमचे तान्हे बाळ समजून कठोर होऊ नका, पदराखाली घ्या, सांभाळ करा.

संतकवी दासगणू चरित्र लेखन पूर्णत्वाला जावे म्हणून प्रथम देवादिकांना शरण जातात, नंतर ऋषीमुनींची सहाय्यासाठी विनवणी करतात. एवढे त्यांना पुरे वाटत नाही म्हणून की काय ते आता साधू-संताना शरण जात आहेत आणि बालवत नम्र होऊन संत कार्य पूर्ण होणे कसे समाजहितासाठी गरजेचे आहे हे संतांच्या मांडीवर बसून प्रेमाने सांगत आहेत. दासगणू हे सारखे एकीकडून दुसरीकडे का फिरत आहेत? त्यांचा कुणा एकावर विश्वास नाही का? अध्यात्मात तर एका वर श्रद्धा व विश्वास ठेऊन निर्धास्त होणे हा मार्ग अनुसरावा असे सांगितले आहे ना? मग सकाळी एका देवाच्या देवळांत, दुपारी दुसरा, सायंकाळी तिसरा देव पकडायचा आणि रात्रीला परत वेगळ्याच देव मंदिरात जायचे असे करणारे अनेक भक्त आपण समाजात बघतो. हे त्यांचे वागणे बरे नाही, असेही म्हणतो तर मग दासगणू असे का करीत असावेत ? यावर चिंतन केले की सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात माझ्या मनात. याचे झाले असे असावे की संतचरित्र परिपूर्ण व्हावे ही तर दासगणू महाराजांना प्रखर इच्छा आहेच. म्हणून ते देवाला साकडे घालतात. पण देव फार प्रखर व अंतिम निर्णय देणारे, चुकल्यास शिक्षा करणारे प्रखर न्यायाधीश आहेत. तेथे तुमचे सत्कर्म असेल तर लगेच बक्षिस, कुकर्म असेल तर तसे फल देऊन देव त्वरेने मोकळा होतो. ऋषी मुनी हे तप करणारे. रागीट, शाप देणारे, तेंव्हा आपले काही चुकले तर येथे माफी नाही म्हणून शेवटी त्यांना संतांची आठवण होते. संत हे दयाळू, खट भक्तालासुद्धा समजून घेऊन त्याला परत नीट मार्गावर आणणारे मायाळू. शिक्षा न करता त्याला सुधारण्याची संधी देणारे हे संत असतात, ह्याची दासगणू यांना आठवण झाली असावी. म्हणून सर्वसमावेशक संताना आपण शरण गेलो की आपले काम शंभर टक्के यशस्वी होणारच, हा भाव त्यांचे मनात जागृत झाला असावा.  यामुळेंच ते संत चरणी प्रेम भावाने लीन होतात. या जगात मोठेपणापेक्षा स्वत:कडे लहानपण घेणे चांगलें. तुकोबारायाही असेच म्हणतात. मला मुंगीपेक्षा लहान राहू दे. “ लहानपण देगा देवा | मुंगी साखरेचा रवा ” मुंगीला कुणाच्याही पोत्यात शिरुन साखर खायला मिळते. हत्ती मोठा खरा पण अंकुशाचा मार खावा लागतो.उंचावर राहतो त्याला सतत वादळाला तोंड द्यावे लागतें. लहानपण अंगी असले, म्हणजे कोणी हेवा करीत नाही. तुकाराम महाराज ही प्रतिमा योजून लहान पणातल्या नम्रत्वाची उंची गाठतात. हीच मुंगीची प्रतीमा आणखी एका अभंगात येते. “ मुंगी होऊन साखर खावी | निजवस्तूची भेटी घ्यावी “ निजवस्तू साठी मुंगीहून लहान व्हावे, नम्र व्हावे. ज्ञानेश्वरीतही धाकटेपणाचा गौरव केला आहे. तसे धाकुटे बनून दासगणू संत चरित्र लिहू इच्छितात म्हणून शरणागतीचा भाव स्वीकारतात.

१/३३ आता श्रोते सावधान | संतकथेचे करा श्रवण |

करोनिया एकाग्र मन | निजकल्याण व्हावया ||

दासगणू महाराजांनी प्रत्यक्ष श्री गजानन महाराजांचे दिव्य चरित्र लिहिण्या आधी ३२ ओव्यांचे नमन करून, ज्यांच्या चित्तामध्ये देव आहे अशा संतांची संगती करावी हा भाव उमटला. म्हणून त्यांनी श्रींचा अंतर्मय नाम जप करून स्वत:ला गजाननमय करून घेतले. श्री तुकोबारायांनी जन कल्याणासाठी अतिशय चंचल व विकारी मनाचा निग्रह करण्यासाठी तर्कशुद्ध व सिद्धांतस्वरूप असा मनोबोध केला तो असा-

“ तुका म्हणे संग उत्तम असावा | याविण उपावा काय सांगो ||’’

चांगल्या संगतीने जीवन सुखमय, आनंदी व उत्तम घडते. जीवन घडविण्यासाठी संगत चांगली असावी लागते. ती सापडते प्रारब्धाने, प्राप्त झालेल्या गुरुकृपेने व उत्तम आध्यात्मिक संस्काराने. म्हणून देवाकडे सतत प्रार्थना करावी, इच्छा करावी ती संत्संगतीची व त्यासाठी प्रयत्नशील राहावे. “ करी संतांचा सायास ”. मन स्थिर होण्यासाठी याचा फार उपयोग होतो. दासगणूंना आता अंतर्बाह्य श्रीच दिसायला लागले, भासायला लागले. विश्वात सर्वत्र त्यांना श्रीच दिसायला लागलेत. असा पूर्ण श्रींचा ध्यास घेतल्या नंतर मुखातून शब्द आलेत “आता”. ही मानसिक भूमिका तयार झाल्यानंतर आता संतकवी श्रोत्यांना सावधान व्हायला सांगतात. सावधान व्हायचं ते कशासाठी तर संतकथा ऐकण्यासाठी.

संतकथा श्रवण करायची म्हटली की भक्ताला प्रबळ व प्रभावी इच्छा व्हावी लागते, त्याच मन आतुर असले पाहिजे तर तो एकाग्र चित्त होऊन शांत मनाने मनात साठवेल व त्यावर मनन चिंतन करेल. बरं एवढ सगळ करून ऐकल तरी प्रश्न उरतोच, कशासाठी ऐकायची संतकथा? “निजकल्याण व्हावया ||” दासगणू महाराज उत्तर देऊन मोकळे झाले. माझ निजकल्याण कशात आहे? दिखाऊ वृत्तीने श्री दर्शन घ्यायचं, इतरांना मी किती धार्मिक आहे दाखवून देण्यासाठी दर्शनाच नाटक करायचं, व्यापारात नफा व्हावा, संतती, संपत्ती, सत्ता लाभावी व आरामदायी जीवनात चैन करता यावी, दुसऱ्याला गुलाम समजून त्याचा छळ करून त्याचेकडून सेवा करून घ्यावी, यांत माझे खरच निजकल्याण आहे का? हा विचार ज्या दिवशी मनात येईल त्यादिवशी निजकल्याणार्थ संतकथा ऐकणे होईल, त्याला प्रत्येक आत्म्यात परमात्म्याचे दर्शन होईल, दुजाभाव संपेल. मी-तू हा भाव संपेल.आणि खऱ्या अर्थाने “निजकल्याणासाठी” वा मुक्तीसाठी कथा ऐकण्याचा भाव निर्माण होईल. आणि ते नरदेहाचे खरे सार्थक ठरेल. भगवंतप्राप्ती होऊन पुन:र्जन्म संपेल. हेच मन:शक्तीचे चिंतन व त्यातूनच लाभणार मन:शांती. अशा श्रवणातून निजकल्याण साधेल. जसे जनाबाई म्हणते- चराचरी जे दिसते, ते अविद्यामायेमुळे. खरा तो देवच आहे. मुक्ताईने शून्यामध्ये विठ्ठल पहिला तर जनाबाईने विठ्ठलात “सोहं” पाहिला. तोही पुढे नाहीसा झाला

“ नामयाची जनी निजवस्तू झाली | अवघ्यासी बुडाली परब्रह्मी ||" अशी जीवमुक्त दशा तिला प्राप्त झाली. सहजपणे ती “ तत्वमसि ” म्हणजे तो परमेश्वर पांडुरंग तूच आहेस या परमज्ञानाप्रत पोचली. सगुण-निर्गुण ही दोन्ही तत्त्वे एकच आहेत, याची तिला खात्री पटली. संतकथा या भावाने श्रवण केली की निजकल्याण होते ते असे.

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।। 


सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment