Feb 20, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी १ ते २१ )


१/१ ।। श्री गणेशाय नम: ।।

जय जयाजी उदारकीर्ती | जय जयाजी प्रतापज्योती ||

जय जयाजी हे गणपती | गौरीपुत्रा मयुरेश्वरा ||

ग्रंथारंभी नमन करण्याचा प्रघात आहे वैदिक तत्वज्ञ संतांचा. याला अनुसरूनच श्री गजानन विजय ग्रंथाचे लेखक ह.भ.प. संतकवी श्रीदासगणू महाराज श्री गणेशाचे नमन करून ग्रंथाच्या प्रथम अध्यायाचा शुभारंभ करतात. जय जय का? तर त्याचे उत्तर आहे पहिल्या अध्यायाच्या ३ ऱ्या ओवीत.

१/३ तुझ्या कृपेची अगाध शक्ती / विघ्ने अवघी भस्मे होती //

कापुसाचा पाड किती / अग्निपुढे दयाघना //

१/४ म्हणून आदरे वंदन / करीतसे मी तुझ्या चरणा //

सुरस करी पद्य रचना / दासगणूच्या मुखाने //

ग्रंथ लेखन कार्यात कुठेही विघ्न येऊ नये, म्हणून त्या विघ्नहर्त्या गणपतीलाच साकडे घालत असावेत दासगणू महाराज. पण ओवीचा ध्यास घेऊन अधिक चिंतन केलें तर माझे लक्ष्य केंद्रित झाले तुझ्या कृपेची अगाध शक्ती - तुझ्या चरणांवर. आणि अंतरंगात शब्द उमटले तुझ्या कृपेची म्हणजे श्री गजानन महाराज कृपेची. आणि भाव निर्माण झाला श्री दासगणू महाराजांना अवतार रुपी श्री गजानन महाराजांच्या सामर्थ्यापुढे नतमस्तक व्हावयाचे असावे. श्रींच्या कृपेची याचना करताना त्यांना जाणवले असावे ते हे की श्री गजानन महाराजाची आत्मिक शक्ती फार मोठी आहे. त्यांच्या श्रीनामाचा एकदा जरी उच्चार केला किंवा न कळत घडला तरी जीवनात विघ्न हे येऊच शकणार नाही. हा महिमा आहे संत कृपेचा आणि प्रसाद आहे श्री गजानन विजय ग्रंथ. अग्निपुढे कापूस जसा सामर्थ्यहीन होतो त्याच नम्रभावाने ग्रंथकर्ते श्रीचरणी लीन हे श्रीचरणी लीन होऊन केलेले वंदन हे निश्चितच फलदायी होते, म्हणून सुरस पद्यरचना घडावी यासाठी दासगणू श्रींची करूणा भाकत आहेत, शरणागतीचा भाव व्यक्त करतात असे वाटते. म्हणून स्वत: कडे जागृत होऊन कमीपणा घेतात, जेणे करून अहं निर्माण होणार नाही म्हणून विनवणी करतात माझ्या हातून तुझे चरित्र लेखन यशस्वीपणे पूर्णत्वाला जाऊ दे.

१/५ मी अज्ञान मंदमती / नाही काव्यव्युत्पत्ति /

परी तू वास केल्या चित्ती / कार्य माझे होईल हे //

देवाचा शोध घ्यावा तरी कोठे? तो परमात्मा तर प्रत्येकाच्या आत्म्यातच सदैव असतोना. म्हणून दासगणू महाराज हृदयस्थ परमात्म्याचें स्मरण करतात जेणे करून त्याना आत्मविश्वास प्राप्त होतो की श्री गजानन महाराजांच्याच कृपेने माझे कार्य पूर्ण होईल. मला कुठे काव्य करता येतें ?, मी तर मंदमती अज्ञानी माणूस, म्हणून तूच मला सामर्थ्य दे आणि तुझे कार्य माझ्याकरवी करून घे असा समर्पणाचा भक्ताचा भाव येथे दृष्टोत्पत्तीस येतो.

१/६-१० दासगणू महाराज नमनात जास्तीत जास्त देव देवतांचे नाव घेऊन स्मरण करतात,त्यांचे महात्म्य गातात जसे आदिमाया सरस्वतीला आवाहन करून जगदंबेची करुणा भाकतांना मी तुझ अजाण लेकरू आहे ना ? मग त्याचा अभिमान धरून हे थोर कार्य माझ्या हातून करवून घे. तुला हे सहज शक्य आहे. तुझी थोरवी एवढी मोठी आहे की तू जर प्रसन्न झाली तर भक्त पांगळा असला तरी त्याला सहजतेने पर्वत चढायला सक्षम बनविते, मुका जरी असला तरी सभेत पंडितासमान अस्खलित व्याख्यान देऊन सभा जिंकतो. या तुझ्या कीर्तीला कमीपणा येऊ नये, म्हणून मी प्रार्थना करतो की या संताच्या अगम्य चरित्राचे लिखाण सुलभपणे पूर्णत्वाला जाऊ दे. दिनाचा उद्धार करणाऱ्या उदार पंढरीच्या पांडुरंगाचे, भक्तांचे पालन पोषण करून त्यांना सुख समाधान प्रदान करून मुक्ती मिळवून देणाऱ्या सच्चिदानंदाला भक्तीपूर्वक दासगणू प्रार्थना करीत असावेत की रसपूर्ण, मधुर सोप्या भाषेत हे संत चरित्र निर्माण झाले, तर मराठमोळ्या साध्याभोळ्या भक्तांच्या मनाचा ते ठाव घेईल आणि त्याच वेळी श्रींच्या चमत्कारातून भक्तीचा महिमा जनसामान्यांच्या मनात ठसेल.यातून अध्यात्मिक जनकल्याण होईल, लोक तुझे नामस्मरण करून त्यांच्या मुक्तीचा मार्ग प्रशस्त करतील. श्री गजानन महाराजांचे महात्म्य दासगणू महाराजांच्या ध्यानी आलेच होते, म्हणून ते श्रींचीच मनातून विनवणी करीत असावेत की ,

” साह्य दासगणूला | ग्रंथरचनेस करी या | ”

पण मग इतर देवदेवतांची नावे घेण्याचे प्रयोजन एवढ्याच साठी असावे की भविष्यात समाजातील अनेक स्तरावरील भक्त भक्तिभावाने जेंव्हा या पोथीची पारायण करतील, तेंव्हा त्यांना आपापल्या देवतेचे स्मरण करिताना अजून प्रसन्न वाटेल व प्रेम आणि आपुलकी व जवळीक निर्माण होईल या संत चरित्राबद्दल. अढळ श्रद्धा व सद्भाव गुरुप्रती असला की सतगुरु कृपेने न कळत आपले सद्भाग्य उदयाला येत असतेच, हे दासगणू महाराजाना चांगलेच ठाऊक होते. या विश्वासापोटीच त्यांनी सहाय्य मागितले श्रींचे आणि श्रींनीही भरभरून ते त्यांना दिले. वास्तविक दासगणूना हे माहित होते की श्री, श्रींचे कार्य स्व:तच करवून घेतात ,आपण फक्त असतो ते निमित्तमात्र. म्हणूनच त्यांना स्मरण झाले असावे ते कमरेवर दोन्ही हात ठेऊन युगानुयुगे उभे असणाऱ्या पंढरीरायाचे.

१/११ तू सर्व साक्षी जगदाधार | तू व्यापक चराचर|

कर्ता करविता सर्वेश्वर | अवघे काही तूच तू ||

या ओवीचे चिंतन करताना मला संत तुकोबारायांच्या वाङ्मयीन व आध्यात्मिक वारकरी कविचे स्मरण होते. कारण तुकोबारायांच्या अनेक अभंगाची तुलना श्री गजानन महाराजांच्या जीवन चरित्राशी करता येते. दोघेही अवतारी महापुरुष- कर्मठ कर्मकांडाला संतांनी फाटा दिला, सामान्य जनतेला व्यक्तीस्तोमापासून व कर्मकांडापासून वाचविले आणि नामस्मरणाचा पचेल, रूचेल असा सुलभ मार्ग आम जनतेला सांगितला. श्रींनी आपल्या जीवनात जे जे “ अनुभव आले अंगा | ते या जगा देतसे ||” तुकोबारायाच्या लोकसंवादाची प्रेरणा जशी या वचनातून –

“बुडते हे जन न देखवे डोळा | म्हणोनी कळवळा येतो आम्हा || तसेच जीवन श्रींनी या अवतारात ठेवले कारण त्याना माहित होते की –

आम्ही वैकुंठासी | आलो याची कारणाशी | बोलीले जे ऋषी | साच भावे वर्तायां ||

श्री ज्ञानेश्वर माउली, तुकोबामहाराज या अवतारी संतकविनी आपल्या या अवतार कार्यात रसातळाला जाणाऱ्या जीवनाला आधार देऊन आध्यात्मिक क्रांती घडवली. तेच कार्य १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात श्रींनी आपले एकांतातील तप बाजूला सारून लोकांत येऊन आपल्या जीवन चरित्रातून सर्व पातळीवरील जनतेशी प्रेममय भक्तीचे संबध निर्माण करून त्यांच्या कडून एकात्मतेचा,समरसतेचा धडा तर गिरवून घेतलाच, पण अध्यात्मिक सुख स्वत: कसे अनुभवावे, हे ज्ञान आपल्या दिव्य मार्गाने त्यांच्यात संक्रमित करुन मोक्षप्राप्ती भक्तांना सहज सिद्ध केली ती या गजानन अवतारातच. पंढरीच्या पांडूरंगाच्या आज्ञेनुसार शेगावला समाधी घेऊन आजही आपल्या दिव्य चैतन्याने भक्तांचा सांभाळ करतात हे सत्य विश्वातील अनंत भक्त अनुभवत आहेत.

दासगणू महाराज म्हणतात, " अवघे काही तूच आहेस. चराचरातील अणुरेणूंत तूच सामाविला आहेस. या जगताचा आधार तूच आहेस. सर्वांचा कर्ता-करविता ही देवा तूच आहेस.” श्रीच्या जीवनातील दिव्य लीलांचा व चमत्कारांचा महिमा एव्हढा थोर की तो कुणालाही सहज कळत नाही, म्हणूनच दासगणू श्रींसमोर नम्र होऊन म्हणतात- तुझ्या पुढे माझा काय पाड लागणार आहे तुझ्या कृपेशिवाय. दासगणू नम्र होऊन श्री चरित्र कथन करतात. स्वत:ची क्षमता असतानाही सर्वस्वाने, समर्पित वृत्तीने सेवा करणारे दासगणू ओळखून असावेत की श्री गजानन महाराज अवतारी महापुरुष आहेत,तेच सगुण आहे,तेच निर्गुण आहे. मोह,माया, भेदाभेद या गोष्टीना आश्रय न देणारे, सुख-दुखात सम बुद्धीने वागणारे, विश्वातील प्रत्येक वस्तू मात्रात ईश्वर तत्व ओतप्रोत भरले असून प्रत्येक आत्मा हा ईश्वर अंश असल्याने या मानवी जीवनात त्याला “अहं ब्रह्मास्मि” हा अनुभव घेण्यासाठीच हा नरदेह प्राप्त झाला आहे, असे मानत. श्री दासगणू लिहितात-

१/१२ जग,जन आणि जनार्दन| तूच एक परिपूर्ण |

सगुण आणि निर्गुण | तूच की रे मायबापा |

१/१४ रामकृपा जेंव्हा झाली| तेंव्हा माकडा शक्ती आली |

गोप तेही बनले बली| यमुनातीरी गोकुळात ||

रामकृपा झाली की भाग्योदय होतो, शक्ती प्राप्त होते. म्हणूनच माकडेंसुद्धा बलाढ्य शत्रूचा नायनाट करू शकले कारण रामकृपा.

१/१५ तुझी कृपा व्हाया जाण | नाही धनाचे प्रयोजन |

चरणी होता अनन्य | तू त्याते साह्य करिशी |

अध्यात्म आणि धन यांचा काही संबंध आहे का? भगवंताची मनापासून निरहंकारी होऊन निर्मोही मनाने प्रार्थना आणि चिंतन करण्यासाठी धनाची गरज आहे का? धनहीन लोकांनाच भगवंत कृपा होणार आहे का? भगवंत धन घेऊन कृपा करतो का? यावर थोड चिंतन करून आपले मन काय उत्तर देत ते कागदावर लिहा.

या संत चरित्र लिखाणात दासगणू स्पष्ट मत व्यक्त करतात - भगवंत कृपेसाठी धनाची गरज नाही. धन आहे म्हणजे कृपा होईलच असेही नाही. मग प्रश्न निर्माण होतो की भगवंताची कृपा केंव्हा होईल?

भगवंताच्या चरणी आपला शुद्ध निखळ भक्तीभाव मनापासून शरणागत भावाने समर्पित करतो दोन्ही हात जोडून जो संताच्या चरणी माथा टेकतो त्यास संत भगवंताशी एकरूप होण्यासाठी साह्य करतात. पण शुद्ध आचरण व सत्कर्म हे संताच्या कृपा छायेखाली करावे लागते, ते त्या मुमुक्षु भक्तालाच.

सिद्ध संतकवी दासगणू महाराजांना प्रार्थनेनंतर हा विचार आला असावा की सर्व संत मंडळी भगवंताविषयी असेच काहीसे बोलत असतात अगर लिहित असतात. पण ज्यावर आपण लिहितो तो विदर्भात शेगाव नगरीत अचानक प्रकट झालेला विदेही आत्मा हा सगळ्यांपेक्षा थोडा हटके आहे, वेगळा आहे. तो बोलत नाही, तो नाही लिहीत ग्रंथ पण जस जगतो तेच त्याच सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान आहे, ज्यामुळे आज जग आध्यात्माकडे आकर्षित झाले आहे. शेगावकडे भक्तिभावाने ओढल्या गेलें आहे. त्या विदेही संताचे जीवन चरित्र हेच मुळी एक तत्वचिंतन आहे. तोच एक महान ज्ञानकोश आहे. आपल्या अवतीभोवतीच्या अठरापगड जातीतील समाजात प्रेममय भक्तीभावाने वागणें  आणि नकळात त्यांच्या मनावर अधिराज्य करणें सोप का होतें ? अशा समाजातील भक्तांना बंधुभावाने सम पातळीवर आणणे आणि तसे मनापासून प्रेमाने जगायला उद्युक्त करणे हे कसे हो शक्य झाले असेल महाराजांना ? त्यासाठी शाळा नाही, अभ्यासक्रम नाही, स्वाध्याय नाही, पाठशाला नाही. जबरदस्ती नाही. जाचक शिस्त नाही. आहे तो फक्त स्वमनाचा अंकुश व संतांवर पूर्ण श्रद्धा. आहे तो फक्त भक्तीचा महामंत्र “गणी गण गणात बोते”.

हे रहस्य आहे या ओवी चिंतनात. श्री गजानन महाराज कुणाचे दर्शन घेत असतील हो या अवतार कार्यात ? मला वाटते श्री समाजात राहूनच आपले यती जीवन जगात असताना, आत्मा आणि परमात्म्याच्या संयोग दर्शनाचा त्यांना लाभ झाला असावा.  सर्व प्राणीमात्रांच्या आत्म्यातील परमात्म्याचे दर्शन घेत घेत मोहरहित होऊन कार्य केले असेल. ज्ञानी श्रीमहाराज हे ओळखून होते की हा मोहच मनुष्याच्या इच्छा, आकांक्षा,कर्म आणि इंद्रियांना जीवन दान देत असतो व त्यातच त्यांना गुंतवून ठेऊन जिवातील ईश म्हणजे सत्य तत्त्वापासून दूर ठेवतो. म्हणून महाराज या मोहमयी बंधनात अडकून पडले नाहीत, चित्ताला त्यांचा स्पर्शही होऊ दिला नाही आणि आपल्या वर्तनाने समाजात डांगोरा पिटला की या विश्वाचा खरा निर्माता जर कोणी असेल, तर तो आहे चंद्रभागेच्या काठी कमरेवर हात देऊन युगानुयुगे उभा असलेला भगवंत.

१/१६ ऐसा संतानी डांगोरा | तुझा पिटला रमावरा |

त्या काळ्या पांडुरंगाच्या कृपेसाठी धन लागत नाही तर लागते सृजन मन. ही भावना चित्ती धरा, मोह सोडा, भगवंताला आपलासा करा कारण तो आणि तुम्ही, मी एकच आहोत. भगवंत पंढरपुरात नाही तर तो आहे तुमच्या, माझ्या, सर्वांच्या अंत:करणात. त्याला ओळखा, स्वत:ला ओळखा. इतरांशी देवासारखे वागा, म्हणजे धनाशिवाय त्याची कृपा होईल आपोआप. विषय वासना सोडा, जागृत व्हा, आपल्यातच असणाऱ्या भगवंताला ओळखून आपलेसे करा, सहृदय होऊन भावनेने जपा त्याला. पांडुरंगाला शरण जा. संसार करा पण वैराग्य जागून खरा सुखाचा संसार करता येतो हे सर्व सामान्याना शिकविणारा पहिला समाजाभिमुख विदेही संत आहे विदर्भातील शेगावचा. त्यासाठी १६ व्या ओवीत दासगणू शेवटी म्हणतात

म्हणून आलो तुझ्या द्वारा | आता विन्मुख लाऊ नको |

१/१७ हे संतचरित्र रचावया | साह्य करी पंढरीराया |

माझ्या चित्ती बसोनिया | ग्रंथ कळस नेई हा ||

१/१८ हे भवभयांतक भवानीवरा | हे निलकंठा गंगाधरा |

ओंकाररूपा त्र्यंबकेश्वरा | वरदपाणी ठेवा शिरी ||

या ओवीत नामस्मरणाचे महत्व प्रतिपादन केले आहे दासगणु महाराजांनी आपल्या अनुभवातून. तुकोबारायसुद्धा आपल्या गाथेत नाम भाव व्यक्त करताना म्हणतात “ नाम तारक भवसिंधु | विठ्ठल तारक भवसिंधु | ” हा भवसागर तरून जाण्यासाठी भगवंताचे- विठ्ठल नाम घेत घेत वैराग्य वृत्तीने संसार करावा म्हणजे इष्ट फलप्राप्ती होते. दासगणू तर पंढरीच्या विठूरायाला आवाहनच करतात की हे श्रींचे चरित्र रचण्यासाठी तू मला साह्यभूत हो. त्यासाठी तू माझ्या चित्तात ग्रंथ लेखन होईपर्यंत बसून माझ्या वाणीद्वारे या श्री चरित्र ग्रंथाचा कळस अध्याय पूर्ण कर. मनापासून केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. “ वरदपाणी ठेवा शिरी ” ही दासगणुनी लीनतेने केलेली प्रार्थना श्रींनी स्वत:च ऐकली मात्र आणि आणि भक्तांच्या हाकेला ओ देणाऱ्या या देवाने वरदान दिले “यशस्वी भव”. असे हे वरद गजानन आहेत.

|| ओम नमो सद्गुरू श्रीगजाननाय | ओम नमो भगवते श्रीगजाननाय ||

विदर्भातील प्रख्यात संत श्री गजानन महाराज यांच्या ३२ वर्षाच्या तेजस्वी कालखंडाचे चरित्र दर्शन अत्यंत रसाळपणे संत कवी दासगणू भाविकासमोर मांडतायेत भावपूर्ण मनाने. तोच हा श्री गजानन विजय ग्रंथ. या सोप्या अमृतमय ग्रंथातील संगीतमय माधुर्याने भक्त तन्मय होतात व समाधीगत अवस्थेत पोहचतात. त्यातील गोडव्याचा पारायणात जेंव्हा ते रसास्वाद घेतात, तेंव्हा त्यांचे मन भावविभोर होते, प्रसन्न होते आणि श्रीं कृपाशीर्वादाने आपण धन्य झालो असे वाटून मुखातून शब्द येतात सहज, नकळत “ गणी गण गणात बोते ! ”

प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव हा शाश्वत सुख-शांतीच्या शोधात असतो. त्यासाठी अनेक योनीत अनेक जन्म घेऊनही योग्य मार्ग आणि दिशा सापडत नाही व भगवत चिंतन न घडल्यामुळे अनंत जन्माचे भोग भोगावे लागतात, पण त्याच्या काही सुकृतामुळे आता मनुष्य जन्मही लाभला आणि नशिबाने या जन्मात श्री दर्शन भाव प्राप्त झाला. तसेच श्री चरित्र पारायणातून शांतीचा अनमोल ठेवा प्राप्त झाला असे वाटणे हीच प्रभू कृपा.

भोग आणि विषयानंदाच्या मागे लागलात की जीव परमानंदापासून दूर दूर फेकल्या जातो हा बोध देणारा महान ग्रंथ आहे श्री गजानन विजय! हा बोधच आत्मस्वरूप, शांतस्वरूप ब्रह्म होय. श्री चिंतनातून ज्ञानप्राप्ती होऊन प्रेममयी भक्तीचा भाव मनात ठसतो आणि कळायला लागते की ब्रह्म शोधून कधीच हाती लागणार नाही. अंतिम सत्यदर्शन हेच की मीच तर ब्रह्म आहे. “अहं ब्रह्मास्मि ” चा स्वानुभव प्राप्त होतो. हे कळणे म्हणजे जीवनातील अंतिम परम ध्येय गाठणे होय.

१/१९ तुझे साह्य असल्यावरी | काळाचाही नाही दर |

लोखंडासी भांगार | परीस करून ठेवितसे ||

१/२० तुझी कृपा हाच परीस | लोखंड मी गणूदास |

साह्य करी लेकरास | प्रते मजला लोटू नको ||

दासगणू आपली आत्मानुभूती या दोन ओव्यातून व्यक्त करीत आहेत. पण त्यासाठी अहंभाव सोडून शरणागतीचा भाव हाच आपल्या मनाचा स्थिर स्थायी भाव व्हायला लागतो. तो दासगणू महाराजांचा झाला असावा. म्हणूनच ते स्वत:ला लोखंड वगैरे मानतात तरच या जीवनाचे सोने होईल असा भाव आहे. कारण ते श्रींची करूणा  भाकतात, सहाय्य मागतात, वरदान मागतात. मला सदैव आपल्या जवळ ठेवा, कधीही दूर लोटू नका असे म्हणतात आणि श्री तर वरद गजानन आहेत. त्यांची कृपा ही होणारच. आणि संतांची कृपा म्हणजे परीस, मग परीस लोखंडाचे रुपांतर सुवर्णांत आपल्या स्पर्शाने करते. भगवंत हाच माझा सहाय्यकर्ता असे मानून जीवन जगायला लागले की मग भाव निर्माण होतो, माझी काळजी तर तो भगवंत वाहतो मला काय भय काळाचे वा संकटाचे. येथे दासगणूचा स्वानुभव प्रगट होतो. आणि पूर्ण अनुभूती आली ती श्री गजानन विजय ग्रंथ लिखाणातून. दासगणू महाराजांनी अनेकदा साईबाबांच्या मुखातून गजानन महाराजांचे नाव ऐकले होते, पण आजपर्यंत दर्शन झाले नव्हते ही गोष्ट सत्य आहे. ई.स. १९०७ ची ही गोष्ट. साईबाबांच्या आज्ञेनुसार ते आकोटला जायला निघाले होते. तेंव्हा शेगाव-अकोट हा प्रवास दासगणूंनी टांग्यातून केल्याचा दाखला मिळतो. अचानक त्यांचे लक्ष्य ओढ्याकाठी निजानंदी बसलेल्या विदेही साधू कडे गेले. वेळ असेल साधारण दुपारची बारा साडेबाराची. मुखाने “गणी गण गणात बोते” हे प्रिय भजन चालू होते. आजूबाजूला बराच भक्त जन समुदाय जमला होता. सहज त्यांनी टांग्यांवाल्यास विचारणे केले आणि त्यांना कळले हेच श्री गजानन महाराज. पटकन त्यांनी टांग्याखाली उडी मारली आणि श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. हेच त्यांना घडलेले श्रींचे प्रथम दर्शन. त्या दर्शनाचा प्रसाद म्हणजेच हा श्री गजानन विजय ग्रंथ असावा. श्रींच्या आशीर्वादानेच दासगणूंना श्रींचे शब्द ब्रह्म रेखाटणे शक्य झाले. “ दर्शन हेळा मात्रे तया होई मुक्ती, तया होई प्राप्ती” असा हा श्री कृपा दर्शन महिमा व प्रताप म्हणावा लागेल.

पुढे सन १९३९ साली लिखाणास शेगावला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यापूर्वी दासगणू मंदिरात श्री दर्शनाला गेलेत व तेथे त्यांनी पूर्वाभिमुख बसून श्रीविष्णूसहस्त्र नामाचा पाठ केला. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ असा जय जय कर केला. श्री गजानन महाराजांना श्रद्धेने नमस्कार करताना श्री दासगणूंचे अष्टसात्विक भाव दाटून आले, झरा झरा डोळ्यातून प्रेमाश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तेंव्हा सद्गदित झालेल्या दासगणुमहाराजांनी श्रींची स्तुती करताना, त्यांच्या मुखातून सहज काव्य बाहेर आले “ सतेज दुसरा रवि | हरि समान याचे बल | वसिष्ठ सम सर्वदा | तदीय चित्त ते निर्मल | असे असुनिया खरे | वरी वरी पिसा भासतो | तया गुरु गजानना प्रति |सदा गणू वंदितो ||”

तसेच आजही पारायणकर्ते भक्तीभावाने शांत चित्त होऊन समाधान पावतात, त्यांची भावसमाधी लागते, आणि आपणास श्रींचे खरेच कृपा आशीर्वाद लाभले असा आत्मभाव जागृत होऊन मनातल्या मनात श्रांत होतात, भक्तीमग्न होतात. हा आपलाही अनुभव असेन.जय गजानन.

१/२१ तुला अशक्य काही नाही | अवघेच आहे तुझ्या ठायी |

लेकरा साठी धाव घेई | ग्रंथ सुगम वदवावया ||

या ओवीतून मिळतो तो दिव्यत्वाचा आनंद. भगवंत आणि भक्त यांचे नातें माय - लेकरासारखे आहे. तेंव्हा मुलाला आपली आई जशी संपूर्ण काळजी घेऊन जे जे मागितले ते पुरविते असा विश्वास असतो, तसा भाव श्री दासगणूजी या ओवीत व्यक्त करतात. देवा! तूच या सृष्टीचा निर्माता व पालनकर्ता, जे तुझ्या जवळ जे नाही ते विश्वात कुठेही नाही. तुला अशक्य तर काहीच नाही, तूच तर आमच्या संकल्पांचा दाता आहेस. माझ मागणें एवढेच आहे, "देवा, तू दिलेली प्रतिभा मला हे श्री चरित्र गाताना पूर्णत्वाने वापरायची सुबुद्धी दे."

श्री दासगणू महाराज हे “ पोटभऱ्या लेखक ” नव्हते. ते स्वत: स्वानुभवाने व संत संगती लाभल्यामुळे पूर्णत्वाला पोहोचलेले संतच होतें असे म्हणा ना. त्यामुळे केवळ यावेळी त्यांना संतचरित्र रेखाटायचे नव्हते, तर श्री कृपेने श्री चरित्र गाऊन आत्मोद्धराचा स्वमार्ग शोधून प्रशस्त करावयाचा होता. पण स्वबळावर आपण काही ठरविले म्हणजे होत नसते, भगवंत कृपेने प्रारब्ध उदयाला यावे लागते, संतकृपा लाभावी लागते याची जाण व आध्यात्मिक ज्ञानही त्यांना गुरुकृपेने प्राप्त झाले होते. रावण ज्ञानी होता, बळवंत होता, भगवंताचा वरदहस्त ही लाभला होता पण अत्यंत लोभी, हट्टी, मी म्हणेल तीच पूर्व या वृत्तीचा होता, मला कुणी हरवूच शकत नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगत होता. मंदोदरीने, त्याच्या राणीने परोपरीने समजून सांगायचा प्रयत्न केला की राम हे भगवंत आहेत ते केवळ अयोध्येचे सम्राट नाहीत, पण कुणाचे काही ऐकायचेच नाही, असे एकदा ठरवून आपल्या मताप्रमाणेच मी वागेन असे म्हटले की सर्व नाश अटळ असतोच. पण दासगणू तर विठ्ठलभक्त, रामभक्त होते. भक्ताचा प्रथम गुण हा की शरणागतीचा भाव ठेऊन वागणे. दासगणू यांचे जीवनविषयक तत्वज्ञान असे की प्राप्त नरदेहाचे सोने करायचे तर पूर्णत्वाने भगवंताला शरण जावे आणि परोपकारात जीवन व्यतीत करावे. भगवंत कृपेने यावेळी काय करायचे हे त्यांचे एकाग्र मन त्यांना सांगत होते की मला श्रींच्या दिव्य चरित्राचे सुगम गायन करायचे आहे, जेणे करून ते भक्तांच्या मनात ठसेल,  त्यांचा आत्मभाव जागृत होईल, त्यांना सात्विक शांती लाभून परमानंद प्राप्त  होऊन

अंतिमत: पांडूरंगात विलीन होता येईल. देह आहे तो पर्यंत वैराग्य व निरपेक्ष वृत्तीने सुखाचा संसारही करता येईल. सर्व सामान्यांना या श्री गजानन विजय ग्रंथाने जर काही दिले असेल तर ते ही की सहज भावाने “ जय गजानन –श्री गजानन ” म्हणत म्हणत साधे सरळ सोपे जीवन मार्गावर एक मुमुक्षु बनून श्रींचा सेवक या नात्याने चालत राहावे, पुढे श्री बघून घेतील याचे काय करायचे, तेंव्हा मी कशाला चिंता करून वेळ वाया घालवू ? त्याऐवजी नामजप करेन. माझे गुरु परिसापेक्षाही श्रेष्ठ आहेत, परीस तरी लोखंडाचे सोने बनविते माझे सद्गुरू तर मला त्यांच्यासम प्रभू बनवितात. मग मी आताच प्रभू बनून समाजात वागण्याचा प्रयत्न का नको करू? समाजात आमुलाग्र परावर्तन घडवून आणण्याची किमया या श्री चरित्राने केली एवढे मात्र खरे. दासगणू स्वबळापेक्षा भगवंत बळ श्रेष्ठ मानून संत चरित्र उत्तम लिहिल्या जावे, म्हणून पांडुरंगाचा धावा करतात व पांडुरंगाची कास ते कधीही सोडत नाहीत. या पांडुरंगाच्या कृपेने आणि श्री ज्ञानदेव-तुकोबाराय या संत कार्यातून महाराष्ट्राची जडण घडण झाली, अठरापगड जाती जमातींना एका झेंड्या खाली आणले. समाजात आत्मभाव, समरसता व समन्वय निर्माण केला. देव माऊली बनला व भक्तांनाही माऊली बनविले. महाराष्ट्राची ही नवी ओळख विश्व वंदनीय केली.वारकरी संप्रदायाने जात,पात,धर्म, भाषा, वंश भूप्रदेश यांचे अडसर दूर करून विश्वाला बंधुत्वाची नवी ओळख करून दिली. त्यांना त्यांच्या पायावरच केवळ उभे नाही केले तर त्या पायांना दिंडीच्या रूपाने चालते केले समाज जागृती साठी. केवढे मोठे अध्यात्म कार्य या एका श्री चरित्रातून घडले.

हे संत चरित्र पारायणासाठी आज विश्वात सर्वत्र प्रचलित झाले आहे. दासगणूचा केवळ श्री चरित्र लिहिणे हा संकल्प नव्हता तो मनीचा ध्यास होता श्रीकृपेने. म्हणून मनापासून त्यांनी साकडे घातले ते भक्तांची अहोरात्र वाट पहाणाऱ्या हात कमरेवर ठेऊन व विटेवर उभे राहणाऱ्या दैवताला – पंढरी नाथाला.

“ माझे मागणे ते किती | दाता लक्ष्मीचा पती” अस म्हणणाऱ्या तुकोबारायांच्या सारखी स्थिती दासगणू महाराजांची झाली असावी. प्रभूचा हात सदैव आपल्या डोक्यावर असला की जीवाचे कल्याण होते हे ते जाणत होते आणि म्हणूनच नम्र भावाने संतचरित्र लेखन यशस्वी व्हावे,पूर्णत्वाला जावे म्हणून देवदेवतांचा धावा करताना येथे दिसत आहेत....जसे त्र्यम्बकेश्वरातील ओंकाराचा, देवाधिदेव महादेवाचा, तसेच प्रसंगी महादेवालाही शांत करणाऱ्या प्रभू रामचंद्राचादेखील ! प्रभू राम हे असे राजे आहेत जे पूर्णत्वाने वैराग्य स्तिथीत राहून जनकल्याणार्थ राज्य करतात. ज्यांनी काही निमित्ते करून राजप्रासाद सोडला आणि सीतेसह वनात गेले. का ? तर आपल्या वनवासी रयतेची सुख दु:ख समजून घेण्यासाठी. या वेळी त्यांनी देवत्वाची शाल न पांघरता वनवासी जनतेला दर्शन तर दिलेच पण भाव होता त्यांचातील शुद्ध सात्विक प्रेमभाव जवळून अनुभवण्यासाठी. राम वनात आलेत हे कळताच वनवासी शुद्ध अंत:करणाने पळसाच्या पानावर रानातील मेवा घेऊन बायकापोरांसह रामभेटी साठी हजर, काही मागायला नव्हे तर राम - सीतामैयाची भूक क्षालन व्हावी, या प्रसंगी वनात त्यांना आश्वस्थ करण्यासाठी. जो राम त्यांचा उद्धार करायला आला होता, त्यालाच हे साधे भोळे वनवासी म्हणतात - आम्ही आहोत ना या वनात ! आपण मुळीच काळजी करू नका.तसेच सीतामाईची काळजी घ्यायला, सोबत द्यायला आमच्या बायका,लेकी सुना आहेतच. आपण निश्चिंत असा. काय हा भगवंताचा व भक्तांचा भाव बरे ! असेच काहीसे दृश्य श्रींच्या अवतार कार्याने विदर्भात दिसायला लागले होते. संत हेची देव. संत हे भक्तांना मुक्त करतात, त्यांना आपल्यासम बनवतात. दासगणु महाराज ज्ञानी होते, काव्यमय ओवीबद्ध चरित्र लिखाणाची हातोटी त्यांच्याजवळ होती पण त्यांचा बालवत शरणागतीचा भाव श्रींना आवडला असावा आणि त्यांच्या मुखाने आपले चरित्र तें स्वत:च वदते झाले श्री जनकल्याणार्थ ! 

।। श्री गजानन महाराजार्पणमस्तु ।। 


सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment