Mar 11, 2020

श्री गजानन विजय दैनंदिन ओवी स्वाध्याय चिंतन अध्याय - १ ( ओवी ६९ ते ८२ )


।। श्री गणेशाय नमः ।।

१/६९ खऱ्या संताचे धोरण | न कळे कोणा लागोन |

महापुरुष गजानन | आधुनिक संतचूडामणी ||

१/७० या महापुरुषाचा | ठावठिकाण कोणचा |

व पत्ता त्यांच्या जातीचा | इतिहासदृष्टया न लागे की ||

१/७१ जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणा | न कळे कोणा लागून ||

ते ब्रह्मास पाहून | निश्चय त्याचा करणे असे ||

खऱ्या संताचे धोरण कळत नाही याचा अर्थ काय? आणि महापुरुष गजानन हे तर आधुनिक संत चूडामणी. याचा अर्थ संतचरित्र वाचत असताना त्यातील संताचे गूढ काय असेल हे कळल्याशिवाय संत कळणार नाही. तसेच “ ब्रह्माचा ठाव ठिकाणा | न कळे कोणा लागून ”, आणि ब्रह्माला पाहून मग त्याचे ठाव ठिकाण हे निश्चित करावे लागेल. हे सगळे अगम्य ! त्यातील अध्यात्मिक अर्थ अजूनही मला कळला नाही हे सत्य आहे. पण विचारांती मला अस वाटलं की समाजातील सर्व सामान्य माणूस आणि संत यांच्या दृष्टीकोनात, वागणुकीत, विचारसरणीत जी दिव्यत्वाची आध्यत्मिक तफावत दिसते त्यात तर हे उत्तर दडल नसेल ना? एक दिवस ज्ञानेश्वरी वाचत असताना जाणीव झाली की संत थोर का ? तर समाजात एखाद्याच्या हातून चुकून दुराचरण घडले, पण लगेच त्याला पश्चात्ताप झाला आणि तो परमेश्वराच्या भजनी लागला तर संत त्याला पतित जीवनाचे सार्थक कसे करावे याचे धडे गिरवून जवळ घेईल की दुराचारी म्हणून दूर लोटेल ? खऱ्या संताचा कस येथेच लागेल.

जन्म कोणत्या जातीत,कोणत्या स्तरात, कोणत्या वर्णात, कोठे घ्यायचा ? हे ठरविण्याचा अधिकार जन्म घेणाऱ्याला नाही हे खरे पण, सर्व मानवांना ज्ञान मिळविण्याचा समान न्याय असायला हवा, पण तसे होत नाही. प्रत्येकाला ज्ञानप्राप्तीतून जीवनाचे सार्थक करण्याचा पूर्ण अधिकार आहे. इतिहासात तोही नाकरण्यात आला. तेथे वेद काही करू शकले नाहीत. स्त्रिया, वैश्य, शुद्र यांना ज्ञानापासून वंचित ठेवल्या गेले.

हे श्रीकृष्णाला मान्य नसावे, म्हणून त्यांनी गीतेमध्ये नवव्या अध्यायात ती चूक सुधारली. जन्म हातात नाही पण कर्म बाकी आपल्या हातात आहे असे सांगून जन्मवंचित आणि कर्मवंचितांना दिलासा दिला. त्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी गीतोपदेशाचे प्रयोजन केले, ते ज्ञानेश्वरीत दृष्टांताच्या माध्यमातून. जसे - गावातील अनेक ओहोळ नदीला जाऊन मिळाले की त्यांचे क्षुद्रत्व संपून नदी म्हणून तिची ओळख होते, तीच नदी पुढे समुद्राला मिळाली की तिला मग कुणी नदी नाही म्हणत तर ती समुद्र बनते. तसेच काष्ठ अग्नीत टाकी पर्यंतच त्याला काष्ठ म्हणायचे, एकदा अग्नीत टाकले की अग्नी म्हणतो, काष्ठ नव्हे. तोच निर्णय मानवी जीवनासाठी गीतेने मान्य मानला. कोणत्याही वर्णात, जातीत, वा वर्गात जन्म झाला तरी ईश्वराचे वळण लागले की त्याचे पूर्व संदर्भ पूर्णत: गळून पडतात आणि तो ईश्वराचा लाडका बनतो, ज्याला तुम्ही मी साधू म्हणून संबोधतो.

वाल्या पूर्वी दरोडेखोर होता, संत संग लाभला आणि रामनाम जपता जपता विश्व वंदनीय महाकवी वाल्मिकी म्हणून स्थिरावला. ज्ञानदेवांनी विराट जनसमुदायाच्या समोर गीतोपदेशाच्या प्रयोजनातून माणसाला आत्मोद्धारासाठी जन्म किंवा कर्म यापैकी कोणतेच कर्म अडथळे आणू शकत नाहीत स्पष्ट केले.

या महापुरुषाचा- श्री गजाननाचा- ठावठिकाण कोणता, जात कोणती, त्यांचा पत्ता काय हे इतिहासदृष्टया तपासून वा तर्क लाऊन आपण मुक्ती पासून दूर तर जात नाही ना याचा विचार करा. कारण ब्रह्माचा ठाव ठिकाणा कोणाला लागला आहे? याचा विचार करा. परमेश्वर नामाने “ अहं ब्रह्मास्मी ” म्हणणाऱ्या मुक्त आत्म्याच्या दर्शनाने त्याचा निर्णय आप आपल्या ज्ञान कुवती प्रमाणे घ्या. त्यातच आधात्मिक कल्याण आहे

“ ते ब्रह्मास पाहून | निश्चय त्याचा करणे असे || ” म्हणून आरती म्हणतो

‘ झाले समाधान | तुमचे देखिले चरण |

आता उठावेसे मना | येत नाही नारायणा |’

आणि श्री गजानन महाराजही शांतपणे “तथास्तु’ म्हणून आशीर्वाद देतात आपल्या मंगलमय जीवनासाठी.

१/७२ जो का हिरा तेजमान | पूर्णपणे असे जाण |

तेज त्यांचे पाहोन | ज्ञाते तल्लीन होती की ||

१/७३ तेथे त्या हिऱ्याची | खाण आहे कोणची |

हे विचारी आणण्याची | गरज मुळी राहत नसे ||

१/७४ ऐन तारुण्याभीतरी | गजानन आले शेगाव नगरी |

शके अठराशेभितरी | माघ वद्य सप्तमीला ||

जो हिरा पूर्ण तेजस्वी आहे, त्याच्याकडे बघितले की जे रत्नपारखी असतात, ते पटकन त्याचे मोल ओळखतात. खरा हिरा पाहताच रत्नपारखी तो हातात घेतो, त्या हिऱ्याला न्याहाळतो आणि समाधानी होतो. तो हा विचार करीत नाही की हिरा कोणत्या खाणीत मिळाला असेन, कुणाला मिळाला,कसा मिळाला वगैरे वगैरे. अशावेळी ते फार चौकस होत नाहीत कारण मनोमन त्याचे महत्व व गुण पटलेले असतात. असे अवतारी व्यक्तिमत्व प्रथमत: शेगावच्या रस्तात बसलेले ज्यांनी पाहिले, त्या सर्वांनाच त्यांचे महत्व कळले असेन असे नव्हे. पण जे ज्ञानी होते, ते प्रथम त्याचे मोल ओळखून, भाव ठेऊन समर्पित झालेत. त्यांना त्याचे महत्व, मोल कळले. असे महानुभवी इतर चौकशा करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. जसे आपण कोण, कोठले, आपले नाव,गाव कोणते? असे एक दोनच मोजके सज्जन त्यांना पाहून तेथेच थबकले. अंत:र्मनाने त्यांनी जाणले हे काही सर्वसामान्य पुरुष नव्हेत. त्यांच्या मनीचा भाव दाटून आला. मोठ्या सदभाग्याने व नशिबाने एखाद्यालाच हे ज्ञान असते. संतकवी म्हणतात ‘ तेज त्यांचे पाहोन | ज्ञाते तल्लीन होती की || ’ त्या हिऱ्याची खाण कोणची आहे ? हे विचारी आणण्याची मुळी गरजच उरत नाही. तसेच आज म्हणजे शनिवारी दुपारी बारा वाजता शेगावात घडले. कारण त्यांच्यासमोर प्रत्यक्ष परब्रह्म बसलेले त्यानी पाहिले व मनाने अनुभवले. श्री गजानन महाराज ऐन तारुण्यात माघ वद्य ७ ला शके १८०० म्हणजेच शनिवार दिनांक २३/०२/१८७८ रोजी येथे अवतीर्ण झालेत. महाराज हे देह नव्हतेच तर ते देही होते. त्यांच्याकडे बघीतले की हे तर प्रत्यक्ष चैतन्य आहे हे जाणवायचे. त्यांचा देह हीच त्या चैतन्याची शोभा होती महाराज. ते अयोनी जगाच्या कल्याणासाठी अवतारीत झाले होते. ते सामान्य व्यक्तिमत्व नव्हते, महान योगी होते हे जाणायला, कळायला आणि त्याचे दर्शन व्हायला महाभाग्य उदयाला यावे लागते. धर्म हा ज्याचा त्याने आचारायचा असतो कारण धर्म हा अनुभूतीचा, अनुभवाचा व अध्यात्मिक ज्ञानाचा विषय आहे. अध्यात्म हे विज्ञान आहे. त्यासाठी सुसज्ज प्रयोग शाळा लागते. ती प्रयोग शाळा म्हणजे प्रत्येकाचे मन होय. ते निर्मल, स्वच्छ व रिते असावे लागते म्हणजे भगवंत तेथे येऊन बसतो. येथे बोलण्यापेक्षा कृती फार मोलाची ठरते.या अवतारी कार्यात श्री गजाननमहाराज काहीच बोलत नाहीत तर आपले जीवनमूल्ये ते जनी, मनी रुजवतात,ते आपल्या प्रत्यक्ष वागणुकीतून. म्हणून संत चरित्राचे चिंतन करायचे एवढेच.

१/७५ कोणी कोणी म्हणती जन | श्रीसमर्थाचे जे का स्थान |

ते त्या सज्जनगडाहून | या देशी आले हे ||

१/८२ हे त्यांच्या लीलेवरून | पुढे कळेल तुम्हालागून |

योगाचे अगाध महिमान | त्याची सरी न ये कोणा ||

राजकीय, सामाजिक, आर्थिक अभ्यासातून हे जाणवते की १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात विदर्भाची स्थिती तशी हलाखीचीच होती. १८०३ ते १८५३ पर्यंत निजामाची कारकीर्द होती. पुढे १८५३ च्या तहानुसार वऱ्हाड इंग्रजांच्या ताब्यात आला. १८६७ साली बुलढाणा हे थंड हवेचे ठिकाण असल्याने जिल्ह्याची जागा निश्चित झाली. १८७० साली खामगाव हा नवीन तालुका निर्माण करण्यात आला. इ.स. १८५९ साली इंग्रजांनी शेगावचा कारभार पाहण्यासाठी १७ स्थानिक पाटलांची नियुक्ती केली. नापुर विभागाकडून १८६३-६४ साली ग्रेट इंडीया पेनिनसुला रेल्वे शेगाववरून धावू लागली. शेगावला पहिली कापूस गिरणी ही १८६८ मध्ये सुरु झाली. १८६७ पर्यंत शेगाव एक सामान्य खेडेगाव होते. शेगावचा पाणी पुरवठा फार अपुरा होता. १८८७ साली शेगाव नगर परिषदेची स्थापना झाली.१८९० मध्ये शेगावला डाकबंगला बांधल्या गेला. १८ जून १८५८ रोजी ब्रिटीश इस्ट इंडिया कम्पनीने संपूर्ण राज्य विक्टोरिया राणीच्या नावे करून दिले. व्हाईसरॉय व भारताचे गव्हर्नर जनरल राणीच्या नावे राज्य चालवीत होते. इ.स. १९०२ पासून निजाम व इंग्रज यांच्या करारानुसार संपूर्ण विदर्भावर इंग्रजी सत्ता कायम झाली. भारतात ब्रिटीशांची राजवट आल्यापासून सर्वत्र अस्थिरता निर्माण झाली. त्यांची दडपशाही अन्याय व अत्याचाराने भरलेली होती.स्वातंत्र्यसैनिकांना त्रास होताच त्याची झळ सर्वसामान्य माणसालाही लागल्याशिवाय राहत नसे. महात्मा गांधी १९०७ ते १९१४ पर्यंत द.आफ्रिकेत सत्याग्रह करीत होते. नाना यातना सहन करीत लोक जीवन जगत होते. भ्रष्ट लोकांना योग्य मार्ग दाखवावा, त्यांच्या जीवनाला काही आशय द्यावा या उद्देशाने श्रींनी अवतार घेतला होता. जगाचा उद्धार करण्यासाठीच श्री समर्थ सिद्धयोगी श्री गजानन महाराज या भूतलावर दि. २३ फेब्रु. १८७८ ला शेगावी या ऋषीमुनींच्या वास्तव्याने पावन झालेल्या शेगावात अवतीर्ण झाले होते. श्री गजानन महाराज, श्री नरसिंगजी महाराज, साईबाबा व श्रीवासुदेवानंद सरस्वती यांच्या बंधू समजून गाठीभेठी झाल्या आहेत हे बाकी खरे. श्री गजानन महाराज हे पूर्ण अवतारी होते, त्यामुळेच त्यांना बापुना काळेला श्री विठ्ठलरूपात दर्शन देता आले. काही लोक अस म्हणतात की श्री गजानन महाराज म्हणजेच श्रीस्वामी समर्थ रामदास होत जे सज्जनगडावरून विदर्भातील शेगाव नगरी अवतीर्ण झालेत जनकल्याणार्थ. याला सबळ पुरावा असा नाही. पण संतकवी श्री दासगणू हे स्वत: रामदासी होते त्यामुळे त्यांना सर्वत्र श्रीरामस्वरूप दृग्गोचर होणे स्वाभाविकच आहे. श्री स्वामी प्रमाणेच गजानन महाराजांचे हात गुढग्यापर्यंत टेकत, ते आजानुबाहू होते. श्रींची उंचीही साडेसहाफुटापेक्षा कमी नव्हती. निमगोरा रंग , सुदृढ व बांधा सडसडीत होता. तसेच श्री गजानन महाराज परमहंस सन्यासी होते. त्यामुळे काही जनांना ते श्री स्वामी समर्थ वाटले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. असो.

असाही एक समज आहे की श्री गजानन महाराज तेलंगी ब्राह्मण आहेत. पण तो खरा नाही. वासुदेवानंद सरस्वती तेलंगी ब्राह्मण होते. लोक श्रींना गणपतीचा अवतार मानत, कारण महाराज सदैव गण गण गणात बोते असे म्हणत. त्यामुळे त्यांना गीणगिणे बुवा, गणपत बुवा वा अवलीयाबाबा असेही म्हणत. पण महाराजाना जप करताना किंवा हातात माळ घेऊन बसलेले कुणी कधी पाहिल्याचे ऐकिवात नाही.

कारंज्याचे बाळशास्त्री एक विद्वत्तेने संपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांना अध्यात्म व संतसत्संगाची आवड होती. शंकराविषयी अपार भक्ती असल्याने ते सतत त्र्यम्बकेश्वर येथे जात. पंचवटीतील गोदावरीकाठी काही पुराणिक, पंडित, शास्त्री, आणि विद्वान यांची शंकर आणि विष्णु यांच्या श्रेष्ठतर, योग्यतेवर चर्चा सुरु होती. काही शंकराला तर काही विष्णूला श्रेष्ठ मानणारे होते तर काही समसमान आहेत असे मानणारे होते. बाळशास्त्रीही या सभेत सहभागी झाले होते. ही चर्चां ऐकण्यासाठी म्हणा वा योगा योगाने म्हणा एक दिगंबर सत्पुरुष जवळच एका झाडाखाली येऊन बसला. त्याच्या हृदयात शिवभक्ती उफाळाला आली होती. बाळाशास्त्रीस त्या सत्पुरुषाच्या रूपाने साक्षात शिव शंकराचे दर्शन झाले. ते सत्पुरुष म्हणजेच श्री गजानन महाराज होते. पुढे शनिवारी दि १८-१२-१८८५ मध्ये मी कारंज्याला येईल, असे श्रींनी कबुल केले होते. बाळशास्त्री सकाळ पासून श्रींच्या शोधात होते. एका सद्-गृहस्थाने त्यांना सांगितले, ऋषीतलावावर एक दिगंबर व्यक्ती सकाळपासून दिसत आहे. बाळशास्त्री तिकडे गेलेत व श्रींना गाठले. श्रींना शरण जाऊन श्रद्धेने त्यांना घरी घेऊन गेलेत. मागणे मागितले “ सद्गुरुनाथ माझा उद्धार करा, माझे अपराध पोटात घाला, या प्रपंचाने श्रमून गेलो आहे, आपण मला यातून वर काढा.” श्रींनी त्यांचे डोक्यावर हात ठेऊन त्यांना बोध दिला. महाराजांचा ज्याला स्पर्श झाला त्याच्या सारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. अशा व्यक्तीला भाव झाला की महाराज शिवाचे अवतार आहेत. महाराज हे जीवन्मुक्त, विदेही, प्रत्यक्ष परब्रह्म स्वरूप होते. असे गजानन महाराज ज्याचा जसा भाव तसे दर्शन देत, मध्येच गुप्त होत. तर एकाच वेळी दोन गावात वेगवेगळ्या व्यक्तींना भेटत, कारण श्री सिद्धयोगी होते. असे अवतारी गजानन जगाचा उद्धार करण्यासाठी या भूतलावर अवतीर्ण झालेत एवढेच सत्य. योगी श्री गजानन महाराज कोणत्याही रुपात आपल्या योगसामर्थ्याने शिरकाव करून भक्तांना दर्शन देत असत. असेच कृत्य या भूमीवर जगद्गुरुनी केले आहे. संतकवी सांगतात, गोरख हा उकिरड्यात जन्मला, तर कानिफा गजकर्णात. चांगदेव नारायण डोहात योनी वाचून प्रगट झाले होते. तसेच काही कृत्ये श्री गजानन महाराजांनी या अवतारात केलीत. कारण योगसामर्थ्याने हे सर्व करण्याची शक्ती व सामर्थ्य त्यांचे जवळ होते. श्री गजानन महाराज महान योगी होते,योगसम्राट होते. योग्याची लीला कुणालाही लक्षात येत नाही. योगमहीमा अगाध आहे. त्याची बरोबरी विश्वात कुणालाही करता येणार नाही, हे पुढील श्री कथाभागातून लक्षात येईलच.

II श्री गजानन महाराजार्पणमस्तु II

सौजन्य : श्री गजानन आचार्यपीठ


No comments:

Post a Comment