Sep 13, 2024

' योगिराज ' श्रीथोरले स्वामीमहाराज आणि प्रासादिक मंत्रोपासना


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगुरुः शरणम् ॥ ॥ ॐ श्रीमद् अमृतमूर्तये श्रीदत्तवासुदेवाय नमः ॥ श्रीतुंगभद्रेच्या तीरावर वसलेल्या हावनूर नामक गावाचा परिसर अत्यंत रमणीय व शांत आहे. श्रीदत्त संप्रदायासाठी या स्थळाचे विशेष महत्व असे की श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती स्वामी महाराजांनी त्यांचा विसावा चातुर्मास शके १८३२ अर्थात इ. स. १९१० साली इथेच केला होता. त्यावेळी हावनूर येथील प्रसिद्ध अशा श्रीत्रिपुरान्तकेश्वराच्या मंदिरामध्ये श्रीटेम्बेस्वामीमहाराज वास्तव्यास होते.  याच चातुर्मासात घडलेली श्रीटेम्बेस्वामीमहाराजांची ही अदभूत लीला - एका सोमवारी श्रीस्वामीमहाराजांच्या दर्शनहेतूने काही भक्त मंडळी हावेरी स्टेशनवर उतरून बैलगाडीने हावनूरला जाण्यास निघाली. त्यांतीलच एका भक्ताची पत्नी मात्र पायीच मार्गक्रमण करत होती. श्रीटेम्बेस्वामी महाराजांच्या दर्शनाचा हा प्रवास कुठल्याही वाहनांत न बसता केवळ पायीच करावयाचा असा तिचा संकल्प व नवस होता. असे असले तरी बरोबरच्या मंडळींनी फारच आग्रह केला तर ती काही अंतर बैलगाडीत बसून पुढील प्रवास पायीच करत असे.  साधारण काही अंतराचा प्रवास झाल्यावर, या सर्व स्वामीभक्तांना दोन तेजस्वी बटू सामोरे आले आणि हात जोडून त्या सर्वांना त्यांनी अति विनीत होऊन प्रार्थना केली," श्रीस्वामीमहाराजांच्या रूपाने या भूतलावर अवतरलेल्या श्रीदत्तगुरुमहाराजांचे दर्शन घेण्यासाठी आपण सर्व भक्तमंडळी हावनूरला निघालेले आहात. हावनूर अजून बरेच दूर आहे. इथवरच्या प्रवासाच्या श्रमाने तुम्ही फार दमलेले दिसत आहात. तेव्हा, आमच्या गुरुदेवांच्या आश्रमात येऊन आपण सर्वांनी भोजन आणि थोडी विश्रांती घेतली तर आम्हांला फार धन्यता वाटेल." खरोखरच ती सर्व भक्तमंडळीं थकलेली होती आणि अत्यंत क्षुधाग्रस्तही झाली होती. त्याक्षणी आपल्या सद्‌गुरूंनीच या बटूंना पाठविलेले आहे असे त्यांना वाटले. त्यामुळे अर्थातच त्या सर्वांनी त्या दोन बटूंची ती प्रेमळ विनवणी तत्काळ मान्य केली आणि ते सर्वजण त्या बटूंच्या पाठोपाठ त्यांच्या आश्रमात गेले.  अनेक लहान-मोठ्या इमारती असलेले त्या आश्रमाचे आवार अतिशय प्रशस्त होते. त्या बटूंनी सर्व लोकांना विहिरीवर नेऊन हातपाय धुण्यास पाणी काढून दिले. त्या शीतल जलाने सर्वच भक्तमंडळींचा थकवा क्षणांत नाहीसा झाला. त्यानंतर समोरच असलेल्या श्रीगणेश मंदिरात जाऊन त्या सर्वांनी विघ्नहर्त्याचे मोठ्या मनोभावें दर्शन घेतले. थोड्याच वेळांत, त्या बटूंनी त्यांना भोजनमंदिरामध्ये नेले. त्या दालनांत हिरव्यागार केळीची लांबरुंद पाने मांडलेली होती. सभोवती सुरेख रांगोळ्या काढलेल्या होत्या व समोर सुवासिक उदबत्त्या लावलेल्या होत्या. हा थाट पाहून त्या सर्व भक्तमंडळींचे चित्त प्रसन्न झाले. सर्वजण स्थानापन्न झाल्यावर त्या दोन हसतमुख बटूंनी त्यांना अतिशय सुग्रास अन्नपदार्थ वाढावयास सुरुवात केली. त्या अतिशय सात्विक, स्वादिष्ट भोजनाने सर्वच तृप्त झाले. भोजनोत्तर त्या बटूंनी सर्वांना त्रयोदशगुणी विडेही दिले.  काही काळ त्या पवित्र स्थानी थांबून सर्वांनी विश्रांती घेतली आणि त्या बटूंचा निरोप घेऊन ती सर्व भक्तमंडळी आपल्या पुढील प्रवासासाठी हावनूरला जाण्यास निघाली. काही पावले चालून गेल्यावर त्या मंडळींनी सहजच मागे पाहिले अन काय आश्चर्य ! काही क्षणांपूर्वी ते ज्या आश्रमांत होते, जिथे त्या सर्वांनी पोटभर जेवण केले तो आश्रम, ते दोन बटू, ते गणरायाचे मंदिर असे तिथे आता काहीच तेथे नव्हते. तर त्या ठिकाणी केवळ बैलगाडीचा मार्ग अन आजूबाजूचा शेत परिसर होता. हा अद्‌भूत प्रकार पाहून ती सर्वच मंडळी दिङ्मूढ झाली. हा भास म्हणावा तर सर्वांनाच कसा झाला ? तसेच त्या सर्व भक्तमंडळींची उदरपूर्तीही झाली होती, म्हणजेच जे घडले ते सत्य होते हे निश्चितच ! संपूर्ण प्रवास मार्गात हाच विचार सर्वांच्या मनांत घोळत होता. यथावकाश सायंकाळी ही सर्व मंडळी श्रीक्षेत्र हावनूर येथे पोहोचली. ते सर्वच भक्तगण आता श्रीस्वामीमहाराजांच्या दर्शनासाठी उत्सुक होते. शुचिर्भूत होऊन त्या सर्वांनी त्यांच्या सद्‌गुरूंचे मोठ्या भक्तिभावाने पूजन केले. सत्संग सोहळ्यानंतर त्यातील एका भक्ताने टेम्बेस्वामीमहाराजांना दुपारी घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि " हा काय अघटित प्रकार होता ?  त्या पाठीमागचे सत्य काय ? हे जाणून घेण्यास आम्ही सर्व उत्सुक आहोत." अशी प्रार्थना केली. त्या सर्व मंडळींच्या चेहऱ्यावरचे ते आश्चर्य, कुतूहल, आणि भीतीयुक्त भाव पाहून श्रीस्वामीमहाराज मंद स्मित करत उत्तरले, " तुमचा भक्तिभाव, दृढ श्रद्धा यांमुळे प्रसन्न होऊन त्या भक्तवत्सल श्रीदत्तप्रभूंनी ही लीला केली. आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी अनेक रूपे धारण करणारे अत्रिपुत्र श्री दत्तात्रेय आपल्या सामर्थ्याने मनःकल्पित विश्व निर्माण करतात आणि ते विलीनही करतात. त्यासाठी त्यांना कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते." दत्तभक्तहो, श्रीस्वामीमहाराजांनी हे सर्व त्या परब्रह्माने घडविले, असे जरी त्या भक्तमंडळींना सांगितले असले तरी, सर्वांतर्यामी स्वामींनीच आपल्या भक्तांना सृष्टीच्या उत्पत्ती-स्थिती-विलयाचा हा चमत्कार दाखविला, हे निःसंशय! श्रीस्वामीमहाराजांच्या चरित्राचे मनन, चिंतन केले असता त्यातील सर्वात् महत्त्वाचा पहिला पैलू म्हणजे  ' देव आणि भक्तांचे ऐक्य ' आपल्याला सहज लक्षांत येतो. श्रीसंतश्रेष्ठ तुकाराममहाराजांनी त्यांच्या अभंगांतून  “देव ते संत, संत ते देव" आणि  " भक्त तोचि देव, देव तोचि भक्त," असे वर्णन करून हे रहस्य प्रकट केले आहेच. अशा अनेक प्रसंगामध्ये श्रीवासुदेवानन्दसरस्वती महाराज आपल्याला करुणासागर व भक्तवत्सल स्वरूपांत दिसतात. त्यांच्या चरित्रातील असंख्य लीला अनुभवतांना आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ व श्रीमन्नृसिंहसरस्वतीस्वामी महाराज या दोन श्री दत्तप्रभूंच्या अवतारानंतर झालेल्या  ' योगिराज ' या श्रीदत्तावताराचीच प्रचीती येत राहते. श्रीटेम्बेस्वामी महाराजांच्या दर्शनाचा हा प्रवास कुठल्याही वाहनांत न बसता केवळ पायीच करावयाचा असा ज्या भक्ताच्या पत्नीचा संकल्प होता, तिच्याकडेच दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी श्रीस्वामीमहाराजांनी भिक्षा ग्रहण केली आणि आशीर्वाद म्हणून त्या सौभाग्यवतीस पुढील तीन मंत्रांचा जप करण्यास सांगितले.  संपत्तीवर्धक श्लोक दरिद्रविप्रगेहे यः शाकं भुक्त्वोत्तमश्रियं ।  ददौ श्रीदत्तदेवः स दारिद्र्याच्छ्रीप्रदोऽवतु ॥ भावार्थ - दरिद्री ब्राह्मणाच्या घरी घेवड्याची भाजी खाऊन ज्यांनी त्याला विपुल संपत्ती दिली, ते लक्ष्मी प्रदान करणारे श्रीदत्तदेव दारिद्र्यापासून माझे रक्षण करोत. (श्रीगुरुचरित्र, अध्याय - १८) संततिवर्धक श्लोक दूरीकृत्य पिशाचार्तिं जीवयित्वा मृतं सुतम् ।  योऽभूदभीष्टदः पातु स नः संतानवृद्धिकृत् ॥ भावार्थ - साध्वीची पिशाचपीडा दूर करून ज्यांनी तिच्या मृतपुत्राला जिवंत केले व त्या ब्राह्मण स्त्रीचे मनोरथ पुरविले, ते वंशवेल वाढविणारे भगवान दत्तात्रेय आमचे रक्षण करोत. (श्रीगुरुचरित्र, अध्याय - २०, २१) सौभाग्यवर्धक श्लोक जीवयामास भर्तारं मृतं सत्या हि मृत्युहा ।  मृत्युंजयः स योगींद्रः सौभाग्यं मे प्रयच्छतु ॥ भावार्थ - पतिव्रतेचा पति मृत असतां ज्यांनी त्याला जिवंत केले, ते मृत्यूचा नाश करणारे मृत्युंजय योगिराज मला सौभाग्य देवोत.(श्रीगुरुचरित्र, अध्याय - ३०, ३१, ३२)

श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती महाराजांच्या कृपेने या दिव्य आणि प्रासादिक मंत्रांचे अनुष्ठान करून पुढे त्या माऊलीस संपत्ती, संतती, सौभाग्य, दत्तमहाराजांची सेवा आदि सहजच प्राप्त तर झालेच, खेरीज तिला अखेरीस सायुज्य मुक्तीचा लाभदेखील झाला.


॥ श्री गुरुदेव दत्त ॥  संदर्भ : श्रीथोरले स्वामीमहाराज - श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानन्दसरस्वती टेम्बेस्वामीमहाराज यांचे चरित्र लेखक : द. सा. मांजरेकर आणि डॉ. केशव रामचंद्र जोशी

Aug 26, 2024

अवतार गोकुळीं हो


श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् । देवकीपरमानंदं कृष्णं वंदे जगद्‌गुरुम् ॥ 

 

अवतार गोकुळीं हो । जन तारावयासी ॥ लावण्यरूपडें हो । तेजःपुंजाळराशी ॥ उगवलें कोटिबिंब । रवि लोपला शशी ॥ उत्साह सुरवरां । महाथोर मानसीं ॥१॥ जय देवा कृष्णनाथा । राईरखुमाईकांता ॥ आरती ओवाळीन । तुम्हां देवकीसुता ॥धृ.॥  कौतुक पहावया । माव ब्रह्मयानें केली ॥ वत्सेंही चोरुनीयां । सत्यलोकासी नेलीं ॥ गोपाळ गाई वत्सें । दोंहीं ठायीं रक्षिलीं ॥ सुखाचा प्रेमसिंधू । अनाथाची माऊली ॥२॥  चारितां गोधनें हो । इंद्र कोपला भारी ॥ मेघ जो कडाडीला । शिळा वर्षल्या धारीं ॥ रक्षिलें गोकुळ हो । नखीं धरिला गिरी ॥ निर्भय लोकपाळ । अवतरला हरी ॥३॥  वसुदेवदेवकीचे । बंध फोडिली शाळ ॥ होऊनियां विश्व-जनिता । तया पोटिंचा बाळ ॥ दैत्य हे त्रासियेले । समूळ कंसासी काळ ॥ राज्य हें उग्रसेना । केला मथुरापाळ ॥४॥  तारिले भक्तजन । दैत्य सर्व निर्दाळून ॥ पांडवसाह्यकारी । आडलिया निर्वाणीं ॥ गुण मी काय वर्णू । मति केवढी वाणी ॥ विनवितो दास तुका । ठाव मागे चरणीं ॥५॥ *************************************************** ओंवाळूं आरती मदनगोपाळा । श्यामसुंदरगळां वैजयंती माळा ॥धृ.॥  चरणकमळ ज्याचें अतिसुकुमार । ध्वजवज्रांकुश ब्रीदाते तोडर ॥१॥  नाभिकमल ज्याचें ब्रह्मयाचें स्थान । हृदयीं पदक शोभे श्रीवत्सलांछन ॥२॥  मुखकमल पाहतां सूर्याच्या कोटी । मोहियेलें मानस कोंदियेली दृष्टी ॥३॥  जडित मुगुट ज्याचा दैदीप्यमान । तेणें तेजें कोंदलें अवघें त्रिभुवन ॥४॥  एका जनार्दनीं देखियेलें रूप । रूप पाहों जातां झालें द्‌रूप ॥५॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

***************************************************


॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥


श्रीहरिविजय - बलराम-श्रीकृष्ण जन्म कथा


॥ श्री गुरुदेव दत्त ॥


Aug 15, 2024

श्री स्वामी स्वरूपानंदकृत श्रीभावार्थदीपिकासार-स्तोत्र अर्थात श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम् ॐ नमो भगवते श्रीज्ञानदेवाय


महती ज्ञानेश्वरीची । प्राकृतग्रंथीं अनुपम साची ॥ ध्रु०॥ रत्ने शब्दाब्धीचीं । वेंचुन रचना केली जियेची ॥१ 

उपमा उपमेयांची । गर्दी, ज्याला गोडी सुधेची ॥२ 

आठवण करवित साची । शुचिपण ज्याचें गोदावरीची ॥३ 

वाणी दासगणूची । कुंठित झाली गति शब्दांची ॥४ 

श्री संतकवि दासगणु महाराजांनी श्रीज्ञानेश्वरीचे माहात्म्य किती सुरेख शब्दांत वर्णिले आहे. श्री ज्ञानेश्वरी - अवघ्या मराठी जनांची माउली असलेल्या ज्ञानदेवांची साक्षात वाङ्मय-मूर्ती ! प्रत्यक्ष श्रीगुरु निवृत्तिनाथ महाराजांचा आशीर्वाद लाभलेल्या आणि माऊलींप्रमाणेच कृपेचा, मायेचा वर्षाव करणाऱ्या या दिव्य-पावन ग्रंथाच्या पठण-मनन-चिंतनाने भाविकांचे परम कल्याणच होते, अशी ग्वाही अनेक अधिकारी महात्म्यांनी दिली आहे. असंख्य भक्तांनी याची प्रचितीही अनुभवलीही आहे.

तथापि, या ग्रंथाची प्राकृत भाषा, ज्ञानदेवांच्या दृष्टांतांतील गुढार्थ, ग्रंथवाचनासाठी लागणारा वेळ आणि अशाच इतर अनेक कारणांमुळे कित्येक भाविकांची, श्रद्धाळूंची इच्छा असूनही ते याचा वाचनलाभ घेऊ शकत नाही अथवा ही प्रासादिक श्रीज्ञानेश्वरी वाचूनही त्यांना पूर्णतः समाधान मिळत नाही. यासाठीच, सद्‌गुरु श्री स्वामी स्वरूपानंद यांनी श्रीज्ञानेश्वरीतील निवडक ओव्या घेऊन भावार्थदीपिकासार-स्तोत्र अर्थात श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठाची रचना केली आहे.

आम्हां सामान्य जनांवर कृपा करण्यासाठीच जणू भगवती श्री ज्ञानदेवी अतिशय सुलभ होऊन प्रकटली आहे.

या श्रीज्ञानेश्वरीला अनन्य भक्तिभावाने शरण जाऊन श्रीसंत एकनाथ महाराजांनीही दिव्यानुभव घेतला होता. म्हणूनच, संत एकनाथ अभंग गाथेमध्ये श्रीज्ञानदेवांच्या या वाङ्मय विग्रहाची स्तुती करतांना ते लिहितात - भाव धरूनियां वाची ज्ञानेश्वरी । कृपा करी हरी तयावरी ॥१॥ स्वमुखें आपण सांगे तो श्रीविष्णु । श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेसी ॥२॥ तोचि ज्ञानेश्वरी वाचे वदतां साचे । भय कळिकाळाचें नाही तया ॥३॥ एका जनार्दनीं संशय सांडोनी । दृढ धरा मनीं ज्ञानेश्वरी ॥४॥

सद्‌गुरु श्री स्वामी स्वरूपानंदकृत हे दिव्य स्तोत्र नित्य पठणांत ठेवल्यास भाविकांचे इह-पर कल्याण होणारच, यात तिळमात्र शंका नाही.


सद्‌गुरु श्री स्वामी स्वरूपानंदकृत श्रीभावार्थदीपिकासार-स्तोत्र अर्थात श्रीज्ञानेश्वरी नित्यपाठ


॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jul 29, 2024

॥ म्हणे गजानन ॥ - श्री. गणेश वि. रामदासीकृत श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय


श्रीगजानन विजय - शेगांवनिवासी संतवर श्री गजानन महाराजांची साक्षात वाङ्मय मूर्ती ! संतकवी श्री दासगणु महाराजांनी सिद्धावस्थेत रचलेला हा प्रासादिक ग्रंथ आहे. या दिव्य ग्रंथाचे वाचन, पारायण केले असता श्री गजानन महाराजांची प्रचिती निश्चितच येते, इतकेच नव्हें तर " जो या ग्रंथीं ठेवील भाव । त्यासी पावेल स्वामीराव । संकटीं त्याच्या घेईल धांव । रक्षण त्याचें करावया ॥ जेथें हा राहील ग्रंथ । तेथें न कदा येई भूत । लाग न साधे यत्किंचित । तेथें ब्रह्मसमंधाचा ॥" असे या प्रभावशाली ग्रंथाचे सामर्थ्य आहे. असंख्य गजानन भक्तांनी याची अनुभूती घेतली आहे.

" म्हणे गजानन " या स्वरमालिकेतून श्री. गणेश वि. रामदासी यांनी या श्रीगजानन विजय ग्रंथाचे निरूपण अत्यंत रसाळ वाणींत केले आहे. अतिशय सुमधुर असे हे मनन प्रत्येक गजानन भक्ताने आवर्जून श्रवण करावे, असेच झाले आहे.



॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥

Jul 2, 2024

श्री गजानन विजय कथामृत - अध्याय १२


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

॥ श्रीगणेशाय नमः ॥ हे गणाधीशा गणपती, हे मयूरेश्वरा विमलकीर्ती तू माझ्या हृदयांत वास करून हा ग्रंथ कळसास ने (हा ग्रंथ सुफळ संपूर्ण व्हावा).॥१॥ तू ज्ञानबुद्धीचा दाता आहेस, तूच भक्तांचे मनोरथ पूर्ण करतोस. हे गणराया, ह्या विघ्नरूपी पर्वतांचा तूच संहार करतोस.॥२॥ तू साक्षात चिंतामणी आहेस, (तत्कारण तुझे भक्त) जे काही इच्छितात, ते सर्व काही तू आपल्या भक्तांना देतोस, असे पुराणांत वर्णिले आहे.॥३॥ हे एकदंता, लंबोदरा, पार्वतीसुता, भालचंद्रा आणि सिंदुरारि माझ्या मनांतील अवघ्या चिंता दूर कर.॥४॥ असो. अकोल्यात बच्चूलाल अग्रवाल नावाचा एक धन-कनक संपन्न असा गृहस्थ होता. तो अतिशय उदारही होता.॥५॥ त्यानें कारंजा ग्रामीं घडलेली लक्ष्मणपंत घुडे यांची हकीकत (इतर लोकांकडून) कर्णोपकर्णी ऐकली होती. त्यामुळें तो जरा साशंक झाला होता.॥६॥ तिथें काय खरें आणि काय खोटें घडलें असावें, असा तो मनी विचार करत असे. आणि एके दिवशी (गजानन) महाराज अकोल्यास आले.॥७॥ त्यावेळीं हा आपला भक्त आहे हे जाणून साक्षात्कारी गजानन स्वामी बच्चुलालाच्या घरीं आलें आणि (घराबाहेरील) ओट्यावर स्थानापन्न झाले.॥८॥ (समर्थांचे आगमन झालेले पाहून) बच्चूलालास अतिशय आनंद झाला आणि तो समर्थांस म्हणाला," गुरूराया, आज मला आपलें पूजन करण्याची इच्छा आहे."॥९॥ त्याचे हे बोलणें ऐकून समर्थांनी आपल्या मानेनेच होकार दिला. श्रोतें हो, (या पूजनास) आपली संमती असल्याचेच हें साक्षात द्योतक होते.॥१०॥ बच्चुलालानें सत्वर पूजेची तयारी केली. त्या ओट्यावर अतिशय आदरपूर्वक त्याने (समर्थांचे) षोडशोपचारी पूजन आरंभिले.॥११॥ प्रथम त्याने समर्थांच्या सर्वांगास विविध प्रकारची उटणीं लावून मंगलस्नान घातलें. त्यानंतर त्यांस भरजरी पितांबर वस्त्र म्हणून परिधान केलें.॥१२॥ अंगावर बहुमोल अशी काश्मिरी शालजोडीही पांघरली. एक जरीकाठीचा रेशमी रुमाल आणून मस्तकास बांधला.॥१३॥ गळ्यांत गोफ आणि हातांत सुवर्ण सलकडींही घातली. दोन्ही हातांच्या दहाही बोटांत निरनिराळ्या अंगठ्या घातल्या.॥१४॥ स्वामींच्या डाव्या हातात हिऱ्याची बहुमूल्य अशी पौची घातली. तसेच रत्नजडित हार महाराजांच्या कंठी त्यावेळीं विशेष खुलून दिसत होता.॥१५॥ नैवेद्यासाठी म्हणून जिलबी, राघवदास पेढे (समर्थांपुढे) ठेवले. एका लहान तबकांत त्रयोदश गुणी विडेदेखील ठेवले.॥१६॥ (स्वामींस) अष्टगंध, अर्गजा, अत्तर आदी सुवासिक द्रव्यें लावली. तसेच गुलाबपाणीही त्यांच्या अवघ्या तनूवर शिंपडले.॥१७॥ शेवटी एका सुवर्णाच्या ताटांत फार मोठी, अनेक रुपये होन मोहोरांची दक्षिणा ठेवली.॥१८॥ त्या दक्षिणेची एकूण किंमत काढली तर खरोखर दहा हजार झाली असती. अश्या थोर दक्षिणेचे किती वर्णन करू बरें ?॥१९॥ (त्यानंतर) श्रींपुढे श्रीफळ ठेवलें आणि अत्यंत विनयपूर्वक (बच्चुलालाने) प्रार्थना केली, " महाराज, माझ्या मनीं इथे एक राममंदिर बांधावयाची इच्छा आहे.॥२०॥ गुरुराया, उत्सवासाठी ह्या माझ्या ओट्यावर मंडप उभारला तरी फारच अडचण होते.॥२१॥ हे ज्ञानवंता, माझें हे मनोरथ पूर्ण कर." असे म्हणून अनन्यभावानें त्याने आपला माथा (स्वामी) चरणांवर ठेवला.॥२२॥ त्यावर संत गजानन (त्याला) ' श्रीजानकीजीवन तुझा हा हेतू पूर्ण करेल.' असा आशीर्वाद देते झाले.॥२३॥ असो. आज हे सर्व अलंकार घालून मला पोळ्याचा बैल बनवला आहेस. तू असें का बरें केलेस ? याचे मला कारण सांग बघू.॥२४॥ मी काही पोळ्याचा बैल अथवा दसऱ्याचा घोडा नाही. मला या सर्व दागदागिन्यांचा काय उपयोग आहे? ते मला सांग बरें.॥२५॥ अरे, हे सर्व मज विषासमान आहे. मला ह्या वस्तूंचा स्पर्शदेखील नको. अरे, या अशा नसत्या उपाधींस माझ्या मागे लावू नकोस.॥२६॥ किंवा मग बच्चुलाला, तू किती धनवान आहेस, हे दाखविण्यासाठी असे हे प्रदर्शन केले आहेस का? ते मला सर्व सांग पाहू.॥२७॥ अरे, ज्याला जे आवडते तेच त्याला द्यावें. मी तर एक वेडापिसा संन्याशी आहे, जो गांवभर नागवा फिरत असतो.॥२८॥ बच्चुलाला, हें अवघें (ऐश्वर्य) तुझें तुला लखलाभ असो. तुम्हां प्रापंचिकांसच या द्रव्याची गरज असते.॥२९॥ अरे, माझा जगतनियंता परमेश्वर भीमा नदीच्या तीरी एका विटेवर उभा आहे. तो काय मला हे सर्व वैभव देण्यास समर्थ नाही का ?॥३०॥ असे म्हणून (महाराजांनी) आपल्या अंगावरील सर्व दागिने काढून चहू बाजूंस फेकून दिले. अगदी वस्त्रांचीही तीच गती झाली.॥३१॥ केवळ दोन पेढे खाऊन गजानन महाराज तिथून निघून गेलें. हा सर्व घडलेला प्रकार पाहून, अकोल्यांतील अनेक लोकांना वाईट वाटले.॥३२॥ त्यावेळीं तिथे कारंजा येथील काही लोक उपस्थित होते. तें आपापसांत  बोलू लागले, " आपला लक्ष्मण खरोखरच दुर्दैवी आहे. त्याने आपल्या घरी बच्चुलालाप्रमाणेच (महाराजांचे) पूजन केलें खरें, परंतु मनांत धनाचा मोह असल्यामुळें दक्षिणा अर्पण करतांना कचरला.॥३३-३४॥ त्यानें भक्ती नसतांना केवळ वरवरचें भाषण केलें. (अंतर्ज्ञानी) समर्थांस त्याचे हे वागणे समजणे अशक्य होते काय ?॥३५॥ दांभिकांची पूजा म्हणजे केवळ शब्दांचे बुडबुडेच असतात. तें महावस्त्र म्हणून केवळ अक्षता अर्पण करतात.॥३६॥ ' शर्कराखंडखाद्यानि ' (खडीसाखर नैवेद्यास अर्पण करतो.) असें म्हणून भुईमुगाचा एखादा कुचका दाणा पुढें आणून ठेवतात.॥३७॥ अशा दांभिक पूजनाचे फळंही अर्थात त्याच स्वरूपांत मिळते. लक्ष्मणाचा सर्वनाश त्याच्या या अशाच कृतीने झाला, हेच खरें !॥३८॥ हा बच्चुलाल मात्र धन्य झाला. ज्याप्रमाणें तो बोलला, अगदी तसेंच, एका जवाहूनही वेगळें नाही असेच त्याचे वर्तन होते. (महाराजांचे अत्यंत श्रद्धा आणि भक्तिपूर्वक त्यानें पूजन केलें.)॥३९॥ आतां त्याच्या या वैभवाला कधीही ओहोटी लागणार नाही. अहो, एकदा संतकृपेस जो पात्र ठरला, तो सर्वदा सुखीच होत असतो."॥४०॥ त्यानंतर बच्चुलालांनीं संपूर्ण अकोला शहरांत समर्थांचा शोध घेतला, परंतु त्यांचा कोठेही थांगपत्ता लागला नाही.॥४१॥ असो. शेगांवच्या मठामध्यें गजानन महाराजांचा पितांबर नावाचा एक शिंपी जातीचा शिष्य होता.॥४२॥ त्याने (समर्थांची) खूप सेवा केली होती. त्याच्या त्या तपश्चर्येला अखेर फळ आले. श्रोतेंहो, एके दिवशी मठांत एक गोष्ट घडली. ती आतां ऐका.॥४३॥ पितांबर एक साधेसे, अतिशय जीर्ण झालेलें धोतर नेसला होता. तें पाहून गुरुवर त्यास म्हणाले," अरे, तुझे नांव पितांबर आहे, पण तुला नेसण्यासाठी धड धोतरही नाही. वेड्या! तुझ्या उघड्या पार्श्वभागास सर्व स्त्री-पुरुष बघत आहेत, तो तरी जरा झाक बरें !॥४४-४५॥ आपलें नाव सोनुबाई सांगायचे आणि हातांत साधा कथिलाचा वाळाही घालावयास नसावा अथवा प्रत्यक्ष गंगाबाई नाव असतांना जीव मात्र तहानेनें तडफडत असावा, असाच खरोखर तुझा हा प्रकार आहे. (हे तू नेसलेलें) फाटकें धोतर केवळ पोतेरा म्हणून उपयोगीं येईल.॥४६-४७॥ तेच (धोतर) तू नेहेमी नेसतोस आणि आपलें ढुंगण जगाला दाखवतोस. तेव्हा नेसण्यासाठी हा दुपेटा (मी) तुला देतों, तो घे.॥४८॥ बाळा, माझ्या शब्दाचा मान राखून तू हा दुपेटा नेसत जा आणि कोणी काहीही केलें तरी हा नेसणें सोडू नकोस."॥४९॥ पितांबराने तो दुपेटा नेसला खरा, पण (त्याचे हे कृत्य) इतरांना सहन झालें नाही. स्वार्थीपणानें भाऊच आपल्या भावाला घातक ठरतो.॥५०॥ तो वेडावांकडा प्रकार खरें पाहतां बोलावयासच नको. श्रोतेहो, गटाराचें दार उघडलें की घाण मात्र सुटतेच (हेच खरें !).॥५१॥ श्री गजानन स्वामींचे असंख्य भक्त असले तरी, अधिकारी भक्त मात्र दोन्ही हातांच्या बोटांवर मोजता येतील इतकेच होते.॥५२॥श्रोतें हो, ज्याप्रमाणें अरण्यांत निरनिराळें अनेक वृक्ष असलें तरी क्वचितच कुठेतरी एखादा चंदनाचा वृक्ष नजरेस पडतो.॥५३॥ त्याचप्रमाणें त्यांच्या शिष्यमंडळींत (उत्तम शिष्य फार कमी) होतें. तेथील काही शिष्य पितांबरास उगाचच निरर्थक टोचून बोलू लागले.॥५४॥अरे पितांबरा, समर्थांना जे घालण्यास उपयोगी आलें असते, तें वस्त्र तू स्वतः परिधान करून बसला आहेस. हेच का तुझें शिष्यपण ? ॥५५॥ तुझी समर्थांवर कशी भक्ती आहे तें अगदीच कळून आलें. तू खरोखर खुशालचंदच आहेस. त्यामुळे ह्या मठांत सद्गुरुंचा अपमान होत आहे, तेव्हा तू इथे राहू नकोस.॥५६॥ त्यावर पितांबर उत्तरला, " मी काही गुरुंचा अपमान केला नाही, तर उलट त्यांच्या आज्ञेचे पालन करून त्यांचा मानच ठेवला.॥५७॥हें वस्त्र त्यांनी स्वतः मला दिलें आणि नेसावयास सांगितले. मी ही (त्यांनी सांगितल्याप्रमाणें) तेंच परिधान केले. मग ही अवज्ञा कशी बरें झाली ?"॥५८॥ अशी 'भवति न भवति' अर्थात वादविवाद होऊन शिष्यांत तणाव आणि दुरावा निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी श्री गजानन स्वामींनी एक निर्णय घेतला.॥५९॥ गुरूवर पितांबरास म्हणाले, " तू आतां येथून निघून जावेस. मूल जाणतें झाल्यावर आई त्याला दूर ठेवतें.॥६०॥ पितांबरा, माझी तुझ्यावर अखंड कृपा आहे. तेव्हा तू आता ह्या भूमीवर भ्रमण कर आणि अज्ञ जनांना योग्य मार्ग दाखव."॥६१॥ (नाइलाजानें अखेर पितांबरानें समर्थांस) साष्टांग नमस्कार केला आणि अश्रूपूर्ण डोळ्यांनी पुन्हा पुन्हा मागे पाहत तो (जड अंत:करणानें) मठ सोडून निघाला.॥६२॥ (मार्गक्रमण करत करत) पितांबर कोंडोली नावाच्या गावांत आला आणि तेथील एका वनांतील आंब्याच्या वृक्षाखाली बसला. त्याच्या मनांत निजगुरूंचे चिंतन सतत चालू होते.॥६३॥ तो रात्रभर तिथेच बसून होता. सूर्योदय झाल्यावर मात्र तिथे मुंगळ्यांचा त्रास होऊ लागला, त्यामुळें तो अखेर त्या झाडावर जाऊन बसला.॥६४॥ परंतु त्या आम्रवृक्षावरदेखील असंख्य मुंग्या आणि मुंगळें होतें. पितांबर सर्व लहान-मोठ्या फांद्यावर जाऊन आला खरा, पण बसण्यासाठी (मुंगळ्यांचा त्रास होणार नाही अशी) निवांत जागा त्याला त्या झाडावर काही सापडली नाही. त्याचे हे कृत्यच तेथील गुराख्यांना कौतुकास्पद वाटलें. ॥६५-६६॥ तें आपापसांत बोलू लागले, हा एखाद्या माकडाप्रमाणें ह्या वृक्षावर का फिरतो आहे ? ह्याचे कारण काही कळत नाही.॥६७॥ हा अगदी लहान-सहान फांद्यांवरही निर्भयपणें फिरून आला. मात्र कुठेही खाली पडला नाही, हे खरें तर आश्चर्यच आहे.॥६८॥ त्यांवर दुसरा (गुराखी) म्हणाला, " ह्यांत काहीच आश्चर्य वाटायचे कारण नाही. श्री गजानन महाराजांच्या शिष्यांच्या अंगी असे सामर्थ्य असते, हे नक्की. त्यामुळें हा त्यांचा शिष्य खचितच असावा. चला, हा इथें आल्याचा वृत्तांत आपण गावांत जाऊन सर्वांना सांगू या."॥६९-७०॥ गुराख्यांकडून हे वृत्त कळल्यावर, कोंडोलीचे ग्रामस्थ त्या आंब्याच्या वृक्षाजवळ आले आणि तिथे कोण आले आहे हे पाहू लागलें.॥७१॥ (पितांबरास पाहून) गावकरी आपापसांत बोलू लागले, हा खरे तर एखादा ढोंगी मनुष्य असावा आणि उगाचच आपण गजानन महाराजांचा शिष्य असल्याचे भासवत आहे.॥७२॥ भास्कर पाटील नावाचा गजानन महाराजांचा एक थोर शिष्य होता खरा, परंतु त्याचा नुकताच अडगांव या गावांत अंत झाला. ॥७३॥ आणि तसेही समर्थांचे शिष्य चांगले बर्फी, पेढे खायचे सोडून इथे मुद्दामहून उपवास करण्यासाठी कशाला येतील बरें ? ॥७४॥ तरीही एकदा याला विचारावे आणि त्याचे म्हणणे प्रथम ऐकून मग काय खरें अन काय खोटें ते ठरवावें. उगाचच तर्क करणे, योग्य नाही.॥७५॥ मग एक गांवकरी पुढे आला आणि " तू कोण आहेस? इथे कुठून आणि कशासाठी आला आहेस ? तुझा गुरु कोण आहे ?" असे (अनेक प्रश्न) पितांबरास विचारू लागला.॥७६॥ पितांबर त्यावर उत्तरला, " मी शेगांवचा असून माझे नाव पितांबर शिंपी आहे. तसेच श्री गजाननस्वामींचा मी शिष्य आहे. त्यांची मला पर्यटन करण्यासाठी आज्ञा झाली, म्हणून मग भ्रमण करीत मी इथवर आलो आणि ह्या वृक्षाखाली (विश्रांतीसाठी) बसलो. पण या आंब्याच्या मुळाशी खूप मुंगळें होते, म्हणून मी झाडावर चढलो आणि एका फांदीवर जाऊन बसलो."॥७७-७९॥ त्याचे हे बोलणें ऐकून ग्रामस्थ चांगलेच संतापले आणि म्हणू लागले, अरे, असे थोर संतांचे नाव घेऊन उगाच अशा चेष्टा करू नकोस.॥८०॥ काय तर म्हणे, मी खरें म्हणजे राजाची आवडती राणी आहे पण पोटाची खळगी भरण्यासाठी मोलमजूरी करण्यास इथे आले.॥८१॥ त्या (कोंडोली) गावांचा जो देशमुख होता, त्याचे नाव श्यामराव होते. तो म्हणू लागला, " अरे सोंगाड्या, आतां माझे बोलणे ऐक.॥८२॥ स्वामी समर्थ गजानन प्रत्यक्ष ईश्वराचा अवतार आहेत. त्यांचे नाव (गुरु म्हणून) सांगून उगाच त्यांना बट्टा लावू नको.॥८३॥ अरे वेड्या, एकदा त्यांनी केलेला चमत्कार ऐक जरा ! (वसंत) ऋतू नसतांना देखील त्यांनी आंब्याच्या झाडाला फळें आणली होती.॥८४॥ समर्थांनी तर फळें निर्माण केली. तू नुसतीं पाने तरी आणून दाखव. नाही तर या ठिकाणी तुझी काही धडगत नाही.॥८५॥ हा जो बळीराम पाटलाच्या (शेतातील) वठलेला शुष्क आंब्याचा वृक्ष आहे, तो आत्ता या क्षणी आमच्या डोळ्यांदेखत (हिरव्यागार पानांनी बहरलेला असा) पर्णयुक्त करून दाखव.॥८६॥ तू जर असे नाही करू शकलास, तर नक्कीच आमचा मार खाशील आणि जर तू सत्य बोलत असशील तर आम्हांस वंद्य होशील.॥८७॥ कारण सद्‌गुरुंचे शिष्य काही अंशी तरी त्यांच्याच योग्यतेचे असतात, अशी या जगती वदंता आहे.॥८८॥ आता अजिबात उशीर न करतां हे आंब्याचे झाड हिरवेगार कर पाहू." तें बोलणें ऐकून पितांबर अतिशय घाबरला.॥८९॥ आणि (दीनपणे) बोलू लागला, " माझा सारा वृत्तांत ऐकून घ्यावा. लोक हो, हिरे आणि गारा एकाच खाणीत सापडतात.॥९०॥ तसेच श्री गजाननस्वामींच्या शिष्यांमध्ये मी गार आहे, असे समजा. मात्र मी यत्किंचितही खोटें बोललो नाही.॥९१॥ या जगांत गारेवरून त्या खाणीस काही कमीपणा येत नाही. माझ्या गुरूंच्या नांवास मी चोरून कसे ठेवू बरें ?"॥९२॥ त्यावर श्यामराव उत्तरला, " तू आता उगाच बाष्कळ बडबड करू नकोस. शिष्यांवर संकट ओढवलें तर ते त्यांच्या सद्‌गुरुंचा धांवा करतात.॥९३॥ मग त्यांचा तो शिष्य जरी योग्य अधिकारी नसला, तरी सद्‌गुरुंचा प्रभाव (कृपासामर्थ्य) आपल्या शिष्यांना सहाय्यभूत  होतो."॥९४॥ श्रोतें हो, त्यावेळीं पितांबराची अवस्था खरोखर इकडे आड अन तिकडे विहीर अशी झाली. बिचारा अतिशय चिंतातुर झाला आणि त्याला काहीच सुचेनासे झाले.॥९५॥ त्या वठलेल्या आंब्याच्या झाडापाशी अवघेंच गांवकरी आपल्या बायकां-मुलांसह जमलें आणि आता पुढें काय घडणार हे पाहू लागलें.॥९६॥ अखेर निरुपाय होऊन पितांबरानें आपलें हात जोडलें आणि आपल्या सद्‌गुरुरायांचे मन:पूर्वक स्तवन सुरु केलें.॥९७॥ हे स्वामी समर्था गजानना, हे ज्ञानरूपी आकाशांतील नारायणा, तुझ्या चरणीं दृढ श्रद्धा असलेल्या (या भक्ताच्या) रक्षणासाठी आतां यावेळीं धावून ये.॥९८॥ हे भक्तपाला, माझ्यामुळें तुला कमीपणा येऊ पाहतो आहे. (मी सदैव भक्तांच्या पाठीशी उभा आहे) या आपल्या वचनासाठी या आंब्याच्या झाडास पालवी फुटू दे.॥९९॥ आता माझी सारी भिस्त तुमच्यावरच आहे. हे आई, माझ्यावर तू कृपा कर. नाहीतर इथे माझा प्राण जायची वेळ आली आहे.॥१००॥ प्रल्हादाचे बोल सत्य करण्यासाठी नरहरी भगवान खांबात प्रगटलें. संत जनाबाईस सुळांवर चढवलें असतां त्या सुळांचेच पाणी झाले.॥१०१॥ संत जनाबाईंचा भार त्या विठ्ठलावर, ईश्वरावर होता तर माझा सर्व विश्वास केवळ तुझ्यावरच आहे. संत आणि देवांमध्ये काहीच अंतर नसते.॥१०२॥ ईश्वर हाच संत असतो तर संत साक्षात त्या परमेश्वराचेच रूप असतात. सर्व लोक मला मी गजानन स्वामींचा शिष्य आहे असे म्हणतात.॥१०३॥ खरे तर माझे असे काहीच महत्व नाही. हे अवघें सामर्थ्य तर तुझ्याच ठायीं आहे. या जगीं फुलांमुळेच दोऱ्याचे महत्त्व असते.॥१०४॥ तें फुल तूच आहेस मी केवळ दोरा आहे. तू कस्तुरी तर माझी योग्यता मातीइतकीच आहे, हे सत्य आहे. हें संकटही तुझ्यामुळेंच माझ्यावर आलेले आहे.॥१०५॥ तेव्हां आता माझा अंत पाहू नकोस रें, गुरुराया ! (या तुझ्या भक्तासाठी) धावत ये आणि या वठलेल्या वृक्षास कोवळी पालवी (तुझ्या कृपेनें) फुटू दे."॥१०६॥ (आपल्या सद्‌गुरुंची अशी प्रार्थना करून) पितांबर तिथे जमलेल्या सर्व लोकांस म्हणाला, " लोक हो, माझ्या सद्‌गुरुंचा नामगजर करा. हे शेगांवच्या अवलिया, जय जय गजानन साधूवर असा त्यांचा जयजयकार करा."॥१०७॥ तेव्हा सर्व गांवकरी (समर्थांचा) जयजयकार करू लागले. (तो काय आश्चर्य !) त्या वठलेल्या वृक्षास पालवी फुटू लागली. त्या अगाध चमत्कारास सर्व लोक आपल्या डोळ्यांसमक्ष घडत असलेले पाहू लागले.॥१०८॥ काही लोक म्हणू लागले, हे तर कदाचित आपणांस पडलेलें स्वप्न असावें, (खरेच जागें आहोत हे जाणण्यासाठी) तेव्हा आपल्याला हातांनी चिमटा घेऊन पाहू या. ॥१०९॥ आणि चिमटे घेऊन पाहिले असता हे स्वप्न नसून सत्य आहे, हे त्यांना उमगले. तेव्हा ही नक्कीच नजरबंदी असावी, असे काही जण बोलू लागलें.॥११०॥ गारुड्यांच्या खेळांत कशी वाद्येंच सर्पाप्रमाणे भासतात आणि कश्या मातीच्या खापऱ्या (नजरबंदीमुळे) आपल्या दृष्टीस रुपयांप्रमाणे दिसू लागतात, नाही का ?॥१११॥ परंतु जेव्हा त्या पानांस तोडून पहिले असतां त्या फांदीतून पांढराशुभ्र चीक बाहेर येऊ लागला, तेव्हा हा भ्रम नव्हें, याची (सर्व गांवकऱ्यांस) जाणीव झाली.॥११२॥ अशा रितीने वाळलेल्या वृक्षास पालवी फुटली, अशी तिथे जमलेल्या सर्वांची खात्री झाली. ' श्री गजानन माऊली हे खरोखर महासंत आहेत,'  हे निःसंशय ! (असे ते सर्वजण म्हणू लागले.)॥११३॥ आता मात्र या पितांबराविषयीं मनांत काहीच संशय घेऊ नये, हा श्री गजानन महाराजांचा शिष्य आहे हेच सत्य आहे. ह्याला आता आपण गावांत घेऊन जाऊ या.॥११४॥ ज्याप्रमाणे गाय आपल्या वासरासाठी धावत येते, त्याप्रमाणेच आपल्या ह्या भक्ताच्या निमित्ताने का होईना कधी तरी श्री गजानन महाराजांचे कोंडोलीस आगमन होईल.॥११५॥ असा सर्व गावकऱ्यांनी विचार केला आणि पितांबरास मोठ्या थाटामाटांत गावांत नेले. अशा प्रकारे दिव्य चमत्कार झाल्यावर सर्वच लोकांचा भाव दृढ झाला.॥११६॥ श्री (रामदास स्वामी) समर्थांनीही अशाच प्रकारें आपला कल्याण नामक शिष्य जगत्कल्याणासाठीच डोमगांवीं पाठवला होता.॥११७॥ श्री गजानन स्वामींनीही जणू तशीच कृपा केली, त्यामुळे आपल्या या कोंडोली गावाचे भाग्य फळफळलें हे मात्र खरें !॥११८॥ श्रोतेहो, ते आंब्याचे झाड अजूनही (श्री गजानन कृपेची साक्ष देत) कोंडोलीत आहे. इतर वृक्षांच्या तुलनेत ह्या आम्रवृक्षाला फळेही भरपूर येतात.॥११९॥ कोंडोलीच्या ग्रामस्थांचीही पितांबरावर दृढ श्रद्धा जडली. अर्थात, हिरकणी कुठल्याही स्थानीं असली तरी मौल्यवानच असते.॥१२०॥ लवकरच, पितांबराचा मठ त्या कोंडोलीत झाला आणि त्याच्या अंतिम क्षणांपर्यंत तो तिथेच कार्यरत राहिला.॥१२१॥ आतां इकडे शेगांवांत एके दिवशी महाराज आपल्या मठांत उदास होऊन बसले.॥१२२॥ त्यांचे सर्व शिष्य हात जोडून त्यांना प्रार्थना करू लागले, " महाराज आज आपण चिंताग्रस्त का दिसत आहात ?॥१२३॥ तेव्हा, महाराज गंभीर स्वरांत तिथे जमलेल्या लोकांना म्हणाले, " आमचा लाडका भक्त कृष्णा पाटील, जो आम्हांला दररोज चिकण-सुपारी आणून देत असे, तो आता वैकुंठवासी झाला. त्याची आम्हांला आज आठवण झाली. त्याचा मुलगा राम तर अजून लहान आहे, मग ये ठायीं आता आम्हांला चिकण-सुपारी कोण आणून देणार ?॥१२४-१२५॥ राम मोठा झाल्यावर माझी सेवा करीलच, पण तोपर्यंत मी काही या मठांत राहायला तयार नाही."॥१२६॥ असे महाराज बोलताच, सर्वांनाच चिंता वाटू लागली. महाराजांचा आता येथून जाण्याचा विचार दिसत आहे. तेंव्हा, आपण काहीही करून त्यांचे मन वळविले पाहिजे. चला, आपण सर्वजण मिळून महाराजांचे चरण धरून प्रार्थना करू.॥१२७-१२८॥ असा सर्वानुमते विचार करून सर्व मंडळी मठांत आली. श्रीपतराव, बंकटलाला, ताराचंद, मारुती या सर्व भक्तमंडळींनी महाराजांचे पाय धरले, आणि महाराजांना विनवणी करत म्हणाले, " महाराज, आम्हांला सोडून तुम्ही अन्यत्र कोठेही राहू नये. कृपा करून या मठाचा तुम्ही त्याग करू नका."॥१२९-१३०॥ या शेगांवांत तुमची जिथे इच्छा असेल, तिथे राहा. मात्र हे गांव सोडण्याचे मनांत आणू नका."॥१३१॥ तो महाराज गर्जून म्हणाले, " तुमच्या या गावांत दुफळी आहे. त्यामुळें, मला इथे राहण्यासाठी कोणाचीच जागा नको.॥१३२॥ तेव्हा, कोणाच्याच मालकीची नसेल अशी जागा मला तुम्ही दिल्यासच, मी या शेगांवीं राहीन."॥१३३॥ महाराजांचे हे वचन ऐकून अवघी मंडळी चिंताग्रस्त झाली आणि ही मागणी करून समर्थांनी आपल्याला मोठ्याच पेंचात टाकले असे ते सर्व विचार करू लागले.॥१३४॥ महाराज तर आपल्यापैकी कोणाच्याही जागेंत राहाण्यास तयार नाहीत, आणि हे सरकार समर्थांसाठी जागा देईल, याची खात्री वाटत नाही.॥१३५॥ आपल्या महाराजांची योग्यता, महती हे सरकार मुळीच जाणत नाही. शेवटीं, बंकटलाल विनयतेनें बोलता झाला, " महाराज, अशा संकटात आम्हांला घालू नका. हे परक्याचे राज्य आहे. त्यामुळें, सरकार धार्मिक कार्यासाठी जागा उपलब्ध करून देईल, याची काही शक्यता वाटत नाही.॥१३६-१३७॥ तेंव्हा, आमच्यापैकी कुणाच्याही जागेची तुम्ही मागणी करा. आम्हां सर्वांचीच आपल्याला आनंदाने जागा देण्याची तयारी आहे."॥१३८॥ त्यावर महाराज बोलले, " काय हे तुमचे अज्ञान ! या सर्व जमिनींची मालकी खरें तर पूर्णतः त्या सच्चिदानंदाची आहे.॥१३९॥ या भूमीवर असे कित्येक राजे आले आणि गेले. तेव्हा, ही सर्व जागा निश्चितच सरकारी नाही. या सर्व जमिनींचा खरा मालक तो पांडुरंगच आहे.॥१४०॥ आतां, व्यावहारिकदृष्ट्या मालकपण राजास प्राप्त होते खरें ! पण ते महत्वाचे नाही. तुम्ही प्रयत्न करून पाहा.॥१४१॥ प्रयत्न केल्यास जागा अवश्य मिळेल. आता काही बोलू नका. हरी पाटलाच्या हाताला यश येईल, याविषयीं काहीही शंका मनांत बाळगू नका."॥१४२॥ मग ती सर्व मंडळी हरी पाटलाकडे आली आणि त्याच्याशी विचार-विनिमय करून महाराजांच्या मठाच्या जागेसाठी अर्ज दिला.॥१४३॥ बुलढाणा जिल्ह्याचा एक करी नामक सर्वाधिकारी होता. त्याने अर्जाची योग्य तपासणी करून समर्थांच्या मठासाठी एक एकर जागा मंजूर केली.॥१४४॥ आणि म्हणाला, " मंडळी, तुम्ही दोन एकर जागेसाठी अर्ज केला आहे खरा, पण मी सध्या तुम्हांला एक एकर जागा देत आहे.॥१४५॥ तुम्ही ती जागा एका वर्षांत व्यवस्थित विकसित केल्यास मी आणखी एक एकर जागा तुमच्या मठासाठी मंजूर करीन. जेणेंकरून तुमची ही दोन एकर जागेची मागणी मान्य होईल."॥१४६॥ या सरकारी ठरावाची अजूनही दप्तरीं नोंद आहे. समर्थांच्या वाणीचा प्रभाव खचितच लोकोत्तर आहे, हे निःसंशय !॥१४७॥ मग हरी पाटील, बंकटलाल आदि भक्तमंडळींनी वर्गणी गोळा करण्याचे कार्य सुरु केले. (समर्थांवर सर्वांचीच श्रद्धा असल्यामुळें) बराच द्रव्यनिधी थोड्या कालावधीत जमला आणि मठाचे काम सुरु झाले.॥१४८॥ यापुढील सर्व वृत्त इत्थंभूतपणे पुढच्या अध्यायांत कथन होईल. सत्पुरुषाची मनोकामना पूर्ण करण्यासाठी परमेश्वर सदैव तत्पर असतो, हेच खरें !॥१४९॥ डोंगरगांवचा विठू पाटील, वाडेगांव येथील लक्ष्मण पाटील आणि शेगांवचे रहिवासी जगु आबा आदि मंडळींनी वर्गणी गोळा करण्यात पुढाकार घेतला.॥१५०॥ श्रोतें हो, हा श्रीदासगणूविरचित श्री गजाननविजय नामें ग्रंथ तुम्ही सावध चित्त होऊन ऐका. त्यामुळें तुमचे निश्चितच निजकल्याण होईल. ॥१५१॥ 
॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति द्वादशोध्यायः समाप्तः ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥