May 4, 2022

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार - गोकर्णक्षेत्रवर्णन


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्रीसद्‌गुरुवे नमः ॥

अथ श्रीसप्तशतीगुरुचरित्रसार षष्ठोऽध्यायः

होता नरपती एक । मित्रसह तत्सेवक । श्राद्धीं नृमांस दे ठक । वसिष्ठादिक ऋषींसी ॥१॥ ऋषी रुसे देयी शाप । ब्रह्मराक्षस हो भूप । विप्रा मारी तत्स्त्री शाप । दे स्त्रीसंपर्के मरसी ॥२॥ तो भूप बारा साल । जातां प्राग्वत् हो विमल । सांगे राणीसी सकल । शापबोल ब्राह्मणीचा ॥३॥ दुःखें मरुं इच्छी राणी । राजा तिला सांवरोनी । केलें पाप सांगोनी । तारा म्हणूनी प्रार्थी विप्रा ॥४॥ मनस्येकं वचस्येकं । असा नोहे हा सेवक । हें जाणोनी द्विज लोक । सांगे सम्यक् तीर्थयात्रा ॥५॥ ब्रह्महत्या न जाय ती । मग भूपा वाटे भीति । मिथिलापुरीं महामती । सांगे खंती गौतमाते ॥६॥ मुनीं तया आश्वासून । सांगे क्षेत्र गोकर्ण । तेथें दोष निवारुन । तूं पावन होशील बा ॥७॥ ऐक थोडेसें आख्यान । म्यां देखिलें तें सांगेन । शिवदूत येती धांवून । चंडाळी मरतां एक ॥८॥ हर्ष पाहतां हो तयां । म्यां पुसतां, करुनी दया । ते सांगती मातें राया । विप्रजाया प्राग्जन्मीं हे ॥९॥ ही बालविधवा झाली । जारकर्मी रमली । स्वजनांनीं सोडिली । व्यक्त झाली वैश्यकांता ॥१०॥ असभ्य संगें दुष्ट । जारकर्में झाली भ्रष्ट । मद्यमांसें झाली पुष्ट । नेणे कष्ट पुढील ती ॥११॥ मत्ता ते मेष म्हणून । गोवत्सा खायी मारुन । दुजे दिनी शिर पाहून । शिव म्हणून छपवी तें ॥१२॥ असी नांदता ती मेली । गोवधें हो चंडाळी । अविचारें हो आंधळी । व्रणें झाली जारकर्में ॥१३॥ असी तोकपणें झाली । मायबापें रक्षियेली । लवकर तेही मेले । पोरी झाली निराश्रय ॥१४॥ ती जन संयोगेशीं । आली गोकर्णक्षेत्रासी । वस्त्रहीन उपवासी । व्रतदिवशीं मागे अन्न ॥१५॥ ती याचावया कर । पुढें करी, कोणी नर । करीं टाकी बिल्वपत्र । टाकी दूर हुंगोनी ती ॥१६॥ पडे दिष्टें लिंगावर । तेणें तुष्टे गौरीवर । करी इला भवपार । धाडी शीघ्र आम्हां येथें ॥१७॥ पुनर्न जन्मेल ही । म्हणोनियां नेली त्यांहीं । गौतम म्हणे तूंही । नृपा पाहीं गोकर्णातें ॥१८॥ नृप चमत्कार मानून । जातांची हो पांवन । तेथ साक्षाच्छिव जाण । म्हणोन ये श्रीपाद ॥१९॥
॥ इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्यश्रीमद्वासुदेवानंदसरस्वतिविरचिते सप्तशतीगुरुचरित्रसारे गोकर्णक्षेत्रवर्णनं नाम सप्तमोऽध्यायः ॥

सूर्यवंशांत (इक्ष्वाकु) एक मित्रसह नांवाचा राजा होता. एकदा तो अरण्यांत मृगयेसाठी गेला असतां त्याने एका राक्षसाचा वध केला. त्या मृत राक्षसाच्या भावाने राजाचा सूड घेण्याचा निश्चय केला. वैमनस्य हेतूने त्याने मनुष्यरूप धारण केले आणि मित्रसह राजाचा सेवक होऊन त्याची मर्जी संपादन केली. एकदां श्राद्धतिथीसाठी मित्रसह राजाने वसिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनाचे आमंत्रण दिले होते. तेव्हा, भोजनसमयीं त्या राक्षसाच्या भावाने कपटाने वसिष्ठादि ऋषीश्वरांच्या पानांत नरमांस वाढले. ते पाहतांच वसिष्ठ मुनी अतिशय क्रोधित झाले आणि तत्काळ त्यांनी " हे राजन, तू आज श्राद्धदिनीं ब्राह्मणांना भोजन म्हणून नरमांस वाढलें, या तुझ्या दुष्कृत्यासाठी तू ब्रह्मराक्षस होशील." असा राजाला शाप दिला. आपला काही दोष नसतांना वसिष्ठ ऋषींनी नाहक आपणांस शाप दिला याचा मित्रसह राजाला राग आला व तोही हातांत उदक घेऊन वसिष्ठ मुनींना शाप देणार, तोच त्या राजाची पतिव्रता पत्नी, मदयंती प्रार्थनापूर्वक म्हणाली, " स्वामी, गुरूंना शाप देण्यासारखे महापाप नाही, आपण त्यांना शरण जाऊन उद्धाराचे वरदान मागावे." आपल्या राणीचे हे वचन ऐकून राजाने तें शापोदक आपल्याच पायांवर टाकले. त्यायोगें, त्याचे पाय काळे पडले अन त्यास कल्माषपाद हे नांव प्राप्त झालें. त्या उभयतांनी वसिष्ठ मुनींची क्षमायाचना मागितली. वसिष्ठ ऋषींनीदेखील अंतर्ज्ञानाने सर्व प्रकार जाणला. तेव्हा उ:शाप देत ते म्हणाले, " हे राजन, तू बारा वर्षे ब्रह्मराक्षस होऊन हा शाप भोगशील अन त्यानंतर पूर्ववत राजा होशील." शापग्रस्त राजा ब्रह्मराक्षस होऊन अरण्यांत राहू लागला. एके दिवशी अत्यंत क्षुधाग्रस्त होऊन अन्न शोधार्थ निघालेल्या त्या ब्रह्मराक्षसाने अरण्यातून मार्गक्रमण करणाऱ्या एका ब्राह्मण दाम्पत्यास पहिले. त्या ब्राह्मणास त्याने धरले असता ती विप्रपत्नी अत्यंत काकुळतीने आपल्या पतीस सोडून देण्याची विनवणी करू लागली. मात्र राक्षसाने तिचे काही एक न ऐकता त्या ब्राह्मणास मारून खाऊन टाकले. त्या वेळी आपल्या मृत पतीच्या अस्थी गोळा करतांना ती पतिव्रता म्हणाली, " हे राजा, शाप भोगल्यानंतर जेव्हा तू पुनश्च राजा होशील, तेव्हां तुझ्या स्त्रीशी समागम करतांच तुझा अंत होईल! " पुढें, बारा वर्षांनंतर वसिष्ठ ऋषींनी दिलेल्या उ:शापामुळे तो मित्रसह राजा शापमुक्त झाला आणि आपल्या नगरी परतला. तो पूर्ववत राज्यकारभार पाहूं लागला. त्याने आपल्या पत्नीला, राणी मदयंतीस आपल्या हातून घडलेली ब्रह्महत्या, अन त्यांमुळे त्या ब्राह्मण स्त्रीने दिलेला शाप यांविषयी सर्व सांगितले. ते ऐकून राजपत्नी अत्यंत दुःखी स्वरांत म्हणाली, " नाथा, हेच आपले प्रारब्ध असेल तर आता प्राण देण्याशिवाय गत्यंतर नाही." तेव्हा, मित्रसह राजाने तिची समजूत काढली. पुढें, राजाने वेदज्ञानी अशा विप्रवर्गांस बोलावले आणि आपल्या हातून घडल्या ब्रह्महत्येच्या पातकाचे परिमार्जन करण्याविषयीं शास्त्रमार्ग सांगावा अशी प्रार्थना केली. अत्यंत धर्मविवेकी, सदाचारसंपन्न आणि पश्चात्तापग्रस्त त्या मित्रसह राजाचे ते वचन ऐकून ब्रह्मवृंदाने राजा मित्रसहास ब्रह्महत्येच्या परिमार्जनासाठी समस्त तीर्थयात्रा करून पावन होण्याचा सल्ला दिला. ते ऐकून तो राजा आपल्या पत्नीसह अत्यंत भक्तिभावाने अन निष्ठापूर्वक तीर्थयात्रा करू लागला. मात्र, विविध तीर्थक्षेत्रीं अनेक शात्रोक्त विधी आणि पुण्यकर्मे करूनदेखील त्याचा ब्रह्महत्येचा दोष गेला नाही. तेव्हा, ते उभयंता पती-पत्नी चिंताग्रस्त आणि भयभीत झाले. अनेक पुण्यक्षेत्रांना भेटी देत देत राजा मित्रसह आणि राणी मदयंती मिथिला नगरीत पोहोचले. तिथे त्यांची भेट स्वेच्छेने भूमीपर्यटन करणाऱ्या गौतम ऋषींबरोबर झाली. महर्षी गौतमांना आदरपूर्वक नमन करून त्या पतीपत्नींनी त्यांचे पूजन केले. तसेच, आपले दुःखही त्यांना निवेदन केले. सर्व वृत्तांत ऐकल्यावर गौतम ऋषींनी राजाच्या मस्तकी अभयहस्त ठेवला आणि आश्वासक स्वरांत म्हणाले," राजा, पापांच्या अगणित राशी स्नान-दर्शन-पूजनमात्रें जाळून टाकणारे आणि समस्त भाविकांच्या इष्ट मनोकामना कल्पवृक्षाप्रमाणे पूर्ण करणारे गोकर्णासारखे क्षेत्र या भूतलावर असतांना, तू ब्रह्महत्येचे किंचितही भय बाळगू नकोस. प्रत्यक्ष कैलासासम असलेल्या या शिवक्षेत्री तुझ्या सर्व दोषांचे पूर्णतः निवारण होईल. लवकरच तू पापमुक्त होशील." " राजा, गोकर्ण क्षेत्री मी प्रत्यक्ष पाहिलेली एक घटना तुला कथन करतो. एकदा मी भ्रमण करीत करीत त्या गोकर्ण क्षेत्रांत आलो. तेव्हा, तिथे अत्यंत विपन्नावस्थेत असलेली एक चांडाळीण मृत झाली. तेव्हा, तिला कैलासधामी घेऊन जाण्यासाठी शिवदूत विमान घेऊन आले. मी आश्चर्यचकित होऊन त्यांना ' ह्या महापातकी स्त्रीला शिवलोकप्राप्ती कशी झाली ?' हे विचारले. त्यांवर, ते शिवदूत मृदु वाणींत म्हणाले, " मुनीवर्य, या स्त्रीचा अवघा वृत्तांत ऐका. पूर्वजन्मी ही एक लावण्यवती ब्राह्मणकन्या होती. प्रारब्धवशांत, ती बालपणीच विधवा झाली. एकदां तिने जारकर्म केले. तिच्या आप्त-स्वकीयांना हे दुष्कृत्य समजल्यावर त्यांनी तिला घराबाहेर काढले. मात्र, कामविकाराने विवेकशून्य होऊन ती एका वैश्य तरुणाची कुलस्त्री बनून राहू लागली. अशी ती दुराचरणी, पापिणी त्या वाण्याबरोबर रममाण झाली आणि अनेक पापकर्मे करू लागली. ती उन्मत्तपणे नित्य मद्य प्राशन करून मांसाहार भक्षण करीत असे. अशा अनेक धर्मबाह्य आणि व्यभिचारी वर्तनांचे भविष्यांत अतीव कष्टदायक फळ मिळेल, यांविषयी ती पूर्णतः अनाभिज्ञ होती. एकदां मद्यधुंद अवस्थेत तिने बकरा समजून गाईचे वासरूच मारले आणि शिजवून खाल्ले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते वासराचे डोके पाहून ती घाबरली आणि " शिव-शिव हे माझ्या हातून काय कुकर्म घडले ?" असे म्हणत तिने वाण्याच्या भीतीने ते वासराचे शिर जमिनीत पुरून टाकले. अशी असंख्य, अनुचित दुष्कृत्ये करून काही कालांतराने ती मरण पावली. त्यानंतर दारुण अशा नरकांत आपल्या पातकांमुळे तिने अपरिमित दुःख भोगले. पुढें, गोवधाचे पाप यांमुळे ती चांडाळाच्या घरी जन्मास आली. अविचारी कृत्यें आणि गाईचे वासरूं मारल्याने ती जन्मतः अंध होती. जारकर्माचे फलस्वरूप म्हणून तिच्या सर्वांगावर व्रण होते." " पूर्वजन्मी केलेल्या पापांमुळे अशी विद्रूप, बाल्यावस्था तिला प्राप्त झाली. तिच्या माता-पित्यांनी तिचा कसाबसा सांभाळ केला. मात्र तेही लवकरच मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूनंतर ती सर्वथा निराश्रित झाली आणि अत्यंत दुःख-कष्टांत कशीबशी जगू लागली. पूर्वजन्माचेच हे भोग होते. दैवयोगाने, ती काही यात्रेकरूंच्या बरोबर माघ महिन्यात गोकर्ण क्षेत्रीं आली. अंग झाकायलादेखील तिच्याजवळ काही वस्त्र नव्हते. भुकेने ती अतिशय व्याकुळ झाली होती. महाशिवरात्रीच्या व्रतदिनी, ती येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना खायला अन्न मागू लागली. भिक्षा मागण्यासाठी तिने एका भक्तापुढे हात पसरला असता त्या व्रतस्थ भाविकाने तिच्या हातावर बिल्वपत्र ठेवले. त्या अंध चांडाळणीने ते बिल्वपत्र हुंगले आणि ते खाण्यायोग्य नाही असे जाणून दूर फेकून दिले. तेच बिल्वपत्र शिवलिंगावर जाऊन पडले. त्या अजाणता घडलेल्या शिवपूजनाने भोळा सांब-सदाशिव प्रसन्न झाला. तसेच, दिवसभर ऐकलेले शिवकीर्तन, उपोषण, जागरण यांमुळे हे शिवरात्रीचे व्रत तिच्याकडून यथासांग पार पडले. त्याचे फलस्वरूप म्हणून तिच्या उर्वरित सर्व पातकांचे क्षालन झाले. महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वणी दिनीं या जागृत आणि पुण्यक्षेत्रीं हिला मृत्यू आला. यास्तव, तिला सहजच सद्‌गती प्राप्त झाली. त्यामुळे करुणासागर गौरीपती-महादेवांनी आम्हांला या स्त्रीला त्वरित कैलासावर घेऊन येण्याची आज्ञा केली आहे. जन्म-मृत्यूच्या बंधनातून ही पूर्णपणे मुक्त झाली आहे." असा वृत्तांत कथन करून त्या शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या देहावर अमृत शिंपडले. तेव्हा तात्काळ तिचा देह दिव्य अन तेजस्वी झाला. पुढें, ते शिवदूत तिला विमानात बसवून शिवलोकी घेऊन गेले.
गोकर्ण क्षेत्राचे हे माहात्म्य सांगून गौतम ऋषी म्हणाले, " हे राजा, तूदेखील त्या अतिपवित्र गोकर्णक्षेत्री त्वरित जा. तिथे जाताच तुझी सर्व पातके अवश्य नष्ट होतील आणि पार्वतीपती शंकरांच्या आशीर्वादाने इह-पर सौख्य तुला प्राप्त होईल." गौतम ऋषींनी दिलेल्या अभयवचनांवर पूर्ण विश्वास ठेवून मित्रसह राजा राणी मदयंतीसह सत्वर श्रीक्षेत्र गोकर्ण येथे गेला आणि पापमुक्त झाला. सिद्धमुनी वदले - या परम पवित्र पुण्यक्षेत्री प्रत्यक्ष देवाधिदेव महादेव सदैव वास करतात. केवळ याचसाठी हे नामधारका, अर्थात आपल्या भक्तांची या जन्म-मृत्यूच्या संसृतीचक्रातून मुक्तता करून त्यांना सायुज्यधाम प्राप्ती करून देण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ या स्थानी येऊन राहिले.

॥ प. प. श्रीद्वासुदेवानंदसरस्वतीमहाराजाय नमः
॥  श्रीपादराजं  शरणं  प्रपद्ये  ॥
॥ श्रीगुरूदत्तात्रेयार्पणमस्तु ॥
॥ श्रीगुरुदेवदत्त ॥ 

Apr 28, 2022

॥ जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था ॥


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था । आरती ओवाळू चरणी ठेवूनिया माथा ॥धृ.॥ छेली-खेडेग्रामीं तू अवतरलासी । जगदुद्धारासाठी, राया तू फिरसी । भक्तवत्सल खरा, तू एक होसी । म्हणूनी शरण आलो, तुझिया चरणांसी ॥१॥ त्रैगुणपरब्रह्म तुझा अवतार । याची काय वर्णू लीला पामर । शेषादिक शिणले, नलगे त्या पार । तेथे जडमूढ कैसा करु विस्तार ॥२॥  देवाधिदेव तू स्वामीराया । निर्जर मुनिजन ध्याती, भावे तव पाया । तुजसि अर्पण केली आपली ही काया । शरणागता तारी तू स्वामीराया ॥३॥ अघटित लीला करुनी जडमूढ उध्दरीले । कीर्ती ऐकुनी कानी चरणी मी लोळे । चरणप्रसाद मोठा, मज हे अनुभवले । तुझ्या सूता न लगे, चरणावेगळे ॥४॥
 ॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

 



श्री स्वामी समर्थ मंत्रराज आणि प्रार्थना


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥
॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

मंत्रराज
प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतीचे । जे रुप श्रीपाद श्रीवल्लभाचे । अवधूत मूर्ती अवतार झाला । नमो सद्‌गुरु दत्त स्वामीपदांला ॥१॥  महाशक्ती जेथे उभ्या ठाकताती । जिथे सर्व सिद्धी, पदी लोळताती । असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ । परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त ॥२॥  प्रत्यक्ष घ्या रे गड्या अनुभवास । विश्वास तेथेची स्वामी निवास “स्वामी समर्थ” अशी मंत्र शक्ती । श्वासातही वास देई प्रचीती ॥३।। साक्षात् परब्रह्म परमात्मतेज । अवतार नामातला मंत्रराज । या कल्पवृक्षाचि सोडोनि छाया । नको भटकु रे साधका अन्य ठाया ॥४॥ पवित्र प्रेमाचे पारिजात फूल । एकदा फुलेल हे अन्तरात । देवपूजेसाठी तयाला ठेवावे । कधीही न हुंगावे वासनेने ॥५॥  सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा । उपेक्षू नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेचि आता ॥६॥ प्रार्थना 
दीनदयाळा श्रीगुरुराया अर्जी ही ऐका । जोडूनि कर हे विनवितसें तुज न मागे पैका ॥धृ.॥ आत्मस्वरूपी ध्यान निरंतर हें द्यावें मजला । प्रेमानंदे करून खरा हा देह अर्पिला तुजला ॥१॥  विश्वारंगी रंग खरा हा एकचि मजला भासो । सदया सदय हृदय निरंतर तुजला बा असो ॥२॥ देहा-देहीं देह विराला मग जीवा पार पाहे । आत्मस्वरूपीं रूप निरंतर रंगुनियां राहे ॥३॥ अनंतभुवनीं भरा भरली अवधी तव सत्ता । नाम वाणिनें घेतां जगिं हे हरली भवव्यथा ॥४॥ आनंदानें अर्जी केली घ्या पायापाशीं । नाम तुझें बा खरें बळें हें तारी जगतासी ॥५॥ 

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥


Apr 26, 2022

श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्रं


॥ श्री गणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवताभ्यो नमः ॥ श्री इष्टदेवताभ्यो नमः ॥ श्री ग्रामदेवताभ्यो नमः ॥ श्री स्थानदेवताभ्यो नमः ॥ श्री सर्वदेवदेवताभ्यो नमः ॥ श्री नवग्रहदेवताभ्यो नमः ॥ श्री मातापितृभ्यां नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ श्री अक्कलकोट स्वामी राजाय नमः ॥ सर्व गुणांचा नायक । बुद्धीज्ञानाचा दायक । अखिल विघ्नांचा हारक । गजानना मी नमितसे ॥१॥ नमन माझें मयुरेश्वरी । विद्यादेवी वागेश्वरी । ग्रंथ लिहावया मजवरी । कृपा करी जगदंबे ॥२॥ श्री गुरुदत्ता वंदीतसे । त्रिगुणाचा अवतार असे । कलियुगी जो नांदतसे । प्रगटरूप होऊनी ॥३॥ स्वामी दत्ताचा अवतार । सर्व भाविका आधार । करितो वंदन साभार । कृपा प्रसाद मिळावया ॥४॥ भिन्न विषयांचे भिन्न गुरू । त्यांच्या ठिकाणी धरुनी आदरू । वंदुनी तया मागतो वरू । कार्यसिद्धी व्हावया ॥५॥ मी तो आहे मतिहीन । परि इच्छा गावया तव गुण । तुझ्या नांवें स्तोत्र करून । सेवा करावी आपुली ॥६॥ नाहीं वाचन नाहीं लिखाण । नाहीं ज्ञान नाहीं घ्यान । कोणतें करू आकर्षण । तव प्रीति मिळावया ॥७॥ कामादि षड्रिपू छळिती । मायेनें गात्रें गळती । मनींचे मांडे मनीं राहती । निराशा ती चहूंकडे ॥८॥ मन चंचल वाऱ्यापरी । स्थिर होत नाहीं ध्यानावरी । तव कृपा नच हो जरी । व्यर्थ आयुष्य जाईल हें ॥९॥ संसारि सुख व्हावे म्हणुनी । अहोरात्र कष्टा करूनी । दुःख होतें शतगुणी । धन दौलत येतां परी ॥१०॥ नकळत आयुष्य चाललें । इंद्रियावरी ताबा न चले । किती एक निश्चयो ढळले । काय करावे न कळे ॥११॥ संसार यातना कठीण । कनक कांता मोह दारुण । किती पापें घडती हातून । स्मरतां भिती वाटतसे ॥१२॥ माझें माझें करितों निशिदिनी । परी विचारित नाहीं कोणी । सुखाचे असती सर्वधनी । व्यवहार हा जगींचा ॥१३॥ ज्ञानाच्या गोष्टी सांगती । आचारीं ज्या कधी न येती । मृगजळापरी सर्व भासती । तृप्ती कधी न होतसे ॥१४॥ स्वानुभवावाचून बोलती । उपदेशामृता पाजिती । परी भाव तो नाहीं चित्तीं । बोल तें फोल होतसे ॥१५॥ गर्वोक्तीने बोलतसे । सर्वांना तुच्छ मानीतसे । शहाणा काय तो मीच असे । मनीं ऐसे समजतो ॥१६॥ पुस्तकी ज्ञान वाचिलें । ज्ञानवंती सांगितलें । परी हृदयीं ठसावलें । काय करू महाराजा ॥१७॥ नियम केले बहुतापरी । न होतां यथासांग जरी । फलश्रुति नच ये करी । व्यर्थ कष्ट होत असे ॥१८॥ किती काळ नेत्रा मिटतो । तव मूर्ती ध्यानीं आणितो । परी न खोले अंतःचक्षू तो । उपाय कोणता करू मी ॥१९॥ नामस्मरण करितां जरी । कार्य होते भराभरी । ऐशी भाषा ऐकतो परी । अनुभव कां तो येईना ॥२०॥ वाचतो ऐकतो बहू ते । परी ध्यानीं मुळी न राहते । पाठ्य ते विसरुनी जाते । काय करावे समजेना ॥२१॥ पूर्वार्जित असती भोगाभोग । ते भोगण्यासि हा जन्मयोग । तरावयाचा कधीं ये सुयोग । कोणी कांहीं सांगेना ॥२२॥ पापपुण्याचा हिशोब न कळे । भ्रांत होते मन त्यामुळे । कार्याकार्यी नित्य गोंधळे । प्राणिमात्र या जगीं ॥२३॥ आयुष्य आले संपावया । हा जन्म जाईल की वाया । याची चिंता नित्य हृदया । स्वामी माते वाटतसे ॥२४॥ आतां करितो एक विनंती । गुणावगुणा नाणी चित्तीं । सदय हृदय धरुनी हातीं । हेतु सफल करावा ॥२५॥ अनन्यभावें शरण तुजशी । जागृती स्वप्नीं त्या वाचविशी । त्यांची चिंता नित्य वहासी । हे तो सर्वां ठाऊक ॥२६॥ तूं ही माता तूं ही पिता । पाळिता सर्वां सांभाळितां । सर्व संकटी रक्षणकर्ता । स्वामी अमुचा आहेस तूं ॥२७॥ केलें तें विसरूनि जाई । क्षमा करी मज लवलाही । शरण आलो तुज पाही । भेट द्यावी स्वामी मला ॥२८॥ तुझ्या नांवाची केली नौका । मध्ये बसुनी मारितो हाका । डळमळे तारू वाटे धोका । घे मज स्वामी परतीरा ॥२९॥ मी तो आहे पूर्ण अज्ञानी । परी शरण तुज लागोनी । पाही मज कृपा दृष्टीनी । धन्य होईल स्वामिया ॥३०॥ स्वामी केव्हां कोठे उद्भवले । हे तो कोणा नाही कळले । दत्तावतार मानियले । सर्व थोर विभुतींनी ॥ ३१ ॥ प्रथम दत्त श्रीपाद दुसरे । नृसिंह सरस्वती हे तिसरे । चवथे स्वामी साजरे । चार अवतार पुरुष हे ॥ ३२ ॥ तेजःपुंज कांति दिव्य । गौरवर्ण शरीर भव्य । आजानबाहू महाभाग्य । देहसौष्ठव न वर्णवे ॥३३॥ नासिका सरल कर्ण विशाल । छाती भरघोस गती चपल । कौपीन कधीं नग्न नवल । सर्व भाविका वाटतसे ॥३४॥ शिरोत्तम सुंदर भिवया । नेत्रकमल भरले कृपया । स्फटिक माला शोभे हृदया । कमरशोभा मेखला करी ॥३५॥ कमलैव चरण भासती । कांती पाहनि नेत्र दीपती । वदन शोभा चंद्रापरि ती । रेखीव सर्व स्वरूप तें ॥३६॥ स्वामीच्या त्या लीला बहुत । वर्णितो तेथें किंचित । तेणे वाढे भक्ति मनांत । हेतु साध्य व्हावया ॥३७॥ स्वामीने दृष्टी फिरविता । वांछित आपुले ये हाता । स्वामीतें शरण जाता । दुरित जाती पळोनी ॥३८॥ राव रंका मानी समान । वागवी सर्वां प्रेमें करून । करी भक्त शंका निरसन । न बोलतां क्रिया करोनी ॥३९॥ चोळाप्पा भक्ति शिरोमणी । आणिला स्वामी चिंतामणी । अर्पिता सर्वस्व तच्चरणी । स्वामी प्रकटरूप जाहले ॥४०॥ रहिले स्वामी चोळाप्पा घरीं । लीला केल्या बहतांपरी । घेऊनि परीक्षा परोपरी । सत्पात्र केले तयाते ॥४१॥ मोडी फोडी फेकुन देई । कृष्णवत केली नवलाई । चोळप्पा पत्नी होऊन आई । सांभाळिले ब्रह्मरूप ते ॥४२॥ चोळाप्पाची एकनिष्ठ भक्ति । दिल्या पादुका दिव्य शक्ति । झाली त्यांची सर्वत्र कीर्ति । दर्शनी मुक्तजन झालें ॥४३॥ बाळाप्पा स्वामीभक्त श्रेष्ठ । मानिली स्वामीसेवा इष्ट । सांगतो त्यांची अल्पशी गोष्ट । स्वामी लीला वर्णावया ॥४४॥ संसार सोडिला बाळाप्पाने । स्वानंद मिळाया स्वामी कृपेनें । केली पदयात्रा त्याने । अक्कलकोटी पातला ॥४५॥ अनन्य भावे सेवा केली । तहान भूक हरपली । सर्वस्व देतां विरक्त झाली । बाळाप्पाची वृत्ति पहा ॥४६॥ मारुनी चापटी पाठीवर । केले बाळाप्पा मन स्थिर । करावया भक्ति दृढतर । हंसध्वज चरित्र दाविले ॥४७॥ निर्लज्ज होऊनी सेवा करावी । हिशेब ठेवोनी जपमाळ घ्यावी । गुरु येता जवळी शंका नसावी । स्वामी बोलले बाळाप्पा ॥४८॥ बाळाप्पाची पाहुनी भक्ति । कृतकृत्य केले त्यास जगतीं । वाढली बाळाप्पाची कीर्ति । अक्कलकोटी मठ स्थापितां ॥४९॥ स्वामी सूत मुंबापुरीचे । महान भक्त श्री स्वामींचे । अलौकिक प्रेम हो त्यांचे । वर्णन कसे करूं मी ॥५०॥ हरीभाऊ त्यांचे मूळ नांव । जिल्हा रत्नागिरी इलिया गांव । गांवचे खोत दृढ स्वभाव । लहानपणा पासोनी ॥५१॥ नोकरीवरी संकट आले । स्वामी कृपें दूर झालें । तत्काळ अक्कलकोटी गेले । श्री स्वामीते भेटावया ॥५२॥ हात ठेवितां मस्तकावर । षड्रिपू ते गेले दूर । वैराग्य आले अनिवार । स्वामी कृपाप्रसादें ॥५३॥ दिल्या पादुका स्वामीसुतास । स्थापावया मुंबापुरीस । सोडोनि आपुल्या नोकरीस । लोककल्याणार्थ झटावे ॥५४॥ लुटवली घरदार संपत्ती । बोलावुनी ब्राह्मणाप्रती । धन्य धन्य ती तारका सती । शुभ्र वस्त्र तें नेसली ॥५५॥ घेतली हातात तुंबरी । घेवोनि स्वामी अंतरी । भजन करी निरंतरी । स्वामी अगाध लिलांचे ॥५६॥ दादा बुवा मोर पाखरूं । मस्तकी ठेवोनिया करू । विरक्त केलें देवोनि वरू । अघटित घटना करवली ॥५७॥ आनंदनाथ वालावलचे । मस्तकीं तुकडे डहाळीचे । पडता दर्शन स्वामींचे । अक्कलकोटी जाहले ॥५८॥ दिगंबर होवुनी राहिले । सहा वर्षे तप केले । अनुज्ञा होता निघाले । स्वामी मठ स्थापावया ॥५९॥ झाले स्वामी तया प्रसन्न । आत्मपादुका स्वयंपूर्ण । काढोनि दिल्या मुखांतून । आनंदनाथ धन्य झाला ॥६०॥ तात महाराज तीन वर्षाचें । झाले भक्त बाबुलनाथाचे । तीनवेळा दृष्टांत स्वामीचे । होतां गेले अक्कलकोटीं ॥६१॥ वडाखाली जातां पाहिले । श्रीशंकराने स्वामीस वंदिलें । तत्काळ स्वामीचरणां नमिलें । स्वामी सेवक जाहले ॥६२॥ बाळकृष्ण दादर मठाचे । पूर्ण नास्तीक मूळचे । उपदेश ऐकुनि ताताचे । स्वामींचे भक्त जाहले ॥६३॥ नित्यानंद भजनांत । वैराग्यें झाले सिद्धभक्त । स्वामी चरणीं अनुरक्त । नित्य राहिले बाळकृष्ण ॥६४॥ विष्णुबुवांचा गर्व हरला । स्वप्नीं विंचवाचा मारा केला । शरण येतां मुक्त झाला । खरा मार्ग दाखविला ॥६५॥ ठाकुरदास मुंबईचे । देऊनी भस्म लाकडाचे । कुष्ट गेलें तत्क्षणी त्यांचे । स्वामीभक्त तो जाहला ॥६६॥ दादासाहेब चिंचोरकर । कुष्ठ झालें मांडीवर । बघतां घाबरले फार । गेले शरण स्वामियां ॥६७॥ आंगठी पांढऱ्या खड्याची । घडवलेली सोन्याची । जरी होती बहु मोलाची । फेकून देण्या सांगितलें ॥६८॥ कुष्ट ते गेलें तात्कालिक । पाहूनि स्वामींचे कौतुक । जडली भक्ति अत्यंतिक । संसारी सुखी जाहले ॥६९॥ दामले वकील भक्तश्रेष्ठ । मुळव्याध झाली अनिष्ट । गोमुत्राने केली नष्ट । अक्कलकोटकी स्वामीनें ॥७०॥ अनुज्ञा मागे बंडास । शरण जाऊनी स्वामींस । नकार दिला जाणूनी दुःखास । वासुदेव बळवंताते ॥७१॥ चिंतोपंत आप्पाटोळ । स्वामीतें भजती सर्वकाळ । पूजार्थ देती स्वामी दयाळ । पाटावरी पादुका उमटवूनी ॥७२॥ राधानांवें कसबीण । रूपवती कलावंतीण ।। स्वामी दर्शना लागोन । आली भाग्य तें उदेलें ॥७३ ॥ स्वामीची कांती देखतां । पडे मोह तिच्या चित्ता । मिळावा नर भोक्ता । मनीं इच्छा जाहली ॥७४॥ जों जों स्वामींकडे पाही । कामातूर राधा होई । कटाक्षे इच्छा प्रगटवी । स्वामी कौतुक पाहती ॥७५॥ तिचा तो काम जावयाते । देई स्तना ब्राह्मणाते । बोलले स्वामी तियेतें । राधा आश्चर्य जाहली ॥७६॥ स्तन जातां विरक्त झाली । अनन्यभावें शरण गेली । काशीतें जाऊनी राहिली । स्वामींची सेवा करीत ॥७७॥ श्रीरामानंद बिडकर । हनुमानाचा भक्त थोर ।। विरक्त व्हावया लौकर । श्री स्वामीतें शरण गेले ॥७८॥ स्वामींचा लागतां छंद । बिडकरा जाहला आनंद । केलें भजन होऊनी धुंद । संवत्सर एक तयाने ॥७९॥ करण्या पाद संवाहनाते । बिडकर बैसले रात्रीतें । जानुमध्ये द्वय नागाते । फणा काढतां देखिलें ॥८०॥ निर्भयपणे सेवा केली । स्वामी उठले निद्रा झाली । क्रोधानें थप्पड दिली । जिंदा राक्षस बोलले ॥८१॥ बिडकर बेशुद्ध पडले । शुद्धीवर येतां ज्ञान झाले । प्रखर वैराग्य प्राप्त झाले । तेव्हापासूनि बिडकरा ॥८२॥ बोटे स्वामी चवदा वर्षांचे । प्रीतीपात्र चिदंबराचें । दर्शन घेण्या श्रीस्वामींचें । पायी चालत निघाले ॥८३॥ स्वामींसाठी पेढा घेतला । परी दर्शनी तल्लीन झाला । पेढा विसरातां घेतला । स्वामीने त्याच्या पासोनी ॥८४॥ नृसिंह सरस्वती आळंदीचे । प्रयोग करिती हटयोगाचे । मार्ग न मिळता समाधीचें । गेलें शरण स्वामींया ॥८५॥ लोक अज्ञा चक्र भेदाचा । सांगता योग शास्त्राचा । साधला योग समाधीचा । नृसिंह सरस्वतीतें ॥८६॥ समाधीने सिद्धी मिळाली । शिष्य परंपरा वाढली । कीर्ती सर्वत्र पसरली । साधु साधु म्हणोनी ॥८७॥ रावजी पाटील विठाबाई । स्वामी प्रसन्न पूर्व पुण्याई । अजब केली कारवाई । रामपूर ग्रामांमध्ये ॥८८॥ चाळीस माणसांचा नवस । फेडावया धरूनी उद्देश । स्वामी यावे जेवावयास । हात जोडोनी विनविले ॥८९॥ घातले मंगल स्नानांते । मनोभावे पूजिता श्रीतें । बोलले स्वामी दाम्पत्याते । भोजन सर्वां घालावे ॥९०॥ दाम्पत्य साशंकमनीं झालें । स्वामीनें तत्क्षणी जाणले । सर्वान्न आणाया सुचविलें । रावजी विठाबाईस ॥९१॥ देवी खंडोबादि टाक आणिले । अन्नामाजी ते ठेविले । अन्नपूर्णा पूजन करविले । पंक्ती बसविल्या जेवावया ॥९२॥ चार हजार वृंद जेविला । स्वामींचा जयजयकार झाला । अद्भुत चमत्कार पाहिला । आबाल वृद्ध जनांनी ॥९३॥ पाण्याच्या गुळण्या टाकिल्या । अग्निज्वाळा प्रदीप्त झाल्या । जैशा कां घृत आहुती दिल्या । होम कुंडा माझारी ॥९४॥ आला न्यावया काळपुरुष । बाबा जाधव भक्तास । धरी घट्ट स्वामी चरणास । सेवा पुरी करावया ॥९५॥ यमातें परत पाठविले । वृषभातें नेण्या सांगितले । जाधवातें वाचविले । वृषभ केला मुक्त तो ॥९६॥ इटगीचा रावण्णा वाणी । सर्प दंशे पडला धरणीं । मारिल्या हाका त्रिवार कर्णीं । उठला स्वामी प्रतापे ॥९७॥ श्री गुरुकाका महाराजांनें । नोकरी सोडली स्वामी आज्ञेनें । मठ स्थापिला प्रेमाने । गोवित्री गांवीं जाऊन ॥९८॥ गोवित्री गायत्रीचे स्थान । करावया अनुष्ठान । गायत्री मंत्राचे ज्ञान । लाधलें स्वामी कृपेनें ॥९९॥ लीला तो अगणित असती । परी किंचित दाविल्या स्तोत्रीं । त्या योगें ठसावें चित्तीं । स्वामी तो पूर्णावतार ॥१००॥ अनंत कोटी ब्रह्मांड नायक । न वर्णावे वर्णितां लौकीक । शरण आलो मारितो हाक । मार्ग तो मज दाखवी ॥१०१॥ ध्यानांत आणोनी स्वामीतें । पूजन करा एकाग्र चित्तें । लावोनी धूपदीप नैवेद्याते । आदरें स्वामींस अर्पावे ॥१०२॥ सुप्रभातीं शयन काळीं । स्तोत्र म्हणावे एकांत स्थळीं । येईल प्रेमाची उकळी । आनंदभाव दाटतील ॥१०३॥ भावे वंदुनी प्रार्थना करा । जयजय समर्था स्वामी वरा । कैवारी दीनांचा आसरा । स्वामी राया तूं असे ॥१०४॥ कर्तुमकर्तुं तुझी शक्ति । दुर्गुणाचीही सद्‌गुण मूर्ति । घडविशी तूं सहजगती । हें तो मी जाणतसे ॥१०५॥ कोणा कैसे उद्धरावे । ही तो रीति तुज ठावें । मज विषयी मी काय सांगावें । जाणतोसी तूं सर्व ॥१०६॥ या जगीचें महागूढत्व । उकलूनी दावी मज तत्त्व । किती तळमळती तव । भक्त, कृपा करी महाराजा ॥१०७॥ तूं अससी अक्कलकोटकीं । अज्ञानाच्या सारूनि पुटी । भवसागर परतटाकी । नेण्या समर्थ तूं एक ॥१०८॥ तूंचि मालक तूंचि चालक । भक्तांचा संकट निवारक । दुर्जनांचा संहारक । शरण आलो मी तुला ॥१०९॥ स्वामी समर्था तूंचि एक । दृढावला हाचि विवेक । तूंचि होई मार्गदर्शक । परमार्थ साधावयासी ॥११०॥ प्रतिदिनीं पाठ म्हणावया । स्फूर्ति दिली स्तोत्र करावया । समर्पण हे तव पाया । गोड करूनी ते घ्यावें ॥१११॥ जे जे म्हणतील या स्तोत्रातें । प्रेमें पाळुनी स्वयंमाते । त्यांची इच्छा पुरविण्यातें । स्वामी समर्थ आहेत ॥११२॥ संसारियासी सुख व्हावया । सर्व चिंता नष्ट व्हाया । आरोग्य संतती मिळावया । स्तोत्राधार तो होवो ॥११३॥ विद्यार्थियाला विद्या मिळावी । धनार्थीकडे संपत्ति यावी । मन:कामना पूर्ण व्हावी । स्तोत्र म्हणतां स्वामीराया ॥११४॥ नियमाने जे पाठ करिती । त्यांची चिंता स्वामी वहाती । दृढभाव असावा चित्तीं । मनीं संशय नसावा ॥११५॥ स्तोत्र म्हणतां एकाग्र मनीं । व्हावे नम्र स्वामी चरणीं । मूर्ति दिसेल नयनीं । जागृती स्वप्नीं प्रत्यक्ष ॥११६॥ स्तोत्रे व्हावें सर्वाचे कल्याण । न पडावी कशाची वाण । स्वार्थ परार्थ मिळवून । स्वामी समर्थ देतील ॥११७॥ स्वामींनी स्फूर्ति दिधली । भास्करें कृतिही केली । स्वामी चरणीं ठेविली । अगाध शक्ति स्वामींची ॥११८॥ ॥ इति श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्रं संपूर्ण ॥  ॥ शुभं भवतु ॥ सौजन्य - https://sanskritdocuments.org/


Apr 18, 2022

श्रीधर स्वामी नित्यपाठ


॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

ॐ नमो भगवते श्रीधराय

 

जय जय श्रीगुरुमाऊली । तुझ्या कृपेची जिवा साऊली । तुजविण न कोणी वाली । भवतप्ताया ॥१

तूं नारी नरासी अभेद । सर्वात्मरूप आनंदकंद । तुज भजतां विषयछंद । नासोनि जाये ॥२ जय जय श्रीसद्‌गुरु । भवाब्धीचे तूं सुदृढ तारू । मज या पाववी पैलपारु । अनाथनाथा ॥३ अज्ञाननिशीच्या अंती । निजात्मरूपेची तुझी प्राप्ती । तूं चित्सुखसूर्य दिनराती । प्रकाशसी स्वप्रभे ॥४ ‘मी’ ‘माझे हे दयाळा । नुरवोनि प्रतिपाळी बाळा । उपेक्षा करू नेणसी कृपाळा । शरणागताची ॥५ माझे शरीर, इंद्रिये प्राण । सकळ वासनेसह हें मन । ससर्व कर्म बुद्धि ही जाण । अर्पियली तुज ॥६ तूं शुद्ध, बुद्ध, सच्चिदानंद । निष्कलंक निर्लेप अभेद । स्वरूपबोधे नाशिसी खेद । शरणागताचा ॥७ मज दीना अभय द्यावें । माया निर्मुक्त मज करावे । भवभय घालवूंनि न्यावें । मज निजधामा ॥८ बाधा कसलीहि नसावी । सकळ आपदा नष्ट व्हावी । निर्विघ्नपणेचि गा मज मिळवी । ब्रह्मपदी तुझ्या ॥९ तूं निराकार ब्रह्म निर्गुण । होसी बा ! साकार आणि सगुण । सद्‌गुरुरूपे आले कळून । आम्हा सोडविण्या ॥११ जय जयाजी दीनदयाळा । घालवी संसारसुखाचा हा चाळा । मिळवी निजरूपीं निर्मळा । शिघ्रचि आता ॥११ माया अविद्येहूनि पर । जीवेशी कल्पना विदूर । सृष्टिस्थितिलयादि वेव्हार । तुजमाजी नसे ॥१२ गुरुराया ! तूं आमचे स्वरूप । अरूप सुखसमुद्र अमूप । अद्वय तव चिद्रूपी ऐक्यरूप । आम्ही सर्वदा ॥१३ सदाचारे श्रीगुरुभक्ति युक्त । नित्यपाठ करता होई मुक्त । तेरा ओव्या या श्रीधरोक्त । भवदुःख विनाशिती ॥१४


आदिनारायणं विष्णूं ब्रह्माणं च वसिष्ठकम् । श्रीरामं मारुती वन्दे रामदासं च श्रीधरम् नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे । स्वानंदामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः

॥ श्री श्रीधर स्वामी महाराजार्पणमस्तु