सायंदेव व त्याची पत्नी जाखाई हिने ज्या उत्कट भक्तिभावाने श्री नृसिंह सरस्वती महाराजांची षोडशोपचारे पूजा केली, त्याचे सुरेख वर्णन गुरुचरित्रकारांनी तेराव्या अध्यायांत केले आहे. दत्तभक्तांसाठी ते श्रीगुरुपूजेचे विधान इथे थोडक्यांत देत आहोत. - समस्त शिष्यगण आणि तो उदरव्यथा असलेला ब्राह्मण यांसह श्रीनृसिंहसरस्वती महाराज सायंदेवाच्या घरी भोजनासाठी गेले. तेव्हा त्याने सर्व घर सुशोभित केले होते, सुंदर पंचवर्णी रांगोळ्या काढल्या होत्या. सायंदेव आणि त्याची पत्नी यांनी सर्वांचे योग्य स्वागत केले. श्रीगुरुंना बसण्यासाठी एक अतिशय सुंदर आसन मांडले होते. त्याचप्रमाणे सर्व शिष्यमंडळींसाठीही आसने तयार केली होती. प्रथमतः सायंदेवाने सपत्नीक मंडलार्चन विधी करून श्रीगुरुमहाराजांना पुष्प-गंधाक्षता वाहिल्या. श्रीसद्गुरूंच्या पूजनाचा श्रद्धापूर्वक शास्त्रोक्त संकल्प सोडून त्याने श्रीगुरुचरणांवर मोठ्या भक्तिभावाने मस्तक ठेवले, अनन्यभावें शरणागत होऊन श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार केला आणि श्रीगुरूंचे भवतारक चरण अतीव पूज्यभावानें आपल्या सर्वांगावरून फिरविले. तदनंतर पंचामृतादि स्नान, रुद्रसूक्तासह अभिषेक करून श्रीगुरुचरणांची षोडशोपचारे पूजा केली. त्या चरणतीर्थाचेही त्याने मोठ्या भक्तिभावाने यथासांग पूजन केले. त्यावेळी गीतवाद्यांच्या गजरात नीरांजन ओवाळीत आरती केली. अनेक प्रकारचे स्तुतीपर गायन केले अन त्या श्रद्धावान दाम्पत्याने श्रीगुरुमहाराजांना अनन्यभावें शरणागत होऊन नमन केले. या विशेष श्रीगुरुपूजनानंतर सर्व शिष्यवर्गाचाही योग्य आदरसत्कार करून त्यांचेही यथाविधी पूजन केले. सर्वांना वंदन केले. त्यानंतर नमनभावें सर्वांसाठी भोजनाची पानें मांडली. पानांभोवती सुंदर रांगोळ्या काढलेल्या होत्या, अष्टदल कमल होते. प्रत्यक्ष श्रीगुरुमहाराज भिक्षेला येणार होते, त्यांमुळे त्या मंगल प्रसंगी जाखाईने खास रांधलेलें अनारसें, उडदाचे पदार्थ आणि अष्टविध पक्वान्नें वाढले. त्या भाविक दाम्पत्याचे ते उत्तम असे आदरातिथ्य स्वीकारून श्रीगुरुनाथांनी आपल्या शिष्यांसह प्रीतीपूर्वक भोजन केले. तो पोटशूळ असलेला ब्राह्मणदेखील पोटभर जेवला. श्रीगुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी समूळ नष्ट झाली. असा त्यावेळी मोठा आनंदसोहळा झाला. त्याचा हा भक्तिभाव पाहून श्रीगुरु संतुष्ट होऊन त्याला म्हणाले, " मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तुझ्या वंशात माझे भक्त होतील."
ऐकोनि श्रीगुरुंचे वचन । सायंदेव विप्र करी नमन । माथा ठेवूनि चरणी । न्यासिता झाला पुनःपुन्हा ॥८॥ जय जया जगद्गुरु । त्रयमूर्तींचा अवतारू । अविद्यामाया दिससी नरु । वेदां अगोचर तुझी महिमा ॥९॥ विश्वव्यापक तूंचि होसी । ब्रह्मा-विष्णु-व्योमकेशी । धरिला वेष तूं मानुषी । भक्तजन तारावया ॥१०॥ तुझी महिमा वर्णावयासी । शक्ति कैंची आम्हांसी । मागेन एक आता तुम्हांसी । तें कृपा करणे गुरुमूर्ति ॥११॥
श्रीगुरुंचे हे आशीर्वचन ऐकून सायंदेवाला अत्यानंद झाला. त्याने पुन्हा पुन्हा श्रीगुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांची स्तुती केली. तो म्हणाला, " हे जगदगुरो, तुमचा जयजयकार असो. तुम्ही प्रत्यक्ष त्रयमूर्तींचे अवतार आहात. परंतु आमच्या अज्ञानामुळे तुम्ही आम्हांला मानवरूपांत दिसता. तुमचा महिमा वेदांनाही कळलेला नाही. तुम्हीच विश्वव्यापक असून साक्षात ब्रह्मा-विष्णु व महेश आहात. आपण भक्तजनांना तारण्यासाठीच हा मानववेष धारण केलेला आहे. तुमचे माहात्म्य वर्णन करणे आम्हांस कदापिही शक्य नाही. हे कृपामूर्ती, माझे एक मागणें तुम्ही पूर्ण करावे. - माझे वंशपारंपरी । भक्ति द्यावी निर्धारी । इह सौख्य पुत्रपौत्री । उपरी द्यावी सद्गती ॥१२॥
ऐसी विनंति करुनी । पुनरपि विनवी करुणावचनी । सेवा करितो द्वारयवनी । महाशूरक्रुर असे ॥१३॥ प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी । घात करितो जीवेसी । याचि कारणे आम्हांसी । बोलावीतसे मज आजि ॥१४॥ जातां तया जवळी आपण । निश्चये घेईल माझा प्राण । भेटी जाहली तुमचे चरण । मरण कैचे आपणासी ॥१५॥
अशी प्रार्थना करून सायंदेवाने पुन्हा एकदा श्रीगुरुंची करुणा भाकली. गुरुकृपेचे कवच लाभण्यासाठी परोपरीची विनवणी करत तो म्हणाला," मी येथे ज्या यवन अधिकाऱ्याच्या सेवेत आहे, तो अत्यंत क्रूर आहे. तो यवन दरवर्षी एका विप्राला ठार मारतो, आज मला त्याने केवळ याच कारणासाठी बोलावले आहे. मी तिथे गेलो तर तो माझे प्राण निश्चितच घेईल. पण या भवतारक श्रीगुरुचरणांचे दर्शन झाल्यावर मला असे मरण कदापिही येणार नाही.
संतोषोनि श्रीगुरूमूर्ति । अभयंकर आपुले हाती । विप्रमस्तकी ठेविती । चिंता न करी म्हणोनिया ॥१६॥ भय सांडूनि तुवां जावे । क्रुर यवना भेटावे । संतोषोनि प्रियभावे । पुनरपि पाठवील आम्हांपाशी ॥१७॥ जंववरी तू परतोनि येसी । असो आम्ही भरंवसी । तुवां आलिया संतोषी । जाऊ आम्हीं येथोनि ॥१८॥ निजभक्त आमुचा तू होसी । पारंपर-वंशोवंशी । अखिलाभीष्ट तू पावसी । वाढेल संतति तुझी बहुत ॥१९॥
सायंदेवाचा असा दृढभाव पाहून श्रीगुरुमहाराज प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर आपला अभयहस्त ठेवला आणि त्या भक्तास ग्वाही देत म्हणाले," तू अगदी निर्भय होऊन त्या क्रूर यवनाकडे जा. तो तुझा आदर-सत्कार करून तुला आमच्याकडे परत पाठवील. तू सुखरूप परत येईपर्यंत आम्ही येथेच राहू, हे आमचे अभिवचन आहे. त्यानंतरच आम्ही येथून गमन करू. तू आमचा अत्यंत प्रिय भक्त आहेस. तुझ्या वंशास गुरुभक्तीचे वरदान असेल. तुझे सर्व अभीष्ट कल्याण होईल. तुला उत्तम संततिसुख लाभेल." दत्तभक्तहो, अशी ग्वाही केवळ सद्गुरुच देऊ शकतात, नाही का ?
तुझे वंशपारंपरी । सुखे नांदती पुत्रपौत्री । अखंड लक्ष्मी तयां घरी । निरोगी होती शतायुषी ॥२०॥ स्वयं श्रीदत्तमहाराजांनी वरस्वरूप दिलेले असे अनेक शुभाशिष - श्रीदत्ताशिष - तुझे पूर्वज सायंदेव यास लाभले.
ऐसा वर लाधोन । निघे सायंदेव ब्राह्मण । जेथे होता तो यवन । गेला त्वरित तयाजवळी ॥२१॥ कालांतक यम जैसा । यवन दुष्ट परियेसा । ब्राह्मणाते पाहतां कैसा । ज्वालारूप होता जाहला ॥२२॥ विमुख होऊनि गृहांत । गेला यवन कोपत । विप्र जाहला भयचकित । मनीं श्रीगुरूसी ध्यातसे ॥२३॥ कोप आलिया ओळंबयासी । केवी स्पर्शे अग्नीसी । श्रीगुरूकृपा होय ज्यासी । काय करील क्रुर दुष्ट ॥२४॥ गरुडाचिया पिलीयांसी । सर्प तो कवणेपरी ग्रासी । तैसे तया ब्राह्मणासी । असे कृपा श्रीगुरुची ॥२५॥ कां एखादे सिंहासी । ऐरावत केवीं ग्रासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । कलिकाळाचे भय नाही ॥२६॥
श्रीगुरुकृपेचे असे अमोघ वरदान प्राप्त करून सायंदेव त्या यवनाकडे सत्वर निघाला. यमासारखा भयंकर असा तो यवन राजा अत्यंत दुष्ट होता. सायंदेवाला पाहताच तो क्रोधाने अग्निज्वाळांसारखा लालेलाल झाला. आता कुठल्याही क्षणीं हा आपल्याला मारणार, अशी भीती सायंदेवास वाटली. तोच एक नवल घडलें! तो यवन तिथून तोंड फिरवून घरांत गेला. सायंदेव जरी भयभीत झाला होता, तरी तो श्रीगुरुंचे मनोमन ध्यान करून प्रार्थना करू लागला - वाळवीला कितीही राग आला तरी ती अग्नीस स्पर्शही करू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरुकृपेचे अभेद्य कवच लाभलेल्यास दुष्ट कधीही इजा करू शकत नाही. गरुडाच्या पिल्लांना का कधी सर्प खाऊ शकेल ? किंवा मग ऐरावतासारखा महाकाय हत्ती असला तरी तो सिंहाला कधी खातो का ? तसेच गुरुकृपा ज्यावर होते, त्याला कलिकाळाचेही भय नसते. गुरुमहाराजांचा वरदहस्त ज्याच्या मस्तकी आहे, त्याला अपमृत्यूची भीती बाळगण्याचे कारणच काय? - ज्याचे हृदयीं श्रीगुरुस्मरण । त्यासी कैंचे भय दारुण । काळमृत्यु न बाधे जाण । अपमृत्यु काय करी ॥२७॥ ज्यासि नांही मृत्यूचे भय । त्यासी यवन असे तो काय । श्रीगुरुकृपा ज्यासी होय । यमाचे मुख्य भय नाही ॥२८॥ श्रीगुरुकृपेचा हा असा प्रभाव आहे.
ऐसेपरी तो यवन । अन्तःपुरांत जाऊन । सुषुप्ति केली भ्रमित होऊन । शरीरस्मरण त्यासी नाही ॥२९॥ हृदयज्वाळा होय त्यासी । जागृत होवोनि परियेसी । प्राणांतक व्यथेसी । कष्टतसे तये वेळी ॥३०॥ स्मरण असे नसे कांही । म्हणे शस्त्रे मारितो घाई । छेदन करितो अवेव पाही । विप्र एक आपणासी ॥३१॥ स्मरण जाहले तये वेळी । धांवत गेला ब्राह्मणाजवळी । लोळतसे चरणकमळी । म्हणे स्वामी तूंचि माझा ॥३२॥ येथे पाचारिले कवणी । जावे त्वरित परतोनि । वस्त्रे भूषणे देवोनि । निरोप दे तो तये वेळी ॥३३॥

इकडे तो यवन अधिकारी जो शयनगृहांत गेला तो एखाद्या भ्रमिष्टासारखा अस्वस्थ झाला. त्याला अचानक निद्रा येऊ लागली. काही वेळांतच तो जागा झाला, तेव्हा त्याला हृदयशूळ होऊन प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. आपल्याला काय होत आहे, आपण कुठे आहे हेच त्याला कळेना. त्यावेळी त्याला कशाचेच भान राहिले नाही. एक तेजस्वी विप्र शस्त्रांचे प्रहार करून आपले सर्व अवयव तोडीत आहे, असा त्याला भास होऊ लागला. काही क्षणांतच त्याला देहभान आले आणि एकदम आठवले की त्याने आज सायंदेवाला बोलावले होते व तो बाहेर उभा आहे. हे स्मरण होताच तो यवन आपल्या शयनगृहांतून लगेचच धावत बाहेर आला आणि त्या सायंदेव ब्राह्मणाच्या पायांवर लोळण घेत म्हणाला," तूच माझा स्वामी आहेस. तुला येथे कोणी बोलावले ? आता तू सत्वर परत जा."