Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ९


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय गोविंदबुवा टाकळीकर । एक हरिदास होता थोर । तो कराया कीर्तनगजर । शेगांवासी पातला ॥१॥ तेथें शिवाचें मंदिर । पुरातन होतें साचार । ज्याचा केला जीर्णोद्धार । मोटे नामक सावकारें ॥२॥ म्हणोन मोट्याचें मंदिर । वदूं लागले नारीनर । आतां पुढचा प्रकार । काय झाला तो ऐका ॥३॥ त्या मोट्यांच्या मंदिरीं । उतरले टाकळीकर कथेकरी । त्यांचा घोडा समोरी । बांधिला होता मंदिराच्या ॥४॥ घोडा अतिद्वाड होता । कोणासही मारी लाथा । समोरून कोणी येतां । त्यास चावे कुत्र्यासम ॥५॥ खिंकाळे रात्रंदिवस । वाईट खोड्या बहुवस । आल्या होत्या मुक्कामास । श्रोते तया घोड्याच्या ॥६॥ लोखंडाच्या सांखळ्या । होत्या त्यासी बांधण्या केल्या । त्या या समयीं राहिल्या । टाकळीमाजीं विसरून ॥७॥ चर्‍हाटानें कसा तरी । घोडा मंदिरासामोरी । बांधूनिया कथेकरी । निजले जाऊन शय्येला ॥८॥ ऐशा रात्रसमयास । श्रीगजानन पुण्यपुरुष । घोडा बांधल्या ठायास । येते झालें सहजगतीं ॥९॥ जे जे कोणी द्वाड असती । त्यांना सुधारण्याप्रती । साधुपुरुष अवतार घेती । ईशाज्ञेनें भूमीवर ॥१०॥ असो गजानन घोड्यापासी । आले रात्रसमयासी । जाऊनी निजले अति हर्षीं । चहूं पायांत घोड्याच्या ॥११॥ मुखें भजन चाललें होतें । ' गणी गण गणांत बोते ' । या सांकेतिक भजनातें । जाणण्या कोण समर्थ हो ? ॥१२॥ म्हणजे मना समजे नित्य । जीव हा ब्रह्मास सत्य । मानूं नको तयाप्रत । निराळा त्या तोचि असे ॥१३॥ ' गिणगिण गिणांत बोते ' । कोणी ' गणी गण गणांत बोते ' । ऐशीं आहेत दोन मतें । या भजनाविषयीं शेगांवीं ॥१४॥ वरील भजन मुखानें । चाललें होतें आनंदानें । वाटे या भजनरूप सांखळीनें । घोडा बांधूनी टाकिला ॥१५॥ गोविंदबुवांच्या अंतरीं । धास्ती होती जबर खरी । म्हणून तो वरच्यावरी । उठून पाहे वारूला ॥१६॥ तो ठाण्यावरी घोडा शांत । ऐसें पडता दृष्टीप्रत । गोविंदबुवांच्या चित्तांत । अति नवल वाटलें ॥१७॥ हें काय आहे तें पहाया गेलें । तो एक माणूस दिसलें । चोहों पायांत निजलेले । त्या द्वाड घोड्याच्या ॥१८॥ अति निकट येऊनी । पाहूं लागले निरखूनी । तों दिसले कैवल्यदानी । तेथे गोविंदबुवाला ॥१९॥ ते म्हणाले मनांत । घोडा कां झाला शांत । हें कळलें कारणासहित । मजलागीं येधवां ॥२०॥ समर्थांच्या सहवासें । घोडा शांत झालासे । जेथें कस्तुरी तेथें नसे । दुर्गंधाला थारा कदा ॥२१॥ समर्थांच्या पायांवरी । गोविंदबुवानें अत्यादरीं । शिर ठेविलें निर्धारीं । अष्टभाव दाटले ॥२२॥ मुखें करूं लागलें स्तवन । आपण खरेच गजानन । विघ्नांचे करितसा कंदन । याचा प्रत्यय आज आला ॥२३॥ माझा घोडा द्वाड अती । सर्वही ज्याला भीती । तेथेंच आलात गुरुमूर्ती । हरण्या त्याचा द्वाडपणां ॥२४॥ स्वामी घोड्यास म्हणाले, " आता गड्या । करूं नकोस खोड्या । त्या येथेंच रोकड्या । द्याव्या अवघ्या सोडून "॥२५॥ ऐसें त्यासी बोलून । निघून गेले दयाघन । कृपाकटाक्षें करून । पशूही ज्यानें आकळिला ॥२६॥ असो श्रोते दुसरे दिवशीं । मळ्यांत असतां पुण्यराशी । आले गोविंदबुवा दर्शनासी । घोड्यावरी बैसून ॥२७॥ तो मळ्यांत आलेला पाहून । लोक बोलले त्याकारण । गोविंदबुवा ही घेऊन । पीडा कशास येथें आला ॥२८॥ गोविंदबुवा त्यांसी वदले । तुमचें म्हणणें मीं ऐकिले । माझ्या घोड्यास शहाणें केलें । काल रात्रीं समर्थांनी ॥२९॥ चिंचेखालीं उभा केला । टाकळीकरांनी घोडा भला । चर्‍हाटावांचूनी राहिला । उभा तो एक प्रहर ॥३०॥ भाजीपाला कोवळा घांस । मळ्यांत होता विशेष । परी ना लाविलें त्यास । तोंड घोड्यानें एकाही ॥३१॥ पहा संताची केवढी शक्ती । पशुही आज्ञेत वागती । पत्र्यांत आरंभिली स्तुती । गोविंदबुवांनीं समर्थांची ॥३२॥
श्लोक ( पृथ्वी वृत्त )
अचिंत्य जगताप्रती कृति तुझी न कोणा कळे । असो खलहि केवढा तव कृपें सुमार्गी वळे ॥
उणें पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी । शिरीं सतत माझिया वरदहस्त ठेवा झणीं ॥१॥
ऐसी स्तुती करून । गेले गोविंदबुवा निघून । घोड्यास आपल्या घेऊन । टाकळी ग्रामाकारणें ॥३३॥ प्रत्येक दिनीं शेगावीं । यात्रा येई नवी नवी । कांहीं तरी धरून जीवीं । हेतु आपल्या श्रोते हो ॥३४॥ त्या यात्रेकरू मंडळींत । बाळापूरचे दोन गृहस्थ । आले कांहीं धरूनि हेत । समर्थांच्या दर्शना ॥३५॥ पथीं जातां एकमेकां । बोलूं लागले ऐसें देखा । पुढल्या वारीस गांजा सुका । येऊं आपण घेऊन ॥३६॥ लोक आणती बर्फी खवा । आपण गांजा नेऊं बरवा । गांठ धोतरां बांधून ठेवा । ना तरी विस्मृति होईल ॥३७॥ पुढल्या वारीस दोघेजण । आले दर्शनाकारण । परि गेले विसरोन । गांजा तों आणावया ॥३८॥ शिर ठेवितां पायांवरी । आठवण त्यांना झाली खरी । कीं नाहीं आणिला बरोबरी । गांजा तो आपण ॥३९॥ आतां पुढच्या वारीसी । दुप्पट आणूं गांज्यासी । ऐसें बोलून मानसीं । दर्शन घेऊन गेले हो ॥४०॥ पुढल्या वारीस तेंच झालें । गांजा आणण्याचे विसरले । कर जोडून मात्र बसले । स्मृती नसे गांजाची ॥४१॥ तै स्वामीं म्हणाले भास्करासी । पाहा जगाची रीत कैसी । गांठ मारून धोतरासी । विसरती जिन्नस आणावया ॥४२॥ बेटे मनीं नवस करिती । आणि हात हालवित येथें येती । अशानें कां पूर्ण होती । त्यांच्या मनींचे मनोरथ ? ॥४३॥ हे शब्द त्या दोघांसी । अति लागले मानसीं । पाहूं लागले एकमेकांसी । कुतूहल दृष्टीनें ॥४४॥ आपण नवस केला मनीं । तो जाणिला समर्थांनी । आतां येऊं घेऊनी । चला गांजा गांवांतून ॥४५॥ ऐसा विचार करून उठले । गांवांत जाऊं लागले । गांजा आणावयाला भले । तैं महाराज वदलें त्या ॥४६॥ आतां आणण्यां गांजाप्रत । नका जाऊं पेठेंत । मेळ हमेशा बोलण्यांत । ठेवा तुम्ही आपुल्या ॥४७॥ लबाडाचे न हेतु पुरती । ही खुणगांठ बांधा चित्तीं । तुमचे काम झाल्यावरती । मर्जी असल्या गांजा आणा ॥४८॥ पुढील आठवड्यांत तुमचें काम । होईल जा अत्युत्तम । परी कदा न चुकवा नेम । पांच वार्‍या येथील करा ॥४९॥ कां कीं हा येथें स्थिर । आहे मृडानीपती कर्पूरगौर । ज्याच्या कृपेनें कुबेर । जगीं झाला धनपती ॥५०॥ ऐसा उपदेश ऐकून । महाराजांशीं वंदून । घेतलें शिवाचें दर्शन । आणि गेले बाळापुरा ॥५१॥ पुढील आठवड्यामाजी भले । काम त्यांचें फत्ते झालें । तेही गांजा घेऊन आले । शेगावांत वारीला ॥५२॥ त्या बाळापुरची दुसरी कथा । तुम्ही ऐका श्रोते आतां । बाळकृष्ण नामें होता । बाळापुरात रामदासी ॥५३॥ कांता त्याची पुतळाबाई । परम भाविक होती पाही । दरवर्षी वारीस जाई । पायीं सज्जनगडाते ॥५४॥ पतिपत्नीचा विचार एक । पौष मासीं निघती देख । ओझ्यासाठीं घोडे एक । घेऊनिया बरोबरी ॥५५॥ कुबडी कंथा दासबोध । सवें हें सामान अति शुद्ध । साधुत्वाचा नव्हता मद । तयासी कीं चढलेला ॥५६॥ मार्गी चालतां ग्रामांतरीं । प्रत्यहीं झोळी फिरवी खरी । त्या झोळीच्या भिक्षेवरी । नैवेद्य करी रामाला ॥५७॥ पौष वद्यांत बाळापूर । सोडी नवमीला साचार । असे कांता बरोबर । पुतळाबाई नाम जिचें ॥५८॥ बाळकृष्णबुवा हातीं । चंदनाच्या चिपळ्या असती । पुतळाबाई करी साथी । झांज हाती घेऊन ॥५९॥ रघुपतीचा नामगजर । करी पंथानें निरंतर । शेगांव, खामगांव, मेहेकर । देऊळगांवराजा पुढें ॥६०॥ आनंदीस्वामींस जालनापुरीं । वंदुनिया जांब नगरीं ।
वंदन गोदेला करी पुढें दिवर्‍यास येऊन ॥६१॥ पुढें बीड आंबेजोगाईचे । मोहोरी बेलेश्वर स्वामीचे । पट्टशिष्य समर्थांचे । डोमगांवी कल्याण ॥६२॥ नरसिंगपूर पंढरपूर । नातेपोतें शिंगणापूर । वाई आणि सातारा । असे जे गडाच्या पायथ्याशीं ॥६३॥ माघ वद्य प्रतिपदेला । तो येऊन पहुचे भला । श्रीसज्जनगडाला । नवमीच्या त्या उत्सवासी ॥६४॥ यथाशक्तिप्रमाणें । ब्राह्मणभोजन करावें त्यानें । श्रीस्वामीसमर्थांकारणें । खरा खराच रामदासी ॥६५॥ ऐसे रामदासी आतां । होणें कठीण सर्वथा । दासनवमीचा उत्सव होता । परत जाई त्याच मार्गें ॥६६॥ ऐसा क्रम चालला । बहुत दिवस त्याचा भला । साठ वर्षें देहाला । गेलीं त्याच्या उलटुन ॥६७॥ माघ वद्य द्वादशीस । सोडून सज्जनगडास । निघावें परत जावयास । त्यानें आपुल्या बाळापुरा ॥६८॥ असो वद्य एकादशीसी । बसला समर्थ समाधींपासीं । आले दुःखाश्रु लोचनासी । शब्द न त्यासी बोलवे ॥६९॥ हे रामदास स्वामी समर्था ! । हे गुरुराया पुण्यवंता ! । माझें शरीर थकलें आतां । वारी न पायीं होईल ॥७०॥ नेम चालला आजवर । आतां पडूं पाहे अंतर । परमार्थासी शरीर । निकोप आधीं पाहिजे ॥७१॥ तरीच सर्व घडे कांहीं । हे रामदासा माझे आई । हें म्हणण्याची जरूर नाहीं । आपण सर्व जाणतसा ॥७२॥ ऐशी प्रार्थना करून । निजला शय्येस जाऊन । तों प्रभातकाळीं पडलें स्वप्न । बाळकृष्णबुवाला ॥७३॥ स्वप्नीं म्हणाले रामदास । ऐसा न होई हताश । नको येऊं येथून खास । या सज्जनगडाते ॥७४॥ माझी कृपा तुझ्यावरी । माझा उत्सव बाळापुरीं । करावा तूं आपल्या घरीं । मी येईन नवमीला ॥७५॥ ऐसें स्वप्न पाहिलें । बाळकृष्ण आनंदले । कांतेसह परत आले । बाळापुरास आपुल्या घरीं ॥७६॥ पुढें श्रोते दुसरे वर्षी । काय झालें माघमासीं । त्या बाळापुरासी । तें आतां अवधारा ॥७७॥ माघ वद्य प्रतिपदेस । समर्थांच्या उत्सवास । आरंभ बाळापुरास । बाळकृष्णांनीं घरीं केला ॥७८॥ दासबोधाचें वाचन । रात्रीस हरिकीर्तन । दोन प्रहरीं ब्राह्मणभोजन । धुपार्ती अस्तमानाला ॥७९॥ ऐसा थाट बाळापुरा । नव दिवस झाला खरा । नववे दिवशीं दोन प्रहरा । अघटित आलें घडून ॥८०॥ श्रीगजानन साक्षात्कारी । श्रोते तया बाळापुरी । उभे राहिले दोन प्रहरी । नवमी तिथि लक्षून ॥८१॥ बाळकृष्णांच्या द्वारांत । रामाभिषेक चालला आंत । लोक झाले विस्मित । गजाननासी पाहुनियां ॥८२॥ म्हणूं लागले बुवासी । उठा उठा हो वेगेसीं । तुमच्या दासनवमीसी । द्वारीं पातलें गजानन ॥८३॥ त्यावरी बुवा म्हणाले । गजानन आले बरें झालें । त्याही संतांचे लागले । पाय माझ्या घरासी ॥८४॥ परी आजच्या दिनी साची । मी वाट पाहतो समर्थांची । त्या सज्जनगड निवासीयाची । आतूर होऊन ये ठायां ॥८५॥ इकडे स्वामी गजानन । द्वारीं उभे राहून । जयजय रघुवीर म्हणोन । श्लोक बोलूं लागले ॥८६॥
श्लोक - अहिल्या शिळा राघवें मुक्त केली । पदीं लागतां दिव्य होऊन गेली ॥ अशी वाणी ऐकतां उठली । स्वारी बाळकृष्णाची ॥८७॥ पाहाती जों येऊन द्वारीं । तों गजाननाची नग्न स्वारी । आजानुबाहु साजिरी । उभी निजानंदामध्यें ॥८८॥ करण्या गेला नमस्कार । तों रामदास दिसले साचार । हाती कुबडी जटाभार । रुळत होता पाठीवरीं ॥८९॥ भालीं त्रिपुंड्र उभा साचा । होता गोपिचंदनाचा । नेसलेल्या लंगोटीचा । रंग होता हिरमुजी ॥९०॥ ऐसें रूप पाहिलें । बाळकृष्णा भरतें आलें । प्रेमाचें तें श्रोते भलें । नयनीं संचले आनंदाश्रु ॥९१॥ तों सवेंच दिसती गजानन । त्याच्या नेत्रांकारण । कुबडी लंगोटी कांहींच न । त्रिपुंड्र शिरींचा जटाभार ॥९२॥ पुनः त्यानें हताश व्हावें । तो रामदास स्वामी दिसावे । पुनः जों निरखून पाहावें । तों मागुती गजानन ॥९३॥ मग म्हणाले गजानन । रामदासासी प्रेमेंकरून । नको गांगरूं देऊं मन । तुझा समर्थ मीच असे ॥९४॥ तुला सज्जनगडीं दिलें वचन । कीं दासनवमीस येईन । मी बाळापुरालागून । ह्याचे स्मरण आहे कां ? ॥९५॥ त्या वचनाची पूर्तता । करण्यास येथें आलों आतां । दे सोडोन अवघी चिंता । मीच आहे रामदास ॥९६॥ बाळकृष्णाचा धरून हात । गजानन आलें घरात । एका मोठ्या पाटीं स्थित । स्वामी गजानन जाहले ॥९७॥ बाळापुरीं पुकार झाली । गजानन आल्याची ती भली । मंडळीं धांवू लागली । दर्शन घ्याया पायांचे ॥९८॥ रामदासी अवघ्या दिवसभर । करीत राहिला विचार । शेवटीं रात्र होतां तीन प्रहर । स्वप्न पडलें बाळकृष्णा ॥९९॥ अरे, गजानन माझीच मूर्ति । हल्लीं तुमच्या वर्‍हाड प्रांतीं । संशय मुळीं ना धरी चित्तीं । तो धरितां बुडशील ॥१००॥ ऐसें स्वप्न पडल्यावरी । बाळकृष्ण तोषला भारी । मस्तक ठेविलें अत्यादरीं । गजाननाचें पायांवर ॥१०१॥ नवमी माझी सांग झाली । न्यूनता कांही न उरली । अर्भकावरी कृपा केली । तेणें धन्य झालो मी ॥१०२॥ भोजनोत्तर निघून गेले । स्वामी शेगांवासी भलें । रस्त्यानें न कोणा दिसलें । क्षणांत पोचले शेगांवीं ॥१०३॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति नवमोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ८


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो मागील अध्यायीं । देशमुख पाटलाठायीं । मुक्कामातें दुफळीबाई । येऊन बैसली हें ऐकिलें ॥१॥ असो तळ्याचिया कांठावर । देशमुखांचा एक महार । करुं लागला चरचर । या खंडू पाटलापुढें ॥२॥ पाटील गांवीचा अधिकारी । पाटील गांवीची पांढरी । कांहीं कामावरुन खरी । कुरबुर झाली उभयतांत ॥३॥ तो असे मर्‍या महार । देशमुखांचा ज्याला जोर । तो बोलला उणें उत्तर । खंडू पाटलाकारणें ॥४॥ पाटील वदला त्यावरी । तुझी रीत ही नाहीं बरी । गरीबानें पायरी । आपली कधीं सोडूं नये ॥५॥ तरी महार ऐकेना । करुं लागला चेष्टा नाना । त्याच्या ऐकोनी भाषणा । पाटील खवळला मानसीं ॥६॥ बाचाबाचीचें कारण । होतें अति क्षुल्लक जाण । कागद ठाण्यालागून । पाठवणें होते पाटलाला ॥७॥ तो टप्पा न्यावयासी । सांगितले होते महारासी । कीं तूं असाच जा अकोल्यासी । तहशिलींत टप्पा द्याया हा ॥८॥ तें ऐकोनी वदला महार । मी न हा टप्पा नेणार । देशमुखाच्या आश्रितावर । तुमचा डोळा हमेशा ॥९॥ कांहीं असो आज दिनीं । मी टप्पा न जाय घेवोनी । तुझ्या हुकूमालागूनी । बोंबा शिमग्याच्या समजतों मी ॥१०॥ ऐसें वदनीं बोलला । हावभावही तैसा केला । मूठ वळुनि हात नेला । त्यानें आपल्या मुखापुढें ॥११॥ ती त्याची पाहूनि कृती । खंडू पाटील कोपला चित्तीं । भरीव वेळूची कांठी होती । पाटलाच्या हातांत ॥१२॥ पाटील मूळचा जोरदार । त्याच काठीचा रागें केला प्रहार । तेणें बेशुद्ध झाला महार । हात त्याचा गेला मोडूनी ॥१३॥ पाटील दुसर्‍या महाराला । गेले टप्पा द्यावयाला । तों इकडे वृत्तान्त कैसा झाला । तो आता सांगतों ॥१४॥ तो महार त्याच्या आप्तांनीं । नेला उचलून देशमुखसदनीं । मोडला हात हे पाहूनि । देशमुख ते संतोषले ॥१५॥ वा ! वा ! छान गोष्ट झाली । आपणां कुरापत काढण्या भली । ही अनायासें संधी आली । ती उपयोगी न दवडणें ॥१६॥ त्यांनीं त्या महारासी । तात्काळ नेलें कचेरीसी । समजाविलें अधिकार्‍यासी । खोटेंनाटें विबुध हो ॥१७॥ फिर्याद त्या महाराची । पुस्तकांत नोंदली साची । आज्ञा झाली अधिकार्‍याची । पाटील पकडून आणावया ॥१८॥ तें खंडू पाटला समजलें । धाबें त्याचें दणाणलें । तोंडचें पाणी पळालें । झाला अति चिंतातुर ॥१९॥ खंडू हताश होऊन बसला । तों एक विचार सुचला त्याला । श्रीगजानन महाराजांला । सांकडें हें घालावें ॥२०॥ त्या साधूचे वांचून । या संकटाचें निरसन । करणारा न कोणी आन । राहिला या वर्‍हाडीं ॥२१॥ लौकिकीं यत्‍न करण्याला । बंधू गेले अकोल्याला । खंडू पाटील नीट आला । समर्थांकडे रात्रीस ॥२२॥ येतांच केला नमस्कार । शिर ठेविलें पायांवर । महाराज आला कठीण फार । प्रसंग तो माझ्यावरी ॥२३॥ सरकारी कामानिमित्त । मी एका महाराप्रत । तळ्यापाशीं ताडिलें सत्य । करांतील काठीनें ॥२४॥ त्यानिमित्त कैद मला । होण्याचा उद्यां प्रसंग आला । समर्था माझ्या इज्जतीला । तुजवीण कोण रक्षील ? ॥२५॥ उद्यां येतील राजदूत । मला येथूनि नेण्याप्रत । बेडी ठोकोनि पायांत । ऐसें आज ऐकिलें ॥२६॥ ऐसें वदून समर्थाला । पाटील रडूं लागला । आसवांचा तो चालला । पूर नेत्रांवाटें हो ! ॥२७॥ इकडे समर्थांनीं भले । दोन्ही हातीं कवटाळीलें । खंडू पाटला हृदयीं धरिलें । त्याचें सांत्वन करावया ॥२८॥ अरे कामकर्त्या पुरुषाप्रत । ऐशीं संकटें येतात । वरच्यावरी जाण सत्य । त्याची चिंता वाहूं नको ॥२९॥ जा भिऊं नकोस तिळभर । बेडी न तुशीं पडणार । किती जरी केला जोर । देशमुखानें आपला ॥३०॥ तेंच पुढें खरें झालें । पाटील निर्दोषी म्हणून सुटले । जें कां संत मुखावाटें आलें । तें न खोटें होई कधीं ॥३१॥ पाटील मंडळी उत्तरोत्तर । भजूं लागली साचार । कोणा नाहीं आवडणार । अमृत तें सेवावया ॥३२॥ पुढें खंडू पाटलानें । करुन विनंति प्रेमानें । नेलें रहावयाकारणें । समर्थाला निजगृहीं ॥३३॥ असतां पाटील सदनांत । गजाननस्वामी समर्थ । ब्राह्मण आले अवचित । दहापांच तैलंगी ॥३४॥ तैलंगी विद्वान असती । कर्मठ वेदावरी प्रीती । परी धनाचा लोभ चित्तीं । राही ज्यांच्या विशेष ॥३५॥ तें कांहीं मिळेल म्हणून । समर्थांकडे आले जाण । तयी होते पांघरुण । घेऊन समर्थ निजलेलें ॥३६॥ त्यांना जागे करण्याप्रत । ब्राह्मण म्हणूं लागले मंत्र । जटेचे ते स्वरांसहित । अति उच्च स्वरानें ॥३७॥ मंत्र म्हणण्यांत चूक झाली । ती न त्यांनीं दुरुस्त केली । म्हणून आसनीं उठून बसली । गजाननाची स्वारी पहा ॥३८॥ आणि ऐसें वदले ब्राह्मणाला । तुम्ही कशासाठीं वैदिक झालां । हीनत्व वेदविद्येला । आणूं नका रे निरर्थक ॥३९॥ ही न विद्या पोटाची । मोक्षदात्री आहे साची । बा डोईस बांधल्या शालीची । किंमत कांहीं राखा हो ॥४०॥ मी म्हणतों ऐसें म्हणा । खरे स्वर मनीं आणा । उगीच भोळ्या भाविकांना । सोंग आणून नाडूं नका ॥४१॥ जी ऋचा ब्राह्मणांनीं । म्हणण्यां सुरुं केली जाणी । तोच अध्याय समर्थांनीं । धड धड म्हणून दाखविला ॥४२॥ चूक न कोठें म्हणण्यांत । शब्दोच्चार स्पष्ट सत्य । वाटे वसिष्ठ मूर्तिमंत । वेद म्हणण्या बसला असे ॥४३॥ तेलंगी तें ऐकून चकित झाले । अधोवदन बैसले । मुख वरी करण्या आपुलें । भय मनीं वाटलें त्यां ॥४४॥ विप्र म्हणती आपुल्या मनीं । हा पिसा कशाचा महाज्ञानी । चारी वेद याच्या वदनीं । नांदतात प्रत्यक्ष ॥४५॥ असो खंडू पाटलाकडून । त्या ब्राह्मणांलागून । देते झाले दयाघन । रुपया रुपया दक्षिणा ॥४६॥ ब्राह्मण संतुष्ट झाले । अन्य गांवा निघून गेले । महाराजही कंटाळले । उपाधिला गांवच्या ॥४७॥ गांवाचिया उत्तरेला । एक मळा सान्निध्याला । या मळ्यांत भाजीपाला । होत होता बहुवस ॥४८॥ एक शिवाचें मंदिर । तेथें होतें साचार । लिंबतरुंची थंडगार । छाया होती ते ठायीं ॥४९॥ हा कृष्णाजी पाटलाचा । मळा होता मालकीचा । हा कृष्णाजी खंडुजीचा । सगळ्यांत शेवटला भाऊ असे ॥५०॥ त्या मळ्यांत महाराज आले । शिवालयासन्निध बसले । एका ओटयावरी भले । निंबतरुच्या छायेंत ॥५१॥ समर्थ म्हणाले कृष्णाजीसी । मी आलों तुझ्या मळ्यासी । कांहीं दिवस रहावयासी । या श्रीशंकरासन्निध ॥५२॥ तें वाक्य ऐकिलें । सहा पत्रें आणविलें । ओट्यावरी छप्पर केलें । कृष्णाजीनें तात्काळ ॥५३॥ महाराजांचे बरोबर । होता पाटील भास्कर । सेवा करण्या निरंतर । दुसरा तुकाराम कोकाट्या ॥५४॥ खाण्यापिण्याची तरतूद सारी । निजांगें कृष्णाजी पाटील करी । समर्थ तें जेवल्यावरी । तो प्रसाद घेत असे ॥५५॥ असो गजानन असतां मळ्यांत । गोष्ट घडली अद्‌भुत । येते झाले फिरत फिरत । दहावीस गोसावी ते ठायां ॥५६॥ समर्थांचा बोलबाला । त्यांनीं आधींच होता ऐकिला । म्हणूनि त्यांनीं तळ दिला । येऊनि या मळ्यामध्यें ॥५७॥ गोसावी म्हणती पाटलासी । आम्ही आहों तीर्थवासी । जातों रामेश्वरासी । भागीरथीला घेऊन ॥५८॥ ब्रह्मगिरी गोसाव्याचे । आम्ही शिष्य आहो साचे । महाराजही आमुचे । आहेत सांप्रत बरोबर ॥५९॥ शिरापुरींचें अयाचित । आम्हां द्यावें तुम्हीं त्वरित । लागे जो ओढण्याप्रत । गांजा तोही पुरवावा ॥६०॥ आम्ही गोसावी वैराग्यभरित । जाणतों अवघा वेदांत । मर्जी असल्या मळ्यांत । या पोथी ऐकावया ॥६१॥ कृष्णाजी म्हणे त्यावरी । उद्यां घालीन शिरापुरी । आज आहेत भाकरी । त्याच जाव्या घेऊन ॥६२॥ जितुका गांजा ओढाल । तितुका तेथेच मिळेल । तेथें चालतां बोलतां कंठनीळ । बसला आहे पत्र्यामध्यें ॥६३॥ दोन प्रहराची वेळा खरी । घेतल्या चूण भाकरी । मळ्यांत येऊनि विहिरीवरी । बसलें गोसावी भोजना ॥६४॥ समर्थांच्या समोरी । एका छपराभीतरी । गोसाव्यांनी लाविली खरी । आपआपली कडासनें ॥६५॥ त्यांचा जो होता महंत । ब्रह्मगिरी नामें सत्य । तो भगवद्‌गीतेप्रत । वाचूं लागला अस्तमानी ॥६६॥ गोसावी श्रवणा बैसले । गांवांतूनही कांहीं आले । पोथी ऐकावया भले । त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची ॥६७॥ "नैनं छिन्दन्ति" हा श्लोक । निरुपणाचा होता देख । ब्रह्मगिरी पक्का दांभिक । स्वानुभवाचा लेश नसे ॥६८॥ सारे पोथी ऐकिल्यावरी । येऊन बसले पत्र्याभीतरीं । गजाननाच्या समोरी । संतदर्शन घ्यावया ॥६९॥ लोक म्हणती छपराला । निरुपणाचा भाग झाला । येथें पत्र्यास बैसला । स्वानुभवाचा पुरुष हा ॥७०॥ तेथें ऐकला इतिहास । येथें पाहिला प्रत्यक्ष पुरुष । या भाषणें गोसाव्यास । राग आला कांहींसा ॥७१॥ अवघे गोसावी गांजा प्याया । बसले होते घेऊनिया । त्या पत्र्याचिया ठायां । चालली चिलीम गांजाची ॥७२॥ पत्र्यांत पलंगाच्या वरी । बसली होती समर्थस्वारी । चिलीम भरुन वरच्यावरी । प्याया देई भास्कर ॥७३॥ त्या चिलिमीच्या विस्तवाची । ठिणगी पलंगीं पडली साची । ती पडतांना कोणाची । दृष्टि न गेली तिच्यावर ॥७४॥ कांहीं वेळ गेल्यावर । निघूं लागला धूर । पलंग पेटला अखेर । एकदम चहूं बाजूंनीं ॥७५॥ तो प्रकार पाहतां । भास्कर बोले सद्‌गुरुनाथा । पलंग सोडा शीघ्र आतां । या खालीं उतरुन ॥७६॥ तयीं समर्थ बोलले वाचें । भास्करा अग्नि विझविण्याचें । कारण नाहीं तुला साचें । जल मुळींच आणूं नको ॥७७॥ अहो महाराज ब्रह्मगिरी । या बैसा पलंगावरी । तुम्हां आहे अवगत खरी । भगवद्‌गीता साकल्यें ॥७८॥ त्याच्या परीक्षेची वेळ । आणिली हरीनें तात्काळ । ब्रह्मा न जाळी अनळ । याचा प्रत्यय दाखवा ॥७९॥ "नैनं छिन्दन्ति" श्लोकावर । व्याख्यान केलें एक प्रहर । आतां कां मानितां दर । या पलंगीं बसण्याचा ? ॥८०॥ पलंग पेटला चौफेर । ज्वाळा निघूं लागल्या थोर । परी महाराज आसनीं स्थिर । हलले मुळीं न इतकेंही ॥८१॥ जा जा भास्करा लौकरी । ब्रह्मगिरीला करीं धरी । आणून बसवी अत्यादरीं । या जळत्या पलंगास ॥८२॥ ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशीं । मला न न्या पलंगापाशीं । महाराजांच्या अधिकाराशीं । मीं नाहीं जाणितलें ॥८३॥ तें न मानी भास्कर । ओढीत आणिला फरफर । उभा केला समोर । आपल्या सद्‌गुरुरायांच्या ॥८४॥ गोसावी म्हणे भीत भीत । मी पोटभर्‍या आहे संत । शिरापुरी खाण्याप्रत । मी झालों गोसावी ॥८५॥ तुला पिसा मी म्हणालों । आतां पस्तावा पावलों । मी दांतीं तृण धरुन आलों । शरण तुला ! अभय दे ॥८६॥ शेगांवच्या जनांनीं । केली समर्था विनवणी । आपणा अग्नीपासूनी । भय नाहीं हें खरें ॥८७॥ तरी महाराज आमच्यासाठीं । उतरा खालीं ज्ञानजेठी । गोसावी झाला हिंपुटी । तो न कांहीं बोलला ॥८८॥ लोक विनंतीस द्याया मान । खालीं उतरले गजानन । तो पलंग पडला कोसळून । एक पळही न लागलें त्या ॥८९॥ अवघाच होता जळला । जो भाग शेष उरला । तो लोकांनीं विझविला । साक्ष दावण्या इतरांसी ॥९०॥ ब्रह्मगिरी पायीं लागला । निरभिमान अवघा झाला । स्पर्श होता गंगाजला । मल कोठूनी राही तेथ ? ॥९१॥ मग मध्यरात्रीच्या समयाला । ब्रह्मगिरीस बोध केला । आजपासून चेष्टेला । तूं या सोडून देईं रे ॥९२॥ ज्यांनीं राख लावावी । त्यांनीं उपाधी दूर ठेवावी । अनुभवावीण न सांगावी । गोष्ट कोणा निरर्थक ॥९३॥ उगीच खाया शिरापुरी । भटकूं नको भूमीवरी । सार न तया माझारीं । येतुलेंही गवसणार ॥९४॥ ऐसा बोध ऐकिला । ब्रह्मगिरी विरक्त झाला । प्रातःकाळींच उठोन गेला । कोणा न भेटतां शिष्यांसह ॥९५॥  शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥इति अष्टमो‍ऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ७


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय हा मारुतीचा उत्सव । करीत होता अवघा गांव । याचा पुढारी खंडेराव । पाटील गणेशकुळीचा ॥१॥ हें पाटील घराणें जाण । आहे अति पुरातन । घरचें धन कनकसंपन्न । पसारा थोर शेतीचा ॥२॥ पूर्वीपासून यांच्या घरीं । संतसेवा होती खरी । आली भाग्ये जमेदारी । मग काय विचारतां ? ॥३॥ महादाजी पाटलास । दोन मुलगे औरस । थोरल्या त्या पुत्रास । नांव असे कडताजी ॥४॥ कुकाजी तो धाकटा । पंढरीचा भक्त निका । गोमाजीचा उपदेश देखा । होता या घराण्यातें ॥५॥ पाटील कडताजी कारण । मुलगे होते सहा जण । कुकाजी नुसता भाग्यवान । पुत्र नव्हतां त्याचे कुशी ॥६॥ कडताजी पावतां मरण । साही मुलांचे संगोपन । कुकाजीनें केलें जाण । जन्मदात्या बापापरी ॥७॥ कुकाजीच्या अमदानींत । भरभराट झाली बहुत । अष्टसिद्धी सदनांत । वाटे नांदूं लागल्या ॥८॥ पाटील कुकाजीनंतर । खंडू करी कारभार । याच्या पुढें साचार । कांहीं न चालें कोणाचें ॥९॥ या खंडू पाटलाप्रती । पांच बंधू निश्चिती । गणपती नारायण मारुती । हरी आणि कृष्णाजी ॥१०॥ बंधु सारे तालीम करिती । दांडपट्टे खेळती । कुस्तीचा तो षोक अती । होता हरी पाटलास ॥११॥ उत्सव नांवास मारुतीचा । तरी जयजयकार पाटलाचा । म्हणतील तो शब्द त्यांचा । झेलणें भाग रयतेला ॥१२॥ असो पाटीलबंधूंनीं । राऊळांत येऊनी । महाराजातें हेटाळणी । करण्याचें तें सुरु केलें ॥१३॥ त्यांचे बोल ऐकावें । समर्थांनीं न उत्तर द्यावें । अवघें हंसण्यावारी न्यावें । कोप न धरावा यत्किंचित्‌ ॥१४॥ ऐसा उर्मट प्रकार । मंदिरीं चाले निरंतर । म्हणून पाटील भास्कर । समर्थासी ऐसें वदला ॥१५॥ नका महाराज येथें राहूं । चला आकोलीं ग्रामा जाऊं । हीं पाटील पोरें माजलीं बहु । यांचा नको संबंध ॥१६॥ हे शक्तीनें माजले । लक्ष्मीनें धुंद झालें । सत्तेपुढें कांहीं न चाले । येथे यांची पाटीलकी ॥१७॥ गजानन बोलले त्यावरी । भास्करा थोडा दम धरी । ही पाटील मंडळी सारी । आहेत माझे परमभक्त ॥१८॥ हीं पोरें पाटलाचीं । माझीं लेकरें आहेत साचीं । कृपा आहे संतांची । यांच्या कुळावर भास्करा ॥१९॥ एके दिवशीं पाटील हरी । आला मारुतीच्या मंदिरी । महाराजांला धरुन करीं । म्हणे कुस्ती करी माझ्यासवें ॥२०॥ तुला कुस्तीत करीन चीत । चाल जाऊं तालमीत । उगे न बैसे ऐसें म्हणत । गण गण गणांत बोते ॥२१॥ तुझें प्रस्थ माजले बहु । तें खरें खोटें आज पाहूं । मला पाडसी तरी देऊं । तुला मोठें बक्षीस ॥२२॥ तें समर्था मानवलें । दोघें तालमीमध्ये गेलें । समर्थांनीं कौतुक केलें । तें आतां परियेसा ॥२३॥ खालीं बसले गजानन । उठीव आतां मजलागून । असलास जरी पैलवान । तरी साच करशील हें ॥२४॥ हरी पाटील उठवावया । लागला यत्‍न करावया । परी ते अवघे गेले वायां । हालेनात समर्थ मुळीं ॥२५॥ घामाघूम तनु झाली । शक्तीची ती कमाल केली । पेंच झाले निर्बळी । समर्थांसी झुंजतां ॥२६॥ हरी म्हणे मनांत । हा केवढा तरी सशक्त ? । अचल ऐसा पर्वत । याच्यापुढें येईल उणा ॥२७॥ हा किडकिडीत दिसतो जरी । शक्ति याची गजापरी । खोड्या आमुच्या नानापरी । आजवरी यानें सहन केल्या ॥२८॥ समर्थ म्हणाले हरीला । आतां बक्षिस द्या आम्हांला । ना तरी चीत मजला । तुवां करावें कुस्तींत ॥२९॥ तुझ्याप्रमाणें पूतनारी । पाटील होता यमुनातिरीं । गोकुळींचीं पोरें सारीं । त्यानें केलीं सशक्त ॥३०॥ तैसें तुवां करावें । शरीरबला वाढवावें । ना तरी हें सोडावें । पाटील नांव आपुलें ॥३१॥ हेंच बक्षीस द्यावें मज । ना तरी कुस्ती करी आज । येणें रिती उतरला माज । समर्थांनीं हरीचा ॥३२॥ हरी म्हणे समर्थांस । आपुली कृपा असल्यास । शेगांवच्या लेकरांस । सशक्त करितां येईल कीं ॥३३॥ असो त्या दिवसापासून । हरीने दिलें सोडून । अद्वातद्वा भाषण । करणें पुण्यपुरुषाशीं ॥३४॥ ही पाहोनि त्याची कृति । इतर बंधु बोलती । हरी तूं त्या जोगड्याप्रति । कां भितोस कळेना ॥३५॥ चाल परीक्षा तयाची । आज आपण करुं साची । मोळी घेऊन ऊंसाची । मंदिरांत पातले ॥३६॥ हरी न कांहीं बोलला । इतरांनीं प्रश्न केला । अरे पिशा या ऊंसाला । खातोस कां तूं सांग हें ? ॥३७॥ जरी ऊंस खाण्याची । इच्छा असेल तुला साची । तरी एक अट आमुची । आहे ती तूं मान्य करी ॥३८॥ आम्ही ऊंसाचे करुं प्रहार । तुझ्या येधवां अंगावर । त्याचे वळ ना उठले जर । तरीच योगी मानूं तुला ॥३९॥ ऐसें भाषण ऐकिलें । महाराज कांहीं न बोलले । लेंकराचे बालिश चाळे । मनीं न आणीं सुज्ञ कदा ॥४०॥ तें दोघां तिघां मानवलें । ऊंस करीं घेतले । समर्थांसी मारण्या भले । आले चढून अंगावर ॥४१॥ तें पाहतां नारीनर । मंदिरीं जे होते इतर । ते पळूं लागले भराभर । भास्कर तेवढा जवळ असे ॥४२॥ भास्कर म्हणे पोरांसी । नका मारुं समर्थांसी । या ऊंसानें आज दिवशीं । हें कांहीं बरें नव्हे ॥४३॥ हे महासाधु तुम्हांसी । जरी न वाटतील मानसी । तरी हीन दीन लेखून यासी । द्यावे सोडून हेच बरें ॥४४॥ यावरी म्हणती पोरें । तुमचें भाषण ऐकिले सारें । गांवींचे लोक अत्यादरें । योगयोगेश्वर म्हणती या ॥४५॥ म्हणून त्याचा पहाया योग । येथें आलों आम्ही चांग । यात न घ्यावा तुम्ही भाग । पहा मौज दुरुनी ॥४६॥ ऊंस घेऊन हातांत । मारुं लागले समर्थांप्रत । जैशा का झोडितात । ओंब्या शेतीं कृषीवल ॥४७॥ परि न महाराज डगमगले । मुलां पाहून हंसत बसले । कोठेंही ना उमटले । वळ त्यांच्या अंगावर ॥४८॥ तें पहातां पोरें भ्यालीं । चरणीं त्यांच्या लागलीं । म्हणती खराच आहे बली । हा योगयोगेश्वर ॥४९॥ महाराज म्हणती पोरांला । मुलांनो तुमच्या कराला । असेल अति त्रास झाला । मारण्यानें मजलागी ॥५०॥ त्या श्रमाचा करण्या नाश । काढून देतो इक्षुरस । तुम्हांलागीं प्यावयास । या बसा माझ्यापुढें ॥५१॥ ऐसे म्हणून घेतला । एक ऊंस करीं भला । हातानेंच पिळून त्याला । रस काढिला पात्रामध्यें ॥५२॥ त्या ऊंसांची अवघी मोळी । समर्थांनी पहा पिळिली । आणि प्यायाकारणें दिली। रस नव्हाळी पोरांस ॥५३॥ श्रीगजानन पुण्य पुरुष । चरकावांचून काढिला रस । तें पाहातां बालकांस । अति आनंद जाहला ॥५४॥ लोक म्हणती ही योगशक्ति । दंतकथा मुळीं नसती । योगें जी का प्राप्त होती । त्या शक्तीला च्युति नसे ॥५५॥ समर्थांसी वंदून । गेलीं पोरें निघून । खंडू पाटलाकारण । वर्तमान श्रुत केलें ॥५६॥ दादा आपुल्या गांवांत । गजानन ईश्वर साक्षात्‌ । त्याचा आज आम्हांप्रत । आला आहे प्रत्यय ॥५७॥ ऐसें म्हणून कथिली सारी । हकीकत त्याला खरी । ती ऐकतां अंतरीं । खंडू पाटील चकित झाला ॥५८॥ मग तोही दर्शनाला । समर्थांच्या येऊं लागला । परी मार्दव वाणीला । मुळीं नव्हतें यत्किंचित्‌ ॥५९॥ गण्या गण्या म्हणे वाणी । परी प्रेम उपजे अंतःकरणी । पहा नारळालागुनी । वर करवंटी खोबरे आंत ॥६०॥ याच न्याये तयाचा । परिपाठ होता बोलण्याचा । वृद्धापकाळ कुकाजीचा । झाला म्हणून कारभार करी ॥६१॥ कुकाजी तो एके दिवशीं । बोलतां झाला खंडूशीं । तूं जातोस प्रतिदिवशीं । महाराजांच्या दर्शना ॥६२॥ सांगतोस मला साक्षात्कारी । गजानन एक भूमीवरी । मग कां रे तुझी वैखरी । मुग्ध होते त्यांच्यापुढें ॥६३॥ तुला नाहीं पोरबाळ । माझा झाला वृद्धापकाळ । नातवंडाचे बोल खेळ । पाहू दे मज डोळ्यानें ॥६४॥ आज विनंती करी त्यांना । स्वामी समर्थ गजानना । म्हणावें त्या करुन करुणा । पोर एखादे द्या मज ॥६५॥ तो खरा साधु असल्या सत्य । पुरतील तुझे मनोरथ । आणि माझाही अवघा हेत । तडीस जाईल त्यायोगें ॥६६॥ साधु पुरुषा अशक्य कांहीं । जगत्रयीं या उरलें नाहीं । संतलाभाचा करुन घेई । कांहीं आपणां उपयोग ॥६७॥ तें खंडूतें मानवलें । एके दिवशीं बोलणे केलें । मारुतीच्या मंदिरीं भले । तें ऐका येणें रिती ॥६८॥ अरे गण्या माझा चुलता । वृद्ध झाला आहे आतां । इच्छा उपजली त्याच्या चित्ता । नातवंड तें पाहण्याची ॥६९॥ तुला लोक साधु म्हणती । दर्शन केल्या तुजप्रती । इच्छा मनींच्या पूर्ण होती । ऐसें लोक सांगतात ॥७०॥ त्याचें दावी प्रत्यंतर । उगा नको करुं उशीर । तुझ्या पायीं ज्याचें शिर । तो कां रहावा निपुत्रिक ? ॥७१॥ ऐसें भाषण ऐकिलें । महाराज त्यासी बोलले । आज हें उत्तम घडून आलें । त्वां याचना केली आम्हां ॥७२॥ याचना म्हणजे मागणें भीक । हें तूं आज केलें देख । तुला होईल बालक । भिक्या नांव ठेव त्याचें ॥७३॥ पुत्र देणें माझ्या करीं । सर्वतोपरी नाहीं जरी । परी मी विनंती करीन खरी । तुझ्यासाठी परमेश्वरा ॥७४॥ हें मम मानी प्रमाण वचन । पुत्र होईल तुजकारण । आम्ररसाचें भोजन । दरसाल घाली ब्राह्मणां ॥७५॥ हें खंडूनें ऐकले । घरीं येऊन सांगितलें । कुकाजीसी निवेदिलें । मंदिराचें वर्तमान ॥७६॥ हें ऐकतां कुकाजीस । आनंद झाला बहुवस । तो कांहीं लोटतां दिवस । समर्थ वचन झालें खरें ॥७७॥ कांता खंडू पाटलाची । गंगाबाई नांवाची । गर्भिणी झाली साची । नवमास पूर्ण झाले ॥७८॥ तिजलागीं पुत्र झाला । खंडू पाटील आनंदला । कुकाजीच्या हर्षाला । पारावार कांहीं नसे ॥७९॥ त्यानें धर्म केला बहु । गरीबां दिले गूळ गहूं । पेढे-बर्फीचा दिला खाऊ । गांवांतील अर्भकांना ॥८०॥ थाटांत झालें बारसें । भिकू नांव ठेविलेंसें । पुढें बाळ वाढला असे । शुक्लपक्षीच्या इंदुपरी ॥८१॥ आम्ररसाचें भोजन । दिलें ब्राह्मणांकारण । तो संप्रदाय अजून । शेगांवांत चालत असे ॥८२॥ पुण्यपुरुषाची वैखरी । कोठून होईल असत्य तरी । पाटलाच्या ओसरीवरी । बाळ रांगूं लागला ॥८३॥ हा बोलबाला पाटलाचा । देशमुखां पटला न साचा । शेगांव हा दुफळीचा । गांव पहिल्यापासून ॥८४॥ एक फळी देशमुखांची । एक फळी पाटलांची । अंतःकरणें एकमेकांचीं । मुळीं होतीं अशुद्ध ॥८५॥ प्रत्येक आपुल्या डावांत । एकमेकांचा करण्या घात । सदा इच्छिती मनांत । लेश नसे प्रेमाचा ॥८६॥ पुढें गोष्ट झाली ऐशी । कुकाजी झाले स्वर्गवासी । पाहूनिया नातवंडासी । भीमातटी पंढरींत ॥८७॥ तेणें खंडूचें उद्विग्न मन । गेलें सहज होऊन । तो म्हणे छत्र पूर्ण । माझे आज ढासळलें ॥८८॥ ऐशी संधि पाहून । बालंट आणाया कारण । पाटलावरी सवड पूर्ण । मिळाली देशमुखमंडळीला ॥८९॥ तो वृत्तांत अष्टमांत । सांगेन श्रोते तुम्हांप्रत । ही जमेदारी खाण सत्य । आहे प्रत्यक्ष द्वेषाची ॥९०॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति सप्तमोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ६


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो बंकटलाला घरीं । राहिली समर्थांची स्वारी । तयी अपूर्व एक घडली खरी । गोष्ट श्रोते ती ऐका ॥१॥ गांवाचिया दक्षिणेस । बंकटलालाच्या मळ्यास । महाराज गेले एक दिवस । कणसें मक्याचीं खावया ॥२॥ बहुत मंडळी बरोबरी । कणसें खाया आली खरी । विहिरीपासी तयारी । केली कणसें भाजण्याची ॥३॥ विहीर होती धनत्तर । पाणी जिला अपरंपार । गर्द छायेचे वृक्ष थोर । जवळ होते चिंचेचे ॥४॥ आगटया पेटल्या एकसरां । आजमासें हो दहा बारा । तेणें डोंब झाला खरा । गगनोदरीं धूमाचा ॥५॥ त्यायोगें ऐसे झाले । आग्या मोहोळ लागलेलें । चिंचवृक्षावरी भलें । त्याच्या माशा उठल्या कीं ॥६॥ त्या माशा उठतां क्षणीं । मंडळी गेली पळोनी । कणसें ठिकाणच्या ठिकाणीं । मक्याचीं तीं राहिलीं हो ॥७॥ त्या आग्या मोहोळांच्या मक्षिका । पसरल्या अवघ्या मळ्यांत देखा । घोंगड्याचा करुन बुरखा । कोणी गेले पळून ॥८॥ महाराज नाहीं पळून गेले । आसनीं आपल्या स्वस्थ बसले । विचार करुं लागले । निजचित्तीं माश्यांचा ॥९॥ वाटे पासोडी माश्यांची । समर्थ पांघरले साची । योग्यता ब्रह्मनिष्ठाची । काय वर्णन करावी ? ॥१०॥ माशा चावती वरच्यावरी । परी न तो पर्वा करी । त्यांचे कांटे शरीरी । बोचले असती असंख्यात ॥११॥ यासी झाला एक प्रहर । भक्त झाले चिंतातुर । बंकटलालाचें अंतर । दुःखे व्याकुळ झालें हो ॥१२॥  बंकटलालानें तयारी । पुढें येण्याची केली खरी । हें जाणोन अंतरीं । कौतुक केलें समर्थानें ॥१३॥ जीवांनो ! जा निघोन । बसा मोहोळीं जाऊन । माझ्या बंकटाकारण । तुम्हीं कोणी न चावावें ॥१४॥ जमलेल्या मंडळींत । बंकट हाच निःसीम भक्त । जो माझ्या प्रीत्यर्थ । येत आहे धांवोनिया ॥१५॥ ऐसें म्हणतां माश्या गेल्या । मोहोळावरी जाऊन बैसल्या । बंकटलालानें पाहिल्या । त्या आपल्या निजदृष्टीं ॥१६॥ महाराज त्या पाहोनी । बोलते झाले हांसोनी । वा खूप केलीस मेजवानी । आम्हांसी तूं माश्यांची ॥१७॥ अरे ते जीव विषारी । बैसले माझ्या अंगावरी । माझ्यापासून झाले दूरी । लड्डूभक्त येधवां ॥१८॥ याचा करी विचार । संकट आल्या कोणावर । कोणी न साह्य करणार । एका ईश्वरावांचुनी ॥१९॥ बंकटलाल मधुरोत्तर । करितां झाला त्यावर । महाराज आणवूं कां सोनार । कांटे माश्यांचे काढावया ! ॥२०॥  समर्थ वदती मला बाधा । होणार नाहीं जाण कदा । त्या माशीरुप सच्चिदानंदा । म्यां जाणलें म्हणोन ॥२१॥ कांटे काढण्या चिमटयाची । गती नाहीं मुळीच साची । साक्ष ती ह्या गोष्टीची । मीच दावितों तुम्हांला ॥२२॥ ऐसे म्हणून कौतुक केलें । वायूलागीं रोधून धरिलें । तों कांटे अवघे वरी आले । रुतलेल्या स्थलांतून ॥२३॥ तो पाहतां प्रकार । लोक आनंदले फार । कळून आला अधिकार । श्रीगजाननस्वामींचा ॥२४॥ पुढें कणसें भाजलीं । अवघ्यांनीं तीं ग्रहण केलीं । अस्तमानीं निघून आली । मंडळी निजगृहातें ॥२५॥ असो पुढें एक वेळा । महाराज गेले अकोटाला । आपुल्या बंधूस भेटण्याला । श्रीनरसिंगजीकारणें ॥२६॥ हा कोतश्या अल्लीचा । शिष्य मराठा जातीचा । कंठमणी विठ्ठलाचा । भक्‍तिबलानें झाला असे ॥२७॥ अकोटाच्या सान्निध्यासी । एका निबिडतरशा अरण्यासी । नरसिंग राहे अहर्निशीं । एकान्तवास सेवावया ॥२८॥ ऐशा त्या अरण्यांत । नरसिंगजी जाऊन बसत । म्हणून आले अवचित । समर्थ त्यासी भेटावया ॥२९॥ गजाननासी पाहिलें । तेणें चित्त आनंदलें । स्वामी नरसिंगजीचें भलें । तो प्रेमा न वर्णवे कीं ॥३०॥ दोघे भेटले एकमेकां । दोघा आनंद सारखा । बैसते झाले आसनीं एका । हितगुज तें करावया ॥३१॥ अनुभव ते आपापले । एकमेकां कथिते झाले । नरसिंगा, तूं उत्तम केलें । प्रपंचांत राहिलास ॥३२॥ मीं त्याग केला तयाचा । स्वीकार करुन योगाचा । या सच्चिदानंद तत्त्वाचा । करितां झालों विचार ॥३३॥ गार पाण्यांत रहाते । परी न पाणी शिरूं देते । तैसेंच वागती साचें । या प्रपंचामाझारीं ॥३४॥ यापरी त्वां रहावें । अपेक्षारहित असावें । चित्तांतून ना ढळूं द्यावें । सच्चिदानंद ईशाला ॥३५॥ नरसिंग म्हणती बंधुराया ! । आलास मसी भेटावया । ही तुझी केवढी दया । उपमा याला देण्या नसे ॥३६॥ तूं कथिलें जयापरी । तैसा वागेन भूवरीं । मी, जाण वरच्यावरी । अशीच भेटी द्यावी तुवां ॥३७॥ ऐसें हितगुज उभयतांचें । रात्रभरी झालें साचें । भरतें आलें प्रेमाचें । दोघांचिया संगमीं ॥३८॥ नरसिंगजीस भेटण्या जाण । काननीं आले गजानन । ऐसें कळलें वर्तमान । गुराखीद्वारे आकोटाला ॥३९॥ तें कळतां आनंदले । लोक धावूं लागले । नारळ घेऊन निघाले । पाहाया द्वय संतांसी ॥४०॥ तों इकडे काय झालें । गजानन आधींच निघून गेले । नरसिंगासी पुसून भले । भेट ना झाली पौरांसी ॥४१॥ पुढें एकदां गजानन । करीत असतां भ्रमण । दर्यापुराच्या सन्निध जाण । येते जाहले शिष्यांसह ॥४२॥ दर्यापुराच्या शेजारीं । शिवर गांव निर्धारी । असे चंद्रभागेच्या तीरीं । व्रजभूषणा वास जेथें ॥४३॥ या शिवर गांवांत । व्रजभूषण नामें पंडित । चार भाषा अवगत । होत्या श्रोते जयाला ॥४४॥ कीर्ति ज्याच्या विद्वत्तेची । वर्‍हाडीं पसरली साची । याला भक्ति भास्कराची । आत्यंतिक असे हो ॥४५॥ प्रत्यहीं चंद्रभागेवर । स्नान करी साचार । उदयास येतां दिनकर । अर्घ्य त्यासी देतसे ॥४६॥ पंच पंच उषःकाला । व्रजभूषण उठे भला । सारुन प्रातर्विधीला । अरुणोदयीं स्नान करी ॥४७॥ तेंही शीतोदकांनीं । ऐसा कर्मठ परी ज्ञानी । मानमान्यतां विद्वज्जनीं । ज्याची होती विशेष ॥४८॥ चंद्रभागेच्या वाळवंटीं । हा गजानन बैसला ज्ञानजेठी । समोर नदीचिया कांठीं । आले व्रजभूषण स्नानाला ॥४९॥ ती प्रभातीची वेळा पाही । प्रकाशिल्या दिशा दाही । कुक्कुटाचा आवाज येई । वरचेवरी ऐकावया ॥५०॥ तईं व्रजभूषण तत्त्वतां । झाला सूर्यासी अर्घ्य देतां । तो हा पुढें ज्ञानसविता । त्यानें पाहिला प्रत्यक्ष ॥५१॥ सूर्याप्रमाणें सतेज कांति । आजानुबाहू निश्चिती । दृष्टि नासाग्राच्या वरती । स्थिर जयाची झाली असे ॥५२॥ ऐसा पुरुष पाहतां क्षणीं । व्रजभूषण हर्षला मनीं । संध्यासामान घेऊनी । आला धावून जवळ त्यांच्या ॥५३॥ अर्घ्य दिलें पायांवरी । गजाननाच्या सत्वरीं । प्रदक्षिणाही अखेरी । त्यानें घातली तयाला ॥५४॥ मित्राय नमः सूर्याय नमः । भानवे नमः खगाय नमः । ऐशी नांवें घेऊन पाहा । घातले द्वादश नमस्कार ॥५५॥ शेवटीं आरती ओवाळिली । गजाननासी आदरें भली । न्यूनता ती नाहीं पडली । कशाचीही त्या ठायां ॥५६॥ प्रार्थनापूर्वक नमस्कार । साष्टांग केला अखेर । मुखानें तें स्तवन थोर । महाराजांचें चाललें ॥५७॥ माझ्या तपाचरणाचें । फळ आजि मिळालें साचें । दर्शन दिव्य पायांचे । आज झालों धन्य मी ॥५८॥ 
(श्लोक) हे पूर्णब्रह्म जगचालक ज्ञानराशी । ऐसें युगायुगीं किती अवतार घेसी । झाल्यास दर्शने तुझें ! भय रोग चिंता । नासे गजाननगुरो ! मज पाव आतां ॥१॥ ऐसी प्रार्थना करुन । संपविलें त्यानें स्तवन । योगेश्वरें या आलिंगन । दृढ दिधलें त्या दोन्ही करें ॥५९॥ मस्तकावरीं ठेविला कर । आशीर्वाद दिधला थोर । सर्वदा तुझा जयजयकार । होईल बाळा व्रजभूषणा ॥६०॥ कर्म मार्ग सोडूं नको । विधी निरर्थक मानूं नको । मात्र त्यांत होऊं नको । लिप्त बाळा केव्हांही ॥६१॥ तूं आतां आपुल्या सदनीं । माझे बोल ठेवी मनीं । प्रत्यहीं माझें तुला ध्यानीं । होत जाईल दर्शन ॥६२॥ ऐसें म्हणून प्रसाद दिला । श्रीफलाचा श्रोते भला । त्या व्रजभूषण पंडिताला । महाराज आले शेगांवीं ॥६३॥ ह्या शेगांवाचें होतें नांव । पूर्वकालीं शिवगांव । अपभ्रंशें लाधला ठाव । शेगांव या शब्दाला ॥६४॥ महाराज शेगांवासी आले । परी न स्थिर राहिले । हमेशा ते भटकत फिरले । मनास येईल त्या स्थळा ॥६५॥ आकोट, अकोलें, मलकापूर । नांवें सांगावीं कुठवर ? । चांदण्यांची न होणार । मोजदाद कोणाही ॥६६॥ ज्येष्ठ आषाढ महिना गेला । पुढें श्रावण मास आला । उत्सव होता सुरुं झाला । मारुतीच्या राउळांत ॥६७॥ हें मारुतीचें मंदिर । शेगांवीं भव्य साचार । पाटील मंडळी थोर थोर । होती या भक्त देवाची ॥६८॥ चाले उत्सव महिनाभर । अभिषेक पोथी कीर्तन गजर । अन्नदानाशीं येई पूर । अवघे लोक तृप्त होती ॥६९॥ या उत्सवाचा पुढारी । खंडू पाटील निर्धारी । जो गांवचा कारभारी । होता उदार मनाचा ॥७०॥ त्या मारुती मंदिरासी । आले गजानन पुण्यराशी । श्रावणाच्या आरंभासी । उत्सव श्रीचा पाहावया ॥७१॥ बोलले बंकटलालासी । मी आतां या मंदिरासी । राहीन जाणा अहर्निशीं । त्याचा शोक करुं नको ॥७२॥ गोसावी संन्यासी फकीर । यांना कायमचें राहण्या घर । योग्य नाहीं साचार । तुम्हां प्रापंचिकाचें ॥७३॥ मी परमहंस संन्यासी । आतां राहातों मंदिरासी । तूं बोलाविशी ज्या दिवशीं । तेवढयापुरता येईन तेथ ॥७४॥ हें अंतरींचें गुह्य तुला । कथन केलें बंकटलाला । मान द्यावा माझ्या म्हणण्याला । यांत कल्याण तुझें असें ॥७५॥ निरुपाय होऊन अखेर । देता झाला रुकार । तो बंकटलाल सावकार । गजाननाचें म्हणण्याला ॥७६॥ मंदिरीं स्वामी समर्थ येतां । हर्ष झाला समस्तां । भास्कर पाटील शुश्रूषेकरितां । जवळ राही निरंतर ॥७७॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति षष्ठोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ५


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय गजानन असतां शेगांवीं । यात्रा येई नित्य नवी । ती कोठवरी वर्णावी ? । पार न लागे तियेचा ॥१॥ महिमा तो वाढला फार । म्हणून गजानन साधूवर । ती उपाधि करण्या दूर । भटकू लागले काननीं ॥२॥ महिना महिना तिकडेच राहावें । वाटेल तेथेंच बैसावें । कोणाशीं न उमगूं द्यावें । चरित्र आपुलें येतुलेही ॥३॥ श्रोते एका समयासी । महाराज पिंपळगांवासी । गेले तेथे गोष्ट कैसी । झाली ते अवधारा ॥४॥ त्या पिंपळगांवच्या शिवारांत । होतें एक अरण्यांत । शंकराचे मंदिर सत्य । जुनें पुराणें हेमाडपंती ॥५॥ ऐशा त्या मंदिरी । येते झाले साक्षात्कारी । बैसले शिवाच्या गाभारी । लावोनिया पद्मासन ॥६॥ गुराखी त्या गांवचे । आपापले कळप गुरांचे । घेऊनिया निघाले साचे । अस्तमानीं गांवाकडे ॥७॥ कोणी सहज मंदिरांत । गेले वंदण्या शिवाप्रत । तो तेथें पाहोन समर्थ । आश्चर्यचकित जाहले ॥८॥ याचें आता पूजन । करु अवघे आपण । जा स्नानालागून । पाणी आणा ओढयाचे ॥९॥ पोरें गेलीं ओढयावरी । गेळ्यामध्ये आणिलें वारी । परमभावें पायांवरी । घालिते झालें समर्थांच्या ॥१०॥ कोणी वन्यपुष्पें आणिलीं । माळ त्यांची तयार केली । कंठामध्यें घातिली । गुराख्यांनीं साधूच्या ॥११॥ कोणी कांदाभाकर । नैवेद्यार्थ साचार । दिली ठेवून समोर । एका वडाच्या पानावरी ॥१२॥ गुराख्यांनीं केलें नमन । आदरें भाव धरुन । कांहीं वेळ केलें भजन । पुढें बसून समर्थांच्या ॥१३॥ ऐसा आनंद चालला । तो गुराखी एक बोलला । अरे वेळ बहु झाला । चला आतां गांवाकडे ॥१४॥ या साधूची हकीकत । आपण सांगूं गांवांत । शहाण्या वडील माणसांप्रत । म्हणजे येईल कळून कीं ॥१५॥ तें अवघ्यांसी मानवलें । गुराखी सर्व निघून गेले । गांवामाजीं कळविलें । मंदिराचें अवघे वृत्त ॥१६॥ पुढें श्रोते प्रातःकाळीं । आली गांवची मंडळी । समर्थांसी पाहाण्या भली । गुराख्यांच्या बरोबर ॥१७॥ जैसा काल होता बसला । तैसाच आता पाहिला । भाकरीसी ना स्पर्श केला । ती जशीच्या तशीच आहे कीं ॥१८॥ म्हणूं लागले गांवकरी । हा योगी पुरुष कोणी तरी । आहे बैसला मंदिरीं । सांप्रत या शंकराच्या ॥१९॥ हा समाधी उतरील । तेव्हां कांहीं बोलेल । ती उतरण्या आहे वेळ । त्याला त्रास देऊं नका ॥२०॥ ऐसी भवती न भवती झाली । एक पालखी आणविली । त्यांत उचलून ठेविली । समर्थांची मूर्ति पाहा ॥२१॥ ग्रामांतील नारीनर । अवघे होते बरोबर । पुढें वाजंत्र्यांचा गजर । होत होता विबुध हो ! ॥२२॥ मिरवणूक आली गांवांत । मारुतीच्या मंदिरांत । बसविले आणून सद्‌गुरुनाथ । एका भव्य पाटावरी ॥२३॥ तोही दिवस तैसाच गेला । मग लोकांनीं विचार केला । आपण करुं स्तवनाला । उपाशी बसून याच्यापुढें ॥२४॥ ऐसा जो ते विचार करिती । तो आले देहावरती । गजानन श्रीसद्‌गुरुमूर्ति । मुगुटमणी योग्यांचे ॥२५॥ मग काय विचारतां । आनंद झाला समस्तां । प्रत्येक स्त्रीपुरुष ठेवी माथा । स्वामीचिया चरणांवरी ॥२६॥ नैवेद्याची धूम झाली । ज्यानें त्यानें आणिलीं । पात्रें तीं वाढून भली । मारुतीच्या मंदिरांत ॥२७॥ त्या अवघ्यांचा स्वीकार । समर्थें केला थोडाफार । हाळोपाळींत साचार । ही वार्ता श्रुत झाली ॥२८॥ पुढें दुसर्‍या मंगळवारीं । पिंपळगांवचे गांवकरी । आले बाजारा निर्धारीं । शेगांवाकारणें ॥३४॥ ते शेगांवच्या लोकांसी । सहज बोलले प्रेमेसी । आमच्याही गांवांसी । आला एक अवलिया ॥२९॥ शेगांवचे बाजारांत । जिकडे तिकडे हीच मात । बंकटलाला झालें श्रुत । वर्तमान तें अवलियाचें ॥३०॥ बंकटलाल पत्‍नीसहित । गेला पिंपळगांवांत । समर्थांसी जोडोन हात । विनवूं लागला नानापरीं ॥३१॥ आत्तां येतो म्हणून । निघून गेलात आपण । त्यास झाले पंधरा दिन । याचा विचार करा हो ॥३२॥ कित्येक दयाळा आपुले भक्त । राहिले असती उपोषित । त्या शेगांव शहरांत । नित्य दर्शन घेणारे ॥३३॥ तुम्ही न आल्या शेगांवीं । मी ही तनु त्यागीन वरवी । आमुची सांगा पुरवावी । आळ कोणी गुरुवर्या ? ॥३४॥ बंकटलाल ऐसें वदले । महाराज गाडीवरी बसले । शेगांवासी निघाले । पिंपळगांवा सोडून ॥३५॥ पिंपळगांवच्या लोकांप्रती । बंकटलाल समजाविती । नका होऊं दुःखित चित्तीं । जाती न कोठें लांब साधु ॥३६॥ वाटेल तेव्हां दर्शना यावें । हेतु आपुलें पुरवावें । जेथल्या तेथें असूं द्यावें । या अमोल मूर्तीला ॥३७॥ पथीं जातां गुरुमूर्ति । बोलली बंकटलालाप्रती । ही कां साहूची होय रीति । माल दुसर्‍याचा बळें न्यावा ! ॥३८॥ ऐसें ऐकतां हंसूं आलें । बंकटलालाप्रती भलें । विनयानें भाषण केलें । तें ऐका सावचित्तें ॥३९॥ जेथें बाळ तेथें आई । तेथें दुज्याचा पाड काई ? । आपुल्या पायापुढें नाहीं । मला धनाची किंमत ॥४०॥ इतकीच माझी विनंती । शेगांवीं असो वस्ती । धेनू काननातें जाती । परी येती घरी पुन्हां ॥४१॥ तसेंच तुम्हीं करावें । अवघ्या जगां उद्धरावें । परी आम्हां न विसरावें । शेगांवीं यावें वरचेवर ॥४२॥ ऐसी समजूत घालून । शेगांवीं आणले गजानन । तेथें कांहीं दिवस राहून । निघून गेले पुनरपि ॥४३॥ ती ऐकावी तुम्ही कथा । सांगतों मी इथें आतां । अडगांव नामें ग्राम होता । एक तया वर्‍हाड प्रांतीं ॥४४॥ त्या ग्रामाकारण । जाया निघाले दयाघन । प्रातःकाळीं चुकवून । नजर शेगांवकरांची ॥४५॥ मास होता वैशाख । सोळा कलांनीं तपे अर्क । क्वचित्‌ कोठें न राहिलें उदक । ऐसा प्रखर उन्हाळा ॥४६॥ माध्यान्हीच्या समयाला । अकोली गांवापासी आला । हा योगयोगेश्वर साधु भला । गजाननमहाराज ॥४७॥ तों काय घडले वर्तमान । समर्थांसी लागली तहान । करिती चौफेर अवलोकन । तों उदक कोठें दिसेना ॥४८॥ अंगावाटे चालल्या धारा । घामाच्या त्या एकसरा । अधरोष्ठ तो सुकला खरा । उदकाविण समर्थांचा ॥४९॥ ऐशा दुपारच्या अवसरीं । भास्कर नामें शेतकरी । घालीत होता पाळी खरी । आपुल्या त्या शेताला ॥५०॥ त्या अकोलीच्या शिवारांत । जलाचें दुर्भिक्ष्य अत्यंत । एक वेळा मिळेल घृत । परि अभाव पाण्याचा ॥५१॥ आपणांतें प्यावयासी । भास्करानें शेतासी । आणिलें खापराच्या घागरीसी । उदक होतें गांवांतून ॥५२॥ ती घागर झुडुपाखालीं । होती भास्करें ठेविली । त्या ठिकाणीं स्वारी आली । भास्करा जल मागावया ॥५३॥ समर्थ म्हणती भास्कराला । तहान बहुत लागली मला । पाणी दे बा प्यावयाला । नाहीं ऐसें म्हणूं नको ॥५४॥ पुण्य पाणी पाजण्याचें । आहे बापा थोर साचें । पाण्यावांचून प्राणाचें । रक्षण होणें अशक्य ॥५५॥ भास्कर बोले त्यावर । तूं नंगा धूत दिगंबर । तुला दांडग्या पाजिता नीर । पुण्यलाभ कशाचा ? ॥५६॥ तुला ना देणार पाणी । नको करुं रे विनवणी । जा जा करी येथोनी । काळें आपलें चांडाळा ॥५७॥ हें भास्कराचें भाषण । समर्थांनीं ऐकून । थोडे करुनी हास्यवदन । निघोन गेले तेथोनिया ॥५८॥ थोड्या दूर अंतरावर । एक होती साच विहीर । तिकडे धांव अखेर । घेतली स्वामीरायांनीं ॥५९॥ स्वामी तिकडे जाऊं लागतां । भास्कर झाला बोलतां । उच्च स्वरें; वेड्या वृथा । तिकडे कशाला जातोस ? ॥६०॥ ती कोरडी ठणठणीत । आहे विहीर जाण सत्य । पाणी या एक कोसांत । नाही कोठे जाण पिशा ॥६१॥ समर्थ बोलले त्यावरी । ही सत्य तुझी वैखरी । विहिरींत पाणी नाहीं जरी । परी करितों प्रयत्‍न ॥६२॥ तुझ्यासारखे बुद्धिमान । जलाने होती हैराण । तें मी नयनीं पाहून । स्वस्थ ऐसा बसलों जरी ॥६३॥ तरी समाजहितासाठीं । काय मी केली सांग गोष्टी । साह्य होतो जगजेठी । हेतु शुद्ध असल्यावर ॥६४॥ समर्थ आले विहिरीपाशीं । तों थेंब नाहीं तियेशीं । हताश होऊन वृक्षापाशीं । बसले एका दगडावर ॥६५॥ डोळे मिटून केलें ध्यान । चित्तीं साठविला नारायण । जो सच्चिदानंद दयाघन । दीनोद्धार जगद्‌गुरु ॥६६॥ देवा ही आकोली । पाण्यावांचून त्रस्त झाली । वोलही ना राहिली । कोठेच देवा विहिरीतून ॥६७॥ मानवी यत्‍न अवघे हरिले । म्हणून तुजला प्रार्थिले । पाव आतां जगन्माऊले । पाणी दे या विहिरीला ॥६८॥ ऐसें विनवितां ईश्वरा । विहिरीलागीं फुटला झरा । उफाळ्याचा साजिरा । विहीर भरली क्षणामध्यें ॥६९॥ साह्य झाल्या जगन्नाथ । काय एक ना तें होत । ईश्वरी सत्ता अगाध सत्य । जें ना घडे तेंच घडवी ॥७०॥ तेथ पाणी समर्थ प्याले । तें भास्करानें पाहिलें । चित्त त्याचें घोटाळलें । कांहीं न च चाले तर्क त्याचा ॥७१॥ वर्षें झालीं द्वादश । जल नाहीं या विहिरीस । तिलाच एका घटकेस । यानें जलमय केली कीं ॥७२॥ यावरुन हा कोणीतरी । खचित आहे साक्षात्कारी । बळेंच फिरतो पिशापरी । हें आतां समजलें ॥७३॥ शेतीचें काम सोडून । भास्कर आला धांवून । धरितां झाला दृढ चरण । मुखें स्तोत्र आरंभिलें ॥७४॥ हे नरदेहधारी परमेश्वरा । हे दयेच्या सागरा । लेंकरासी कृपा करा । अर्भक मी तुमचें असें ॥७५॥ तुम्हांतें ना जाणून । मी बोललों टाकून । आतां पस्तावा झाला पूर्ण । क्षमा त्याची करा हो ॥७६॥ तैसा तुझा अधिकार । केवढा तरी आहे थोर । तें कळलें साचार । या जलाच्या कृतीनें ॥७७॥ कांहीं असो सद्‌गुरुनाथा । मी न सोडी तुम्हां आतां । लेंकरानें भेटतां । माये कोठें न रहावें कीं ॥७८॥ भास्करासी समर्थ म्हणती । ऐसा न होई दुःखित चित्तीं । आतां घागर डोक्यावरती । गांवांतून आणूं नको ॥७९॥ तुझ्यासाठीं हें जीवन । विहिरींत केलें निर्माण । आतां कशाची नुरली वाण । मग कां प्रपंच टाकिशी ? ॥८०॥ पाणी आलें तुझ्याकरितां । बगीचा तो लाव आतां । भास्कर म्हणे गुरुनाथा । हें आमीष दावूं नका ॥८१॥ पहा श्रोते संतसंगति । क्षणैक घडतां भास्कराप्रती । केवढी झाली उपरति । याचा विचार करा हो ॥८२॥ खर्‍या संताचें दर्शन । आगळें सर्व साधनांहून । तुकारामें केलें वर्णन । संत चरणरजाचे अभंगीं ॥८३॥ पाणी लागलें विहिरीस । ही वार्ता आसपास । पसरतां जन दर्शनास । धांवूं लागले स्वामींच्या ॥८४॥ तैसे श्रोते तेथ आले । लोक अपार मिळाले । विहिरीचें पाणी पाहिले । पिऊन त्यांनी तेधवां ॥८५॥ उदक निर्मळ शीत मधुर । गोड अमृताहून फार । करुं लागले जयजयकार । गजाननाचा लोक सारे ॥८६॥ असो पुढें भास्करासहित । अडगांवासी न जातां परत । महाराज आले शेगांवांत । श्रीगजानन सिद्धयोगी ॥८७॥ शुभं भवतु ॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥
॥ इति पंचमोऽध्यायः समाप्तः ॥