Feb 11, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ४


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय बंकटलालाचे घरांत । असतां स्वामी समर्थ । प्रकार एक अघटीत । आला ऐसा घडोनी ॥१॥ वैशाख शुद्ध पक्षासी । अक्षयतृतीयेचिया दिवशीं । पितरार्थ उदककुंभासी । देती श्राद्ध करोनिया ॥२॥ त्या दिवशीं काय झालें । तें पाहिजे श्रवण केलें । महाराज पोरांत बैसले । कौतुकें लीला करावया ॥३॥ बालकां म्हणती गजानन । चिलीम द्यावी भरुन । तंबाखूची मजकारण । विस्तव वरी ठेवोनिया ॥४॥ ऐसी आज्ञा ऐकतां भली । पोरें अवघीं आनंदलीं । चिलीम भरुं लागलीं । तंबाखू आंत घालुनिया ॥५॥ पोरें चित्तीं विचार करिती । आपापसांत निश्चिती । कशी करावी यासी युक्ति । विस्तव पाहिजे चिलिमीला ॥६॥ मुलें पाहून चिंतातुर । बंकट करी मधुरोत्तर । अरे जानकीराम सोनार । आहे वेटाळी आपुल्या ॥७॥ त्याच्याकडे तुम्ही जावें । विस्तवासी मागून घ्यावें । दुकान तें चालण्या बरवें । विस्तव लागतो आधीं त्या ॥८॥ पोरांनीं तें ऐकिलें । जानकीरामाकडे आले । विस्तव मागूं लागले । समर्थांच्या चिलमीस ॥९॥ जानकीराम रागावला । लेंकरासी बोलता झाला । अक्षयतृतीयेच्या सणाला । दे न कोणा विस्तव मी ॥१०॥ पोरें म्हणालीं त्यावर । जोडोनी आपले दोन्ही कर । नको करुं हा अविचार । विस्तव पाहिजे समर्थाला ॥११॥ सोनार म्हणे बालकांसी । गजानन कशाचा पुण्यराशी ? । त्या चिलमीबहाद्दरासी । साधु म्हणून सांगूं नका ॥१२॥ तो आहे ना साक्षात्कारी । मग विस्तव कशाला पाहिजे तरी ? । आपुल्या कर्तृत्वें कां न करी । विस्तवातें निर्माण ? ॥१३॥ जा जा उभे न राहा येथ । विस्तव ना मिळे तुम्हांप्रत । नाहीं मला किंमत । त्या तुमच्या पिशाची ॥१४॥ पोरें विन्मुख परत आलीं । महाराजांसी निवेदिली । हकीकत जी कां झाली । सोनाराचे दुकानांत ॥१५॥ ती ऐकतां हास्यवदन । करिते झाले दयाघन । नाहीं आपणां प्रयोजन । मुळींच त्याच्या विस्तवाचें ॥१६॥ ऐसें म्हणोनि घेते झाले । चिलीम आपुल्या हातीं भले । बंकटलालासी बोलले । काडी एक वरती धरीं ॥१७॥ बंकटलालें तैसें केलें । नुसत्या एका काडीस धरिले । चिलमीचिया वरती भले । समर्थ आज्ञा म्हणून ॥१८॥ तों काय झाला प्रकार । ऐका तुम्ही श्रोते चतुर । प्रगट झाला वैश्वानर । काडी नुसती धरतां वरी ॥१९॥ काडीप्रती विस्तवाचा । अंशही नव्हता साचा । हा प्रभाव शक्तीचा । महाराजांच्या लोकोत्तर ॥२०॥ काडी तैसीच राहिली । चिलीम तीही पेटली । कशाचीही नाहीं उरली । जरुर खर्‍या साधूला ॥२१॥ याचें नांव साधुत्व । उगीच नव्हतें थोतांड मत । आतां सोनाराचे घरांत । काय झालें तें ऐका ॥२२॥ या अक्षयतृतीयेला । मान विशेष चिंचवण्याला । जेवीं वर्षप्रतिपदेला । महत्त्व निंब फुलांचें ॥२३॥ असो भोजना बैसली पंगत । चिंचवणें वाढलें द्रोणांत । तों प्रकार ऐसा अघटीत । घडून आला तो ऐका ॥२४॥ त्या चिंचवण्या माझारीं । अळ्या दिसल्या नानापरी । बुजबुजाट झाला भारी । किळस वाटली सर्वांना ॥२५॥ लोक उठले पात्रांवरुन । अवघ्या अन्नातें टाकून । सोनार बसला अधोवदन । कारण कांहीं उमजेना ॥२६॥ चिंचवण्याच्या संगें भलें । अवघें अन्न वायां गेलें । मग त्या कोडें उमगलें । ऐसें व्हाया मीच कारण ॥२७॥ मी न साधूंसी विस्तव दिला । त्याचा प्रत्यय तात्काळ आला । गजाननाची अगाध लीला । मी न खचित जाणिली ॥२८॥ कांहीं असो आतां जाऊं । समर्थांचे पाय पाहूं । पदीं त्यांच्या अनन्य होऊं । क्षमा मंतूची मागावया ॥२९॥ ऐसा विचार करुनी । सवें घेऊनि चिंचवणी । बंकटलालाच्या सदनीं । आला हकीकत सांगावया ॥३०॥ आतां इतुकीच विनंती । आहे शेटजी तुम्हांप्रती । मला नेऊन पायांवरतीं । घाला शीघ्र समर्थांच्या ॥३१॥ समर्थांपुढें भीत भीत । जानकीराम गेला त्वरित । घातलें त्यानें दंडवत । अष्टांगेंसी समर्था ॥३२॥ आणि म्हणाला दयाघना ! । तुला येवो माझी करुणा । मीं अपराध केले नाना । त्यांची क्षमा करावी ॥३३॥ जी शिक्षा आज केली । तेवढीच मजसी पुरे झाली । तूं अनाथांचा आहेस वाली । आतां अंत पाहू नको ॥३४॥ महाराज बोलले त्यावर । खोटें न सांगे तिळभर । तुझें चिंचवणी आहे मधुर । किडे न पडले त्यामध्यें ॥३५॥ तें ऐकतां अवघ्यांनीं । पाहिलें तें चिंचवणी । पहिला प्रकार मावळोनी । गेला होता तेधवां ॥३६॥ अवघ्यांप्रती आश्चर्य झालें । समर्थांचें महत्त्व कळलें । हां हां म्हणतां पसरलें । वृत्त हें त्या गांवामध्यें ॥३७॥ चंदुमुकीन नांवाचा । गृहस्थ एक शेगांवाचा । निःसीम भक्त समर्थांचा । त्याची कथा ऐका ही ॥३८॥ श्रोते ज्येष्ठ मासांत । सभोंवार बसले भक्त । अति आदरें जोडोन हात । दृष्टि ठेवून पायावरी ॥३९॥ कोणी आंबे कापिती । कोणी फोडी हातांत देती । कोणी पंख्याने घालिती । वारा समर्थांकारणें ॥४०॥ तयीं महाराज म्हणाले चंदूला । हे आंबे नकोत मला । दोन कान्होले उतरंडीला । आहेत तुझ्या ते आण जा ॥४१॥ चंदू घराप्रती गेला । कांतेस पुसूं लागला । दोन कान्हवले उतरंडीला । आहेत काय रंभोरु ? ॥४२॥ तैं बोले अंगना । होऊन गेला एक महिना । आतां कान्हवले आपुल्या सदना । मिळतील कशाचे ? ॥४३॥ अक्षयतृतीया दिवशीं भले । कान्हवले मीं पतिराया केले । ते न आतां राहिले । संपून गेले त्याच दिनीं ॥४४॥ मर्जी असल्या नवे करिते । समर्थांस्तव तळून देते । ही पाहा मी ठेवितें । कढई नाथा चुलीवर ॥४५॥ चंदू बोले त्यावरी । ताजे नकोत सुंदरी । जे तूं उतरंडीमाझारी । दोन ठेविले तेच दे ॥४६॥ ऐसे ऐकतां पतिवचन । कांता गेली घोटाळून । करुं लागली शोधन । कान्हवल्याचे चित्तांतरीं ॥४७॥ कान्हवल्यांचा शोध करितां । आठवण झाली तत्त्वतां । उघड म्हणे थांबा नाथा । सत्य गिरा समर्थांची ॥४८॥ ऐसें बोलून तात्काळ उठली । उतरंड सर्व धांडोळली । कान्हवलें ते ठेवलेली । कळशी होती खापराची ॥४९॥ आंत जों पाहिलें न्याहाळून । तों दृष्टी पडले तिच्या दोन । कान्हवले जे सुकोन । गेले होते थोडके ॥५०॥ कान्हवल्यातें पाहोन । उभयतांचें हर्षलें मन । धन्य साधु गजानन । महा समर्थ सिद्धयोगी ॥५१॥ चंदू कान्हवले घेऊन आला । समर्थांसी अर्पिता झाला । लोक करती आश्चर्याला । त्याच्या कृतीतें पाहून ॥५२॥ लोक म्हणती गजानन । खचित असती त्रिकालज्ञ । भूत भविष्य वर्तमान । यांसी अवघे कळतसे ॥५३॥ शेगांवच्या दक्षिणेसी । चिंचोली गांव परियेसी । तेथील एक रहिवासी । माधव नामें विप्र होता ॥५४॥ वय ज्याचें साठावर । अवयव झाले क्षीण फार । तरुणपणीं संसार । हेंच होतें ब्रह्म ज्याचें ॥५५॥ माधवासी न कोणी उरले । कांतापुत्र मरुन गेले । म्हणून विरक्त जाहलें । मन तयाचें संसारीं ॥५६॥ आतां माझा वाली कोण ? । दीनदयाळा तुजवांचून । माझें हें अरण्यरुदन । तुजविण देवा कोण ऐके ? ॥५७॥ ऐसा अनुताप धरुन पोटीं । शेगांवीं आला शेवटीं । गजाननाच्या द्वारवंटीं । हट्ट धरुन बैसला ॥५८॥ आरंभिलें उपोषण । अन्नपाण्यातें त्यागून । वदनीं वदे नारायण । खंड न पडे तयाला ॥५९॥ ऐशापरी एक गेला । दिवस परी नाहीं उठला । तईं महाराज वदले तयाला । हें करणें उचित नसे ॥६०॥ अशाश्वताचें पोषण । केलें शाश्वता विसरुन । त्या कर्माचीं तुजलागून । फळें भोगणें भाग असे ॥६१॥ तेंही म्हणणें माधवाला । नाहीं पटलें तसाच बसला । समर्थांच्या सान्निध्याला । नाम घेत हरीचें ॥६२॥ रात्र झाली दोन प्रहर । तमें आक्रमिलें अंबर । निशीचा तो शब्द किर्र । होऊं लागला वरच्यावरी ॥६३॥ आसपास कोणी नाहीं । ऐसें पाहून केलें कांहीं । कौतुक तें लवलाही । स्वामी गजाननांनीं ॥६४॥ रुप धरिले भयंकर । दुसरा यमाजी भास्कर । आ पसरुन माधवावर । धांवून आले भक्षावया ॥६५॥ तेणें माधव पळाला । घेऊन आपला जीव भला । धडकीं भरली चित्ताला । छाती उडे धडधड ॥६६॥ बुडबुडा आला तोंडासी । शब्द फुटेना वाचेसी । ऐशा पाहोन स्थितीसी । समर्थें धरिलें सौम्य रुप ॥६७॥ आणि बोलले गर्जोन । हेंच कां तुझें धीटपण । तूं काळाचें भक्ष्य जाण । असाच खाईल काळ तुला ॥६८॥ माधव ऐसें ऐकतां । झाला विनयें बोलतां । यमलोकाची नको वार्ता । तेवढी माझी टाळा हो ॥६९॥ माझ्या पातकांच्या राशी । आहेत जरी बहुवशी । परी त्या जाळणें तुम्हांसी । नाहीं मुळीं अशक्य ॥७०॥ कांही सुकृत पदरीं होतें । म्हणून पाहिले तुम्हांतें । संतभेटी ज्याला होतें । यमलोक ना तयासी ॥७१॥ ऐसें ऐकतां भाषण । समर्थें केलें हास्यवदन । महापतीता पावन । साधूच एक करिती कीं ॥७२॥ श्रीमन्नारायण नारायण । ऐसेंच माधवा करी भजन । जवळ आलें तुझें मरण । आतां गाफील राहूं नको ॥७३॥ किंवा अजून वांचण्याची । आस आहे तुला साची । ती असल्यास आयुष्याची । वाढ तुझ्या करितों मी ॥७४॥ माधव म्हणे गुरुराया । नको मला आयुष्य सदया । ओखटी ही प्रपंचमाया । त्यांत पुन्हां गोवूं नको ॥७५॥ तथास्तु ऐसें महाराज वदले । तूं जें मागसी तें मीं दिलें । आतां तुला नाहीं उरलें । जन्मास येणें भूमीवर ॥७६॥ असो माधवाचें देहावसान । समर्थासन्निध झालें जाण । चुकलें त्याचें जन्ममरण । गजाननाच्या कृपेनें ॥७७॥ असो एक्या समयीं भली । समर्थांसी इच्छा झाली । ती त्यांनीं निवेदिली । आपुल्या शिष्यवर्गातें ॥७८॥ वैदिक ब्राह्मण बोलवा । मंत्रजागर येथें करवा । वेदश्रवणें देवदेवा । आनंद होतो अतिशय ॥७९॥ ऐसें भाषण ऐकिलें । शिष्य विनवूं लागले । ऐसे वैदिक नाहीं उरले । या आपुल्या शेगांवीं ॥८०॥ महाराज म्हणाले त्यावरी । करा उद्यां तयारी । ब्राह्मण धाडील श्रीहरी । तुमच्या वसंतपूजेला ॥८१॥ मग काय विचारितां । अवघे हर्षले तत्त्वतां । झाली तयारी हां हां म्हणतां । रुपये शंभर झाले जमा ॥८२॥ दोन प्रहरचे समयाला । ब्राह्मण आले शेगांवाला । जे पद क्रम जटेला । जाणत होते विबुध हो ! ॥८३॥ थाटांत वसंतपूजा झाली । ब्राह्मण मंडळी आनंदली । दक्षिणा घेऊनी गेली । अन्य ग्रामाकारणें ॥८४॥ संतांच्या जें मनीं येत । तें तें पुरवी रमानाथ । कमी न पडे यत्किंचित । ऐसा प्रभाव संतांचा ॥८५॥ बंकटलाल प्रतिवर्षी । व्रत हें चालवी अतिहर्षी । अजून परी शेगांवासी । वंशज त्याचे करिती हें ॥८६॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति चतुर्थोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय ३


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय असो बंकटलाला घरीं । राहाते झाले साक्षात्कारी । दीन दुबळ्यांचे कैवारी । श्रीगजानन महाराज ॥१॥ लांबलांबोनि भक्त येती । समर्थांतें वंदिती । मधु तेथें माश्या जमती । न लगे करणें आमंत्रण ॥२॥ एके दिनी काय झालें । तें आतां सांगतों वहिलें । महाराज होते बसलेले । निजासनीं आनंदांत ॥३॥ ऐशा त्या रम्य वेळेस । एक साधु शेगांवास । येतां झाला दर्शनास । श्रीगजानन साधुंच्या ॥४॥ दर्शनासी भीड फार । होवो लागली साचार । अशा स्थितींत मिळणार । सवड कशी त्या गोसाव्यास ? ॥५॥ तों ठायींच बैसोन । करुं लागला चिंतन । म्हणे समर्थांचे चरण । दृष्टि पडणें कठीण मला ॥६॥ समर्थांचा लौकिक भला । मी काशींत ऐकला । आवडीनें नवस केला । भांग स्वामीस अर्पिण्याचा ॥७॥ गांजाचें नांव काढितां । लोक मजला देतील लाथा । मी तो आलों फेडण्याकरितां । नवस गांजाचा शेगांवीं ॥८॥ तें त्याचें मनोगत । जाणते झाले समर्थ । बोलते झाले इतरांप्रत । आणा काशीचा गोसावी ॥९॥ तो पहा त्या कोपर्‍याला । आहे बिचारा दडून बसला । हें ऐकतां आनंद झाला । गोसाव्याला परमावधी ॥१०॥ आणि बोलला मनांत । त्रिकालज्ञ हे खरेच संत । मी जें बोललों मनांत । तें सर्व यांनीं जाणलें ॥११॥ मंडळींनीं गोसाव्याला । पुढें आणोन उभा केला । तों महाराज वदले तयाला । काढ झोळीची पोटळी ॥१२॥ जी तीन महिनेपर्यंत । रक्षण केलीस झोळींत । त्या पोटळीचें आज येथ । होवो दे गा पारणें ॥१३॥ गोसावी होता महा धूर्त । तो बोलला भीत भीत । जोडुनिया दोन्ही हात । ऐसें नम्र वाणीनें ॥१४॥ मी बुटी काढितों । नवस आपुला फेडितों । परि मागणें मागतों । एक तें द्या दीनाला ॥१५॥ आठवण माझ्या बुटीची । नित्य राहावी आपणा साची । हीच इच्छा मानसींची । आहे ती पूर्ण करा ॥१६॥ महाराज किंचित्‌ घोटाळले । परि अखेर होय म्हणाले । माय पुरवी बालक-लळे । वेडेवाकुडे असले जरी ॥१७॥ गोसाव्यानें बुटी काढिली । हातावरी घेवोन धुतली । चिलमींत घालून पाजिली । पुण्यपुरुष गजानना ॥१८॥ कांहीं दिवस राहोन । गेला गोसावी निघोन । आपणां धन्य मानोन । रामेश्वराकारणें ॥१९॥ ऐसी गांजाची पडली प्रथा । ते ठायीं तत्त्वतां । परी व्यसनाधीनता । न च आली समर्थांतें ॥२०॥ वेदऋचा अस्खलित । उदात्त-अनुदात्त स्वरांसहित । कधीं म्हणाव्या मुखीं सत्य । कधीं त्यांचें नांव नसे ॥२१॥ कधीं गवयासमान । अन्य अन्य रागांतून । एकाच पदातें गाऊन । दाखवावें निजलीलें ॥२२॥ चंदन चावल बेलकी पतीया । प्रेम भारी या पदा ठाया । ते आनंदांत येवोनिया । वरच्यावरी म्हणावें ॥२३॥ कधीं गणगणाचें भजन । कधीं धरावें नुसतें मौन । कधीं राहावें पडून । शय्येवरी निचेष्टित ॥२४॥ कधीं वागावें पिशापरी । कधीं भटकावें कांतारीं । कधीं शिरावें जाऊन घरीं । एखाद्याच्या अवचीत ॥२५॥ असो त्या शेगांवांत । जानराव देशमुख विख्यात । होता त्याचा प्राणान्त । व्हावयाचा समय आला ॥२६॥ व्याधी शरीरी बळावली । शक्ति पार निघून गेली । प्रयत्‍नांची कमाल केली । वैद्यांनी ती आपुल्या ॥२७॥ नाडी पाहोन अखेर । आप्ता कळविला समाचार । प्रसंग आहे कठीण फार । नसे आशा वांचण्याची ॥२८॥ वैद्यानें टेकिले हात । प्रयत्‍न झाले कुंठित । आतां अखेरच्या यत्‍नाप्रत । करोन पाहूं एक वेळा ॥२९॥ बंकटलालाचिये घरीं । आहेत एक साक्षात्कारी । त्यांच्या योगें शेगांव नगरी । झाली प्रती पंढरपूर ॥३०॥ त्याचें पाहूं प्रत्यंतर । जा जा कोणी जोडा कर । नका करुं रे उगा उशीर । वेळ अंतसमयाची ॥३१॥ तें ऐकोनी एक आप्त । आला बंकटसदनाप्रत । जानरावाची हकीकत । बंकटलाला कथन केली ॥३२॥ जानराव देशमुखाचा । समय अंतकाळाचा । आला आहे जवळी साचा । म्हणून आलों तुम्हांकडे ॥३३॥ महाराजांचें चरणतीर्थ । द्या कृपा करोनी मजप्रत । तें तीर्थ नोहे अमृत । होईल वाटे जानरावा ॥३४॥ प्याल्यामध्यें भरुन पाणी । समर्थांच्या लाविलें चरणीं । आणि केली विनवणी । तीर्थ देतो जानरावा ॥३५॥ समर्थें तुकाविली मान । तीर्थ पाजिलें नेऊन । जानरावाकारण । घरघर घशाची बंद झाली ॥३६॥ हात हालवूं लागला । किंचित् डोळा उघडिला । उतार पडूं लागला । तीर्थप्रभावें देशमुखासी ॥३७॥ मग औषधी बंद केली । तीर्थीं भिस्त ठेविली । ज्या-योगें लाभती झाली । आरोग्यता जानरावा ॥३८॥ आठ दिवसांमाझारीं । जानराव झाला पहिल्यापरी । भवानीरामाचीये घरीं । आला दर्शना समर्थांच्या ॥३९॥ पहा संतांचें चरणतीर्थ । साधनांत झालें अमृत । संत न ते साक्षात्‌ । देव कलीयुगीचे ॥४०॥ येथें एक ऐसी शंका । उत्थान पावे सहज देखा । श्रीगजाननासारिखा । संत होता शेगांवीं ॥४१॥ मग तो तेथें असतांना । गेलें न पाहिजे कोणी जाणा । यमाजी पंताचीया सदना । परि हाच आहे कुतर्क ॥४२॥ संत मृत्यु ना टाळिती । निसर्गाप्रमाणें वागती । परि संकटांतें वारिती । आगंतुक असल्यास ते ॥४३॥ याचें रहस्य इतुकेंचि आहे । हें गंडांतर टाळिती पाहे । तें टाळणें कांहींच नोहे । अशक्य संत पुरुषाला ॥४४॥ हे गंडांतर रूपाचें । मृत्यू दोन प्रकारचे । भौतिक आणि दैविक साचे । हे आहेत ख्यात जगीं ॥४५॥ तैसा जानरावाचा । मृत्यु गंडांतर स्वरुपाचा । होता तो टाळिला साचा । समर्थतीर्थ देवोनिया ॥४६॥ श्रद्धा पूर्ण असल्यावरी । तीच मृत्यु टाळी खरी । श्रद्धाच अवघ्या माझारीं । सर्व बाजूंनीं श्रेष्ठ असे ॥४७॥ चरणतीर्थ साधूंचें । तेंही टाळी मृत्यु साचे । वरील दोन प्रकारचे । परी तो साधु पाहिजे ॥४८॥ गजानन नव्हते वेषधारी । ते पूर्ण साक्षात्कारी । म्हणून तीर्थानें झाली बरी । व्याधि जानरावाची ॥४९॥ देशमुख बरा झाल्यावर । भंडारा घातिला थोर । साधुप्रीत्यर्थ साचार । बंकटलालाचिये घरीं ॥५०॥ तीर्थें देशमुख बरा झाला । परी स्वामीशीं पेच पडला । त्यांनी मनासी विचार केला । तो ऐका येणें रितीं ॥५१॥ कडकपणा धरल्याविना । ही उपाधि टळेना । स्वार्थसाधू प्रापंचिकांना । साधुत्वाची चाड नसे ॥५२॥ त्या दिवसापासून । आणूं लागलें अवसान । स्वामी महाराज दयाघन । वरपांगी कडक झाले ॥५३॥ हा त्यांचा कडकपणा । असह्य झाला इतरांना । परी त्यांच्या भक्तांना । कांहीं न त्याचे वाटलें ॥५४॥ असो आतां गोष्ट दुसरी । सांगतों मी तुम्हां खरी । कस्तुरीच्या शेजारीं । बसल्या माती मोल पावे ॥५५॥ श्रीगजाननाचे सन्निध । ऐसाच होता एक मैंद । संतसेवा हाच मद । अंगीं ज्याच्या भरला असे ॥५६॥ तो सेवा करी वरीवरी । भाव निराळा अंतरीं । मिठाई पेढे सावरी । समर्थांच्या नांवांवर ॥५७॥ मी कल्याण समर्थांचा । अत्यंत आहे आवडीचा । कधीं न खालीं जावयाचा । शब्द माझा त्यांच्यापुढें ॥५८॥ ऐसें लोकांस सांगतसे । आपला सवरात करीतसे । त्या अधमाचें नांव असें । माळी विठोबा घाटोळ ॥५९॥ तें अंतर्ज्ञानांनीं । जाणिलें सर्व समर्थांनीं । कौतुक केलें एके दिनीं । तें ऐका विबुध हो ॥६०॥ परस्थ कांहीं मंडळी । शेगांवीं दर्शना आली । तों मूर्ति होती निजलेली । समर्थांची शय्येवर ॥६१॥ हिय्या कुणाचा होईना । जागे करण्या समर्थांना । मंडळीस होती जाणा । त्वरा पुढें जाण्याची ॥६२॥ ते कुजबुज करूं लागले । विठोबाला विनवते झाले । विठोबा आम्हां पाहिजे गेलें । येथून आतांच परगांवा ॥६३॥ तूं समर्थांच्या शिष्यांत । मुख्य धोरणी महाधूर्त । तुला आम्ही जोडितों हात । समर्थांचे दर्शन घडवावें ॥६४॥ ऐशा त्या स्तुतींनीं । विठोबा फुगून गेला मनीं । त्यानें जाऊन तत्क्षणीं । महाराजांसी उठविलें ॥६५॥ मंडळींचें काम झालें । परी संकट ओढवलें । घाटोळ विठोबावरी भले । कर्म जैसें तैसें फल ॥६६॥ समर्थांच्या हातीं काठी । एक होती भली मोठी । तीच त्यांनीं घातली पाठीं । त्या विठोबा माळ्याच्या ॥६७॥ म्हणती मला लावितो उपाधी । घंटे आणून बांधितो मठीं । घुमारे घाली कधीं कधीं । ऐसा अती नीच हा ॥६८॥ त्या घुमार्‍याचें बक्षीस । घे मी देतों तुला खास । तुजवरी केल्या कृपेस । होईन प्रभूचा अपराधी ॥६९॥ ऐसा रीतीं ठोकला । छड्याखालीं घाटोळाला । विठोबा तो पळाला । पुनः न आला मागुती ॥७०॥ नशीब विठोबा घाटोळाचें । अति खडतर होतें साचें । पाय लाभून साधूचें । दैवें दूर झालें कीं ॥७१॥ जरी तो ना ढोंग करितां । तरी योग्यतेप्रती चढता । संतांची ती योग्यता । त्यानें मुळीं ना जाणिलीं ॥७२॥ ऐसें न कोणी करावें । संतापासीं राहून बरवें । तेथें विचारा ठेवावें । अहर्निशीं जागृत ॥७३॥ श्रीहरिहरापर्णमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति तृतीयोऽध्यायः समाप्तः ॥

Feb 10, 2022

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय २


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय मागले अध्यायीं झालें कथन । समर्थ गेले निघून । तेणें बंकटलाला लागून । हुरहूर वाटूं लागली ॥१॥ गोड न लागे अन्नपाणी । समर्थांचा ध्यास मनीं । न हाले दृष्टिपासोनी । गजाननाचें रुप तें ॥२॥ ऐशा रीति चित्तीं भलें । विचाराचें काहूर झालें । शेगांव अवघें धुंडाळिलें । परी न पत्ता लागला ॥३॥ घरीं येतां वडील पुसती । भवानीराम सन्मती । बाळा तुझी आज वृत्ती । का रे झाली चंचळ ॥४॥ कांहीं तरी सांगून । केलें पित्याचें समाधान । पुन्हा शोधाकारण । फिरुं लागला शेगांवीं ॥५॥ बंकटलालाचे शेजारीं । एक होते सदाचारी । घरीं होती जमेदारी । परी अभिमान नसे त्याचा ॥६॥ ते देशमुख रामाजीपंत । वयानें वृद्ध अत्यंत । बंकटलालानें इत्थंभूत । हकीकत त्यांना निवेदिली ॥७॥ ते बोलले बंकटलाला । तुझा वृत्तान्त मी ऐकिला । तूं जो पुरुष कथिसी मला । तो योगी असावा कोणीतरी ॥८॥ ऐशा स्थितीत दिवस चार । गेले निघून साचार । बंकटलालासी तीळभर । विसर न पडे तयाचा ॥९॥ गोविंदबुवा टाकळीकर । होते एक कीर्तनकार । ज्यांच्या कीर्तनीं शारंगधर । प्रसन्नचित्त होतसे ॥१०॥ शंकराच्या मंदिरीं । झाली कीर्तनाची तयारी । धांवो लागल्या नरनारी । कीर्तन ऐकायाकारणें ॥११॥ बंकटलालही तेथें आला । कीर्तन श्रवणासाठीं भला । मध्यें शिंपी भेटला । पितांबर नाम ज्याचें ॥१२॥ दोघे कीर्तना चालले । तों अवचित समर्थ पाहिले । मागल्या बाजूस बसलेले । फरसावरी तेधवां ॥१३॥ मग कशाचें कीर्तन । गेले उभयतां धांवून । जेवीं द्रव्य-घटातें पाहून । कृपण जाय हपापोनी ॥१४॥ तैसें उभयतांसी झालें । दूर उभे राहिले । विनयानें बोलूं लागले । कांहीं आणूं का खावया ? ॥१५॥ महाराज बोलले त्यावरी । तुला गरज असेल जरी । आण झुणका भाकरी । माळणीच्या सदनातून ॥१६॥ बंकटलालें सत्वरीं । चून अर्धी भाकरी । आणोन ठेविली हातावरी । तया योगेश्वराच्या ॥१७॥ चून भाकरी खात खात । वदले पितांबरासी समर्थ । जा जावोनी ओढयाप्रत । तुंबा भरोनी आण पाणी ॥१८॥ पितांबर बोले गुरुराया । ओढयास पाणी अल्प सदया । पाण्यांत तुंबा बुडावया । मुळीं नाहीं अवसर ॥१९॥ इतुकें असुन तें पाणी । खराब केले गुरांनी । तेवीं जाणाऱ्या येणाऱ्यांनी । नाहीं पिण्याच्या योग्य तें ॥२०॥ मर्जी असल्या दुसरीकडून । पाणी आणितों तुंबा भरुन । तैं बोलले गजानन । दुसरें पाणी आम्हां नको ॥२१॥ नाल्याचेंच आण पाणी । आंत तुंबा बुडवोनी । उगीच ओंजळी-ओंजळींनीं । तुंब्यांत पाणी भरुं नको ॥२२॥ तुंबा घेऊन पितांबर । तात्काळ गेला नाल्यावर । तुंबा भरेल ऐसे नीर । कोठें न त्यानें पाहिलें ॥२३॥ ऐसी झाली आड विहीर । चिंतावला पितांबर । हिय्या करुन अखेर । तुंबें स्पर्श केला जला ॥२४॥ तो ऐसें झालें अघटित । तुंबा ठेवावा जेथ जेथ । तो बुडे तेथ तेथ । खळगा पडून ओढयाला ॥२५॥ नाल्याचें घाण जीवन । तुंब्यांत स्फटिकासमान । आलें तैसें पाहोन । शिंपी चित्तीं चकित झाला ॥२६॥ तुंबा आणून ठेविला । योगेश्वराचे सान्निध्याला । त्याचा समर्थें स्वीकार केला । झुणकाभाकर सेविल्यावर ॥२७॥ बंकटलालासी सुपारी । मागते झाले साक्षात्कारी । अरे माळीणीच्या भाकरीवरी । माझी सेवा करतोस कां ? ॥२८॥ सुपारीच्या बरोबरी । दोन पैसे हातावरी । ठेवितां झाला व्याघ्रांबरी । बंकटलाल समाधानें ॥२९॥ पैशाप्रती पाहून । महाराज बोलले हांसोन । काय व्यापारी समजून । मजला तूं हें अर्पिसी ? ॥३०॥ हें नाणें तुमचें व्यवहारीं । मला न त्याची जरुरी । भावभक्ति नाण्यावरी । संतुष्ट मी रहातसे ॥३१॥ जा आतां कीर्तन । दोघे जाऊन करा श्रवण । मी लिंबापाशीं बैसोन । कथा त्याची ऐकतो ॥३२॥ दोघे कीर्तनाप्रती आले । महाराज लिंबापाशीं बैसले । गोविंदबुवांचें सुरु झालें । आरंभीचें निरुपण ॥३३॥ बुवांनीं पूर्वार्धा विशद केलें । त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले । तें ऐकोन घोटाळले । गोविंदबुवा मनांत ॥३४॥ हा उत्तरार्ध वदणारा । पुरुष अधिकारी दिसतो खरा । जा त्या घेऊन मंदिरा । या हो कीर्तन श्रवणास ॥३५॥ बंकटलाल पितांबर । आणिक मंडळी निघाली इतर । समर्थासी साचार । कीर्तनासी आणावया ॥३६॥ केली विनंती अवघ्यानीं । श्रोते अती विनयांनीं । परी बसल्या जागेपासोनी । मुळीं न महाराज हलले हो ॥३७॥ गोविंदबुवा अखेर । येवोन जोडीते झाले कर । कृपा करावी एक वार । चला शिवाच्या मंदिरीं ॥३८॥ ऐसें गोविंदबुवा बोलतां । समर्थ वदलें तत्त्वतां । ठेवी एकवाक्यता । भाषणीं गोविंदा लवमात्र ॥३९॥ तूं इतक्यांत प्रतिपादिलें । अवघें ईश्वरें व्यापिलें । आंत बाहेर कांहीं न उरलें । मग हा ऐसा हट्ट कां ? ॥४०॥ जें जें जयानें सांगावें । तें तें त्यानें आचरावें । शब्दच्छलासी न करावें । साधकानें केव्हांही ॥४१॥ पोटभर्‍या कथकेरी । तूं न व्हावें भूमीवरी । जा कीर्तन समाप्त करी । मी येथून ऐकतों ॥४२॥ बुवा कीर्तनीं परत आले । गर्जोन अवघ्या बोलिले । तुमच्या शेगांवीं अमोल आलें । रत्‍न हें त्या सांभाळा ॥४३॥ कीर्तन अवघें सांग झालें । लोक आपुल्या घरां गेले । बंकटलाल घरीं आले । चित्तीं हर्ष माईना ॥४४॥ आपल्या सन्माननीय पित्यासी । हकीकत कथिली प्रेमेसी । बाबा आपुल्या घरासी । गजानन आणा हो ! ॥४५॥ पुत्रानें जें कथन केलें । तें भवानीरामें ऐकिलें । आणि प्रेमें ऐसें वदलें । तूंच ये त्या घेऊन ॥४६॥ पित्याची मिळाली संमती । बंकटलाल हर्षें अती । म्हणे कधीं भेटेल गुरुमूर्ती । मजला सदनीं आणावया ॥४७॥ पुढें माणिक चौकांत । चौथे दिवशीं सद्‌गुरुनाथ । भेटले बंकटलालाप्रत । अस्तमानाचें समयाला ॥४८॥ दिवाबत्तीची तयारी । दुकानदार करिती खरी । अशा वेळीं आला घरीं । घेऊन बंकट महाराजा ॥४९॥ पित्यानें मूर्ति पाहातां क्षणीं । अति आनंद झाला मनीं । नमन साष्टांग केलें चरणीं । पाटावरीं बैसविलें ॥५०॥ आणि विनविलें जोडोन होत । कांहीं भोजन करा येथ । तुम्ही साक्षात् पार्वतीकांत । प्रदोष वेळीं आला या ॥५१॥ ऐसें म्हणोन आणिलें । बिल्वपत्र तात्काळ भलें । समर्थांच्या ठेविलें । परमभक्तीनें मस्तकीं ॥५२॥ पुर्‍या बदाम खारका । केळीं मोसंबीं मुळे देखा । भालाप्रती लाविला बुक्का । कंठीं घातिला पुष्पहार ॥५३॥ गुरुमूर्ति प्रसन्न चित्तें । अवघे झाले सेविते । जें जें पडेल पात्रातें । तें तें खाती भराभर ॥५४॥ उदरीं सुमारें तीन शेर । अन्न साठविलें साचार । तेथेंच राहिले रात्रभर । श्रीगजानन महाराज ॥५५॥ बंकटलालें दुसरे दिवशीं । मंगलस्नान समर्थांसी । घातलें असे अतिहर्षी । तो न थाट वर्णवें ॥५६॥ स्नानविधी संपला । पितांबर तो नेसविला । अति सन्मानें बैसविला । योगिराज गादीवरी ॥५७॥ भालीं गंध केशरी । गळ्यांत हार नानापरी । कोणी तुळशीमंजरी । वाहूं लागले शिरावर ॥५८॥ नैवेद्य नानापरीचे । झाले समर्थार्पण साचे । भाग्य त्या बंकटलालाचें । खचित आलें उदयाला ॥५९॥ अवघ्या मंडळींनी आपुले । मनोरथ ते पूर्ण केले । एक मात्र त्यातून उरले । इच्छाराम शेटजी ॥६०॥ हा चुलत बंधु बंकटाचा । होता भाविक मनाचा । भक्त असे शंकराचा । त्यासी ऐसें वाटलें ॥६१॥ आज आहे सोमवार । मसी उपास साचार । घरां प्रत्यक्ष शंकर । चालते बोलते आलेच कीं ॥६२॥ त्यांची पूजा अस्तमानीं । यथासांग करोनि । करुं पारणा ऐसी मनीं । इच्छा त्यानें धरली असे ॥६३॥ तों झाला अस्तमान । मावळलासे नारायण । इच्छारामें केलें स्नान । प्रदोष वेळा लक्षुनी ॥६४॥ पूजासाहित्य घेऊन । साधु जे कां गजानन । त्यांचें केलें पूजन । परम प्रेमें करोनि ॥६५॥ चार मनुष्यांचें अन्न । ऐसा नैवेद्य परिपूर्ण । समर्थांपुढें आणून । ठेवला इच्छारामानें ॥६६॥ पाहोन त्या नैवेद्यासी । महाराज बोलले आपणासी । खातो खातो अहर्निशीं । ऐसें बोलसी गणप्या ॥६७॥ महाराज भोजना बैसलें । अन्न अवघें पार केलें । पात्रीं न कांहीं ठेविलें । मीठ लिंबू तेही पाहा ॥६८॥ आग्रहाचा प्रकार । काय होतो अखेर । हें दावण्या साचार । कौतुक केलें गुरुवरें ॥६९॥ खणाणून उलटी झाली । खाल्ल्या अन्नाची ती भली । ऐसीच गोष्ट होती केली । श्रीरामदासें एकदां ॥७०॥ तैसें लोकाग्रहाला । घालावयासी शीघ्र आळा । हा उलटीचा प्रकार केला । अंगीं बळ असूनिया ॥७१॥ तेंच समर्थें येथें केलें । लोकांलागीं सुचविलें । आग्रह करणें न चांगलें । तो विपरीत फळ देई ॥७२॥ असो उलटी झाल्यावरी । जागा केली साफ सारी । नेवोन बैसविले पहिल्या परी । स्नान घालोन महाराजा ॥७३॥ नरनारी दर्शनें घेती । महाराजांची आनंदवृत्ती । तों भजन करण्याप्रती । दिंड्या आल्या दोन तेथें ॥७४॥ इकडे महाराज आसनीं । होते ते वदले वदनीं । भजनाचिया मिषांनीं । "गणगण गणांत बोते" ॥७५॥ हेंच सर्वदा त्यांचें भजन । करिती टिचक्या वाजवून । ऐसा झाला आनंद जाण । रात्रभरीं ते ठायां ॥७६॥ ’गण गण’ हें त्यांचें भजन । हमेशा चाले म्हणून । लोकांनीं दिलें अभिधान । गजानन हें तयाला ॥७७॥ जो स्वयंमेव ब्रह्म झाला । नांवरुप कोठून त्याला ? । नामरूपांचा गलबला । प्रकृतीच्या आश्रयास ॥७८॥ समर्थांची दिनचर्या । सांगतों थोडी या ठायां । अगाध त्यांचें चरित्र गाया । मज पामरा मती नसे ॥७९॥ कधीं करावें मंगलस्नान । कधीं हाळांत जाऊन । कधीं कधीं प्राशन । करावें गढूळ जलाचें ॥८०॥ त्यांच्या दिनचर्येचा । नियम नव्हता एक साचा । प्रकार वायूच्या गतीचा । न ये ठरवितां कोणासी ॥८१॥ चिलमीवरी प्रेम भारी । ती लागे वरच्यावरी । नव्हती आसक्ति तिच्यावरी । तें केवळ कौतुक ॥८२॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥
॥ इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः ॥

श्रीगजानन विजय नित्यपाठ - अध्याय १


ह. भ. प. संतकवी श्री दासगणू महाराजकृत श्री गजानन विजय ग्रंथाची संक्षिप्त पाठावृत्ती

॥ श्री गणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॐ नमो भगवते श्री गजानन महाराजाय जयजयाजी उदारकीर्ती । जयजयाजी प्रतापज्योती । जयजयाजी हे गणपती ! । गौरीपुत्रा मयूरेश्वरा ! ॥१॥ आतां आदि माया सरस्वती । जी ब्रह्माची होय प्रकृती । जी कविवरांची ध्येयमूर्ती । ब्रह्मकुमारी शारदा ॥२॥ आतां हे पुराणपुरुषा । पांडुरंगा पंढरीशा । सच्चिदानंदा रमेशा । पाहि माम् दिनबंधो ॥३॥ हे भवभवान्तक भवानीवरा । हे नीलकंठा गंगाधरा । ओंकाररुपा त्र्यंबकेश्वरा । वरदपाणी ठेवा शिरीं ॥४॥ माझ्या कुळीची कुलदेवता । कोल्हापुरवासिनी जगन्माता । तिच्या पदीं ठेवितों माथा । मंगल व्हाया कारणें ॥५॥ हे दुर्गे तुळजे भवानी । हे अपर्णे अंबे मृडानी । ठेवी तुझा वरदपाणी । दासगणूच्या शिरावर ॥६॥ आतां वंदन दत्तात्रेया । पाव वेगीं मसीं सदया । गजाननचरित्र गाया । प्रसादासह स्फूर्ति दे ॥७॥ आतां शांडिल्यादि ऋषीश्वर । वसिष्ठ गौतम पाराशर । ज्ञाननभीं जो दिनकर । त्या शंकराचार्या नमन असो ॥८॥ आतां अवघ्या संतमहंता । नमन माझें सर्वथा । दासगणूच्या धरुन हाता । ग्रंथ करवा लेखन ॥९॥ संत हेच भूमिवर । चालते बोलते परमेश्वर । वैराग्याचे सागर । दाते मोक्षपदाचे ॥१०॥ त्या संतचरित्रास । श्रवण करा सावकाश । आजवरी ना कवणास । संतांनीं या दगा दिला ॥११॥ त्या संतांच्या तोडीचा । संत श्रीगजानन साचा । या अवतारी पुरुषाचा । प्रभाव खचित लोकोत्तर ॥१२॥ शेगांव नामें वर्‍हाडांत । ग्राम आहे प्रख्यात । खामगांव नामें तालुक्यांत । व्यापार चालें जेथ मोठा ॥१३॥ ग्राम लहान साचार । परि वैभव त्याचें महाथोर । ज्याचें नांव अजरामर । झालें साधूमुळें जगत्रयीं ॥१४॥ शेगांवचे पौरवासी । परम भाग्याचें निश्चयेसी । म्हणून लाधले तयांसी । गजानन हें संतरत्‍न ॥१५॥ रामचंद्र पाटलांनीं । केली माझी विनवणी । पंढरी क्षेत्रीं येऊनि । कार्तिकीच्या वारीला ॥१६॥ माझा मनीं हेत होता । गावें गजानन-चरित्रा । परी त्याची तत्त्वतां । संगत नाहीं लागली ॥१७॥ खर्‍या संताचें धोरण । न कळे कोणालागोन । महापुरुष गजानन । आधुनिक संत चूडामणी ॥१८॥ या महापुरुषाचा । ठावठिकाण कोणचा । वा पत्ता त्यांच्या जातीचा । इतिहासदृष्टया न लागे कीं ॥१९॥ जेवीं ब्रह्माचा ठावठिकाण । न कळे कोणा लागून । ते ब्रह्मास पाहून । निश्चय त्याचा करणें असे ॥२०॥ ऐन तारुण्याभीतरीं । गजानन आले शेगांवनगरीं । शके अठराशाभीतरीं । माघ वद्य सप्तमीला ॥२१॥ कोणी कोणी म्हणती जन । श्रीसमर्थांचें जें कां स्थान । त्या सज्जनगडाहून । या देशीं आले हे ॥२२॥ लोक अवघें भ्रष्ट झाले । नाना यातनें गांजले । त्यांच्यासाठीं वाटतें केलें । कौतुक ऐसें समर्थांनीं ॥२३॥ जगाचा करण्या उद्धार । गजाननरुपें अवतार । धरुन आले महीवर । पुन्हा समर्थसिद्धयोगी ॥२४॥ शेगांवीं माघमासीं । वद्य सप्तमी ज्या दिवशीं । हा उदय पावला ज्ञानराशी । पदनतातें तारावया ॥२५॥ त्या वेळची तुम्हां कथा । सांगतों मी ऐका आतां । एक भाविक गृहस्थ होता । नाम ज्याचें देविदास ॥२६॥ हा देविदास सज्जन । पातूरकराचा वंशज जाण । शाखा ज्याची माध्यंदिन । मठाधिपती होता तो ॥२७॥ त्याच्या एका मुलाची । ऋतुशांति होती साची । त्यानिमित्त भोजनाची । तयारी होती त्याचे घरा ॥२८॥ उष्टया पत्रावळी रस्त्यावर । टाकिल्या होत्या साचार । घराचिया समोर । त्या देविदास विप्राच्या ॥२९॥ तो गजानन समर्थसिद्धयोगी । बैसले होते तया जागीं । एक बंडी होती अंगीं । जुन्या पुराण्या कापडाची ॥३०॥ कोणत्याही उपाधीचें । नांव नव्हतें जवळीं साचें । पात्र पाणी प्यावयाचें । होता एक भोपळा ॥३१॥ कच्ची चिलीम हातांत । जी होती तयांची स्वकृत । कुंभाराच्या भट्टीप्रत । जिनें नव्हतें पाहिलें ॥३२॥ नासाग्र दृष्टि मुद्रा शांत । तपोबल अंगीं झळकत । प्राचीच्या बालरवीवत् । वर्णन किती करावें ॥३३॥ मूर्ति अवघी दिगंबर । भाव मावळला आपपर । आवडनिवड साचार । राहिली न जवळी जयाच्या ॥३४॥ ती समर्थांची स्वारी । बैसोनिया रस्त्यावरी । शोधन पत्रावळींचे करी । केवळ निजलीलेनें ॥३५॥ शीत पडल्या दृष्टीप्रत । तें मुखीं उचलुनी घालीत । हें करण्याचा हाच हेत । अन्न परब्रह्म कळवावया ॥३६॥ त्याची पटवावया खूण । शितें वेंचती दयाघन । त्याचा सामान्य जनालागून । भावार्थ तो कळला नसे ॥३७॥ बंकटलाल आगरवाला । होता रस्त्यानें चालला । त्याने हा प्रकार पाहिला । आपल्या त्या स्नेह्यासह ॥३८॥ दामोदरपंत कुलकर्णी । त्याच्या स्नेह्याचें नांव जाणी । दोघें तो प्रकार पाहोनी । आश्चर्यचकित जाहले ॥३९॥ बंकटलाल म्हणे पंतासी । ऐसेच उभे रस्‍त्यासी । आपण राहूं यत्कृतीसी । अजमावयाकारणें ॥४०॥ प्रथमता तो पुढें झाला । बंकटलाल आगरवाला । गजाननासी विचारण्याला । विनयानें येणें रीतीं ॥४१॥ ह्या पत्रावळीच्या शोधना । कां हो करितां कळेना । क्षुधा असेल आपणां । तरी तरतूद करुं अन्नाची ॥४२॥ त्यानें ऐसें विचारिलें । परि न उत्तर मिळालें । नुसतें वरी पाहिलें । उभयतांच्या मुखाकडे ॥४३॥ तो सतेज कांती मनोहर । दंड गर्दन पिळदार । भव्य छाती दृष्टि स्थिर । भृकुटी ठायीं झाली असे ॥४४॥ निजानंदीं रंगलेला । ऐसा योगी पाहिला । मौनेंच नमस्कार केला । चित्तीं संतोष पावोनियां ॥४५॥ देविदासबुवासी । सांगूं लागले प्रेमेंसी । तुम्ही पात्र वाढून वेगेंसी । आणा एक बाहेर ॥४६॥ देविदासें तैसें केलें । पक्वान्नांनीं भरलेलें । पात्र आणून ठेविलें । द्वारासमोर स्वामींपुढें ॥४७॥ ठेविलेल्या पात्रावरी । भोजना बैसली समर्थस्वारी । चवी न कशाची अंतरीं । अणुमात्र उरली असे ॥४८॥ अनुपम ब्रह्मरसाला । जो पिऊन तृप्त झाला । तो कां मागतो गुळवण्याला । मिटक्या मारीत बैसेल ? ॥४९॥ अवघीं पक्वान्नें एक केलीं । आवडनिवड नाहीं उरली । जठराग्नीची तृप्ती केली । दोन प्रहरच्या समयाला ॥५०॥ बंकटलाल तें पाहून । पंताशी करी भाषण । ह्या वेडा म्हणालों आपण । ती निःसंशय झाली चुकी ॥५१॥ सूर्य माध्यान्हीं आला । भाग भूमीचा तप्त झाला । पांखरेहीं आश्रयाला । जाऊन बैसलीं वृक्षावरी ॥५२॥ ऐशा भर उन्हात । हा बैसला आनंदांत । हा ब्रह्मची होय साक्षात्‌ । भय ना कशाचें उरलें या ॥५३॥ हा जेवला यथेच्छपणीं । तुंब्यामध्यें नाहीं पाणी । तें पंता यालागुनी । आपण देऊं आणून ॥५४॥ पुसूं लागले दामोदर । तुंब्यामध्यें नाहीं नीर । मर्जी असल्या हा चाकर । पाणी द्याया तयार असे ॥५५॥ ऐसे शब्द ऐकिले । समर्थांनीं हास्य केलें । उभयतांसी पाहून वदले । तें ऐका सांगतों ॥५६॥ अन्न भक्षिलें देहानीं । म्हणून त्या पाहिजे पाणी । हा व्यवहार चतुरांनीं । अवश्य पाहिजे जाणिला ॥५७॥ म्हणून तुमच्या चातुर्यासी । गरज असल्या तुम्हां साची । तरतूद करा पाण्याची । म्हणजे अवघें संपलें ॥५८॥ हें भाषण ऐकतां । दोघे हर्षले तत्त्वतां । बंकटलाल म्हणे पंता । आपुलें आहे भाग्य धन्य ॥५९॥ पाणी आणण्या दामोदर । घरांत गेले साचार । तो इकडे प्रकार । काय घडला तो ऐका ॥६०॥ कुपाचिया शेजारीं । हाळ होता निर्धारीं । जेथें जनावरें सारीं । पीत होतीं पाण्याला ॥६१॥ तेथें जाऊन पाणी प्याले । तृप्ततेचे ढेकर दिले । तों इतक्यांत घेऊन आले । पंत पाणी गडव्यांत ॥६२॥ हां हां तें गढूळ पाणी । समर्था न लावा वदनीं । तें जनावरांलागुनी । योग्य आहे प्यावया ॥६३॥ मीं हें पहा आणिलें नीर । गोड निर्मळ थंडगार । वासित केलें साचार । वाळा घालून यामध्यें ॥६४॥ ऐसें भाषण ऐकतां । महाराज वदले तत्त्वतां । व्यावहारिक अवघ्या कथा । ह्या न सांगा आम्हां तुम्ही ॥६५॥ हें अवघें चराचर । ब्रह्मे व्याप्त साचार । तेथें गढूळ, निर्मळ, वासित नीर । हे न भेद राहिले ॥६६॥ पाणी तरी तोच आहे । निर्मळ गढूळ तोच पाहे । सुवास कुवास दोन्ही हें । रुप त्याचें निःसंशय ॥६७॥ पिणाराही वेगळा । त्यापासून ना निराळा । ईश्वराची अगाध लीला । ती कळे या नरजन्मीं ॥६८॥ तें दिलें टाकून । व्यवहारीं गोविलें मन । यांचेच करा सदा मनन । कशापासून जग झालें ॥६९॥ ऐसी ऐकतां समर्थवाणी । दोघे गेले गहिवरोनी । अनन्यभावें समर्थचरणीं । लोळावया तयार झाले ॥७०॥ तो त्यांचा जाणोन हेत । महाराज निघाले पळत पळत । वायूच्या त्या गतिप्रत । अडथळा जगीं कोण करी ? ॥७१॥ श्रीहरिहरार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

॥ इति प्रथमोऽध्यायः समाप्तः ॥

Feb 3, 2022

मनन श्रीगुरुस्तवन स्तोत्राचे - ओवी ४१ ते ४५


॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥ ॥ ॐ श्री स्वामी समर्थाय नमः ॥

॥ श्री आनंदनाथ महाराजाय नमः ॥


हे जगा हितकारी । चुकवि चुकवि भ्रमफेरी । मृगजळ दाऊनि संसारी । मग तारी जीवाते ॥४१॥
या दिव्य गुरुस्तवन स्तोत्राचे माहात्म्य पुन्हा अधोरेखित करतांना श्री आनंदनाथ महाराज म्हणतात - हे स्तोत्र अतिशय कल्याणकारी असून जन्म-मृत्यूच्या संसृतिचक्रातून सुटका होण्याचा हा सहजसोपा मार्ग आहे. भवभयभंजन अशा सद्गुरूंच्या कृपेने, योग्य साधना केली असता मोक्षप्राप्ती निश्चितच असते. मात्र तत्पूर्वी हा मायाध्यक्ष आपल्या भक्तांना या संसाररूपी मोहप्रवाहांत गुंतवितो. मायेच्या प्रभावाने अल्पसुखाने मोहित झालेला हा जीव या मिथ्या संसारालाच आपले सर्वस्व मानतो. लोकेषणा, वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा ईषणात्रयांच्या बंधनात पुरता अडकत जातो. ही माया म्हणजे खरें तर मृगजळ आहे. मृगजळ म्हणजे काय तर जे जसे आहे ते तसे न दिसता काहीतरी वेगळे भासणे. त्याला तुम्ही दृग्भ्रम अर्थात दृष्टीचा खेळ अथवा भास म्हणू शकता. या मृगजळाचे ज्ञान झालें की तें पूर्णपणे मिथ्याच आहे, हे ध्यानांत येते. त्याच न्यायाने, सदगुरुंना पूर्णपणे शरण गेले की अमूर्त असणारे शुद्ध ईशचैतन्य हे तुझेंच मूळ स्वरूप आहे या सत्याची जाणीव होते. हे सर्वबंधमोक्षदायका, या मिथ्या संसारातील फोलपणा दाखवून तुम्हीच तर आमचा उद्गार करता.

ही आनंदनाथांची वाणी । जग तारक निशाणी । स्मरता झुलवी निरंजनी | योगी ध्यानी डुलविले ॥४२॥
हे गुरुस्तवन स्तोत्र हा भवसागर तरून जाण्याचे सुलभ साधन आहे आणि मुमुक्षु भक्तांना त्याची अवश्य अनुभूती येईल हे आनंदनाथ महाराजांचे वचन आहे. हे सर्वेश्वरा, तुझ्याच कृपेनें ईश्चराधिष्ठित असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन होऊन निर्विकार परमात्मस्वरूपाचे ज्ञान प्राप्त होते. परिणामस्वरूप, भक्तांना सहजच निरंजन म्हणजेच निर्विकल्प, विमल दोषरहित अशी योगसमाधी अनुभवता येते आणि परमानंदाचा लाभ होतो.

ऐसा ऐकता गुरुस्तवन । जागे केले सच्चित गुरु कारण । केवळ तो हरि हर ब्रह्म । मुखयंत्रीचा गोळा पूर्ण । गुरुहृदय भुवन व्यापिले ॥४३॥
श्री दत्तप्रभूंना जगदगुरु मानण्यात येते. भक्तांनी केलेल्या अत्यल्प सेवेने ते संतुष्ट होतात. आपल्या प्रिय भक्ताने, शिष्योत्तमाने केलेले हे आपले स्तवन ऐकताच सद्गुरू प्रसन्न झाले. अत्यंत निर्मळ, शुद्ध आणि विमल असे हे मूळ परमतत्व भक्तांकरिता सगुण, साकार झाले. या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे ब्रह्मा, विष्णु आणि महेश अशा तीन शक्तींचे समन्वित स्वरूप असणारे हे गुरुतत्त्व जागृत झाले. वागिंद्रियांनीं केलेल्या या स्तवनाने गुरुतत्त्वाची अनुभूती येऊ लागली आणि श्रीगुरुमूर्ती अंतःकरणात स्थिर झाली.

तेणे होवुनि स्मरती । स्वये प्रगटली स्फूर्ती । नाभी नाभी आवरती । अवतार स्थिती बोलतो ॥४४॥
गुरुतत्वाच्या कृपाप्रसादामुळे आनंदनाथ महाराज कृतार्थ झाले. सद्‌गुरूंशी अशी तादात्म्यता पावल्यावर, ईश्चराधिष्ठित असणाऱ्या आपल्या स्वस्वरूपाचे आकलन सहजच झाले. सद्‌गुरूंचे अभयवचन प्राप्त झाल्यामुळे आता कुठलीही भीती राहिली नाही. मन निर्भय, निःशंक झाले आणि अत्यंत उत्स्फूर्तपणें त्या परमात्म्याचे अवतार रहस्य वाणीतून शब्दरूपांत साकार होऊ लागले.
अयोनिसंभव अवतार । हिमालय उत्तरभागी निर्धार । होऊनी पूर्ण हंस दिगंबर । व्यापू चराचर निजलीले ॥४५॥
माधवशास्त्री रचित श्री स्वामी महाराज चरित्र हा संस्कृत श्लोकबद्ध ग्रंथ आहे. त्यांत स्वामी समर्थांचे स्वरूप वर्णन करतांना ते लिहितात - जन्मशून्यो दिव्यरुपो रविभा: सुरवंदित: । अर्थात श्री स्वामी महाराज जन्मशून्य आहेत. सूर्याप्रमाणे तेजस्वी असे त्यांचे रूप दिव्य असून सर्व देवांनादेखील ते वंदनीय आहेत. साक्षात परब्रह्माचा हा अवतार अयोनिसंभव आहे. श्री स्वामी महाराज यांचा जन्म कोठे झाला ? त्यांचे माता-पिता कोण ? यांविषयी खात्रीलायक माहिती मिळत नाही. मात्र काही अधिकारी भक्तांच्या मतांनुसार उत्तर हिंदुस्थानात हिमालय पर्वतराजींमधील एका अरण्यांत ते प्रथम प्रगट झाले. ' सर्व चराचरांत मीच ईश्वरीय चैतन्य रूपाने भरून आहे. ', या स्वानंदात सदैव निमग्न असलेला हा श्री दत्तप्रभूंचा पूर्णावतार दिगंबर होता. जणू दशदिशांना त्यांनी वस्त्र म्हणून धारण केले होते. संपूर्ण चराचर सृष्टीला, या ब्रह्मांडाला व्यापून राहिलेले हे परमतत्त्व सकल जीवांच्या उद्धारासाठीच, त्यांना आत्मोन्नतीचा मार्ग दाखविण्यासाठीच अवतरले होते. प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचा अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थांना अशक्य ते काय असणार ? त्यांच्या लीला खरोखर अनंत, अनाकलनीय आणि अगाध आहेत. पण ते केवळ चमत्कार नव्हते, तर त्यांनी संसारी, मुमुक्षु जन, मूक प्राणी अशा सर्वच शरणागतांना भुक्ति-मुक्ती देऊन त्यांचे इहपर कल्याण केले.


॥ श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ॥

॥ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॥

क्रमश: