Jul 8, 2016

श्री गुरुचरित्र पारायण - दिवस पाचवा अध्याय ३५ ते ३७



।।श्री गणेशाय नमः ।।
अध्याय ३५ वा
कचदेवयानी कथा - सोमवारव्रत - सीमंतिनी आख्यान


।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
।। श्री गुरुभ्यो नम: ।। श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धमुनींच्या पाया पडून म्हणाला, "स्वामी, श्रीगुरुंनी त्या ब्राह्मण पतिपत्नीला रुद्राध्यायाचे माहात्म्य सविस्तर सांगितले. मग पुढे काय झाले, ते मला सविस्तर सांगा. श्रीगुरुचरित्र ऐकण्यास माझे मन आतुर झाले आहे." नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, "नामधारका, त्यानंतर एक अपूर्व घटना घडली. ज्या स्त्रीचा मृत पती श्रीगुरुंच्या कृपेने जिवंत झाला, ती पतिव्रता हात जोडून श्रीगुरुंना म्हणाली, "स्वामी, आता आमची गती काय ? आमचा उद्धार कसा काय होईल ? आम्हाला काहीतरी उपदेश करा. मला एखादा मंत्र द्या, त्यामुळे तुमच्या चरणांचे स्मरण निरंतर राहील." त्यावर श्रीगुरू म्हणाले, "स्त्रियांना मंत्र देण्याची गरज नाही. त्यांनी आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी, हेच त्यांचे कर्तव्य आणि हीच त्यांची परमेश्वर उपासना. स्त्रियांना कधीही मंत्र देऊ नये. त्यांना मंत्रोपदेश दिला तर मोठी संकटे येतात. पूर्वी दैत्यगुरु शुक्राचार्यांना याचा अनुभव आला होता." त्यावर ती स्त्री हात जोडून म्हणाली, "स्त्रियांना मंत्राचा अधिकार नाही, असे का म्हणता, ते का ? शुक्राचार्यांना कोणता अनुभव आला ते मला सविस्तर सांगा." त्या स्त्रीने अशी विनंती केली असता श्रीगुरू म्हणाले, "त्या विषयीची एक कथाच मी सांगतो, ती ऐक."
पूर्वी देवदैत्यांची सतत युद्धे होत असत. दैत्य सैन्य युद्धात पडले की दैत्यांचे गुरु शुक्राचार्य संजीवनी मंत्राने त्यांना पुन्हा जिवंत करीत असत, मग पुन्हा युद्ध सुरु होत असे. देवांचा सेनापती इंद्र आपल्या वज्रप्रहाराने दैत्यसेनेला ठार मारत असे. शुक्राचार्य लगेच संजीवनी मंत्राने दैत्यांना जिवंत करीत असे. मग दैत्य देवसेनेवर हल्ला करीत असत. असे सतत घडत होते. दैत्यांचा पराभव करणे देवांना कठीण होऊन बसले होते. मग इंद्राने कैलासलोकांत जाऊन शुक्राचार्यांविषयी तक्रार केली, त्यावर "तू ताबडतोब जा व त्या शुक्राचार्याला पकडून येथे आण." शंकरांनी अशी आज्ञा करताच नंदी धावतच शुक्राचार्यांकडे गेला. त्यावेळी शुक्राचार्य ध्यान करीत बसले होते. नंदीने त्यांना आपल्या तोंडात धरले व श्रीशंकरांकडे आणले. शंकरांनी तत्काळ शुक्राचार्यांना उचललें व आपल्या तोंडात टाकून गिळले. हे समजताच भयभीत झालेले दैत्य आकांत करू लागले. कित्येक दिवसांनीं शुक्राचार्य मूत्रातून बाहेर पडले व निघून गेले. श्रीशंकराच्या ते लक्षातच आले नाही. पूर्वी त्यांचे नाव 'शुक्र' होते. शंकराच्या पोटात त्यांचा उद्भव झाला, म्हणून त्यांना 'भार्गव' असे नाव पडले. शुक्राचार्य दैत्यांकडे गेले व मंत्राचा प्रयोग करू लागले. इंद्रापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. आता यावर काय उपाय करायचा ? असा विचार करीत तो देवगुरु बृहस्पती यांना भेटला.
तो बृहस्पतींना म्हणाला, "गुरुवर्य, शुक्राचार्य संजीवनी मंत्राने दैत्यांना पुन्हा पुन्हा जिवंत करतो. त्यामुळे आम्हाला दैत्यांचा नाश करता येत नाही. त्या शुक्राचार्यांसारखे मंत्रसामर्थ्य आपल्याकडे नाही. देवांची शक्ती गेली तर ती पुन्हा प्राप्त होत नाही. असेच सतत चालू राहिले, तर देवांचा संपूर्ण नाश होईल व अवघ्या त्रैलोक्यावर दैत्यांचे राज्य येईल. तुम्ही सर्व देवांना पूज्य, वंदनीय आहात. तुम्ही जर आमच्यावर कृपा केली तर शुक्राचे तुमच्यापुढे काहीही चालणार नाही. तो तुमची बरोबरी करू शकणार नाही." इंद्राने अशी प्रार्थना केली असता देवगुरु बृहस्पती इंद्राला म्हणाले, "देवेंद्रा, यावर एकाच उपाय आहे. शुक्राचा तो संजीवनी मंत्र षट्कर्णी केला असता, शुक्राचे काहीएक सामर्थ्य राहणार नाही. आता आपल्यापैकी एखाद्यास विद्यार्थी म्हणून ब्राह्मणरूपात शुक्राकडे पाठवावे. तो आत्मसंरक्षणासाठी संजीवनी मंत्र शिकेल." त्यावर इंद्र म्हणाला, "तुमचा पुत्र कच आहे. त्यालाच विद्याभ्यासाच्या निमित्ताने शुक्रांकडे पाठवावे. तो शुक्राचार्यांची मनोभावे सेवा करील व मोठ्या युक्तीने त्याच्याकडून संजीवनी मंत्र मिळवील. असे झाले तर फारच छान होईल."
इंद्राची ही योजना बृहस्पतींना एकदम पसंत पडली. त्यांनी कचाला बोलावून सांगितले, "तू विद्यार्थी म्हणून शुक्राचार्यांकडे जा.त्यांच्यापुढे देवांची खूप निंदा कर. मी देवांना कंटाळून आपणास शरण आलो आहे. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करा." असे बोलून त्यांची मनोभावे सेवा कर, त्यांना प्रसन्न करून घे व त्यांच्याकडून संजीवनी मंत्र मिळवून लगेच परत ये." कचाने ते मान्य केले. मग तो बृहस्पतींना व इंद्रादी देवांना वंदन करून शुक्राचार्यांकडे गेला व हात जोडून नम्रपणे त्यांच्यापुढे उभा राहिला. शुक्राचार्यांनी त्याची नीट विचारपूस केली असतां तो म्हणाला, " मी ब्राह्मपुत्र आहे. मी आपली कीर्ती ऐकून विद्याध्ययनासाठी आपणास शरण आलो आहे, माझा कृपया स्वीकार करावा. मी आपली मनोभावे सेवा करीन. माझा विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा." त्यावेळी शुक्राचार्यांची एकुलती एक लाडकी कन्या देवयानी तेथेच होती. ती आपल्या वडिलांना म्हणाली, " बाबा, हा ब्राह्मकुमार चांगला विद्यार्थी दिसतो आहे. याचा तुम्ही विद्यार्थी म्हणून स्वीकार करावा व त्याला विद्या शिकवावी." देवयानी कचाकडे निरखून पाहत होती. तरुण, अत्यंत रूपवान असलेला कच, दुसराच मदन आहे असे देवयानीला वाटले. 'हाच आपला पती व्हावा' असे तिला मनोमन वाटत होते.
शुक्राचार्यांनी कचाला विद्यार्थी म्हणून स्वीकारले. कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहून विद्याध्ययन करू लागला. दैत्यांना मात्र ' हा कच देवांच्याकडून संजीवनी विद्या मिळवण्यासाठीच आला आहे. आता याला जर संजीवनी विद्या मिळाली तर आपल्यावर मोठे संकट येईल.' असेच वाटत होते. त्यामुळें सगळे दैत्य मोठ्या काळजीत पडले. काहीही करून संधी मिळताच याला ठार मारावयाचे असे त्यांनी ठरविले. लवकरच तशी संधी त्यांना मिळाली. एके दिवशी कच काही दैत्यांच्या बरोबर समिधा आणण्यासाठी वनात गेला. तेथे दैत्यांनी त्याला ठार मारले व स्वतःच समिधा घेऊन परत आले.
इकडें कच कुठे दिसेना म्हणून देवयानी अस्वस्थ, बैचेन झाली. कच परत आल्याशिवाय मी अन्नपाणी घेणार नाही, असे ती शुक्राचार्यांना म्हणाली. कचाला दैत्यांनी ठार मारले आहे हे शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. त्यांनी देवयानीच्या हट्टास्तव संजीवनी मंत्राचा जप करून त्याला जिवंत केले. मग कच आश्रमात परत आला. असेच काही दिवस गेले. एके दिवशी कच वनात गेला असता, पुन्हा एकदा टपून बसलेल्या दैत्यांनी त्याला ठार मारले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे केले व ते दहाही दिशांना फेकून दिले. संध्याकाळ झाली. सूर्यास्त झाला. कच कुठे दिसत नव्हता. त्यामुळे शोकाकुल झालेली देवयानी पित्याला म्हणाली, "हे तात, कच माझा प्राणसखा आहे. काहीही करून त्याला परत आणा. नाहीतर मी विष प्राशन करून प्राणत्याग करीन." आपल्या कन्येच्या हट्टास्तव शुक्राचार्यांनी पुन्हा संजीवनी मंत्राचा जप करून कचाला जिवंत केले. कच घरी परत आला. त्याला पाहताच देवयानीला आनंद झाला. असेच आणखी काही दिवस गेले. दैत्य मोठ्या काळजीत पडले. 'काही केल्या हा कच मारत नाही. याला ठार मारले असता आपलें गुरु स्वकन्येवरील प्रेमामुळे याला पुनःपुन्हा जिवंत करतात.' असा विचार करून मग दैत्यांनी एक भयंकर कृत्य केले. त्यांनी कचाला बाहेर नेऊन ठार मारले. शुक्राचार्यांना मद्यपानाची सवय होती म्हणून दैत्यांनी कचाच्या हाडांचेही चूर्ण करून, ते जाळून त्याचे भस्म तयार केले व ते मद्यात चांगले मिसळून ते शुक्राचार्यांना प्यायला दिले. आता काही झाले तरी कच जिवंत होणार नाही. या विचाराने सगळे दैत्य आनंदित झाले. कच दिसेना म्हणून देवयानी रडू लागली. त्याला परत आणा, असा पित्याला आग्रह करू लागली. शुक्राचार्यांनी अंतर्ज्ञानाने ओळखले. दैत्यांच्याच कारस्थानामुळे कच आता आपल्या पोटात आहे. आता त्याला संजीवनी मंत्राने त्याला जिवंत करणे शक्य नाही, कारण संजीवनी मंत्राने त्याला जिवंत केले तर तो आपले पोट फाडून येणार , म्हणजे आपणास मृत्यू येणार ! "
त्यांनी देवयानीला परिस्थितीची जाणीव करून दिली व कच आता जिवंत होणार नाही असे सांगितले. त्यावर देवयानी म्हणाली, " तुम्ही मरण पावलेल्या सर्वांना पुन्हा जिवंत करता, मग तुम्हाला स्वतःच्या मृत्यूची भीती का वाटते ? " त्यावर तिला समजावित शुक्राचार्य म्हणाले, " हे बाळा, संजीवनी मंत्र फक्त मलाच येतो. तो मी इतरांना सांगितला, तर त्याचा प्रभाव नाहीसा होईल. अशा परिस्थितीत मी काय करणार ? " थोडा विचार करून देवयानी म्हणाली, " तो मंत्र मला द्या. कचाला जिवंत करताना जर तुम्हाला मृत्यू आला तर मी त्या मंत्राने तुम्हाला जिवंत करीन."
शुक्राचार्य म्हणाले. "स्त्रियांना मंत्र देऊ नये अशी शास्त्राची आज्ञा आहे. पतिसेवा हाच स्त्रियांसाठी मंत्र आहे. त्यांनी मंत्रजप करू नये. त्यांनी मंत्रजप केला तर मोठा अनर्थ घडतो, त्या मंत्राचे सामर्थ्य कमी होते, म्हणून मी तुला संजीवनी मंत्र देऊ शकत नाही." हे ऐकताच देवयानीला राग आला. ती म्हणाली, "असे असेल तर तुमचा मंत्र तुमच्याशी घेऊन बसा ! मी कचाशिवाय एक क्षणभरही जिवंत राहू शकणार नाही. आता मी प्राणत्याग करते." अतिक्रोधाने असें बोलून ती एकाएकी बेशुद्ध पडली. शुक्राचार्यांची देवयानीवर अतिमाया होती. ते द्रवले. त्यांनी तिला सावध केले, समजाविले व तिला संजीवनी मंत्र सांगितला. शुक्राचार्य देवयानीला मंत्र सांगत असता त्यांच्या पोटात असलेल्या कचाने तो लक्षपूर्वक ऐकला आणि पूर्ण लक्षात ठेवला. त्या मंत्राच्या सामर्थ्याने तो शुक्राचार्यांचे पोट फाडून बाहेर आला. देवयानीने मंत्र जपून शुक्राचार्यांना जिवंत केले. कचाने तो मंत्र तीनवेळा म्हणून लक्षात ठेवला. ज्या कार्यासाठी तो आला होता ते त्याचे कार्य झाले होते. मग तो शुक्राचार्याच्या पाया पडून म्हणाला, " गुरुदेव, तुमच्या कृपेने मला सर्व विद्या प्राप्त झाल्या; पण येथील दैत्य माझा द्वेष करतात व मला ठार मारतात म्हणून मी येथे राहणे योग्य नाही. मी आता परत जातो." शुक्राचार्यांनीही मोठ्या आनंदाने त्याला निरोप दिला. कच जाऊ लागला, तेव्हा देवयानी त्याचा हात पकडून म्हणाली," माझे तुझ्यावर प्रेम आहे. माझा पत्नी म्हणून तू स्वीकार कर." कच म्हणाला, " देवयानी, तू गुरुकन्या आहेस म्हणजे तू माझी बहीण ठरतेस. शिवाय तू संजीवनी मंत्र पित्याकडून घेऊन मला पुनर्जन्म दिला आहेस, म्हणजे एकार्थाने तू माझी माता ठरतेस, म्हणून तू हा अयोग्य विचार मनात काढून टाक. मी तुझ्याशी विवाह करू शकणार नाही. माझा हात सोड. मला जाऊ दे." कचाचे हे शब्द ऐकताच देवयानी अतिशय संतापली. तिचा मोठाच अपेक्षाभंग झाला होता. त्या रागाच्या भरांत तिने कचाला शाप दिला, "तुला मिळालेली संजीवनी विद्या ती तत्काळ विसरशील. तू माझी घोर निराशा केलीस. तुला मिळालेली विद्या व्यर्थ जाईल."
त्यावर कच म्हणाला, "तू मला व्यर्थ शाप दिलास. मीही तुला सांगतो, कोणीही ब्राह्म तुला वरणार नाही. तुझा विवाह ब्राह्मणेतर पुरुषाशी होईल. तुझ्या पित्याने तुला संजीवनी मंत्र दिला खरा; पण तो षट्कर्णी झाल्यामुळे यापुढे तो निष्फळ ठरेल.", असा देवयानीला प्रतिशाप देऊन कच स्वर्गलोकांस गेला. इंद्रासह सर्व देवांना मोठा आनंद झाला.
ही कथा सांगून श्रीगुरू त्या स्त्रीला म्हणाले, "पतिसेवा हाच स्त्रियांच्यासाठी महामंत्र आहे. स्त्रियांना मंत्र देऊ नये. त्यांनी व्रतोपासना करावी. तसेंच त्यांनी पतिसेवा करावी." त्यावर ती स्त्री म्हणाली, "स्वामी, तुमचे वचन प्रमाण ! तुम्ही सांगाल तसे आम्ही करू. जो गुरूच्या आज्ञेनुसार वागत नाही तो नरकात जातो. आता मी कोणते व्रत करू ? ते मला सांगा." अशी तिने विनंती केली असता भक्तवत्सल श्रीगुरुंनी तिला एक व्रत सांगितले. श्रीगुरू म्हणाले," तुला जे व्रत मी सांगणार आहे, ते व्रत पूर्वी सूतांनी ऋषींना सांगितले होते. ते व्रत म्हणजे सोमवार व्रत. हे शिव-उपासनेचे व्रत स्त्री-पुरुष, तरुण-तरुणी, सर्वांनी करावे. भगवान श्रीशंकरांच्या आराधनेने हे सोमवार व्रत केले असता, आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. वेदोक्त किंवा पुराणोक्त मंत्रांनी भगवान श्रीशंकरांची यथासांग पूजा करावी. नक्तभोजन उपवास करावा. विधवा स्त्रीनेही हे व्रत करावे. या विषयी स्कंदपुराणातील एक कथा सांगतो. ही कथा श्रवण केली असता असाध्य ते साध्य होते."
सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, " नामधारका, श्रीगुरुंनी त्या ब्राह्म पति-पत्नीला एक प्राचीन कथा सांगितली. तीच सीमंतिनीची कथा मी तुला सांगतो. ती लक्षपूर्वक ऐक."
एकदा नैमिषारण्यात सर्व ऋषींनी पुराणकार सूतांना विचारले, "सर्व व्रतांमध्ये उत्तम व्रत कोणते ? " तेव्हा सूत म्हणाले, " भगवान सदाशिवाचे सोमवार व्रत हे श्रेष्ठ व्रत आहे. भगवान शिवाची भक्ती स्वर्ग व मोक्ष देणारी आहे. जर प्रदोषादी गुणांनी युक्त अशा सोमवारी शिवपूजन केले तर त्याचे माहात्म्य अधिक आहे. जे केवळ सोमवारी शिवपूजा करतात त्यांना इहपरलोकी दुर्लभ असे काहीच नाही. सोमवारी उपवासपूर्वक पवित्र अंतःकरणाने भगवान सदाशिवाची पूजा करावी. ब्रह्मचारी, गृहस्थ, कन्या अथवा विधवा अशा कोणीही भगवान शिवाची पूजा केल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या विषयी एक कथा सांगतो. ती श्रवण केली असता मोक्षप्राप्ती होते. श्रवणार्थींच्या मनात शिवभक्तीची इच्छा निर्माण होते. ही कथा स्कंदपुराणात आली आहे, ती अशी -
पूर्वी आर्यावर्तात चित्रवर्मा नावाचा एक थोर, गुणवान, धर्मशील राजा होता. तो महापराक्रमी व न्यायप्रिय होता. तो भगवान विष्णूंचा व शंकरांचा परमभक्त होता. त्याला एक अत्यंत सुंदर मुलगी झाली. ती मुलगी जन्मास येताच एका विद्वान ज्योतिषाने तिचे भविष्य वर्तविले. तो ज्योतिषी म्हणाला, "राजा, आपली कन्या 'सीमंतिनी' नावाने प्रसिद्ध होईल. ही पार्वतीप्रमाणे मंगल, दमयंतीप्रमाणे सुंदर, सरस्वतीप्रमाणे सर्वकाळनिपुण व लक्ष्मीप्रमाणे अत्यंत सद्गुणी होईल. ही आपल्या पतीसह दहा हजार वर्षे सुख भोगेल. हिला आठ पुत्र होतील." पण याचवेळी दुसऱ्या एका ज्योतिषाने भविष्य सांगितले, "हिला चौदाव्या वर्षी वैधव्य येईल." हे अशुभ भविष्य ऐकून राजाला अत्यंत दुःख झाले. सीमंतिनी हळूहळू मोठी होऊ लागली. तिला आपल्या मैत्रिणींकडून आपल्या भावी वैधव्याची वार्ता समजली. तेव्हा दुःखी झालेल्या तिने याज्ञवल्क्य ऋषींची पत्नी मैत्रेयी हिला विचारले, " अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी कोणते बरे व्रत करावे ?" तेव्हा मैत्रेयी म्हणाली, "तू शिवपार्वतीला शरण जा. जेणेकरून कितीही संकट आली तरी त्यातून तू मुक्त होशील. अगदी महाभयंकर संकट आले तरी शिवपूजा सोडू नकोस. त्याच्या प्रभावाने तू संकटमुक्त होशील. तू सोमवारव्रत सुरु कर. त्या दिवशी उपवासपूर्वक शिवपूजन करावे. गौरीहराची शांतचित्ताने पूजा करावी.अभिषेक करावा. असे केल्याने सौभाग्य अखंड राहते. सदाशिवाला नमस्कार केला, तर चारही पुरुषार्थ सिद्धीला जातात. शिवनामाचा जप केला असता सर्व ऐश्वर्याची प्राप्ती होते. तू हे व्रत कर. तुझे कल्याण होईल." सीमंतिनीने मैत्रेयीच्या उपदेशानुसार सोमवारचे व्रत सुरु केले.
काही दिवसांनी निषध देशाचा राजा इंद्रसेन, याच्या चंद्रांगद नावाच्या पुत्राशी सीमंतिनीचा मोठ्या थाटात विवाह झाला. विवाहानंतर काही दिवस चंद्रांगद सीमंतिनीच्या माहेरीच राहिला. एके दिवशी जलक्रीडा करण्यासाठी तो यमुनेवर गेला, परंतु अकस्मात नाव उलटून चंद्रांगद नदीत बुडाला. या दुर्घटनेमुळे सर्व लोक दुःखसागरात बुडाले. चित्रवर्मा तर दुःखाने वेडाच झाला. सीमंतिनीवर तर तो वज्रघातच होता. पतिनिधनामुळे दुःखाकुल झालेल्या सीमंतिनीने अग्निप्रवेश करण्याचा निश्चय केला परंतु वडिलांनी तिची समजूत घालून अग्निप्रवेश करण्यापासून परावृत्त केले. सीमंतिनी आता वैधव्यजीवन जगू लागली. मैत्रेयीने सांगितलेले सोमवारव्रत तिने अत्यंत श्रद्धेने, निष्ठेने वैधव्यावस्थेतही सुरु ठेवले. अशाप्रकारे केवळ चौदाव्या वर्षी दारूण दुःख प्राप्त झालेली सीमंतिनी भगवान सदाशिवाचे सतत स्मरण करू लागली. इकडे पुत्रशोकाने वेड्या झालेल्या इंद्रसेनाचे राज्य त्याच्या शत्रूने बळकाविले व इंद्रसेनाला पत्नीसह कारागृहात कोंडले.
इकडें चंद्रांगद यमुनेच्या डोहात बुडाला, तो खाली खाली गेला. तेथे त्याला नागकन्या जलक्रीडा करीत असलेल्या दिसल्या. चंद्रांगदाला पाहून आश्चर्यचकित झालेल्या नागकन्यांनी त्याला पातळलोकात तक्षक नागाकडे नेले. तक्षकाने त्याची मोठ्या प्रेमाने विचारपूस केली, तेव्हा चंद्रांगद म्हणाला, "पृथ्वीवर निषध नावाचा प्रसिद्ध देश आहे, त्या देशात पुण्यश्लोक नलराजा होऊन गेला. त्याचा पुत्र इंद्रसेन. त्या इंद्रसेनाचा मी पुत्र आहे. माझे नाव चंद्रांगद. मी माझ्या विवाहानंतर पत्नीच्या माहेरी काही दिवस राहिलो होतो. एके दिवशी यमुनेत मी जलक्रीडा करीत असता पाण्यात बुडालो. नागस्त्रियांनी मला येथे आणले आहे. आपण अत्यंत प्रेमाने माझी विचारपूस केल्यामुळे मी धन्य झालो आहे."
त्यावर तक्षक म्हणाला, "राजपुत्रां, तू घाबरू नकोस. धीर धर. मला सांग, तू कोणत्या देवाची आराधना करतोस ? "चंद्रांगद म्हणाला, " विश्वात्मा उमापती भगवान श्री शिवांची मी सदैव पूजा करतो." चंद्रांगदाचे हे शब्द ऐकताच तक्षक आनंदित झाला. तो म्हणाला, "राजपुत्रा, तुझे कल्याण असो ! मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू इतक्या लहानपणी शिवतत्त्व जाणतोस, यामुळें मला फार आनंद झाला आहे. आता तू येथेच राहा. येथे मृत्यूची भीती नाही. रोग नाही. कसलीही पीडा नाही. येथे तू सुखाने राहा व सर्व सुखांचा उपभोग घे." चंद्रांगद हात जोडून म्हणाला, " नागराज, माझा विवाह झालेला आहे. माझ्या आई-वडिलांचा मी एकुलता एक पुत्र आहे. माझ्या मृत्यूमुळे ते शोकाकुल झाले असतील, त्यामुळे मी येथे सुखोपभोगात राहणे योग्य नाही. मला सत्वर मनुष्यलोकांत पोहोचवावे, अशी मी आपणांस प्रार्थना करतो."
त्याची प्रार्थना ऐकून प्रसन्न झालेला नागराज म्हणाला, " राजपुत्रा, तू जेव्हा माझे स्मरण करशील, तेव्हा मी तुझ्यापुढे प्रकट होईन." असे सांगून त्याने चंद्रांगदाला एक दिव्य घोडा दिला. त्याशिवाय अनेक रत्नालंकार व दिव्य वस्त्रे भेट म्हणून दिली. चंद्रांगद त्या घोड्यावर स्वार होऊन यमुनेच्या बाहेर आला. त्याच्याबरोबर दोन नागकुमारही होते. चंद्रांगद यमुनेच्या काठावर आला, त्यावेळी सीमंतिनी आपल्या मैत्रिणीसह तेथे आली होती. चंद्रांगदाला पाहून ती गोंधळलीच. ती विचार करू लागली, "हा कोण बरे असावा ? इच्छारुपी राक्षस तर नसेल ? तिला तो आपल्या पतीसारखा वाटला, पण छे ! माझे पती तर पाण्यात बुडून पुष्कळ दिवस झाले ! तें कसे बरे येतील ? पण राहून राहून त्याला पाहताना तिला संकोच न वाटता एकप्रकारची खात्री वाटू लागली. याचवेळी सीमंतिनीला पाहून चंद्रांगद विचार करू लागला, "हिला मी पूर्वी कधीतरी पहिले असावे." मग घोड्यावरून उतरून तो तिच्याजवळ जाऊन विचारपूस करू लागला. तेव्हा सीमंतिनीची सखी म्हणाली, "हिचे नाव सीमंतिनी. ही निषधाधिपती इंद्रसेनाची सून, चंद्रांगदाची पत्नी व महाराज चित्रवर्म्याची मुलगी आहे. दुर्दैवाने हिचा पती या नदीत बुडाला. वैधव्यदुःखाने ही फार खचली आहे. या गोष्टीला आता तीन वर्षे झाली. आज सोमवार आहे, म्हणून ही येथे स्नान करण्यासाठी आली आहे. हिचे सासरे आपल्या पत्नीसह शत्रूच्या तुरुंगात पडले आहेत. असे असतानासुद्धा ही राजकन्या प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने शिवपार्वतीची पूजा करते."
मग सीमंतिनीने चंद्रांगदाला विचारले, " आपण माझी माहिती विचारलीत, पण आपण कोण ते कळले नाही. आपण कोणी गंधर्व किंवा देव आहात, की कोणी मायावी सिद्ध, साधू, किन्नर आहात ? आपण मला आप्तजनासारखे वाटता. आपण कोण आहात ? " असे तिने विचारले व पतीच्या आठवणीने ती शोकाकुल झाली. चंद्रांगदालाही अतिशय दु:ख झाले. पण आपल्या दुःखावर आवर घालून तो म्हणाला, " मी तुझ्या पतीला पहिले आहे. माझे नाव 'सिद्ध' असे आहे. तुझ्या व्रताच्या प्रभावाने तुझा पती नक्की परत येईल. तो माझा मित्र आहे. तीन दिवसांनी तो तुला भेटेल. तू चिंता व दुःख करू नकोस." चंद्रागदाच्या या बोलण्याने सीमंतिनी अधिकच शोक करू लागली. तिला मनोमन वाटत होते, हाच आपला पती असावा. पण तिने पुन्हा विचार केला. छे! हे शक्य नाही. पाण्यात बुडालेला आपला पती परत कसा येणार ? खोटी आशा बाळगण्यात काहीच अर्थ नाही; पण मैत्रेयीने सांगितल्याप्रमाणे मी सोमवार व्रत तर करीतच आहे. भगवान शंकर प्रसन्न झाले तर काहीही अद्भुत होऊ शकते." असा ती विचार करीत होती. त्याचवेळी चंद्रांगद घोड्यावर बसून आपल्या राज्यात गेला. नदीत बुडालेला चंद्रागद घोड्यावर बसून परत आला आहे व त्याला तक्षकाचे सामर्थ्य लाभले आहे हे समजताच भयभीत झालेल्या शत्रूने चंद्रांगदाला त्याचे राज्य सन्मानपूर्वक परत दिले.त्याच्या मातापित्यांची सुटका केली. आपला पुत्र परत आला आहे, हे समजताच इंद्रसेनाच्या डोळ्यांवाटे आनंदाश्रू वाहू लागले. सर्व नागरिक, मंत्री, पुरोहित चंद्रांगदाला सामोरे गेले. इंद्रसेनाने चंद्रांगदाला पोटाशी धरले. चंद्रांगदाने मातापित्यांना व इतर सर्वांना वंदन केले. मग त्याने राजसभेत बसून आपली पाहिल्यापासून सर्व हकीगत सविस्तर सांगितली. ती ऐकून इंद्रसेनाला अतिशय आनंद झाला. आपल्या सुनेने सौभाग्यप्राप्तीसाठी सोमवारव्रत करून भगवान शंकराची आराधना केली, त्याचेच हे फळ आहे, याबद्दल इंद्रसेनाची खात्री पटली.त्यानें लगेच ही शुभवार्ता आपल्या दूताकरवी चित्रवर्म्याला कळविली.ही अमृतवार्ता ऐकून राजा चित्रवर्माच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्याने सीमंतिनीला वैधव्यचिन्हे टाकावयास लावली. मग त्याने आपल्या राज्यात मोठा आनंदोत्सव केला. प्रत्येकजण सीमंतिनीच्या सदाचाराची प्रशंसा करू लागला. मग चित्रवर्म्याने इंद्रसेनाकडे आपला दूत पाठवून, त्याला पुत्रासह वऱ्हाड घेऊन आपल्या नगरास येण्याची विनंती केली. इंद्रसेन आपल्या वऱ्हाडासह चित्रवर्म्याकडे आला. मग सीमंतिनी व चंद्रांगद यांचा पुन्हा विवाह झाला.
चंद्रांगदाने तक्षकाकडून आणलेले मानवदुर्लभ अलंकार सीमंतिनीला दिले. कल्पवृक्षांच्या पुष्पमालांनी सीमंतिनी अधिकच सुंदर दिसू लागली. त्यावेळी तिच्या आनंदाला काही सीमाच राहिली नाही. मग शुभमुहूर्तावर इंद्रसेन, चंद्रांगद व सीमंतिनी आपल्या नगरात परत आले. त्याने चंद्रांगदाला राजसिंहासनावर बसविले व राज्याभिषेक केला. पुढें चंद्रांगदानें सीमंतिनीसह दहा हजार वर्षे सर्व सुखांचा उपभोग घेत राज्य केले. त्यांना आठ पुत्र व एक कन्या झाली. सीमंतिनीही भगवान महेश्वराची आराधना करीत आपल्या पतीसह सुखाने राहू लागली. तिने सोमवारच्या प्रभावाने आपले गेलेले सौभाग्य परत मिळविले.
श्रीगुरू ही कथा सांगून त्या पतिपत्नीला म्हणाले, "सोमवार व्रताचा प्रभाव हा असा अद्भुत आहे. तुम्ही हेच व्रत करा." श्रीगुरूंची आज्ञा प्रमाण मानून त्या पतिपत्नींनी सोमवारव्रत केले. पुढे त्यांना पाच पुत्र झाले. ती दोघे दरवर्षी संगमस्थानी श्रीगुरुंच्या दर्शनासाठी येऊ लागली.
सरस्वती गंगाधर म्हणतात, " त्रैमूर्ती नृसिंहसरस्वती माझे वंशपरंपरागत स्वामी आहेत. म्हणून लोक हो, तुम्हीसुद्धा निःसंदेह श्रीगुरूचरणांची सेवा करा. श्रीगुरु आपल्या भक्तांवर त्वरित प्रसन्न होतात, हे त्रिवार सत्य. साखरेच्या गोडीला दुसरी कोणती उपमा द्यावयाची ? हातावरील कंकण पहावयास आरसा कशाला ? लोक हो ! तुम्ही श्रींगुरुंची सेवा करा. तुमच्या सर्व मन:कामना त्वरित पूर्ण होतील. श्रीगुरूचरित्र प्रत्यक्ष कामधेनू आहे. त्याचे श्रवण-पठण केले असता सर्व काही साध्य होते. अंती मोक्षही प्राप्त होतो."
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील ' कचदेवयानी कथा-सोमवारव्रत-सीमंतिनी आख्यान ' नावाचा अध्याय पस्तिसावा समाप्त.
=============================
अध्याय ३६ वा
परान्नदोष - धर्माचरण


।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
।। श्री गुरुभ्यो नम: ।। श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारक सिद्धमुनींच्या पाया पडून भक्तिभावाने हात जोडून म्हणाला, "स्वामी, तुमचा जयजयकार असो. या संसारसागरातून सर्वांना सुखरूप तारून नेण्यास तुम्हीच समर्थ आहात. तुम्ही अविद्यारूप अंधार नाहीसा करणारे प्रत्यक्ष सूर्य आहात. मी आजपर्यंत अज्ञानरुपी अंधारात झोपलो होतो; पण हे कृपासागरा, तुम्ही मला जागे केलेत. अज्ञानरुपी अंधार नाहीसा करणारे तुम्ही भास्कर आहात. तुम्ही मला गुरु म्हणून लाभल्याने मी हा भवसागर तारून गेलो आहे. श्री गुरुचरित्राची यापुढील कथा सांगण्याची कृपा आपण करावी. श्रीगुरुचरित्रामृत कितीही ऐकले तरी माझे मन तृप्त होत नाही. श्री गुरूंच्या आणखी लीला ऐकण्यास मी आतुर झालो आहे." नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धयोगी म्हणाले, "आता पुढची कथा लक्षपूर्वक ऐक. श्रीगुरु नृसिंहसरस्वती गाणगापुरात असताना त्यांचे माहात्म्य सर्वतोमुखी झाले. ते सगळे मी सांगू लागलो तर ते कधीच संपणार नाही. श्रीगुरूंच्या सर्व लीला सांगणे कुणालाही शक्य होणार नाही. मी तुला सारांशरूपाने सांगतो, ते ऐक."
त्या गाणगापुरात एक बहुश्रुत, वेदज्ञ ब्राह्मण होता. तो कर्ममार्गी होता. परमज्ञानी होता. तो कुणाकडून दान घेत नसे. कुणाच्याही घरी भोजनासाठी जात नसे. तो कोणाशीही वादविवाद घालीत नसे. तो चुकूनसुद्धा कधी खोटे, असत्य बोलत नसे. तो नेहमी पाच घरी कोरडी भिक्षा मागून पोट भरीत असे. त्याची पत्नी त्याच्या अगदी उलट होती. ती सदैव उद्विग्न असे. पतीशी नेहमी भांडण करीत असे. अन्नाची मोठी लोभी होती. त्याकाळी गाणगापुरात अनेक श्रीमंत लोक येत असत व सहस्त्रभोजन घालीत असत. गावातले असंख्य ब्राह्मण तेथे भोजनासाठी जात असत व त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन सहस्त्रभोजनाचे रसभरीत वर्णन करीत. ते ऐकून ती स्त्री मनातल्या मनात म्हणे, "माझे नशिबच खोटे ! मला स्वप्नातही असले गोडधोड खायला मिळत नाही. या दरिद्री ब्राह्मणाशी लग्न करून मी मोठीच चूक केली. केवळ याच्यामुळे मला भोजनाला जाता येत नाही. माझे पूर्वजन्मीचे पाप म्हणूनच मला असे दारिद्र्यात दिवस काढावे लागत आहेत. गावातल्या इतर बायका किती भाग्यवान ! त्यांना त्यांच्या पतीबरोबर भोजनाला जाता येते. माझा पती कधीही परान्न घेत नाही. त्यामुळे मलाही भोजनाला जात येत नाही. माझे नशीबच फुटके, दुसरे काय ? परमेश्वरा, मी काय करू ? " असे ती नेहमी दुःख करीत असे.
असेच एकदा एका श्रीमंत माणसाने आपल्या पितरांच्या श्राद्धानिमित्त गाणगापुरात ब्राह्मभोजनाचा बेत आखला होता. त्याने गावातील अनेक दाम्पत्यांना भोजनाचे निमंत्रण दिले होते. ते पाहून ती ब्राह्म ती स्त्री आपल्या पतीस म्हणाली, " आज आपल्या गावात एका श्रीमंत ब्राह्मणाने पितृश्राद्धानिमित्त सुग्रास भोजन देण्याचे ठरविले आहे. आपणही त्या भोजनाला जाऊ या. निदान एक दिवस तरी आपल्याला चांगले गोडधोड खायला मिळेल. तिथे वस्त्रे, दक्षिणाही मिळणार आहे. मला तिथे जाण्याची फार इच्छा आहे. तुम्हाला यायचे नसेल तर मला तरी जाण्याची परवानगी द्या." त्यावर तो ब्राह्म म्हणाला, "परान्न न घेण्याचे माझे व्रत आहे. त्यामुळे मी मुळीच येणार नाही. तुला जायचे असेल तर खुशाल जा." त्याने अशी परवानगी देताच ती भोजनासाठी म्हणून त्या श्रीमंत गृहस्थाकडे गेली. तिला पाहून तो गृहस्थ म्हणाला, " तुम्ही एकट्या कशा आलात ? मी दांपत्यभोजन घालीत आहे. तुमचा पती कोठे आहे ? भोजनासाठी तुमच्या पतीलाही घेऊन या." हे ऐकताच तिच्यापुढे मोठाच प्रश्न उभा राहिला. येथे भोजनाचे निमंत्रण आहे ते फक्त दाम्पत्यांस, माझा पती तर परान्न घेत नाही. तो इथे कधीही येणार नाही. तो आला नाही तर मला एकटीला भोजन मिळणार नाही. आता काय करावे ? मग ती श्रीगुरू नृसिंहसरस्वतींकडे गेली. त्यांच्या पाया पडून ती म्हणाली, "स्वामी, गावात दांपत्यभोजनाचा कार्यक्रम आहे. माझा पती परान्न घेत नाही, म्हणून तो येत नाही. आपणच त्याला समजाविले तर तो माझ्याबरोबर भोजनासाठी येण्यास तयार होईल." तिचे हे बोलणे ऐकून श्रीगुरुंना हसू आले. मग ते तिच्या पतीला म्हणाले, "अरे, तुझ्या पत्नीला मिष्टान्न खाण्याची तीव्र इच्छा आहे, म्हणून तू तिच्याबरोबर भोजनाला जा. तू तिची इच्छा पूर्ण कर. कारण कुलस्त्रीचे मन कधीही खिन्न असू नये." श्रीगुरुंनी असे सांगितले असता तो ब्राह्म हात जोडून म्हणाला, "स्वामी, परान्न न घेण्याचा माझा नेम आहे, परंतु तुमची आज्ञा मला शिरसावंद्य आहे. जो आपल्या गुरूची आज्ञा मानीत नाही, त्याला भयंकर अशा रौरव नरकात जावे लागते, म्हणून मी पत्नीबरोबर भोजनाला जाईन."
मग श्रीगुरूंचा निरोप घेऊन ते दांपत्य भोजनासाठी गेले. आज आपणास सुग्रास भोजन मिळणार या विचाराने त्या ब्राह्म स्त्रीस मोठा आनंद झाला. ती दोघे पानांवर बसली.अन्नवाढप सुरु झाले. भोजनाला सुरुवात झाली. त्यावेळी त्या ब्राह्म स्त्रीला एक विलक्षण अशुभ दृश्य दिसले. आपल्या पानातील अन्न डुकरे आणि कुत्रे खात आहे. ते दृश्य पाहून घाबरलेली ती स्त्री एकदम पानावरून उठली. भोजन करीत असलेल्या इतर ब्राह्मणांना व आपल्या पतीला आपण काय पहिले ते सांगितले. मग ती आपल्या पतीसह घरी परत आली. ती पतीला म्हणाली, " तुम्ही कुत्र्याने व डुकराने उष्टे केलेले अन्न खाल्लेत, असे मला दिसले. मला याबद्दल क्षमा करा. तुम्ही नको नको म्हणत असतानाही मी तुम्हांला भोजनाचा आग्रह केला, माझेच चुकले." हे ऐकून त्या ब्राह्मणास अतिशय राग आला. तो दुःखाने म्हणाला, " माझे दुर्दैव म्हणून तुझ्याबरोबर भोजनाला आलो. माझा नेम तर मोडलाच. शिवाय कुत्र्याने व डुकराने तोंड लावलेले अन्न खावे लागले."
त्यानंतर तो ब्राह्म पत्नीसह श्रीगुरुंच्याकडे आला. दोघांनी श्रीगुरुंना भक्तिभावाने नमस्कार केला. तेव्हा श्रीगुरू हसत हसत त्या ब्राह्मपत्नीला म्हणाले, "काय ? परान्नाचे सुख कसे वाटले ? परान्न घेत नाही म्हणून तू सदैव आपल्या पतीला नावे ठेवीत होतीस. आता तुझी इच्छा पूर्ण झाली ना ? " श्रीगुरू असे म्हणाले असता ती स्त्री श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाली, "स्वामी, मला क्षमा करा. मी खरोखर अज्ञानी आहे. माझ्या हव्यासापायी माझ्या पतीचा व्रतभंग झाला. मी त्यांना हट्टाने परान्नासाठी नेले. मी मोठाच अपराध केला आहे. मला क्षमा करा."
मग तो ब्राह्म श्रीगुरुंच्या पाया पडून म्हणाला, " या माझ्या पत्नीमुळे माझा नेम मोडला. ही माझी पत्नी नाही. वैरिणी आहे. हिच्यामुळे माझ्या हातून नेम मोडण्याचे पाप घडले आहे. आता मी काय करू ? " त्यावर श्रीगुरू हसून म्हणाले, "चिंता करू नकोस. तू तुझ्या पत्नीची परान्नाची वासना पुरविली आहेस. आता तिचे मन तृप्त झाले आहे. आता ती पुन्हा कधीही परान्नाची इच्छा करणार नाही. शिवाय तू तिकडे भोजनासाठी गेलास तो आमच्या आज्ञेने, त्यामुळे तुला कसलाही दोष लागणार नाही. आता मी तुला आणखी एक सांगतो. जर एखाद्या ब्राह्मणाला श्राद्धकर्माच्यावेळी योग्य ब्राह्म मिळाला नाही, त्याचे ब्राह्मणाअभावी कार्य अडून राहिले, तर तू त्याच्याकडे भोजनाला जावेस. त्यामुळे तुझ्या हातातून धर्मकार्य घडेल; पण अशा वेळी तू गेला नाहीस तर त्याचा शाप तुला लागेल." श्रीगुरुंनी असे सांगितले असता त्या ब्राह्मणाने श्रीगुरुंना साष्टांग नमस्कार घातला व कोणाकडे अन्न घ्यावे, कोणाकडे भोजनास जाऊ नये असे विचारले असता श्रीगुरू म्हणाले, "कोणाकडे भोजनाला जावे ते प्रथम सांगतो, ते लक्षपूर्वक ऐक. आपले गुरु, शिष्य, वैदिक ब्राह्म, आपले मामा, सासरे, सख्खे भाऊ, सज्जन मनुष्य यांच्याकडे भोजन केल्यास कोणताही दोष लागत नाही. एखादा ब्राह्म ब्राह्मविना अडला तर त्याच्या घरी भोजन घ्यावे. त्यावेळी गायत्रीमंत्र जप करावा म्हणजे कोणताही दोष लागत नाही. आता अन्न वर्ज्य करण्याची घरे सांगतो. त्याचे सविस्तर विवेचन स्मृतीचंद्रिकेत केले आहे. ते खूप मोठे आहे. ते मी तुला सारांशरूपाने सांगतो, ऐक. आपल्या आई-वडिलांकडून आपली सेवा करून घेणारा, धनलोभी, आपल्या बायकामुलांचे हाल करणारा, गर्विष्ठ, चित्रकार, मल्ल असलेला ब्राह्म, वीणावादक, समाजाने बहिष्कृत केलेला, याचकवृत्तीचा, स्वतः स्वतःची स्तुती करणारा, परनिंदा करणारा, क्रोधी, पत्नीने टाकलेला, तामसी वृत्तीचा, कंजुष, दुराचारी, ढोंगी, व्यभिचारी, निपुत्रिक, विधवा स्त्री, स्त्रीच्या अधीन असलेला पुरुष, ब्राह्म असून सोनारकाम करणारा, अति यज्ञ करणारा, लोहार, शिंपी, धोबी, दारू तयार करणारा, आपल्या जाराबरोबर राहणारी बाहेरख्याली स्त्री, चोर, कपटी, पतिताकडून धन घेणारा, सौदागर, देवभक्ती न करणारा, जुगारी, स्नान न करता भोजन करणारा, संध्यावंदन न करणारा, कधीही दान-धर्म न करणारा, आपल्या पितरांचे श्राद्धकर्म न करणारा, दांभिकपणे जप करणारा, पैसे घेऊन जप करणारा, दुसऱ्यावर केलेले उपकार बोलून दाखविणारा, व्याजाने पैसे देणारा, विश्वासघातकी, कुलपरंपरा मोडणारा, हिंसक-खुनी, आशाळभूत, परान्न घेणारा, पंचमहायज्ञ न करणारा, घरच्या अन्नाची निंदा करणारा व परान्नाची प्रशंसा करणारा, परगृही राहणारा अशा लोकांच्याकडे कधीही भोजनास जाऊ नये. अशा ठिकाणी भोजनास गेल्यास त्या त्या यजमानाचे दोष आपल्याला लागतात, म्हणून अशा यजमानाच्या घरी भोजन घेऊ नये. त्या ऐवजी भूमिदान, सुवर्णदान, गज-अश्व-रत्न दान केल्यास दोष लागत नाही. परान्न घेतल्यामुळे जसे दोष लागतात त्याप्रमाणे परस्त्रीगमन केल्यास नरकवास भोगावा लागतो. अमवास्येला परान्न घेतल्यास मासपुण्य जाते. आपल्या कन्येला पुत्र झाल्याशिवाय तिच्या घरी भोजनास जाऊ नये.त्याचप्रमाणे सूर्य-चंद्रग्रहणाच्या दिवशी अन्न घेऊ नये. सुवेर किंवा सुतक असलेल्याच्या घरी भोजन करू नये. ब्राह्मणांनी जर आपला आचारधर्म पाळला, तर त्याला कधीही दैन्य -दारिद्र्य भोगावे लागत नाही. सर्व देव-देवता त्याच्या अंकित होतात. त्याला महासिद्धी प्राप्त होतात. आजकाल ब्राह्म उन्मत्त झाले आहेत, म्हणून त्यांना दैन्य, दारिद्र्य भोगावे लागत आहे."
श्रीगुरुंचे हे कथन त्या ब्राह्मणाने श्रद्धापूर्वक ऐकले. पुढे ' आपण मला आचारधर्म सांगावा ' अशी विनंती त्या ब्राह्मणाने केली असता श्रीगुरू म्हणाले, " पूर्वी नैमिषारण्यात सर्व ऋषीमुनी यांनी पराशरांना हाच प्रश्न विचारला होता. त्यावेळी पराशरांनी सर्वांना आचारधर्म विस्तारपूर्वक सागितला होता. तोच मी तुला थोडक्यात सांगतो. प्रत्येकाने पहाटे लवकर उठावे. गुरुस्मरण करावे. ब्रह्मा-विष्णू-महेश यांचे ध्यान करावे. सूर्यादी नवग्रहांचे स्मरण करावे. सनकादिकांचे स्मरण करावे. 'प्रातःस्मरामि' ने प्रारंभ होणारे प्रातःस्मरणीय श्लोक म्हणावेत. हे सर्व अगोदर शौचमुखमार्जन करून, हातपाय धुवून, स्वस्थ बसून करावे. स्नानापूर्वी व नंतर आचमन करावे. त्याचप्रमाणे झोपण्यापूर्वी, उठल्यावर, भोजनापूर्वी, भोजनानंतर, जांभई किंवा शिंक आल्यावर, लघुशंका व शौच केल्यावर, वात सरला असता, वाईट दृश्य दिसले असता आचमन करावे. आचमनासाठी पाणी मिळाले नाही तर डोळे व कान यांना स्पर्श करावा. ब्राह्मणाच्या उजव्या कानाजवळ सूक्ष्मरुपात अग्नी-वायू-आपदेवता, चंद्र, सूर्य, वेद व वरूण या सात देवता असतात.
डोक्यावर उपरणे बांधून व जानवे उजव्या कानात अडकवून नैऋत्य दिशेस शौचास बसावे. खाली मान घालून बसावे.दिवसा उत्तरेकडे व रात्री दक्षिणेकडे तोंड करून बसावे. मौन पाळावे. इकडे-तिकडे पाहू नये. उभ्याने लघुशंका करू नये. शौचास पाणी नाही मिळाले तर मातीने स्वच्छता करावी; पण हे केवळ अपवाद म्हणून. नुसत्या मातीवर किंवा हिरव्या गवतावर बसू नये. मातीने हात स्वछ करावेत. यानंतर श्रीगुरुंनी स्नानविधी सांगितला. स्नान केव्हा करावे, स्नानासाठी कोणते पाणी योग्य, कोणते अयोग्य तेही सांगितले. स्नानानंतर कोणती वस्त्रे परिधान करावीत, भस्म व चंदन कसे लावावे ते सांगून संध्यावंदन, गायत्रीमंत्र, त्यातील चोवीस अक्षरे, त्यांच्या देवता, गायत्री ध्यान, गायत्री जप, जपासाठी योग्य वेळ, आसन, जप करताना कसे बसावे, ॐकाराचा दैवी अर्थ इत्यादी सर्व तपशीलाने सांगितले. पंचमहायज्ञ, वैश्वदेव का करावेत, कसे करावेत, तर्पणाचे प्रकार कोणते इत्यादी दैनंदिन कर्मकांड यांविषयी सविस्तर सांगितले.
अन्नदानाचे महत्व, अतिथीचे स्वागत कसे करावे, अतिथीसेवेने कोणते पुण्य मिळते, अतिथीची उपेक्षा केल्यास कोणता दोष लागतो?, हे सांगून भोजनपत्रे कशी असावीत, कोणत्या दिशेने तोंड करून भोजनास बसावे, भोजनापूर्वी आचमन, चित्राहुती, प्राणाहुती कशा द्याव्यात ? भोजन कसे व किती वेळात करावे, कोणाबरोबर भोजन करावे, भोजन कोठे करावे, कोठे करू नये, अन्न उष्टे केव्हा होते, रात्री भोजनाच्या वेळी दिवा प्रज्वलित का ठेवावा, भोजनानंतर पाणी कसे प्यावे, कसे पिऊ नये, कोणते पाणी घ्यावे, भोजन संपल्यावर हात कसे धुवावेत, चुळा किती भराव्यात, कोणत्यावेळी, कोणत्या तिथीला काय खावे, काय खाऊ नये, भोजनानंतर तांबूल का खावा ? कोणी खावा इत्यादी बारीकसारीक गोष्टींविषयी माहिती देऊन त्यानंतर झोपण्याचा विधीही सविस्तर सांगितला. स्त्रीसंग केव्हा करावा, केव्हा करू नये इत्यादी संपूर्ण कर्मकांड शास्त्राच्या आधारे सांगितले. एकूणच आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन केले. नैमिषारण्यात पराशरांनी सर्व ऋषीमुनींना जो आचारधर्म सांगितला, तोच श्रीगुरुंनी त्या ब्राह्मणास नीट समजावून सांगितला. मग श्रीगुरू त्याला म्हणाले, " या आचारधर्माचे निष्ठापूर्वक पालन केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तो पूर्ण सुखी होतो."
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'परान्नदोष - धर्माचरण' नावाचा अध्याय छत्तिसावा समाप्त.
==============================
अध्याय ३७ वा
गृहस्थाश्रमाचा आचारधर्म

।। ॐ श्री गणेशाय नम: । श्री सरस्वत्यै नम: ।।
।। श्री गुरुभ्यो नम: ।।श्री कुलदेवतायै नम: ।।
नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, "त्या ब्राह्मणाला श्रीगुरुंनी आचारधर्म सविस्तर सांगितल्यावर पुढे काय घडले ? त्याला त्यांनी कोणता उपदेश केला ?" नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, "श्रीगुरू म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा सगुण अवतार. त्यांनी एका पतिताला ज्ञानी करून त्यास वेद म्हणावयास लावले होते. त्यांना अगम्य असे काहीच नाही. त्रैमूर्तीचा अवतार, भक्तजनांचा कल्पवृक्ष अशा श्रीगुरुंनी गृहस्थाश्रमात ब्राह्मणाने आपले आचरण कसे ठेवावे, कोणता आचारधर्म पाळावा, काय करावे, काय करू नये ते सविस्तर सांगितले. श्रीगुरुंनी सांगितलेला आचारधर्म मी तुला सांगतो, तो लक्षपूर्वक ऐक. श्रीगुरू म्हणाले ," गृहस्थाने अग्निहोत्रासाठी लाकडे, तीळ, कृष्णाजिन इत्यादींचा सदैव संग्रह करावा. घरी पोपट, सारसपक्षी पाळावेत. सर्व पातकांचा नाश करणारी गाय पाळावी. आता देवपूजेचे विधान सांगतो. घर सदैव झाडून स्वच्छ ठेवावे. देवापुढे सुंदर रांगोळ्या काढाव्यात. यथाशास्त्र पूजेचे सर्व साहित्य ठेवावे. त्रिकाल देवपूजा करावी. त्रिकाल शक्य झाले नाही तर निदान प्रातःकाळी पूजा करावी. प्रातःकाळी न जमल्यास मध्यान्हकाळी पूजा करवी. संध्याकाळी समंत्रक देवाला फुले वाहावीत. ब्राह्मणकुळात जन्मास येऊनही जो देवपूजा करीत नाही, वैश्वदेव करीत नाही त्याला यमयातना भोगाव्या लागतात. उदक, अग्नी, मानस, सूर्य, स्थंडिलस्थ प्रतिमा, यज्ञ, धेनू, ब्राह्मण, गुरु यांची पूजा करावी. आपल्या गुरूची मानसपूजा केली असता त्रैमूर्ती भगवान प्रसन्न होतात. पूजकाला चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. षोडशोपचार पूजा करावी. पूजा करताना वैदिक, पौराणिक मंत्र म्हणावेत. देवापुढे दीप प्रज्वलित करावा. देवांवरील निर्माल्य काढून ते नैऋत्य दिशेला ठेवावे. प्रथम शंख, घंटा यांची पूजा करावी. नंतर देवाची पूजा करावी.
पूजेला प्रारंभ करण्यापूर्वी प्राणायाम करावा. न्यास करावेत.गायत्रीमंत्र म्हणावा. मग ज्या देवतेची पूजा करावयाची आहे त्या देवतेचे ध्यान, पुरुषसूक्तातील सोळा ऋचांचा उच्चार करून, देवाला पाद्य अर्घ्य इत्यादी सोळा उपचार अर्पण करावेत. यालाच षोडशोपचार पूजा असे म्हणतात. पूजेसाठी देवाला वहावयाची फुले ताजी, सुगंधी असावीत. ती किडकी-सडकी, गळून पडलेली, पायदळी तुडविलेली नसावीत. जाईजुई, मोगरा, शेवंती, चाफा, कमळ इत्यादी फुले देवांना आवडतात. गणपतीला तुळस वाहू नये, देवीला दुर्वा वाहू नयेत. देवाला धूप, तूप, नैवेद्य अर्पण करावा. देवाला मंत्रपूर्वक साष्टांग नमस्कार घालावा. आपले गुरु, माता, पिता व सत्पात्री ब्राह्मण देवस्वरूप असतात, त्यांनाही नमस्कार करावा. नमस्कार एकहस्ते करू नये.
यानंतर श्रीगुरुंनी उत्तरपूजा कशी करावी, वैश्वदेवाचा विधी, अन्नदानाचे महत्व, अतिथी सेवा, भोजनाचे नियम, भोजनपात्रे कोणती असावीत, आपोशन, चित्राहुती, प्राणाहुती कशा-किती घालाव्यात हे सांगून भोजन कसे करावे, किती वेळात करावे, घास केवढे व किती घ्यावेत, भोजनाला कोणाबरोबर बसावे, कसे बसावे, कोणत्या स्थानी बसावे, कोठे बसू नये, यज्ञोपवीत कसे ठेवावे, अन्न उष्टे केव्हा होते, भोजनाच्यावेळी दिवा का असावा, पाणी कसे, केव्हा प्यावे, भोजनाच्या वेळी वस्त्र कोणते असावे, भोजन संपल्यावर हात-तोंड कसे धुवावे, किती चुळा भराव्यात हे सर्व समजावून सांगितले. कोणते अन्न शिळे समजावे, कोणाच्या स्पर्शाने अन्न अग्राह्य होते, कोणते पदार्थ खावेत, कोणते खाऊ नयेत, भोजनानंतर तांबूल कसा खावा, कोणी खावा, कोणी खाऊ नये, हे सविस्तर सांगितल्यावर झोपण्याचा विधी सांगितला. कोणत्या लाकडाची खाट असावी, कोठे झोपावे, कोठे झोपू नये, झोपताना कोणत्या दिशेला पाय करावेत, रात्री झोपण्यापूर्वी कोणती स्तोत्रे म्हणावीत हे सांगून, स्त्रीसंग केव्हा करावा, केव्हा करू नये, स्त्रीसंगाच्या वेळी पतीपत्नीच्या मनःस्थितीचा गर्भावर काय परिणाम होतो इत्यादी सूक्ष्म विचारही श्रीगुरुंनी सांगितले.
इतके सर्व सांगितल्यावर श्रीगुरू त्या ब्राह्मणाला म्हणाले, अशा रीतीने विचारपूर्वक शास्त्रविहित आचरण केले असता मनुष्याची सर्व क्षेत्रांत भरभराट होते. त्याला उत्तम यश प्राप्त होते. तो दीर्घायुषी होतो. तो देवांना वंद्य होतो. त्याच्या घरी कामधेनू येते. त्याच्या घरी लक्ष्मी अखंड राहते. त्याला पुत्रपौत्रादिंची प्राप्ती होते. त्याला कधीही अपमृत्यू, अकाली मृत्यू येत नाही. त्याच्या हातून कोणतेही पाप होत नाही. त्याला कळीकाळाची भीती राहत नाही. तो ब्रह्मज्ञानी होतो, म्हणून प्रत्येक गृहस्थाने या प्रकारे आचरण ठेवावे."
श्रीगुरुंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या पाया पडून म्हणाला, "स्वामी, आज आपण केलेल्या उपदेशाने माझा उद्धार झाला. आपण कृपासागर आहात. भक्तांचा उद्धार करण्यासाठीच आपला अवतार झाला आहे. आज माझा अज्ञानरुपी अंधार नाहीसा झाला आहे. आपण माझ्या अंतःकरणात ज्ञानज्योत प्रज्वलित केली आहे."
असे बोलून त्या ब्राह्मणाने श्रीगुरुंच्या चरणांवर लोटांगण घातले. त्यावेळी संतुष्ट झालेले श्रीगुरू त्याला म्हणाले, "आता तुला भिक्षेला जाण्याची गरज नाही. आचारधर्माचे पालन करून तू सुखाने राहा. तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुला कन्या-पुत्र होतील याबद्दल जराही शंका बाळगू नकोस." श्रीगुरुंनी असा आशीर्वाद दिला असता, त्या ब्राह्मणास अतिशय आनंद झाला. त्याने श्रीगुरुंनी सांगितलेल्या आचारधर्मांचे पालन केले, त्यामुळे त्याच्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या."
ही कथा सविस्तर सांगून सिद्धयोगी नामधारकास म्हणाले, " श्रीगुरूचरित्र अत्यंत दिव्य आहे. याचे जो श्रवण करील तो मूर्ख असला तरी ब्रह्मज्ञानी होईल."
अशारीतीने श्रीगुरुचरित्रामृतातील 'गृहस्थाश्रमाचा आचारधर्म' नावाचा अध्याय सदतिसावा समाप्त.
।।श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ।।

====================================

1 comment: