Jul 16, 2016

॥ नमस्काराष्टक ॥


॥ श्रीगणेशाय नम: ॥ ॐ द्रां दत्तात्रेयाय नमः ॥

अथ श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्र प्रारंभ: I 


सदा प्रार्थितो श्रीगुरूच्या पदासी I 

धरितो शिरी वंदितो आदरेसी I 

धरोनी करी तारी या बाळकासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।१।।


मती हीन मी दीन आहे खरा हो I 

परी दास तुझा करी पांखरा हो I 

जसे लेकरू पाळीते माय कुशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।२।।


लडिवाळ मी बाळ अज्ञान तुझा I 

गुरुवाचुनी पांग फेडील माझा I 

तुझ्यावीण दुजा कुणी ना आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।३।।


पिता माय बंधु सखा तूची देवा I 

मुले मित्रही सोयरे व्यर्थ हेवा I 

कळोनी असे भ्रांती होई आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।४।।


चरित्रे गुरूची करी नित्य पाठ I

जया भक्ती लागे पदी एकनिष्ठ I 

तयाचे कुळी दीप सज्ञानराशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।५।।


बसे उंबरासन्निधी सर्वकाळ I 

जनी काननी घालवी नित्यकाल I 

तया सदगुरुचे नाम कल्याणराशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।६।।


श्रमोनी गुरूपाशी तो म्लेंच्छ आला I

तया स्फोटरोगातुनी मुक्त केला I 

कृपेने तसे स्वामी पाळी आम्हासी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।७।।


सती अनसूया सुधी आदिमाता I 

त्रयमूर्ती ध्यानी मनी नित्य गाता I 

हरे रोगपीडा दारिद्रसी नाशी I 

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।८।।


करोनी मनी निश्चयो अष्टकांचा I 

जनानो करा पाठ दत्तस्तुतीचा I 

करी माधवाच्या सुता रामदासी I

नमस्कार हा स्वामी दत्तात्रेयासी ।।९।।

।।इति श्रीगुरू श्रीगुरुदत्तात्रेयनमस्कारस्तोत्र संपूर्णम II


No comments:

Post a Comment